समष्टी व अभिव्यक्ती

   

कवींविषयी प्लेटोचे मत बरे नव्हते. 'रिपब्लिक' मध्ये तो म्हणतो की कवी हे सर्व असत्यवचनी व छद्मपूजक असून, ही सगळी झुंड अथेन्समधून हुसकून हद्दीपलीकडे पोहोचवणे हेच धोरण योग्य होय. उलटीकडून प्लेटोविषयी कवींचे मत कितपत बरे होते हे कोणीही अोळखू शकेल. एकूण कसे तर कोणते लेखन समष्टीस पोषक व कोणते अनिष्ट, ही वर्दळ तशी जुनीच. एकीकडे लेखक व दुसरीकडे स्वयमेवमृगेंद्र असलेले संस्कृतिरक्षक हे दोन पक्ष प्रस्तुत चर्चेत प्रतिस्पर्धी असणे हेही नैसर्गिकच होय. 


अमुकतमुक लेखन हे धर्मसंस्थेची व कुटुंबसंस्थेची खिल्ली उडवते, अमुकतमुक लेखन हे अोंगळ होय, अमुकतमुक लेखन लैंगिकतेने लिडबिडलेले होय, व म्हणूनच अमुकतमुक लेखन बंद करणे निकडीचे होय अशी अोरड नेहमीच ऐकू येते. जो लेखक प्रस्तुत टीकेचे लक्ष्य बनतो तो भेद्रटपणे असे मुळमुळीत समर्थन देतो की 'हे तुमचे म्हणणे पूर्णपणे खरे नव्हे, लक्षपूर्वक परीक्षण केले तर असे दिसते की अमुकतमुक दोष हे गुणच होत व तसे तसे लेखन तेथे तेथे रसोत्कर्ष म्हणून गरजेचेच होय.' पण 'हो, मी लिहिले ते लिहिले, न रुचेल तर ते पठण न करणे हेच इष्ट' असे बेफिकीर प्रत्युत्तर ऐकू येणे तसे दुर्मीळ! शेपूट दुमडून बसलेलेच अधिक. पण खूप पूर्वी ऐकलेली अशी एक गोष्ट इथे नमूद करतो. तेंडुलकरलिखित 'गृध्र' नटकथेतील एक प्रसंग: रूबी ही लग्न न केलेली एक मुलगी गरोदर असते. तिची बहिण लक्ष्मी तीस जमिनीवर फेकते, व तेणेकरून रूबीचे पोट पडते. रक्त येऊन तिची चड्डी भिजते. इथे सेन्सॉर कमिटीने म्हटले की योनीतून स्त्रवलेले रक्त स्टेजवर दिसणे अवैध होय; तेणेकरून संस्कृती नष्ट होईल. तर दिग्दर्शक श्रीधर वर्टीनी स्वत:शी असे म्हटले की कमिटीस सरळसरळ विरोध करणे हे मोठे जिकिरीचे प्रकरण, व तसे केले तरी यश मिळेल न मिळेल. उलट तिची टोपी उडवणे हेच सोपे व संयुक्तिक ठरेल. खेळ सुरू होणेपूर्वी ते स्पीकरवरून निवेदन करीत की 'अमुकतमुक प्रसंगी रूबीची चड्डी हिरवी दिसेल. तेच रक्त असे समजणे!' 


सोवळे नेसून कोणतीही बोली वृद्धिंगत होत नसते. सर्व तऱ्हेचे लेखन बोलीत असणे हे समृद्धीचे लक्षण होय. जर वैखरी प्रगल्भ होणे असेल तर तीत जसे ललितगद्य उत्पन्न होणे गरजेचे, निसर्गपद्य उत्पन्न होणे गरजेचे, तत्वचिंतन उत्पन्न होणे गरजेचे, बीजगणित उत्पन्न होणे गरजेचे, तसेच पोती भरभरून डिटेक्टिव पुस्तके, पिवळी पुस्तके, चटोर पुस्तके उत्पन्न होणे हेही गरजेचे होय. जितकी भंकस व रद्दी पुस्तके इंग्रजीत असतील तितकी ती अन्यत्र कुठेही नसतील. पण हे इंग्रजीचे वैगुण्य नसून शक्तिस्थळ होय. एक असुर शी करून स्वत:चे ढुंगण कसकसे पुसतो हे वर्णन एक फ्रेंच लेखक चवीने करतो. एक इंग्रजी लेखक दशसहस्र शब्द असलेली एकच अोळ लिहितो. एक अमेरिकन लेखक रोमन लेखनपद्धतीतील एक स्वर संपूर्णपणे अव्हेरून अख्खी गोष्ट लिहितो. बीभत्स लेखन, अवघड लेखन, विक्षिप्त लेखन हे सर्व स्वत:चे बळ घेऊन येते, व बोलीस दणदणीत बनवते. हीच तिची खरी धट्टीकट्टी श्रीमंती असते. 


जसजशी बोलीवरील बंधने कमी होतील तसतशी समष्टीची सहनशक्ती मोठी होते. जे लेखन पूर्वी रुचत नसे ते रुचते. जशी जुनी पिढी 'नभी लोळती इंद्रधनूची जुळी दुहेरी वेटोळी' हे कवन ऐकून मुग्ध होते, तशी नवी पिढी 'उंदिर मेले बिडी पीउनि' हेही कवन स्वीकृत करते. जी गोष्ट 'ऊन मी म्हणत होतं' इथून सुरू होते, ती पलिते विझत येतेवेळी 'मी असे सुचवतो की धृतशरधनुष्य अशी जी देवस्वरूप विभूती तीस तुम्ही निमूळते टोकेरी शस्त्र घेऊन जखम करणे इष्ट होईल' इथपर्यंत पोहोचते. जुने मरते, पण फेस भर्कन उसळतो तसे पुन:श्च जिवंत होते. 


इंग्लंडमधील थोर तत्त्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल्लचे 'अॉन लिबर्टी' हे पुस्तक प्रस्तुत चर्चेत अत्यंत महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय होय. 'हवे तसे लेखन करणेस किती मोकळीक असणे संयुक्तिक' ही चर्चेतील मेख नसून 'लेखन करणेवर निर्बंध बसवणेस समष्टीकडे किती दमनशक्ती उपलब्ध असणे संयुक्तिक' ही होय, असे तो सूचित करतो. तो म्हणतो की, विशिष्ट लेखन अनिष्ट समजून ते करणेस अडसर उभे करणे, म्हणजे 'मी सत्य अोळखून असून इतर सर्व मते खोटी समजतो' अशी अहंमन्य वृत्ती प्रदर्शित करणे होय. 'मी चुकू शकतो, समष्टी चुकू शकते, विरुद्ध मतही बरोबर असू शकते' हे जो समजतो, तोच सहिष्णु असतो. 'सर्व मते ऐकू, तोलून बघू व बुद्धीस योग्य तीच घेऊ' असे तो म्हणतो. अप्रिय सत्य ऐकणे व बोलणे हे दोन्ही समष्टीस अत्यंत हितकर होय. जिथे लेखक बंधमुक्त असतो, जिथे अभिव्यक्तीस गिळंकृत करणेस दंडशक्ती सदोदित तोंड उघडून उभी नसते, तिथेच समष्टीतील प्रत्येकजण निर्भयपणे श्वसन करू शकतो.


✳ ✳