सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक दुसरा

ललित

सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक दुसरा

- जयदीप चिपलकट्टी

पहिल्या अंकाचा दुवा

अंक दुसरा

(कुरुक्षेत्राच्या धुळीमध्ये, गेल्या अंकातले संवाद जिथे झाले त्याच्याच जवळपास, अंदाजे वीस हात व्यासाचं एक गोलाकार रिंगण आखण्यात आलेलं आहे. दाटीवाटी करून उभ्या असलेल्या सैनिकांनी त्याचा परीघ वेढलेला दिसतो. रिंगणाच्या मधोमध अश्वत्थामा एकटा बसला आहे, आणि आजूबाजूला कोणीसुद्धा नसून आपलेच आपण विचारात गढलो आहोत असा अभिनय करतो आहे.

कृपाचार्याने डोळ्यांवर काळ्या रंगाच्या रेशमी रुमालाची पट्टी बांधली आहे. रिंगणात शिरून तो अश्वत्थाम्याच्या पाठीवर चढतो आणि त्याचा कान कुरवाळतो.)

कृपाचार्य: हत्ती सुपासारखा असतो.

(सैनिक खिदळतात. कृपाचार्य खाली उतरतो आणि रिंगणाच्या कडेला येऊन स्तब्ध उभा राहतो. संजयने डोळ्यांवर पांढऱ्या रंगाच्या रेशमी रुमालाची पट्टी बांधली आहे. रिंगणात शिरून तो अश्वत्थाम्याचा पाय चाचपडतो.)

संजय: हत्ती तुळईसारखा असतो.

(सैनिक खिदळतात. संजय बाजूला होऊन कृपाचार्याच्या डावीकडे स्तब्ध उभा राहतो. मयाहुराने डोळ्यांवर तांबड्या रंगाच्या रेशमी रुमालाची पट्टी बांधली आहे. रिंगणाच्या मध्यभागी जाऊन तो अश्वत्थाम्याच्या ढुंगणावर हाताने थापटतो.)

मयाहुर: हत्ती दगडासारखा असतो.

(सैनिक खिंकाळतात. मयाहुर बाजूला होऊन संजयच्या डावीकडे स्तब्ध उभा राहतो. सीनूने डोळ्यांवर हिरव्या रंगाच्या रेशमी रुमालाची पट्टी बांधली आहे. रिंगणाच्या मध्यभागी जाऊन ती अश्वत्थाम्याची शेपटी अोढते.

सीनू: हत्ती सापासारखा असतो.

(सैनिक खिदळतात. सीनू बाजूला होऊन मयाहुराच्या डावीकडे स्तब्ध उभी राहते. कृतवर्म्याने डोळ्यांवर पिवळ्या रंगाच्या रेशमी रुमालाची पट्टी बांधली आहे. रिंगणाच्या मध्यभागी जाऊन तो अश्वत्थाम्याच्या दातावर आपला हात घासतो.)

कृतवर्मा: हत्ती भाल्यासारखा असतो.

(सैनिक खिदळतात. कृतवर्मा बाजूला होऊन सीनूच्या डावीकडे स्तब्ध उभा राहतो. कृपाचार्य, संजय, मयाहुर, सीनू आणि कृतवर्मा हळूहळू अस्वस्थपणे हलू लागतात. नीट दिसत नसल्यामुळे त्यांना एकमेकांचा अडथळा होऊ लागतो आणि अस्वस्थता वाढत जाते. आता पाचहीजण घोळका करून एका ठिकाणी जमतात आणि एकमेकांशी भांडण करण्याचा मूकाभिनय करू लागतात. सैनिक मोठ्याने खिदळताहेत. भांडण विकोपाला पोहोचताच अश्वत्थामा उठून उभा राहतो, आणि सोंड पुढे काढून एकेकाच्या रुमालाची गाठ मागून सोडवत जातो. पाचहीजण मागे वळून अश्वत्थाम्याकडे चकित होऊन पाहिल्याचा अभिनय करतात.)

कृपाचार्य: अरेच्चा! आता समजलं! अख्खा हत्ती सुपासारखा नसतो.

संजय: मलाही समजलं! अख्खा हत्ती तुळईसारखा नसतो.

मयाहुर: मलापण समजलं! अख्खा हत्ती दगडासारखा नसतो.

सीनू: मलासुद्धा समजलं! अख्खा हत्ती सापासारखा नसतो.

कृतवर्मा: मलादेखील समजलं! अख्खा हत्ती भाल्यासारखा नसतो.

(पाचहीजण एकमेकांची गळाभेट घेतात.)

अश्वत्थामा: सैनिकांनो! ह्या प्रसंगातून तात्पर्य निघतं ते असं की हत्ती सुपासारखा, तुळईसारखा, दगडासारखा, सापासारखा आणि भाल्यासारखा अंशाअंशाने जरी असला तरी पुरता नसतो. आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीबद्दल मत बनविण्यापूर्वी तिचा सर्वांगीण विचार करा. ज्याच्याशी आपलं दुमत असेल त्याच्याशी मुद्दाम बोलणं काढा, जेणेकरून तुमचे पूर्वग्रह विरून जातील आणि तुम्हाला सम्यक ज्ञान होईल.

(सैनिक जोराने टाळ्या वाजवतात. कृपाचार्य, संजय, मयाहुर, सीनू, कृतवर्मा आणि अश्वत्थामा पुढे येऊन सर्वांना नाटकीपणे नमस्कार करतात आणि रिंगणाबाहेर पडतात. खाली पडलेले पाच रुमाल उचलून घेण्यासाठी सैनिकांची झुंबड उडते. 'अरे! अरे!' असं सीनू अोरडतेच आहे, तेवढ्यात ते सगळे गायब होतात. एक ढोलकीवाला आणि एक शीघ्रकवी आता रिंगणात उतरतात, तसं सैनिकांचं लक्ष तिकडे वेधलं जातं. हा शीघ्रकवी जाताजाता संजयकडे पाहून अोळखीने नमस्कार करतो.)

संजय (शीघ्रकवीला उद्देशून): मोकाट सुटू नकोस.

शीघ्रकवी: नाही. तसा जपून वागेन. पण उत्स्फूर्त रचना करायची म्हणजे कधीकधी तोल जातोच. त्यातच मजा असते.

(हे सहाजण गलक्यापासून हळूहळू दूर जातात.)

अश्वत्थामा: (चाचरत) तात्पर्य मी बरोबर सांगितलं ना? मला खात्री वाटत नव्हती.

कृपाचार्य: हो, बरोबर सांगितलंस. पण शेवटी ती एक लोककथा आहे. अमुक तात्पर्य तिच्यातून निघतं अशी परंपरा ठरून गेलेली आहे. ती आपण जशीच्या तशी पाळावी हेच उत्तम.

अश्वत्थामा: म्हणजे?

कृपाचार्य: म्हणजे असं की कथेचं तात्पर्य काय असायला हवं हे स्वतंत्र बुद्धीने ठरवायला गेलं तर उगीच गोंधळ वाढत जातो. त्यापेक्षा ते आपलं घोकून म्हणून टाकावं. उदाहरणार्थ असं पाहा की सर्वांगीण विचार हत्तीचा करणं सोपं आहे, कारण त्याचं भलंथोरलं अंग समोर दिसतच असतं. पण प्रत्यक्ष व्यवहारात ज्यांचा करावा लागतो त्या अमूर्त संकल्पना असतात. त्यांना किती अंगं असतील याची मोजदाद अवघड असते आणि ती सगळी आपण तपासलेली आहेत ह्याचा भरवसा नसतो. आणि म्हणूनच त्यांचा सर्वांगीण विचार इतक्या सहज करता येत नाही.

कृतवर्मा: आणि त्याचबरोबर असंही आहे की डोळ्यांवर बांधून घेतलेला रुमाल पटकन काढता येतो. पण व्यवहारात आंधळ्या माणसाला डोळस करता येत नाही. तेव्हा तू सांगितलेलं तात्पर्य एक तत्त्व म्हणून जरी वाईट नसलं तरी ह्या कथेतून नेमकं सिद्ध होत नाही.

मयाहुर: समजलं. म्हणजे निदान ह्या चर्चेचं तात्पर्य असं की सर्वांगीण विचार जरूर करावा पण लोककथांचा करू नये.

सीनू: जाऊ द्या रे! (अश्वत्थाम्याला उद्देशून) तुझं काम बाकी तू छान केलंस. पाव घटका विरंगुळा झाला यात सगळं आलं. माझे पाच रुमाल तेवढे गेले.

मयाहुर: बाकीचे चार दिसत नाहीत, पण पांढरा समोर दिसतो आहे.

सीनू: कुठे?!

मयाहुर: तो बघ. त्या माणसाच्या डोक्यावर आहे.

(समोर एक सैनिक दिसतो. पांढरा रुमाल दुमडून दोन कोपरे दोन कानांमागून वर येतील अशा प्रकारे त्याने तो डोक्यावर थापला आहे. तो खाली पडू नये म्हणून रुमालाला दोन भोकं पाडून त्यांच्यामधून एक बाण केसांत आरपार अोवला आहे. त्याच्या बाजूने चालणाऱ्या सैनिकाने पाठीला ढाल बांधून घेतली आहे.

कृतवर्मा: (दोघांना उद्देशून) हा काय प्रकार आहे?!

पाठीवर ढाल घेतलेला सैनिक: आम्हाला कंटाळा आला आहे. वेळ चांगला जावा म्हणून ससा आणि कासवाची शर्यत हे सूत्र धरून आम्ही एक नाट्यप्रयोग करणार आहोत. प्रयोग असा आहे की कुरुक्षेत्रातून मी धीम्या गतीने उलटासुलटा चालत राहणार. त्यातला काही वेळ ससा माझ्या सोबतीला असेल, आणि तेव्हा आम्ही दोघे गप्पाटप्पा, हास्यविनोद असं काहीबाही करत राहू. ऐकणाऱ्यांची करमणूक व्हावी असा उद्देश आहे. गप्पांना अध्येमध्ये मुद्दाम थोडं गंभीर वळण लावू, आणि ह्यामुळे आपल्या बुद्धीला आता शीण आला आहे असा अभिनय करून ससा तिथल्या तिथे झोपून जाईल. मी एकटाच पुढे जाईन आणि नुकत्याच सुरू केलेल्या गंभीर विषयावर अंतर्मुख होऊन स्वगत बोलत राहीन. थोड्या वेळाने सशाला जाग येईल आणि पळत येऊन तो मला गाठेल, तशा आमच्या गप्पा पुन्हा सुरू होतील. असा एकूण विचार आहे. प्रयोगाला निश्चित संहिता नाही, ज्या वेळी जसे संवाद सुचतील तसे आम्ही बोलू. जे उत्स्फूर्तपणे जमेल ते खरं. शर्यत मी जिंकणार असल्यामुळे माझी इच्छा होईल तेव्हा खेळ थांबेल.

कृतवर्मा: ठीक आहे! काय वाटेल ते करा. पण नंतर आपापल्या गणात परत जा. सैन्याला शिस्त पाहिजे.

सैनिक: ती आता कशाला पाहिजे? नंतर घरीच जायचं आहे. येतो बरं का! (कासवासारखी मान हलवत निघून जातो. ससा त्याच्या पुढे दुडक्या चालीने पळत जातो.)

सीनू: नुसता थिल्लरपणा चालू आहे. जो तो म्हणतो नंतर घरीच जायचं आहे.

कृपाचार्य: ते साहजिक आहे. सुरवातीला जेव्हा अर्जुन आजारी झाला तेव्हा त्याच्याबद्दल दोन्हींही सैन्यांतून थोडीफार सहानुभूती होती. लढायला तो जे नको म्हणत होता ते प्रत्येकालाच मनातून थोडंसं म्हणायचं होतं, आणि त्यामुळे आपली लढाई अर्जुन लढतो आहे अशी एक सार्वत्रिक भावना होती. पण कृष्णार्जुनांची बडबड जी एकदा सुरू झाली ती काही केल्या थांबेना. हळूहळू सैनिक वैतागले. आणि नंतर जेव्हा अर्जुन पुन्हा जमिनीवर उताणा पडला, पुन्हा उभा राहिला आणि बडबड पुन्हा सुरू झाली तेव्हा मात्र ही सहानुभूती पुरती संपली. कधी हा प्रकार आटोपतो आणि कधी आपण घरी जातो असं ज्याला त्याला होऊन गेलं आहे.

संजय: हो, तो विषय मी काढणारच होतो. (घुटमळतो.) युद्ध रद्द होणार आहे आणि लवकरच आपण घरी जाणार आहोत असं सगळे समजताहेत. पण मला तशी शाश्वती वाटेनाशी झाली आहे.

सीनू: म्हणजे?

संजय: हा सगळा प्रकार आपण जितका मनावर घ्यायला हवा होता तितका घेतलेला नाही.

सीनू: असं का म्हणतोस?

संजय: आपण बरेच तर्कवितर्क केले. आपण म्हणालो की कृष्ण आणि अर्जुन यांचं काहीतरी साटंलोटं आहे आणि संगनमत करून ते दोघे वेळ काढताहेत. किंवा लहान मुलांची भाषा असते तशी ह्या दोघांनी गंमतीची भाषा बनवली आहे. फार धडपड करून अर्थ लावावा असं त्यात काही नाही. पण मला आता ह्यातलं काहीच बरोबर वाटेनासं झालं आहे.

कृपाचार्य: मघाशी जेव्हा अर्जुन दुसऱ्या वेळेला जमिनीवर पडला तेव्हाच नेमका सीनूच्या गाड्याचा गोंधळ झाला, आणि आपलं लक्ष तिकडून उडालं ते उडालंच. त्यावेळी ह्या दोघांचं तिथे काय चाललं होतं ते नीट बघायला हवं होतं.

संजय: इथून मला जेवढं समजलं तेवढं सांगतो. नेहमीचा घोळ इथेही झालाच. म्हणजे अर्जुनाच्या मनात काय चाललं होतं ते मला नीट कळलं नाही आणि तो जे बोलला तेही पुसटच ऐकू आलं. पण अर्जुन खाली कसा पडला ते सांगतो. मी तुम्हाला आधी म्हणालोच होतो की कृष्णाच्या मते सगळं जग त्याने निर्माण केलेलं आहे. आपल्यापैकी कुणाला ते खरं वाटलं नाही, पण अर्जुनाला बहुतेक ते पटलेलं आहे. तर आता ह्या जगात कुठले पदार्थ आहेत आणि ते कसे तयार झाले हे मध्ये केव्हा तरी कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. तो तपशील फार किचकट आहे आणि मलाही नीट समजलेला नाही, म्हणून सध्या राहू दे. पण कृष्णाचं म्हणणं असं की हे सगळे पदार्थ मिळून जे काही जग बनतं ते माझ्या अंगात सामावलेलं आहे. अकरावा अध्याय जेव्हा ह्या दोघांनी सुरू केला तेव्हा अर्जुनाने विचारलं की मला तसं दिसत का नाही? यावर कृष्ण म्हणाला की साध्या डोळ्यांनी तुला ते दिसणार नाही, तेव्हा मी तुला दिव्यचक्षू देतो. याच वेळी अर्जुन जमिनीवर उताणा पडला. यापुढे त्याला जे काही दिसलं ते मला दिसलं नाही, पण त्याची प्रतिक्रिया काय झाली तेवढं तुम्हाला सांगतो.

कृतवर्मा: मला इथून काहीसुद्धा दिसलं नाही. संजयला दिव्यदृष्टी दिली आहे आणि अर्जुनाला दिव्यचक्षू दिले आहेत. आम्हा पामरांना कुणी काही देत नाही.

संजय: अर्जुन कृष्णाला उद्देशून म्हणाला की तुला कितीतरी डोळे, कितीतरी तोंडं, कितीतरी दाढा, कितीतरी पोटं, कितीतरी मांड्या आणि कितीतरी पाय आहेत असं मला दिसतं आहे –

कृतवर्मा: म्हणतोस काय?!

संजय: आणि तुझ्या अंगातून कसलातरी वेगळाच सुगंध येतो आहे.

कृतवर्मा: म्हणजे त्याला नुसते दिव्यचक्षू दिले नसणार. दिव्यनासिकाही दिली असणार. मला तरी इथून तो म्हणतो तसं काही दिसलंही नाही किंवा कसला सुगंधही आला नाही. हत्तीघोड्यांनी कंटाळून जाऊन शेणामुताचे जे सडे इथेतिथे टाकले आहेत त्यांची दुर्गंधी मात्र येते आहे. तेही जगाचाच भाग आहेत. असं असूनही कृष्णाच्या अंगातून तो वास का आला नाही हे मला समजत नाही.

अश्वत्थामा: तुम्हा माणसांना लढाईसाठी हत्तीघोडे राबवून घ्यायला हवेत, पण त्यांचा वास नको. कृतघ्न आहात.

मयाहुर: वासाचं एक राहू दे, पण जग निर्माण करणाऱ्याला कितीतरी मांड्या आणि कितीतरी पाय का असावेत? मडकी तयार करण्यासाठी पायांनी माती मळतात तशी जग ही काही मळून तयार करायची वस्तू नव्हे.

संजय: पुढे ऐका. अर्जुन कृष्णाला म्हणाला की तुला ही जी कितीतरी तोंडं आहेत त्यांच्यात कौरवसैनिक शिरून तुझ्या दाढांखाली चिरडले जाताहेत, आणि ह्या सगळ्यांचा चट्टामट्टा करून तू जिभल्या चाटतो आहेस असं मला दिसलं. ह्यावर कृष्ण म्हणाला की कौरवसैनिक दुष्ट आहेत, आणि ते मरावेत असं मी ठरवूनच टाकलेलं आहे. त्यांची जी वासलात शेवटी लागणारच आहे, ती तुला आधी दिसली. आता तू फक्त निमित्ताला पुढे हो आणि आपल्या हाताने त्यांना मारून टाक.

कृपाचार्य: 'निमित्ताला पुढे हो' म्हणजे काय?!

संजय: मला माहित नाही. व्हायचं ते आधीच होऊन गेलेलं आहे, तू फक्त त्याचं श्रेय घे असा अर्थ असावा.

कृतवर्मा: पण समजा अर्जुन निमित्ताला पुढे झाला, तर त्याला काही हातपाय हलवावे लागणार आहेत की आम्ही कौरव आपसूक समोर येऊन त्याच्यासमोर मान उतरून देणार आहोत? कारण तशा काही सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. आणि याउलट समजा अर्जुन म्हणाला की मी निमित्ताला पुढे व्हायला नकार देतो आहे, तर काय? मग अशा परिस्थितीत कौरव मरणार की नाही?

सीनू: कृष्ण काहीच्या बाही बोलतो आहे! ह्या 'निमित्ताला पुढे हो' मध्ये काही अर्थ नाही.

कृपाचार्य: इथे मला धोका असा दिसतो की कृष्ण काहीच्या बाही जरी बोलत असला तरीदेखील अर्जुनाला जर ते पटलं तर तो युद्धाला तयार होईल. मग काही आपण लवकर घरी जाणार नाही.

संजय: अर्जुनाचा आविर्भाव मला तसाच दिसला. कृष्णाच्या कितीतरी मांड्या आणि कितीतरी दाढा बघून तो सटपटलेला दिसला. लाचार होऊन त्याने कृष्णासमोर धुळीत लोळण घेतली आणि 'बाबारे! तुला मित्र समजून तुझ्या गळ्यात गळे घातले हे माझं चुकलं!' अशी सपशेल माफी मागितली. अर्जुन पुरता कह्यात आला आहे असं बघून कृष्णाने सगळा देखावा विझवून टाकला, तेव्हा कुठे अर्जुन पुन्हा उठून बसला. आता ह्या सगळ्याची काय संगती लावायची ते तुम्ही सांगा. माझा तर्क चालत नाही.

(भिल्ल आणि गवळणीची एक अश्लील कथा ढोलकीच्या तालावर रचून सांगणाऱ्या शीघ्रकवीचा आवाज दूरवरच्या रिंगणामधून अजूनही ऐकू येतो आहे. पण तिथली गर्दी आता रोडावत चालली आहे. कृपाचार्य, कृतवर्मा, संजय, अश्वत्थामा, मयाहुर आणि सीनू ह्या सहाजणांभोवती आता सैनिकांचं नवं रिंगण तयार झालं आहे. सारेजण दाटीवाटीने बसून लक्षपूर्वक ऐकताहेत.)

मयाहुर: पुष्कळदा होतं काय की हृदयात खोल रुतून बसलेल्या इच्छा वेडंवाकडं रूप घेऊन बाहेर येतात. इथे हेच झालेलं आहे. अर्जुनाला बहुतेक राज्य मिळवण्याचा हव्यास आहे, पण कौरवांना मारल्याखेरीज ते मिळणार नाही. कौरव हे त्याचे चुलतभाऊ असल्यामुळे त्यांना मारवत तर नाही. तेव्हा अशा वेळी पळवाट काय? तर त्यांना मारण्याचा निर्णय दुसऱ्या कुणीतरी परस्पर घेतलेला आहे, ती जबाबदारी आपल्यावर नाही, आपण निमित्त आहोत अशी मनाची समजूत करून घेणं. माणसं जेव्हा वाईट वागतात तेव्हा आपण जे केलं ते हुकमाचे ताबेदार होतो म्हणून केलं असं त्याचं समर्थन करतात. त्यामुळे मनाला अपराधाची बोच लागत नाही आणि व्हायचं ते काम होऊनही जातं.

कृतवर्मा: म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? हे दिव्यचक्षू मिळाल्यानंतर अर्जुनाला जे काही दिसलं तो त्याच्या मनाने तयार केलेला देखावा होता की त्याला काय दिसावं हे कृष्णाने ठरवलेलं होतं?

मयाहुर: हे दिव्यचक्षू खरोखरीच आहेत यावर माझा विश्वास नाही. कुठलीही वस्तू आपल्याला कशी दिसते? त्या वस्तूवर प्रकाश पडून नंतर आपल्या डोळ्यांत शिरतो, आणि डोळ्यांतून ती संवेदना रक्तावाटे हृदयात पोहोचल्यानंतर आपल्याला वस्तू दिसते. पण वस्तू जर समोर नसेलच तर तिच्यावर प्रकाश पडणार नाही, आणि अशा प्रसंगी तुमचा चक्षू कितीही दिव्य असला तरी प्रकाशाअभावी काही करू शकणार नाही. संजयलादेखील दूरचं दिसतं पण नसलेलं दिसत नाही. कृष्णाच्या ह्या कितीतरी जिवण्या आणि कितीतरी दाढा अर्जुनासमोर प्रत्यक्ष नव्हत्या हे उघड आहे, कारण असत्या तर आपल्यालाही दिसल्या असत्या. म्हणून म्हणतो की 'तुला दिव्यचक्षू देतो आहे' ह्याचा शब्दश: अर्थ घ्यायचा नाही. कृष्णाने अर्जुनाला दिलेली ती एक प्रकारची परवानगी आहे. तुझ्या मनात कितीही वेड्याविद्र्या कल्पना असल्या तरी त्या बाहेर आणायची लाज बाळगू नकोस, कारण खरं म्हणजे त्या तुझ्या मनात नाहीतच, त्या बाहेरच्या जगात आहेत आणि दिव्यचक्षूंमुळे तुला दिसताहेत, असं तो अर्जुनाला आडून सांगतो आहे. अर्जुनासाठी हे सोयीचंच आहे.

कृपाचार्य: तसंही असेल. मयाहुराचं मत मला पटत नाही असं नाही. पण माझीही एक कल्पना ऐकून घ्या. हा जो प्रकार चालू आहे त्याच्याकडे आपण एक हत्ती म्हणून पाहायला हवं. म्हणजे त्याचा सर्वांगीण विचार करायला हवा. तसा तो आपण अजून केलेला नाही. आपण असं समजून चाललो आहोत की कृष्ण एकतर खोटं बोलतो आहे किंवा निरर्थक बोलतो आहे. पण जे काही तो बोलतो आहे ते खरं असेल ही शक्यता आपण विचारात घेतलेली नाही. ती घ्यायला हवी.

अश्वत्थामा: कल्पना उत्तम आहे. मघाशी मी जे तात्पर्य सांगितलं त्याचा रोख हाच होता.

मयाहुर: पण कृष्ण खरं बोलतो आहे असं समजलं तर सगळं चित्रच बदलेल.

कृपाचार्य: तसं वादाखातर समजायचं. ते संयुक्तिक नाही असं लक्षात आलं तर सोडून द्यायचं.

मयाहुर: ठीक आहे, पण मग हे काळजीपूर्वक करायला हवं. कृष्ण जे म्हणाला त्याची फोड करून पाहायला हवी. (धुळीत खाली बसतो आणि बोटाने जमिनीवर लिहू लागतो.)

(१) कृष्णाने जग निर्माण केलेलं आहे.

(२) एखाद्याने मरावं हे ठरवण्याचा नैतिक अधिकार त्याला आहे.

कृपाचार्याचा प्रस्ताव असा की ही विधानं आपण तात्पुरती मान्य करावीत. पण वास्तविक हे दोन मुद्दे स्वतंत्र आहेत. ह्यातलं पहिलं विधान खरं आहे असं जरी गृहीत धरलं तरी दुसरं खरं आहे असा निष्कर्ष आपोआप निघत नाही. कृष्णाने जग निर्माण केलंच असेल तर कौरवही निर्माण केले आहेत हे कबूल. पण जो वस्तू निर्माण करतो तो तिचं काहीही करू शकतो असं नाही. तेव्हा त्यांनी सरसकट युद्धात मरून जावं हे ठरवण्याचा अधिकार त्याच्याकडे कुठून आला हे मला समजत नाही. याउलट कृष्णाने जग नसेल जरी निर्माण केलं तरीदेखील युद्धात कुणी जिंकावं आणि कुणी मरावं हे ठरवण्याचा अधिकार काही कारणाने त्याच्याकडे आलाही असू शकेल. पण असं कुठलंच कारण त्याने जाहीर केलेलं नाही.

कृपाचार्य: नाही, आत्तापर्यंत ह्यातलं काहीच स्पष्ट झालेलं नाही.

मयाहुर: पण ते काही असलं तरी पहिला मुद्दा मला सध्या तरी गौण वाटतो. जग कुणी निर्माण केलेलं आहे ह्याची पंचाईत आपल्याला नंतर करता येईल. पण कौरवांनी मरावं असं जर कृष्णाने ठरवून टाकलं असेल आणि हे खरं करण्याची ताकद त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला असलेला धोका उघड आहे. मी आणि सीनू इथून केव्हाही बाहेर पडू शकतो, पण तुमचं तसं नाही.

(हे ऐकून भोवताली जमलेले सैनिक कुजबुजू लागतात. 'आपण मरणार का?', 'अजून नक्की नाही', 'सेनापती काय म्हणताहेत ते बघूया', 'हो, बघा आणि लवकर सांगा' अशासारखे आवाज निघतात. एक सैनिक अर्धवट स्वत:शी पण मुद्दाम मोठ्याने म्हणतो, 'पण निदान मुहूर्त नीट ठरवायचा होता. तेवढीही आमची काळजी कुणाला नाही.')

कृतवर्मा: कोण म्हणतंय ते? तुमची काळजी मला आहे. मी यादवांचा सेनापती आहे.

तोच सैनिक: नाही, त्याबद्दल आम्हाला शंका नाही. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. परिस्थिती अशी आहे की आपण बाकीचे कौरव लगेच मरू, पण भीष्म नाही. तो आपल्या सोयीने मरेल. मग माझा प्रश्न असा की ही सोय आम्हा सगळ्यांचीच का नाही केली?

कृतवर्मा: म्हणजे?

सैनिक: भीष्म मागे आम्हाला म्हणाला होता की माझ्या मरणाची वेळ मी स्वत: ठरवू शकतो. सध्या दक्षिणायन चालू आहे. मरायला ही वेळ शुभ नाही. उत्तरायण जास्त शुभ आहे. तेव्हा भीष्माने आम्हाला सांगितलं की मी युद्धात जखमी झालो तरी तडकाफडकी मरायला राजी होणार नाही. कुरुक्षेत्रात तसाच एका बाजूला पडून राहीन आणि उत्तरायण आलं की माझा मी शुभ वेळेला मरेन. आता हे उत्तरायण केव्हा सुरू होणार ते कुणालाच छातीठोक माहित नाही. काहीजण म्हणतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणार. काहीजण म्हणतात रात्रीच्या आकाशात चांदण्यांनी बनलेला जो मेंढा दिसतो तिथून सूर्य गेला की सुरू होणार. काहीजण म्हणतात की तो ठोकताळा पूर्वी बरोबर होता, पण सूर्याला अलिकडे दरवर्षी थोडा थोडा उशीर व्हायला लागला आहे. त्यामुळे तो मेंढ्याजवळून नव्हे तर माशाजवळून गेला की सुरू होणार. आता ह्यातलं काहीही खरं असलं तरी आपलं युद्ध अठराच दिवस चालणार आहे. तेवढ्यात काही हे उत्तरायण सुरू होत नाही. तेव्हा ह्या युद्धात जर आम्ही मरणार असू तर हटकून अशुभ वेळेलाच मरणार. भीष्म जसा ताणून धरू शकतो तसं आम्ही कुणी करू शकत नाही. मग आता माझा प्रश्न असा की युद्ध उत्तरायणातच का नाही ठेवलं? म्हणजे आपण सगळेच शुभ वेळेला मेलो असतो. सेनापतीने आपल्या सैनिकांसाठी निदान एवढं करायला नको का?

कृतवर्मा: तू म्हणतोहेस त्यातलं मला काहीच माहित नव्हतं.

मयाहुर: मलाही माहित नव्हतं. युद्ध केव्हा होणार ती तिथी मला सांगितलेली होती, आणि त्याप्रमाणे सगळ्या सोयी वेळेत झाल्या पाहिजेत अशा सूचना मला दिलेल्या होत्या. मरणाऱ्यांसाठी अंत्यसंस्कारांची सोय यात आहे. पण अशुभ वेळेला माणूस मेला तर अंत्यसंस्कार वेगळे असतात का हे आता मला शोधून काढायला हवं.

कृतवर्मा: (सैनिकाला उद्देशून) तुझा आक्षेप बरोबर आहे, पण मला या क्षणी निश्चित काही सांगणं शक्य नाही. युद्धाचे नियम ठरवण्यात माझा सहभाग होता, पण ते केव्हा होणार हा निर्णय माझ्या हाती नव्हता. त्यामध्ये कुठेतरी गलथानपणा झालेला दिसतोय. मी चौकशी करून सांगतो काय ते. (ह्या उत्तराने सैनिकांचं समाधान झालेलं दिसत नाही, पण ते गप्प राहतात.)

मयाहुर: पण वेळ शुभाशुभ कशीही असली तरी माझं म्हणणं तेच आहे. आपण तातडीने विचार करायला हवा तो दुसऱ्या मुद्द्याचा. तुम्ही कौरवांनी मरावं हे ठरवण्याचा नैतिक अधिकार कृष्णाला कसा मिळाला असेल? आणि त्यातदेखील इतकी माणसं मारण्यासाठी मुद्दाम अशुभ वेळ निवडणं हे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. अर्थात असा अधिकार त्याच्याकडे आहे असं मी वादाखातर गृहीत धरलेलं आहे; तो खरोखरीच आहे का हे मला ठाऊक नाही.

कृतवर्मा: तू 'नैतिक अधिकार' म्हणतो आहेस. म्हणजे ज्याच्यामागे नैतिक अधिष्ठान आहे असा अधिकार. पण नैतिकता हा जगाचाच भाग आहे. समजा कृष्ण म्हणाला की जग मीच निर्माण केलं असल्यामुळे नैतिकतेचे नियम मला लागू होत नाहीत, तर काय उत्तर देणार? थोडक्यात तो असं म्हणू शकतो की हा अधिकार मी हातात घेतला म्हणून माझ्याकडे आहे. मला विचारणारे तुम्ही कोण?

कृपाचार्य: पण तो तसं म्हणताना दिसत नाही. आपल्या निर्णयाचं काहीतरी स्पष्टीकरण द्यायला हवं असं त्यालाही वाटत असणार, कारण आपण कौरवसैनिक दुष्ट असल्यामुळे मरणार आहोत असं तो अर्जुनाला म्हणतो आहे.

अश्वत्थामा: (ठामपणे) मी दुष्ट नाही. कौरवांच्या सैन्यात मी स्वेच्छेने आलेलो नाही, आणि असलं गैरलागू विशेषण मी स्वत:ला चिकटवून घेणार नाही. मी इथला नव्हे. इथियोपियाच्या माळरानावर माझा जन्म झालेला आहे. एक दिवस जंगलात फिरत असताना मला जमिनीवर बरीच पानं पडलेली दिसली. हा काय प्रकार आहे ते पाहायला मी पुढे झालो आणि खोल खड्ड्यात तोंडघशी पडलो. अर्धवट तुटलेली झाडाची मुळी माझ्या कपाळात घुसली. मला दोरखंडांनी जखडून अोढून काढण्यात आलं आणि आक्सूमच्या बाजारात विकून टाकण्यात आलं. एकामागून एक असे माझे अनेक मालक झाले. प्रेमळ असा त्यांतला एकही निघाला नाही. भारतात मोठं युद्ध होणार अशी वदंता जेव्हा पसरली तेव्हा सगळीकडे हत्तीघोड्यांचे भाव वधारले. माझ्या तेव्हाच्या मालकाला लोभ सुटला आणि त्याने मला फुंकून टाकलं. पराण्या टोचून सहाशे योजनं चालवत मला इथे आणण्यात आलं. भारतातले हत्ती मला सामावून घेत नाहीत. त्यांच्यापेक्षा माझं वजन जास्त आहे, त्यांच्यापेक्षा माझे कान मोठे आहेत, आणि त्यांच्यापेक्षा माझी कातडी सुरकुतलेली आहे. ते मला उपरा समजतात आणि घाबरतात. मला इथे करमत नाही. ह्या युद्धातून मी बाहेर पडेन का ते मला माहित नाही, पण मी दुष्ट होतो म्हणून मेलो असं म्हणू नका.

सीनू: खरं तर जग तुझ्याशी दुष्टपणे वागलेलं आहे.

अश्वत्थामा: ते तुम्ही ठरवा. मी हत्ती आहे. मी काही विसरत नाही, पण आठवणींचे कढ काढून रडतही बसत नाही.

कृतवर्मा: दुष्ट मीही नाही आणि माझे सैनिकही नाहीत. आम्ही कुणीही इथे स्वेच्छेने आलेलो नाही. ह्या कृष्णाची जगावरच नव्हे तर भाषेवरही सत्ता असावी. कुठलाही शब्द कुठल्याही अर्थाने तो वापरू शकत असावा. जर मी कुणाला दुष्ट म्हणालो तर तसं का म्हणालो हे सांगण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. तो शब्द ज्या अर्थाने मी वापरतो आहे तो समोरच्याला पटला नाही, तर दोघांनाही मान्य होईल असा अर्थ शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्हाला करावा लागतो. कृष्णाचं तसं नसावं. कुणालाही तो काहीही म्हणू शकतो.

कृपाचार्य: पण म्हणजे गोळाबेरीज परिणाम तोच झाला. माणूस काय किंवा हत्ती काय, कुणालाही विनाकारण दुष्ट ठरवून मारणं आणि कारण न देता मारणं ह्यात मला फरक दिसत नाही.

सीनू: मला हे सगळं चुकीचंच वाटतं. का ते उदाहरण घेऊन सांगते. चीनमध्ये एक खेळ चालतो. लाकडाची एक सपाट चौकोनी फळी घेतात आणि तिच्यावर आडव्या उभ्या रेषा आखून घरं बनवतात. घरांना आलटून पालटून लालपिवळे रंग देतात. फळीच्या एका बाजूला एक खेळाडू बसतो आणि दुसऱ्या बाजूला दुसरा खेळाडू बसतो. घरांमध्ये हस्तिदंती सोंगट्या ठेवतात. डुक्कर, अजगर, वेश्या, भाला, गोगलगाय, व्यापारी असे सोंगट्यांचे वेगवेगळे आकार असतात. कुठली सोंगटी कशी हलते आणि कुठल्या सोंगटीची ताकद किती ह्याचे ठरलेले नियम आहेत. भाला तिरका जातो आणि डुक्कर अजगरावरून उडी घेऊ शकतो. गोगलगाय एक घर डावीकडे, उजवीकडे किंवा समोर जाऊ शकते. अजगर डुकराला गुदमरून मारू शकतो आणि भाला वेश्येला भोसकू शकतो. वेश्या व्यापाऱ्याला विष घालू शकते. आणखी खूप नियम आहेत. समोरच्या गोगलगाईला जो मारेल तो डाव जिंकला. खेळणारे हुशार असतील तर गुंतागुंत वाढत जाते आणि अशा वेळी फार कौशल्य लागतं.

उत्तर चीनमधला एक राजा आणि त्याची आई अशा दोघांचा हा आवडता खेळ आहे. राजवाड्याच्या आवारात त्यांनी एक मोठा दगडी पट तयार करून घेतला आहे. मयाहुरानेच तो हवा तसा करून दिला आणि नंतर एकदा मला नेऊन दाखवला. दोन्ही बाजूंना दोन उंच मनोरे बांधले आहेत. एका मनोऱ्यात राजा आणि त्याच्या समोरच्या मनोऱ्यात आई असे बसतात, आणि खाली पटांगणात बघून खेळातल्या चाली अोरडून सांगतात. दरबारी मंडळी भोवताली बसून पाहात असतात. सोंगट्या म्हणून कैदी वापरतात. डुक्कराचं नाहीतर अजगराचं कातडं पांघरलेला, हातात भाला घेतलेला असे ते कैदी असतात. बाई कैदेत असेल तर तिला गडद रंग लावून वेश्या म्हणून उभी करतात. वेश्या जेव्हा व्यापाऱ्याला विषाचं मडकं देते तेव्हा त्याला ते एका घोटात पिऊन टाकावं लागतं. अजगरडुकराचं असंच असतं. डुकराला विरोध करायची परवानगी नसते. रक्त टिपून घ्यायला आणि प्रेतं उचलायला नोकर ठेवलेले असतात. यामध्ये बघणाऱ्यांना विरंगुळा होतो आणि कैद्यांना जो एवीतेवी मृत्युदंड द्यायचाच असतो तेही काम होऊन जातं.

पण विनाकारण माणसं मारू नयेत असा आईमुलाचा दंडक आहे. आपण डाव खात्रीने जिंकणार असं जर समजा आईला वाटलं, तर आपले पुढचे डावपेच काय असणार आहेत याची समोरच्या मनोऱ्यात निरोप्या पाठवून ती राजाला सूचना देते. ह्यातून आपण वाचत नाही असं जर राजाला वाटलं तर तो हार कबूल करतो आणि डाव तिथे संपतो. अशा वेळी जिवंत राहिलेल्या सोंगट्यांना घरी जाऊ देतात. उरलेल्या आयुष्यात कसलीही आगळीक त्या कधी करत नाहीत. राजाला नाही मान्य झालं तर डाव पुढे चालू राहतो, पण त्याला इलाज नाही.

इथेही काहीसं असंच आहे. रथीने अमुक करावे आणि पदातिने तमुक करू नये असे लांबलचक नियम तुम्ही बनवलेले आहेत. दगडावर कोरलेले मला समोरच दिसताहेत. पण कृष्ण म्हणतो आहे ते जर खरं असेल आणि सगळे कौरव जर मरणारच असतील, तर हे नियम आतून पोकळ आहेत आणि ही लढाई बनावट आहे. एवढं समजण्याइतकी अक्कल कृष्णाला असायला हवी. अर्जुनाला जे काही रूप त्याने दाखवलं ते वास्तविक सगळ्या कौरवांना जाहीरपणे दाखवायला हवं. त्यांना पटवून द्यायला हवं की लढाई करू नका, केलीत तर तुम्ही जगणार नाही. मग ते शरणागती पत्करतील आणि निमूटपणे घरी जातील. आपापल्या बायकामुलांशी यापुढे फार चांगले वागतील. विनाकारण माणसं मरायची यामुळे टळतील. कृष्णाने जग निर्माण केलेलं असेल तर कौरवांच्या मनावरही त्याचं नियंत्रण असायला हवं. त्यामुळे कौरवांना इतकं पटवून देणं त्याच्या शक्तीबाहेर असू नये.

संजय: सीनू, तू म्हणतेस ते पूर्णपणे मान्य आहे. पण कृष्ण असं काही करेल अशी चिन्हं दिसत नाहीत. अजूनही तो एकट्या अर्जुनाशीच बोलतो आहे.

कृतवर्मा: पण हेच मला कळत नाही. बोलण्यासारखं आता राहिलं काय आहे? युद्ध करायला हवं हे जर अर्जुनाच्या गळी उतरलेलं असेल तर तो लागलीच युद्धाला सुरुवात का नाही करत?

मयाहुर: तुम्हाला म्हटलं ना? हा सगळा एककल्लीपणा आहे. सांगायचं ते सांगून झालेलं आहे, पण कसे ना कसे तरी अठरा अध्याय करायचे असा कृष्णाने चंग बांधला आहे. तेव्हा भारुडभरती करण्याखेरीज त्याच्यासमोर दुसरा मार्ग राहिलेला नाही.

संजय: तसंच वाटतं. आता ह्या दोघांचा वेगळाच विषय चालू आहे. कृष्णाने जग निर्माण केलं असेल तर त्याची मर्जी सांभाळायला हवी हे अर्जुनाला कळलेलं आहे. म्हणून त्याने कृष्णाला विचारलं की तुला कशा प्रकारचा चेला पसंत आहे? कृष्ण म्हणाला की सर्वांशी मैत्री करून असणारा आणि कनवाळूपणे वागणारा चेला मला पसंत आहे. वास्तविक जर अर्जुनाचा पक्ष युद्ध खात्रीने जिंकणार असेल तर ही चर्चा करायला मागाहून खूप वेळ आहे. त्यात आत्ता शिरण्याची गरज नव्हती.

कृतवर्मा: कनवाळूपणे वागून युद्ध कसं करणार? अर्जुनाला हे युद्ध झाल्यानंतर सांगायला हवं. आधी नाही.

संजय: इतकंच नव्हे तर कृष्णाचं म्हणणं असं की सुख आणि दु:ख ह्या दोन्ही गोष्टी ज्याला सारख्याच आहेत, किंवा जय आणि पराजय याही गोष्टी सारख्याच आहेत असा चेला मला पसंत आहे.

कृतवर्मा: पुन्हा तेच म्हणतो. हे नंतर सांगायला हवं. जय आणि पराजय ह्यात जो फरक करत नाही अशा माणसाच्या लढण्यात कितीसा जोर असणार आहे?


संजय: कदाचित कृष्णाला असं म्हणायचं असेल की जय आणि पराजय आधी वेगवेगळे समजा, पण एकदा व्हायचं ते होऊन गेल्यावर सारखेच समजा. किंवा सुख आणि दु:ख वाटण्याआधी वेगवेगळे समजा पण नंतर सारखेच समजा.

कृपाचार्य: असं करणं अवघड आहे.

मयाहुर: अवघड नाही, अशक्य आहे. आणि सुखदु:ख आम्ही सारखेच समजावे अशी त्याची इच्छा असेल तर जग निर्माण करतानाच तशी तरतूद का नाही केली? एखादा चितारी असं कधी म्हणेल का की मी इथे काळा रंग दिलेला आहे आणि तिथे सोनेरी दिलेला आहे, पण चित्राकडे बघताना तुम्ही ते सारखेच समजा?

सीनू: कृष्णाचा हा जो कोणी चेला असेल तो स्वत:चं सुख आणि स्वत:चं दु:ख सारखं समजतो आहे तोपर्यंत ठीक आहे. पण इतरांचं सुख आणि इतरांचं दु:ख जर तो सारखं समजू लागला तर आजूबाजूचे लोक लागलीच तक्रार नाही का करणार?

कृपाचार्य: हे सगळं कृष्णाने आधी सांगितलं असतं तर धर्मयुद्धाच्या नियमांत आपण तसे बदल करून घेतले असते. आम्ही असं म्हटलं असतं की 'ज्याचे शस्त्र नीट चालत नसेल किंवा चिलखत निकामी झाले असेल अशास ठार मारू नये. परंतु जय आणि पराजय ही आपल्याला सारखीच आहेत असे प्रतिस्पर्ध्याने आधी जाहीर केले असल्यास हे कलम लागू होणार नाही.' युद्ध लवकर संपायला यामुळे थोडी मदत झाली असती.

कृतवर्मा: आणि ह्या दोघांना जर वेळच काढायचा असेल तर निदान अर्जुनाचं आणि पर्यायाने आमचंही मनोरंजन होईल अशी काही सोय कृष्णाने करायला हवी. आमच्या द्वारकेला एक गप्पिष्ट म्हातारा आहे. त्याची नेहमीची युक्ती अशी की कुठल्याही घोळक्यात असला की तो माणसांचे तीन प्रकार पाडतो. एकदा तो म्हणाला की जगात तीन प्रकारचे लोक असतात. समुद्राकाठी रमणारे, पर्वतावर रमणारे आणि बाजारात रमणारे. आता ह्या बोलण्यात चातुर्य असं फार नाही, पण जमलेल्यांनी ह्यातून इतके वेगवेगळे लाक्षणिक अर्थ काढले की पुढच्या दोन घटका कशा गेल्या ते कुणाला कळलं सुद्धा नाही. कृष्णाला ह्यातून काही शिकण्यासारखं आहे.

सीनू: मीही तेच म्हणते. इथे तीन प्रकारचे सैनिक आहेत: लागलीच मरणारे, हाल होऊन मरणारे आणि धास्तीने मरणारे. हा समोरचा प्रकार असाच चालू राहिला तर बहुतेक सगळे तिसऱ्या वर्गात जमा होतील.

संजय: सीनू, हा विनोदाचा विषय आहे का?

सीनू: मग मी तरी काय करू? वेळ नको का जायला? लोक कंटाळलेले मला बघवत नाहीत.

संजय: सैनिक खरोखरीच मरणार आहेत, पण मला संशय असा आहे की ह्या मुद्द्याला कृष्णाच्या लेखी महत्त्व नाही. तुम्हाला मी जेव्हा इथे भेटलो तेव्हा पाचेक अध्याय होऊन गेलेले होते, आणि त्यांमध्ये कृष्ण पुष्कळ काही म्हणून गेला होता. ते सगळंच मला समजलेलं नाही, पण माणसं मारणं वाईट का नाही याचा त्यातून उलगडा होतोसं दिसतं. तुम्हालाही सांगतो, पटतं का बघा.

कृतवर्मा: सांग. पटलं तर चांगलंच होईल, कारण मग मला समाधानाने मरता येईल.

संजय: त्याआधी आत्मा म्हणजे काय हे तुम्हाला सांगायला हवं, तेव्हा थोडं सबुरीने घ्या. कृष्ण म्हणाला होता की आपल्या अंगात आत्मा नावाची काहीतरी वस्तू असते. तिच्यामुळे आपण जिवंत राहतो. आता एकतर ही वस्तू अंग सोडून गेली की आपण मरतो, किंवा आपण मेलो की ही वस्तू अंग सोडून जाते. दोहोंपैकी नक्की काय होतं याबद्दल अजून माझ्याच मनात गोंधळ आहे. पण ते काही असलं तरी आपण मेल्यानंतर हा आत्मा दुसऱ्या अंगात शिरतो आणि ते अंग जिवंत होतं. कृष्णाचं म्हणणं असं की माणूस जसा जुने कपडे टाकून देऊन नवे कपडे घालतो तसा आत्मा जुनं अंग टाकून देऊन नव्या अंगात शिरतो.

मयाहुर: हे महत्त्वाचं आहे. मला नीट समजून घ्यायला हवं. पण हा आत्मा अंगात राहून काय करतो?

संजय: कृष्णाने ते काही सांगितलं नाही. त्याने आत्म्याचं जे वर्णन केलेलं आहे ते आत्मा काय करत नाही आणि आत्म्याला काय होत नाही अशाच धाटणीचं आहे. कृष्ण म्हणतो की आत्म्याला हत्याराने इजा होत नाही, आग त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वारा त्याला वाळवू शकत नाही. हे व्यापक अर्थाने घ्यायला हवं असं संदर्भावरून दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ, तसं जरी स्पष्ट म्हटलं नसलं तरी आत्म्याला गंज चढत नसणार किंवा रुमालात बांधता येत नसणार.

अश्वत्थामा: मलाही आत्मा आहे का? तसं जाणवत तरी नाही.

सीनू: जाणवत मलाही नाही.

संजय: हो, प्राण्यांनाही आणि बायकांनाही असतो. माणूस मेल्यावर त्याचा आत्मा प्राण्यात जाऊ शकतो, प्राणी मेल्यावर माणसात जाऊ शकतो किंवा एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात जाऊ शकतो. तेव्हा आपल्या सगळ्यांमधले आत्मे एकमेकांपेक्षा निराळे नसावेत. ते परस्परांना कसे अोळखतात हे माहित नाही. वनस्पतींमध्ये असतो का हे मात्र नीट कळलं नाही. उदाहरणार्थ, वडाचं मोठं झाड असेल तर त्याचा काही भाग मेलेला आणि काही जिवंत असू शकतो. अशा वेळी त्यामधला आत्मा झाडाच्या काहीच फांद्यांमध्ये वावरू शकतो आणि काही फांद्यांमध्ये शिरायला त्याला मज्जाव आहे असंही असू शकेल. महत्त्वाचं असं की माणसाला किंवा प्राण्याला मारलं तरी त्याचा आत्मा मरत नाही. मेलेलं अंग सोडून तो दुसऱ्या अंगात निघून जातो. त्यामुळे कृष्णाचं म्हणणं असं की माणूस मेला तरी त्यात दु:ख करण्यासारखं काही नाही, कारण आत्म्याला त्यात कुठेच धक्का पोहोचलेला नसतो. आणि म्हणूनच कृष्ण अर्जुनाला म्हणतो की तू माणसं मारायला कचरू नकोस.

मयाहुर: हे खूपच महत्त्वाचं आहे. मला मुळातूनच समजून घ्यायला हवं. तू म्हणालास की माणूस आत्म्यामुळे जिवंत राहतो. असं जर असेल तर जिवंतपणी तो माणूस केव्हा काय करतो हे आत्मा ठरवत असणार.

संजय: नाही, तसं वाटत नाही. असं पाहा की आपल्या अंगात ज्या संवेदना निर्माण होतात त्या रक्तातून हृदयात वाहून नेल्या जातात. याबद्दल आपण मघाशी बोललोच आहोत. रक्तात खूप पाणी असतं. आत्म्याला जर पाणी भिजवू शकत नसेल तर आपल्या संवेदना त्याच्यापर्यंत पोहोचतच नसणार. म्हणजे समजा मला ह्या क्षणी थंडी वाजत असेल तर माझ्या आत्म्याला ते ठाऊक नसतं. आणि तेच जर ठाऊक नसेल तर थंडी भागावी म्हणून पुढे काही करण्याचा प्रश्न येत नाही.

सीनू: तुला खरंच थंडी वाजते आहे का?

संजय: थोडीशी.

(सीनू आपल्या गाड्यात जाऊन एक धाबळी घेऊन येते आणि संजयला आणून देते.)

सीनू: तूरानमध्ये एक दाट पांढरे केस असलेली गरगरीत मेंढी असते. समरकंदला तिच्या लोकरीचा मोठा बाजार भरतो. तिथून मी ही घासाघीस करून स्वस्तात मिळवली. ठेव तुझ्याजवळ.

(संजय ती आपल्याभोवती लपेटून घेतो.)

संजय: ऊब छानच आहे. धाबळी पाहिली की मला लहानपणची आठवण होते. आई आणि बाबांनी जोडीने म्हणायचं एक जुनं गाणं होतं. बाबा खोगीर पाठीवर बांधून घोडा व्हायचे आणि आई धाबळी पांघरून मेंढी व्हायची. मेंढी घोड्याची थट्टा करत असे की 'बाबारे! काय हे हाल तुझे! माणूस तुझ्या पाठीवर बसून तुला दामटतो आणि सामानाने भरलेले जड खटारे तुला अोढायला लावतो.' यावर उलट घोडा म्हणतो, 'बाई गं! किती हे हाल तुझे! तुझ्या अंगावर इतकी सुंदर लोकर असते, पण माणूस ती सगळी अोरबाडून घेतो आणि तुला नागडी करून सोडून देतो.' एक कडवं घोड्याचं आणि एक कडवं मेंढीचं असं ते चालायचं. समोर ऐकणारे कोण आहेत याचा अंदाज घेऊन हे गाणं कितीही आर्त बनवता येत असे. बायाबापड्यांच्या अंत:करणाला पीळ पाडता येत असे. तितकाच खुर्दाही जास्त मिळायचा.

सीनू: गाणं लिहून दे नंतर मला.

संजय: देईन.

मयाहुर: पण आपला विषय सोडूया नकोत. तुला आत्ता जेव्हा थंडी वाजली तेव्हा तुझ्या त्वचेतून हृदयाकडे रक्त गेल्यामुळे ती तुला कळली. पण तू जेव्हा तसं बोलून दाखवलंस, तेव्हा कशी हालचाल करायची हे तुझ्या अोठातल्या स्नायूंना कुणीतरी सांगितलं असलं पाहिजे. आणि नंतर स्वत:भोवती धाबळी लपेटून घेतलीस, तेव्हाही कशी हालचाल करायची हे तुझ्या हातातल्या स्नायूंना कुणीतरी सांगितलं असलं पाहिजे. पण हे सांगतं कोण?

संजय: आता ते मला काय ठाऊक? पण आत्मा सांगत नाही हे निश्चित. कारण मुळात थंडी वाजणं म्हणजे काय हेच त्याला समजत नाही आणि नंतर अंगाला ऊब मिळालेलीही समजत नाही. निदान कृष्णाच्या बोलण्यावरून तसा स्पष्ट तर्क करता येतो. असं सगळ्याच बाबतीत आहे. आत्म्याला दु:ख होत नाही आणि आनंदही होत नाही. त्याला तहान किंवा भूक लागत नाही. तेव्हा माणसाने काय खायचं आणि प्यायचं हे तो ठरवत नाही.

कृपाचार्य: ठीक आहे, पण मेलेली माणसं बोलत नाहीत किंवा हालचालही करत नाहीत. तू म्हणालास की जिवंत माणूस जिवंत असतो तो त्याच्यात आत्मा असल्यामुळे. पण जिवंत माणसाच्या कुठल्याच संवेदनेत आणि कुठल्याच हालचालीत तो भाग घेत नसेल तर आत्म्याचा उपयोग काय?

मयाहुर: मलाही हाच प्रश्न पडला होता. जिवंत माणूस जेव्हा मरेल तेव्हा ही अडचण येईलच. असं समज की कौरवांच्या बाजूचा धैर्यधर नावाचा एक सैनिक आहे. अर्जुनाने त्याच्या पोटात समज बाण मारला. परिणामी धैर्यधर भयंकर कासावीस होईल आणि त्याच्या अंगातलं रक्त जखमेतून बाहेर सांडायला लागेल. थोड्या वेळाने धैर्यधर मरेल. पण तू म्हणतोस की दुखल्याची संवेदना आत्म्याला कळत नाही आणि रक्ताशीही त्याचा संबंध येत नाही. पण मग धैर्यधराचं अंग केव्हा सोडून जायचं हे त्याच्या आत्म्याला कसं कळतं?

कृतवर्मा: आणि समज धैर्यधर एकदाचा मेला. आता त्याच्या आत्म्याला काही इजा झालेली नाही आणि तो दुसऱ्या अंगाच्या शोधात निघाला असेल हे मान्य. पण म्हणून धैर्यधराच्या बायकोने रडू नये असं मुळीच नाही. कारण तिचं प्रेम होतं धैर्यधरावर, त्याच्या आत्म्यावर नव्हे. आणि तो मेल्यामुळे वाईट वाटणार आहे ते तिला, तिच्या आत्म्याला नव्हे. तेव्हा तिने अर्जुनाच्या आत्म्याला शिव्या देऊ नयेत फारतर, पण अर्जुनाला द्यायला काहीच हरकत नाही. आणि असं असेल तर धैर्यधराला मारण्यासाठी अर्जुनाकडे सबळ नैतिक कारण हवं. त्याचा आत्मा मरत नाही हे कारण नव्हे.

सीनू: मला हे सगळं विचित्रच वाटतं. का ते संजयनेच दिलेलं उदाहरण पुढे चालवून सांगते.

संजय: माझं उदाहरण असं इथे काही नाही. मी पदरचं सांगितलेलं नाही. कृष्ण जे म्हणाला ते तसंच्या तसं तुम्हाला सांगतो आहे.

सीनू: हो रे! उगीच फुरंगटू नकोस. तर कृष्णानेच दिलेलं उदाहरण पुढे चालवून सांगते. माणूस जुने कपडे टाकून देऊन नवे घेतो. पण का घेतो? जुन्या कपड्यांचा रंग विटतो, ते फाटतात असं काही ना काहीतरी होतं. त्यामानाने नवे कपडे चांगले दिसतात. म्हणून माणूस नवे कपडे घेतो. पण आता इथे बघ. समज एक दिसायला छान मुलगी आहे. आपण तिला छान म्हटल्यामुळे तिला स्वत:ला आनंद होतो. पण यात तिच्या आत्म्याला काही फरक पडत नाही. पुढे ती म्हातारी झाली की आपलं सौंदर्य गेलं असं म्हणून खट्टू होते. पण यातही तिच्या आत्म्याला काही फरक पडत नाही. मग असं असेल तर हा आत्मा जुनं अंग टाकून देऊन नवं अंग घेण्याचा खटाटोप कशासाठी करतो? तो नेहमी अंगाबाहेरच का राहात नाही? म्हणजे अंगाला आत्म्याचा उपयोग नाही एवढंच नव्हे तर आत्म्यालाही अंगाचा उपयोग नाही.

संजय: ह्यावर एक उत्तर आहे. म्हणजे कृष्णाने दिलेलं उत्तर आहे, मी नव्हे. माझ्यावर धार धरणार नसाल तर सांगतो.

सीनू: नाही धरत रे! घाबरू नकोस. तू आपला सांगत राहा.

संजय: हा जो आत्मा एका अंगातून दुसऱ्या अंगात आणि दुसऱ्या अंगातून तिसऱ्या अंगात जातो, तसं त्याला वास्तविक करायचंच नसतं.

कृतवर्मा: करायचंच नसतं?!

संजय: ह्या तोचतोचपणातून त्याला कायमची मोकळीक मिळवायची असते. याला मोक्ष म्हणतात. हा मोक्ष मिळाल्यानंतर आत्मा कायमचा कृष्णाजवळ जाऊन राहतो. आणि हा मोक्ष मिळावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत असं कृष्णाचं म्हणणं आहे.

कृतवर्मा: म्हणजे काय करायला हवं?

संजय: बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी मोक्ष मिळवता येतो असं दिसतं. ज्याचा जसा स्वभाव असेल तसा मार्ग त्याने निवडावा असं कृष्णाचं म्हणणं आहे. हे मार्ग कुठले ते मी तुम्हाला सांगूही शकेन, पण त्यात किचकटपणा खूप आहे. तरीदेखील ह्या सगळ्या मार्गांमधलं समान सूत्र असं की स्वत:चे चोचले पुरवायचे नाहीत. किमान एवढं पथ्य पाळायचं.

सीनू: म्हणजे काय करायचं?

संजय: उदाहरणार्थ, समज तुला आंबा आवडतो. तर तो खाल्ल्यामुळे जीभ चाळवते आणि आंबा आणखी खावासा वाटतो. तर अशा वेळी जिभेचं ऐकायचं नाही. एकतर आंबा आधी खायचाच नाही, किंवा खाल्ला तरी तो चवीला चांगला लागू द्यायचा नाही. असं सगळ्यांच बाबतीत आहे. समुद्र मी कधी पाहिलेला नाही, पण पाहणारे सांगतात की समुद्रात सूर्य मावळताना फार छान दिसतो आणि रोज त्या वेळेला पाय तिथे अोढ घेतात. पण हे वाईट आहे, कारण जितक्या वेळा समुद्रावर जाल तितकी ही तलफ वाढत जाते. गाण्याचंही असंच आहे. चांगलं गाणं ऐकावं लागलं तर त्यात आनंद मानू नये. यामागचं कारण असं की जितक्या वेळा तुम्ही चवीने आंबा खाल, किंवा कान देऊन गाणं ऐकाल तितका तुमचा जगण्यावरचा लोभ वाढत जातो. पण यामुळे मोक्ष आणखी अवघड होतो, कारण जिवंत अंगापासून आत्म्याला दूर नेणं ह्याच उद्दिष्टाचा त्यात बोजवारा उडतो.

कृतवर्मा: पण मोक्ष कशासाठी मिळवायचा?

संजय: कृष्णाजवळ कायमचं जाऊन राहता यावं यासाठी.

(कृतवर्मा निश्वास सोडतो.)

कृपाचार्य: (कृतवर्म्याला उद्देशून) ह्या कल्पनेने तू हर्षभरित झालेला दिसत नाहीस.

कृतवर्मा: नाही. निखळ आनंद व्हावा असं ह्या प्रस्तावात मला काही दिसत नाही. यादवांचा मी सेनापती असल्यामुळे कृष्णाशी माझा अनेकदा जवळून संपर्क आलेला आहे.

अश्वत्थामा: कृतवर्म्याचं एक राहू दे. काही वैयक्तिक अनुभवांमुळे ही मोक्षाची कल्पना त्याला आकर्षक वाटत नसेल. पण माझी शंका वेगळी आहे. जेव्हा केव्हा मी मरेन तेव्हा माझा आत्मा माझ्या अंगातून बाहेर जाईल. बरोबर?

संजय: बरोबर.

अश्वत्थामा: तो कुठे जाईल ह्यावर माझं नियंत्रण नाही. कुठल्याही प्राण्याच्या किंवा माणसाच्या अंगात तो जाऊ शकेल.

संजय: बरोबर.

अश्वत्थामा: असं समजून चला की तो एका वेश्येच्या अंगात गेला. वेश्याच का समजायची याला कारण नाही, पण उदाहरणादाखल समजून चला. आता मी मेल्यानंतरच ही वेश्या जन्माला आलेली असल्यामुळे तिची आणि माझी अोळख नसणार. एवढंच नव्हे तर तिने माझं नावही ऐकलेलं नसणार. तेव्हा मी म्हणेन की ह्या आत्म्याचं पुढे काय होतं हे त्या वेश्येने बघावं. त्याला मोक्ष मिळावा ह्यासाठी मी का म्हणून प्रयत्न करावेत? मी मेल्यावर माझा संबंध संपला.

संजय: ठीक आहे, हा तिढा सुटतो का बघूया. पण 'हा आत्मा' असं म्हणत राहणं त्रासाचं आहे. त्याला रीतसर नाव पाहिजे.

मयाहुर: आउटिस! आत्म्याला मी 'आउटिस' हे नाव सुचवतो. यवनांकडचा हा रुळलेला शब्द आहे. एखाद्याची अोळख नक्की नसेल तर ते त्याला 'आउटिस' म्हणतात.

संजय: हरकत नाही. तर अश्वत्थाम्याच्या आत्म्याचं नाव 'आउटिस'. आणि वेश्येचं नाव 'योजनगंधा'.

कृपाचार्य: व्यासाला टपली मारून जायची एकही संधी तू सोडत नाहीस. योजनगंधा हे त्याच्या आईचं, म्हणजे सत्यवतीचं टोपणनाव आहे.

संजय: तसं समजा. तर वेश्येचं नाव 'योजनगंधा'. सारांश काय तर अश्वत्थामा मेल्यानंतर त्याचं कलेवर सोडून देऊन आउटिस योजनगंधेच्या अंगात शिरेल. आता इथे कृष्णाचं म्हणणं असं की अश्वत्थाम्याने आपण अश्वत्थामा आहोत आणि योजनगंधेने आपण योजनगंधा आहोत असं समजू नये. तो भ्रम आहे. याउलट आपण आउटिस आहोत असं दोघांनी समजावं. आउटिसला जो मोक्ष मिळवायचा आहे त्यासाठी अश्वत्थामा आणि योजनगंधा ह्या दोघांनीही प्रयत्न करायला हवेत, कारण ते दोघेही आउटिस आहेत.

सीनू: (कपाळाला आठ्या घालत) हे शक्य नाही.

कृतवर्मा: (भुवया कुस्करत) नाही.

अश्वत्थामा: हे मुळीच शक्य नाही. मी आउटिस नव्हे. मी कोण आहे ते सांगणं माझ्यासाठी सोपं नाही; सांगायला गेलोच तर ढग चाचपडून पाहण्यासारखं ते होईल. पण मी आउटिस नव्हे इतकं उघड आहे. तुम्हाला म्हणालो होतो की इथियोपियाच्या जंगलात मी लहानाचा मोठा झालो. मला तिथल्या आठवणी आहेत आणि त्या आता माझा भाग झालेल्या आहेत. माझे मोठे कान मला आवडतात आणि माझी सुरकुतलेली कातडी मला आवडते, कारण आपण इथले नाही, आपल्याला इथे राहायचं नाही, एक ना एक दिवस आपण इथियोपियात परत जाणार आहोत असा एक विश्वास त्यांच्यामुळे माझ्यापाशी आहे. खरा असो किंवा खोटा असो, पण आहे. माझे कान अधिक माझी कातडी अधिक माझ्या आठवणी, असं सगळं अोबडधोबड कडबोळं होऊन मी बनतो. योजनगंधेजवळ यापैकी काहीही नाही. माझ्या आठवणी तिला आठवणार नाहीत. योजनगंधेचे कान मोठे नसतील आणि योजनगंधेचं अंग सुरकुतलेलं नसेल. नाहीतर तिचा धंदाच चालायचा नाही. तिची स्वत:ची अोळख निर्माण करणारे तिच्या अंगचे अवयव वेगळे असणार. ते कोणते ह्यात मी शिरत नाही. पण असं पाहा की ह्या बिनआठवणींच्या, बिनकानाच्या, बिनकातडीच्या आउटिसचा यापैकी कशातही सहभाग नाही. तेव्हा मी काय किंवा योजनगंधेने काय, आपापली दाट अोळख विसरून जाऊन आउटिसची अोळख सांगावी ह्यात काहीसुद्धा हशील नाही. आउटिसचा मी कुणी लागत नाही. त्याला मोक्ष हवा असेल तर तो त्याचा प्रश्न आहे, माझा नाही.

कृपाचार्य: मीही तेच म्हणतो. आपण आउटिस आहोत असं अश्वत्थाम्याने वाटून घ्यावं अशी जर कृष्णाची इच्छा असेल तर तशी जाणीव त्यानेच अश्वत्थाम्यामध्ये निर्माण का नाही केली? त्याने जर जगातलं सगळं निर्माण केलं असेल तर हे त्याला का जमू नये? जी अोळख आपल्याला आपसूक जाणवत नाही ती पढवून कशी जाणवेल?

अश्वत्थामा: अगदी मान्य आहे. आणि त्यातूनही समजा मला मोक्ष मिळवावासा वाटलाच. आता आंबा राहू द्या, कारण तो मला कधी कुणी खायला दिलेला नाही. पण मला ऊस आवडतो. डोळ्यांना थांग लागणार नाही इतकी प्रचंड उसाची शेतं इथियोपियामध्ये असतात. एकेकाळी मी त्यांची वाटेल तशी नासधूस केलेली आहे. मोक्ष मिळवायचा तर हे जिभेचे चोचले मी बंद करायला हवेत. पण माझा प्रश्न असा आहे की जग निर्माण करताना ऊस चवीला इतका चांगला निर्माण केलाच का? ऊस खाऊन पोट भरेल आणि अंगात ताकद येईल, पण चवीला तो विशेष चांगला लागणार नाही अशी व्यवस्था आधीपासूनच का नाही केली? जर समुद्र दिसायला सुंदर नसता किंवा ऊस चवीला चांगला नसता तर मोक्ष जास्त सोपा झाला नसता का?

मयाहुर: मी तर ह्याच्याही पुढे जाईन. मुळात माणसांच्या आणि प्राण्यांच्या अंगांमध्ये आत्मे बंदिस्त करून नंतर त्यांना मोक्षासाठी प्रयत्न करायला लावणं हा द्राविडी प्राणायाम कशासाठी? सगळ्या आत्म्यांना सुरवातीलाच मोक्ष देऊन टाकला असता तर ही वायफळ गुंतागुंत वाढलीच नसती.

कृपाचार्य: कृष्णाने जग निर्माण केलंही असेल कदाचित, पण खूप विचार करून ते केलेलं आहे असं म्हणवत नाही.

कृतवर्मा: ह्या मुद्द्यावरून मी तुझ्याशी वाद घालेन अशी अपेक्षा धरू नकोस.

मयाहुर: पण मुद्दलात ह्या ठिकाणी आपण कसे येऊन पोहोचलो ते तरी पाहा. अर्जुन म्हणत होता की राज्य मिळवण्यासाठी मी स्वत:च्या चुलतभावांना मारणार नाही. आता कुणी म्हणेल की मारायला हरकत नाही, तर कुणी म्हणेल की हरकत आहे. हा पेच अवघड आहे. पण त्यांना मारलं तरी त्यांचे आत्मे मरत नाहीत असं म्हणून तो सुटायला थोडीदेखील मदत होत नाही. तेव्हा आत्म्याकडे नेणाऱ्या ह्या आडरस्त्याला लागून आपल्याला काहीही मिळालेलं नाही. तिथे जायला नको होतं.

संजय: तिथे काही मिळेल अशी हमी मी दिलेली नव्हती.

कृतवर्मा: हे कबूलच आहे. आम्ही तुझ्यावर रागावलो आहोत असं समजू नकोस. तुझं स्वत:चं यात काही नाही.

संजय: ते एक राहू द्या. आत्मा नको तर नको, पण आणखीही एक वेगळं कारण कृष्णाने सांगितलं होतं, तेसुद्धा तुम्हाला सांगतो. नंतर तुमची तक्रार येऊ नये.

कृतवर्मा: हा माणूस प्रश्नाचे लचके तोडतो. थेट गळा पकडत नाही.

सीनू (संजयला): तो तुला उद्देशून म्हणत नाहीय. कृष्णाला उद्देशून म्हणतो आहे.

संजय: ठाऊक आहे.

सीनू: मग पुढे सांग.

संजय: कृष्णाने जेव्हा जगातली माणसं निर्माण केली तेव्हा त्यांच्या जाती पाडल्या. प्रत्येक जातीला तिचं काम नेमून दिलेलं आहे. क्षत्रिय, शूद्र, ब्राह्मण आणि वैश्य अशा त्या चार जाती आहेत. अर्जुनाची जात क्षत्रिय अशी आहे, आणि युद्ध करणं हे क्षत्रिय जातीच्या माणसाला नेमून दिलेलं काम आहे. पण युद्ध करायचं तर माणसं मारावी लागणारच, मग ते चुलतभाऊ असोत की आणखी कुणी असोत. म्हणूनच अर्जुनाने न कुरकुरता ते करायला हवं. नाहीतर त्याची नाचक्की होईल.

कृपाचार्य: बाकीच्यांची कामं काय आहेत?

संजय: मालाची खरेदीविक्री हे वैश्यांचं काम आहे. माणसांची लग्नं लावून देणं आणि नंतर त्यांना झालेल्या मुलांना शिकवणं हे ब्राह्मणांचं काम आहे. शूद्रांची कामं खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत. कृतवर्मा मघाशी म्हणाला होता की हत्तीघोड्यांनी खूप घाण करून ठेवली आहे. ही घाण काढून नाल्यात सोडून देणं हे शूद्रांचं काम आहे. किंवा सैनिक मेल्यावर त्यांना जाळणं हेही शूद्रांचंच काम आहे. कुठल्या कामात कोण चांगला आहे हे पाहून त्याची जात ठरवलेली असते. उदाहरणार्थ, हा शेणामुताचा वास कृतवर्म्याला फार त्रासदायक वाटला होता, पण शूद्रांना तो तसा वाटत नाही. त्यामुळे किळस न येता स्वच्छतेचं काम ते करू शकतात. किंवा सीनू जात्याच बेरकी असल्यामुळे खरेदीविक्रीचं काम चांगलं करू शकते. अशी ही योजना आहे.

कृतवर्मा: कौरवसैनिकांची जात काय आहे?

संजय: अर्थात क्षत्रियच. तेव्हा अर्जुनाच्या उलट्या बाजूने युद्ध करणं हे त्यांचंसुद्धा काम आहे.

कृपाचार्य: पण कौरव मरणार हे कृष्णाने आधीच ठरवलेलं आहे, म्हणजे ही दोन्हीकडची कामं लुटूपुटूचीच आहेत.

संजय: हो, तसं म्हणायला हरकत नाही. नाटकात एका पात्राला भोसकण्याचं काम दुसऱ्या पात्राला द्यावं आणि धुळीत विव्हळत लोळत पडायचं काम पहिल्या पात्राला द्यावं तसं ते आहे.

कृतवर्मा: पण मग मघाचाच प्रश्न पुन्हा विचारतो. असं असेल तर कृष्णाने पांडवांतर्फे कौरवांकडे येऊन शिष्टाई केली ती कशासाठी?

कृपाचार्य: तोही नाटकाचाच भाग असावा. आणि युद्ध संपल्यानंतर कुरुकुलाची जी पडझड होईल आणि बायकांना माज येऊन वर्णसंकर होईल, तोही नाटकाचाच भाग असावा.

कृतवर्मा: पण मग नाटकात काय होणार हे आधीच ठरून गेलेलं आहे की त्यात बदल करण्याचा काही मार्ग शिल्लक आहे?

संजय: माहित नाही.

मयाहुर: थांबा. तुम्ही उगीच भरकटत चालला आहात. हे सगळं नाटक आहे असं कृष्ण स्वत: म्हणाला आहे का?

संजय: स्पष्ट शब्दांत तसं नाही म्हणालेला.

मयाहुर: मग आपण तसं समजूया नको. कारण तसं जर असतं तर क्षत्रिय जातीचं काम अमुक आहे ह्याला काही अर्थ उरला नसता. नट हीच प्रत्येकाची जात असती.

संजय: तेही बरोबर आहे.

अश्वत्थामा: माझी जात काय आहे?

संजय: प्राण्यांना जात असते का ह्यावर कृष्ण काही बोललेला नाही. कदाचित माणसांच्या जाती प्राण्यांना तशाच्या तशा लागू होत नसतील. हत्ती हीच तुझी जात असू शकेल.

अश्वत्थामा: पण मी नूबियातला हत्ती आहे. भारतातल्या हत्तींची जात माझ्याहून वेगळी असणार. नाहीतर मी त्यांच्यापेक्षा वेगळा दिसलो नसतो.

संजय: असेलही तसं. नक्की ठाऊक नाही, पण माणूस काय किंवा प्राणी काय, त्याची जात काही वेळा त्याच्या अंगाकडे बघून कळते आणि काही वेळा नाही. ती नेमकी अोळखणं अवघडच दिसतं. पण आपल्या आईवडिलांची जात ती आपली जात असं सोपं समजून चालायला हरकत नाही. माझे वडिल भाट होते आणि आई त्यांना सोबत करत असे. मीही तेच करतो.

अश्वत्थामा: पण असं असेल तर मला नेमून दिलेलं काम कुठलं हे कळत नाही. कारण माझे आईबाबा काम असं काहीच करत नसत. दोघेही खुशालचेंडू होते. त्यामानाने कामाचा अनुभव मला खूप आहे.

संजय: तुला नेमून दिलेलं काम कुठलं हे मलाही सांगता यायचं नाही. माणसांची सेवा करणं असं ते नसावं. कारण नाहीतर तू जन्मापासूनच माणसांच्या ताब्यात असशील अशी व्यवस्था कृष्णाने केली असती. पण तसं झालेलं नाही.

अश्वत्थामा: नाही. तसं झालेलं नाही.

मयाहुर: पण हा नेमून दिलेल्या कामाचा मुद्दा आधीच्या मुद्द्याशी मेळ खात नाही. कसं ते सांगतो. अर्जुनाची जात क्षत्रिय आहे, आणि त्याला नेमून दिलेलं काम माणसं मारायचं आहे. तेव्हा त्याबद्दल त्याने उगीच शंकाकुशंका काढू नयेत असं कृष्णाचं म्हणणं.

संजय: बरोबर.

मयाहुर: पण कृष्णाचं हेही म्हणणं होतं की आत्मा मरत नसल्यामुळे माणसं मारण्यात वाईट काही नाही. पण असं असेल तर अर्जुन क्षत्रिय आहे की नाही हा मुद्दा गैरलागू आहे. माणसं मारण्याचं काम वैश्याने केलं तरीदेखील त्यात वाईट काही नाही. आणि याउलट माणसं मारणं जर वाईट असेल तर अर्जुनाला ते काम मुळात नेमून द्यायलाच नको होतं.

संजय: आता यावर मी काय बोलणार? काम ज्याने नेमून दिलं त्याला विचारायला हवं. पण ते काही जरी असलं तरी नेमून दिलेलं काम आपण करावं एवढ्यावर हे प्रकरण संपत नाही. तुम्हाला मोक्ष हवा असेल तर कामातून काही निश्चित फायदा व्हावा अशी अपेक्षा न ठेवता ते करावं लागतं.

मयाहुर: पण अर्थात मोक्ष हवा की नाही किंवा कशाला हवा हे वेगळेच प्रश्न आहेत. ते आपल्याला सुटलेले नाहीत.

सीनू: नाहीत सुटलेले. पण समजा ते सुटले, आणि मी ठरवलं की आपण मोक्ष मिळवायचा. तरीदेखील माझं काम करत असताना किमान इतका फायदा आपल्याला व्हायला हवा अशी अपेक्षा जर मी ठेवत गेले नाही तर ते होणार नाही. मी तुम्हाला म्हणाले होते की अफू बख्तरमधून आणावी लागते. इतक्या मणाच्या बदल्यात इतकी चांदी असा भाव सांगतात. तिथले शेतकरी लुच्चे आहेत. तागडीत मारतात. हिशेबात तसं धरूनच चालावं लागतं. अफूत डिंक मिसळावा लागतो, नाहीतर वड्या नीट पडत नाहीत. किती अफूला किती डिंक याचा हिशेब काटेकोर करावा लागतो. उंट हाकणाऱ्यांना वड्या चाराव्या लागतात. अध्येमध्ये बड्या माणसांना फुकट द्याव्या लागतात. एका वडीमागे मला जितका खर्च येतो त्याच्यापेक्षा जास्त भावाने ती विकावी लागते. तसं नाही केलं तर माझा धंदा बसेल. एकदा माझ्याकडचे पैसे संपले की पुढे यातलं काहीच करता यायचं नाही. तेव्हा किती फायदा व्हायला हवा याचा हिशेब आधी न करून चालायचं नाही. नाहीतर मला मोक्ष मिळेल, पण इतरांना अफू मिळायची बंद होईल. मग तेच म्हणतील की मोक्षाच्या मागे लागून तू आमची गैरसोय केलीस.

संजय: हे सुख आणि दु:खासारखंच असावं. म्हणजे फायदा किंवा तोटा होत नाही तोवर ते वेगवेगळे समजायचे, पण एकदा यापैकी काहीतरी झाल्यावर ते सारखेच समजायचे. फायद्याची अपेक्षा ठेवायची नाही याचा अर्थ हा.

सीनू: पण तसं नाही. तोटा झाल्यावर जर मला दु:ख झालं नाही, तर हिशेबात कुठे गफलत झाली किंवा बाजारातला कुठला अंदाज चुकला हे शोधायला मी जाणार नाही. त्यामुळे माझं धंद्यातलं कसब सुधारणार नाही. ते जर सुधारायचं तर अपेश आल्याबद्दल थोडं तरी वाईट वाटायलाच हवं. गांधारात पिढ्यानपिढ्या हे अफूचं काम चालतं. त्यांचंही तसंच आहे. वाईट अफू आणि चांगली अफू ते सारखीच समजून चालले असते तर आत्ताइतकी तिची प्रत सुधारली नसती. मग तुम्हाला वाट्टेल ते खावं लागलं असतं.

कृपाचार्य: तुझं बरोबर आहे. काही वस्तू ह्या चांगल्या प्रतीच्याच असायला हव्यात.

मयाहुर: काम काय आहे त्यावर बहुतेक हे सगळं अवलंबून आहे. पण संजय जे म्हणतो ते मला अगदीच पटत नाही असं नाही. माझाही एक अनुभव मांडतो. लंबवर्तुळाचं क्षेत्र कसं काढतात ते तुम्हाला सांगितलं. मोठा व्यास, छोटा व्यास आणि तीनशे पंचावन्न यांचा गुणाकार करायचा आणि चारशे बावन्नने भागायचं. सोपं सूत्र आहे. यवनांना ते खूप आधीपासून माहित होतं. पण आता समजा आपल्याला लंबवर्तुळाचं क्षेत्र काढायचं नाही, तर कड किती लांब असते हे काढायचं आहे. त्याला परिमिती म्हणतात. गंमत अशी की लंबवर्तुळाची परिमिती किती असते याचं सूत्र कुणालाही माहित नव्हतं. यवनांमध्ये यावर खूप उलटसुलट चर्चा चालत असत. एकाच्या मते अमुक सूत्र बरोबर आहे, दुसऱ्याच्या मते दुसरं आहे असं त्रांगडं होतं. पण ही सूत्रं अचूक कधी नसायची. ती वापरून उत्तरं अदमासे बरोबर येत असत, पण थोडी ना थोडी चूक रहातच असे. काही वेळा उत्तर थोडं जास्त तर काही वेळा थोडं कमी येत असे. हे कुणालाच नीट समजत नव्हतं, पण इथे बरंच पाणी मुरतं आहे अशी शंका बळावत चालली होती. हा प्रश्न मी सोडवायला घेतला. तो हत्ती आहे असं समजून त्याचा सगळीकडून विचार केला, पण आपल्याला काय सापडायला हवं याबद्दल निश्चित अपेक्षा अशी मुद्दामच ठेवली नाही. मनात पूर्वग्रह न बाळगता गणित जिथे नेईल तिथे गेलो. खूप श्रम घेतले. शेवटी मी असं सिद्ध केलं की लंबवर्तुळाची परिमिती काढण्यासाठी अचूक सूत्र अस्तित्वात नाही. आणि हे सिद्ध करत असताना जे नव्या प्रकारचं गणित माझ्यासमोर आपोआप उलगडत गेलं ते अतिशय सुंदर होतं. तेव्हा मला वाटतं असं की निश्चित अपेक्षा न ठेवता काम करत गेलो हे चांगलं झालं. जंगलात रानडुकराच्या पाठीमागे लागतात तसा एकच एक हव्यास धरून अचूक सूत्राच्या पाठीमागे लागलो असतो, तर सूत्रही सापडलं नसतं आणि ह्या नव्या गणिताचा शोधही लागला नसता.

कृपाचार्य: हे पटण्यासारखं आहे.

कृतवर्मा: सीनूचंही बरोबर आहे आणि मयाहुराचंही बरोबर आहे. काम काय आहे त्यावर ते अवलंबून आहे. मी म्हणेन की फायद्याची अपेक्षा न ठेवता काम करा हा एक सल्ला आहे. जी परिस्थिती तुमच्यासमोर असेल तिला हत्ती समजा, आणि हा सल्ला लागू आहे की गैरलागू हे तुमचं तुम्ही ठरवा. मोक्षाशी ह्या कशाचा काही संबंध नाही. मोक्ष नको असेल तरीसुद्धा सल्ला म्हणून तो शिल्लक राहतोच.

कृपाचार्य: कृष्णाच्या म्हणण्याचा असा अर्थ करता येईल का याबद्दल मला शंका आहे, पण विपर्यासच जर करायचा तर असा करायला हरकत नाही.

सीनू (मयाहुराला उद्देशून): तू गणिताचं तेवढं सांगितलंस. त्यापुढचा भाग मला माहित आहे, पण इतरांना सांगितलेला नाहीस.

मयाहुर: सांगण्यासारखं फार नाही.

सीनू: पण तरीही सांगूनच टाक.

मयाहुर: सांगतो. दडवण्यासारखंही त्यात काही नाही. मला जे काही शोध लागत गेले ते मी यवनांच्या पद्धतीप्रमाणे चामड्याच्या तुकड्यांवर लिहून ठेवले होते. त्याखेरीज मी जमवलेली कितीतरी पुस्तकं माझ्याजवळ होती. अथेनाईमध्ये एक हुशार माणूस होऊन गेला. नायक आणि नायिका शेवटी सुखी होतात असं नाटक जर लिहायचं असेल तर ते चांगलं कसं लिहावं ह्यावर त्याचं पुस्तक आहे. त्याचीही प्रत होती. यवनांचं नाटक इथल्यापेक्षा वेगळं असतं. तेव्हा मी खांडववनात राहात होतो. तिथेच हे सगळं होतं. अर्जुन आणि त्याचे भाऊ यांनी ठरवलं की त्यांना ती जागा गाव वसवायला हवी आहे. एक दिवस कुणाला काही न सांगता त्यांनी रानाला आग लावली. माझं सगळं त्यात गेलं. अंगाचा डावा भाग आणि चेहरा खूप भाजला पण जीव वाचला. पण नुकतंच मला हे समजलं की माझ्या आत्म्याला मात्र आगीमुळे काही इजा झालेली नाही. तेवढी एक बातमी चांगली आहे.

कृपाचार्य: जे गेलं ते नंतर पुन्हा लिहून काढलंस का?

मयाहुर: नाही. मी शोधलेलं गणित बरोबर असेल तर कुणाला तरी ते पुन्हा सापडेलच. आणि नसेल तर जळलेलंच बरं.

सीनू: विक्षिप्त माणूस आहेस.

कृतवर्मा: तो विक्षिप्त असेल, पण कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही असं त्याचं काम असतं. अर्जुनाचं तसं नाही. त्याला नेमून दिलेलं काम माणसं मारण्याचं आहे, तेव्हा ते तू निमूटपणे कर इतकं सांगणं पुरेसं वाटत नाही.

मयाहुर: हे कबूल आहे. तुझं काम निमूटपणे कर असं मीच स्वत:ला सतत सांगत असतो. पण अर्जुनाचं तसं नाही.

कृतवर्मा: हे युद्ध कसं आहे ते पाहा. धैर्यधर आणि शूरसेन हे दोघेही क्षत्रिय आहेत आणि एकमेकांना मारण्याचं काम त्यांना नेमून दिलेलं आहे. हे जर त्यांनी निमूटपणे केलं तर दोघांनाही इजा होईल. याउलट त्यांनी हे करायचं नाकारलं तर दोघेही आनंदाने घरी जाऊ शकतील.

अश्वत्थामा: म्हणजे पुन्हा निष्कर्ष हाच निघतो की जग निर्माण करताना नीट विचार केलेला नाही. हा संशय मला फार पूर्वीपासून आहे. तुम्ही एकदा नूबियामध्ये येऊन पाहा. मोजता येणार नाहीत इतके कावळे आणि मोजता येणार नाहीत इतकी घुबडं तिथे एकाच टापूत राहतात. एकमेकांचा प्रचंड दुस्वास करतात. कावळ्यांना दिवसा दिसतं पण रात्री नाही आणि घुबडांना रात्री दिसतं पण दिवसा नाही. दुपार झाली की कावळे जमा होतात आणि एकट्या पडलेल्या घुबडाला शोधून काढून घेराव घालून चोचींनी त्याचं रक्त बाहेर काढतात. याचा सूड घुबड मध्यरात्री घेतं. झाडाच्या फांदीवर रांगेने झोपलेल्या कावळ्यांवर झडप टाकून त्यांची डोकी फाडून ते आतला मेंदू बाहेर काढतं. दोन्ही जाती नेमून दिलेली कामं करतात. ती नेमून दिलेली असणार हे उघड आहे, कारण घुबडांचे आणि कावळ्यांचे आईबाप अगदी हेच करत होते. पण ती एकमेकांच्या जिवावर उठून करतात, आणि म्हणूनच मी म्हणतो की ही अख्खी योजना वेडेपणाची आहे. दोघे एके ठिकाणी राहणार नाहीत याची जग निर्माण करतानाच सोय बघायला हवी होती. निदान त्यांना एकत्र का आणलं हे शांतपणे समजावून द्यायला हवं होतं. यातलं काहीच केलेलं नाही.

कृपाचार्य: घुबड हुशार असतं.

कृतवर्मा: मी असं म्हणणार नाही, कारण ते फक्त नेमून दिलेलं काम करतं. पण घुबडापासून माणसानं काही शिकणं ह्याला मात्र मी हुशारी म्हणेन. (कृपाचार्याकडे रोखून पाहतो.)

कृपाचार्य: (थोड्या वेळाने) विचार करण्यासारखी बाब आहे. पण पाचवा नियम?

(कृतवर्मा जिवणीला मुरड घालून हसतो. आपली स्वत:ची हसण्याची उबळ दाबून धरून कृपाचार्य त्याला प्रत्युत्तर देतो. हे दोघे काहीतरी खाजगी बोलत असल्याचं इतरांच्या लक्षात येतं, पण विचारायला कुणी धजत नाही.)

कृतवर्मा: (सावरून बसत) मयाहुरा, तू काही म्हणण्याच्या बेतात होतास.

मयाहुर: खरं तर नव्हतो, पण म्हणून टाकतो. कदाचित आपण कृष्णावर अनाठायी टीका करत असू. जग निर्माण करताना त्याने अमुकअमुक करायला हवं होतं अशा पठडीतल्या आपल्या तक्रारी आहेत. पण त्याने ते निर्माण केलेलं आहे असं मला वाटत नाही.

कृपाचार्य: तसं फक्त वादाखातर गृहीत धरावं असं मी म्हणालोच होतो.

मयाहुर: जे काही तो म्हणतो आहे त्यातल्या कितीतरी बाबींची संगती लागत नाही. त्याने जर खरोखरीच जग निर्माण केलं असतं तर जगाची रचना आहे तशी का आहे यामागचं सुसंगत स्पष्टीकरण त्याला देता आलं असतं. पण त्याने ते आपल्याला दिलेलं नाही.

कृतवर्मा: कदाचित त्याला ते द्यायचं नसेल.

कृपाचार्य: पण मग आम्ही त्याचे चेले बनावं अशी अपेक्षा धरू नये.

मयाहुर: बऱ्याच गोष्टी जुळत नाहीत. मी तुम्हाला मघाशी म्हणालो होतो की फिलेस्तानमध्ये एक तरुण माणूस होता, आणि तो गोष्टी सांगत फिरत असे. आपल्या बापाचं नाव याहवे असं तो सांगत असे, पण ह्या बापाला तिथे कुणीच पाहिलेला नाही. फिलेस्तानमधल्या लोकांची अशी समजूत आहे की जग याहवेने निर्माण केलं. त्यांच्या पुस्तकात तसं तपशीलवार लिहिलेलं आहे. तिथल्या लोकांना कृष्ण माहित नाही, आणि इथल्या लोकांना याहवे माहित नाही. शिवाय जगाची रचना अशी आहे की दोघाजणांनी एकमेकांना कळू न देता ते अर्धवट निर्माण करणं शक्य नाही. कारण तसं असतं तर फिलेस्तानमधले डोंगर इथल्यापेक्षा अगदी वेगळे असते, किंवा तिथल्या पाण्याची चव इथल्यापेक्षा अगदी वेगळी असती. पण तसं नाही. तेव्हा काहीतरी गोंधळ आहे. कृष्ण आणि याहवे यापैकी किमान एकजण खोटं बोलतो आहे हे नक्की.

कृपाचार्य: अशीही शक्यता आहे की याहवेने कृष्णाला निर्माण केलं असेल, पण ही गोष्ट त्याला भारतातल्या लोकांना कळू द्यायची नसेल. का ते माहित नाही. अर्थात ह्याच्या उलटही असू शकेल. कृष्णाने कदाचित याहवेला निर्माण केलं असेल, पण ही गोष्ट त्याला फिलेस्तानमधल्या लोकांना कळू द्यायची नसेल.

कृतवर्मा: किंवा ह्या दोघांमागचा सूत्रधार वेगळाच असू शकेल. जग कसं असायला हवं ह्याचा आराखडा तयार करून याहवे आणि कृष्ण ह्या दोघांना जगाच्या वेगवेगळ्या भागांत तो अंमलात आणायला त्याने सांगितला असेल. आपण नामानिराळे राहावं अशीच त्याची इच्छा असेल. याहवे फिलेस्तानमध्ये सांगतो की जग मी निर्माण केलं आणि कृष्ण भारतात सांगतो की जग मी निर्माण केलं. दोघेही अर्धसत्य सांगताहेत, पण आपापल्या जागी त्यांची प्रतिष्ठा टिकून राहावी म्हणून सूत्रधार कदाचित हे खपवून घेत असेल.

मयाहुर: याहवेने लिहिलेलं पुस्तक वरवर जरी वाचलं तरी हे लगेच कळतं की स्वत:चं कौतुक करून घ्यायची त्याला मोठी हौस आहे. कृष्णाचाही स्वभाव यापेक्षा फार वेगळा दिसत नाही. तेव्हा तू म्हणतोस ते शक्य आहे. आणि एकदा ह्या दिशेने विचार सुरू केला की काही परस्परसंबंध आपोआप लक्षात येत जातात. संजय मघाशी म्हणाला की कृष्णाने सूर्याला योग शिकवला आणि सूर्याने मनूला शिकवला. योग म्हणजे काय ते मला ठाऊक नाही आणि सूर्याचा इथे संबंध काय हेही ठाऊक नाही. पण ते महत्त्वाचं नाही. काही जरी असलं तरी मनू हा कृष्णाचा चेला आहे इतकं यावरून उघड होतं. ह्या मनूबद्दल मला थोडीफार माहिती आहे. असं सांगतात की एकेकाळी खूप मोठा पूर आला आणि सगळी माणसं बुडून मेली. त्यावेळी मनूने एक गलबत तयार करवून घेतलं आणि एका देवमाशाच्या शिंगाला ते दोरखंडाने बांधून पुरातून तरून नेलं. पूर अोसरल्यानंतर पाण्यातून बाहेर आलेल्या एका अप्सरेला तो जुगला. त्यातून पुन्हा माणसं जन्माला आली. आता नवलाची गोष्ट अशी की फिलेस्तानमध्ये नोहा नावाचा एक याहवेचा चेला होता. त्यानेही एक गलबत तयार करवून घेतलं आणि पूर अोसरल्यानंतर तशीच पुन्हा माणसं जन्माला घातली. तेव्हा तर्क असा करता येतो की फिलेस्तानपासून भारतापर्यंत व्याप्ती असणारा एकच मोठा पूर आला असणार. ह्या दोघांनीही तो आपापलं अवडंबर माजवण्यासाठी वापरून घेतला. भारतातल्या माणसांना वाटतं की आपण कृष्णाच्या चेल्याची मुलं आहोत आणि फिलेस्तानमधल्या माणसांना वाटतं की आपण याहवेच्या चेल्याची मुलं आहोत. इकडचा पत्ता तिकडे नाही.

सीनू: पण असं असेल तर ह्या सूत्रधाराने फिलेस्तानातून भारतात यायला रस्ता ठेवायला नको होता. तसा तो ठेवल्यामुळेच हे गुपीत उघड झालं.

मयाहुर: कदाचित हा रस्ता मूळ आराखड्याचा भाग नसेलही. नंतर कुणीतरी तो काढला असू शकेल. आपण म्हणतो आहोत की जग निर्माण करण्याचं काम एका सूत्रधाराने दोघांना वाटून दिलं असेल. ढोबळ कल्पना म्हणून हे ठीक आहे, पण अर्थात ते दोघे नव्हेत तर अनेकजण असावेत. कारण उदाहरणार्थ चीनमध्ये कुणी याहवेचं नाव ऐकलेलं नाही आणि कृष्णाचंही नाही.

कृपाचार्य: पण हा आराखडा किती जुना आहे हेही आपल्याला माहित नाही. त्यामुळे हा सूत्रधार आज जिवंत असेलच असं खात्रीने म्हणवत नाही. मध्ये केव्हातरी तो मेला असू शकेल. आणि एकदा त्याचा प्रभाव मागे पडल्यानंतर इतरांनी आपापल्या बुद्धीने जगाच्या रचनेत फेरफार केले असंही शक्य आहे.

कृतवर्मा: पण असं असेल तर काय करायचं हे ठरवणं फार अवघड आहे. कारण कुठल्या बाबतीत कुणाकडे जबाबदारी आहे याबद्दल निश्चित काही समजत नाही.

सीनू: अजून किती वेळ राहिला आहे?

संजय: सतरावा अध्याय संपत आला आहे. अठराचा आपला अदमास बरोबर असेल तर आता हे लवकरच आटपेल. पण कृतवर्म्याचा सल्ला कृष्णाने मानलेला दिसतो. नुकताच तो म्हणाला की माणसांचे तीन प्रकार पडतात. ताजं खाणारे, शिळं खाणारे, आणि तेलकटतिखट खाणारे. आपल्यापैकी कोण कुठल्या वर्गात मोडतो ह्यावर चर्चा घडवून आणता येईल.

कृतवर्मा: नको. मनोरंजन करून घेण्याची वेळ आता मागे पडलेली आहे.

कृपाचार्य: पण पुढचं ठरवायला हवं.

सीनू: मला एक शंका येतेय ती बोलून दाखवते. मग मला तर्कटी म्हणा, काही म्हणा.

कृपाचार्य: बोल.

सीनू: अर्जुन भेदरट आहे आणि मनाने डळमळीत आहे. शिवाय कृष्णासमोर तो आता पुरता गयाळ होऊन गेलेला आहे. पण मी म्हणते की तो बुद्धीने मंद नाही. आपल्याला पडलेले प्रश्न त्यालाही पडले असणार, पण कृष्णाला ते समोरासमोर विचारायचा त्याला धीर होत नसावा.

कृतवर्मा: पण मग यावर आम्ही काय करणार?

सीनू: सांगते. संजयला जो वर मिळालेला आहे त्याबद्दल अर्जुनाला ठाऊक असणार.

संजय: हो, ठाऊक आहे.

सीनू: म्हणजे अर्जुनाला हा अंदाज असणार की आपलं आणि कृष्णाचं संभाषण खाजगी नाही. कृष्ण जे म्हणतो आहे त्याचा नीट अर्थ त्यालाही लागत नसावा. तेव्हा संजयने हे सगळं ऐकून इतरांना सांगावं अशी त्याचीही इच्छा म्हणा किंवा अपेक्षा म्हणा, पण असावी. मुखदुर्बळ असल्यामुळे तो स्वत: काही करू शकत नाही. पण इतरांनी आपल्या ह्या बिकट अवस्थेची दखल घ्यावी आणि योग्य वाटेल ते करावं अशी एक कळकळ त्याच्या मनात असणार. माझा तर्क मी थोडा ताणते आहे, पण हे अगदीच अशक्य वाटत नाही.

कृपाचार्य: नाही, अशक्य मुळीच वाटत नाही.

कृतवर्मा: मी एक सुचवतो. सगळे धैर्यधर आणि सगळे शूरसेन इथेच आपल्याभोवताली आहेत. त्यांना गटागटाने एकत्र आणता येईल. एकूण परिस्थिती समजावून देऊन युद्ध करायचं की नाही हे आता तुम्हीच ठरवा असं सौम्य शब्दांत आपल्याला म्हणता येईल. त्यांचा कल काय होतो हे पाहून पुढचं ठरवता येईल.

सीनू: कल्पना चांगली आहे. मी आणि मयाहुर इथून केव्हाही बाहेर पडू शकतो. पण तुमची काळजी वाटते.

अश्वत्थामा: दोन्ही सैन्यांतले कितीतरी हत्ती माझ्या अोळखीचे आहेत. त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम माझ्याकडे लागलं. आणि हे एकदा झालं की घोड्यांनाही तो आपसूक कळेलच. ह्या चर्चेमध्ये त्यांचंही मत घेता येईल. पण तसं पाहिलं तर घोडे कधीच हत्तींच्या शब्दाबाहेर नसतात.

मयाहुर: कल्पना खरंच चांगली आहे. पण मला वाटतं की त्याआधी एक शेवटची संधी देऊन बघावी.

कृपाचार्य: कुणाला?

मयाहुर: ज्या कुणाच्या हाती अंतिम सूत्रं असतील त्याला. मग तो कृष्ण असो की आणखी कुणी असो. आपले प्रश्न त्याच्यापर्यंत पोहोचले असतील आणि उत्तरं त्याच्याकडे असतील तर ती त्याने आपल्याला कळवायला हवीत. नसतील तर इलाज नाही. म्हणजे पोहोचले नसतील तर किंवा उत्तरं नसतील तर किंवा असून द्यायची नसतील तर.

कृतवर्मा: माझी हरकत नाही.

कृपाचार्य: माझीही नाही.

सीनू: मग एक करून बघूया. (आपल्या गाड्यात जाते. तिथे शोधाशोध करून तालपत्रांची एक चळत आणि मघाचाच तांब्या घेऊन परत येते. चळत समोर ठेवते.) सगळी कोरी आहेत. माझ्याकडे नेहमी साठा असतो. इथे मी ही मांडलेली आहेत, लिही म्हणावं काय लिहायचं ते. उत्तरं बरोबर वाटली तर आपण लागलीच प्रती काढून घेऊ. (तांब्या मयाहुराकडे सोपवते.) किती वेळ द्यायचा?

(मयाहुर अश्वत्थाम्याच्या ढुंगणावर हाताने थापटतो, तसा अश्वत्थामा धार सोडू लागतो. मयाहुर ती तांब्यात भरून घेतो. तांब्याच्या तळाला असलेलं लहान भोक त्याने आपल्या तर्जनीने बंद केलं आहे. चळत मध्यभागी ठेवून तिच्याभोवती रिंगण करून सगळेजण उभे आहेत.)

मयाहुर: अठरा क्षण देऊया. त्याचा अठराचा आग्रह आम्ही पाळतो, आमचा उत्तरांचा आग्रह त्याने पाळावा. (तांब्याखालचं बोट बाजूला करून धार पडू देतो. आतल्या खुणांकडे तो बारीक लक्ष ठेवून आहे. 'अठरा क्षण' हा अवधी उत्कंठा ताणली जावी इतका मोठा आहे, पण कंटाळा यावा इतका मोठा नाही. रिंगणाभोवतालची गर्दी वाढते आहे. मयाहुर तांब्याखाली पुन्हा बोट धरतो तशी धार पडायची थांबते.) वेळ संपली.

(अश्वत्थामा पुढे होतो आणि एकेक पान आपल्या सोंडेने काळजीपूर्वक बाजूला करत जातो.)

अश्वत्थामा: (त्यांची पुन्हा व्यवस्थित चळत करून सोंडेने सीनूपुढे धरतो.) घे. सगळी कोरी आहेत.

(कृपाचार्य आणि कृतवर्मा एकमेकांकडे दीर्घकाळ पाहत राहतात.)

सीनू: मला नकोत ती आता.

अश्वत्थामा: ठीक आहे. (सोंड मागे घेऊन पानं तोंडात ठेवतो आणि चावून चावून खाऊन टाकतो.) माफ करा हं मंडळी! पण राहवत नाही. (शेणाचा पो टाकतो.)

(काहीसा लांब जाऊन मयाहुर तांब्या अोतून देतो आणि हाताची बोटं झाडत राहतो. भोवतालचे सैनिक अवघडून स्तब्ध उभे आहेत. 'मातर! मातर! तू कुठे आहेस? मातर!' अशा आरोळ्या दूरवरून येऊ लागतात. सीनू त्या दिशेला तोंड वळवते आणि उत्साहाने हात हलवत राहते.)

सीनू: माझी पोरगी इकडेच येते आहे. म्हणजे ह्या दोघांचं बोलणं संपलेलं दिसतंय.

संजय: हो, नुकतंच संपलं.

कृपाचार्य: कोण काय म्हणालं शेवटी?

संजय: अर्जुन म्हणाला की आता मी युद्धाला तयार आहे. काय करायचं ते मला नेमकं समजलं आहे आणि माझा गोंधळ नाहीसा झाला आहे.

अश्वत्थामा: माझा नाही.

समाप्त

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

हाही भन्नाट झालेला आहे. सविस्तर प्रतिक्रिया नंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्ट क्लासिक होण्याची शक्यता आहे या रचनेत.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या भागाच्या तुलनेत कमी फटाके आहेत, पण तरी एकुणात हे लेखन सुपर आहे! आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाही भाग भारी. धनंजयशी सहमत आहे. शीर्षकाचा अर्थ मात्र समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचं गणित पहिल्या भागात करून दाखवलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0