"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..."

१९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या. त्यामुळे काहीतरी नवीन प्रकार आहे इतकेच माहीत होते.

पण भारताने त्या पहिल्या सामन्यात विंडीजला हरवले याचे आश्चर्य वाटले होते इतके आठवते. त्यानंतरही या स्पर्धेबद्दल फारशी चर्चा कोठे झाल्याचे आठवत नाही. त्यावेळेस भारत नुकताच दोन महत्त्वाच्या मालिका खेळलेला होता. आधी पाकिस्तान मधे आणि नंतर वेस्ट इंडिज मधे. दोन्हीकडे पराभव झालेले होते, अपेक्षितपणे. तोपर्यंत फक्त अधूनमधून नाव ऐकलेला मोहिंदर अमरनाथ अचानक प्रकाशात आलेला होता - पाक मधे ३ व वेस्ट इंडिज मधे २ शतके मारून. पाक विरूद्ध हरल्यावर गावसकरचे कप्तानपद काढून घेउन कपिल कडे देण्यात आले होते, व गुंडाप्पा विश्वनाथलाही संघातून वगळण्यात आले. नंतरची वेस्ट इंडिज सिरीज आपण जरी हरलो तरी नवीन कप्तान व संघाच्या मानाने इतक्या बलाढ्य संघाविरूद्ध त्यांच्याच घरी कामगिरी ठीकठाक होती.

हा वर्ल्ड कप या सिरीजनंतरचा. मधे दोन महिने होते. पण तेव्हा मुळात इतक्या सलग सिरीज नसत. मार्च-एप्रिल मधे आधीचा सीझन संपला, की मग जर इंग्लंड दौरा नसेल तर कधीकधी ५-६ महिने क्रिकेट नसे. ही स्पर्धा सुरू झाल्यावरही भारतात फारशी हवा नव्हती. एकतर वन डे क्रिकेट फारसे माहीत नव्हते. कसोटी सामन्यांच्या अधेमधे फुटकळ सामने असत. स्थानिक संघाविरूद्ध तीन दिवसांचा सामना, अध्यक्षीय संघाविरूद्ध सामना वगैरे प्रमाणेच. त्यातले विजय पराजय कोणी फारसे लक्षात ठेवत नसत, त्याला काही महत्त्वही नसे.

त्यामुळे हा पहिला सामना जिंकल्यावरही फारशी काही हवा झाल्याचे लक्षात नाही. मग नंतर झिम्बाब्वेला हरवले. त्यानंतर मात्र एकदा विंडीज कडून आणि एकदा ऑस्ट्रेलियाकडून भारत हरला (याचीही इतकी चर्चा आठवत नाही. ही सगळी माहिती नंतर काढलेली). त्यानंतर आला तो टनब्रिज वेल्स चा झिम्बाब्वे विरूद्धचा सामना. त्यातील कपिलच्या नाबाद १७५ ची बातमी संध्याकाळी की दुसर्‍या दिवशी आली, आणि मग हळुहळू लोकांना इण्टरेस्ट वाढू लागला. टीव्ही/रेडिओ व पेपर्स मधे बातम्या येउ लागल्या.

या १७५ बद्दल ती एकच बातमी तेव्हा आली होती. तोपर्यंत भारतात या कपमधल्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवतच नव्हते. तेव्हा सरकारचे "माहिती आणि नभोवाणी मंत्री" जाहीर करत कोणत्या स्पर्धेचे प्रक्षेपण दूरदर्शन वर होणार ते. त्यातही परीक्षांचा काळ वगैरे विचारात घेत. एकूणच इतर मंत्री माहीत नसले तरी या एका खात्याचे मंत्री आम्हाला नेहमीच माहीत असत Smile विठ्ठलराव गाडगीळ व एच के एल भगत ही दोन नावे लक्षात आहेत. पण या सामन्याचे प्रक्षेपण मुळात उपलब्धच नाही हे नंतर समजले.

१७/५ अशी अवस्था असताना कपिलने शेपटाला बरोबर घेउन स्कोअर २६२ पर्यंत नेला इतपत माहीत होते. पण यातील अनेक डीटेल्स नंतर माहीत झाले. एकतर १७५ हा स्कोअर तेव्हा highest individual score होता वन डे मधला. एक दोन वर्षांनंतर रिचर्ड्स ने तो मोडला, पण केवळ रिचर्ड्सच तो मोडू शकेल असे लोकांना वाटे इतका मोठा स्कोअर तो तेव्हा होता. अगदी ९०च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत १०-१२ शतके म्हणजे खूप असे आणि शतकांचे स्कोअरही फार मोठे नसत. वर्ल्ड कप मधल्या गेम्स ६० ओव्हर्सच्या होत्या हे धरले तरी तीन स्पर्धांमधे इतका मोठा स्कोअर कोणी केलेला नव्हता. बाकी मॅचेस मधे तर नाहीच. रिचर्ड्सचा १८९ चा इंग्लंड विरूद्धचा स्कोअर व ती इनिंग ही अनेक वेळा सर्वोच्च गणली जाते. पण माझ्या मते कपिलची ही इनिंग सुद्धा तितकीच भारी होती - काकणभर जास्तच. दोन्ही डाव हे पहिल्या विकेट्स पडल्यावर तळाच्या लोकांना बरोबर घेउन केलेले होते. एक इंग्लंड विरूद्ध असला तरी त्या दिवशी त्या मैदानावर झिम्बाब्वेच्या बोलर्सनीही जबरदस्त बोलिंग केली होती. त्यात वर्ल्ड कपचे प्रेशरही आलेच.

यातील आणखी एक गंमत. त्या दिवशी त्या मैदानावर हे पिच मधल्या स्क्वेअरच्या एका बाजूला होते. त्यामुळे पिचच्या एका बाजूला बाउण्ड्री जवळ तर दुसरीकडे खूप लांब होती. पण कपिलने मारलेल्या ६ सिक्सेसपैकी बहुतांश या त्या लांब बाउण्ड्री असलेल्या बाजूला मारल्या होत्या, हे खुद्द झिम्बाब्वेचा कीपर डेव्ह हॉटननेच नंतर सांगितले. कपिलचा हा असला अचाटपणा त्याला फॉर्म मधे खेळताना पाहिलेल्यांना लक्षात असेल. जेव्हा १०० हा स्ट्राइक रेट फार महान समजला जात असे तेव्हा त्याच्या अनेक इनिंग्ज ३० बॉल मधे ५०, ३६ बॉल मधे ७२, ५६ बॉल्स मधे ८९ असल्या प्रकारच्या आहेत, त्या ही टॉप क्वालिटी बोलिंग विरूद्ध, आणि परदेशातील पिचेस वर. आणि नुसती धुलाईच नाही, तर त्याचे "रनिंग बिटविन" सुद्धा भारी होते. दुसरा फलंदाज तिकडे जेमतेम पोहोचेपर्यंत हा इकडे बॅट टेकवून पुन्हा ३-४ पावले निघाला आहे अजून एक रन काढायचा आहे का बघायला, हे कायम दिसणारे दृश्य होते.

या विजयापासून भारताची घोडदौड सुरू झाली. मग ऑस्ट्रेलियाला हरवून आपण सेमी मधे पोहोचलो. आणि तेव्हा सेमी फायनल व फायनल दूरदर्शनवर लाइव्ह दाखवणार असे जाहीर झाले. आता तेव्हाचे कॅलेण्डर पाहिले तर २२ जून ची सेमी फायनल ही बुधवारी होती. या गेम्स साधारण दुपारी ३ वाजता सुरू होत भारतातल्याप्रमाणे. तेव्हा शाळा सुरू झालेल्या होत्या. म्हणजे ही शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळी पुढे पाहिली असावी. भारताचा डाव पाहिल्याचे लक्षात आहे. चेस सुरू असताना मोहिंदर व यशपाल चांगले खेळत होते पण रन रेट अजून वाढायला हवा होता. आता संदीप पाटील यायला हवा असे लोक म्हणू लागले ते ही लक्षात आहे. मग तो आला आणि धुंवाधार खेळला. मॅन ऑफ द मॅच जरी त्याला मिळाले नसले तरी माझ्या दृष्टीने मॅच त्यानेच खेचली. संदीप पाटील याआधीही इंग्लंड मधे चांगला खेळला होता. एकदा एका टेस्ट मॅच मधे बॉब विलीसविरूद्ध त्याने एकाच ओव्हर मधे ६ फोर्स मारून ८० वरून १०४ वर जात शतक पूर्ण केले होते (त्या ओव्हर मधे एक नो बॉल होता). या सेमी फायनल मधेही त्याने बॉब विलीसला मारला होता.

फायनलमधेही भारताला जिंकण्याचे चान्सेस नव्हतेच. त्यात १८३ वर सगळे ऑल आउट झाल्यावर तर नाहीच. पण भारत मॅच हरणार यात काही फारसे नावीन्य नव्हते. तरी आम्ही बघत बसलो. संधूचा एक बॉल एरव्ही आक्रमक खेळणार्‍या ग्रीनिज ने सोडला व तो ऑफ स्टंपची बेल घेउन गेला तेव्हा एकदम आता काय होते याबद्दल कुतूहल निर्माण झाले. पण तरी येणारा बॅट्समन रिचर्ड्स होता. ही मॅच बघताना साधारण या वेळेस आमच्याकडे व आसपास लाइट्स गेले. तेव्हा स्कोअर समजण्याचे इतर मार्ग सोपे नव्हते. कोणीतरी जेथे लाइट्स आहेत अशा भागापर्यंत गाडीने जाउन स्कोअर "आणला" तरच. रेडिओ वर धावते समालोचन होते का लक्षात नाही पण कोणाकडे बहुधा ट्रान्झिस्टरही नसावा आसपास. कारण पुन्हा लाइट्स येईपर्यंत स्कोअर माहीत नव्हता. मग लाइट्स आले तेव्हा अजून तीन विकेट्स उडालेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यात रिचर्ड्स होता हे समजले. नंतर लगेच लॉइडही परतला. आता मात्र एकदम इंटरेस्ट ने सगळे पाहू लागले. मग मधे थोडा वेळ दुजाँ व बहुधा होल्डिंगने स्कोअर बराच पुढे नेला. ओव्हर्स भरपूर होत्या त्यामुळे हे आता असेच चिकटपणे खेळून जिंकतात की काय अशी शंका आली. साधारण तेव्हाच मोहिंदर बोलिंगला आला.

त्याची बोलिंग अ‍ॅक्शन अफाट होती. रन अपची सुरूवात जरा वेगाने करून मग बॉल टाकावा की नाही याचा फेरविचार करत असल्यासारखा तो स्लो होत असे क्रीजजवळ येताना. त्याने मध्यमगती गोलंदाजी करून ही जोडी फोडली. मग पुढचे लौकर गुंडाळून आपण मॅच जिंकली. मग ते चार्ल्स च्या हस्ते पारितोषिके देणे वगैरे लक्षात आहे. दुसर्‍या दिवशी 'केसरी' मधे "विंडीजचा धुव्वा, विश्वचषक भारताकडे" अशी पहिल्या पानावरची मोठी बातमी व कपिलचा हातात कप घेतलेला "फावड्या" फोटो - तो पेपर अनेक वर्षे जपून ठेवला होता. नंतर कोठे गेला माहीत नाही.

या विजयानंतर जागतिक व भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. सुनील गावसकर ने १९७५ च्या वर्ल्ड कप मधे ६० ओव्हर्स खेळून फक्त ३६ रन्स केले होते ही बातमी या दरम्यान कधीतरी फुटली. तोपर्यंत त्याबद्दल ऐकल्याचे आठवत नव्हते. या सामन्यांना महत्त्व आले. या मॅचेस टीव्हीवर दिसू लागल्या, लोक पाच दिवस कसोटी सामनेही पाहात, हे तर एका दिवसात संपायचे. १९८५ सालच्या वर्ल्ड सिरीज कप मधला भारत-पाक अंतिम सामना बहुधा रविवारी होता. ऑस्ट्रेलियात डे-नाइट असल्याने भारतात तो सकाळी उशीरा सुरू झाला. तेव्हा रस्त्यांवर असलेली सामसूम लक्षात आहे. १९८४ मधे शारजालाही मॅचेस सुरू झाल्या. १९८४ मधेच भारतात नवी दिल्ली मधल्या नेहरू स्टेडियमवर भारत-पाक सामना डे-नाइट खेळला गेला. तेव्हा त्याचे अप्रूप वाटले होते. खेळाडूंच्या दिसणार्‍या चार सावल्या वगैरे. ती मॅच भारताने जिंकली होती. आता रेकॉर्ड पाहिले तर नंतर तो "बेनिफिट" सामना धरला गेला असे दिसते. याच सिरीज मधे मुंबईत झालेल्या आणखी एका बेनिफिट मॅच मधे संदीप पाटील व कपिल ने जबरी धुलाई केली होती ते ही लक्षात आहे.

तरीही हे सामने एकाच सिरीज मधे कसोटी मॅचेसच्या अधेमधे होत. वेगळी वन डे सिरीज नसे. कपडेही पांढरेच असत. नियमही फार वेगळे नव्हते - पॉवर प्ले, नो बॉल्स चे नियम साधारण कसोटीसारखेच होते. २२०-२४० रन्स म्हणजे भरपूर होत. आणखीही विविधता होती. ऑस्ट्रेलियामधे पांढरा बॉल व रंगीत कपडे असत. इंग्लंड मधे ५५ ओव्हर्सच्या मॅचेस असत. भारत, इंग्लंड ई. ठिकाणी कॅमेरे एकाच बाजूला असत. त्यामुळे बोलर्सची अ‍ॅक्शन दोन्ही बाजूनी दिसत असे. आणि कपिल, इम्रान, मार्शल, होल्डिंग, हॅडली सारख्यांच्या अ‍ॅक्शन अगदी रन-अप पासून बघायला मजा येत असे. प्रत्येक ओव्हरनंतर जाहिरात नसल्याने ओव्हर झाली, की विकेट कीपर व स्लिप फिल्डर्स दुसर्‍या क्रीजकडे जात आहेत हे दिवसभर बघायला मिळे. साधारणपणे अर्धशतक वगैरे केलेल्याला मॅन ऑफ द मॅच मिळे. बोलर्सना त्यामानाने कमीच मिळत असे. याच काळात कसोटी सामने निर्जीव होउ लागले होते. त्यामानाने हे सगळे बरेच वेगवान वाटे.

तरीही कसोटी सामन्यांचे महत्त्व होतेच. एक उदाहरण - तेंडुलकरची पहिली पाच-साडेपाच वर्षे व पहिले ७५-७६ सामने वन डे मधे एकही शतक नव्हते. पण त्याचे नाव कसोटीतील कामगिरीमुळे ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले होते. अर्थात वन डे मधे निकालावर परिणाम करणारी अर्धशतके होतीच. पण शतक नव्हते.

या वर्ल्ड कप विजयाचे आणखी पडसाद उमटले ते त्याच वर्षी वेस्ट इंडिज भारत दौर्‍यावर आले तेव्हा. त्यांनी ६ कसोटीत आपल्याला ०-३ असे व ५ वन डे मधे ०-५ असे हरवले. त्याबद्दल आणखी माहिती या लेखात आहे.

आता नंतर भारताने पुन्हा २०११ मधे कप जिंकलेला आहे. पण तरीही हा १९८३ चा विजय भारी वाटतोच. माझा समाजशास्त्रीय अभ्यास वगैरे नाही पण गेल्या एक दोन दशकात एकूणच भारताची आंतरराष्ट्रीय पत वाढलेली आहे. आपले एकूणच लोक व खेळाडू जगात कोठेही आत्मविश्वासाने वावरतात. इव्हन प्रेक्षकांची तुलना केली तर ८०-९० मधे मैदानावर कोठेतरी पुंजक्यांमधे दिसणारे कोट वगैरे घालून आलेले भारतीय आणि आता जगातील कोणत्याही मैदानावर मोठ्या संख्येने दिसणारे, खूप "आवाज" करणारे आणि कसलाही कमीपणा न बाळगणारे भारतीय प्रेक्षक यातील फरक सहज जाणवतो. तेव्हा कपिल व कंपनी हे शिक्षकांनी दिलेल्या पारितोषिकाचा स्वीकार करत असल्यासारखे नम्र होते. आता आपले खेळाडू कोठेही कप वगैरे स्वीकारताना एकदम सहजपणे वावरतात. इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियालाही आपण हरवू शकतो याचा सेल्फ बिलीफ त्यांच्या खेळात, वागणुकीत दिसतो (तो मैदानावर खेळात नेहमी उतरतोच असे नाही Wink ) आयपीएल मुळे व भारत एकूणच क्रिकेटची मोठी बाजारपेठ झाल्याने इतरांनाही भारताची दखल घ्यावीच लागते. पूर्वी एरव्ही एकमेकांविरूद्ध खेळणारे रिचर्ड्स व बोथम सॉमरसेट मधे एकाच संघात असत तसे आता आयपीएलमुळे झाले आहे.

बाकी पैसा, सोयी व हाय लेव्हल कोचिंग वगैरेही फरक आहेच. सध्या बर्‍याच शोज मधे १९८३ च्य खेळाडूंच्या मुलाखती पाहिल्या. अगदी तुटपुंजे मानधन, राहण्याच्या सोयीतील अडचणी वगैरेंचा सामना करून या लोकांनी विश्वचषक जिंकला हे पाहिले की 'टोटल रिस्पेक्ट' शिवाय दुसरे काही मनात येत नाही. आता सुपरस्टार कल्चर मुळे काही खेळाडू 'अनटचेबल' झालेत. सचिन कितीही भारी असला तरी त्याच्या करीयरच्या उत्तरार्धात त्याच्या खेळावर टीका ही फार क्वचित होत असे. कॉमेण्टेटर्स, ज्युनियर खेळाडू व इतर सपोर्ट स्टाफ यांना मुख्य खेळाडूंना दुखावणे परवडत नसावे असे चित्र अनेकदा दिसते. संजय मांजरेकर, हर्ष भोगले वगैरेंबद्दल ऐकले आहे. तेव्हा आता जर एखाद्याने विजयाचे पूर्ण श्रेय जर कोहली किंवा रोहित शर्माला दिले तर त्यात आश्चर्य वाटत नाही.

या पार्श्वभूमीवर १९८३ च्या संघाच्या मुलाखतींमधे झाडून सगळे जे कपिलला निर्विवाद श्रेय देतात त्याचे महत्त्व जाणवते. २००८ मधे आयपील सुरू व्हायच्या आधी एक "आयसीएल" घोषित झाली होती - त्यात बीसीसीआयचा सहभाग नव्हता. किंबहुना विरोधच होता. तेव्हा कपिल त्यात असल्याने बरीच वर्षे त्याला संघाशी संबंधित कोणत्या पदावर घेतले गेले नव्हते. गावसकर, शास्त्री, द्रविड, कुंबळे, गांगुली वगैरे जसे बीसीसीआयच्या इनर सर्कलमधले वाटतात तसा तो अजूनही नाही. त्यामुळे कपिलची तारीफ करण्यात या खेळाडूंना कसलाही स्वार्थ नाही, किंवा न केल्यास काही नुकसान नाही. तरीही संघातील लोक त्याच्याबद्दल जे बोलतात त्यावरून त्याने एक कप्तान म्हणून एक अशक्यप्राय कामगिरी तेव्हा सर्वांकडून करून घेतली याची खात्री पटते.

पुढे हा संघ बराच टिकला. कपिलचे कप्तानपद त्यानंतर वर्षातच गेले, आणि पुन्हा एका वर्षाने त्याच्याचकडे परत आले - आणि मग १९८७ च्या वर्ल्ड कप पर्यंत राहिले. उपकप्तान मोहिंदर भारताबाहेर जितका चांगला खेळला तितका भारतात खेळला नाही. पुढे ५-६ वर्षे संघात होता इतके लक्षात आहे. गावसकर या कपमधे विशेष चमकला नाही पण नंतर त्याने वन डे मधला खेळ आत्मसात केला. वेंगसरकर, शास्त्री, श्रीकांत हे पुढे अनेक वर्षे खेळले, तिघेही कप्तानही झाले (शास्त्री एक दोन सामने "बदली" कप्तान होता. वेस्ट इंडिज विरूद्ध एक विजयही त्याच्या नावावर आहे). संदीप पाटील पुढे एक दोन वर्षे चमकला पण अझर आल्यानंतर त्याला पुढे फार संधी मिळाली नाही. यशपालचे ही तसेच झाले असावे. किर्ती आझाद २-३ वर्षे होता. किरमाणी तर होताच. तो कसोटीत अनेकदा नाइट वॉचमन म्हणून येत असे (आणि त्याला ती संधी आपले लोक अनेकदा तत्परतेने देत), त्यामुळे कप्तान हे जसे पद असते तसे नाइट वॉचमन हे किरमाणीचे पद आहे असेच तेव्हा वाटे. बिन्नी व मदनलाल अनेक वर्षे संघात होते. भारतात फार चालत नसत पण परदेशात विकेट्स काढत. बलविंदर संधूबद्दल मात्र पुढे फार खेळला नाही. पुलंच्या 'दोन वस्ताद' मधल्या त्या वस्तादांप्रमाणेच त्याचे झाले असावे. फायनलमधे वेस्ट इंडिज च्या अभेद्य फलदांजीला पहिला सुरूंग त्याने लावला होता. आजही तो बहुधा ग्रिनीज ने बॉल सोडण्याकरता वर उचललेली बॅट व अचानक आत येउन ऑफ स्टम्प वरची बेल घेउन गेलेला बॉल - याची कहाणी सांगत असेल. ते लाइव्ह पाहिलेल्यांना ती सांगायचीही गरज नाही - कारण ती कोणीच विसरलेले नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेखाजोगा आवडला. सर्व आठवणींना उजाळा मिळाला. त्यामुळे त्याही आधीच्या काळात जाऊन, जसु पटेलने, पावसामुळे खराब झालेल्या पीचवर , ऑस्ट्रेलियाला कसे एकाहाती हरवले होते, फाजल महम्मदच्या पाकिस्तानी टीममध्ये हनीफ महम्मद या अद्वितीय फलंदाजाला आपल्या रमाकांत देसाईने कसे गिऱ्हाईक बनवले होते, हॉलचा एक चेंडु फरुख इन्जिनियरच्या डोक्याला लागून बाऊंड्री गेली तरी फरुखला ढिम्म काही कसे झाले नाही वगैरे आठवणी जाग्या झाल्या!

क्रिकेटबद्दल लोक लिहायला लागले की एकदम "मला किती माहिती आहे" मोडमध्ये जाऊन खूप खूप आकडे फेकून बोर करतात. पण हा खरंच आठवणी सांगण्यासाठी लिहिला आहे. लाईट जाण्याची आठवण वगैरे अगदी १९८०-१९९० आहे.
शेवटच्या व्हिडियोमुळे मजा आली अजून.

मला क्रिकेटमध्ये फारसं गम्य नाही तरीही लेख आवडला.
छान लिहिलंय!

माझ्या काहीच आठवणी नाहीत या विश्वचषकाशी जोडलेल्या. मी तेव्हा सातवीआठवीत होते, घरी टीव्ही नव्हता. आईवडलांना क्रिकेटचं वेड नव्हतं. रेडिओवर काॅमेंटरी वगैरे ऐकली असेल, बातम्या वाचल्याही असणारच अर्थात. कपिल देवच्या नेतृत्वाखाली आपण विश्वचषक जिंकला होता, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याचं चित्रीकरण उपलब्ध नाही कारण त्या दिवशी बीबीसीचा संप होता, कपिलचा एक षटकार समालोचकांच्या कक्षात पोचला होता थेट, वगैरे वाचलेलं होतं. खेळाडूंची नावं, आपल्याच नव्हे तर इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, विंडीज या संघांतल्याही, माहीत होती सगळीच्या सगळी.
सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अनेक मित्रांच्या, हो बहुतांश मित्रांच्याच, प्रतिक्रिया वाचल्या की जबरदस्त भावनाविवश झाले ते, आणि स्मरणरंजन हा महत्त्वाचा घटक होता यात. मला स्मरणच नसल्याने रंजन शक्य नव्हतं. (तेव्हा मुलीबाया क्रिकेट पाहण्या/ऐकण्यात जरा मागे होत्या का? म्हणजे एकदोन आज्या चांगल्या माहीत आहेत त्या नव्वदीतही, म्हणजे १९८० वा १९९० च्या दशकात नव्वदीत, क्रिकेट सामन्याचा एक चेंडूही पाहायचा चुकवत नसत. पण त्या अपवाद असाव्यात.)
तरीही सिनेमा जबरदस्त आवडला.
रणवीर तर एकाही चौकटीत रणवीर वाटत नाही, भूमिका जगलाय हे वाक्य चावून चोथा झालंय, पण तेच इथे तंतोतंत बसतंय. दुसरं कोणीच ती भूमिका करू शकणार नाही, असं वाटावं इतका तो कपिल झालाय.
हा सिनेमा बघताना दंगल आणि चक दे या दोन सिनेमांची आठवण न येणं अशक्य. पण जसे सर्व स्पोर्ट्स मूव्हीज काही प्रमाणात एकसारखे असतात, तितकंच साम्य यांत आहे असं मला वाटलं. मु्ख्य फरक हा की विश्वचषकातील सामन्यांचे, एक वगळता, चित्रीकरण उपलब्ध आहे, प्रत्येक सामन्याची तपशीलवार नोंद आहे. काही मुख्य व्यक्ती वगळता सगळ्या जिवंत आहेत. त्यामुळे कल्पनाविलासाला फारसा वाव नाहीय. हा इतिहास सांगणं आहे, निव्वळ सिनेमा नव्हे.
पावणेतीन तास हा इतिहास आपण आ वासून पाहात राहातो, पुढे काय होणार हे माहीत असून हृदयात धडधड वाढत असते, हे घडून गेलंय हे माहीत असूनही आपण टाळ्या वाजवत असतो. नंतर विचार केला की काही कमतरता जाणवू शकतात, किंवा अमुक टाळता आलं असतं वगैरे वाटायला लागतं. पण माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाच्या दृष्टीने ते क्षुल्लक आहे.
असाच इतिहास भारतीय क्रिकेट संघानेे नंतरही घडवला पण त्यात कदाचित इतकं नाट्य नाही. एकही सामना जिंकणारच नाही संघ अशा अपेक्षेने इंग्लंडला पाठवलेला कपिलचा संघ आणि जिंकूच या विश्वासाने खेळणारा धोनीचा संघ, यात फरक आहेच. खेरीज १९८३मध्ये भारतात असणाऱ्या टीव्ही संचांची संख्या आणि २०००च्या सुमारास असलेली संख्या यांतही फरक आहे. धोनीच्या संघाने जिंकलेल्या स्पर्धा भारतातल्या खूप जास्त लोकांनी लाइव्ह पाहिलेल्या आहेत, जे ८३मध्ये शक्य नव्हतं.
यातलं लहरा दे गाणं मला फार आवडलं, ते कॅची आहे, पण त्यात जिंगोइझम नाही, जो चक दे किंवा दंगलमध्ये बऱ्यापैकी आहे.
फुल पैसा वसूल सिनेमा आहे.

This too shall pass!

आठवणी अतिशय हृद्य आहेत, आणि म्हणूनच सिनेमा अत्यंत टपरी आहे.

८३ची पटकथा लिहिणाराला, आणि ती लिहू देणाऱ्या निर्मात्या दिग्दर्शकाला फोडून काढलं पाहिजे. अत्यंत लो एफर्ट. ८३ वर्ल्डकपचे हायलाईटस, एक गूगल सर्च (दोन पानं), अक्षय कुंभारचे देशभक्तीपर सिनेमे, आणि टीव्हीट्रोप्स डॉट कॉमवर अर्धा तास इतक्या भांडवलावर लिहिली आहे.

मला ओरडून सांगावंसं वाटत होतं, की यातली 'गोष्ट' ही सामान्य माणसांची आहे रे, क्रिकेटपटूंची आणि त्यांच्या पराक्रमाची नाही. फोकस सामान्य माणसावर ठेवा. कर्फ्यूत क्रिकेट बघणारे रहीमचाचा, सचिन म्हणून बसवलेला कोणतातरी झिपर्डा पोरगा, स्कोर मागणारे देश के जवान, वगैरे वरवर दाखवलेल्या गोष्टी हे निव्वळ अर्कचित्र आहे. माणूस कुठाय?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला विशेष बघावासा वाटत नाही पण OTT वर असेल तर बघता येईल. रणवीर सिंगचं अस्तित्व नष्ट करण्यात मेकअपवाल्यांना यश आलं आहे. दीपिका सुंदर दिसली आहे.

धन्यवाद सर्वांना.
सई - सध्या तरी थिएटर्स मधेच आहे. पण पुढे हॉटस्टार किंवा नेफिवर येइल, कारण ते बहुधा मीडिया पार्टनर्स का काय म्हणतात ते आहेत.

पिक्चर एकदम लाइटवेट आहे. फारसे डीप काही नाही. अगदी "चक दे" इतकेही नाही. केवळ सेलिब्रेशन आहे त्या विजयाचे. पण बघताना अजिबात कंटाळा येत नाही. मी टोटली एन्जॉय केला. "रंग दे बसंती" मधे त्या नाटकाच्या वेळेस दाखवले आहे तसे मूळचे फोटो व ते कट करून चित्रपटातील तशीच फ्रेम हे सर्वात आवडले. कॅरेक्टर्सची शब्दश: तोंडओळख करायला इमिग्रेशनचा सीन परफेक्ट घेतला आहे. कपिल व मार्शलच्या ॲक्शन्स सर्वात ॲक्युरेट वाटल्या. त्याखालोखाल रिचर्ड्स.

या चित्रपटात दाखवले गेलेले क्रिकेट परफेक्ट आहे. प्रत्येक खेळाडूच्या स्टान्स, स्ट्रोक्स मारण्याच्या स्टाईल पासून पेस बॉलर्स च्या actions with minutest डिटेल्स आल्या आहेत. याकरिता बहुधा बलविंदर संधू यांचे दिग्दर्शन उत्तम आहे . काम करणाऱ्या अभिनेत्यांनीही यावर भरपूर कष्ट घेतले असणार

उर्वरित चित्रपट गबाळा आहे. बटबटीत भाबडे डायलॉग्स भरलेला. अतिशय ढोबळ.

उदा :

" कॅप्स , शास्त्री को वापस लाओ.
उनको स्लो स्पिन नहीं आती "

हा आणि असले बावळट डायलॉग लिहिल्याबद्दल संवाद लेखकाचा जाहीर सत्कार करणेत यावा.

या चित्रपटाऐवजी सेमी फायनल आणि फायनल हायलाईट्स थेट्रात दाखवले तर जास्त मजा येईल.

बाकी...
आपला नम्र:
सेमी फायनल व फायनल पूर्ण टीव्हीवर लाईव्ह बघितलेला आहे. .

त्यावेळी आमच्याकडे सुप्रसिद्ध भरतनाट्य कलाकार चित्रा विश्वेश्वरन व त्यांचे साथीदार यांचा मुक्काम आमच्या घरी होता. मॅच जिंकल्यावर आम्ही घरासमोर उभे राहून शांपेन पित असताना फोटो काढला. अजून तो फोटो ठेवला आहे.

८३ आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
(अतिशय टपरी सिनेमा या मताशी सहमत.)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

> (अतिशय टपरी सिनेमा या मताशी सहमत.)

चिंजं, आपण फिल्म क्रिटिक आहात ना?! आपल्याकडून यापेक्षा अधिक तरल, संदिग्ध परंतु बिंदुगामी अभिप्रायाची अपेक्षा होती. 'अरेरे' असे उद्गार माझ्या तोंडून निघत आहेत.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सिनेमा पाहून मती कुंठित की काय झाली आहे. त्यामुळे ‘टपरी’ हे विशेषणही उसने घ्यावे लागले.
(उपाय म्हणून ‘पावनखिंड’ पाहावा की कसे, यावर विचार चालू आहे.)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||