मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. अनेक मराठी चित्रपटांनी यंदा पुरस्कार पटकावले आहेत. मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत असं यावरून म्हणता येईल का? की यामागे काहीतरी वेगळं कारण आहे? की आणखी काही? लोकांचं मत जाणून घ्यायला आवडेल.

पुरस्कारांची यादी:

सर्वोत्कृष्ट पूर्ण लांबीचा चित्रपटः देऊळ (विभागून)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: गिरीश कुलकर्णी (देऊळ)
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा: अविनाश देशपांडे (शाळा)
सर्वोत्कृष्ट संवादः गिरीश कुलकर्णी (देऊळ)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा: नीता लुल्ला (बालगंधर्व) (विभागून)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा (मेकप): विक्रम गायकवाड (बालगंधर्व) (विभागून)
सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष): आनंद भाटे (बालगंधर्व)

अद्ययावतः सुरुवातीला हाती आलेल्या बातमीत माहितीपटांना किंवा लघुपटांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती नव्हती. त्यातही काही मराठी चित्रपटांनी बाजी मारलेली आहे म्हणून धागा अद्ययावत करत आहे. ते पुरस्कार असे आहेत:

चरित्रात्मक माहितीपटः विष्णुपंत दामले - बोलपटांचा मूकनायक (निर्माता: अनिल दामले. दिग्दर्शकः विरेंद्र वळसंगकर)
विशेष ज्यूरी पुरस्कारः जय भिम कॉम्रेड (दिग्दर्शकः आनंद पटवर्धन)
विशेष उल्लेखः ऐरावत (दिग्दर्शक: रेणू सावंत)

स्रोतः
http://news.outlookindia.com/items.aspx?artid=754528

याविषयीचं माझं मत मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का? उत्तरार्ध म्हणून प्रकाशित केलं आहे.

प्रतिक्रिया

चिंतातुरा, अरे पुरस्कार, शाली,श्रीफळ,५०,००० रोख रक्कम हे प्रत्येक वर्षी चालूच असते.पण ह्यावेळी कष्टकरी मराठी लोकांची वर्णी लागली हे पाहून जरा मनाला बरे वाटले हो.

वासरात लंगडी गाय शहाणी
कोणत्याच पुरस्कारांना काही अर्थ नसतो

हे दोन पर्याय निवडले आहेत

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचे असल्याने इतर भाषेतल्या चित्रपटांची २०११ ची स्थिती काय होती यावरही बरंच अवलंबून असू शकतं. वर उल्लेख आलेल्या मराठी चित्रपटांना ज्या ज्या विभागाकरता पारितोषिक जाहीर झालं आहे ती निवड सकृद्दर्शनी योग्य वाटते. (मी "शाळा" हा सिनेमा पाहिलेला नाही. ) "देऊळ" मला अगदी निश्चित आवडलेला होता आणि "बालगंधर्व" चा गाण्यांचा नि वेषभूषेचा भाग चांगला जमला होता.

राहता राहिला मुद्दा "बरे" दिवस आल्याचा. यात एकंदर अर्थकारणाच्या बाबत तथ्य असावे. अलिकडची एखाद दोन उदाहरणे पाहू. "देऊळ"च्या आर्थिक यशातला सर्वाधिक महत्त्वाचा भाग असा की, एरवी हिंदी चित्रपटांनी मल्टिप्लेक्सेस मधे चित्रपट झळकवून कमी कालावधीत प्रचंड पैसा बनवण्याच्या तंत्राला या चित्रपटाच्या निर्मितिसंस्थेने ( अर्थातच महाराष्ट्तल्या वितरणापुरते) आत्मसात केलेले होते आणि साधारण चार आठवड्यांत सुमारे सातेक कोटींचा धंदा केला. मराठी चित्रपटांनी अशी गोष्ट घडवण्याची ही माझ्या माहितीप्रमाणे पहिली घटना. दुसरं उदाहरण म्हणजे, जानेवारी महिन्यात MIFTA या नावाखाली मराठी चित्रपटांना पुरस्कार दिले गेले त्याचा सोहळा लंडनमधे झाला आणि सुमारे ८०-९० मराठी कलाकार तिथे हजर असावेत. माझ्या माहितीप्रमाणे कुठला तरी स्पॉन्सर मिळवून हे घडवण्यात आले. (अर्थात सरकारदरबारची कृपादृष्टी यात नसेलच असे काही सांगू शकत नाही; परंतु ती व्हिजासारख्या गोष्टींपुरती मर्यादित असावी. )

एकंदर मराठी सिनेमाना बरे दिवस आलेले आहेत या (साधारण "श्वास" सिनेमाला मिळालेल्या ऑस्कर नामांकनापासून सुरू झालेल्या) चर्चेत किमान तथ्य असावे.

८०च्या दशकाच्या मध्यावधीपासून , निव्वळ पिळगांवकर/बेर्डे यांच्या सिनेमातच इतिकर्तव्यता मानलेल्या सिनेमाने चांगली मजल गाठली आहे. परंतु, इतर भारतीय भाषांमधे झालेले काम पहाणे येथे अपरिहार्य आहे. सत्यजित राय यांना मिळालेले आयकॉनिक् स्टॅटस् , अदूर गोपालकृष्णन यांच्यासारख्यांनी प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर उमटवलेला ठसा, सत्तरीच्या दशकामधे आलेल्या समांतर सिनेमाच्या कालावधीमधे हिंदी मधे बेनेगल, निहलानी यांनी केलेले काम, किंवा अगदी चालू कालावधीत अनुराग कश्यप यांच्यासारख्यांनी केलेले काम या सार्‍या गोष्टींपर्यंत आपल्या भाषेतला सिनेमा अजून जायचा आहे हे उघड आहे.

साहित्य/संगीत/नाटके यासंदर्भात नवनवीन प्रयोग, एकंदर आदरणीय स्थिती संपादलेल्या मराठी भाषेतल्या कामाच्या तुलनेत, चित्रपटांच्या संदर्भात काहीशा प्राथमिक अवस्थेमधेच असण्याच्या परिस्थितीची जाणीव होते. साहित्य/संगीत/नाटक या बाबतही सर्व दशके सारखी नव्हती. गेल्या बारा पंधरा वर्षांत कुठली महत्त्वाची कादंबरी लिहिली गेली ? संगीताच्या बाबत कुठले नवे लोक उदयाला आले आणि मुख्यत्वे त्यांनी भरीव काम काय केलं ? (माझ्या डोळ्यासमोर कुमार गंधर्व, भास्कर चंदावरकर यांची उदाहरणं आहेत. ) या सार्‍या प्रश्नांचा विचार करता, प्रत्येक बाबतीत चक्रमेनिक्रमेण घडतं, एकंदर प्रवाह रुंद होतो किंवा काहीसा सुकतो या तत्वांचा अनुभव येतोच. अशी आशा आहे की, मराठी सिनेमाचा हा उदयकाल आहे आणि येती दहा वर्षे काहीतरी महत्त्वाचे घडताना दिसेल.

जाताजाता : एक विचार आपला सहज. इंटरनेट्च्या आणि गेमिंगच्या आणि इतर मनोरंजनपर साधनांच्या उदयाआधी चित्रपट या माध्यमाची पकड कितीतरीपट अधिक होती. इतर काहीच नव्हतं तेव्हा सैगलसारख्यांचे उत्कृष्ट संगीत असलेले पण वाईट सिनेमे "कल्ट स्टॅटस"वाले होते. त्यानंतर झालेला प्रवास तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. माझा प्रश्न केवळ मराठी सिनेमापुरता मर्यादित नाही. तो असा आहे की, येत्या वर्षांमधे/दशकांमधे चित्रपटांचे एकंदर व्यवस्थेतले स्थान एकमेवाद्वितीय तर सोडा, पण सर्वाधिक महत्त्वाचे तरी राहील काय ? आणि मग या प्रलयात "आपले" मराठी पिंपळपान कुठे असेल ? Smile

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"बालगंधर्व" चा गाण्यांचा नि वेषभूषेचा भाग चांगला जमला होता.

सुरूवातीच्या नांदीतच असणारं कोरसच्या पार्श्वभूमीवरचं गाणं हे कानाला आवडलं तरी बालगंधर्वांच्या काळातलं वाटत नाही. मात्र आनंद भाटेंच्या पुरस्काराबाबत आश्चर्य वाटलं नाही.
सर्वोत्कृष्ट वेशभूषा: नीता लुल्ला (बालगंधर्व) (विभागून) हे तर धक्कादायक वाटलं. बालगंधर्वांना कुंदनवर्कच्या, जरदोसी इत्यादी प्रकारच्या साड्या नेसवण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल तर, अरेरे!

या वर्षी स्पर्धेत असलेले बरेचसे चित्रपट पाहिलेले नसल्यामुळे अविनाश देशपांडे, गिरीश कुलकर्णी प्रभृतींना मिळालेला पुरस्कार अस्थानी आहे का, याचं उत्तर मी देऊ शकत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वोत्कृष्ट वेशभूषा: नीता लुल्ला (बालगंधर्व) (विभागून) हे तर धक्कादायक वाटलं. बालगंधर्वांना कुंदनवर्कच्या, जरदोसी इत्यादी प्रकारच्या साड्या नेसवण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल तर, अरेरे!

याबद्दल थोडं..
वेशभूषेसाठीचा पुरस्कार देताना केवळ बालगंधर्वांचीच वेशभुषा नव्हे तर तत्कालीन विविध पात्रांच्या वेशभूषा लक्षात घेतल्या असतील असे वाटते. चित्रपटात बालगंधर्वांच्या वेशभूषांचे सिलेक्शन करताना, तत्कालीन 'फॅशन्स', 'कमी प्रकाशात' (सुरवातीच्या काळात दिवट्यांच्या प्रकाशात नाटके होत, हे लक्षात घेऊन चित्रपटाच्या पुर्वार्धातील नाटकात कमी प्रकाशयोजना आहे) उठाव देणारे रंग- वस्त्राचा प्रकार निवडणे, पुरुषांच्या तत्कालीन पगड्या, मुंडाशी वगैरे बांधणे अश्या गोष्टी हरेक जातीत बदलत असत, त्याप्रमाणे चित्रपटातही बदल बघितल्याचे आठवते. अश्या अनेक छोट्या बाबी सांगता याव्यात..
असो..

मला तांत्रिक पुरस्कार योग्य वाटले, अभिनय वगैरे बद्दल मात्र दुमत आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा पर्याय माझ्या तोकड्या ज्ञानावरून निवडलेला आहे. 'सामना', 'सिंहासन' सारखे जुने, गाजलेले, मातब्बर दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपटदेखील आता बघताना तांत्रिकदृष्ट्या कमकुवत वाटतात. भडक मेकप, अकल्पक चित्रचौकटी, आणि अत्यंत अवजड बोजड स्थिर कॅमेरा हे जागोजागी दिसतात. जुन्याकाळी नाटकं चित्रित करण्याची कंटाळवाणी शैली होती. तीतून सत्तर-ऐशीच्या दशकातले चित्रपट पूर्णपणे बाहेर पडले नव्हते. फारतर पंधरावीस सेकंदांची खूप नाटकं एकत्र केल्याचा फील यायचा.

त्यामानाने आजकाल मराठीतही चित्रपट माध्यमाच्या सर्व अंगांमध्ये अधिक लालित्य आलेलं आहे. 'अडाणीपणाच्या नानाची टांग' सारखं गाणं असो, की 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' मध्ये जाणूनबुजून वापरलेली चार्ली चॅप्लिनी, कार्टूनी शैली असो, मराठी चित्रपट अधिक प्रयोगशीलता, वैविध्य, आणि एक सहजता आलेली आहे. अर्थात हे अगदी बॉलिवुडी हिंदी चित्रपटांतही झालेलं आहे. मराठीत ते पुरेसं झालेलं आहे का, हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण सुधारणा निश्चित आहे.

'सामना', 'सिंहासन' सारखे जुने, गाजलेले, मातब्बर दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपटदेखील आता बघताना तांत्रिकदृष्ट्या कमकुवत वाटतात. भडक मेकप, अकल्पक चित्रचौकटी, आणि अत्यंत अवजड बोजड स्थिर कॅमेरा हे जागोजागी दिसतात. जुन्याकाळी नाटकं चित्रित करण्याची कंटाळवाणी शैली होती. तीतून सत्तर-ऐशीच्या दशकातले चित्रपट पूर्णपणे बाहेर पडले नव्हते. फारतर पंधरावीस सेकंदांची खूप नाटकं एकत्र केल्याचा फील यायचा.

सहमत. त्यामुळं रसभंग होऊ नये यासाठी मी ते चित्रपट पाहताना आपण जणू त्या काळात आहोत, असेच समजतो. थोडा यशस्वी होतो. बाकी दुर्लक्ष करता येते.
पुरस्कारांच्या यादीत "सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा: अविनाश देशपांडे (शाळा)" हे वाचले. शाळा पाहिल्यानंतर उमटलेल्या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर हा मात्र मला विनोद वाटला.

अलिकडेच सिंहासन पुन्हा पाहिला तेव्हा अरूण सरनाईक आणि श्रीराम लागू सोडून सगळे कलाकार मोठ्यामोठ्याने बोलतात असे वाटले (कदाचित यातले बहुतेक कलाकार नाटकांमधून काम करणारे असल्याने असेल). बहुतेक मराठी चित्रपटात हाच प्रॉब्लेम असतो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या यादीतील केवळ 'देऊळ' पाहिला आहे, आणि 'बालगंधर्व' मधील गीते ऐकली आहेत, पण तेवढया भांडवलावरून ही निवड योग्य असावी असे वाटते.

मराठी चित्रपट अधिक प्रयोगशीलता, वैविध्य, आणि एक सहजता आलेली आहे. अर्थात हे अगदी बॉलिवुडी हिंदी चित्रपटांतही झालेलं आहे. मराठीत ते पुरेसं झालेलं आहे का, हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण सुधारणा निश्चित आहे.

सहमत.

पुरस्कारांच्या कोणत्यातरी क्षेत्रांत मराठी चित्रपट येतो आहे हेच महत्वाचे आहे.
बहूतेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काहीतरी भव्य दिव्य दाखवलेले, उपदेश केलेले, सामाजिक आशय असलेले, राष्ट्रीय समस्या, बंधूभाव, भाईचारा आदी कलात्मक विषयांना वाहिलेल्या चित्रपटांना सहसा मिळतो. याला अपवाद पांडू हवालदार या दादा कोंडके यांचा चित्रपट.
चित्रपट ज्या मुळ कारणाकरता हवे - मनोरंजन - ते कारण विसरले जाते. मग तो पुरस्कार राष्ट्रीय असो वा प्रादेशिक.
बाकी वाहिन्यांनी पुरस्कृत केलेल्या चित्रपटांबाबत वक्तव्य केले जावू शकत नाही.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

चित्रपट ज्या मुळ कारणाकरता हवे - मनोरंजन - ते कारण विसरले जाते. मग तो पुरस्कार राष्ट्रीय असो वा प्रादेशिक.

कदाचित चित्रपटांची सुरूवात या कारणामुळे झाली असेल, पण चित्रपटांनी याहीपुढे जाऊन विचार करावा असं वाटतं. फक्त मनोरंजन करणार आणि इतर काही संदेश वगैरे नाही तर निदान निखळ मनोरंजनतरी करावे; हेराफेरी (प्रियदर्शन दिग्दर्शित, परेश रावलवाला), जॉनी गद्दार, वळू, इत्यादी चित्रपटांनी चिक्कार मनोरंजन केलं. पुन्हा एकदा बघायलाही मजाच येते. बालगंधर्वने धड मनोरंजन केलं नाही ना ती एक उत्तम (सोडाच चांगलीही म्हणवत नाही) डॉक्यूमेंटरी आहे!
खरंतर हे चित्रपटाबद्दलच काय, कोणत्याही माध्यमाबाबत म्हणता येईल. सतत एरंडेल प्यायल्याप्रमाणे चर्विच्चरणं करावीत असे नाही, पण विनोद, मनोरंजन करायचं असेल तर ते ही दर्जेदार असावे. चित्रपट "पाहून" शिवाजी ड्रग अ‍ॅडीक्ट होते का काय अशी शंका येऊ नये. किंवा कोणीतरी मसीहा येईल आणि आपला उद्धार करेल असले चित्रपट काढणं आतातरी बंद करावं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरे दिवस या संज्ञेचा अर्थच नीटसा कळालेला नाही. राजा परांजपे, गदिमा, सुधीर फडके, पु.ल.देशपांडे यांच्या काळात तरी मराठी सिनेमाला 'बरे दिवस' होते का? कारण काही दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि सरसकट सुमारगर्दी हे त्या काळातही होतेच. आताही 'देऊळ', 'शाळा' वगैरेंचा उल्लेख होतो (त्यातला 'शाळा' मी पाहिलेला नाही, आणि 'देऊळ' मला रेंगाळलेला वाटला होता, पण ते जाऊ दे, त्याऐवजी आपण वाटल्यास 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस' आणि 'टिंग्या' ही उदाहरणे घेऊ), पण अशा चित्रपटांच्या तुलनेत अनासपुरे, जाधव अशा सचिन, बेर्डे परंपरेतील 'इनोदी' नटांचा आणि त्यांच्या बालीश चित्रपटांचा सुकाळ आहेच. हिंदी चित्रपटातील अनुराग कश्यपादि मंडळींचा मुक्तसुनीतांनी उल्लेख केला आहे, पण अशा अपवादांना पूर्ण झाकोळून टाकणारे 'दबंग' आणि 'बॉडीगार्ड' हे समाजवादी पार्टीसारखे प्रचंड बहुमताने निवडून येताहेत. गुलजार, हृषीकेश मुखर्जींच्या काळातही जीतेंद्र-श्रीदेवीच्या दाक्षिणात्य मवाली, हिम्मतवाला, जस्टीस चौधरी, मांग भरो सजनाचे (आणि मनमोहन देसाईछाप बिनडोक अमिताभ बच्चनच्या सिनेमांचे) वर्चस्व होते. त्यामुळे एखाद्या काळात तुलनेने बरे चित्रपट येत राहाणे याला 'बरे दिवस येणे' असे म्हणता येईल का असा प्रश्न पडला आहे.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

बरे दिवस म्हणजे काय? अनेक कल्पना, चित्रपट ह्या पडद्यावर येउच शकत नाहीत्, अकाली मरतात. त्यात एखादा सिनेमा तयार होउन प्रदर्शीत होतो तिथेच त्याचे "बरे दिवस" आले म्हणायचे. Smile "बरे दिवस" ह्या शब्दप्रयोगाचा अर्थ वाईटातुन परिस्थिती सुधारणे. आता मराठी सिनेमांना वाईट दिवस कधी होते? तयार होणारे बहुतांश सिनेमे एखाद्या समुहाच्या अपेक्षेप्रमाणे नसणे याला पूर्वी बरे मग वाईट आता बरे असे म्हणायचे की त्या सिनेमाने त्याच्याशी संबधीत लोकांना फायदा करुन देणे महत्वाचे हे कोण ठरवायचे? बाकी पुरस्कार बिरस्कार चालायचेच...

वरील यादीतल्या काही लोकांना त्यांच्या उमेदीच्या काळात जवळून पाहील्याने त्यांच्या होणार्‍या कौतुकाचे कौतुक आहेच. सिनेमा काढायला व त्यात काम करायला मिळते याचाच अर्थ त्यांचे मस्त दिवस चालू आहेत. Smile

हा जर ह्या पुरस्कारा मागील काही माहीती असेल तर सांगा की जंतूसाहेब Smile

ते केवळ या पुरस्कारामुळे नव्हे.
१. देऊळ व बालगंधर्व हे दोन चित्रपट बर्‍याच दिवसांनी "आजूबाजूच्या, ओळखीच्या, नात्यातील लोकांनी थिएटर मधे पाहिलेले आहेत" कॅटेगरीत आले. हा बहुमान गेली काही वर्षे फार मराठी चित्रपटांना मिळालेला नसावा Smile
२. गुणगुणण्यासारखी, आवर्जून सीडी लावून ऐकण्यासारखी गाणी गेल्या काही वर्षात पुन्हा आली मराठीत. नाहीतर मधे एक दोन दशके काही नवीन फारसे नव्हते.
३. तांत्रिकदृष्ट्या हे आजकालचे चित्रपट खूप पुढारलेले वाटतात. बरेचसे हिन्दीच्या तुलनेत कोठेही कमी वाटत नाहीत.
४. पटकथा व संवादातील 'स्मार्टनेस' मराठीत मध्यंतरी गायब होता, तो परत आला आहे. झेंडा व देऊळ ही दोन प्रमुख उदाहरणे, पण एक कप च्या, पाऊलवाट, पारध, चेकमेट ई. मधे जाणवले.
५. संकलनही बरेच चांगले आहे आता. पूर्वी "चालण्याच्या शॉट" मधे आधी उभा राहिलेला कलाकार चालू लागलेला सहज जाणवत असे Smile

पण तरीही अजून १. उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवयीन प्रेक्षकांना(च) आवडतील असे ("आनंदाचं झाड", "रीटा", "धूसर", "पाऊलवाट"),२. प्रचंड हेवी ("रेस्टॉरंट","गंध" ई, कदाचित "विहीर" - मी पाहिलेला नाही) किंवा ३.एकदम भंगार्/रटाळ विनोदी, जे केवळ कलाकारांची लोकप्रियता एन्कॅश करण्यासाठी बनवले आहेत असे वाटते ते - याच्या मधले व सर्व लोकांचे मनोरंजन करतील असे चित्रपट खूप येत नाहीत असे वाटते. झेंडा व देऊळ तसे वाटले.

पुढल्या वर्षी "क्रांती" च्या गोष्टीवरती आधारित एक मराठी सिनेमा काढूयात का?

अ‍ॅवॉर्ड्सची लाईन लाव्वू.... आहात कुठे?

अ‍ॅवॉर्ड्स नकोत, सिनेमा आवरा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फुटलोय

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars