भक्तीहीनता

आजवर अनेक लोकांनी माझ्यात भक्तीचं, श्रद्धेचं बीज रुजावं म्हणून प्रयत्न केले आहेत पण ते दुर्दैवाने सगळे फोल ठरले. मी कधीच चांगली ‘भक्त’ नव्हते आणि पुढेही बहुधा मी ती होऊ शकणार नाही. पण कोणा पंथावर, धर्मावर, देवावर श्रद्धा नसतानाही आजवरचे माझे आयुष्य एकंदरित आनंदाचे गेले आहे.

पण अर्थातच मला देवळांत जायला आवडतं – विशेषत: तिथ गर्दी नसते तेव्हा! मला देऊळ पहायला आवडतं. माझ मन भूतकाळात जातं आणि त्या काळाची चित्र रंगवतं – काल्पनिकच! या चित्राची मी वर्तमानाशी तुलना करते. कधी त्या चित्रात फरक पडलेला असतो तर कधी ते चित्र तंतोतंत तसंच असतं! देवापेक्षा लोकांचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला नेहमी कुतुहलाचा विषय वाटतो. अनेकदा अशा ठिकाणांबाबत ज्या कथा असतात, त्या विलक्षण असतात आणि अशा देवळांभोवतीचा बाजारही चित्तवेधक असतो. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं एका हातात भौतिकवाद आणि एका हातात अध्यात्म घेऊन(?) वाटचाल करत असतात. या प्रक्रियेत नेमकं काय घडतं हे ज्याचं त्याला – जिचं तिलाच कळतं!

त्यादिवशी कारेकल (Karaikal) या पुदुचेरीतील जिल्ह्याच्या शहरात प्रवेश करताना सुंदरराजनने या परिसरात जागृत शिव मंदिर असल्याचं मला सांगितलं आणि त्याने मला उत्साहानं विचारलं, “तुम्हाला जायला आवडेल का या देवळात?” खरं तर आज दिवसभर भरपूर काम आहे, म्हणून आम्ही भल्या सकाळी सहा वाजता पुदुचेरीतून बाहेर पडलो आहे. पण आत्ताच कशाला नकारघंटा वाजवायची म्हणून मी म्हणते, “ बघू, आपलं काम वेळेत संपलं तर जाऊ”. अनुभवाने मला माहिती आहे की मी स्पष्ट नकार देत नाही तेव्हा आमचं काम ‘वेळेत’ हमखास संपतं!

दिवसभरात दोन तीन मीटिंग होतात, काही गावांत आम्ही जातो तिथ गावक-यांशी चर्चा होते, अडचणी काय आहेत आणि त्यातून पुढं कसं जायचं यावर विचारविनिमय होतो. हे करताकरता संध्याकाळचे साडेपाच वाजतात. “जायचं का आपण मंदिरात?” गावातला एकजण अपेक्षेने विचारतो. आमच्यातला एक गट मागच्याच आठवड्यात तिथ जाऊन आलाय त्यामुळे ते सगळे थेट पुदुचेरीकडे प्रयाण करतात.

दिवसभर ब-यापैकी दगदग झालीय. पुदुचेरीला पोचायला अजून चार तास लागतील. पण अर्धा एक तास जास्तीचा या देवळासाठी द्यायला माझी हरकत नाही. मग आम्ही थिरूनल्लार (Thirunallar) ला जातो.

इथल्या देवळात शिव आणि शनी असे दोघे एकत्र आहेत. मी आजवर फार थोडी शनीची देवळं पाहिली आहेत. पुण्यातलं (शानिपारापाशी असलेलं!) शनीच देऊळ कधी आत जाऊन पाहिलेलं नाही. एकदा कधीतरी शनी शिंगणापूरला गेले होते असं आठवतं. दिल्लीत आश्चर्य वाटावं इतक्या जास्त संख्येत शनीची देवळं दिसतात. पण सगळ्याच शनी मंदिरांभोवती भिकारी असतात, अपंग लोक असतात. शनी आणि दु:ख, शनी आणि वेदना, शनी आणि जगण्याची धडपड असंच चित्र माझ्या मनात आहे. शिवाय एकदा कधीतरी वाचलेलं शनिमाहात्म्य पण आनंददायी नाही. त्यामुळे ‘शनी’च्या देवळात जाणं मी आजवर टाळत आलेय. त्याउलट मी ब-याच ‘शिव’ मंदिरांत गेलेय. ती सगळी साधारणपणे थंड, सुंदर आणि शांत होती. अशा प्रत्येक भेटीत मी एक प्रकारच्या अपूर्व शांतीचा अनुभव घेतला आहे.

इथल्या देवळाला जैन आणि शैवांच्या संघर्षाचा इतिहास आहे. एक राजा होता, एक संत होते आणि काही चमत्कारही होते. या जागेचा महाभारतकालीन नल राजाशीही संबंध आहे. इथे नलाने शनी देवतेची कृपा प्राप्त करून घेतली अशी कथा आहे. भक्त सांगतात की, हे एकच ठिकाण आहे की जिथं शनी ‘कृपेच्या’ अवस्थेत आहे. इथे शंकराच्या शक्तीमुळे शनी ‘नियंत्रणात’ आहे!

कोणत्याही धार्मिक ठिकाणी गेलं, धर्मग्रंथ वाचले आणि पुराणकथा वाचल्या की एक गोष्ट लक्षात येते – ती म्हणजे आपले देव अगदी मानवी आहेत. देवांचे विचार, देवांच्या कल्पना, देवांचे स्वभाव आणि देवांच वागणं अनेकदा माणसांसारखं असतं. कदाचित मानवी मन देवाची कल्पना ‘इतकीच’ करू शकतं. अज्ञाताला जाणण्याचा प्रयत्न ज्ञात बाबींमधून करायचा ही आपली शिकण्याची नेहमीची पद्धत आहे.

मला ते देऊळ आवडतं. त्याची वास्तू आकर्षक आहे. मला काही कळायच्या आधी मला एका रांगेतून पुढं नेलं जातं रांग मोडून – आणि तिथं पूजा आहे. आम्ही रांग मोडून पुढे घुसतो तेव्हा कोणी तक्रार करत नाही. नंतर माझ्या लक्षात येतं की सगळ्याच मंदिरांत “जास्त पैसे दया आणि लवकर दर्शन घ्या” अशी व्यवस्था असते. मला अशी रांग मोडून जाणं आवडत नाही, देवापुढे कोणी कसा काय जास्त मोठा असतो – आणि तेही केवळ पैसे जास्त आहेत किंवा पद मोठं आहे म्हणून? खरं सांगायचं तर लोकांचा देवावर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं! मी देवळात पूजा वगैरे कधी करत नाही पण इथं मी अगतिक आहे. म्हणजे मी अजूनही त्यातून बाहेर पडू शकते हे आहेच – पण जे काही चाललं आहे त्यात आधी नकळत का होईना सहभागी होऊन मी माझी संमती दिलेली आहे अप्रत्यक्षपणे – आता एकदम बाहेर पडायचं तर माझे सहकारी दुखावले जातील. ग्रंथालयात निरक्षर माणसाची जी अवस्था होईल तशीच माझी इथं झाली आहे.

पूजेत लगेचच एक अडचण येते. “तुमची रास काय?” असं मला पुजारी विचारतो आणि मी “मला रास नाही” असं उत्तर देते. त्यावर सगळे एकदम चिडीचूप होतात. मग आपापसात ते तामिळ भाषेत काहीतरी बोलतात – जे मला सुदैवाने समजत नाही. मग पुजारी मला “तुमचा जन्म कोणत्या महिन्यातला?” असं विचारतात. इथं काहीतरी ठोकून द्यावं, खरं सांगू नये असं मला वाटतं. पण मी खरी माहिती सांगते. पूजा संपल्यावर सुंदरराजन मला दक्षिणा द्यायला सांगतो. पण माझं पैशांचं पाकीट गाडीतच आहे. तो घाईघाईने एक नोट माझ्या हातात देतो ती मी आरतीच्या तबकात टाकते. नंतर त्याला मी पैसे देते तेव्हा तो घेतो कारण हे पैसे मी दिले नाहीत तर या पूजेचं पुण्य मला मिळणार नाही. म्हणजे एका अर्थी माझ्या इच्छेविरुद्ध मला पैसे द्यावे लागले आहेत. पण सुंदरराजनचा हेतू चांगला आहे हे मला माहिती आहे – म्हणून मी वाद घालत नाही.

आता कसल्यातरी महागड्या मण्याची पूजा आहे. हा मणी कसला, त्याची काय गोष्ट आहे हे काहीच मला समजत नाही. एक पुजारी किल्ल्यांचा भला मोठा जुडगा घेऊन येतात आणि कुलुपांमागून कुलूपं उघडतात. भक्तांचा एक गट शांतपणे या समारंभाची वाट पाहतोय – म्हणजे काहीतरी महत्त्व असणार याचं. अचानक दोन स्त्रिया शंकराचं एक तामिळ भक्तीगीत गायला सुरुवात करतात. मला ते गाणं आठवतंय. एके काळी ते मी खूपदा ऐकलं होतं. इतर भक्तांसोबत मीही ते गाणं त्या दोन स्त्रियांच्या पाठीमागं म्हणते आहे. मी ते विसरलेय असं वाटतं होतं मला – पण आता ते मला व्यवस्थित आठवतंय. मला लहान मुलीसारखा आनंद होतो – मला ते गाणं आठवतंय याचा आणि ते अवघड तामिळ शब्द मला उच्चारता येताहेत याचाही.

एकदाच्या सगळ्या पूजा संपतात. मंदिराचे मुख्य पुजारी मला प्रसाद देतात. त्यांच्या मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीत ते मला सांगतात की हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्या खालोखाल प्रसिद्ध आणि जागृत आहे. देवांमधला हा श्रेणीक्रम मला कधी समजत नाही. ते सगळेच शक्तिशाली आणि सर्वसमावेशक नसतात का? आता उदाहरणार्थ इथं मी प्रार्थना केली नाही म्हणून शिव माझ्यावर रागावला अशी आपण कल्पना केली, तर त्यातून असं निष्पन्न होईल की शिव हा माणसासारखा मातीचा आहे – त्याला सलाम नाही केला की तो रागावतो! असल्या सगळ्या मानवी भावांच्या पल्याड देव पोचलेले असतात असं मी समजते!

मुख्य पुजारी पुढे सांगतात: इथं तुम्ही जी काही इच्छा मनात धरली असेल ती पूर्ण होईल.

त्यावर सगळे समाधानाने हसतात. मीही हसते. त्यांची श्रद्धा त्यांना सुखी ठेवते आहे तर असू दे, उगाच कशाला प्रश्न विचारायचे त्यांना?

“तुम्ही काय इच्छा धरली होती?” परतीच्या वाटेवर सुंदरराजन मला विचारतो.

“मला हा देव इतका शक्तिशाली आहे हे जर आधी माहिती असतं, तर मी नक्की दोन तीन गोष्टी मागितल्या असत्या ..” मी सांगते. सामान्यपणे सगळ्या भक्त मंडळींचं या उत्तराने समाधान होतं असा माझा आजवरचा अनुभव आहे. आजचा प्रसंग त्याला अपवाद नाही.

मी काय विचार करत होते मंदिरात? मी प्रार्थना नक्कीच करत नव्हते – ती कशी करतात ते मला माहिती नाही. मी ईश्वराकडे काही मागत नव्हते हेही नक्की.

मी भक्त आणि त्यांची भक्ती पहात होते – त्यात कुठेतरी प्रामाणिक आणि खरी भक्ती असणार, त्यात कुठेतरी भक्तीची असीम प्रेरणा असणार. मी नेहमीप्रमाणे पहात होते; आपल्याला किती कमी माहिती आहे याचं नेहमीप्रमाणे मला आश्चर्य वाटत होतं; शेकडो वर्षांपूर्वी इथलं चित्र काय असेल आणि आणखी पाचशे वर्षांनी चित्र कसं असेल याचा मी विचार करत होते; उत्पत्ति-स्थिती-लय यांच्या अविरत चक्राचा मी विचार करत होते; माझ्या आजच्या जगण्याबद्दल मी समाधानी होते – सुख असो की दु:ख; यातलं काहीच अखेर टिकणार नाही या जाणीवेने मी शांत होते.

भक्तीहीनतेच्या त्या क्षणी मला ते जुनपुराणं सत्य पुन्हा एकदा सापडलं. माझ्या भक्तीहीनतेमुळे न शिवाचे काही बिनसते, ना शनीचे, ना आणखी कोणा देवतेचे – आणि मुख्य म्हणजे न माझेही काही बिघडते. आम्ही एक निर्णय घेतला आहे – तो आहे एकमेकांकडून काही न मागता, काही अपेक्षा न करता; काही देवाणघेवाण न करता एकमेकांसोबत जगायचं. त्यात आम्ही समाधानी आहोत. निदान मी तरी नक्कीच आहे.

तसं पहायला गेलं तर भक्तीची मला काय गरज?

पूर्वप्रसिद्धी

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (6 votes)

प्रतिक्रिया

“मला हा देव इतका शक्तिशाली आहे हे जर आधी माहिती असतं, तर मी नक्की दोन तीन गोष्टी मागितल्या असत्या ..” मी सांगते. सामान्यपणे सगळ्या भक्त मंडळींचं या उत्तराने समाधान होतं असा माझा आजवरचा अनुभव आहे. आजचा प्रसंग त्याला अपवाद नाही

हा हा! मस्त उत्तर

समांतरः यावरून संदीप खरे यांच्या एका कवितेतले - गाण्यातले हे कडवे आठवले (आठवणीतुन.. चुभुद्याघ्या)
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो

बाकी अनुभव त्यावरचे लाऊड थिंकींग नेहमीप्रमाणे आवडलेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखामधील मुद्दे १०० टक्के पटले.
पण किती लोक अशा बुद्धिवादी दृष्टीकोनातून भक्ती व श्रद्धा करतात हा विचार करण्याचा विषय आहे. तसेच बुद्धी जे सांगते त्याप्रमाणेच वागणारे तरी किती आहेत ?
आता तुमचेच पहा ना, सविता. तुम्हाला मान्य नसतानासुद्धा सुंदरराजन यांना तुमच्या वतीने पूजा करायला परवानगी दिलीतच ना ?
मला वाटते, बुद्धिवादी दृष्टीकोन बाळगणारे सुशिक्षित वास्तवात खूपजण आहेत. पण केवळ भिडेपोटी किंवा इतरांच्या भावना दुखवू नयेत म्हणून ते पारंपारिक पद्धतीची भक्ती दाखवतात.
दुसरे म्हणजे या बुद्धिवादी दृष्टीकोनापर्यंत ज्यांची धाव पोचत नाहीत असे सर्वसामान्य लोक.
जीवनातल्या दु:खांशी अगर संकटांशी सामना कसा करावा याची जाण नसलेले. त्यांच्या लेखी भक्ती अन श्रद्धा म्हणजे संकटे , दु:ख यांच्या पार जाण्याचे साधन. अन हे साधन वापरून हे लोक यशस्वीपणे ते उद्दिष्ट साध्यही करतात असे दिसते. कदाचित तुमच्या-माझ्यापेक्षा जास्त खंबीरपणे !
अज्ञान हे भक्ती अन श्रद्धा यांचे प्रमुख कारण, हे खरे. पण आपल्याला खात्री आहे का आपण खरंच ज्ञानी आहोत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अज्ञानी नसणारे लोकं ज्ञानी असतीलच असं नाही. धर्म बर्‍याचदा भीतीवर आधारित असतो, अशी भीती नसणारे लोकंही धार्मिकतेपासून लांब येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Feudalism प्रणाली भारतात रुजू लागली त्याच सुमारास भक्तीमार्गाचा उदय झाला / घडवून आणला गेला (त्यासाठी गीता लिहिली गेली - पण हे अवांतर.), असे कोसंबींचे प्रतिपादन त्यांच्या मिथ अँड रिअ‍ॅलिटी मधे वाचलेले आठवते आहे. (पुस्तकच सापडले)

तत्पूर्वीच्या उपासना पद्धतींत अशी 'अनकण्डीशनल' भक्ती नसे. खुल्ला व्यवहार असे. (उदा. ह्या साळीच्या लाह्या घे अन वधू वर वाईट नजर ठेवू नकोस, इ. : लाजाहोम)
>>
त्या पुस्तकातून :
1.6. THE SOCIAL FUNCTIONS OF BHAKTI
However, the Gita did contain one innovation which precisely fitted the needs of a later
period : bhakti, personal devotion. To whoever composed that document, bhakti was the
justification, the one way of deriving all views from a single divine source. As we have
seen from the demand for the quite insipid Anu-Gita sequel, this did not suffice in its own
day. But with the end of the great centralized personal empires in sight Haifa's being the
last—the new state had to be feudal from top to bottom. The essence of fully developed
feudalism is the chain of personal loyalty which binds retainer to chief, tenant to lord, and
baron to king or emperor. Not loyalty in the abstract but with a secure foundation in the
means and relations of production : land ownership, military service, tax-collection and
the conversion of local produce into commodities through the magnates. This system was
certainly not possible before the end of the 6th century AD. The key word is 'samanta'
which till 532 at last meant 'neighbouring ruler’ and by 592 AD had come to mean feudal
baron. The new barons were personally responsible to the king, and part of a tax-
gathering mechanism. The Manusmrti king, for example, had no samantas; he had to
administer everything himself, directly or through agents without independent status. The
further development of feudalism 'from below' meant a class of people at the village level
who had special rights over the land (whether of cultivation, occupation, or hereditary
ownership) and performed special armed service as well as service in tax-collection. To
hold this type of society and its state together, the best religion is one which emphasizes
the role of bhakti, personal faith, even though the object of devotion may have clearly
visible flaws.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही जहागिरदारी भारतात साधारण कधीपासून असावी? अनेक स्तोत्रांमधे असणारी फलश्रुती ही भीती नाही, पण लालूच वाटते. रोकडा व्यवहार. मग त्यात भक्ती कुठून येणार? गेल्या जन्माच्या पापाचं प्रायश्चित्त या जन्मात हा प्रकार भीती दाखवण्याचा वाटतो. आजच्या काळात असलेली पद्धत, देवळात दान-धर्म करून पुण्य विकत घेणं, हा ही तसलाच प्रकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुमारे ६व्या शतकापासून सुरू झाले असावे असे त्यांचे मत आहे. याच सुमारास गीता रचून महाभारताला जोडली गेली असा त्यांचा दावा आहे, व त्यासंदर्भात त्यांनी हे लिहिले आहे.
कृष्णासारखा कॉन्ट्रव्हर्शियल देव असूनही, त्याच्या सगळ्या अधिक-उण्याबाजू असूनही, (in spite of) माझ्याप्रती भक्ती ठेव, मी तुला वाचवीन असा दावा तिथेच प्रथम आढळतो असे त्यांचे म्हणणे आहे.
या आधी मात्र, देव बर्‍यापैकी human होते. अन त्यांचा कोप इ. होऊ नये व कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी उपासना असे. असे काहीसे प्रतिपादन आहे. ते मुळातून वाचलेत तर जास्त बरे. मजकडे सॉफ्टकॉपी आहे, हवी असल्यास देवू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ती प्रत हवी आहे. व्य.नि. चेक करा थोड्या वेळाने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलादेखील ती प्रत हवी आहे. व्यनि कृपया चेकवा ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलापण. व्यनि करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भरपूर जुनी प्रत असल्याने प्रताधिकार मुक्त आहे असे वाटते.. कृपया आपापले व्यनी पहा.

ता.क. वाचून झाल्यावर आपापली मते माझ्याशी शेयर करायला कृपया विसरू नये ही विनंती. चर्चेने माझ्याही आकलनात भर पडेल..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रकट चिंतन आवडले. मीही कधी पारंपारिक भक्ती केली नाही. कारण, 'जो कुठल्याही प्रार्थनेशिवाय, पूजेशिवाय वा नेवैद्याशिवाय सर्व प्राणिमात्रांकडे सारख्याच प्रेमाने पहातो, तोच खरा देव', अशी माझी व्याख्या आहे. देवाचे लक्ष, मुद्दाम आपल्याकडे जास्त वेधून घेणे म्हणजे, स्वतःला "इनव्हर्टेड कॉमाज" मधे घालून घेण्यासारखे आहे असे माझ्या वडीलांचे मत होते आणि त्यामुळे ते माझेही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मला हा देव इतका शक्तिशाली आहे हे जर आधी माहिती असतं, तर मी नक्की दोन तीन गोष्टी मागितल्या असत्या
भारिच.
भक्ती-श्रद्धावगैरे नेहमीचाच्विषय. पण खूपच चांगला मांडलेलाय.
कॉलिंग पकाकाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कॉलिंग पकाकाका.

म्हणजे नक्की कोण? Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पकाकाका म्हणजे प्रकाश घाटपांडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला भुभुदेवता प्रसन्न आहे. माझी त्या देवतेवर श्रद्धा आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लिखाण आवडलं. देवाधर्माशी असलेल्या स्वतःच्या नात्याशी काहीसं मिळतंजुळतं नातं आहे याच्या जाणीवेमुळे ते नेहमीपेक्षा अधिक आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेखातील "तसं पहायला गेलं तर भक्तीची मला काय गरज?" ही कबुली फार भावली....ज्यामुळे एक नक्की जाणवते की लेखिका किती रॅशनल पातळीवर या सार्‍या अलौकिक मानल्या गेलेल्या गोष्टी घेत आहे. हजारो वर्षाचे धार्मिक संस्कार आपल्या 'जिन्स' मध्ये नैसर्गिकरित्या उतरले असल्याने ते त्यागता येत नाही हे खरे, किंबहुना त्यामुळे का होईना रस्त्यावरून चालताना ग्रामदेवतेचे मंदिर वाटेत लागले तर नकळत का होईना आपल्या हाताचे तळवे आपसूक जोडले जातात व देवाला/देवीला एक सहज नमस्कार घडतो. इथपर्यंत ठीक. पण आले आहे देऊळ म्हणून हातातील कामे सोडून, चपला काढून, तीर्थप्रसादाचे ताम्हण घेऊन जर कुणी देवीपुढे जातो म्हणत असेल तर ना ते देवीला पसंत पडेल ना हा ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल तेथील प्रशासकाला. भक्ती आणि भक्तीचा बडेजाव या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. मला यश लाभले म्हणजे मी देवीचा खूप लाडका वगैरे सार्‍या गोष्टी बिलकुल झूठ असतात. मी नोकरीच्या ठिकाणी इमानेइतबारे, अंग मोडून काम केल्याची पावती वर कुठेतरी नोंदविली गेली आहे म्हणून मी बढतीसाठी पात्र ठरत गेलो आहे याची मला जाणीव असली पाहिजे. अन्यथा भक्ती २४ तास करीत बसलो म्हणजे प्रमोशन्स मिळत जातील अशी दुधखुळी कल्पना या युगात कुणी करत असेल तर मग त्याला भक्तीमाहात्म्यच समजले नाही असेच म्हणावे लागेल.

रडतभेकत देवापुढे कुणी काहीतरी मागत असताना दिसला की मला नक्की जाणवते की त्या भक्तीच्या मागे त्या भक्ताचे सुखाचे प्रेत कुठेतरी लपले आहे, ज्यामुळे तो करुणा भाकत आहे. असल्या भक्तीला देवदेखील कंटाळत असेल.

"काही न मागता, काही अपेक्षा न करता; काही देवाणघेवाण न करता एकमेकांसोबत जगायचं. त्यात आम्ही समाधानी आहोत......" ~ या तात्पर्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रडतभेकत देवापुढे कुणी काहीतरी मागत असताना दिसला की मला नक्की जाणवते की त्या भक्तीच्या मागे त्या भक्ताचे सुखाचे प्रेत कुठेतरी लपले आहे, ज्यामुळे तो करुणा भाकत आहे. असल्या भक्तीला देवदेखील कंटाळत असेल.
"काही न मागता, काही अपेक्षा न करता; काही देवाणघेवाण न करता एकमेकांसोबत जगायचं. त्यात आम्ही समाधानी आहोत......" ~ या तात्पर्याशी सहमत.

अशोक काका, जबरदस्त प्रतिसाद.

सविताताई,

भक्ती करणे आणि न करणे या दोन्ही अर्थातच व्यक्तीसापेक्ष आहेत.

भक्ती आहे म्हणजे मी अमुक अमुक देवाची (निष्ठेने) भक्ती करतो. (हे देव अर्थातच हळू हळू अनुभवाने बदलत जातात)
त्याला मी दर सोमवारी यंव करीन आणि दर शनिवारी त्यंव करीन. पण मला ऑफिसातल्या राजकारणात शत्रूंना पुरुन उरु दे रे देवा. आता या महिन्यांअखेरीस मला तातडीने एवढे पैसे हवे आहेत. तर त्या पैशाची सोय करुन दे रे देवा. पगार झाल्यावर परत .... नैवेद्य... (सरकारी भाषेत लाच)

भक्ती नाहिये म्हणजे मी देव-बिव मानत नाही. मला ते उपचार वा अवडंबर मान्य नाही. पण ऑफिसातल्या राजकारणात मी स्वतःच्या शत्रूंना त्यांची जागा दाखवून देईनच... अथवा पैशाची सोय मी या ना त्या प्रकारे करेनच...

वरील एकाच प्रकारच्या उदाहरणांतून भक्ती आहे व नाहिये असे मानणार्‍या लोकांची तुलना केली तर एक गोष्ट लक्षात येते. ती ही की दोन्ही प्रकारच्या व्यक्ती आपापली कामे करतातच व त्यात यशस्वी वा अयशस्वी होतातही. पण एक लक्षात घेतले तर असे दिसून येते की भक्ती करणार्‍याला व्यक्तीत त्या घटनांना सामोरे जाण्याची क्षमता असते, पण मान्य करायची तयारी नसते याचे कारण देवाला सर्वशक्तीमानत्व मनातून दिलेले असते.
तर दुसर्‍या प्रकारची व्यक्ती ही स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असणारी असते.
दोन्ही प्रकारच्या व्यक्तींमध्ये एक फॅक्टर कॉमन असतो - तो हा की दोन्ही प्रकारच्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तीगत क्षमतांनुसार त्यांच्या ध्येयाप्रती क्रिया-प्रतिक्रिया देत असतातच आणि त्याचे रिझल्ट्स त्यानुसारच मिळतात. - फक्त कोणी मनाने खंबीर नसतो तर अशा वेळी देवावरची भक्ती त्याला आवश्यक असणारे मानसिक बळ पुरवते.

हा झाला भक्त व अभक्त यातल मामला.
याहीपलिकडे जाऊन मला असे म्हणायचे आहे की नशीब हा फॅक्टर खरोखर अस्तित्त्वात असतो. (नशीबावर हवाला ठेवणारे देखील नशीबाचे भक्तच असतात तर नशीब न मानणार्‍यांनाही याची प्रचिती येतेच येते - उदा: ट्रेन मधून प्रवास करणार्‍या हजारो लोकांपैकी पाकीट मारले जाण्याचा अनुभव आपल्यालाच येणे किंवा एखादा दिवस असा जाणे की त्या दिवशी सगळेच चांगले होते किंवा सगळेच वाईट होते.) - अर्थात थोडे अवांतर होते आहे. पण श्रद्धाळू व अश्रद्धाळू हा मुद्दा येथे येत असल्याने त्या अनुषंगाने थोडासा हाही विषय घेतोय.

निसर्गाचे गणित हे असे आहे की समजून घेतले तर सोपे आहे. पण समजून घ्यायचे नसेल तर कितीही काथ्याकूट केला तरी ते कळत नाही. (मी ही अर्थातच त्याला अपवाद नाही Wink )

शेवटी देव आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर पुन्हा व्यक्तीसापेक्ष अनुभवांवर आधारीत आहे. देव जर अस्तित्त्वात नसताच (ज्याकडे मी निसर्गाची अमर्याद क्षमता म्हणून पाहतो) तर पतंजली पासून विवेकानंद-परमाहंस यांच्यापर्यंत आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्ती निर्माण झाल्या नसत्या. अशा व्यक्ती वेळोवेळी आहेत म्हणजे अशी कोणतीतरी गोष्ट आहे की जी आपल्याला अगम्य आहे... अज्ञात आहे. तिचा शोध घेणे म्हणजेच भक्ती का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखामधला प्रामाणिकपणा फारच भावला.

भक्तीमार्गाबद्दल माझे मत - भक्ती ठेवणार्‍याचे पण काहीच बिनसत नाही, तद्वत न ठेवणार्‍याचे पण काहीच बिनसत नाही, अज्ञाताच्या फटी शिल्लक राहिल्या की त्याचा देव, दानव किंवा नशीब होते, आणि बरे-'वाईट' कळणारा माणूस आहे तोपर्यंत अज्ञाताचा फायदा घेणारे लोक पण असणारच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. विशेषतः ईश्वराकडे/देवाकडे/गुरूकडे नवस बोलणे, कृपाप्रसाद मागणे, गार्‍हाणे घालणे, कौल लावणे असल्या गोष्टींचा तिटकारा आहे.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः||- हे असो किंवा इतर भाषांमधले इतर धर्मांचे तत्सम आदेश - मी सांगतो त्या एकमेवाद्वितीय ईश्वराला शरण जाणे भाग आहे अन्यथा शरणं नास्ति , अन्यथा मोक्षं नास्ति असले दुधखुळे अंधविश्वास (पिवळे पितांबर) मानायचेच कशाला? कोणीतरी अनाकलनीय थर्ड पार्टी आपल्याला केवळ भक्तीच्या बदल्यात काही देईल असे मानणार्‍यांचेही नवल वाटते. तसे मानण्यासाठी ठार अडाणी असणे गरजेचे आहे.

भविष्य अनिश्चित आहे आणि त्याची पावले कोणत्या दिशेने वळतील ते १००% ओळखता येत नाहीत. गीतेतले ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग (म्हणजे पर्यायाने भारतीय तत्त्वविचारांची काही दर्शने) यातले मोक्षबिक्ष काढून टाकले तर अनिश्चित जगाची समज येण्यास,बर्‍या-वाईट कालात बुद्धीला स्थिरता मिळण्यास आणि योग्य असे आचरण करण्यासाठी योग्य ठरावेत. धर्म बाजूला ठेवला तरी ते सायकॉलॉजिकल काऊन्सलिंग आहे असे मानतो. विशेषतः मृत्यूची भीती वाटू लागण्याच्या वयातल्या लोकांसाठी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादांतून मला विचार करण्यासाठी अनेक नवे मुद्दे मिळाले,त्यासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0