सरलं दळण...

आमचं घर अगदीच टिपिकल शेतकर्‍याचं नसलं तरी लहान गांवात राहिल्याने अगदीच फटकूनही नव्हतं. सतत ऊस लावल्यास जमिनीचा कस कमी होतो म्हणून प्रत्येक खोडव्यानंतर खपली गहू पेरला जायचा, तूरडाळ विकत घेण्याऐवजी थेट आख्खी तूर विकत घेतली जायची, ज्वारी-गहू सोडून इतर धान्य क्वचितच गिरणीत दळायला नेलं जायचं, वर्षभराचं तिखट डंकावर करून आणलं असलं तरी उपवासाचं तांबडं तिखट घरीच बनवलं जायचं. नंतर यंत्रं आली तरी कित्येक दिवस चव चांगली लागत नाही म्हणून दाण्याचं कूट,मिरचीचा ठेचा उखळ-खलबत्त्यातच व्हायचा आणि पुरणयंत्र "मेरा नंबर कब आयेगा" म्हणून अजूनही आ वासून पडलं आहे. थोडक्यात काय, आता कालपरत्वे थोडा फरक पडला असला तरी उखळ, खलबत्ता, पाटा-वरवंटा यांच्या सोबतीने आमच्या घरी दळण-कांडणाची अगदी रेलचेल होती.

उखळ आणि जात्याच्या वापराचंही एक तंत्र असतं. खिरीसाठी गहू कांडताना पहार उपयोगाची नाही, त्यासाठी मुसळ लागतं आणि ते सततच्या वापरानं झिजू नये यासाठी त्याच्या एका टोकाला वर्तुळाकार लोखंडी नाल बसवावी लागते. जात्यावर पीठ दळताना छोटे-छोटे घास (जात्याला) भरवून किंचित अधिक जोर लावावा लागतो; तर नुसतं भरडताना मोठे घास आणि हलक्या हातानं दळावं लागतं. एकटीने करताना हे काम कंटाळवाणं खरं, पण जोडीला कुणी असेल तर धमाल येते. कांडप करताना एका हाताने मुसळ खाली आपटायचं, ते जोडीदारीण एका हाताने पटकन उचलून आपटते तोवर पहिलीने हात बदलून पुढचा घाव(!) घालेतोवर दुसरीनेही हात बदलून साथ दिलेली असते. आणि या लयबद्धतेला साथ असते दोघींच्या हुंकारांची. हे पाहायला थोडा वेळ मजा येते परंतु यापेक्षा धमाल असते ती कुणी काकू-मामी-आजी जात्यावर दळायला बसल्यावर. किनऱ्या आवाजात (कदाचित त्यामुळे आवाज नाजूक व पातळ येतो आहे असा सार्वत्रिक समज असावा असं वाटतं) हळूच एकदा का ओव्यांना सुरवात झाली की स्त्रीमनाचे पदर हळूहळू उलगडत जातात. व्यक्त होणं ही सर्वांचीच गरज असते. पण ते व्यक्त व्हावं कुणाजवळ? जुन्या काळच्या, ज्या मुख्यत्वेकरून घरीच असायच्या त्यांना आई, नणंद-भावजया, बरोबरीच्या सख्या किंवा अगदीच कुणी नसेल तर गोठ्यातल्या कपिलेला मनीचे गुज सांगता येई नाहीतर मग जात्यावर दळताना स्वत:शीच गुणगुणणं तर होतंच. अशा तऱ्हेने घरातलं जातं स्त्रियांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असायचं. या जात्यावरच्या ओव्यांत वैविध्य तर शोधावं तितकं कमीच. त्यांमध्ये भोंडल्याच्या गाण्याप्रमाणे माहेरवाशिणीचं सुखदु:ख दडलेलं असे, कधी तिचं रोजचं जीवनमान दिसे तर कधी संसारातली तृप्ती ओव्यांतून-जात्याच्या घरघरीसोबत पिठाप्रमाणे हळूहळू झिरपत राही.

सीतेला देवीचा अंश मानलं तरी ती शेवटी मनुष्यच. तिला हरिणकांतीची भुरळ पडावी हे जसं नैसर्गिक, तसंच चार घटका कुणाशी बोलावंसं वाटणं हेही तितकंच साहजिक. तिला दोनदा वनवास घडला. पहिल्यावेळेस ती एकटी नव्हती पण दुसऱ्यांदाच्या वनवासात मात्र ती अवघडलेली, एकाकी होती. तिने तिचा हा काळ कसा कंठला असेल याची चिंता आयाबायांना पडली नसेल तर नवल! या काही जात्यावरच्या ओव्या आहेत, सीतेच्या दोन्ही वनवासातल्या. एकामध्ये रामाचं तिच्यावरचं प्रेम जाणवतं, सीतेपायी विव्हळ झालेला राम दिसतो आणि दुसऱ्या भागात आडरानात एकाकी पडलेली सीता तिथल्या झाडांसोबत आपलं दु:ख वाटून घेताना दिसते.

सीता-सीता करत राम, राम पडला धरणीलाऽऽऽऽ।
आरं लंकेच्या रावणाऽऽ, कुठं फेडशीऽऽल पापालाऽऽऽऽ।।
रावणानं सीतेला पळवून नेले आणि राम अगदी कासावीस झाला. त्याची व्याकुळता पाहून रावणाचा अधिकच राग येतो, त्याची सारी कुकर्मे आठवतात आणि त्याच्यासाठी अगदी शापवाणी ओठी येते.

राम अन लक्षीमनऽऽ, दोघं हिंडती लवणानंऽऽऽऽ।
ऐका रामाची सीताऽ, सीता नेलीया रावणानंऽऽऽऽ॥
रामच नाही,तर लक्ष्मणाला देखील सीताहरणानं सैरभैर केलं होतं. दोघे तिला ठाई ठाई शोधत होते. अशा वेळी कुणीतरी जाऊन त्यांना सीता नक्की कुठे आहे हे सांगावं असं वाटणं साहजिक आहे.

बारा वरसं निरंकारऽऽ, माता अंजनीऽनं केलाऽऽ
मारूती ब्रह्मचारी, बाळ पोटी जल्माला आला, त्यानं सीतेचा शोऽऽध केला.
मनापासून केलेली प्रार्थना पूर्ण होते म्हणतात. अंजनीमातेस नवस सायासाने झालेल्या मुलाने शेवटी सीता कुठे आहे याचा छडा लावला. त्यानंतर काय, राम-लक्ष्मण पराक्रमी होतेच, आणि मग राम-सीता-लक्ष्मण सुखाने अयोध्येस परत आले.

पण अध्याय इथं संपत नाही आणि सीता पुन्हा एकदा वनात येऊन ठाकते, अगदी एकटी.

अडग्या रानामंदीऽऽ सीतामाईला नव्हतं कुणीऽऽऽऽ।
रानातल्या बोरी-बाभळी झाल्या गं आई-बहिणीऽऽऽऽ।।
भयाण वन, आडवाटेचं. आसपास कुणीच नाही, मग मायेचं माणूस तर दूरच. अशा वेळेस अंगभर काटेकुटे असलेल्या, कदाचित ज्यांना कुणी कधी प्रेमाने आंजारलं गोंजारलं नसेल अशा बोरी-बाभळी तिच्या जीवाभावाच्या सख्या बनतात. इथं खरंतर उपमा-उत्प्रेक्षा-रूपक सगळे अलंकार थिटे पडतात. शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहतात रानावनात, काटेकुटे ल्यायलेली ही झाडं. रूक्ष, रखरखीत. रणरणत्या उन्हात तळपणारी आणि तरीही अस्तित्व टिकवून ठेवणारी. ऊन-वारा-पावसाचे सगळे आघात सोसूनही ताठ उभी. हे प्रतीक आहे,कसल्याही आपत्तीत हार न जाणाऱ्या स्त्रीत्वाचं, तितक्याच ठामपणे दुसर्‍या एकाकी स्त्रिला तिच्या होरपळणार्‍या आयुष्यात तिला आधार देणारं. बोरी-बाभळीच्या उल्लेखामागे आणखी एक हेतू दिसतो. बरेचदा सहज आसपास असलेले लोक विनाकारण दुर्लक्षित असतात. त्यांची किंमत अशा वेळेसच जाणवत असावी असं काहीसं इथं अधोरेखित असावं.

अडग्या रानामंदी कोण रडतं आईईऽऽकाऽऽऽऽ।
सीतामाईला समजाविती बोरी-बाभळी बाईईऽऽकाऽऽऽऽ॥
या ओव्या ही मूळची मौखिक परंपरा. तिला कुठल्याही लिखापढीची गरज नाही. ही परंपरा कुठल्या विहित शिक्षणाची गुलाम नाही. ती लेखनाच्या, कोणत्याही प्रकारच्या स्त्रीशिक्षणाच्या आधी जन्म पावलेली आहे. कुठल्याही भाषेत तिचं व्याकरण हे नंतर येतं, पण तीमधला भाव प्रथम येतो. त्यामुळे काव्यातले मीटरचे नियम इथं लावून चालायचं नाही, पण गेयता-भावगर्भता यांच्या निकषांवर या ओव्या उच्च प्रतीच्या ठरतात. मग ती गेयता साधताना कधी एखादा शब्द पुन्हा पुन्हा येणं किंवा एखाद्या शब्दाला सूर लावणं हे नेहमीचंच. इथं भाव जास्त महत्वाचा, त्यामुळे हे कानाला खटकत नाही, उलट गोडच वाटतं. त्यामुळेच या ओवीत 'ऐका'चं 'आईईऽऽकाऽऽऽऽ' काय किंवा 'बायकां'चं 'बाईईऽऽकाऽऽ' हे बिनबोभाट खपून जातं.

सीतामाईला वनवासऽऽ, तिला वनवास आला कसाऽऽऽऽ?
आली वर्साची संकरातऽऽ, बोरी-बाभळी ववसल्याऽऽऽऽ॥
जंगल असलं म्हणून काय झालं? काळ तर पुढे सरकत राहातो, ऋतू बदलतात आणि सणसमारंभ येत राहतात. कदाचित इतर सणवार साजरे होणार नाहीत, पण ज्या सणांशी तिचं सवाष्णपण जोडलं गेलं असेल ते कसे चुकवणार? सीतेची याबद्दलची मानसिकता काय असेल हा विचार मनात न येता ही ओवी म्हणणाऱ्या स्त्रीची 'नवरा चुकला म्हणून आपण चुकू नये' अशी भावना असावी. संक्रातीला हाती सुगड घेऊन एकमेकींच्या भांगांमध्ये (बहुधा) गुलाल चिमटीत घेऊन दोनतीन वेळा भरणं याला ववसणं म्हणतात. त्यावेळेस जिला ववसलं, तिच्यासोबत हातातल्या सुगडाचीदेखील अदलाबदल केली जाते. पाच या आकड्याचं काय महत्व आहे हे माहित नाही, परंतु किमान पाच सवाष्णींना ववसलं जातं. बोरीबाभळींसोबत दु:खच नाही तर इतरही गोष्टी वाटून घेणं हे असलं तरी दु:खात साजरा केलेला सण अधिक दु:खदायक असावा.

अडग्या रानामंदीऽऽ सीता बसली सावलीलाऽऽऽऽ।
लंकेच्या रावणानंऽऽ, बट्टा लावला माऊलीलाऽऽऽऽ।।
खरंच.. रावणाने सीताहरण केलं नसतंच, तर हा दिवस उगवला नसता. रावण हा दोषी आहे, "root cause" म्हणावा असा. पण त्यामुळे रामाची जबाबदारी कमी होत नाही. प्रत्यक्षरित्या तोच याला जबाबदार असला तरी दोष त्याला नाही, तर तो रावणालाच दिला जातो. असो. हे व्यक्तिपरत्वे होणारं इंटरप्रिटेशन म्हणता येईल. कदाचित त्यावर इतका विचार करण्याची या एकेकाळच्या अवाक्षरही न शिकलेल्या स्त्रियाची उमज नसेल किंवा त्याकाळच्या समाजाच्या बाळकडूप्रमाणे हे बरोबरही असू शकतं. हे रामायण समजून घेऊन ते रोजच्या रामरगाड्यात आळवावं हे मात्र विशेष. या ओव्या कुणी प्रथम लिहिल्या असतील हे माहित नाही पण ज्याप्रकारे त्यांचं जतन-संवर्धन झालं आहे ते कौतुकास्पद आहे.

वरच्या ओव्यांमध्ये निरक्षर स्त्रियांचं त्यांच्यापुरतं रामायणाचं विवेचन दिसून येतं. पण ते खरंतर निमित्तमात्र आहे. स्त्रीकाव्य हे बंदिस्तीची वेदना मांडतं आणि त्यातून मुक्तीचं गीत येतं. ती कदाचित खरोखरीची मुक्ती नसेलही, पण किमान ठसठसणारी दु:खं या गीतांमधून मांडली जातात. कधी एकटीनं गुणगुणत, तर कधी सोबत कामाला हातभार लावणार्‍या सखी सोबत. या काव्यात जे असतं, ते केवळ एक स्त्रीच उमजू शकते कारण तेच तिचं जगणं असतं. ही वेदनेची माळ या सगळ्यांना एकत्र सांधत राहाते. रामायणाच्या आख्यानातून गायलेललं दु:ख एकट्या सीतेचं नसतं, कित्येकदा त्या सीतेच्या ठिकाणी ती स्वतः असते तर कधी तिची सखी. घरातल्यांकडून-नवर्‍याकडून अपमानित झालेली, कधी काही दोष नसताना हाकलून दिलेली, भराल्या घरातही एकटी पडलेली... प्रत्येक दु:ख वेगळं, पण त्यामध्ये दुखावली जाणारी ही स्त्रीच. त्याचा निचरा करण्याचा एक मार्ग म्हणजे ते व्यक्त करणं.

हे झालं रामायणासारख्या महाकाव्याबद्दल. त्याहीपेक्षा रोजच्या आयुष्याबद्दलच्या ओव्या मला अधिक आवडतात. या ओव्या म्हणणारीला तिच्या गाण्याचं कौतुक आहे, आणि का गावं याची नेमकी कारणं तिच्याकडे आहेत.

मुक्यानं दळयानऽऽ तुला कसं गं व्हतं नारीऽऽऽऽ।
भाऊ भाच्याचं दलऽऽ तुझ्या उतरलं गं दारीऽऽऽऽ॥
काम करताना गुणगुणलं की कामाचा भार जाणवत नसावा आणि अशा हसत खेळत वातावरणात माहेरचं आख्खं भेटीला येण्यापरतं दुसरं सुख ते काय असावं?
या ओवीमध्ये पुन्हा एकदा गेयता साधण्यासाठी 'दळणा"चं "दळयान" होतं की अहिराणी मधलं "दळयान" इथे येतं? उत्तर अवघड आहे. लोकगीतांना प्रांत-भाषांच्या बंधनात असं अडकवता येत नाही. एका ठिकाणचं रोप दुसरीकडे लावलं की तिकडे आपली संस्कृती घेऊन जातं. भाषेचं संक्रमण होतं. लिहितावाचता येत नसलं तरी लोकगीतांद्वारे स्त्रियांनी भाषेचं असं अभिसरण घडवून आणलं.

सरीलं दळयानऽऽ सूप सारिते पलिकडेऽऽऽऽ।
सासर म्हायेरीऽऽ राज मागीते दोहीकडेऽऽऽऽ॥
या दोन ओळींमध्ये शब्दशः अर्थापलिकडे बरंच काही आहे. धान्याचं सूप खूपशा विधींमध्ये महत्वाचं असतं. काही विशिष्ट विधींमध्ये तर सूप सोडून देण्याची प्रथा आहे, ज्याला बोलीभाषेत 'सूप सोडणं' असंही म्हणतात. असं हे 'दळण सरलं' तरी घरावरची माया कमी होत नाही. स्त्रीच्या कोणत्याही मागणीत असतं त्याप्रमाणे शेवटचं मागणंही दोन्ही घरच्या सौख्याचंच असतं.

जात्यावर बसावंऽऽ तंवर जात्याशी बोलावंऽऽऽऽ।
सव्वाशेराचं लुगडंऽऽ आपल्या ध्याईवं तोलावंऽऽऽऽ॥
प्रत्येकवेळेसच दळताना सोबत असावी असं काही नसतं. गुजगोष्टी सखीशेजारणीसोबत होतात तशाच त्या जात्यासोबतही ओव्यांमधूनही होऊ शकतात. कदाचित अशा कष्टातून घरादाराला बरकत येऊन सव्वशेराचं लुगडं "ध्याईवर" मिरवायला मिळेल. काही ग्रामीण कवितांमध्ये वाचलेलं , ’हृदयाला 'हुरदं' म्हणणं मला काहीसं ओढून ताणून आणल्यासारखं वाटतं, पण ही देहाची 'ध्याई' म्हणणं कानाला अगदी गोड वाटतं.

मला या जात्याचा हेवा वाटतो. किती तरी गृहिणींच्या सुखदु:खांचे साक्षीदार आणि साथीदार असलेल्या या जात्यांकडे लोकगीतांचा ठेवा आहे. तो हळूहळू हरवत चालला आहे. मला यात स्मरणरंजनाहून त्या स्त्रियांची अभिव्यक्ती अधिक महत्वाची वाटते. छोट्या प्रतिकांतून किती मोठा अर्थ त्या सांगून जातात. जातं कालबाह्य झालं आहे आणि ते कधीतरी होणारच होतं. परंतु त्यामुळे हे अमूल्य साहित्य हरवतं आहे त्याचं दु:ख अधिक आहे. या ओव्यांना आजची आपली तथाकथित मीटरची सूत्रं लागू पडत नाहीत, परंतु त्यांचीही मात्रांची गणितं आहेत, संगीतांचे विशिष्ट ताल आहेत. ही गणितं मांडली जाण्याआधी ती समाजातील निरक्षर आणि दुर्लक्षिल्या गेलेल्या घटकांनी त्यांचा वापर करावा हे लक्षात घेण्याजोगं आहे. या ओव्यांत गेयता नसती तर लेखनावाचून त्यांचं संक्रमण अशक्य होतं. हे ओळखून तेव्हा ते तसं जोपासलं गेलं. आता तेच आपण कदाचित ब्लॉगवर लिहित असू आणि त्यात इतरजणी प्रतिसादांचा हातभार लावत असतील. आताच्या अभिव्यक्तीत आणि तेव्हाच्या व्यक्त होण्यात काही फरक नाही, फक्त माध्यमं आणि प्रकटनाचं स्वरूप बदललं आहे, इतकंच.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

हरवलेल्या संस्कृतीचं चिंतन आवडलं. लहानपणी मी जात्यावर दळताना बघितलेलं आहे. त्या बाई खूप वयस्क होत्या आणि ओव्या वगैरे म्हणत नसत. पण ती लयदार घरघर आठवते. चाळीतच आजीच्या घरी एक जुनं मुसळ बरीच वर्षं होतं. त्याचा काही उपयोग नव्हता. कधीतरी कांडायला म्हणून कोणीतरी घेऊन जायचं. तसं जोडीचं कांडणही बघितलेलं आहे... काही प्रेमाच्या आठवणी आहेत म्हणून नाहीत, पण लेखाने या जुन्या प्रतिमा जाग्या झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओव्या ही एक अभिव्यक्ती होती जुन्या काळच्या स्त्रियांची आणि म्हणून त्यांचे मूल्य आहेच. तुम्ही मांडलेल्या तुमच्या आठवणीतल्या ओव्या छान आहेत; आवडल्या त्या.

अजून ब-याच दुर्गम भागांत, आदिवासी क्षेत्रांत जात्यांवर दळतात पण ओव्या सोबत असतात की माहिती नाही! तिथं गिरण्या आल्या आहेत आता, पण विजेचा लपंडाव असतो आणि अनेकदा गिरणीतल्या दळणाची किंमत मोजायची ऐपत नसते कुटुंबाची. असो, यावर लिहिण्याजोगं पुष्कळ आहे पण ते इथं अवांतर होईल.

मात्र जातं नाहीसं होतंय हे ठीकच आहे, त्यामुळे ओव्या नाहीशा झाल्या तरीही ठीकच आहे ते. खूप कष्टाचं काम होतं रोजच्या रोज जात्यावर दळणं हे! आता स्त्रिया नवी माध्यमं शोधून काढतील अभिव्यक्तीची यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सरलं दळण' हे बाईच्या मृत्यूचं प्रतीक म्हणून ज्यात वापरलं आहे अशी एक ओवी 'शेवंतीचं बन' ह्या लोकगीतांवर आधारित कार्यक्रमात अखेरीला सादर केली जाते ती पूर्वी ऐकली आहे. त्याविषयीची ही ब्लॉग एन्ट्री ह्या संदर्भात वाचायला रोचक वाटेल. विशेषतः शेवटच्या इच्छा म्हणून ह्या गाण्यातली स्त्री काय काय व्यक्त करते ते हृद्य आणि अंतर्मुख करणारं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'अहेव गेली नार', आणि तिथून पुढं 'सरलं दळण' असा तो क्रम आहे. हा दुवा दिल्याबद्दल तुम्हाला दुवा. Smile
मा. मस्त कलंदर या ब्लॉगचं वाचन करतीलच, अशी आशा आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दळण सरणं" हे मृत्यूचं प्रतीक आहे हे हा लेख लिहीपर्यंत मलाही माहित नव्हतं. लेखाचा पहिला खर्डा मोडकांना पाठवला होता, आणि वस्तुतः साधीशी म्हणून सोडून दिलेल्या ओवीमध्ये किती गहन अर्थ दडला आहे हे कळालं. आणि मग त्या अर्थाच्या अनुषंगाने पुढच्या ओव्या वाचल्या तेव्हा अगदी अंगावर काटा आला. सहज म्हणून म्हटलेल्या त्या ओळी मग अंगावर यायला लागल्या, आणि मग त्या सरळ लेखातून काढून टाकल्या. नाहीतरी, दिवाळीच्या मंगलप्रसंगी इतक्या नकारात्मक ओव्या नकोत असं एक मत होतं, आणि पुढेमागे आणखी काही ओव्या जमल्यानंतर या वगळलेल्या ओव्यांसह नवीन काहीतरी लिहिता येईल असाही एक हेतू होता.
जंतू, ब्लॉगच्य दुव्याबद्दल मीच तुम्हाला दुवा देते.

गेला माहा जीव
नका करू संध्याकाळ
पोटच्या पोराची
थंड्या पान्याची आंगूळ

या ओळी अक्षरशः भयंकर आहेत!!

अवांतरः ज्या बायकांकडून या ओव्या घेतल्या होत्या त्यांनाही 'दळण सरण्याचा' हा अर्थ माहित नव्हता. त्या फक्त त्यांना या ओव्या माहित आहेत म्हणून गात होत्या. मी अर्थ सांगितल्यावर त्याही विचारात पडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

>>या ओळी अक्षरशः भयंकर आहेत!!<<

सहमत. कधीतरी 'शेवंतीचं बन' हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहा असं सुचवेन. ह्या गाण्यांच्या वेळी प्रेक्षागृह सुन्न असतं आणि अनेकांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहात असतात. 'आजकालचा प्रेक्षक कसा मोबाईलशी खेळता खेळता कलास्वाद घेतो' वगैरे तक्रारी करणारेसुध्दा अंतर्मुख होतील असं वातावरण तिथे असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भयंकर ओळी +२

कधीतरी 'शेवंतीचं बन' हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहा असं सुचवेन

जालावर आहे? दुवा प्लीज. नसल्यास प्रयोग होतात का? कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेवटचा पॅरा विशेष !
एक आहे. गेयता असल्यामुळे किंवा कशामुळे ओव्या चिरंतन झाल्या आहेत, तितकं ब्लॉगलेखन अमर होईल का शंका आहे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज हा लेख वाचला.. आवडला!

जातं म्हटलं की आजी आजोबांच्या वस्तु: जातं च्या प्रतिक्रीयेत श्री. यनावालांनी दिलेली बहिणाबाईंची जात्यावरची ओवी आठवते:

अरे घरोट घरोट
वान्या बाम्हनांचं जातं
कसा घरघर चाले
त्याले म्हनवा घरोट.
*
अरे जोडता तोडलं
त्याले नातं म्हनू नही
ज्याच्यातून पीठ येतं
त्याला जातं म्हणू नही.
*
अरे घरोटा घरोटा
माझे दुखता रे हात
तसं संसाराचं गानं
माझं बसते मी गात.

अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं ओठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0