दोनशे त्रेसष्ठ

दोनशे त्रेसष्ठ

लेखक - आदूबाळ

Section 263(1) of the Income-tax Act, 1961. The Commissioner …

चार लोक असूनही केबिनमध्ये स्तब्ध, घट्ट शांतता होती. एसीच्या व्हेंटची अस्पष्ट ’झुंई झुंई’ आणि भिंतीवरच्या घड्याळाच्या सेकंदकाट्याची ’थर्र थर्र’, एवढेच काय ते आवाज. टेबलावरच्या त्रिकोणी पाटीचे मालक कैलास थोरवे, कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, एक डोळा चोळत समोरच्यांकडे पाहत होते. टेबलावर ’मे. काना ऑटोकॉम्प प्रा. लि.’ हे स्केचपेनने लिहिलेली जीर्ण थुलथुलीत फाईल पडली होती. आतले कागद पिवळे.

थोरव्यांचे वडील रिक्षा चालवायचे. आयुष्यभर शिफ्टवर काढून पोरगं कॉलेजात जायला लागल्यावर शेवटी चालक-मालक झाले होते. कैल्या हुशार. पोराने बीएपर्यंत फर्स्ट्क्लास सोडला नाही. पुढे कलेक्टर व्हायचं म्हणाला. कर बाबा, प्रयत्न कर. बापाला अपेक्षा नव्हती. आता घरची रिक्षा होती. पोराच्या भविष्याची तरतूद बापाने आपल्या परीने केली होती.

यूपीएससीला बसताना थोरव्यांचं ध्येय आयेएस. होतं. रँकमुळे आयारेस मिळाली. हरकत नाही. परत प्रिलीमच्या फंदात न पडता त्यांनी पोस्टिंग घेतलं. घरची रिक्षा घरीच राहिली, यथावकाश विकली.

इन्कम टॅक्स ऑफिसात तीन प्रकारचे लोक दिसतात. थंडगार एसी केबिनमध्ये बसणारे ऑफिसर्स. बाहेर हॉलमध्ये बसलेला ऑफिसर्सचा स्टाफ. याव्यतिरिक्त अजून एक तिसरा प्रकार असतो. हरकाम्या. रामा गडी. साहेबांची गाडी आली - डबा आणायला जाणार. बाहेर भेटायला कोणी आलं - चिठ्ठी घेऊन आत साहेबांकडे जाणार. फायलींचे ढिगारे इथून तिथे आणि तिथून इथे करणार. असेसीला नोटिसा पोचवणार. हजार कामं.

नियमानुसार हरकाम्यांना पर्मनंट घेता येत नाही, काँट्रॅक्टवर घ्यावं लागतं. आपला हरकाम्या कोण हे सर्वस्वी साहेबाच्या हातात असतं. सराईत डोळ्यांना हरकाम्या बघून साहेबाचा अंदाज येतो. गावंढा हरकाम्या दिसला तर साहेब प्रमोटी. कारण आपल्या जुन्या वॉर्डातून आपल्याबरोबर आणलेला हरकाम्या. गाववाला हरकाम्या दिसला तर साहेब आयारेस, पण मराठी. ग्रामीण भागातला. चंट हरकाम्या असेल तर साहेब आयारेस ओएमएस (औटसाईड महाराष्ट्र स्टेट). असलं. अपवाद असायचे, नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात.

थोरवे अपवादांत येत होते. त्यांच्या लेखी हरकाम्याची एकच पात्रता. गरज. मग ती कुठलीही असो - शिक्षण, आजारपणं, काहीही. ती असेल तरच थोरवे घ्यायचे. गरज संपेपर्यंत ठेवायचे. गरज संपताच आपोआप पोरं आपापल्या वाटेला जायची. थोरव्यांना दुवा द्यायची.

सध्याचा हरकाम्या विलास असाच गरजू. बापाची नोकरी गेलेली. मोठा मुलगा, कुटुंबाची जबाबदारी. कॉलेज अर्धवट टाकून नोकरी शोधत हिंडायला लागलं. कुणा भल्या माणसाने थोरव्यांकडे पाठवलं. थोरव्यांनी रुजू करुन घेतलं. शिकलेला तेज पोरगा म्हणून थोरव्यांनी शॅडोला बसवलं. म्हणजे कोपऱ्यात बसायचं. महत्त्वाची हियरिंग्ज असतील तर बोलणं टिपून ठेवायचं. नोट्स काढायच्या. टाईप करायच्या. फायली टिपटॉप ठेवायच्या. साहेबांच्या प्रेमातलं कूळ असेल तर चहा सांगायचा.
विलास थोरव्यांना काटकोनात बसे. शॅडो नसेल तेव्हा कडेच्या कॉम्प्युटरवर नोटिसा टाईप करणे, ऑर्डरी लिहिणे असली कामं करायची. शॅडो असेल तर समोरचा माणूस आणि थोरवे दोघंही दिसतील असं बसायचं. शब्दनशब्द लिहायचा. बोलायचं नाही. आवाजही कमीत कमी करायचा. शक्य तितकं अदृश्य आणि अश्राव्य रहायचं.

हे काम विलासला बरोब्बर जमलं होतं. आलेल्या माणसांना विलास खोलीत आहे की नाही हेही जाणवत नसे. टेबल, खुर्ची, सोफा, भिंतीवरचं अगम्य चित्र, यांच्याइतकाच विलास त्या केबिनमधल्या फर्निचरचा भाग होता.

… may call for and examine the record of any proceeding under this Act …

थोरवेसाहेबांच्या समोर काना ऑटोकॉम्पचे एकमेवाद्वितीय फायनान्स कंट्रोलर देवकीशरण बिस्वा बसले होते. साधुसंतांच्या मागे प्रकाशाचं वलय असतं, तसं बिस्वाच्या शरीराभोवती कपड्यांत जिरलेल्या घामाच्या कुबट वासाचं वलय कायम असे. पन्नास कोटी टर्नओवरच्या कंपनीचे अकाउंट्स आणि फायनान्स बिस्वा एकहाती सांभाळत असे. प्रमोटर्सची चाटूगिरी वेगळी. मोठ्या कस्टमर्सना हांजी हांजी करणं वेगळं. पदाला चिकटलेलं टेन्शन घामावाटे झिरपत असे.

टॅक्ससाठी चार्टर्ड अकाउंटंट बिद्रीकरांना नेमलं होतं. सावध, शांत, धिमे बिद्रीकर बिस्वाला पटत नाहीत. "सीए डायनेमिक होना चैए. ए बूढा किसी काम का नै ए.." हे खाजगीतलं मत.

दोन आठवड्यांपूर्वी थोरवेसाहेबांची नोटीस कानाच्या ऑफीसमध्ये पोचली. दोनशे त्रेसष्ठची नोटीस पाहून बिस्वाने लिटरभर घाम गाळला आणि ताबडतोब बिद्रीकरांना फोन करून बोलावून घेतलं.

"गडे हुवे मुर्दे उखाड रैए भोस्डीके..."

"हंss..."

"सात साल पुराना असेसमेंटए. ओ ऑर्डर निकालनेवाला ओ साब भी बदलके गया."

"हंss..."

"ओ नई क्या ओ, गंजा था बिलकुल. क्या नाम उसका..."

"डोके."

"हां हां डोकेसाब. अबी क्या करेंगे निकालके?"

"बघायला पाहिजे जाऊन. सोळा. नोटीस ठेवतो माझ्याकडे." आपल्या डायरीत तारखेची नोंद करत बिद्रीकर उठले.

"बिद्रीकर साब, आप बैठो. ठंडा पिओगे? पूरा बताओ. क्या होगा क्या नहीं..."

"बघायला पाहिजे. काहीतरी कारण असणार म्हणून काढलीय नोटीस. डोकेच्या ऑर्डरमध्ये काहीतरी कमीजास्त असेल." खांदे उडवत बिद्रीकर म्हणाले, "बघायला पाहिजे."

"कौन ए ये थोरवे? उसके साथ कुछ सेटलमेंट..."

"बघायला पाहिजे." आळसटलेल्या आवाजात बिद्रीकरांनी आपलं पालुपद म्हटलं.

बिद्रीकरांचा गळा दाबायची बिस्वाला अनावर इच्छा झाली.

… and if he considers that any order passed therein by the Assessing Officer is erroneous …

खोलीतली शांतता विलासला असह्य झाली. तो किंचित खाकरला. त्या बारीकशा आवाजाने वातावरणाला लागलेली तंद्री उतरल्यागत झालं. थोरव्यांनी डोळा चोळणं थांबवलं. बिस्वाची चुळबूळ थांबली. कणकेच्या गोळ्यागत थंड पडलेल्या बिद्रीकरांच्या बुबुळांची आणि गालाची थोडी हालचाल झाली.

"सो टू समप - डोकेंची असेसमेंट ऑर्डर मी वाचली. फाईल पाहिली. थोड्याफार गोष्टी इकडेतिकडे आहेत, बट दॅट्सोके,” थोरवे म्हणाले. “बट मेन थिंगीज - फाईलमध्ये कंझंप्शनचे डीटेल्स नाहीयेत."

बिद्रीकरांची भुवई पाव सेंटीमीटर हालली.

"सर हम समझे नहीं..."

"सो, मिस्टर... बिस्वा," समोरच्या कार्डावरून नाव कन्फर्म करत थोरवे म्हणाले, "आय हॅव अ रीझन टू बिलीव दॅट कंझंप्शन फिगर इज इनकरेक्ट."

इनकरेक्ट म्हणजे जास्त आहे. म्हणजे करपात्र नफा कमी दाखवला आहे, आणि कर कमी भरला आहे.

"सर, आम्हांला बघायला लागेल जरा." बिद्रीकर त्यांच्या नेहेमीच्या स्टाईलने म्हणाले. "जुनी गोष्ट आहे - रेकॉर्ड्स काढून बघतो."

बिस्वाला राहवलं नाही. सारखं टोलवायचं कशाला? एक घाव दोन तुकडे करून मोकळं व्हायचं.

"सर, क्यों डाऊट सर? हमारा कंझंप्सन तो पूरा सिस्टमसे आता है. वो तो गलत हो ही नहीं सकता."

"आप का सिस्टिम भगवान ने बनाया है क्या?"

"नो नो नो सर. हा हा हा. सर, लेट मी एक्स्प्लेन सर. इट्स प्रिटी सिंपल, सर." बिद्रीकरांनी गुडघ्यावर मारलेल्या ढुशीकडे दुर्लक्ष करत बिस्वा आत्मविश्वासात म्हणाला. च्यायची या बिद्र्याच्या - एवढं सिंपल सांगता येत नाही?

"सर, अ‍ॅज यू नो, वी आर इंटु ऑटो कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग. एक कंपोनंट बनाने के लिए जो भी मटीरियल लगता है - चाहे वो सीट मेटल कटिंग्स हो, चाहे कोई कास्टेड पार्ट हो, चाहे कुछ भी - उसका सबका पहलेही हिसाब होता है. वो सब एक डोक्युमेंट में लिख के रखतेए, उसका नाम बॉम. माने वो फटने वाला नहीं, ह्या: ह्या: ह्या:..."

कुणीच हसलं नाही.

"बॉम माने बिल ऑफ मटीरिअल्स. जब पार्ट मॅनुफॅक्चर में जाता है, तो बॉम के हिसाब से सब मटीरियल का कोस्ट सीधा कंझंप्सन में जाता है. सिस्टम थ्रू. कोई मेनुअल इंटरवेंसन नहीं."

"बिस्वाजी, मैं भी थोडा पढा लिखा हूं. ये सब मैं जानता हूं. काय सांगायचंय ते थोडक्यात सांगा."

"मतलब सरजी, एक बार बॉम सही हो जाए, तो कंजंप्सन गलत नहीं हो सकता."

"तो आपका कहना है, कि कंझंप्शन सही है?"

"जी बिलकुल सर, सौ फी सदी."

"गुड. सो प्रूव्ह इट."

थोरव्यांनी पेन उचललं आणि हिरव्या ऑर्डरशीटवर लिहायला लागले. बिद्रीकर हताशपणे खुर्चीत रेलले. बिस्वाने आपणहून स्वतःची मारून घेतली होती.

… in so far as it is prejudicial to the interests of the revenue …

बिस्वाच्या काखेतून ताज्या घामाचा पहिला ओहोळ निघाला.

"सर, आज का कंझंप्सन दिखा सकता हूँ."

"आज का देख के क्या करूं?"

"नहीं सर, वैसे आप को कंफर्ट आ जाएगा."

"बिस्वाजी, ही केस सात वर्षांपूर्वीची आहे. मला त्या वर्षाचे डीटेल्स द्या."

"सर वो थोडा डिफिकल्ट रहेगा... क्या है ना, कि हमारे सिस्टम्स बदल गये है. पहले बान हुवा करती थी, आजकल एसएपी पे है..."

थोरवे काहीच बोलले नाहीत. "नॉट माय प्रॉब्लेम." हे त्यांच्या चेहेर्‍यावरून गळत होतं.

"बान तो हम कब के छोड चुके. उस टाईम के कोई बंदे भी नहीं रहे अब. अभी डेटा निकालना मुश्किल है." बिस्वा परत बोलला.

"कधी देणार डीटेल्स?" थोरवे मुद्दा सोडत नव्हते.

"वहीं तो बताऊं सर... वो साल का पोसिबल नहीं लगता मुझे."

"बिस्वा, मेक अप युवर माईंड. आधी म्हणत होता, थोडं अवघड आहे. मग म्हणालात, खूप अवघड आहे. आता म्हणताय, शक्य नाही. व्हाय आर यू वेस्टिंग माय टाईम?"

बिस्वाच्या काखेतून ताज्या घामाचा दुसरा ओहोळ निघाला. पण त्याने नोटीस नीट वाचली होती. त्याच्याकडे अजून एक एक्का शिल्लक होता.

"सर, ये नोटीस भी मुझे थोडा अजीब लगा..."

"का? काय प्रॉब्लेम आहे?"

"सर, क्या है ना ... सात साल बीत चुके है ... तो केस टाईमबार हो गया ... टूसिक्स्टीथ्री का सबसेक्शन टू…" बिस्वा विजयी मुद्रेने म्हणाला. टाईमबार झालेल्या केसच्या नोटीसला काहीही अर्थ नव्हता.

आता बिद्रीकरांनी बिस्वाच्या मांडीला सणसणीत चिमटा काढला. पण बाण वर्मी लागला होता.

"मिस्टर बिस्वा," थोरवे भीषण थंड आवाजात कडाडले. "आप पहले मुझे इंजिनियरिंग सिखाने लगे. अब इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट भी सीखाएंगे?"

"नहीं सर..."

"काय नाही? माझं काम कसं करायचं मलाच शिकवणार तुम्ही? ओके. तसं लेखी सबमिशन द्या. लिहा त्यात - इथे एक मूर्ख बसलाय खुर्चीत थोरवे नावाचा, त्याला इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट कळत नाही. मी आत्ताच्या ऑर्डर शीटवर लिहितो - दॅट असेसी रिफ्युजेस टू को-ऑपरेट."

"नहीं सर, नोटिंग में ना लिखिएगा कुछ..." बिस्वाची चड्डी पिवळी व्हायची वेळ आली.

"यू वोंट गिव व्हॉट आय हॅव आस्कड अँड देन टीच मी टू रीड धिस?" टॅक्समनचा ठोकळा बिस्वासमोर भिरकावत थोरवे म्हणाले.

"सॉरी सर. मी माफी मागतो तुमची." बिद्रीकर मध्ये पडत समजावणीच्या सुरात म्हणाले. "बिस्वाजी इज न्यू टु दीज थिंग्स. एका महिन्याच्या आत तुम्हाला डीटेल्स देतो आम्ही सर."

"सगळे डीटेल्स हवेत." थोरवे गुरकावले.

"हो सर. सगळे. तपशीलवार सबमिशनच करू ना आपण. फाईल पूर्ण करून टाकू तुमची." बिद्रीकर लीनपणे म्हणाले.

"हं..." थोरवे शांत होत ऑर्डर शीटवर लिहायला लागले. "विलास, चहा सांग कँटीनमधून. बिस्वाजी, चाय तो लोगे ना?"

"नको सर. जास्त वेळ घेत नाही तुमचा. येतो आता."

"पुढच्या महिन्याच्या वीसची तारीख देतो. सकाळी या अकरा वाजता."

बिस्वाला आणखी काही बोलायचं होतं, पण तो घुटमळणारसं दिसताच बिद्रीकरांनी त्याला दाराच्या दिशेने ओढलं.

तरीही तो बडबडलाच, "सर, बीच में अगर कुछ भी लगे ... आप को ... मतलब पर्सनली ... तो बस कॉल कीजिएगा."

थोरव्यांचा चेहेरा ढगाळला. "मिस्टर बिस्वा, आय नो व्हॉट यू आर इंडिकेटिंग. मी असलं काही करत नाही." आपली नजर त्याला टोचवत थोरवे म्हणाले. "प्लीज कम विथ द डेटा नेक्स्ट टाईम. आय डोंट नो व्हॉट यू थिंक ऑफ इन्कम टॅक्स ऑफिसर्स, बट आय मे लुक अ‍ॅट ऑल द इयर्स इफ धिस रिमेन्स युवर अ‍ॅटिट्यूड. डोंट टेम्ट युवर फेट."

बिस्वाच्या काखेतून ताज्या घामाचा तिसरा ओहोळ निघाला.

… he may, after giving the assessee an opportunity of being heard …

"साला भेंचोद. गांधीजी बनता है गुडवे का टेंटुआ साला." घामावर ताजी हवा बसताच बिस्वाची बिहारी गंगा मोकळी झाली. "आप भी ना साब, उस को कुच बोले नहीं. चुप रहें. ओ पावर मिसयूज कर रहा, आपने करने दिया."

"हर चीज का वक्त होता है, बिस्वा."

"सीधा बोल देना था - तेरा नोटिस इल्लीगल, उखाड ले जो उखाडना है…"

बिद्रीकरांनी दूरवर, क्षितिजापार डोळे लावले. तू चुत्या आहेस हे शब्दांविना सांगायची त्यांची ही पद्धत बिस्वाला ठाऊक होती. बिस्वाने टाईमबार्ड नोटीसचा मुद्दा अचूक पकडला होता, पण थोरव्यांनी निव्वळ दांडगाई करून बिस्वाचा कचरा केला होता.

"अजून एक सांगतो, थोरवे सगळं सांगत नाहीये आपल्याला. त्याला कंझंप्शनच्या आकड्यावर शंका का आहे हे त्याने लेखी द्यायला पाहिजे आपल्याला."

"फिर तो और बढिया. एक तगडा सबमिशन मारतेए उस के मूंह पे. डेटा क्या, झाटा भी नहीं देंगे." बिस्वाचे बाहू फुरफुरायला लागले.

"तरी तो ॲडिशन करेल." बिस्वाने तोंड उघडताच त्याला थांबवत बिद्रीकर पुढे म्हणाले. "हो, हो, आपण अपील करू. पुढे ट्रायब्युनलला जाऊ. पुढे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. टॅक्सपेक्षा जास्त पैसे लिटिगेशनमध्ये घालवायचे का?"

"..."

"बिस्वा, काहीही करायचं, पण ऑफिसरच्या इगोला हात घालायचा नाही. कधीच." बिद्रीकरांनी तत्त्ववचन सांगितलं. "त्यांच्याकडे पॉवर असते. अमर्याद पॉवर. ठरवलं, तर तुझं-माझं करियर बरबाद करू शकतात ते."

"फिर क्या करें?" बिस्वा हताशपणे म्हणाला. त्याला मुद्दा पटत होता.

"डेटा मागतोय ना, देऊन टाकू. असा डेटा देऊ की त्यातून काहीच समजणार नाही. चांगले जाडजूड शंभर दोनशे पानी आकडेच आकडे. आकड्यांचा समुद्र. बस अर्थ लावत. कर म्हणावं काय करायचंय ते. "

"उधर तो प्राबलेम है ना! डेटा निकालें कहांसे?"

"ती बाण की काय ती सिस्टिम आहे, त्यातून."

"सर, वो बान सिस्टम का देहान्त हो के भी चार साल हो गए. एक बेकप रख्खा है, वो भी कोने के पुराने खटारा फोरेटसिक्स पे. पूरे ऑफिस में किसी को चलाना तक नहीं आता."

"ते बघायला लागेल कसं जमवायचं…" जबाबदारीतून सुळकन सटकत बिद्रीकर म्हणाले.

बिस्वा विचारात पडला. सिस्टिमच्या डोंगरातून डेटा काढणे ही स्पष्टपणे त्याचीच जबाबदारी होती. डेटा न दिल्यामुळे त्या हैवानाने काही वेडंवाकडं केलं, तर ते पाप बिस्वाच्याच माथीचं असणार होतं.

"चल, चहा घेऊ या."

चहा पिताना बिस्वा गप्प गप्प होता. गहन विचारात रुतलेला.

"महिना आहे तसा आपल्या हातात…" बिद्रीकरांच्या शब्दांनी बिस्वा भानावर आला.

"सर, वो साल का ऑडीट, बाद में स्क्रुटिनी, आपने हेंडल किया होगा. आप की फाईल्स में कुछ डेटा…?" बिस्वाने खडा टाकून पाहिला.

"बघतो मी, पण शक्यता कमी आहे. त्याला पाहिजे तसा तर नक्कीच नसणार." बिद्रीकरांनी असे खंडीभर बिस्वे पाहिले होते. त्यांनी सहज झुकांडी दिली.

बिस्वाचा चेहेरा अजूनच काळवंडला. आतापर्यंत त्याच्या शर्टावर घामाचे उभे उभे पट्टे आले होते.

"अरे बिस्वा, सोपं आहे काम तसं. बान सिस्टिम आहे, त्यात डेटा आहे. कुठल्यातरी जुन्या माणसाला विचारून घे कसा काढायचा डेटा. तेव्हा स्टॉक कोण बघायचं?"

"वही तो. वो संकपाल देखता था. आप को तो पता ही है…”

तीन वर्षांपूर्वी संकपाळला कंपनीने नारळ दिला होता. आर्थिक मंदीमध्ये लेऑफ करायची आज्ञा परदेशातल्या बापांकडून आली होती. शॉपफ्लोरला बरेच लेऑफ झाले. युनियनला कुरवाळण्यासाठी 'लेऑफ सगळ्या डिपार्ट्मेंटसमध्ये केले' असली दाखवेगिरी करणं भाग होतं. अकाउंट्समध्ये स्टाफ लेव्हलला संकपाळचा बळी पडला.

वास्तविक पाहता संकपाळ गरीब माणूस. ना मॅनेजमेंटची हुजरेगिरी, ना युनियनशी संधान. त्याला हाकलून कुणाच्याच पायावर पाय पडणार नव्हता. आदर्श बळीचा बकरा. घरातला एकुलता कमावता माणूस, आडनिड्या वयातली मुलं. संकपाळने पुष्कळ मनधरणी करून पाहिली. पण बिस्वा ठाम राहिला.

पुढे काय झालं कळलं नाही, पण दोनतीन महिन्यांनंतर संकपाळतर्फे वकिलाची नोटीस आली. लेबर लॉखाली संकपाळने काना ऑटोकॉम्पला कोर्टात खेचलं होतं. बिस्वा विकट हसला. काना ऑटोकॉम्प पन्नास कोटी विरुद्ध संकपाळ कारकून, बेकार. बिस्वाने शांतपणे नोटीस पंचपोर वकिलांकडे पाठवून दिली, आणि विषय डोक्यातून झटकून टाकला. सूरज पे मूतना चाहता है साला.

बिद्रीकरांच्या झटकन लक्षात आलं. प्रॅक्टिसमध्ये त्यांचे केस पिकायला लागूनही आता दहा वर्षं झाली होती. शेवटी सगळा इगोचा खेळ होता. बिस्वाच्या आणि थोरव्यांच्या.

"संकपाळ? ते कसं जमायचं तुम्हांला? सोड ते." बिद्रीकर धूर्तपणे म्हणाले. "मी एक करू शकतो. माझ्याकडे त्या वर्षाचे क्रेडिटर्सचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, ते पाठवून देतो. सप्लायर्सकडून त्या वर्षाचं स्टेटमेंट मागवून घ्या. त्यावरून कंझंप्शन काढू आपण."

बिस्वाच्या घशात चहा अडकला. बूढा सठिया गया है.

"पगला गये क्या सर? सप्लायर भोसडीके पिछले महिने के रिको में हग देते है... सात साल पुराना स्टेटमेंट किसकी गांड से निकालेंगे?"

बिद्रीकरांना आतून हसू फुटत होतं. शिव्यागाळी करणारा बिस्वा म्हणजे टेकीला आलेला, अगतिक बिस्वा.

"सप्लायरकडे तुला जायचं नाही. संकपाळचं-तुमचं जमायचं नाही. कसं करायचं मग?"

बिस्वा गप्प राहिला. त्याच्या डोक्यातली चक्रं गरागरा फिरत होती.

"चहा घेऊया अजून एक-एक? आप्पा..." कँटीनवाल्याला दोन बोटं उंचावत बिद्रीकर म्हणाले. "डेटा द्यायचा, फाईल फुगवायची, विषय खलास."

… and after making or causing to be made such inquiry as he deems necessary …

आठवडा तसाच गेला. बिद्रीकर थंड होते. बिस्वा शेवटी शरण येणार याची त्यांना खात्री होती. पण खच्ची झालेला बिस्वा स्वतःहून आलेला त्यांना हवा होता. त्याला पराभूत करण्यात मजा नव्हती. त्याने रुमालात हात बांधून येण्यात मजा होती.

तसा तो आलाच. स्वतःच्या पायांनी.

"वो थोरवे का कुछ मॅनेजमेंट कर सकते क्या?"

"बिस्वा... तूच स्वतः प्रयत्न केलास की."

"आप जैसे सीनियर ने बोला तो अलग रहता है..."

"काही होणार नाही."

"फिर भी कुछ..."

बिद्रीकरांनी कपाळ चिवडलं. म्हणजे ’डोक्याला कल्हई करू नकोस’. बिस्वा वरमला.

"डेटाचं काय?"

"एक रिक्वेस्ट थी."

"बोल."

"आप संकपाल को जानते थे ना?"

"कानामध्ये होता तेव्हा काम पडायचं. आता कुठे असतो काय माहीत." बिद्रीकर सावधपणे म्हणाले.

"एक रिक्वेस्ट थी." बिस्वा परत म्हणाला. बिद्रीकरांना हसू यायला लागलं होतं. "संकपाल को यहां बिठा के उससे काम करवा के ले सकोगे क्या?"

"इथे? माझ्या ऑफिसात?" बिद्रीकरांना आश्चर्य वाटलं.

"हां, वो फोरेटसिक्स मंगवाता इधर. डेटा निकलेगा तो सीधा आप चेक कर पाओगे." पडेल आवाजात बिस्वा म्हणाला. "दूसरा ऑप्सन नहीं दिखता मुझे."

"येईल का इथे?"

" आयेगा तो यहीं आयेगा. फेक्टरी में नहीं. आप वो लोगों को नहीं जानते. आप बात कर के देखो ना. उस के वकील से नंबर लाया मैं." एक चिठ्ठी पुढे सरकावत बिस्वा म्हणाला.

"अरे तो फुकट थोडीच करणारे?"

"कंपनी पांच लाख तक देने को तैयार हैं..." बजेटमधले पैसे सोडताना बिस्वाच्या हृदयाला घरं पडत होती.

"पाच लाख? बिस्वा, खुळा की काय तू? पाच दिवसांचंपण काम नाही हे. पाच तासांचंपण नाही जेमतेम."

"क्या करें सर, मजबूरी है..."

"अरे, पण मजबूरी असल्याचं त्याला थोडीच माहीत आहे? पाच हजारातपण आनंदाने करून देईल तो."

"सर, काना में एक चीज मैंने सीखी है. सब के कान बडे लंबे होते है. सब का नेटवर्क भोत तगडा रहताए. पांच का दस लाख ना हो जाए उतना देखिएगा..."

बिस्वा निघून गेल्यावर बिद्रीकर खदखदून हसले आणि एक फोन नंबर डायल केला. तो त्या चिठ्ठीवरचा नव्हता.

… pass such order thereon as the circumstances of the case justify …

’मे. काना ऑटोकॉम्प प्रा. लि.
सबमिशन इन रिस्पॉन्स टू नोटीस अंडर सेक्शन २६३(१)
व्हॉल्यूम १ ऑफ ३’
.
.
.
’व्हॉल्यूम २ ऑफ ३’
.
.
.
’व्हॉल्यूम ३ ऑफ ३’

कापडी बांधणीतले तीन जाड ठोकळे थोरव्यांच्या ऑफिसपर्यंत उचलून आणायला बिद्रीकरांची दोन आर्टिकल पोरं आली होती. त्यांनी टपालमध्ये सबमिशन फाईल करून विलासकडून जांभळे शिक्के मिळवल्यावर बिस्वाच्या चेहेर्‍यावर वंशाला दिवा मिळाल्याचा आनंद होता.

"अब शान से मिलेंगे साब को!" विलासच्या हाती आपलं कार्ड देत तो टेचात म्हणाला. बिस्वाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी की काय कोण जाणे, विलासही आज कोरे कपडे घालून आला होता. "क्यों विलास, जनमदिन है आज या शादी तय हो गयी?"

विलास मख्ख चेहेर्‍याने कार्ड घेऊन आत गेला.

"कैसे कैसे लोग होते है यार. बिद्रीकर साब, आदमी मुस्कुराता होना चैये. आंधी हो, तूफां हो, दिन हो के रात रहे..." बिस्वा फुल फॉर्मात होता. घामही कमीच होता.

"थंड घे बिस्वा. अजून क्लीन ऑर्डर मिळाली नाहीये. साहेबांना भेटायचंय अजून..." बिद्रीकरांनी सावध केलं.

"आप समझते नहीं सर. हम ने अब अपनी पावर में था ओ सब किया. अब अॅडिसन हो भी गया तो अपने उपर कोई ब्लेम नहीं..." ’कव्हर युवर अॅस’ पंथाचा पाईक बिस्वा म्हणाला.

"पैसे दिले संकपाळला?"

"हां, अढाई लाख आपने एडवांस दिया वो, बाकी अढाई सेटल किए आज सुबह."

"ते बरं केलंस. धंदे में किसी का हक नहीं मारते."

"संकपाल का लडका बडा तेज है. अॅडवान्स लेने का उसका आयड्या था."

"पुढची पिढी आहे बाबा. भेटलास का त्याला?"

"फोन पे बात किया."

"काय करतो तो? हुषार आहे तर कानामध्ये घेतोस त्याला?" बिद्रीकरांनी पिन मारली.

"क्या मजाक कर रै आप, सर?" बिस्वा जीभ चावत म्हणाला. "सुना ओ किसी सरकारी ओफिस में काँट्रॅक्ट बेसिस पे काम करता है."

दार उघडून विलास बाहेर डोकावला. "बोलावलंय..."

आत्मविश्वास तगडा असूनही बिस्वाच्या काळजाचा एक ठोका चुकला.

… including an order enhancing or modifying the assessment, or cancelling the assessment and directing a fresh assessment.

आत थोरवे तो सबमिशनचा जाडजूड ग्रंथराज हाताळत होते. विलास नेहेमीप्रमाणे कोपर्‍यातल्या खुर्चीत होता. असून नसल्यासारखा.

"गुड मॉर्निंग सर!" बिस्वा स्मार्टपणे म्हणाला. थोरव्यांनी बारीकशा स्मितहास्याने त्याला उपकृत केलं. बिद्रीकर नेहेमीप्रमाणे त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले.

थोरव्यांनी पहिला व्हॉल्यूम जेमतेम चाळल्यासारखं केलं. दुसर्‍याचं मुखपृष्ठ उघडून पाहिलं. तिसर्‍याला तर हातही लावला नाही.

"ठीक आहे. पाहतो मी." निरोपदर्शक मान हलवत थोरवे म्हणाले. बिद्रीकरांनी उठायच्या हालचाली सुरू केल्या.

झालं? दॅट्स इट? बिस्वाचा विश्वास बसेना. "सर, इफ यू डोंट माईंड ... कुछ इंडिकेसन?"

"अडजोर्न्ड सायने डाय." थोरवे पोपच्या थाटात म्हणाले.

बिस्वाला काहीच टोटल लागली नाही. तो अगतिकपणे बिद्रीकरांकडे बघायला लागला.

"अडजोर्न्ड अन्टिल फर्दर नोटिस." बिद्रीकरांनी लॅटिनचा खुलासा केला.

"विच यू मे नॉट रीसीव." थोरवे हसत म्हणाले. "इन्फॉर्मली, मिस्टर बिस्वा, आय कॅन टेल यू दॅट द केस इज क्लोज्ड!"

वातावरणातला तणाव एकदम सैलावला. कुठल्याही क्षणी बिस्वा उठून नाचायला लागेल असं बिद्रीकरांना वाटलं. या घामट प्राण्याला इतकं फ्रेश हसताना त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं.

"थँक्यू सर, थँक्यू सो मच! इट वॉज अ प्लेझर मीटिंग यू, सर." बिस्वा उठला. पाठोपाठ बिद्रीकर.

बिस्वाने केबिनचं दार उघडलं, इतक्यात मागून आवाज आला.

"बिद्रीकर!"

"येस सर!"

"त्या व्होरा ज्वेलर्सच्या मॅटरबद्दल..."

"ओह… येस सर!" दारात घुटमळलेल्या बिस्वाला उद्देशून ते म्हणाले. "तू हो पुढे."

"जी सर. नीचे रुकता मैं." बिस्वा निघून गेला.

बिद्रीकर आपल्या खुर्चीत परतले. बिस्वासमोर कधी न केलेली गोष्ट त्यांनी केली - आपल्या खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम टिपला. आणि थोरव्यांकडे बघून हसले. थोरवेही हसत होते. आवाज न करता. हे सामंजस्याचं हसू होतं. कृतकृत्यतेचं हसू होतं. विश्वासाचं हसू होतं.

विलास खिडकीबाहेर बघत होता. बाहेर बिस्वा दिसत होता. इन्कम टॅक्स ऑफीसच्या आवारातल्या बागेत एका कट्ट्यावर तो बसला. खिशातून ब्लॅकबेरी काढून त्यावर जोरजोरात काहीतरी टाईप करायला लागला. बहुदा आज मिळवलेल्या विजयाची बातमी चेअरमनला कळवत असावा. श्रेय दाबायची सुवर्णसंधी. आता तो याचा व्यवस्थित ढोल बडवणार होता. पार परदेशी बापांपर्यंत. हाऊ आय मॅनेज्ड इंडियन इन्कम टॅक्स कॉट्रोव्हर्सी. ऐका हो ऐका. देवकीशरण बिस्वा द मॅन मॅनेजर. युवर्स इज रेड, माईन इज ब्राऊन, बट अ शायनी शायनी ब्राऊन.

विलासने हसून पडदा सारला, आणि कडेच्या पिशवीतून पेढ्यांचा बॉक्स काढला. बिद्रीकरांच्या समोर धरला.

"सरांना दे आधी. असं काय करतोस, पाया पड त्यांच्या." बिद्रीकरांनी दटावलं.

"नाही नाही, हा मान तुमचा आहे. तुमच्याशिवाय शक्य नसतं झालं हे." थोरवे म्हणाले.

"खरं तर पहिला पेढा तुला, विलास." त्याला पेढा भरवत बिद्रीकर म्हणाले. "आयुष्यमान भव. स्वामी समर्थ!" पाया पडलेल्या विलासला आशीर्वाद देत ते म्हणाले, "बिस्वा कौतुक करत होता तुझं. लडका तेज आहे, म्हणाला. मी म्हटलं, देतोस का नोकरी कानामध्ये ... हा हा हा!"
थोरवे गडगडाटी हसले. "जातोस तिथे?"

विलासच्या चेहर्‍यावरचं स्मित क्षणात लोपलं. "सर, त्या गटारात पाऊलही ठेवणार नाही असं ठरवलंय मी."

"ओहो… भीष्मप्रतिज्ञा!"

"बिद्रीकर, तुम्हांला माहितीय का, या भीष्मप्रतिज्ञेमुळेच मला हा सगळा प्रकार कळला." थोरवे म्हणाले. "एक नोटीस होती, याला म्हटलं, जा कानाला सर्व्ह करून ये; तर म्हणाला, सर, आगीवरून चालेन, पण तिथे जाणार नाही. म्हटलं काहून, राजा? तर ही कहाणी."

"पैशाचं काय करणारेस?" बिद्रीकरांनी विचारलं.

"शिकणाराय. भावालाही शिकवणाराय." विलास म्हणाला. "यंदा यूपीएस्सीला बसतोय."

"आयएएस हो, माझा बॉस म्हणून ये." थोरव्यांनी आशीर्वाद दिला.

"वडील फारसे बोलत नाहीत रे तुझे. माझ्या ऑफिसमध्ये होते दोन दिवस, तर जेमतेम सगळी मिळून दहा वाक्यं बोलले असतील."

"यानेच नुकसान झालं त्यांचं सर. ते थोडे बोलके असते, जरा युनियनच्या जवळ राहिले असते, तर हा दिवस आला नसता." विलास म्हणाला.

"असो. येतो मी आता." बिद्रीकर बागेतल्या बिस्वाकडे हात करत म्हणाले, "अन्नदात्यांना ताटकळवणं योग्य नाही. पुन्हा आज त्याचा दिवस आहे! कंपनीवरचं मोठ्ठं गंडांतर टाळलंय त्याने. मॅरियटलाच नेतोय आज बहुतेक."

"सर, या सबमिशनचं काय करायचं?" तीन ठोकळ्यांकडे हात करत विलास म्हणाला.

"रद्दीत घाल, पैसे येतील ते धर्मादाय देऊन टाक. धंदे में किसी का हक नहीं मारते. नको, थांब!" थोरव्यांकडे बघत ते म्हणाले. "जाळूनच टाक सरळ."

"बरं आठवलं," ऑर्डर शीट आणि नोटीसचे तुकडे तुकडे करत थोरवे म्हणाले. "नोटीसची ओरिजिनल असेसी कॉपी बिस्वाकडून घेतलीत ना?"

"हो. आजच सकाळी फाडली." बिद्रीकर म्हणाले. "दोनशे त्रेसष्ठचं असं काही प्रोसिडिंग झालं याची कोणतीही अधिकृत नोंद आता सरकारदप्तरी उरली नाही."

***

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.57143
Your rating: None Average: 4.6 (7 votes)

प्रतिक्रिया

कथेचा शेवट काय असणार आहे, याचा अंदाज बांधता आला होता. पण तरीही शेवटपर्यंत वाचायला मजा आली.
दिवाळी अंकासाठी मेहनत घेणार्‍या सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार.
सर्व ऐसीकर आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथेचा शेवट काय याचा अंदाज (साधारण ७५% वाचल्यावर) आला होता. पण ते कसं घडवणार याबद्दल कुतूहल आणि लेखकाची शैली यामुळे उत्सुकता टिकून राहिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१
अपेक्षित शेवट, पण छान कथा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा आदूबाळ छुपा रुस्तुम निघाला की! मस्त लिहीलीय कथा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उच्च. रफ अंदाज आला असला तरी लै मस्त फुलवली आहे कथा. अ‍ॅज़ दे से, डेव्हिल इज़ इन द डीटेल्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तच आहे गोष्ट. आता ही आदूबाळाला दाद वाटेल की खोड काढणं वाटेल हे मला माहीत नाही, पण मी देते आहे दाद म्हणूनच - मला या शैलीमुळे संतोष शिंत्र्यांच्या 'गुलाबी सिरः पिंक हेडेड डक'ची आठवण झाली. कुरकुरीत, दमदार आणि टू द पाँईंट गोष्ट आहे, तशीच.

या उच्च गोष्टीला साजेसं चित्र नसल्याबद्दल मात्र संपादकांचा घोर निषेध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त जमलीय कथा.
- स्वधर्म

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय वेधक रचना, उत्तम शैली आणि कथनामधील बारकावा ह्यामुळे कथा वाचनीय बनली आहे. आदूबाळांना आयकर विभागाच्या कार्यपद्धतीची आतून चांगलीच माहिती असावी असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली. शैलीही छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झटकेबाज मांडणी अन खटकेबाज संवाद !
शेवट अति-अकल्पित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्कम टॅक्स वर एवढी रंजक कथा म्हणजे क्या बात है! आणि वाक्यांतून क्यारेक्टर खूपच मस्त डोकावतायेत!
मध्यानंतर थोडा अंदाज आलेला, पण शेवटसुधा मस्त लिहिलाय! एक शॉर्ट फिल्म चांगली बनेल ह्यावर- पटकथा तय्यारच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! शेवट काय होणार त्याचा अंदाज आला पण बराच शेवटी आला. तोवर .... Smile
व्यक्तीचित्रण खासच हो आदूबाळ!!
आय अ‍ॅम जॉइनिंग द फॅनक्लब Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त झाली आहे कथा.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कथा आवडली. व्यवसाय क्षेत्र आणि सरकारी हपिसं ही बाहेरून रटा़ळ वाटली तरी सुरस कथांनी भरलेली असतात हे इतर मित्रांकडूनही ऐकलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

झकास!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Sad कथा फारच छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वावा. एकदम झकास कथा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त कथा !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0