'द हेअर विथ अ‍ॅम्बर आईज' - वस्तू, व्यक्ती आणि सृजन यांच्यातलं तलम नातं

दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास ज्यूवंशीयांना जे भोगावं लागलं त्याविषयी पाश्चिमात्य संस्कृतीत इतकी पुस्तकं आणि सिनेमे निर्माण झाले, की त्याविषयी म्हणण्यासारखं नवीन काही आता शिल्लक उरलं आहे का असा प्रश्न पडावा. तरीही ‘द हेअर विथ अ‍ॅम्बर आईज’ या पुस्तकामध्ये लेखक एडमंड द वाल काहीतरी वेगळं करू धजतो आणि त्यात यशस्वीसुद्धा होतो. एका ज्यूवंशीय कुटुंबाची ही कहाणी असली तरी तिची सुरुवात पाश्चात्य संस्कृतीपासून दूर जपानमध्ये होते. लेखकाचा पेशा हे त्यामागचं अप्रत्यक्ष कारण आहे.

एडमंड द वाल हा चिनी मातीच्या कलात्मक वस्तू घडवणारा, म्हणजे सिरॅमिक ह्या माध्यमात काम करणारा कलाकार आहे. याच माध्यमात काम करणारे सुप्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार बर्नार्ड लीच यांचे शिष्य जॉफ्री व्हाइटिंग हे लेखकाचे गुरु होते. बर्नार्ड लीच यांच्या कामावर जपानी शिल्पकलेचा मोठा प्रभाव होता. १९९२ साली लेखक एक वर्ष जपानमध्ये राहिला. तिथे त्यानं जपानी सिरॅमिक्सचा अभ्यास केला आणि बर्नार्ड लीच यांच्यावर एक पुस्तक लिहिण्यासाठी संशोधन केलं. १९४७ पासून लेखकाचे एक काकाआजोबा इगी (Ignace) जपानमध्ये स्थायिक झाले होते. जपानमधल्या आपल्या वास्तव्यादरम्यान लेखक त्यांच्या संपर्कात आला आणि त्यांच्यातला स्नेहबंध दृढ झाला. त्या दरम्यान काकाआजोबांकडच्या एका वेधक संग्रहाशी लेखकाचा परिचय झाला. २६४ नेत्सुकेंचा हा संग्रह पाहायला आणि हाताळायला मिळणं ही सिरॅमिक कुंभकारी शिकणाऱ्या लेखकासाठी एक अनोखी पर्वणी होती.

छोट्या आकाराच्या अनेक गोष्टी निगुतीनं आणि कलात्मकतेनं करण्यात जपान नेहमीच अग्रेसर राहिला आहे. नेत्सुके ही अशीच एक खास जपानी वस्तू आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत पुरुषांच्या किमोनोच्या पट्ट्यामध्ये ती खोवली जात असे. नेत्सुकेंना असणाऱ्या छिद्रांद्वारे विविध उपयोगी वस्तू टांगत्या ठेवत सोबत नेण्याची सोय होत असे. हाताच्या तळव्यावर सहज मावतील असे हे नेत्सुके लाकूड, हस्तिदंत अशा वेगवेगळ्या माध्यमांत बनवले जायचे. त्यांमागे मोठे कष्ट आणि साधना असे.

नेत्सुकेंचे खूप वेगवेगळे प्रकार इगीआजोबांच्या संग्रहात होते. त्यातल्या सशावरून पुस्तकाला नाव मिळालं. या इवल्याशा वस्तू बनवण्यात कित्येक शिल्पकारांनी जणू आपलं सर्वस्व वेचलं होतं. एकमेकांवर चढलेल्या कासवांची ही रचना पाहा :

उंदीर हा नेत्सुके बनवणाऱ्यांचा आवडता विषय होता :

काही नेत्सुके चावटसुद्धा असत :

आणि काही गमतीशीर असत. उदाहरणार्थ पाठीवर चढलेल्या उंदराला पाहून हसणारा माणूस :

आपल्या जपानी प्रियकरासोबत इगीआजोबा जपानमध्ये स्थायिक झाले होते, पण हा नेत्सुकेंचा संग्रह त्यांना जपानमध्ये मिळाला नव्हता; तर उलट त्या संग्रहानं त्यांना जपानमध्ये आणलं होतं. ते कसं हे जाणून घेता घेता आपण इगीआजोबांच्या काकांपर्यंत म्हणजे एकोणिसाव्या शतकातल्या पॅरिसमध्ये पोहोचतो.


Portrait of Charles Ephrussi, Leon Bonnat, 1906.

चार्ल्स एफ्रुसी हे इगीचे काका. ओडेसा या रशियन शहरात जन्मलेला चार्ल्स लहानपणी आपल्या कुटुंबासह युरोपात आला. गव्हाच्या व्यापारातून श्रीमंत झालेलं हे ज्यूवंशीय कुटुंब तिथे स्थायिक झालं. एकोणिसाव्या शतकातल्या पॅरिसचा दिमाख काही वेगळाच होता. पाश्चात्य कलाप्रांताच्या केंद्रस्थानी ते तेव्हा होतं. आणि अशा पॅरिसच्या कलावर्तुळात चार्ल्स कार्यरत होता. तो समीक्षक आणि कलासंग्राहक होता. Gazette des Beaux-Arts या त्या काळातल्या अत्यंत महत्त्वाच्या कलाविषयक नियतकालिकाचा तो संपादक आणि अंशत: मालक होता. इम्प्रेशनिस्ट गटाचा तो एक मोठा हितचिंतक आणि संग्राहक होता. एदगर दगा, एदुआर माने, क्लोद मोने, पिएर-ओग्युस्त रन्वार हे चित्रकार आपल्या उमेदीच्या काळात त्याच्या नित्य बैठकीतले होते. त्याच्या संग्रहातल्या कलाकृती आता जगभरच्या अत्यंत महत्त्वाच्या कलासंग्रहात आहेत. उदाहरणार्थ, १८८० मध्ये त्यानं एदुआर मानेला अ‍ॅस्परॅगसच्या जुडीचं एक चित्र काढायची विनंती केली. मानेनं काढलेलं चित्र त्याला इतकं आवडलं की कबूल केलेल्या ८०० फ्रँकऐवजी त्यानं मानेला १००० फ्रँक देऊ केले. मग मानेनं चार्ल्सला अ‍ॅस्परॅगसच्या एकाच कांद्याचं आणखी एक चित्र ‘एक कांदा मागे राहून गेला’ असं म्हणत बहाल केलं. एका कांद्याचं ते चित्र आज विख्यात ओर्से संग्रहालयात आहे, तर जुडीचं चित्र कलोनमधल्या Wallraf-Richartz-Museum मध्ये आहे.

रन्वारच्या Luncheon of the Boating Party (1880–1881) या सुप्रसिध्द चित्रात पाठमोरा दिसणारा सूट घातलेला पुरुष म्हणजे चार्ल्स असंही मानलं जातं :

चार्ल्सचा वावर फक्त चित्रकारांमध्ये नव्हता. ऑस्कर वाईल्ड आणि फ्रेंच लेखक मार्सेल प्रूस्त यांचा तो चांगला मित्र होता. In Search of Lost Time ह्या मार्सेल प्रूस्तच्या जगप्रसिद्ध कादंबरीतलं चार्ल्स स्वान हे एक महत्त्वाचं पात्र ह्या चार्ल्सवरून अंशत: बेतलेलं आहे असं मानतात.

तर नेत्सुके. एकोणिसाव्या शतकातल्या पॅरिसमध्ये जपानी वस्तू आणि कलाकृती रसिकप्रिय झाल्या होत्या. अनेक चित्रकारांनी आपल्या चित्रांमध्ये होकुसाई, हिरोशिगे किंवा उतामारो या जपानी कलाकारांची शैली वापरली किंवा त्यांच्या मूळ चित्रांच्या प्रतिकृती बनवल्या. उदाहरणार्थ, हिरोशिगेचं मूळ चित्र (डावीकडे) आणि व्हॅन गॉघनं त्याची केलेली नक्कल (उजवीकडे) :

Japonism अशी एक संज्ञाच त्या काळात रुळली होती. या काळात चार्ल्सनं हा नेत्सुकेसंग्रह विकत घेतला. नंतर जगप्रसिद्ध झालेल्या काही चित्रांच्या सोबतीनं काही वर्षं तो त्याच्या खोलीत दिमाखात मिरवत होता. पण हळूहळू दिवस पालटले. ज्यूद्वेष हा युरोपला नवीन नव्हता. पण १८९४ मधल्या द्रेफ्यूस प्रकरणानं त्याला एक जहाल धार आली. ज्यूवंशी असूनही सैन्यात अधिकारपदावर पोचलेल्या द्रेफ्यूसला हेरगिरीच्या आरोपावरून शिक्षा झाली. द्रेफ्यूसच्या (म्हणजे ज्यूवंशीयांच्या) बाजूचे आणि त्याच्या विरोधातले अशी फ्रान्सची विभागणी झाली. एफ्रुसी कुटुंब आणि स्वत: चार्ल्स यांना त्याचा फटका बसला. मार्सेल प्रूस्त किंवा एमिल झोलासारखे लेखक द्रेफ्यूसच्या बाजूनं उभे राहिले, पण रन्वारसारखे अनेक लोक ज्यूविरोधी बनले. पुढे द्रेफ्यूस निर्दोष ठरला, पण तोवर चार्ल्सचा मृत्यू झाला होता.

'द हेअर विथ अ‍ॅम्बर आईज'ची कहाणी मात्र इथे थांबत नाही, तर ती नेत्सुकेसंग्रहाबरोबर पुढे चालू राहते. ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याच्या ऐन भरात असणाऱ्या व्हिएन्नातल्या विख्यात रिंगश्ट्रासवरच्या एफ्रुसी पॅलेसमध्ये आणि इतर काही ठिकाणी घडून ती दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या जपानमध्ये विसावते. व्हिएन्नाच्या विद्यापीठात स्त्रियांना त्या काळात प्रवेश नव्हता. तिथे शिकून पदवी मिळवणारी (कायद्यातली डॉक्टरेट) पहिली महिला आणि विख्यात कवी रेनर मारिआ रिल्केची एक मैत्रीण अशी एलिझाबेथ एफ्रुसी तिथे आपल्याला भेटते. छपाईतंत्राच्या जन्माच्या काळातल्या दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह करून त्यात भान हरपणारा व्हिक्टर एफ्रुसी आपल्याला भेटतो. आणि इतरही पुष्कळ रंगीबेरंगी पात्रं भेटतात.

एफ्रुसी घराण्यातल्या व्यक्ती हा ह्या कथेचा एकमेव केंद्रबिंदू मात्र नाही. हा निव्वळ एका घराण्याचा इतिहासही राहत नाही, तर युरोपच्या इतिहासातला एक महत्त्वाचा काळ त्यात जिवंत होतो.

मार्सेल प्रूस्तनं आपल्या ज्या कादंबरीतलं एक पात्र चार्ल्स एफ्रुसीवर बेतलं होतं ती कादंबरी वेगवेगळ्या संवेदना आणि स्मृती यांमधून साकार होते आणि सर्जनशील लेखकाच्या जडणघडणीच्या प्रवासात आपल्याला सहप्रवासी म्हणून नेते. तसंच काहीसं इथे वस्तूंच्या बाबतीत होतं. नेत्सुके आणि इतर अनेक वस्तू हा काळ आणि त्यातल्या व्यक्ती साकारतात. कोणती वस्तू कोण गोळा करतं, कुणाचं घर आणि खोली कशी सजवली होती, कोणत्या वस्तूशी कुणाचं काय नातं होतं यातून हा प्रवास पुढे जातो. युरोपच्या इतिहासात पुढे जो भयाण काळ वाढून ठेवलेला असतो त्यात ह्या वस्तूंचा अज्ञाताकडचा प्रवास कहाणीच्या आतापर्यंतच्या मनोहर प्रवासाहून वेगळा ठरतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या भंगलेल्या जपानमध्ये तो प्रवास आणखी गहिरा होतो. “What did these small things mean? Why does touch matter? And what survives?” या लेखकाला पडलेल्या सोप्या वाटणाऱ्या पण गहन अशा प्रश्नांची उत्तरं मिळताहेत असं अखेर कधीतरी भासू लागतं. लेखक घडवतो त्या पोर्सलेनमधल्या नाजुक कलाकृती आणि त्याची सर्जनशीलता यांचं जपानी सौंदर्यविचारांशी आणि या सगळ्या अगडबंब इतिहासाशीसुद्धा असलेलं तलम नातं मग आपल्याला हळूहळू कळू लागतं.

आपल्याच कुटुंबाविषयी तटस्थपणे आणि एका गहिर्‍या संवेदनशीलतेनं लिहिणं ही सोपी गोष्ट नाही, पण एडमंड द वाल यांना ती जमली आहे. एफ्रुसी कुटुंबाचा युरोपियन संस्कृतीशी असलेला गाढ संबंध अचंबित करून टाकणारा आहे. इतकं एकरूप होऊनही वेळ येताच त्यांना खड्याप्रमाणे बाजूला सारणारा युरोप आपल्याला अंतर्मुख करतो. त्यामुळे कथनात सहज झिरपू शकली असती अशा कटुतेपलीकडे जाऊन आपली संस्कृती आणि आपल्या वारशाविषयी तलमपणानं लेखक जे मांडतो त्यात तो आपल्या कुटुंबाचाच वारसा चालवतो. एका वेगळ्या अनुभवासाठी हे पुस्तक नक्की वाचावं अशी शिफारस मी करेन.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

परिचय आवडला. त्या काळाच्या पार्श्वभूमीची ओळखही पुस्तक वाचण्याआधी महत्त्वाची. तीही परिचयात नेटकी उतरली आहे. नेत्सुके हा शब्द ne+tsuke म्हणजे root आणि to attach ह्या दोन जपानी शब्दांनी मिळून बनलेला आहे, ही माहिती लेखातल्याच विकीपीडियाच्या दुव्यावर सापडली. आपले कुटुंब, त्यांची दोन देशांत विस्तारलेली मुळं आणि आत्मीयता या संदर्भात असणार्‍या ह्या पुस्तकासंदर्भात हा शब्दशः अर्थही योगायोगाने समर्पक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान परिचय.
फुर्सतीत परततो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वा! पुस्तकाची पार्श्वभुमी व्यवस्थित उतरली आहे. सचित्र लेखनाने अनेक गोष्टी "समोर आल्या".
नेटके, मुद्देसुद आणि प्रभावी लेखन
पुस्तक वाचायला उद्युक्त करणारे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक परिचय. 'वाचायला पाहिजे' या यादीत हे पुस्तक जोडले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0