माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी

नमस्कार मंडळी,

माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती.

त्याचे झाले असे की गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही वर २०१२ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास नक्की कसे निकाल लागतील याविषयीचा ओपिनिअन पोल दाखवला होता.हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी तो कार्यक्रम अर्थातच चुकविला नाही.त्या कार्यक्रमात निवडणुकविषयक प्रश्नांबरोबरच सर्वेक्षणात विचारलेल्या इतर प्रश्नांनाही लोकांनी नक्की कसे प्रतिसाद दिले हे पण दाखविले होते.त्यातच एक प्रश्न होता-- भारताने पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला प्रयत्न करावा का? त्याला ५७% प्रतिसादकर्त्यांनी "नाही" असे उत्तर दिले. पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला महाराष्ट्रातील ८०% प्रतिसादकर्त्यांनी विरोध दर्शविला. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची मोठी झळ मुंबईला लागली आहे त्यामुळे या प्रश्नाला महाराष्ट्रातून नकारात्मक मत येणे समजण्यासारखे आहे.पण उत्तर भारतातील दिल्लीत ६६%,पंजाबात ७२% तर हरियाणात ८०% प्रतिसादकर्त्यांनी पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला पाठिंबा दर्शविला याचे मला आश्चर्य वाटले. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील पंजाबमधून निर्वासित होऊन आलेले हिंदू उत्तर भारतातील याच राज्यांमध्ये स्थायिक झाले होते.तसेच पाकिस्तानात हिंदूंच्या झालेल्या कत्तलींची सर्वात जास्त प्रतिक्रिया उत्तर भारतात विशेषत: आपल्या पंजाबमध्ये (त्यावेळी हरियाणा आणि दिल्ली पण पंजाबमध्येच होते) उमटली होती.या दु:खद घटनांमुळे आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानातून आलेले निर्वासित जास्त उत्तर भारतात स्थायिक झाले असल्यामुळे पाकिस्तानविरोध उत्तर भारतात असेलच असे मला वाटले होते.या घटना अनुभवलेली पिढी आता म्हातारी झाली आहे. त्यातले अनेक लोक कदाचित हे जग सोडूनही गेले असतील/आहेत.तरीही आपल्या आई-वडिलांना/आजी-आजोबांना पाकिस्तानात मिळालेल्या वागणुकीबद्दल नव्या पिढीच्याही मनात प्रचंड राग असेल अशी माझी कल्पना होती.पण ते तितक्या प्रमाणात सत्य दिसत नाही.

या प्रकारावर मी माझ्या फेसबुकवर स्टेटस लिहिले.त्यावर माझा "मग्गू" अडनावाच्या आय.आय.एम मधील मित्राने मला ई-मेल करून काही गोष्टी लिहिल्या."मग्गू" हे "मट्टू" या काश्मीरी अडनावाशी साधर्म्य असलेले अडनाव आणि गोरा रंग यामुळे तो काश्मीरी असावा अशीच माझी बरेच दिवस समजूत होती.पण "मी काश्मीरी नसून पंजाबी आहे" असे त्याने सांगितल्यावर मी त्याला विचारायचे इतर काही प्रश्न विचारणे टाळले होते.पण माझ्या फेसबुक स्टेटसवर पाठविलेल्या ई-मेलमध्ये त्याने लिहिले की त्याचे आजी-आजोबा पश्चिम पंजाबमधील "झांग" मधून दिल्लीला निर्वासित म्हणून आले.तसेच दिल्लीमध्ये आजही पाकिस्तानातील ठिकाणांवरून काही भागांची नावे आहेत.उदाहरणार्थ १९४७ नंतर दिल्लीमध्ये गुजरॉंवाला टाऊन,मियॉंवाली व्हिलेज अशा प्रकारच्या नावांच्या वस्त्या झाल्या.तसेच पश्चिम पंजाबातून १९४७ मध्ये आलेल्या निर्वासितांच्या पुढच्या पिढ्या आजही एकमेकांना त्यांच्या मुळच्या ठिकाणावरून ओळखतात.म्हणजे माझा मित्र मुळचा "झांग" चा म्हणून "झांगी", मुळचे "बन्नू"चे असलेले "बन्नूवाला" म्हणून तर मुळचे लाहोरचे "लाहोरी" म्हणून ओळखले जातात. माझ्या मित्राने एक वाक्य लिहिले: "All of such people who have roots in Pak can't imagine that the people there wud be different." म्हणजेच १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सिरिल रॅडक्लिफने नकाशावर एक रेषा आखली आणि भारत आणि पाकिस्तान हे वेगळे देश झाले तरी आपल्या पंजाबातील आणि त्यांच्या पंजाबातील लोकांची राहणी, जीवनमान, सवयी इत्यादी सारखेच आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील त्या भागातून पाकिस्तानशी मैत्री करायला जास्त पाठिंबा मिळतो असे म्हणायचा माझ्या मित्राचा उद्देश आहे असे वाटते.तसेच माझ्या मित्राने मला "खामोश पानी" हा पाकिस्तानी चित्रपट बघ असेही सांगितले.हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध असल्यामुळे मी तो ताबडतोब बघितला.हा चित्रपट पंजाबी-उर्दूमध्ये असला तरी इंग्रजी सबटायटल असल्यामुळे तो समजायला काही प्रश्न आला नाही.

गोष्ट आहे १९७९ मधील.स्थळ-- पश्चिम पंजाबमधील चरखी हे लहानसे गाव.या गावात आयेशा नावाची एक पापभीरू स्त्री राहत असते. तिला सगळे गाव आयेशा चाची नावाने ओळखत असते.तिचे सगळे विश्व तिचा मुलगा--सलीमभोवती फिरत असते.आपल्या दिवंगत पतीच्या पेन्शनवर आणि गावातील मुलींसाठी कुराणाचे क्लास घेऊन ती आपली गुजराण करत असते.ती स्त्री गावात सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागत असते.पण या स्त्रीविषयी एक गौडबंगाल असते.ती स्वत: विहिरीवर पाणी भरायला कधीच जात नसे तर गावातील इतरांना पाणी भरून आणायला सांगत असे.

एक दिवस गावच्या मुखिया चौधरीच्या घरी लग्न असते.तिथे दोन पाहुणे येतात.त्यांच्या एकंदरीत हावभावावरून, पेहरावावरून आणि दाढीवरून ते मुलतत्ववादी असणार हे लगेच कळते.लवकरच अफगाणिस्तानवर रशिया आक्रमण करणार असून आपल्या भाईबंदांना आपण वाचवायला हवे, जनरल झिया उल हकनी इस्लामी कायदा आणला आहे ही चांगली गोष्ट आहे आणि आपण सगळ्यांनीच मूळच्या इस्लामला अभिप्रेत असलेली जीवनपध्दती अंगिकारायला हवी अशा प्रकारचा प्रचार करायला ते सुरवात करतात.असा प्रचार ऐकून घरी आलेल्या सलीमला त्याच्या आईने-- आयेशाने विचारले--"सब ठिक है?" आणि त्याला सलीमने उत्तर न देता चित्रपटात दाखवलेली शांतता बरेच काही सांगून जाते.पुढे हे दाढीवाले पाहुणे सलीमला रावळपिंडीला "प्रोफेसर साहेबांचे" भाषण ऐकायला घेऊन जातात. "१९४७ मध्ये आपण धर्माच्या नावावर हा देश मिळवला पण ती "पाक" भूमी कुठे आहे?राजकीय नेत्यांनी/टीव्हीने देशाला बिघडवले आहे.आज आपल्या देशात स्त्रिया त्यांचे डोके आणि चेहरा उघडा ठेऊन बाहेर पडूच कशा शकतात?इस्लामचा खरा अर्थ समजून या आणि पुढच्या जगातही काही मिळवायचे असेल तर रशियनांविरूध्द जिहादसाठी पुढे या" अशा स्वरूपाचे विखारी भाषण या प्रोफेसरसाहेबांनी केले.या प्रचाराचा सलीमवर परिणाम होत असलेला दिसतोच.हे भाषण ऐकून भारावलेला सलीम घरी परत येत असतानाच त्याच्या आईने--आयेशाने "केवळ मुस्लिमच जन्नतमध्ये जायला पात्र आहेत असे नाही तर चांगली कृत्ये करणारे सगळेच जन्नतमध्ये जाऊ शकतात" असे क्लासच्या मुलींना सांगणे यातला विरोधाभास दिग्दर्शकाने अगदी प्रभावीपणे दाखविला आहे.तसेच झियांच्या इस्लामी कायदा आणायच्या निर्णयानंतर गावात कसा बदल व्हायला लागला--नमाजाच्या वेळी आपली दुकाने बंद करून मशिदीत नमाजाला जावे असे फर्मावणारे डोके भडकलेले तरूण दिसू लागले आणि यापूर्वी दाढी-मिशा न वाढवणारा सलीमही दाढी ठेऊ लागला यातून सगळ्या वातावरणाचा सलीमवर झालेला परिणाम पण तितक्याच प्रभावीपणे दाखविला आहे.आपला मुलगा धर्मांधांच्या मार्गाला गेलेला बघून आयेशाच्या मनात होत असलेली कालवाकालव बघून खरोखरच वाईट वाटते.तसेच "लव्ह मॅरेज" ही आपली संस्कृती नाही या पाहुण्यांच्या सांगण्यामुळे सलीम झुबेदाला टाळायला लागला आणि ते दु:ख झुबेदाच्या डोळ्यात दिसते आणि नकळत आपल्यालाही वाईट वाटते.

यानंतर आयेशाच्या आयुष्यात एक वादळ येते.भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक करार होतो आणि या कराराप्रमाणे काही शीख तीर्थयात्रींना पाकिस्तानातील त्यांच्या देवस्थानांना जायची परवानगी मिळते.१९४७ मध्ये मुसलमानांकडून नासविले जाऊ नये म्हणून अनेक शीख कुटुंबांमध्ये वडिलांनी आपल्या मुलींना, पतींनी आपल्या पत्नींना आणि भावांनी आपल्या बहिणींना ठार मारले होते.तसेच अनेक शीख स्त्रियांनी आपल्या शीलाचे रक्षण करण्यासाठी विहिरींमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती (हे तमसमध्ये पण बघायला मिळाले होते).आयत्या वेळी आत्महत्या करू न शकलेल्या काही शीख स्त्रिया गावात अजूनही राहिल्या आहेत अशी वदंता यात्रेकरूंमध्ये आधीच पसरलेली असते.या यात्रेकरूंमध्ये एक जसवंत सिंह नावाचा यात्रेकरू असतो.तो पत्ता काढत आयेशाच्या घरी पोहोचतो आणि मला माझ्या बहिणीला--विरोला भेटायचे आहे असे म्हणतो.आणि आपली आई मुळातली शीख होती हे सलीमलाही कळते.हळूहळू गावातले सगळे आयेशाला टाळू लागतात.मी मुसलमान आहे हे सर्वांसमक्ष आयेशाने जाहिर करावे अशी धर्मांधांची अपेक्षा असते.एकीकडे जसवंत सिंह तिला त्यांच्या वडिलांना प्राण सोडण्यापूर्वी तिला भेटायचे आहे हे सांगत असतो आणि दुसरीकडे आयेशा मी तुमच्याशिवाय माझे आयुष्य नव्याने सुरू केले हे सांगते. यापुढचा जसवंत सिंहला तिने विचारलेला प्रश्न मात्र अनुत्तरीतच करतो. एक तर आपली मुलगी मुसलमान झालेली बघून वडिल "शीख जन्नत" मध्ये जातील का? आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे "वडिल निदान शीख जन्नतमध्ये तरी जातील.पण माझे काय?मी शीख जन्नतमध्ये जाईन की मुस्लिम जन्नतमध्ये"?

चित्रपटात फ्लॅशबॅकमधून कळते की मुसलमानांनी त्यांच्या अंगाला हात लावायच्या आत शीख मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या करावी असा थोडासा दबावच त्यांच्यावर आलेला असतो.आयेशा म्हणजे मुळातली विरो मात्र त्या दबावाला बळी न पडता तिथून पळून जाते.काहीही म्हटले तरी स्वत:चा जीव द्यायला जबरदस्त धाडस लागते आणि ते तिच्यात नसेल तर चित्रपटाचा प्रेक्षक तिला नक्कीच दोष देऊ शकणार नाही.पुढे तिला मुसलमान पळवून नेतात.पण विरोच्या सुदैवाने तिला पळवून नेणारा माणूस चांगला निघतो.तो तिच्याशी लग्न करतो आणि अर्थातच लग्नापूर्वी विरोची आयेशा बनते.तरीही ज्या विहिरीच्या पाण्यात आपला जीव जायची शक्यता होती त्या विहिरीवर पाणी भरायला मात्र ती त्यानंतर कधीच जाऊ शकत नाही.

पण आयेशाच्या आयुष्यात आलेल्या या वादळानंतर तिचे सगळे जीवनच बदलून जाते.आणि शेवटी ती त्याच विहिरीत उडी मारून स्वत:ला संपविते. जे १९४७ मध्ये घडायचे टळले होते तेच १९७९ मध्ये घडते.

चित्रपटात जनरल झिया उल हक यांनी आणलेल्या इस्लामीकरणामुळे कसे दुष्परिणाम झाले हे दाखवायचा एक चांगला प्रयत्न केला आहे.मानवी स्वभावातले विविध कंगोरेही यातून पुढे येतात. मेहबूब नावाचा तेलमालिश करणारा आणि केस कापायचे काम करणारा म्हणून जातो की "काफिरांनी" आपले नक्की काय वाईट केले होते आणि "The question is whom does General Zia Ul Haq represent?" असे प्रश्न विचारतो. सलीमला धर्मांधतेच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करणारी त्याची प्रेयसी झुबेदा असे काही घटक पाकिस्तानी समाजात असतील तर ते आशेचे किरण आहेत असे नक्कीच वाटायला लावते.

चित्रपटाचे चित्रीकरण पाकिस्तानात केले आहे.फाळणीच्या वेळी सामान्यांना जे काही सोसायला लागले त्याबद्दल कोणाही सहृदय माणसाप्रमाणे मलाही खूप वाईट वाटते.त्यातूनही विरो/आयेशा सारख्या स्त्रियांचे नक्की काय झाले असेल?विरोला चांगला नवरा मिळाला पण सगळ्या स्त्रिया तितक्या सुदैवी असतील का?अशा कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत स्त्रियाच दोन्ही बाजूंच्या शिकार बनतात हे सत्य या निमित्ताने परत अधोरेखित होते.

या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय आणि पाकिस्तानी समाजात असलेली काही साम्ये आणि फरकही अगदी ठळकपणे समोर येतात.उदाहरणार्थ लग्नात "तुझी सासू चांगली निघो" अशी शुभेच्छा लग्नमुलीला देणे हा प्रकार आपल्याकडे उघडपणे होत नसला तरी मनातल्या मनात अशा शुभेच्छा नक्कीच दिल्या जात असतील.तर लग्नप्रसंगी "मर्द" आणि "जनाना" पडद्याद्वारे विभक्त करणे हा आपल्याकडे नसलेला प्रकार चित्रपटात बघायला मिळतो.मधूनच एखादी पंजाबी शिवी पण येते.तरीही एक गोष्ट मात्र खटकते आणि ती म्हणजे सलीम आणि झुबेदाचे चुंबनदृश्य. पाकिस्तानी चित्रपटात असे दृश्य बघायला मिळेल अशी अपेक्षा नसल्यामुळे ते धक्कादायक वाटते हे नक्कीच.

हे माझे पहिलेच चित्रपट परिक्षण आहे त्यामुळे ते बरेच विस्कळीत आहे याची खात्री आहे.आणि चित्रपट हा माझा आवडीचा विषय नक्कीच नाही.तरीही फाळणीविषयी (किंबहुना त्यावेळी झालेल्या रक्तपाताविषयी आणि सर्वसामान्यांना ते अमुक एका धर्माचे असल्याच्या "गुन्ह्याबद्दल" जे सोसावे लागले त्याविषयी) मला खूपच दु:ख वाटते.आणि त्यामुळेच चित्रपट परीक्षण या ओळखीच्या नसलेल्या प्रदेशात पाऊल टाकले आहे. सध्या मी इमरान खानचे पाकिस्तानवर लिहिलेले पुस्तकही वाचत आहे.वेळ मिळाल्यास त्याचेही परिक्षण जरूर लिहेन.

field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (4 votes)

प्रतिक्रिया

परीक्षण आवडले. पाकीस्तानी चित्रमालिका बघण्यात आल्या होत्या, पण परदेशी चित्रपट म्हटल्यावर का कोण जाणे कधी पाकीस्तानी चित्रपट जनसामान्यांच्या मनात येत नाही. परीक्षण वाचून हा चित्रपट बघावासा वाटतो आहे.
अवांतरः
जुन्या काळी वाचलेल्या एका कथेची आठवण झाली. सूडापोटी पळवून नेलेल्या हिंदू मुलीचे पुढचे सारे आयुष्य तिला पळवणार्‍या, परंतु त्यानंतर तिच्यावर आत्यंतिक प्रेम करणाय्रा मुस्लिम व्यक्तीची पत्नी म्हणून जाते. संसार, मुलेबाळे होतात. शेवटी तिचा नवरा तिच्यावर केलेल्या अन्यायाच्या टोचणीमुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्या परिवारातल्या एका तरुण मुलीला निसटून जायला मदत करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परीक्षण/ओळख नेटकी झाली आहे. सवडीने पाहण्याच्या यादीत आता या चित्रपटाची भर घालतो.

थोडे अवांतर - इम्रान खानचे पुस्तक म्हणजे 'पाकिस्तान : अ पर्सनल हिस्टरी' का? त्याबद्दलही वाचायला आवडेल. अ‍ॅमेझॉनवर त्यातले पहिले प्रकरण वाचले. पाकिस्तानच्या कल्पनेने जेव्हा स्वातंत्र्यपूर्व भारतात मूळ धरले, तेव्हा बव्हंशी मुस्लिम जग हे युरोपियन अधिपत्याखाली असल्याने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना इक्बालसारख्या अनेकांना अधिक आकर्षक वाटली, हा मुद्दा - पाकिस्तानच्या निर्मितीमागचे सर्वात प्रबळ कारण नसले - तरी पटण्याजोगा वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इम्रान खानचे पुस्तक म्हणजे 'पाकिस्तान : अ पर्सनल हिस्टरी' का?

हो तेच. ते पुस्तक अर्ध्याहून जास्त वाचून झाले आहे.सकाळी-संध्याकाळी ऑफिसात जाता-येता बसमध्ये ते वाचतो. काल पावसामुळे बसमध्ये बरीच पाने वाचून झाली Smile त्या पुस्तकावर नक्कीच लिहायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

परिक्षण आवडले. मी कॉलेजात असताना रात्री दूरदर्शनवर तमस ही भीष्म सहानींची मालिका लागायची.त्या मालिकेचे सर्व भाग मी रात्री जागून बघितले होते. विशेषतः शेवटी शीख स्त्रिया "सत श्री अकाल" म्हणत स्वतःला विहिरीत झोकून देताना बघून अंगावर काटा आला होता.

इम्रानखानच्या पुस्तकाचे परि़क्ष्ण वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

चांगल लिहलय...
शहराजाद बहुतेक पिँजर बद्दल बोलताहेत.
खामोश पानी या चित्रपटाच्या कथेवरुन हा थोडाफार पिँजर २ आहे असे वाटतेय.
बाकी मी एकच पाकिस्तानी चित्रपट पाहिलाय 'खुदा के लिये'. कोणी अजुन पाहीला नसेल तर नक्की पहा फारच छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी चित्रपट पाहिला नसल्याने कथा आधीच समजु नये म्हणून संपूर्ण परिक्षण वाचले नाही. त्यामुळे लेखात चित्रपटाची कथा कितपत दिली आहे कल्पना नाही (मात्र कथा दिली आहे / नाही रसभंग होऊ शकतो / शक्यता नाही वगैरे ची टिप असती तर पुढे वाचायचे की नाही हा निर्णय घेता आला असता)

असो. पहिले काही परिच्छेद आनि वर आलेले प्रतिसाद यांमुळे चित्रपट पाहणार आहेच. उर्वरीत परिक्षण चित्रपट पाहिल्यावर वाचुन, मग प्रतिक्रीया देईन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मात्र कथा दिली आहे / नाही रसभंग होऊ शकतो / शक्यता नाही वगैरे ची टिप असती तर पुढे वाचायचे की नाही हा निर्णय घेता आला असता

हो लेखकाने रसभंग होऊ शकतो ही टिप दिली असती तर बरे झाले असते असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

हा सिनेमा काही वर्षांपूर्वी पाहिला तेव्हा फारच आवडला होता..हे परिक्षण वाचून परत पाहिला.
"आणि शेवटी ती त्याच विहिरीत उडी मारून स्वत:ला संपविते. जे १९४७ मध्ये घडायचे टळले होते तेच १९७९ मध्ये घडते." ही वाक्य जरा स्पॉयलर वाटली ज्यानी का चित्रपट पाहिला नसेल.. त्यांच्यासाठी..
पहिल्यांदा पहाताना मला ती शेवटी इच्छेविरूद्ध भावाबरोबर भारतात जाईल कि काय असं वाटलं...आणि शेवट थोडा अनपेक्षित वाटला होता.
असो..हा काही सस्पेन्स असलेला चित्रपट नाही..त्यामुळे कदाचित ठीक आहे हे स्पष्टपणे देणं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद मंडळी.

चित्रपट परिक्षण हा माझा प्रांत नाही.त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली नव्हती.मी जवळपास चित्रपटाची सगळीच स्टोरी लिहिली आहे. त्याविषयीचे डिस्क्लेमर टाकायला हवे होते. खरे सांगायचे तर मी वर्तमानपत्रातले एकही चित्रपट परिक्षण कधीही वाचलेले नाही आणि अगदी लहानपणापासून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त चित्रपट मी बघितले नसतील (त्यातील २५+ हिलरीच्या आग्रहाखातर). तेव्हा या बाबतीत माझा अनुभव अगदी शून्य. तरीही परिक्षण ते एक डिस्क्लेमर वगळता फार फसलं नाही याचेच समाधान आहे.

परत एकदा धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

चित्रपट नक्कीच बघेन.

फाळणीच्या काळात त्या भागातल्या स्त्रियांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. अनेक शतकं चालत आलेली एक रूढी, परंपरा किंवा मूल्य म्हणून त्यांतल्या अनेक स्त्रियांनी वीरो/आयेशाप्रमाणे नवीन आयुष्य हेच आपलं कर्तव्य आहे असं समजून आपल्या नवीन कुटुंब, धर्माला आपलंसं केलं. दोन्ही देशांमधे अनेक स्त्रिया-पुरूष अशा अडकलेल्या स्त्रियांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असत. त्यांतल्या एका गांधीवादी कार्यकर्तीने (नाव विसरले) अशा स्त्रियांशी बोलून काहींना 'सोडवायला' नकार दिला. एकदा या स्त्रियांवर जबरदस्ती आणि अन्याय झालेला आहे, पण पुन्हा त्यांना त्यांच्या इच्छेविरोधात त्यांच्या घरातून काढून मूळ घरात नेण्याला त्यांचा विरोध होता. (असेही अनेक लोक असतील, पण या बाई महात्मा गांधींच्या खूप संपर्कातल्या, जवळच्या होत्या म्हणून अलिकडेच त्यांच्याबद्दल समजलं.) अनेकांनी हेच काम, स्त्रियांची इच्छा समजूनही सुरूच ठेवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.