अश्वत्थ

‘आई, पिंपळाचं पान कसलं असतं गं ?’ एक दिवशी मुलगा म्हणाला.
‘अरे, ते नाही का असं हार्ट शेपसारखं असतं बघ...’
मी हाताने पिंपळाच्या पानाचा आकार हवेत काढण्याचा प्रयत्न केला.
‘मी नाही पाहिलं कधी ! झाड केवढं असतं ते ? नारळाएवढं ?’
‘अरे नाही रे ! खू S प मोठं असतं ‘
‘म्हणजे ते पारंब्यावालं ? आपण काळम्मावाडी पाहायला गेलो होतो तेव्हा मी त्या गार्डनमध्ये पारंब्यांना धरून लोंबकळलो होतो ते ?’
‘अरे ते वडाचं ! पिंपळाला पारंब्या नसतात.’
‘मला दाखव.’
मी बुचकळ्यात पडले. रोजच्या वावरात असलेल्या शहराच्या या भागात तरी कुठे पिंपळाचं झाड पाहिलेलं मला आठवेना. त्याला पोटात घेण्याइतकी जागा या कॉक्रीटच्या जंगलात शिल्लक कुठे राहिली आहे ?
या प्रसंगाला आठ एक दिवस झाले असतील.
घराच्या दक्षिणेस एक रिकामा प्लॉट आहे. त्या बाजूस कच्चे कुंपण घातले आहे. सकाळी मी दक्षिणेकडची खिडकी उघडली अन काय आश्चर्य ! फिकट पोपटी पार्श्वभूमीवर तांबूस आभा ल्यालेली पिंपळाची दोन डौलदार पाने कुंपणापलीकडून डोकावत होती. मी नवलाने कुंपणाजवळ जाऊन पलीकडे डोकावले. अंगठ्याएवढ्या जाडीचे पिंपळाचे रोप कुंपणाच्या भिंतीच्या तळातून वर झेपावले होते.
त्याची दहाबारा तजेलदार हसरी, आतूनच प्रकाशमान झाल्यासारखी पाने माझ्याकडे निरागसपणे पाहत होती. वाऱ्यावर डुलत होती.


मंत्रमुग्ध होऊन मी पहातच राहिले. मनात आले, ‘अरे, हा कधीपासून पाठराखण करून राहिला आहे ? भिंतीच्या वर येईपर्यंत याचा सुगावाच लागला नाही की !’
मुलगा शाळेतून आल्यावर मी त्याला ती पाने दाखवली. ‘हा बघ पिंपळ !’
‘एवढासा ?’
‘अरे मोठा होईल ना तो !’
‘आई, तो मोठा झाल्यावर आपल्या घरावर मस्त सावली पडेल ना ?’ मुलगा म्हणाला.
‘काढून टाक ते झाड माळी आल्यावर ! मुळ्या घराच्या भिंतीत शिरतील नंतर. कुंपणाची भिंतही मोडेल.’ ‘अहो’ बोलले.
माझा काही जीव होईना ते इवलेसे कौतुक जीवे मारायला.
‘राहूदे, बघू जगलं तर नंतर..’ मी.
‘अगं, नंतर काढता येणार नाही ते, मोठे झाल्यावर.’
‘असू दे.’ मी. मनात, ‘माझा पाठीराखा आहे तो !’
माझ्या लहानपणी, आताची शहरं जेव्हा गावं होती, तेव्हा गल्ली ओलांडून हमरस्त्याला लागले की एखादा तरी पिंपळ नजरेस पडायचा. इतकेच नव्हे तर जुन्या घरांच्या, पडक्या इमारतींच्या कुठल्याही सांदी-कोपऱ्यातून त्याची इवलीशी कोवळी रोपे डोके वर काढून उभी असत. चौकातल्या पिंपळाला ऐसपैस पार बांधलेला असे अन त्याच्या सावलीत येणारे जाणारे घटकाभर विसावत. तिन्हीसांज झाली की त्याच्या कट्ट्यावर गप्पा रंगत.
बालपणापासून पिंपळाच्या झाडाचं मला का कोण जाणे, खूप आकर्षण. विशेषत: नदीकाठी ऐसपैस पाय पसरून खालच्या पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहत बसलेला पिंपळ मला खूप आवडे.

त्याचा तो पानांचा डौलदार पिसारा, ती डेरेदार सावली, सकाळच्या अन संध्याकाळच्या उन्हात चमचम करणारी तजेलदार पाने.. सगळं पाहत रहावसं वाटे. वारा सुटला की ती पाने समुद्राच्या गाजेसारखा घनगंभीर सळसळ आवाज करीत.
आणि काय ती पाने ! चमकदार हिरव्या मुलायम मखमली गालीच्यावरची तांबूस पोपटी शिरांची नाजूक नक्षी. पान हातात घेऊन ती नक्षी पाहता पाहता मी अजून भान विसरते. पिंपळाच्या झाडाखाली पडलेली, दोन्ही तळहातात सुद्धा मावणार नाही इतकी मोठाली पाने गोळा करून आम्ही मुली ती शाळेच्या पुस्तकात ठेवत असू. काही दिवसांनी त्याची सुरेख नाजूक नक्षीदार जाळी तयार होई. अशी की उत्तमातल्या उत्तम वस्त्राची वीणसुद्धा फिकी पडेल. त्या जाळीच्या शिरांना सोनेरी रंग दिल्यावर त्यातून एक अद्भुत अन दिमाखदार सौदर्य उलगडत असे ! कधी त्यावर गणपती, तर कधी गुलाबाचे फुल रंगवत असू. खास खास प्रसंगी या ‘अमूल्य’ भेटी जिवलगांना दिल्या जात. ते उंचच उंच अन भरदार पिसारा ल्यालेले पिंपळाचे झाड एखाद्या पुराणपुरुषासारखे वाटे.
रात्रीच्या वेळी मात्र पिंपळाच्या झाडाखालून कधी एकटे जायचा प्रसंग आला तर राम आठवे. अचानक वरून उडी मारून पिंपळावरचा मुंजा गपकन मानगुटीवर येऊन बसणार असे गल्ली पार करेपर्यंत वाटत राही.

थोड्या कळत्या वयात आल्यावर, संध्याकाळच्या कातरवेळी सुटलेल्या वारयाच्या झुळुकीवर उमटणारी पिंपळाच्या पानाची सळसळती गाज जीवाला विलक्षण हुरहूर लावून जाई. ‘ये, तुझ्या कानात हृदयातलं शल्य सांगतो...’ असं म्हणत ती चमचमणारी पानं जणू खुणावत रहात. सायंकाळच्या गाढ निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी प्रकाशाची झिलई पांघरलेल्या त्या हृदयाकृती पानांवर इवलासा जीव अलगद झुलत सोडून द्यावा, अशी काहीशी उर्मी अंत:करणात उठे.
ज्ञानियाच्या राजाच्या अत्यंत संवेदनशील अन कुशाग्र बुद्धीलासुद्धा मोहिनी पडावी असे काहीतरी या वृक्षामध्ये खरंच आहे ! आणि संसाराच्या तापाने पोळलेल्या गौतमाच्या क्षुब्ध चित्ताला शांती देणारे काहीतरीसुद्धा ! असे म्हणतात की तुळस आणि पिंपळ या दोन वनस्पतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवसा अन रात्रीही ऑक्सीजन बाहेर टाकतात. रात्रीसुद्धा त्याची पाने मलूल नसतात. भक्कम रखवालदारासारखी रात्रभर जागीच असतात. मधूनच सळसळ करत जागेपणाची खूण दाखवत. म्हणूनच की काय त्याला अश्वत्थ म्हणतात. घोड्यासारखा सदैव सावध.
कुंपणालगतचा पिंपळ काही दिवसांनी, १३-१४ व्या वर्षी मुले होतात तसा उंचच उंच झाला. अन खोड मात्र अंगठ्याएवढेच ! परिणाम असा झाला की ते कमरेत वाकून उलट्या U सारखा आकार तयार झाला. अन पाने वटवाघळासारखी उलटी लोंबकळू लागली. मी त्याला दोरी बांधून आधार दिला. आता खोड दिवसेंदिवस जाड होऊ लागले. रोज सकाळी उठल्यावर कौतुकाने त्याची प्रगती न्याहाळायाचा मला छंदच जडला.
एके दिवशी बघितले तर पिंपळ अदृश्य झालेला. मी धास्तावून कुंपणाशी जाऊन पाहिले. पलीकडे चरायला सोडलेल्या म्हशीने त्याची पाने ओढून खोड अर्ध्यातून मोडले होते.
मी चुकचुकले. हळहळ दिवसभर टिकून राहिली. ४-५ दिवस गेले. पुन्हा चार पाने भिंतीपलीकडे हजर ! पिंपळाला नवा फुटवा आलेला. जणू काही झालेच नव्हते. कधी ते मोडलेच नव्हते.
मग मात्र ते तरारून वाढू लागले. पाने एका तळहातात मावणार नाहीत इतकी मोठी झाली.
अन परवा कुसुम आली. कुसुम माझी मावसबहीण. मोठी हुशार अन व्यवहारी. माझ्यासारखी नादिष्ट नव्हे. तिच्या व्यवहारिक हुशारीमुळेच तर भाड्याच्या घरापासून दोन मजली बंगल्यापर्यंत तिच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे. तिने पिंपळ पाहिला.
‘अगं, कशाला ठेवला आहेस तो पिंपळ ? पिंपळाची सावली घरावर पडणे अशुभ असते ! आणि मुळ्या नाही का घरात घुसणार ?’
‘बघ, मी सांगत नव्हतो ?’ अहो.
‘म्हणजे भाऊजींनी सांगूनसुद्धा तू तसंच ठेवलंस या पिंपळाला ? कशी गं तू खुळी ? ‘ कुसुम
आता माझा कॉन्फिडन्स ढासळायला लागला. रविवारी माळ्याला बोलावले अन पिंपळ काढण्याबद्दल विचारले. त्याने पलीकडे जाऊन निरिक्षण केले अन निर्विकारपणे सांगितले ‘कुंपण पाडल्याशिवाय काढायला येणार नाही. नायतर मशीन आणून कापावे लागेल अन मग त्यावर असिड घालावे लागेल. दोन हजार रुपये खर्च येईल.’
यावर उलटसुलट बरीच चर्चा झाली. मनाला क्लेश होत होतेच. पण इलाज नव्हता. मग दोन हजार रु. खर्च करायचे ठरले. पुढच्या रविवारी हा कार्यक्रम करायचा ठरला.
यानंतर दोन दिवसांनी माझा चुलातभाऊ अरविंद एका लग्नासाठी मुंबईहून आला. त्याने पिंपळाचा समाचार ऐकला. तो म्हणाला ‘अगं, शहाणी का खुळी तू ताई ? ते झाड तोडल्यावर शेजारी दुसरे कशावरून येणार नाही ? तू काय राखण करत बसणार आहेस काय ? आणि पलीकडच्या प्लॉटवाल्याला नसेल का त्याची काळजी ? आज न उद्या तो बांधकाम काढीलच की ! तेव्हा तोच टाकेल कापून. तू कशाला टेन्शन घेते आहेस ?’
झालं ! सर्वाना त्याचं म्हणणं पटलं. अन माझ्या पिंपळाला जीवदान मिळालं. मनाच्या एका कोपऱ्यात खुपणारं कुसळ निघून गेलं. अन रोज सकाळी त्या पिंपळाचा समाचार घेणं हे माझं आवडीचं नित्यकर्म झालं.
अजूनही तो पुराणपुरुष माझी पाठराखण करत दक्षिणेला दिमाखात उभा आहे अन दिवसेंदिवस बाळसेदार होत आहे !

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

पिंपळाशी असलेलं तुमचं नातं आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा सहज व्यक्त झाल्या आहेत. लेख आवडला.
तुम्ही लेखाला शीर्षक 'पिंपळ' असं साधसुधं न देता भारदस्त वाटणारा 'अश्वत्थ' शब्द का निवडला असेल याचा विचार करते आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या आधारवत पुराणपुरुषासाठी मला 'पिंपळ' पेक्षा 'अश्वत्थ' शब्द जास्त समर्पक वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सविताताईना पडलेला प्रश्न मलाही स्पर्श करून गेला होताच. पण त्या नामामागे लेखिकेची काहीतरी कौटुंबिक भावना असेल म्हणून थेट काही विचारले नाही. माझ्या वाचनात 'औदुंबर' ला देखील 'अश्वथ' असे कुठेतरी संबोधल्याचे स्मरते...आता नेमके ते संदर्भ आठवत नाहीत. यज्ञात टाकल्या जाणार्‍या समीधेच्या संदर्भातील हे नाम असेल.

बाकी 'पिंपळ' सय मनाला फार भिडली हेही सांगणे अगत्याचे आहे. फार भावूक लेखन आहे...विशेषतः काळम्मावाडीचा उल्लेख भावला....मी फिरलो आहे त्या भागात, बर्‍याचदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

औदुंबराचे माहित नाही पण पिंपळाला संस्कृतातल्या अनेक श्लोकात अश्वत्थ म्हटले आहे हे नक्की! Smile
हिंदीतही अश्वत्थ म्हणजे पिंपळच इथे बघा

बाकी अश्वत्थ हा यज्ञवृक्षांमध्येही येतो (ज्याचा आहुतीत उपयोग होत असे).. याच यज्ञवृक्षाच्या कॅटेगरीत औदुंबर देखील येतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्नेहांकिता पिंपळाशी माझ्या आयुष्यातील अनेक सुखद प्रसंग निगडीत आहेत. लहानपणी कित्येकदा अंगणातील पिंपळावर चढून अभ्यास करायचो. पिंपळाच्या सान्निध्यात खूप उत्साही वाटायचे.

अवांतरः २४ तास ऑक्सिजन प्रसवणारा पिंपळ हा एकमेव (ज्ञात) वृक्ष आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकटन आवटले.
घाइत इतकेच.
पिंपळावरचा मुंजा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लेख.

आमच्या लहानपणी चाळीच्या भिंतीभिंतीतून पिंपळ डोकावत असे. पिंपळाचं अगदी कोवळं पान - म्हणजे इंचभर लांब सुरनळी असते. ती जिभेवर विशिष्ट पद्धतीने जिभेवर ठेवून हवा खेचली की त्यातून सुईं, सुईं अशी शिट्टी वाजत असे. ते आठवलं.

पूर्ण जाळी पडलेलं पान म्हणजे पर्वणीच असायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वड-पिंपळ या झाडांचं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे पक्षांना अन्न पुरवणे. वड, पिंपळ आदी भरगच्च व शिवाय फळे देणार्‍या झाडांवर अनेक पक्ष्यांचे वास्तव्य असते - असे.
चिमण्या धीटाईने वळचणीत राहु लागल्या, कावळ्यांना भरगच्च झाडांची, उदरभरणासाठी ताज्या फळांची फारशी गरज नसते तर कबुतरांनी माणसाच वापरून घेतले असल्याने Wink हे तीन पक्षी शहरात मोठ्या प्रमाणात टिकून राहिले (आता चिमण्याही कमी होत आहेत म्हणा)

मात्र हळद्या, नाचण, निकेलचा फुलटोच्या, शिंपी, दयाळ, मैना, तांबट (शिवाय मुंबईतल्या तिवरांत पूर्वी वारंवार आढळणारे खंड्या, बगळे, करकोचे, बदके) आदी पक्षांना आपला बिस्तरा शहरांतून उचलावा लागला आहे. अजूनही अगदी शहरातही जिथे वड-पिंपळ किंवा उंबराचे जुने झाड असते असतो तिथे तांबट, नाचण, हळद्या सहज दिसून जातो.

तुमच्या घराजवळ पिंपळ अजून वाढला, त्याला फळे येऊ लागली की या पक्षी वैभवाचा - सानिध्याचा आनंद तुम्हाला घेता येईल (येवो - तोपर्यंत झाड टिको- अशी सदिच्छा!)

बाकी, लेखन आवडले हेवेसांन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला
आमच्या टाँवरमधे हा पिँपळ अजूनही दिमाखात ऊभा आहे
धार्मिक श्रध्दा भीतीने कदाचित त्याला तोडायला हात धजावत नसतील
बाकीची झाड एवढी सुदैवी नव्हती
धार्मिकतेचा असाही फायदा म्हणायचा

घासकडवीँच्या जाळीदार पानाच्या मताशी सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

कितना कूड़ा करता हैं पीपल आँगन में ..
मानो दिन में दो-दो बार बुहारी फेरनी पड़ती हैं |
कैसे कैसे दोस्त-यार आते हैं इसके - खाने को ये पीपलियाँ देता हैं |
सारा दिन शाखों पे बैठे तोते , गु-गू - आधा खाते, आधा ज़ाया करते हैं,
गिटक-विटक सब आँगन ही में फ़ेंक के जाते हैं,
कितना कूड़ा करता हैं पीपल आँगन में .. !

एक डाल पर चिड़ियों ने भी घर बांधे हैं,
तिनके उड़ते रहते हैं आँगन में |
एक गिलहरी, भोर से ले कर सांझ तलक जाने क्या उझलत रहती हैं,
दौड़-दौड़ कर दसियों बार ही सारी शाखें घूम आती हैं |
चील कभी ऊपर की डारी पर बैठी बौराई सी
अपने आप से बातें करती रहती हैं |

आस पड़ोस से झपटी-लूटी हड्डी-मांस की बोटी भी
कंबख्त ये कौवे, पीपल ही की डाल पे बैठ के खाते हैं ...
उपरसे कहता हैं, " पीपल पक्का ब्राह्मण हैं ! "

हश-हश करती हैं माँ तो यह मांसखोर सब,
काँय-काँय उसपर फ़ेंक के उड़ जाते हैं
फिर भी जाने क्यों माँ कहती हैं
" ओ कागा, मेरे श्राद्ध पे आईयो तो, अवश्य आईयो...
अवश्य आईयो कागा तुम |"

- गुलज़ार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह, क्या बात है..
धन्यवाद अमुकभौ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.. लेख संपतासंपता आपसूकच बोरकरांच्या ओळी आठवल्या

कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी

कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी

पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ

भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे

व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है! कित्ती दिवसांनी कविता वाचली ही!
या लेखामुळे दोन उत्तमोत्तम कविता वाचायला मिळाल्या यातच धागा वसूल! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कवितेबद्दल धन्यु देवानु Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेख! सुंदर प्रतिसाद!

लहानपणी पिंपळाच्या पानाची घडी घालून कपाळावर ठेवून दुसर्‍या हाताने मारून चपटी करून पिपाणी करायचो ते आठवले.
वहीतली जाळीदार पिंपळपाने गेल्या कित्येक वर्षांमध्ये दिसली नाहीयेत हे आठवले.
लहानपणी जिथेतिथे दिसणारा पिंपळ बरेच दिवस झाले भेटलेला नाहीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार.
'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट', तसे, लेखापेक्षाही प्रतिसाद अव्वल मिळालेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय सुरेख लेख आहे. अमुक यांनी दिलेली गुलजार यांची कविताही फार आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0