लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे

'व्यक्तीने परिवारासाठी, परिवाराने गावासाठी आणि गावाने देशासाठी त्यागाची तयारी ठेवावी '- आचार्य चाणक्य .

अर्थशास्त्रात देशहितासाठी त्याग हे सूत्र चाणक्य वरील शब्दांमध्ये सूत्रबद्ध करतात. त्यांच्या या सूत्राचा प्रत्यय देणारे तीन ठळक प्रसंग भारताच्या इतिहासात येतात.

२१ जून १५७६:वेळ माध्यान्हिची तरी सुर्यनारायणच्या उष्म्यापेक्षा मोगल तोफांचा मारा राजपुतांना जास्त ताप देत होता. हळदी घाटाच्या मध्ये मोगल आणि मेवाड यांच्या झुंजीत मोगलांचे पारडे जड होऊ लागले होते. आधीच एकास पाच अशी विषम लढत आणि त्यात मुघलांच्या तोफा राजपुतांना जाळत होत्या. या सगळ्या अडचणींची महाराणा प्रतापाला जाणीव नव्हती? होती पूर्ण जाणीव होती. आपल्याकडे तोफा नाहीत आणि उघड मैदानात मुघलांचे संख्याबळ आपल्यावर भारी पडणार याची महाराणांना पुरेपूर जाणीव होती म्हणून तर त्यांनी मुघल सेनापती मानसिगाला हळदी घाटीच्या खिंडीपर्यंत झुलवून आणला होता. पण तरीही हा सामना अवघडच होता. राणा प्रतापांकडे निर्णायक विजय मिळवण्यासाठी एकच पर्याय शिल्लक होता -मुघल सेनापतीचा मृत्यू.
सेनापती पडला कि सैन्य हि पळते हा प्रकार त्यावेळी काही नवीन नव्हता . महाराणांनी युद्धाचा रंग ओळखला त्याच बरोबर मुघलांच्या सैन्यातला कमकुवत दुवा हि ओळखला . मानसिंग हत्तीवरून लढत होता कारण हत्ती म्हणजे जणू चालता फिरता बुरुजच .हे बघतच महाराणांनी एक धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या अंगरक्षक दलासह महाराणा स्वतः मानसिंगावर चालून गेले. महाराणांच्या रक्षकांनी त्यांना मानसिंगावर धावून जाण्यासाठी शक्य तितका मार्ग मोकळा केला तोही अर्थात कापाकापी करूनच. स्वतः महाराणा वाटेत आडवा येणाऱ्याला कायमचा आडवा करून मानसिंगाच्या हत्तीपर्यंत पोहचले . महाराणांच्या एकाच इशार्यावर त्यांच्या लाडक्या चेतकने आपले पुढचे पाय उचलून हत्तीच्या सोंडेवर रोवले . तितक्यातच महाराणांनी हातात भाला पेलला आणि क्षणार्धात मानसिंगावर फेकला. पण येथे राणाजींचे दुर्दैव माहुताच्या रुपात आडवे आले आणि मानसिंग बचावला. राणाजींचा धाडसी बेत त्यांच्यावरच उलटला.राणाजी मुघलांच्या गराड्यात सापडले.राणाजींना मुघलांनी पाहताच त्यांच्या झाला सरदारांपैकी मन्नासिंह त्यांना वाचवण्यासाठी सरसावले. राणाजींभोवती पडलेले मुघलांचे कडे तोडत मन्नासिंह त्यांच्यापर्यंत पोहचले. राणाजींजवळ जात त्यांनी राणाजींच्या डोक्यावरील मेवाडचा मुकुट काढला व राणाजींना इतर रक्षकांबरोबर बाहेर पडण्यास सांगितले. क्षणभर राणाजी चिडले, मेवाडच्या त्या पुरुषसिंहाला माघार घेणे मान्य नव्हते.पण मन्नासिंहाने राणाजींना समजावले कि आत्ता माघार घेतली नाही तर त्यांच्या रूपाने मेवाडचा सम्मान मुघलांच्या हाती सापडेल.राणाजींना माघार घेण्यासाठी रस्ता बनवतच मन्नासिंहाने मेवाडचा मुकुट शिरावर धारण केला. युद्धाच्या गदारोळात मोगल राणाजींच्या मुकुटामुळे मन्नासिंहावर चालून आले. राणाजीं सुखरूप माघार घेता यावी म्हणून मन्नासिंहही मुघलांवर त्वेषाने तुटून पडले.मार्तंडभैरव बनत माथ्यावरील मुकुटालासाजेसा साजेसा पराक्रम गाजवत मन्नासिंह धारातीर्थी पडले ते मेवाडसाठी, महाराणांसाठी, मायभूसाठी.

१२ जुलै १६६०: शिवाजी महाराज शरण येणार ही बातमी कळल्याने सिद्दी जौहरची छावणी सुस्तावली पण त्याचे नजरबाज नाही. अशाच काही नजरबाजांच्या नजरेत काही मावळे वेढ्यातून बाहेर पडताना दिसले. हि खबर जौहरला सांगण्यासाठी त्यांनी लगेच छावणीच्या दिशेने धाव घेतली. गडबडीत एक गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटली कि मावळे एक नव्हे तर दोन पालख्या सोबत घेवून धावत होते . आपल्याला सिद्दीच्या हेरांनी पाहिले हि गोष्ट मावळ्यांनी ताडली . त्यासाठी तर पन्हाळ्यावरून निघताना दोन पालख्या आणि दोन महाराजांसोबत मावळे निघाले होते. छत्रपतींना जौहरच्या वेढ्याच्या बाबतीतल्या जागरूकतेची पूर्ण माहिती होती आणि वाटेवर कुठे न कुठे जौहरचे हेर आपल्याला पाहतील याचीही त्यांना पूर्ण कल्पना होती . त्यासाठीच दुसऱ्या पालखीची योजना होती , होणारा पाठलाग टाळून सिद्दीची दिशाभूल करण्याची कामगिरी शिवा काशिदांनी उचलली ती महाराजांना विशाळगडाकडे जायला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून . पुढे काय झाले त्याची गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाली आहे. महाराष्ट्राच्या ,सह्याद्रीच्या, जिजाऊ मासाहेबांच्या , स्वराज्याच्या लाडक्या शिवबांकरिता शिवा काशीद , बाजीप्रभू आणि तीनशे मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

२२ डिसेंबर १७०४:चमकौर साहिब ची गढी सुभेदार वजीर खानच्या फौजांनी वेढली होती. सुभेदार वजीर खान खूप आनंदात होता कारण अनेक वर्षांनतर मुघल सेनेला मोठ यश मिळणार होत. कारण चामकौरच्या गढीत अडकले होते दस्तुरखुद्द दशम गुरु श्री गुरु गोविंदसिंगजी. तिकडे महाराष्ट्रात पातशहा औरंगजेबाला मराठ्यांनी त्रस्त करून सोडले होते तर पंजाबात गुरु गोविंदसिंगांच्या नेतृत्वात शिखांनी नवीन आघाडी जोरात उघडून मुघलांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी करून सोडली होती.अशात गुरु गोविंदसिंग हाती लागणे म्हणजे एका ठिकाणी तरी स्वस्थता लाभणार होती. तिकडे गढीच्या आत गुरूंची आपल्या सहकाऱ्यांबरोबर खलबते चालू होती. रात्रीच्या वेळी गुरूंना वेढ्यातून बाहेर तर काढता आले असते पण त्यानंतर त्यांचा पाठलाग झाला असता. अशावेळी भाई जीवनसिंग पुढे आले . भाई जीवनसिंग म्हणजे श्रद्धा, त्याग आणि पराक्रमाचे मूर्तिमंत प्रतिक.भाई जीवनसिंगांची चेहरेपट्टी आणि शरीरयष्टी गुरूंशी मिळतीजुळती होती. त्यांनी गुरूंना रात्री अंधाराचा फायदा घेत निघून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी जीवनसिंगांनी गुरूंचा पोशाख आणि शस्त्रे धारण केली . दोन्ही हातात तलवारी घेऊन भाई जीवनसिंग आपल्यासोबत्यांनिशी सव्वा लाखाच्या मुघलसेनेवर तुटून पडले.मुघलांचा प्रयत्न त्यांना जिवंत पकडून औरंगजेबापुढे हजर करण्याचा होता. पण जीवनसिंगांच्या तलवारीचा तिखटपणा मुघलांना साहवेना. शेवटी दुरूनच गोळ्या आणि बाणांचा वर्षाव केला तेव्हाच रणांगणावरील जीवनसिंग नावाचे वादळ शांत झाले. गुरूंचा पोशाख आणि शिरपेचामुळे गुरु गोविन्दसिंगच पडले असा वजीर खानाचा समज झाला.त्याने जीवनसिंगांचे शीर धडावेगळे करून पातशहाकडे पाठवले . त्यानंतर झालेला घोटाळा औरंगजेबाच्या लक्षात आला. पण तोपर्यंत गुरूंना सुरक्षित ठिकाणी निघून जायला पुरेसा वेळ मिळाला होता. गुरूंचे प्राण वाचवण्यासाठी जीवनसिंगांनी प्राणार्पण केले. गुरुंपर्यंत हि बातमी पोहचली तेव्हा गुरूंनी जीवनसिंगांसाठी 'सवा लाखसे एक लडाउ' हे गौरवोद्गार काढले.

सुमारे सव्वाशे वर्षांच्या कालखंडात घडलेल्या या तीन घटना. जाज्वल्य देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांची अजरामर गाथा सांगणाऱ्या. तिन्ही ठिकाणी एकच सूत्र देशासाठी लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

उदात्त हेतू असलेल्या धन्यासाठी आणि मोठ्या उद्दिष्टासाठी (for the greater cause) आपले बलिदान देणे हे खचितच वंदनीय आहे. __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन आवडले लिहीत राहा ,तीनही थोर व्यक्तींना सलाम !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे'.

म्हणायला छानछान वाटते खरे. विशेषतः त्या लाखांत स्वतःचा समावेश होण्याची सुतराम् शक्यता नसेल, तेव्हा तर निश्चितच. आणि ऐकायला समोर वय वर्षे सुमारे दहा ते सोळासतराचा आणून पकडून ठेवलेला श्रोतृगण असेल तर सोन्याहून पिवळे! (श्रोतृवर्ग 'मनाने तरूण', बोले तो 'मनाने दहा ते सोळासतरा' क्याटेगरीतला असला, तर मग 'आणून पकडून ठेवण्या'ची अट थोडी शिथिल केली, तरी चालते. तो आपसूक आपल्या पायांनी येतो, निमूट बसतो, नि टाळ्याही वाजवतो. तर ते एक असो.)

पण यावर थोडा विचार केला, तर काही प्रश्न पडतात.

(१) लाखांचा पोशिंदा जगवण्याकरिता मारण्यासाठी लाखावरच का थांबायचे? दहा लाख, कोटी किंवा अब्ज का नाही?
(२) लाख मेले आणि फक्त लाखांचा पोशिंदाच जगला, तर मग तो जगणार कोणासाठी नि पोसणार कोणाला? नि मग त्याला ठेवायचा कशासाठी, नि कोणासाठी?
(३) 'पोशिंदा' कोण? दुसर्‍या शब्दांत, कोण कोणाचा पोशिंदा?
(४) 'पोशिंदे' बदलता येत नाहीत काय? म्हणजे, एक पोशिंदा मेला, तर त्याजागी दुसरा जो येतो, त्याला, प्रसंगी वाजवी किंमत देऊन, प्रसंगी त्याच्या कलाने घेऊन, 'पोशिंदा' बनवता येत नाही काय?

चौथा प्रश्न मला वाटते सर्वात महत्त्वाचा आहे. 'वाजवी' किंमत म्हणजे काय नि किती, याच्या उत्तरावर - म्हणजे, 'पोसक्यां'च्या (पोषितांच्या) दृष्टिकोनातून हिशेबावर - सर्व अवलंबून आहे. अन्यथा इतिहासात 'पोशिंदे' बदलतच असतात. राजवटी बदलतात, त्याबरोबर संस्कृतीही बदलतात. 'लाख' कधी जुळवून घेतात, आणि नाही जुळवून घेता आले, तर मारले जातात, नाहीतर देशोधडीस लागतात. ज्यांचे फारसे बिघडत नाही, ते जुळवून घेतात. त्यांना हा 'पोशिंदा' काय नि तो पोशिंदा काय, सारखेच. ज्यांचे बिघडते, ते लढत बसतात, नि जिंकतात, किंवा मरतात. किंवा सटकतात.

पण जुळवून घेणारेही 'लाखां'तलेच असतात, हे महत्त्वाचे. त्यांच्यासाठी हा 'पोशिंदा' जगला काय, नि तो 'पोशिंदा' जगला काय, किंवा हा मेला काय, नि तो मेला काय, काय फरक पडतो? पण हे टिकून राहतात, नि यांच्यामुळे सातत्य राहते, हे काय कमी महत्त्वाचे आहे?

उलटपक्षी, जे जुळवून घेऊ इच्छीत नाहीत, ते सटकले नाहीत, तर लढतात. कशासाठी लढतात? तर येऊ घातलेल्या नव्या (बदली) 'पोशिंद्या'ची किंमत वाजवी वाटत नाही, ती द्यावी लागू नये, म्हणून. म्हणजे शेवटी स्वतःच्याच स्वार्थासाठी. 'पोशिंद्या'साठी नव्हे. 'पोशिंदा' हा निमित्तमात्र.

राणा प्रताप काय, शिवाजीमहाराज काय, किंवा गुरु गोविंदसिंह काय, त्यांच्या थोरवीविषयी काहीही म्हणायचे नाही. तो विषय स्वतंत्र आहे. परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा बळी द्यायला जे 'लाख' तयार झाले, ते ते 'लाखांचे पोशिंदे' होते, म्हणून नव्हे, तर येऊ घातलेल्या पर्यायी 'लाखांच्या पोशिंद्यां'ची किंमत 'वाजवी' वाटण्यासारखी नव्हती, परवडण्यातली नव्हती, किंवा निव्वळ मोजण्याची इच्छा नव्हती, म्हणून, हाही मुद्दा विसरून चालणार नाही.

अन्यथा, इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, फार कशाला, मोगलांच्याही राजवटीशी रयतेने जुळवून घेतलेच की! आणि जुळवून घेतले, म्हणूनच रयत टिकली, नि रयत कशी का होईना, पण टिकली, म्हणूनच तर कसाही का असेना, पण हिंदुस्थान देश टिकून आहे. (नाहीतर 'अमेरिका' - किंवा तत्सम कायसेसे - म्हटले नसते त्या देशास?) नाहीतर लाख टिकले नसते, लाखांचा फक्त पोशिंदा टिकला असता, तर त्याने काय नवी रयत आयात केली असती नि त्या नव्या 'लाखां'चा तो पोशिंदा बनला असता? (म्हणजे, पोशिंद्याने भलत्याच कोणत्यातरी नव्या 'लाखां'चे पोशिंदे व्हावे म्हणून जुन्या 'लाखां'नी जीव गमवायचा?) मुळात 'लाख' गमावून एकट्या पडलेल्या 'पोशिंद्या'स प्रतिपक्षाने तसे करू दिले असते का? की 'लाखां'नंतर हा 'एक लाख एकावा'?

सांगण्याचा मतलब:

- 'लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे', वगैरे सगळे झूट आहे.
- 'लाख' जे लढतात, प्रसंगी जीव गमावतात, ते स्वतःच्या स्वार्थासाठी. स्वतःची जीवनपद्धती जबरदस्तीने बदलावी लागू नये, म्हणून. 'पोशिंद्या'स जगवण्यासाठी नव्हे. पोशिंदा केवळ निमित्तमात्र. किंवा, 'पोशिंदा' ही चालू जीवनपद्धती टिकवण्याची किंमत असते, म्हणून. (या 'स्वार्था'त काही गैर आहे, अशातला भाग नाही. किंवा, 'गैर आहे' असे सांगणारे अनेकदा स्वार्थी असतात, असे मानता यावे.)
- 'पोशिंदा' मेला, तर त्या जागी दुसरा जो कोण येतो, तो 'पोशिंदा' होऊ शकतच नाही, अशातला भाग नेहमीच नसतो. अनेकदा त्याची किंमत वेगळी असते, इतकेच. किमतीतला फरक वाजवी किंवा परवडण्यासारखा आहे की नाही, यावर काय ते सर्व अवलंबून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0