पाँपे - एक धावता दौरा.

काही दिवसांपूर्वी आम्ही दोघांनी रोमची एका आठवडयाची सहल केली. त्यावर आधारित लेखांपैकी हा पहिला. आमच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही रोमच्या दक्षिणेस सुमारे ३०० किमीवर असलेल्या पॉंपेच्या उत्खननास भेट देऊन केली. त्याचे वर्णन ह्या पहिल्या भागात आहे. ह्यानंतर कोलोसियम आणि जवळचे २००० वर्षांचे अवशेष, वॅटिकन सिटी, रोममध्ये पायी फेरफटका आणि अखेरीस ऑस्टिया ऍंटिकाला भेट असे भाग असतील. तेव्हा आता पॉंपेच्या भेटीस सुरुवात करू.

नेपल्सपासून पॉंपे ४० मिनिटांच्या रेल्वे प्रवासावर आहे. नेपल्सहून निघालेली गाडी - तिचे नाव Circumvesuvius - वेसुविअस ज्वालामुखीच्या पायथ्याला लागून गोल वळत पॉंपेला येते आणि तेथून तशीच पुढे जाते. सर्व वेळ वेसुविअस आपली सोबत करीत असतो. हे थोडेसे जपानमधील फुजियामासारखे आहे. टोकियोहून ओसाका-हिरोशिमाकडे जाणारी शिनकानसेन गाडी - आपण तिला ’बुलेट ट्रेन’ असे ओळखतो - फुजियामाभोवती जवळजवळ अर्धे रिंगण करते तसेच हे आहे.

पॉंपेचे अवशेष रेल्वे स्टेशनच्या बाहेरच अर्ध्या कि.मी.वर आहेत. स्टेशनमधून बाहेर येताच एकदोन टॅक्सीचालक ’वेसुवियसला दोन तासात नेऊन आणतो’ असा प्रस्ताव घेऊन समोर येतात. आपण त्यातील एक टॅक्सी ठरवून वेसुवियसकडे निघतो.

वेसुविअसच्या पायथ्याच्या घेरामध्ये ’तोरे देल ग्रेको’ ( ग्रीकांचा स्तंभ) नावाचे गाव आहे. नेपल्ससकट ह्या सर्व प्रदेशात प्रारंभी ग्रीक लोकांनी वसाहती केल्या होत्या आणि ह्या गावात त्यांनी समुद्रात एक दीपस्तंभ उभारला होता त्यावरून गावाचे हे नाव पडले आहे असा तर्क आहे. वेसुवियसची चढण येथून सुरू होते आणि अर्ध्या तासात आपण आपण वेसुवियस पार्क सर्विसच्या छोटया ऑफिसपाशी येऊन पोहोचतो. तेथे तिकीट घेऊन पुढची चढण पायी चढायला आपण प्रारंभ करतो. सुमारे ४५० फुटाची ही चढण तशी अवघड नाही पण सध्या थंडीचे दिवस असल्याने सर्व रस्ता बर्फाखाली आहे आणि बर्फावर घसरण्याची शक्यता ध्यानात ठेवून काळजीपूर्वक चढलेले बरे! लोकांच्या येण्याजाण्यामुळे रस्त्याच्या कडेला जरा सुरक्षित मातीची पायवाट तयार झाली आहे तिच्यावरून चालणे श्रेयस्कर. वाटेत नेपल्स आणि नेपल्स बे सर्व वेळ दिसत राहतात. वेसुविअसवरून नेपल्स आणि वेसुविअसवरून नेपल्स बे अशी पुढची दोन चित्रे आहेत.

अर्ध्या तासाच्या चढणीनंतर सुमारे ३८०० फूट उंचीवर आपण ज्वालामुखीच्या विवराच्या कडेशी जाऊन पोहोचतो. ४०० फूट खोल असलेले हे विवर जवळजवळ वर्तुळाकृति आणि चांगलेच मोठे आहे. त्याची चार चित्रे आणि विडीओ पहा. पहिली तीन चित्रे माझी आणि चौथे NASA Images मधील आहे. Google Earth वरून अंदाज बांधता येतो की ह्या विवराची खोली सुमारे ४०० फूट आहे.

त्याचा सर्वात गाजलेला विस्फोट २४ ऑगस्ट ७९ ह्या दिवशी झाला. तत्पूर्वी इ.स. ६२ मध्येहि मोठा विस्फोट झाला होता आणि पॉंपेचे समृद्ध शहर मोकळे करण्याची वेळ आली होती आणि शहराची बरीच नुकसानीहि झाली होती. त्या नुकसानीचे चित्रण करणारा एक शिलापट्ट पॉंपेच्या उत्खननातून हाती लागलेला आहे. त्या नुकसानीतून शहराची जनता सावरत होती तोच ७९ साली अजून मोठा स्फोट होऊन उडालेल्या लाव्हा, राख, प्यूमिस दगड ह्यांच्या राशींखाली पॉंपे आणि जवळचेच हर्क्युलेनियम ही शहरे गाडली गेली. असा तर्क आहे की वेसुवियसचा ७९चा स्फोट अचानक झाला नाही तर काही दिवस असे लहानमोठे स्फोट होत होते. ६२च्या स्फोटाची आठवण ताजी असल्याने पॉंपेच्या सुमारे २०,००० वस्तीपैकी बहुसंख्यांनी जीव वाचविण्यासाठी गाव सोडले पण सुमारे १००० धीट/अविचारी लोक मजबूत घरांवर विसंबून गावातच राहिले. नंतर अनपेक्षितपणे वेसुवियसमधून विषारी वायु बाहेर पडू लागले आणि वार्‍याच्या दिशेमुळे ते वायु पॉंपेकडे वळले आणि त्या सुमारे १००० लोकांचा जीव अशा विषारी वायूमुळे गेला. त्यांची शरीरे तेथेच राख आणि प्यूमिसमध्ये गाडली गेली. त्यांपैकी कोणाचेच नाव आता उरलेले नाही. ह्याला अपवाद म्हणजे थोरला प्लिनी (Piny the Elder). सैन्यात अधिकारी असलेला प्लिनी एका परिचिताला पॉंपेहून सोडवून आणण्यासाठी तेथे गेला आणि दूषित हवेमुळे स्वत:च मृत्युमुखी पडला असा वृत्तान्त त्याचा पुतण्या धाकटा प्लिनी ह्याने लिहून ठेवला आहे. स्फोट होतेवेळी वेसुवियस ज्वालामुखी नगराच्या प्रमुख चौकामधून -Forum - दिसला असेल त्याचे हे कल्पनाचित्र पहा. शेजारीच तुलनेसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात १९८० साली झालेल्या सेंट हेलन्स ज्वालामुखीच्या स्फोटाचे चित्र दिले आहे.

नामशेष होण्यापूर्वीचे पॉपे नगर मोठे समृद्ध नगर होते. ते बंदराचे शहर असल्यामुळे व्यापारातील खेळता पैसा शहरात होता. रोममधील प्रतिष्ठित नागरिक विश्रान्तीसाठीचे आपले विला ह्या नगरात वा आसपासच्या गावात बांधत असत. काटकोनात छेद देणारे सरळ रस्ते, भरपूर खेळते पाणी आणि मलनि:सारणाची सोय, संगरवराचा आणि अन्य दगडांचा मुबलक उपयोग केलेली मंदिरे, कार्यालयांच्या इमारती, धनवान् नागरिकांचे प्रासाद अशा वैभावाच्या खुणा अंगावर बाळगणारे हे शहर ७९ सालच्या वेसुवियसच्या उद्रेकाने एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. त्यानंतर काही काळ त्याची आठवण जागृत होती पण कालान्तराने रोमन साम्राज्याच्या र्‍हासाबरोबरच ती आठवण पुसट होत गेली आणि नगर विस्मृतप्राय झाले ते १८व्या शतकापर्यंत. त्या शतकाच्या मध्याला पुन: तेथे उत्खननाला प्रारंभ झाला आणि झोपी गेलेले हे नगर पुन: दृष्टीस येऊ लागले. प्रारंभी उत्खननाचा हेतु शास्त्रीय मुळीच नव्हता तर पॉंपेमधील संगमरवरी शिल्पे, अन्य कलाकृति, धातूच्या वस्तु, फरशा आणि अन्य बांधकामी सामानाची लूट करणे ह्या उद्देशानेच असे उत्खनन सुरू झाले. त्याला उत्खननाऐवजी लूट हे वर्णनच अधिक योग्य ठरेल. (असे नेहमीच होते. भारतातहि जुन्या इमारती, ऐतिहासिक किल्ले असे अवशेष खणून त्यातील बांधकामाचे साहित्य पळवायची प्रथा होतीच. उदा.१८व्या शतकात बनारसच्या राजाचा दिवाण जगत सिंग ह्याने आपला वाडा आणि आपल्या नावाची बाजारपेठ गावात बांधण्यासाठी सारनाथमधील बौद्ध कलाकृतींच्या दगडांची खुलेआम पळवापळव केली असे कनिंगहम ह्यांनी लिहून ठेवले आहेच.) मात्र हळूहळू अधिक जाणीवपूर्वक आणि शास्त्रीय मार्गाने उत्खनन सुरू होऊन नगराचे आजचे स्वरूप आपल्यापुढे दिसू लागले.

नगराचे एक काल्पनिक आकाशदृश्य आणि एक नकाशाचा भाग पुढे दाखवीत आहे. आतापर्यंत केलेल्या उत्खननाचा एकूण विस्तार बराच मोठा, सुमारे ४६ हेक्टेअर इतका आहे आणि तो सर्व पाहण्याची इच्छा असली तरी त्याला खूपच वेळ लागेल. आपणास संध्याकाळची परतीची गाडी घेऊन रोमला परतायचे असल्याने सुमारे अडीच-तीन तासाचा वेळ आपल्याजवळ आहे. सुदैवाने प्रेक्षणीय अशा बहुतेक जागा थोड्याच भागात केन्द्रित झालेल्या आहेत हे उत्तमच आहे.

ह्या प्रेक्षणीय आणि महत्त्वाच्या जागा आहेत तेथेच का बांधल्या गेल्या ह्याचाहि इतिहास आहे. सन ७९ पूर्वी हे नगर सुमारे १००० वर्षे अस्तित्वात होते आणि वेगवेगळ्या संस्कृतींच्या लोकांच्या ताब्यात ते होते. रोमन लोकांनी इ.स.पू.८९ मध्ये सॅम्नाइट लोकांकडून जिंकून घेतले (http://en.wikipedia.org/wiki/Samnites) आणि त्यांना तेथून हाकलून देऊन निवृत्त रोमन सैनिकांना त्यांची घरे देऊन नगराचे रोमनीकरण केले. सॅम्नाइटांचे मूळ गाव खूपच छोटे होते. तकालीन नगररचना शास्त्रानुसार त्या छोटया नगरात उत्तरदक्षिण (Cardo) आणि पूर्वपश्चिम (Decumenus) असे दोन प्रमुख मार्ग होते आणि त्याच्या छेदबिंदूच्या जवळ नगरातील प्रमुख देवालये, सार्वजनिक बाजार (Forum) अशा महत्त्वाच्या जागा होत्या. रोमनीकरणानंतर गावाचा तो प्रमुख चौक तसाच राहिला पण गाव मात्र उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशांना वाढत गेले.

क्र.२, समुद्राकडचे प्रवेशद्वार, येथून प्रवेश करून आपण क्र.४ (अपोलोचे देऊळ), क्र.५ (बॅसिलिका - नगराचे प्रमुख कार्यालय), क्र.६ (फोरम - नगराचा प्रमुख चौक), क्र. ८ (यूमाकियाने बांधविलेले देऊळ), क्र.९ (सम्राट् वेस्पासिअयनला वाहिलेले देऊळ), क्र.११ (मार्सेलम - मांसमच्छी विक्रीची जागा आणि सम्राट् ऑगस्टसला वाहिलेले देऊळ), क्र.१२ (ज्यूपिटरचे देऊळ), क्र.१३ (नगराचे प्रमुख स्नानगृह - हमामखाना) आणि क्र. १४ (नगराची धान्य साठवणीची जागा) असा धावता दौरा करणार आहोत. परतीच्या वाटेवर क्र.३९, गावाच्या वेश्यावस्तीकडे जाऊन परततांना स्टाबियन स्नानगृहाकडे नजर टाकून आपण आपला हा धावता दौरा संपवू.

वेळेच्या अभावामुळे पाँपेमधील काही अन्य लक्षणीय जागा आपल्यास वगळाव्या लागणार आहेत ह्याचा खेद आहे पण त्यावर इलाज नाही. अशा जागांमध्ये दुसर्‍या टोकाला असलेले अँफीथिएटर, ज्याचा वापर ग्लॅडिएटर आणि अनिमल फाइट्ससाठी केला जाई, नाटकाचे थिएटर, प्रसिद्ध अलेक्झँडर मोझेइक असलेले घर अशा काही जागा आहेत.

समोर दिसणार्‍या सर्व जागा म्हणजे आज उघडयावाघडया पडलेल्या भिंती आहेत पण एकेकाळी त्या कशा दिसत असतील ह्याची थोडी चुणूक काल्पनिक आकाशदृश्यावरून येईल.

नगराला भोवती वेस बांधलेली होती आणि ती अद्यापि काही ठिकाणी शिल्लक आहे. वेशीमधील दारांपैकी सर्वात महत्त्वाचे दार समुद्राकडच्या दिशेला होते. तेथून प्रवेश करून आपण पुढे आलो की डाव्या बाजूस अपोलोचे देऊळ दिसते. पाय‍र्‍या चढून गेले की समोर अपोलोचे शिल्प होते, ते आता तेथे नाही. पुढयात जो चौथरा आहे त्यावर अपोलोला अर्पण करावयाच्या वस्तु ठेवत. देवळाच्या सर्व बाजूंना उंच स्तंभ उभे होते आणि देवळाचे छत त्यांच्यावर तोललेले होते. त्यापैकी आता काहीहि उरलेले नाही. प्रांगणात अन्य देवदेवतांची शिल्पे होती त्यांपैकी एकदोनच आता जागेवर आहेत. देवळाच्या बरोबर मागे वेसुवियस दिसत आहे. आता त्याला दोन शृंगे दिसतात - एक उंच, जेथे ज्वालामुखीचे विवर आहे आणि दुसरे थोडे खाली. सन ७९च्या पूर्वी छोटे शृंग नव्हते आणि ज्वालामुखी आता दिसतो त्याहून बराच उंच होता. स्फोटात त्याचा वरचा सर्व भाग उडाला आणि आसपास विखुरला. तो उंचीने कमी झाला आणि दुसरे शृंग निर्माण झाले.

अपोलोच्या देवळाच्या विरुद्ध बाजूस, म्हणजेच रस्त्याच्या उजव्या बाजूस ’बॅसिलिका’ नावाच्या इमारतीचे अवशेष आहेत. त्या इमारतीची दोन छायाचित्रे आणि हा विडीओ पहा.

रोमन नगरांमधील ’बॅसिलिका’ नावाच्या इमारती म्हणजे नगराची प्रमुख कार्यालयांची आणि न्यायालयांची जागा. आता समोर स्तंभांच्या अवशेषांवर मोठे संगमरवराचे अथवा अन्य प्रकारच्या दगडांचे स्तंभ आणि त्या स्तंभांच्यावर छप्पर होते. आता छप्पर नष्ट झाले आहे आणि आतील जमीन उघडी पडलेली आहे. बॅसिलिकाच्या एका बाजूस आपणास पायर्‍या चढून गेल्यावर चार खांबांमागे Tribunal म्हणजे न्यायाधीशाची जागा आणि कार्यालय दिसत आहे. त्यावर कार्यालयाचा दुसरा मजलाहि अर्धा दिसत आहे.

बॅसिलिकामधून बाहेर पडून आपण आता ’फोरम’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोकळ्या आयताकृति सार्वजनिक मैदानात येतो. मैदानाच्या चोहो बाजूस स्तंभांच्या ओळी असत. येथे आता केवळ त्याचे पायथेच उरलेले दिसतात. मैदानाच्या पूर्व बाजूस युमाकिआ नावाच्या प्रतिष्ठित स्त्रीने स्वत:च्या खर्चाने बांधून दिलेली इमारत आहे. रंगारी आणि विणकर ह्या व्यावसायिकांच्या रोममधील संघटनेची (Guild) ती आश्रयदाती होती आणि म्हणून तो व्यवसाय करणार्‍या लोकांनी तिचे एक शिल्प देवळास अर्पण केले. देवळात उजव्या हाताच्या भिंतीपाशी ते शिल्प उभे आहे. ह्या स्त्रीची अधिक माहिती येथे पहा.

युमाकिआच्या देवळाशेजारी उत्तरेकडे सरकले म्हणजे वेस्पासिअन ह्या रोमन सम्राटाला वाहिलेले देऊळ. रोमन धर्मात सम्राटांना देवता समजून त्यांची पूजा करणे, त्यांना बळी अर्पण करणे अशी प्रथा होती. तदनुसार हे वेस्पासिअनला वाहिलेले देऊळ आहे. (कुप्रसिद्ध सम्राट् नीरोच्या आत्महत्येनंतर जी अंदाधुंदी माजली तिच्या अखेरीस आपल्या सैनिकांच्या पाठिंब्यावर हा ६९ साली सम्राट् झाला आणि ७९ साली नैसर्गिक मृत्यूने मरेपर्यंत त्या स्थानावर टिकून राहिला. पॉंपेच्या उद्रेकाच्या केवळ दोन महिने आधी, २३ जून ७९ ह्या दिवशी त्याचा मृत्यु झाला. त्याची अजून एक प्रख्यात बाब म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली त्याचा मुलगा टायटस ह्याने ७० साली जेरुसलेममधील ज्यू राज्य आणि तेथील देऊळ अखेर नष्ट केले आणि तेथील संपत्ति लुटून रोमला आणली. ह्या विजयाची स्मृति म्हणून रोममध्ये कोलोसियमच्या जवळ फोरममध्ये उभारलेली विजयकमान अजून उभी आहे. तिच्याकडे यथावकाश जाऊच. उद्रेकाच्या वेळी वेस्पासिअनचा मुलगा टायटस हा रोमच्या सम्राट्पदावर आरूढ होता.) देवळाचा हा विडीओ पहा. विडीओमध्ये दिसणार्‍या चौथर्‍यावर बैल बळी देण्याच्या विधीचे चित्र आहे. ते खाली दाखवत आहे.

ह्या पलीकडे फोरमच्या उत्तरपूर्व कोपर्‍यात आहे ती इमारत म्हणजे मांस आणि मासळीचे मार्केट ऊर्फ मार्सेलम. इमारतीतून आत शिरले की समोर मध्यावर वर्तुळामध्ये स्तंभांच्या जागा, दोन्ही बाजूला दुकानांसाठी गाळे आणि मागे तीन खोल्या दिसतात. ह्या विडीओवरून इमारतीची उत्तम कल्पना येते आणि त्याबरोबरचे निवेदन काळजीपूर्वक ऐकले तर सर्वाचा अर्थहि स्पष्ट होतो.

सर्वात मागच्या भागातील मध्यावर सम्राट् ऑगस्टसला वाहिलेले मंदिर आहे. मधोमध सम्राटाच्या शिल्पाचे स्थान आहे आणि दोहो बाजूस त्याच्या कुटुंबापैकी चार व्यक्तींच्या शिल्पांच्या जागा आहेत. त्यापैकी दोन शिल्पे अजूनहि जागेवर आहेत - सम्राटाची बहीण ऑक्टेविया आणि तिचा मुलगा मार्सेलस. प्रवेशद्वारातून आत येताच डाव्या बाजूस ग्रीक कथा रंगविणारी मूळची काही चित्रे पहावयास उरली आहेत. त्यांपैकी एका चित्रात आहेत युलिसिस आणि पेनेलोपी आणि दुसर्‍यामध्ये आर्गस इओचे रक्षण करीत असल्याची कथा, तसेच मेडिआ आपल्याच मुलांना मारून टाकण्याच्या विचारात दर्शविली आहे.

कोपर्‍यात दोन काचेच्या पेटयांमध्ये प्लॅस्टरमध्ये ओतलेले दोन साचे दिसतात. विस्फोटात मेलेल्या दोन व्यक्तींची शरीरे नष्ट होऊन राखेत ज्या पोकळ्या तयार झाल्या त्यात प्लॅस्टर ओतून केलेली त्यांच्या मरणाची ही चित्रे आहेत. दोन्ही व्यक्तींच्या कवटया अर्ध्या शाबूत डोक्यावर टिकून आहेत.

मार्सेलममधून बाहेर पडले की फोरमच्या उत्तर सीमेवर दिसते ते ज्यूपिटर - Giove - ह्या देवाचे मंदिर. त्याचे येथे दिसणारे चित्र बॅसिलिकाशेजारून घेतलेले आहे म्हणून ते थोडे लांबून घेतल्यासारखे भासत आहे आणि पुरेसा तपशील दिसत नाही. प्रत्यक्षात मंदिर पायर्‍या चढून गेल्यावर उंच चौथर्‍यावर आहे आणि त्याच्या पुढे देवाला अर्पण करावयाच्या वस्तूंसाठी जागाहि दिसत आहे. मागे पार्श्वभूमीवर दोन शृंगांचा वेसुवियस स्पष्ट दिसत आहे.
ज्यूपिटरच्या देवळावरून आपण आता फोरममधील स्नानगृहाकडे जाऊ. रोमन जनतेच्या लेखी अशा स्नानगृहांना खूप महत्त्व असे. येथे येऊन लोक मित्रांच्या संगतीत स्नान आणि मालिश करवून घेतांना गप्पाटप्पा, कुचाळक्या, कारस्थाने करीत. मित्रांचे वेळ घालवायचे अड्डेच हे. प्रतिष्टितांचा क्लब आणि सर्वसामान्यांसाठी चावडी अशी दोन्ही कामे ही स्नानगृहे करीत असत आणि प्रत्येक रोमन शहरात अशी स्नानगृहे असत. स्नानगृहांमध्ये caldarium, tepidarium आणि frigidarium असे कढत, कोमट आणि थंड पाण्याचे हौद असत आणि त्यातील पाणी आळीपाळीने अंगावर घेत आणि सेवकांच्याकडून शरीराला मालिश करवून घेत रोमन नागरिकांचा वेळ उत्तम जात असे. असे एक स्नानगृह फोरममध्ये होते त्याचे हे छायाचित्र आणि विडीओ पहा.
स्नानघराच्या शेजारी फोरममध्ये धान्याचे कोठार होते. त्याचा उपयोग सध्या पॉंपेमध्ये मिळालेले शेकडो ऍंफोरा आणि मृतदेहांचे साचे ठेवण्यासाठी केला आहे.

आपली पॉंपेची भेट आता संपत आली आहे. तसेहि ५ वाजता पॉंपे बंद केले जाते आणि म्हणून ४.४५ वाजता सर्वांनी बाहेर पडण्याच्या दिशेने हालचाल सुरू करावी अशी सूचना आपणांस प्रारंभीच देण्यात आली आहे. थोडया पलीकडे असलेल्या वेश्यावस्तीला भेट देऊन आपण परत निघू.

ह्या भागाला वेश्यावस्ती म्हटले जाण्याचे कारण असे की येथे काही घरांमध्ये लैंगिक म्हणता येतील अशी चित्रे, भिंतीवरची लिखाणे अशा गोष्टी सापडल्या. त्यावरून असा तर्क केला गेला की ही घरे वेश्याव्यवसायासाठी वापरली जात असावीत. अशी दोन चित्रे पहा:

आता परत आलेल्या मार्गाने जाऊन पॉंपेमधून बाहेर पडू. जातांना स्टाबिअन स्नानगृह लागते पण काही कारणाने आपणास त्यात प्रवेश सध्या मना आहे. बाहेरूनच त्याच्या प्रवेशद्वारातील मोझेइकचे छायाचित्र घेऊ.

आपली येथील सहल आता संपत आहे. परत बाहेर पडून स्टेशनवर जाऊन नेपल्सची गाडी पकडू आणि तेथून तसेच रोमला हॉटेलावर जाऊ.

(टीप - पॉंपेमधील हजारो वस्तु आता नेपल्समधील पुरातत्त्व संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. ते संग्रहालय जगातील एक उत्तम संग्रहालय मानले जाते. तेथे जाण्याइतपत मजजवळ वेळ नव्हता.)

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

ही केवळ वाचनाची पोच. टिपिकल कोल्हटकर टचमुळे भरगच्च माहिती ठासून भरलेली आहे. बाकीचे नंतर लिहितो हा लेख पुरेसा चघळून झाल्यावर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या प्रकारचं इटली बघायलाही आवडलं. ग्रीसच्या क्रीट बेटावर क्नॉसोसच्या (Knossos) राजवाड्याचे अवशेषही साधारण या जुन्या इमारतींसारखे दिसतात. ऑगस्टसच्या मंदिरातली चित्रही साधारण तशीच वाटली.

वीस हजार वस्तीचं गाव म्हणजे बरंच मोठं झालं, तेव्हाच्या मानाने तर खूपच. तिथलं एवढं तरी जपलं गेलेलं आहे हे उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<ग्रीसच्या क्रीट बेटावर क्नॉसोसच्या (Knossos) राजवाड्याचे अवशेषही साधारण या जुन्या इमारतींसारखे दिसतात.>

असे वाचले आहे की रोमन-लॅटिन लोक हे शिल्पकलेमध्ये ग्रीकांचे अनुकरण करीत. त्यामुळेच सर्व प्राचीन रोमन अवशेषांमध्ये डोरिक, आयॉनिक आणि कॉरिंथिअन स्तंभांची, तसेच प्रमाणबद्ध शरीराच्या मानवी शिल्पांची रेलचेल दिसते.
पहा

डोरिक आयॉनिक कॉरिंथिअन

(चित्रे http://greece.mrdonn.org/columns.html येथून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(स्वतः काढलेले फोटो शोधायचा आळस म्हणून) गुगलून पाहिलं. डोरिक पद्धतीचे खांब क्नॉसोसमधे आहेत असं दिसलं. हा खांबांचा फोटो

आणि तिथे पडक्याधडक्या भिंतीवरची चित्रं:.

तुम्ही दिलेल्या फोटोंचा कॉण्ट्रास्ट (बराच) वाढवला तर साधारण अशाच प्रकारची रंगसंगतीही चित्रांमधे दिसते. ही चित्रं उन्हात आहेत का? क्नॉसोसच्या भित्तीचित्रांची विकीपिडीया लिंक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख चाळला आहे. पाँपे - लाईफ इन रोमन टाउन ७९ सीई नामक एक अतिशय सुंदर प्रदर्शन पाहीले होते. चित्रात वर उल्लेख आलेले पुतळे, शहराचे अवशेष जसे भिंत, कारंजे, पेंटींग प्रत्यक्ष भुकंप व झालेल्या वाताहातीवर अतिशय सुंदर थ्रीडी चित्रफीत, एका पडद्यावर आजचा माउंट वेसुव्हियस त्याबद्दलचा एक माहीतीपट, लहानमुलांना प्रदर्शन पहता पहाता सोडवता येतील अशी कोडी, चित्रकला साहीत्य, त्यावेळच्या जनजीवनावाची माहीती, विविध स्लाईड शो ते सिम्युलेशन, सबंध गावाचा नकाशा, चित्रात विविध जागांवर टिचकी मारता कळणारी आधीक माहीती, चित्रफिती. फार सुंदर अनुभव होता. पाँपेला जायला मिळाले नाही तरी अक्षरशा तिथे जाउन आल्यासारखा.

अवांतर - लहानपणी विजय नामक एका तापट व उंच मित्राचे नाव कॉलनीतल्या एका मोठ्या मुलाने माउंट विजूव्हिअस ठेवले होते. तेव्हा भुगोल-इतिहासात शिकायच्या आधीच अमुक एक ज्वालामुखी इटलीत आहे असे चांगले लक्षात राहीले होते. प्रत्यक्ष पाँपेला जाउन अथवा वर उल्लेख केलेले प्रदर्शन, अगदी एखादा माहीतीपट पाहून इतिहास घोकंपट्टी करुन शिकण्यापेक्षा जास्त रोचक बनवता येतो. कोल्हटकर साहेब तुम्ही आता हे सगळे प्रत्यक्ष जाउन मॅनेज कसे करता याबद्दल किमान ऑफलाईन मार्गदर्शन करा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आवडला. लेखनशैलीदेखील आवडली.
पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वा ! मस्त माहिती. ही सहल केली तर त्याआधी हा लेख परत वाचून जाईन म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेखन. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

पाँपे ची - कोल्हटकर साहेब, अजून येउ द्या इट्ली विषयी, वेगळ्या दृष्टीकोनातून केलेला प्रवास आणि वर्णन आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरीच काय! जवळजवळ सगळीच माहिती नवी आहे. लेखन नेहमीप्रमाणे उत्तम!

पॉंपेचे अवशेष रेल्वे स्टेशनच्या बाहेरच अर्ध्या कि.मी.वर आहेत. स्टेशनमधून बाहेर येताच एकदोन टॅक्सीचालक ’वेसुवियसला दोन तासात नेऊन आणतो’ असा प्रस्ताव घेऊन समोर येतात.

Smile चला पॉम्पे आणि नेरळ यात सांस्कृतिक दुवा आहे तर Wink

बाकी, इथे बॅटमॅन रोमन पुराणाची ओळख करून देतानाच, हे प्रवासवर्णन यावं याचा आनंद झाला आहे.

@बॅटमॅन, २.२ आणि पुढे लिहायचे आहे याची आठवण करून द्यायचा या छुपा नव्हे तर जाहिर प्रयत्न Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!