विश्वरूपदर्शन - १

आजच सकाळी झालेला चॅट-संवादः

मी - पुढचे दोन-चार दिवस काल चर्चा करत होतो ती गोष्ट लिहीली का नाही विचारू नकोस.
मित्र - का? आता कुठे उलथणार?
मी - नाही रे. विश्वाचा नवीन नकाशा आलाय. त्याबद्दल आपल्याला अंमळ माहिती आहे याची जाहिरात नको करायला?
मित्र - च्यायला, म्हणजे आता जीपीएसमध्ये पुन्हा गोंधळ होणार... तुझ्याकडे यायला निघालो तर कदाचित वायोमिंगला पोचेन.
मी - एय्य!
मित्र - नकाशे बदलले, रस्ते बदलले, पूर्वीची गावं आता होती तिथे राहिली नाही....

असं काही झालंय का नाही हे वेगळं सांगायला नको. विश्वाचा नवा नकाशा कसा आहे हे काही गुपित वगैरे नाही. तेव्हा तो आधीच दाखवून टाकते.

प्लँक मिशनने बनवलेला विश्वाचा मायक्रोवेव्ह नकाशा - इसाच्या संस्थळावरून

सध्या फेसबुक, अन्य बातम्यांमधे हा नकाशा (निदान माझ्या समोर) झळकतो आहे. (अर्थात हा 'सिलेक्शन बायस'ही आहे. माझ्या फेसबुकाच्या भिंतीवर ज्या लोकांचे अपडेट्स दिसतात त्यांच्यापैकी साधारण ५०% लोकांकडे खगोलशास्त्रातली पदवी आहे.) अर्थात हा नकाशा दिसला तरी वाचायचा कसा हे बहुतेकांना माहित नसेल.

कोणत्याही नकाशाप्रमाणे या ही नकाशाचे coordinates (मराठी?) आधी समजून घेऊ या. या नकाशाच्या मध्यभागी आहे आपल्या दीर्घिकेचं केंद्र. आपल्या दीर्घिकेचा आकार सर्पिलाकार (spiral) आहे. मध्यभागी एक मोठा गोळा आणि त्यातून बाहेर पडणारे बाहू. पेटलेलं भुईचक्र जसं दिसतं तसंच. समजा आपण जमिनीवर कुशीवर आडवे पडलो आणि या पेटलेल्या भुईचक्राकडे पाहिलं तर काय दिसेल? गोल फिरणारे सर्पिलाकार बाहू आता एकाच प्रतलात दिसतील. मधला गोळा वेगळा दिसेल. प्रयत्न केला तर भुईचक्रातून किती ठिकाणी ठिणग्या बाहेर पडत आहेत ते ही दिसेल. आपला सूर्य आणि पर्यायाने आपण या भुईचक्राच्या एका बाजूला मध्यापासून साधारण २/३ अंतरावर आहोत. विश्वात आपली दीर्घिका हे एक भुईचक्र आहे. तिच्या वर-खाली, आगे-मागे प्रचंड जागा (space) आहे. ती सगळी जागा भुईचक्राच्या वर खाली दाखवलेली आहे. खालच्या चित्रातला निळा-पांढरा भाग म्हणजे आपलं भुईचक्र, आकाशगंगा.

४०८ मेगाहर्ट्झला बनवलेला विश्वाचा नकाशा - National Radio Astronomy Observatory च्या संस्थळावरून

यातल्या फक्त आडव्या निळ्या-पांढर्‍या भागात तारे आहेत. तांबडा रंग म्हणजे कमी तीव्रता, निळा म्हणजे त्यापेक्षा अधिक आणि पिवळा-पांढरा म्हणजे सर्वाधिक तीव्रता. या नकाशात आपण केंद्राच्या बरेच डाव्या बाजूला आहोत. उजव्या बाजूच्या टोकाला कमी प्रकाश आहे असं दिसतंय. याचं कारण दीर्घिकेच्या पलिकडच्या टोकाला बघायचं तर मधल्या धुळीतून प्रकाशकिरणांना वाट काढावी लागते. आपण जोपर्यंत दीर्घिकेच्या केंद्राच्या पलिकडच्या बाजूला जात नाही, तोपर्यंत आपल्याला पलिकडचं काही दिसणार नाही. स्टार ट्रेक - व्हॉयेजर माहित असेल तर तो आहे 'डेल्टा क्वाड्रंट'.

तर नवा नकाशा दाखवून त्याची संदर्भपद्धत फक्त दाखवली. हा नकाशा विश्वाचा आहे तर त्यात दीर्घिका, दीर्घिकांचे गुच्छ, तारे, वायू, रिती जागा (voids) असं कुठे काय आहे ते मी दाखवलेलं नाही. पुन्हा दुसरा एक नकाशा समोर टाकला, जो पहिल्या नकाशापेक्षा फार वेगळा दिसतो, आणि वर सांगत्ये की या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जरी दोन्ही नकाशांचे रंग सारखे ठेवले तरीही दोन्ही नकाशे एकमेकांसारखे दिसत नाहीत हे कोणीही सांगेल. हे दोन नकाशे वेगळे दिसण्याचं कारण आहे, हा प्रकाश तयार होण्याची वेगवेगळी कारणं.

बहुतेकांना प्रकाश दोन रूपांमधे अस्तित्त्वात असतो हे माहित असेल; विद्युतचुंबकीय लहरी आणि प्रकाशकण. आपल्या यंत्रांना एकावेळी यांच्यापैकी एकच गोष्ट समजते. पण त्यातही तपशीलात शिरल्यास एका वेळी ठराविक उर्जा असणारा प्रकाशच पहाता येतो. दृष्य प्रकाशासाठी वापरली जाणारी दुर्बिण असेल तर तिला इतर प्रकारचा प्रकाश दिसत नाही. आपल्या डोळ्यांनाही रेडीओ, अवरक्त (infrared), रेडीओ इ. लहरी थोडीच दिसतात! एक प्रकारे एका दुर्बिणीतून एकाच प्रकारचा प्रकाश दिसणं ही गाळणी आहे. हे झालं बघणार्‍याच्या बाजूने. पण जिथे मुळात प्रकाश तयार होतो, तिथेही वेगवेगळ्या प्रक्रिया चालतात आणि त्यातून हा प्रकाश तयार होतो. त्यामुळे वेगवेगळ्या गाळण्या वापरल्या तर वेगवेगळ्या प्रक्रिया कुठे होतात हे दिसतं. थोडक्यात एकाच ठिकाणी आपण दोन वेगवेगळ्या गाळण्या लावून पाहिलं तर वेगवेगळी दृष्य दिसतील. म्हणूनच हे दोन्ही नकाशे वेगवेगळे दिसतात.

यातला जो दुसरा नकाशा आहे तो ४०८ मेगाहर्ट्झला बनवलेला आहे. ४०८ मेगाहर्ट्झ म्हणजे झाल्या रेडीओ लहरी. ही खगोलशास्त्रात कमी वारंवारिता (frequency) समजली जाते. आपले जे जीएसएम मोबाईल असतात ते काही ठराविक वारंवारितेचे सिग्नल्स वापरतात. त्यातला भारतातला एक बँड आहे तो साधारण ८१०-९०० मेगाहर्ट्झ या रेंजमधे आहे. (त्यामुळे पृथ्वीवरच्या दुर्बिणी वापरून आपण या वारंवारितेला विश्व कसं दिसतं हे पाहू शकत नाही.) प्लँक हा कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडून ३० ते ८५७ गीगाहर्ट्झला निरीक्षणं करून विश्वाचा नकाशा बनवण्यात आला. लक्षात घ्या, पहिला नकाशा आहे त्याची वारंवारिता गीगाहर्ट्झ, एकावर नऊ शून्य अशी आहे; दुसर्‍याची मेगाहर्ट्झ, एकावर सहा शून्य एवढीच. म्हणजे प्लँकची वारंवारिता दुसर्‍या नकाशाच्या निदान १०० पट अधिक आहे. वारंवारितेमधल्या या फरकामुळे आपण अवकाशात होणार्‍या एकाच घटनांकडे फारच वेगवेगळ्या गाळण्या घेऊन पहातो आहोत. या घटना कोणत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या.

४०८ मेगाहर्ट्झ आकाशात तयार होतात ते synchrotron प्रकारचं प्रारण असतं. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन या प्रकारच्या भारीत कणांच्या चुंबकीय क्षेत्रामधे हालचालीमुळे प्रकाश उत्सर्जित होतो. पल्सार्समधून रेडीओ लहरी बाहेर पडतात. त्याशिवाय हायड्रोजनच्या वायूच्या ढगांमधून (nebula) मधूनही रेडीओ प्रारणं उत्सर्जित होतात. हे झालं तापमानविरहीत (non-thermal) प्रारण. त्याशिवाय सर्व तारे, तप्त वायूमधून काही प्रमाणात रेडीओ लहरी उत्सर्जित होतात. याचा संबंध वस्तूच्या तापमानाशी (thermal radiation) आहे. आपल्या दीर्घिकेच्या केंद्राशी रेडीओ प्रारणाचा मोठा स्रोत आहे. तसंच या नकाशात केंद्राच्या डाव्या बाजूला, दीर्घिकेच्या प्रतलातच दोन इतर तेजस्वी बिंदू दिसत आहेत. हे आकाशातले (सूर्य वगळता) सर्वात तेजस्वी रेडीओ स्रोत आहेत.

पहिल्या नकाशात दाखवलेलं आहे ते वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारण. ते काय असतं, कशामुळे ते तयार झालेलं आहे हे आपण पुढच्या भागात समजावून घेऊ. त्याची गोष्ट अशी दोन वाक्यांत समजावून सांगता येण्यासारखी नाही. पण आधी या प्रकारच्या नकाशांची 'उत्क्रांती' पाहू या. सर्वप्रथम महास्फोटाचा सिद्धांत मांडला गेला तेव्हा सर्व विश्वात अशा प्रकारचं प्रारण पसरलेलं असेल आणि त्यातून विश्वाचं तापमान ३ केल्व्हिन (= उणे २७० सेल्सियस) असेल असं सुचवलं गेलं. योगायोगाने, १९६४ साली आर्नो पेन्झियाज आणि रॉबर्ट विल्सन या अमेरिकन रेडीओ खगोलशास्त्रज्ञांना हे प्रारण प्रत्यक्षात सापडलं. त्याची गोष्ट क्लिष्ट नाही, निदान असं लिहीताना मला वाटतंय. ती चटकन सांगून टाकते.

रेडीओ खगोलशास्त्रात तापमान आणि नॉईज (मराठी?) हे समानार्थी शब्द आहेत. आपल्याला रस असणार्‍या वस्तूमधून बाहेर पडणारी प्रारणं म्हणजे आपला सिग्नल. बाकी सगळ्या प्रकारचं तापमान, प्रारणं म्हणजे गोंधळ/नॉईज. आपल्या टीव्ही अँटेनासारख्या (काड्या-काड्या असणारी यागी अँटेना असूदेत किंवा डिश टीव्ही, टाटा स्कायसारखी असणारी डिश असू देत) 'भांड्या'त जेवढा जास्त जमेल तेवढी प्रारणं गोळा केली जातात. भांड्याच्या बुडाशी वायर्स, अँप्लिफायर्स, अश्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक (चं कँप्यूटर) जोडून हा अशक्त सिग्नल बूस्ट करून सेन्सर्समधे मोजतात. या प्रत्येक पायरीवर मूळ सिग्नलमधे थोडा बाहेरचा गाळसाळ जमा होतो. हा गाळ किंवा नॉईज अधिक तापमानामुळेही येतो. तो जेवढा कमी असेल तेवढी दुर्बिणीची ग्रहणक्षमता (sensitivity) वाढते. पेन्झियाज-विल्सनही आपल्या टेलिस्कोपची ग्रहणक्षमता वाढवत होते. त्यांना अगदी बारीक प्रमाणात गाळ मिळत होता, पण त्याचा हिशोब लागत नव्हता. (काही वेळा असं होतं की फार तेजस्वी वस्तूच्या जवळ दुर्बीण फिरवली तर तिथूनही थोडा कचरा आपल्या सिग्नलमधे येतो.) आधी त्यांना वाटलं की त्यांच्या 'भांड्या'त कबूतरांनी घाण केलेली आहे आणि त्यामुळे हा गाळ पुढे ढकलला जातो आहे. कारण दुर्बिण कोणत्याही दिशेने फिरवली तरीही हा गाळ तसाच होता. पण असं काही नव्हतं. ते सगळं साफ करूनही हा गाळ जाईना. तेव्हा हा गाळ नाही तर वेगळ्या प्रकारचा सिग्नल आहे, आणि तो आकाशातून सगळ्या दिशांनी समान प्रकारे येतो आहे हे त्यांना समजलं. आत्तापर्यंत इतर कोणाला हा सिग्नल मिळाला नसेल असं नाही. पण इतकी अचूक यंत्रणा आणि मापन त्यांनी केलं की ३ची चूक हा नॉईज नाही हे त्यांना समजलं. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा सिग्नल आकाशातून येतोय, तो सगळ्या दिशांनी सारखाच आहे आणि त्याचा संबंध विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेशी आहे हे त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांना १९७८ चा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला.

COsmic Background Explorer (COBE) या मिशनने अशा प्रकारचा १९८९-१९९३ या काळात निरीक्षणं करून नकाशा बनवला. कोबेच्या विदेतून विश्वाचं तापमान ३ नसून २.७ आहे असं लक्षात आलं. महास्फोटाच्या सिद्धांताला मिळालेला हा आत्तापर्यंतचा सर्वात भरभक्कम पुरावा. २००६ सालचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार या मिशनच्या प्रमुख संशोधनकांना मिळाला. त्यांनी प्रसिद्ध केलेला हा विश्वाचा नकाशा:

कोबेने बनवलेला विश्वाचा नकाशा - नासाच्या संस्थळावरून

त्यानंतर Wilkinson Microwave Anisotropy Probe (WMAP) दशकाच्या वर काम करून अशा प्रकारचा पुढचा नकाशा बनवला. तो हा:

डब्ल्यूमॅपने बनवलेला विश्वाचा नकाशा - नासाच्या संस्थळावरून

कोबे आणि डब्य्लूमॅपचे नकाशे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दोन्हींमधे दिसणार्‍या स्ट्रक्चरमधे (मराठी?) फार फरक नाही. हे विश्वाचं तापमान आहे, निळा रंग हा थंड आणि पिवळा-लाल उष्ण भाग दाखवण्यासाठी (चित्रकलेतसारखीच मानकं) वापरलेला आहे. जो भाग कोबेला थंड दिसला त्या भागातली आणखी अधिक गुंतागुंतीची रचना डब्ल्यूमॅपने दाखवली, पण दोन्ही नकाशांमधे मूलभूत फरक नाही. नकाशात मध्याच्या उजव्या बाजूला थंड भाग दोन्ही नकाशांमधे आहे, अगदी उजव्या बाजूला उष्ण भाग आहे. प्लँकची भेदनक्षमता (resolving power) त्याच्या दोन्ही पूर्वजांपेक्षा बरीच जास्त आहे हे चित्रांवरून दिसतं आहेच. आणि तरीही हा जो पॅटर्न आहे तो डोळ्यांना बघूनही एकसारखाच दिसतो आहे. (असं असूनही प्लँकने नवीन काय दाखवलं वगैरे वाचून लिहायला थोडा वेळ लागतो आहे. तोपर्यंत मुळात हे दाखवलेलं आहे ते काय आहे वगैरे लिहीते आहेच.) डोळ्यांनी पहा किंवा संगणकावर गुंतागुंतींचे प्रोग्रॅम लिहून तपासून पहा, प्लँकला आधीची निरीक्षणं आणि सिद्धांत खोडून काढणारं 'नवीन' असं काही सापडलेलं नाही (कारण अशी काही ब्रेकिंग न्यूज पसरलेली नाही). एकप्रकारे हे कोबे, डब्ल्यूमॅप आणि प्लँक दोन्हीचं यश आहे.

कोबेने मुळात एवढं चांगलं काम केलेलं असताना (म्हणजे नक्की काय काय केलं?) पुढे डब्ल्यूमॅप आणि प्लँक कशाला, त्यातून काय साध्य झालं त्याचं इथे फक्त एक चित्र दाखवते. पुढच्या भागात आपण याचे अधिक भौतिकशास्त्रीय तपशील बघू या.

पुढच्या भागातः वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारण कशामुळे तयार झालं, प्रारणाच्या तापमानाच्या पलिकडे विश्वाबद्दल आपल्याला या माहितीमधून काय समजलं, विश्व प्रसरण पावतंय तर पुढे असंच पसरत राहिल का एका बिंदूपाशी ते थांबेल, इ.

(क्रमशः)

भाग २, भाग ३

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

तो नकाशा जालावर पाहून षष्प काही कळलं नव्हतं .. आता थोडं समजलंय असं वाटतंय..
उत्तम माहिती सोप्या भाषेत.. धन्यवाद अदिती..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेच्या,
"परमेश्वर आहे, तो इंग्रजी (रोमन)लिपी जाणतो आणि तो स्टिव्हन हॉकिंगलाही ओळखतो" हे सिद्ध करणारी या नकाशातील 'SH' अक्षरे अस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.या नव्या नकाशात ती जवळजवळ दिसतच नाहीत.
ही सगळी निरीश्वरवाद्यांची खेळी आहे. निषेध!

अवांतरः
कदाचित 'SJ' अक्षरे हळूहळू स्पष्ट होतील... तसे झाले तर मात्र 'ईश्वरेच्छा बलियसि'! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाढव, हरीण आणि पोपट दिसले का हो तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे घ्या. "तुम ने कहां और हम ढूंढ के लाये"

पुढचा भाग अर्धा लिहून झाला आहे, कृपया त्यावरून टोमणे मारू नयेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो इतकंच नाही तर मेले हे निरीश्वर वादी आधी ओरडून ओरडून सांगायचे की आपण विश्वाच्या केंद्रस्थानी नाही म्हणून. आता बोला म्हणावं! आमच्या ग्रंथांचा अभ्यास केला असता तर आधीच नस्तं सापडलं? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिटेल मध्ये पाहिलत तर या नवीन नकाशात काय हवं ते दिसण्याची सोय आहे.

विश्वाच्या पसार्यात 'नटराज'सुद्धा दाखवत असत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आदरवाईज विश्वरुपदर्शन हा शब्द फार चावट वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेख आवडला. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.

चं कँप्यूटर म्हणजे काय?
coordinate ला निर्देशांक कसा वाटतो? नॉइजसाठी गोंधळापेक्षा गोंगाट बरा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चं कँप्यूटर म्हणजे काय?

कंसातले शब्द वाचले तरी, वाचले नाही तरी वाक्य अर्थपूर्ण असावं असा संकेत आहे.
"इलेक्ट्रॉनिकचं कँप्यूटर" अशी संज्ञा 'वर्‍हाड निघालंय लंडन'ला मधला नॉनमॅट्रीक पास बबन्या, लिफ्टचं वर्णन करताना वापरतो. ती उचलण्याचा मोह आवरला नाही.

coordinate ला निर्देशांक कसा वाटतो? नॉइजसाठी गोंधळापेक्षा गोंगाट बरा वाटतो.

शेअर बाजारासंदर्भात निर्देशांक हा शब्द ऐकलेला आहे. आणखी काही पर्याय सुचत आहेत का? गोंगाट हा आवाज सोडून इतर गोष्टींचा असतो का? गोंधळही फार आवडला नाहीच.

---

विश्वरूपदर्शन म्हटल्यावर एकेकाळी मलाही भलतंच आठवत असे. आता तुमच्यामुळे आठवण झाली.

हे शीर्षक देण्याचं कारण म्हणजे अलिकडेच (कृपा फेसबुकाची!) एका तत्त्वनिष्ठ म्हणून मुंबई-पुण्यात प्रसिद्ध असणार्‍या, माजी सरकारी अधिकार्‍याच्या मते स्ट्रिंग थिअरी शंकराचार्यांच्या अद्वैतवादात दिलेली आहे असं काहीसं वाचलं. या विनोदावर हसावं का रडावं समजेना. त्यातून ते गंभीरपणे लिहीलेलं असल्यामुळे विनोदी न म्हणता हास्यास्पद म्हणावं का असाही एक उपप्रश्न होता. एकंदर त्या भिंतीवर पेट्रनायझेशन (मराठी?) अनपेक्षित नव्हतंच, पण प्रतिसादांमधे एकालाही त्यावर प्रश्न विचारावासा वाटला नाही याचं आणखी आश्चर्य वाटलं. एकेकाळच्या कवीकल्पना रंजक आहेत, पण ते विज्ञान नाही हे सांगायला वेगळा मार्ग सुचला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला. इतक्या सहज या अगम्य विषयात घरबसल्या माहिती मिळत आहे हे महत्वाचे.

ज्या शब्दांना मराठी पर्याय विचारले आहेत त्याबद्दल.

नॉईज ला गोंगाट वा खरखर योग्य वाटते.
नकाशातल्या कोऑर्डिनेटस ना आम्ही अक्षांश-रेखांश म्हणायचो.

रिसेप्टर ला दुर्बिणीतून बघणारा या अर्थाने असेल तर पर्याय कठीण आहे. केवळ 'बघणार्‍याच्या बाजूने' असे म्हणता येईल.

पुढील भागाची वाट पहात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

नकाशातल्या कोऑर्डिनेटस ना आम्ही अक्षांश-रेखांश म्हणायचो.

स्थान-निर्देशांक हा शब्द थोडा अधिक जवळचा वाटतो आहे. कारण खगोलात दोन प्रकारचे कोऑर्डीनेट्स वापरले जातात, इथे दाखवले आहेत ते galactic coordinates आणि दुसरे equatorial coordinates. दीर्घिकेच्या संदर्भचौकटीतले स्थान-निर्देशांक म्हणजे galactic, त्यात आपल्या दीर्घिकेचं केंद्र मध्यभागी आहे असं मानून आकाशाची विभागणी केलेली आहे. दुसर्‍या पद्धतीत वसंतसंपात बिंदूची (परवाच, २१ मार्चला सूर्य ज्या तार्‍यांच्या पार्श्वभूमीवर होता ती जागा) जागा शून्य, शून्य मानून आकाशाचे तुकडे केलेली असते. मुख्य पद्धत अक्षांश-रेखांशासारखीच असते. equatorial coordinates वापरायला, चित्र डोळ्यासमोर यायला सोपे आहे. पण पृथ्वीच्या परांचनामुळे हे बदलत जातात*. हे दर पन्नास वर्षांनी सुधारले जातात. १९५०, २००० साली हे केलं, आता २०५० मधे होईल. galactic coordinates समजायला कठीण असले तरी बदलत नाहीत असा त्याचा फायदा आहे.

इथे नकाशांमधे galactic coordinates आहेत.

* हे थोडं हवेत केलेलं विधान आहे हा आरोप मान्य आहे. याचा विश्वाच्या रचनेशी फारसा संबंध नसल्यामुळे आत्ता हा प्रश्न थोडा बाजूला सोडून देते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा मस्त रोचक झालाय लेख. पेन्झियस अन विल्सनबद्दल आधी वाचलेय जुजबी- नारळीकर अन निवास पाटलांच्या पुस्तकातून. इथे परत वाचताना मजा आली.

पुढील भाग लौकरच आला पाहिजे आता!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम. च्यायला, मराठीत वृत्तपत्रे अजूनही याच्या बातम्या देताहेत तोवर त्यांच्या मुस्काडीत मारणारा लेख लिहिला आहेस.
हे असंच सारखं लिहित राहण्यासाठी काय आणि किती घेणार? हा विषय खूप मोठा आहे, हे तुला सांगायला हवे का? लिहित रहा.
विशिष्ट द्राक्षासव बाटलीभर पाजेन. ते अनियन शैली वगैरेच्या नादी न लागणं श्रेयस्कर आहे (आणि म्हणून तुला प्रेयस नसेल).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून एक दोनदा वाचेन फुअरसतीत; पण सध्या आवडलय; इतक्च म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्यासाठी पुर्णपणे नवीन माहीती.
खूप छान! रोचक लेख _/\_
पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत! अतिउत्तम लेख!
या विषयात मी एकदम अंगूठाछाप आहे त्यामुळे अतिशय नवीन आणि रोचक माहिती मिळतेय. स्फोट होऊन विश्व निर्माण झाल्याची कल्पना करणे हा नकाशा पाहून जरा सोपे जाते खरे, पण फटाक्याचा स्फोट झाल्यावर जसा सगळा प्रकाश वगैरे विरून जातो तसे न होता हे पुन्हा इम्प्लोड होत जाईल अशी कल्पना करताना मती कुंठित होते.
मुळात हे सगळं कशात आहे याचा विचार करणेच जमत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लै भारी. मॅप्स असल्याशिवाय नक्की कुठे चाललोय अन कुठून आलोय हे कळायचे संदर्भ सहजी सापडत नाही. येऊंद्या!

नविन मॅप आलाय नविन मॅप आलाय असं ऐकलं म्हणून आमीबी आमची दुर्बिण घेऊन बघायलोए, पण काही दिसनं ब्वॉ! इतका वेळ घालवला की आमचा चहापण थंड झाला, शेवटी मायक्रोवेव्हमध्ये गरम करताना आलेल्या चहाच्या वाफेकडेच पाहून समाधान मानून आम्ही झोपी गेलो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख ! हा क्लिष्ट विषय मराठीतून सांगायचा म्हणजे आव्हान आहे.

एकदा मी असेच काही नकाशे काही हौशी लोकांना दाखवत होते...एकानी म्हटलं "म्हणजे आपली दीर्घीका सगळे म्हणतात तशी नगण्य नाही तर...एवढी मोठी तर दिसते आहे विश्वाच्या नकाशात". तेव्हापासून विश्वाचं हे 'प्रोजेक्शन' मला फारसं आकर्षक वाटेनासं झालं.

एक खुसपट वजा काही...
"याचं कारण दीर्घिकेच्या पलिकडच्या टोकाला बघायचं तर मधल्या धुळीतून प्रकाशकिरणांना वाट काढावी लागते. ते धूलिकण पार करण्याची आपल्या दुर्बिणींची क्षमता अजूनपर्यंत नाही. आपण जोपर्यंत दीर्घिकेच्या केंद्राच्या पलिकडच्या बाजूला जात नाही, तोपर्यंत आपल्याला पलिकडचं काही दिसणार नाही. "
तिरक्या अक्षरात दाखवलेलं वाक्य एका अर्थी बरोबर वाटत नाही...आणि ते काढून टाकलं तरी चालेल.त्या आधीचं आणि नंतरचं वाक्य जे सांगायचं आहे ते स्पष्ट करत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विशेषतः कोबे, डब्ल्युमॅप आणि प्लॅंकने काढलेल्या मापनातलं वाढतं रिझोल्यूशन दाखवणाऱ्या शेवटच्या चित्रांमुळे नक्की नकाशातले बारकावे कसे स्पष्ट होत गेले हे लक्षात येतं.

काही प्रश्न.
१. जमिनीवर असलेल्या महाप्रचंड रेडियो दुर्बिणींपेक्षा उपग्रहाच्या छोट्याशा कलेक्टरमध्ये अधिक चांगला सिग्नल मिळतो का? असल्यास का?
२. नकाशाचं स्केल काय आहे? माझा अंदाज निळं म्हणजे कमी आणि लाल म्हणजे अधिक असा आहे. काही ठिकाणी लाल पुंजके दिसतात. त्याचा अर्थ काय?
३. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातून प्रकाश आणि एक्स रे वगैरे प्रचंड प्रमाणावर येतात, मात्र रेडियो लहरी येत नाहीत असं दिसतं. असं का?

कदाचित या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात येणार असतील. तसं असल्यास पुढचा भाग लवकर लिही.

कोऑर्डिनेट्ससाठी निर्देशांक हा शब्द बरोबर वाटत नाही, तो इंडेक्ससाठी वापरल जातो. माझ्या मते यासाठी नवीन शब्द तयार करायला हवा. बिंदूमान हा शब्द कसा वाटतो? 'ज्यावर बाह्य बल कार्य करत नाही अशा एखाद्या कणाची विशिष्ट वेळची बिंदूमानं माहीत असतील आणि वेग माहित असेल तर त्यानंतरच्या व त्या आधीच्या सर्व वेळेची बिंदूमानं, तद्वतच ठिकाणं (लोकेशन्स) न्यूटनच्या पहिल्या नियमाने शोधून काढता येतात.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा मी असेच काही नकाशे काही हौशी लोकांना दाखवत होते...एकानी म्हटलं "म्हणजे आपली दीर्घीका सगळे म्हणतात तशी नगण्य नाही तर...एवढी मोठी तर दिसते आहे विश्वाच्या नकाशात". तेव्हापासून विश्वाचं हे 'प्रोजेक्शन' मला फारसं आकर्षक वाटेनासं झालं.

मग आपली दीर्घिका वजा केलेले हे कोबे, डब्ल्यूमॅप आणि आता प्लँकचे नकाशे दाखवायचे! Wink
जवळचं सगळंच मोठं दिसतं हे दाखवायला हा नकाशा चांगला आहे. अर्थात आपणच महान असा काही समज असेल तर काहीही दाखवलं आणि कितीही स्पष्टीकरणं दिली तरी फरक पडणार नाही.

ते धूलिकण पार करण्याची आपल्या दुर्बिणींची क्षमता अजूनपर्यंत नाही.

हे थोडं गोंधळाचं आहे. धूलिकणांमधून आरपार दिसत नाही, त्यांच्या पलिकडे बघण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे नाही असं काही लिहीताना गडबड झाली.

१. जमिनीवर असलेल्या महाप्रचंड रेडियो दुर्बिणींपेक्षा उपग्रहाच्या छोट्याशा कलेक्टरमध्ये अधिक चांगला सिग्नल मिळतो का? असल्यास का?

वातावरणाचा परिणाम रेडीओ लहरींवरही होतो. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या तंत्रज्ञानात रेडीओ लहरी वापरात, मोबाईल, रेडीओ, सैन्य इ. अनेक वापरकर्ते आहेत आणि त्यांच्यासाठी ठराविक रेडीओ बॅण्ड्स आरक्षित ठेवलेले आहेत. या बँड्समधे आपल्याला बघायचा आहे तो सिग्नल असेल अशी खात्री असेल (पुस्तकी ज्ञानावरून ही गणितं करता येतात.) आणि त्या सिग्नलचं खरोखर तेवढं महत्त्व असेल तर आकाशात उपग्रह पाठवण्याशिवाय इलाज नसतो.

२. नकाशाचं स्केल काय आहे? माझा अंदाज निळं म्हणजे कमी आणि लाल म्हणजे अधिक असा आहे. काही ठिकाणी लाल पुंजके दिसतात. त्याचा अर्थ काय?
३. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातून प्रकाश आणि एक्स रे वगैरे प्रचंड प्रमाणावर येतात, मात्र रेडियो लहरी येत नाहीत असं दिसतं. असं का?

दुसर्‍या नकाशाबद्दल बोलत असावास. लाल म्हणजे कमी, निळं म्हणजे अधिक आणि पिवळं-पांढरं म्हणजे फार तीव्र स्रोत असं स्केल आहे.
आपल्या दीर्घिकेचं केंद्र धनू राशीत असल्याचं रेडीओ निरीक्षणांवरूनच (दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस) समजलं होतं. कार्ल जान्स्की या अभियंत्याकडे शत्रूपक्षाच्या हालचाली बघण्यासाठी दुर्बिणी तयार करण्याची जबाबदारी होती. त्यावर काम करताना जान्स्कीला आकाशगंगेचं केंद्र फार मोठा रेडीओ स्रोत आहे हे लक्षात आलं. त्याच्या सन्मानार्थ रेडीओ खगोलशास्त्रात वस्तूची रेडीओ-तीव्रता जान्स्की या एककात मोजतात.

कोबे आणि डब्य्लूमॅपचे नकाशे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दोन्हींमधे दिसणार्‍या स्ट्रक्चरमधे (मराठी) फार फरक नाही. हे विश्वाचं तापमान आहे, निळा रंग हा थंड आणि पिवळा-लाल उष्ण भाग दाखवण्यासाठी (चित्रकलेतलीच मानकं) वापरलेला आहे. जो भाग कोबेला थंड दिसला त्या भागातली आणखी स्ट्रक्चर डब्ल्यूमॅपने दाखवली, पण दोन्ही नकाशांमधे मूलभूत फरक नाही. नकाशात मध्याच्या उजव्या बाजूला थंड भाग दोन्ही नकाशांमधे आहे, अगदी उजव्या बाजूला उष्ण भाग आहे. प्लँकची भेदनक्षमता (resolving power) दोन्ही पूर्वजांपेक्षा बरीच जास्त आहे हे चित्रांवरून दिसतं आहेच. आणि तरीही हा जो पॅटर्न आहे तो डोळ्यांना बघूनही एकसारखाच दिसतो आहे. (असं असूनही प्लँकने नवीन काय दाखवलं वगैरे वाचून लिहायला थोडा वेळ लागतो आहे. तोपर्यंत मुळात हे दाखवलेलं आहे ते काय आहे वगैरे लिहीते आहेच.) डोळ्यांनी पहा किंवा संगणकावर गुंतागुंतींचे प्रोग्रॅम लिहून तपासून पहा, प्लँकला आधीची निरीक्षणं आणि सिद्धांत खोडून काढणारं 'नवीन' असं काही सापडलेलं नाही (कारण अशी काही ब्रेकिंग न्यूज पसरलेली नाही). एकप्रकारे हे कोबे, डब्ल्यूमॅप आणि प्लँक दोन्हीचं यश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहाहा! हे असं काही मराठी आंजांवर दिसलं आणि धन्य झालो आहोत!
अशी माहिती मराठीत येणं अत्यंत आवश्यक आहे. ती आणल्याबद्दल आभार.. पुढिले लेखांकाची उत्सूकता आहे
माझ्यासारख्यालाही हा लेखांक दोन वाचनातच कळल्यासारखा वाट्टोय म्हंजे याहून सोप्या भाषेत लिहिणे शक्य नाही याची पावतीच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परिभाषा कोषानुसार
नॉईज = कुरव
coordinates = सहनिर्देशक (भैतिकशास्त्र) निर्देशक (गणित)
स्ट्रक्चर = संरचना / ढाचा

परिभाषा कोषाचे दुवे ऐसीअक्षरेच्या पहिल्या पानावर मिळतील Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान.

नकाशाचे अक्षांश-रेखांश समजणे मला जरा कठिण गेले. हा नकाशा एका गोळ्याच्या पृष्ठभागाचे ("स्फेरिकल सर्फेस"चे) प्रक्षेपण ("प्रोजेक्शन") आहे, हे समजल्यावर जरा नीट कळले.

दृश्य आकाश (दिसायला "गोलाकार द्विमिती" पसरलेले नभ-"आंगण") जणू एका गोळ्याचा आतला पृष्ठभाग आहे. दीर्घिकेच्या केंद्राकडे तोंड केले तर नभांगणाचा काही भाग आपल्या पाठीमागे असतो - मग तो सपाट नकाशावर दाखवायचा कसा? एक करता येते - नभांगणाच्या एका ध्रुवापासून कात्री घेऊन दुसर्‍या ध्रुवापर्यंत आपल्या मागून कापत जाता येते, आणि मग एकीकडेच छाट दिलेले संत्र्याचे साल जसे मारून-मुटकून सपाट टेबलावर पसरता येते, तसा नभांगणाचा हा नकाशा पसरवलेला आहे. आपल्या पाठीशी असलेले काही तारे चिरेच्या या बाजूला असले तर सपाट केल्यावर एकदम डावीकडे जातात, तर चिरेच्या त्या बाजूचे तारे सपाट नकाशाच्या एकदम उजवीकडे. अगदी उजवीकडच्या वस्तू या अगदी डावीकडच्या वस्तूंच्या खूप जवळ आहेत हे लक्षात ठेवले की पुरे.

(पृथ्वीच्या पृष्ठभागाला पॅसिफिक महासागरातून चीर देऊन सपाट पसरवून नकाशे बनवतात - त्यात देखील अगदी उजवीकडे असलेला रशियाचा भाग आणि अगदी डावीकडे असलेला अलास्काचा भाग हे दोन्ही एकमेकांच्या अगदी जवळ असतात.)

नकाशाचा केंद्रबिंदू म्हणून दीर्घिकेचा केंद्रबिंदू घेतला आहे. "विषुववृत्त" म्हणून दीर्घिकेचे प्रतल घेतले आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुव बहुधा पृर्थ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळातजवळचे निवडलेले असावे. बरोबर आहे, अदिति?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजय यांचा हा प्रतिसाद वाचून मला हे नकाशे फारच चुकीचे समजले असं वाटायला लागलंय.

माझ्या समजानुसार हा नकाशा केवळ विश्वाच्या पृष्ठभागाचा नसून साधारण गोलाकार (स्फीअर) किंवा लंबगोलाकार गोळ्याच्या आत असलेल्या सर्व घटकांचा आहे. जणू काही एखादा रंगबेरंगी चमकी भरलेला काचेचा पारदर्शक गोळा आपण बाहेरून बघतोय असा मला भास झाला.

अदिती, खुलासा करशील का? या विषयातलं माझं ज्ञान यथातथाच असल्याने प्रचंड चुकीच्या पायावर पुढची माहिती उभी रहायला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

> माझ्या समजानुसार हा नकाशा केवळ विश्वाच्या पृष्ठभागाचा नसून साधारण गोलाकार (स्फीअर) किंवा
> लंबगोलाकार गोळ्याच्या आत असलेल्या सर्व घटकांचा आहे.
तुमचे म्हणणे बरोबर आहे. नकाशा दिसणार्‍या सर्व घटकांचा आहे खरा. पण आडलेल्या घटकांचा नाही. नभ-आंगण सर्व घटकांचे (आडलेल्या घटकांचे नाही). नभांगणात जवळ-जवळ भासणारे तारे हे खरोखर खूप दूर असू शकतात. त्याच प्रकारे वरील नकाशात दीर्घेकेच्या केंद्राच्या "अगदी जवळ" असलेली काही किरणे खरे तर दीर्घिकेच्या पेक्षा खूपच दुरून मागून येत आहेत.
नभ-आंगण हे आधीच भासमान-द्विमिती आहे (म्हणजे प्रक्षेपण/प्रोजेक्शन) त्याच प्रमाणे वरील नकाशाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्पष्टिकरण उमगले आहे असे वाटतेय. भासमान-द्विमितीचा मुद्दा समजला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

मस्त! एकदम क्लीअर झाले हे वाचून सर्व काही! बहुत धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नकाशाचं विषुववृत्त आणि फळाची साल कापून सपाट करण्याची तुलना मलाही आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.loksatta.com/lokrang-news/introduction-european-space-agency-...
इथे दिसला लेख. अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हबिणंदण हो हबिणंदण अदितीबै Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
जोर्दार हाभिणंदन! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अदितीचे अभिनंदन कशाला करायचे ? ती आहेच हुशार. करायचे झाले तर मी 'लोकसत्ता' चेच करीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.