आठवणीतले प्रवास दुचाकीवरचे - भाग २

'दुचाकीवर लांब जाऊन आलेला' म्हणून मित्रांच्यामध्ये खमिसाची कंठपट्टी जरा कडक करता आली. त्या बळावर वसंताबरोबर इंड-सुझुकीवरून ओतूर-माळशेज करण्याचे ठरले. झाले असे की वसंताच्या मोठ्या भावाने घेतलेली इंड-सुझुकी पुण्यात होती. भाऊ पुणे सोडून ओतूरला स्थायिक व्हायला म्हणून गेला होता आणि त्याची मोटरसायकल तिथे नेऊन पोहोचवायची होती. पहिल्या प्रवासाच्या तुलनेत हा प्रवास अगदीच किरकोळ होता.
पण पुढच्या प्रत्येक लांब पल्ल्याच्या प्रवासात जाणवत गेल्या तशा त्या प्रवासातही काही गोष्टी नव्याने जाणवल्या. एक म्हणजे चालवण्यासाठी मोटरसायकल ही स्कूटरपेक्षा कितीच्या किती आरामदायक असते. दुसरे म्हणजे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मला तरी स्कूटरच नेणे भाग होते. मोटरसायकल एक तर घरी नव्हती. आणि कुणाची मागून घेऊन जायचे म्हटले तर सगळे सामान पाठीवर वाहणे भाग होते. स्कूटरच्या डिकीपेक्षा मोटरसायकलची डिकी आखडू असते. एका डिकीत काही फारसे मावत नाही. आणि दोन डिक्या लावल्या तर मागे बसणारा बोंबलतो. शिवाय 'टायर पंक्चर झाला तर काय' ही भीती कायम (जरी मोटरसायकलचा टायर स्कूटरच्या टायरच्या तुलनेत कमी पंक्चर होत असला तरी).
त्या पुणे-ओतूर-माळशेज प्रवासात एक वेगळीच मजा आली. एक तर इंड-सुझुकी तेव्हा अगदीच नवीन होती. त्यामुळे तिच्या स्पीडोमीटर कन्सोलकडे नुसते पाहणे हादेखिल एक सुखद अनुभव होता. टाचेच्या एका हलक्याशा झटक्याबरोबर अलगद पुढचा/मागचा गियर गाठणे हे तर स्वप्नवतच होते. जावा/यझदीचे गियर म्हणजे लाथा घालीत अन कडर्र कडर्र कट्ट असले आवाज करीत शोधावे लागत. पिक-अप, स्वच्छ दिसेल असा प्रकाशझोत, वळण घेताना इतरांना दाखवण्यासाठी इंडिकेटर. न थांबता लांबचा पल्ला मारला तरी पाठ न दुखणे. शिवाय मागे बसणाराही सुखात असे. स्कूटरवर (किमान 'प्रिया'वर) मागे बसणारा अशा अवघडलेल्या परिस्थितीत असे की 'कधी एकदा थांबतो' असे त्याला सुरुवातीपासूनच होई. बसणारी असेल तर ती त्याकाळच्या प्रघाताप्रमाणे एका बाजूला पाय ठेवून बसे, आणि स्कूटर वळवताना फारच सावचित राहावे लागे.
वेग साठ ते ऐंशीच्या दरम्यान राखूनही इंजिनवर ताण न येता जात राहणे (त्याला इंग्रजीत cruising म्हणतात हे नंतर कळाले) ही त्या छोट्याशा प्रवासातून झालेली कमाई.
आणि माळशेज घाटातूनही एंजिनवर ताण न येता सेकंड/थर्ड गिअरमध्ये निवांतपणे चढता येते हेही तेव्हा कळाले.
मग मोटरसायकलनेच जायचे तर थोडे लांब का नको असे म्हणून तीर्थरूपांच्या एका मित्राची नवीन हीरो होंडा मिळवली आणि हर्‍याबरोबर कोल्हापूरला जाऊन आलो. पण इंड सुझुकीच्या तुलनेत हीरो होंडा पळवायला फारशी उपयोगाची नव्हती. ऍव्हरेज अगदी डोळे दिपवणारे मिळे (आम्हांला सत्तर मिळाले), पण cruising speed ची साठ ही परमावधी होती. आणि गियर इंड सुझुकीच्या बरोबर उलटे. इंड सुझुकी अगदी सवय होईस्तोवर चालवलेली नव्हती कधी, पण हीरो होंडाच्या तुलनेत इंड सुझुकीचे गियर जास्ती intuitive वाटतात. मला तरी.
एव्हाना आमच्याकडे 'प्रिया' जाऊन बजाज सुपर आली होती. चार गियर, बरी उंची, थोडी अधिक (वाटणारी) ताकद एवढे तिच्यात होते. एव्हाना पदवी पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षणात अडकलो होतो.
एनसीपीएमध्ये दोन संशोधकांनी 'मेलडिक मूव्हमेंट अनालायजर' आणि 'बोल प्रोसेसर' नामक यंत्रे तयार केली होती. हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या अभ्यासासाठी. तो माझाही अभ्यासाचा विषय होता त्यामुळे मला त्या यंत्रांवर काम करता येईल का याची चाचपणी करायला जायचे होते. स्कूटरही नवीन होती, म्हणताना घेऊन गेलो. त्यावेळेस घाट उतरल्यावर खोपोली सुटले की पनवेलपर्यंत (मधला रसायनीचा फाटा सोडला तर) काहीही नव्हते. पनवेलनंतर लगेचच कळंबोली, मग बेलापूर, मग एलपीची फॅक्टरी (नेरूळ तेव्हा वसायचे होते), मग वाशीची थोडीफार जाग, आणि खाडीपूल. वाशीपेक्षा बेलापूरचे सिडको ऑफिस आणि कोकण भवन हेच मोठे वाटत. त्या परिसराला कौतुकाने 'नवी मुंबई' असे म्हणायला सुरुवात झाली होती.
ठाण्याच्या खाडीवरचा पूल तेव्हा तसा नवीनच होता. मुंबईला जाणार्‍या यष्टीगाड्यांच्या पाट्यांवर 'खाडीपूल मार्गे' असे अभिमानाने रंगवलेले असे. जसे पंधरा वर्षांपूर्वी पुण्याहून मुंबईला जाणार्‍या काही (नशीबवान) गाड्यांवर 'मेगाहायवे मार्गे' असे रंगवलेले असे तसेच.
मानखुर्दचे रेल्वे स्टेशन थोडीफार वर्दळ दाखवी. पण थेट चेंबूर गाठेपर्यंत मुंबईत असे पोहोचल्यासारखे भासत नसे. 'आरके स्टुडिओ' आणि 'टीआयएसएस' दिसले की मुंबई आली असे समजण्याची प्रथा होती. मग देवनारचा खाटिकखाना, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सायन आणि दादर टीटी. तिथे उजवीकडे वळून प्लाझा, सेनाभवन. परत उजवीकडे वळून सेनापती बापट रस्त्याने थेट माहीम, बांद्रा. रेल्वे ओलांडून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, खार, सांताक्रूझ आणि पार्ले. पार्ल्यात अनंतामामाकडे मुक्काम करायचा होता. शिवाय 'एनसीपीए'मध्ये काम करणारा साउंड रेकॉर्डिस्ट माझा मित्र होता. तोही पार्ल्यालाच रहात असे. त्याला घेऊनच सकाळी 'एनसीपीए' गाठावे असा विचार होता.
सायनवरूनच उजवीकडे वळून धारावीतून थेट कलानगरला निघण्याची गंमत तेव्हा ठाऊक नव्हती. कदाचित तो रस्ता तेव्हा एव्हढा प्रचलित नसेल. मुंबैकरांना ठाऊक.
चेंबूर गाठल्यावरच अडचणींची कल्पना यायला लागली. पहिली अडचण म्हणजे दुचाकीचालक हे पुण्यात बहुसंख्येने असल्याने रस्त्यावरही त्यांचेच राज्य असे. रिक्षावाले सोडले तर कुणी दुचाकीचालकांना त्रास द्यायला फारसे धजावत नसे. इथे मी अचानक 'अतिअल्पसंख्यांक' या श्रेणीत ढकलला गेलो. दुसरे म्हणजे चारचाकी वाहने, टॅक्स्या आणि 'बेस्ट'च्या बसेस हे सगळे एकमेकांशी शर्यत लावल्याच्या थाटात झन्नाट सुटलेले होते. त्यात अंग कसे चोरावे हेच मला समजेनासे झाले. आणि तिसरी अडचण म्हणजे वाहतुकीचे नियम, विशेषतः सिग्नलला उभे असताना, पाळायची अघोषित सक्ती. 'लेन कटिंग' हा शब्द आणि 'तो गुन्हा आहे' ही माहिती मला पहिल्यांदाच झाली. रस्त्याची डावी कड धरून ठेवल्यामुळे मला दादर टीटीला उजवीकडे वळताच आले नाही (पोलिसाने मला 'लेन कटिंग' करू दिले नाही). मग नायगावला फायर स्टेशनपाशी वळून मोरू परतुनि आला.
पार्ल्याला पोहोचेपर्यंत जरा सवय व्हायला लागली. रस्ते नीट समजावून घेतले तर हिंडता येईल असा आत्मविश्वासही अंकुरायला लागला.
दुसर्‍या दिवशी दमट-घामट उन्हात दीड तास खर्चून आणि एका सिगरेट पाकिटाइतके प्रदूषण फुप्फुसांत भरून घेऊन आदित्यबरोबर 'एनसीपीए' गाठले. काम चटकन झाले. झाले म्हणजे, एकादा आठवडाभर मुक्काम करायला लागेल असे कळले. मग स्कूटर घेऊन पार कुलाब्यापर्यंत हिंडून आलो. हे रस्ते बरे होते. संध्याकाळ कोवळी असतानाच पार्ले गाठले आणि अनंतामामाच्या कहाण्या ऐकत बसलो. हा इसम मर्चंट नेव्हीत होता. त्याच्याकडे देश म्हटला की एकादी तरी कहाणी निघेच. त्यामुळे मध्यरात्र होईस्तोवर बोलिव्हिया, फिनलंड, कंपुचिया असल्या (त्यावेळेपर्यंत तरी) अनवट देशांच्या कहाण्या ऐकत बसलो. भल्या सकाळी निघून दुपारी पुणे गाठले.
अजून एकदा(च) मुंबईला स्कूटरने जाण्याचे धाडस केले. कलिना कॅम्पसमध्ये आठवडाभर काम होते. तेव्हा वाशी आणि परिसराला सूज येऊ लागल्याचे जाणवले.
त्यापुढचा मोठा असा प्रवास म्हणजे गोवा!
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये माझे जाणेयेणे सुरू झाले होते. तिथला एक नमुना म्हणजे प्रकाश नावाचा एक जाटकुलीन वळू. उच्चार परकाश असा. हा दिग्दर्शनाचा विद्यार्थी होता. आणि माझ्या गुरुजींच्या अनेक स्वयंघोषित चेल्यांपैकी एक.
अशा या परकाशची एक गर्लफ्रेंड होती. कुणी घोरपडे म्हणून. बेळगांवच्या जवळच्या कुठल्याशा सरदार घराण्यातली. आणि तिचे वडील ब्रिगेडिअर वा तत्सम कुणीतरी होते. तर एकदा परकाशला तिला भेटायची जबरदस्त उबळ आली. ती तेव्हा बेळगांवला होती. बेळगांवला जायचे तर बसने जाता येते याचा त्याला अंदाज आला नाही बहुधा. त्याने संजय रासनेची हीरो होंडा मिळवली. संजय हा एक कॅमेरामन होता. चांगलाच गोष्टीवेल्हाळ आणि किस्सेबहाद्दर होता. दोन वर्षांमागेच अकाली गेला.
तर मोटरसायकलवर एवढ्या लांब जायला मिळते आहे म्हटल्यावर "मी चालवणार" या अटीवर मी जायला तयार झालो. परकाशला तसेही दुचाकी चालवण्यात एव्हढे काय अप्रूप असते याचा गंध नव्हता हे बरे होते.
संजयकडून मोटरसायकल ताब्यात घेतली, जमतील तेव्हढे पैसे घेतले आणि निघालो. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे संजयने समोरच्या साईड-गार्डला एक भलेमोठे रबराचे मॅट बांधून सिलिंडर आणि प्लगला परदानशीन केले होते. ते मॅट काढले. कारण गावातल्या गावात ठीक होते, पण हायवेच्या चालवण्याला एअर-कूल्ड एंजिनला हलती हवा गरजेची असते.
हीरो होंडा असल्याने cruising साठीतच होते. खंबाटकी चढताना एकदोनदा तर फर्स्ट गिअरपर्यंत जावे लागले. डकांव डकांव करीत कोल्हापूर गाठले. ओपलला नळी फोडून पुढचा पल्ला घेतला. तेव्हा सुवर्ण चतुष्कोन भानगड अजिबात अस्तित्वात नव्हती. पण मुंबई-बेंगलोर महामार्ग बराच चांगला होता. विशेषतः कागलच्या पुढचा. उन्हे उतरायला लागण्याआधीच आम्ही बेळगांव गाठले. एका लॉजवर खोली घेतली आणि आधी तासभर पाठीला आराम दिला. परकाश तेवढ्यात त्याच्या गर्लफ्रेंडला फोन करून आला. तिने संध्याकाळी आम्हांला घरी जेवायला बोलावले होते.
बेळगांवची हवा खरेच सुरेख होती. संध्याकाळ फारच आल्हाददायक होती. आणि घोरपडेंचा बंगला कुठल्यातरी जुन्या, भरपूर झाडी असलेल्या कॉलनीत होता. उंच सीलींगचा, बाहेर भरपूर मोठे व्हरांडे असलेला तो बंगला पाहूनच आनंद वाटला.
आत गेल्यावर आम्हांला एका ब्रिटिशकालीन सोफ्यावर बसवण्यात आले आणि (तेव्हा मिलिटरी कँटीनमध्येच सहज मिळणारे) लेमन स्क्वॉश पाजण्यात आले. परकाशची 'गर्लफ्रेंड' काही समोर येईना. तिच्या मातोश्रीच इकडच्या तिकडच्या गप्पा करीत बसल्या. मी मिलिटरीतल्या तात्यामामाकडून ऐकलेल्या जॅकरिफ, डोग्रा, गोरखा असल्या पलटणींच्या कहाण्या उलगडल्या. अखेर अर्ध्या तासाने त्याची 'गर्लफ्रेंड' आली.
होती चांगलीच सुंदर. गोरीपान, शेलाटी वगैरे. पण त्याची 'गर्लफ्रेंड' मात्र नव्हती. असलीच तर एकदिशामार्गाने होती. ती येऊन बसली आणि तिने आमच्या दोघांशी बोलणे सुरू केले. अमेरिका कशी एकदा भारताबरोबर काही चर्चा झाली की तेवढीच लांबरुंद चर्चा पाकिस्तानाबरोबरही करते तसा तिने परकाशबरोबर आणि माझ्याबरोबर समसमान वार्तालाप सुरू केला. त्याला दोन प्रश्न की मला दोन प्रश्न. मला तिच्याबरोबर बोलायला छान वाटत होते. खोटे का बोला?
जेवण तयार असल्याचा सांगावा आला. आठ माणसांच्या डायनिंग टेबलवर आम्ही चौघे बसलो. जेवण सुरेख होते एवढे आठवते, पण काय होते ते लक्षात नाही. जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाताना तिने तिचा पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह दाखवायला काढला. तेव्हा माझाही संग्रह बर्‍यापैकी असल्याचे मी सांगताच संभाषणामध्ये भारतापेक्षा पाकिस्तानला झुकते माप मिळाले.
रात्री परत रूमवर आलो तेव्हा परकाश अस्वस्थ होता. माझ्यापासून धोका होता म्हणून नव्हे. परकाश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत तरी होता. मी नुसतेच हातचे सोडून दिले होते आणि पळत्यापाठी लागायचे धाडस करीत होतो. थोडक्यात मी सरळ सरळ यंग इनएलिजिबल बॅचलर होतो. पण परकाशला त्याच्या गर्लफ्रेंडने केलेले दुर्लक्ष सतावत होते. तो लॉजच्या बाहेर जाऊन एक एसटीडी करून आला आणि त्याने जाहीर केले, "आपण उद्या गोव्याला जायचे". त्याची अजून एक गर्लफ्रेंड गोव्याला मेडिकल कॉलेजात शिकत होती. 'तू नही और सही' या ब्रीदवाक्याला अनुसरून त्याने आता तिकडे मोर्चा वळवला.
मला काय आनंदच होता. एनसीसी कँपनंतर गोव्याला जाणे झाले नव्हते. आणि पुण्यात माझ्यासाठी कुणी व्यक्ती वा काम खोळंबून राहण्याची शक्यता शून्य होती.
भल्या पहाटे उठून खानापूरमार्गे रामनगर गाठले आणि अनमोडच्या घाटातून मोटरसायकल हाणली. त्याही वेळेस तिथे खाणींचे डंपर धूळ उडवत हिंडत होते. पण घाट सुरेख आहे. घाट असे म्हणता येणार नाही, कारण कोयनानगर वा आंब्याच्या घाटासारख्या डोळे फिरवणार्‍या दर्‍या दिसत नाहीत. जंगलच इतके दाट आहे की थेट खाली मोल्लें गाठल्यावर घाट संपल्याची आणि गोव्यात आल्याची जाणीव एकदमच होते. हा रस्ता डंपरची कटकट सोडल्यास नेहमी जाण्यायेण्यासाठी वापरण्यासारखा आहे, जर फोंडा वा मडगांवला जायचे असेल तर. म्हापशाला वा पणजीला जायला आंबोलीचा घाट बरा.
परकाशची गर्लफ्रेंड दुसर्‍या दिवशी येणार आहे ही माहिती त्याने गोव्यात पोहोचल्यावर जाहीर केली. थोडक्यात तो दिवस आम्हांला उंडारायला मोकळा होता. मोटरसायकल हाताशी होतीच म्हणताना थेट काणकोण गाठले. आणि किनार्‍याच्या सगळ्यात जवळचा जो रस्ता गावेल तो धरून तिपारी कोलव्याला पोहोचलो. पालोलें आणि आगोंद्याचे किनारे आम्ही स्पर्शले एवढे आठवते.
काही रस्ते फसवे निघाले. रस्ता आहे असे वाटत असताना तो तीनफुटी रस्ता अचानक दीडफुटी होऊन कुणाच्या तरी अंगणात वा थेट किनार्‍यावरच्या वाळूत संपे.
पण त्या भेटीत गोव्याने जे गारूड केले ते दिसामासाने वाढतच गेले.
परकाशची कटकट सुरू झाली (त्याच्या दृष्टीने 'तू नही और सही' या आणि याच कारणाने तो गोव्यात आला होता. तीनफुटी रस्ते वा साठफुटी हायवे, त्याला काही घेणेदेणे नव्हते) की कुठल्यातरी टावराणात त्याला पेगभर फेणी पाजत असे. मग तो हरयाणवी हिंदीत कुठलीतरी भयाकारी प्रेमगीते म्हणत मागल्या सीटवर अस्वलासारखा झुलत बसे. मी मात्र किंग्ज अथवा बेलोज बिअर सांभाळून असे.
कोलवा बीच गाठला आणि संध्याकाळ वाळूत लोळून काढली. तिथे किनार्‍यावरच्या टावराणात परकाशला मडगांवातला कुणी कोंकणी फिल्म-मेकर गाठ पडला. रात्री राहण्याची सोय झाली. त्याबदल्यात आम्हांला एक कोंकणी फिल्म पाहावी लागली. पणजीच्या सिटी चर्चच्या पायर्‍यांवर एक म्हातारा विलाप करतो आहे असे त्यातले दृष्य तेवढे आठवते.
लॉजचा खर्च वाचला. तसेही पैसे संपतच आले होते. गुरुजींना पुण्याला फोन केला. त्यांनी मडगांवच्या एका कुळाचा पत्ता दिला.
गुरुजींची कुळे तशी कुठेही पसरलेली असत. हा कुणी केरळी इसम होता, मडगांवच्या कॅनरा बँकेत नोकरीला होता. सकाळी उठून त्याला फोन केला. तो फातोर्ड्याच्या जवळ कुठेतरी राहत होता. त्याचे घर गाठले नि पैसे ताब्यात घेतले.
परकाशचा गर्लफ्रेंडचे काही खरे दिसत नव्हते. ती संध्याकाळी येईल असे त्याचे म्हणणे होते. पण मला तरी ते शरद पवारांच्या पाठिंब्यासारखे संशयास्पद वाटत होते. पण हरकत नव्हती. खिशात पैसे होते आणि हातात अख्खा दिवस होता. वास्कोला जाऊन फेरीतून दोना पावला गाठले. आणि पणजी - पर्वरी - म्हापसा करीत अंजुना बीच गाठला. तिथे परदेशी मंडळी सूर्यस्नान करीत असतात, आणि त्यात निम्म्याहून जास्त बायका असतात अशी अफवा परकाशच्या कानी आली होती. ती खोटी निघाली. मुळात अंजुनाला बीच असा नाहीच. त्या तोकड्या बीचपेक्षा वास्कोच्या एमपीटीचा बीचही मोठा ठरेल.
पण तिथपासून हिंडायला सुरुवात केली आणि बागा, कलंगूट, रेईस मागूस करीत संध्याकाळी परत मडगांव गाठले.
परकाशची (तिथली) गर्लफ्रेंड नावेलीला राहत होती. तिच्या फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा ती (खरेच) तिथे होती. मग परकाश तिला घेऊन कुठेतरी बाहेर गेला आणि त्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅट-पार्टनरसोबत मला दीडेक तास वेळ काढावा लागला. तिने बिचारीने मला नूडल्स करून दिल्या, सिगारेट ओढण्यासाठी बाल्कनीचा दरवाजा उघडून दिला आणि would you like to have some beer हे पाचवेळेस विचारले. मी पाचही वेळेस नकार दिला. त्या रात्री राहण्याचा बेत असा ठरलेला नव्हता. त्यामुळे रात्रीतूनच परतीच्या प्रवासाला लागावे लागेल असा माझा अंदाज होता. आणि त्यांच्याकडच्या बिअर थंडही नव्हत्या. मी 'हो' म्हटले असते तर तिने त्या फ्रीजमध्ये टाकल्या असत्या.
माझा अंदाज खरा ठरला. परकाश परत आला नि 'चला चला' करू लागला. आम्ही लगेच निघालो. अक्षे कुठ्ठाळी, सांताक्रूझ, पणजी, पर्वरी, म्हापसा करीत पेडणें गाठले. तोवर अकरा वाजायला आले होते. मग एका बारसमोर मोटरसायकल उभी करून आत शिरलो. इथे मात्र मी फेणीवर (काजू फेणी; नारळाची फेणी नासक्या नारळासारखी वास मारते) हात मारला. परकाशला बहुतेक याही 'गर्लफ्रेंड'ने ठेंगा दाखवला होता. तो 'देवदास' मूडमध्ये पेगमागून पेग झोकत होता. मध्यरात्रीच्या सुमारास निघालो.
पेडण्यापासून बांद्यापर्यंत अंतर ते कितीसे? तीसेक किलोमीटर असेल. पण फेणीने काम केले होते. कारण हायवेचे काही काम चालू होते आणि त्यामुळे 'डायव्हर्शन्स' तयार करण्यात आली होती. त्या 'डायव्हर्शन्स' मध्ये काहीतरी घोळ व्हायचा आणि आम्ही परत पेडण्यालाच पोचायचो. दोनपाच वेळेस असे झाल्यावर अखेर रस्ता गावला आणि आम्ही रत्नागिरीच्या दिशेने निघालो.
कणकवली आणि नांदगांवच्या मध्ये कुठेतरी मला अचानक झोप अनावर झाली. रस्त्याजवळ एक नुकतेच रंगवलेले दत्ताचे देऊळ दिसले. मी मुकाट मोटरसायकल त्या अंगणात उभी केली आणि तासभर देवळाच्या ओसरीत झोप काढली. परकाश 'सोना है, नो प्रोब्लेम, जागना है, नो प्रोब्लेम, जाना है, नो प्रोब्लेम, आना है, नो प्रोब्लेम' या मंत्राचा जप करीत बसला. स्वतःला मोटरसायकल चालवता येते हे बहुधा तो विसरला होता.
तासाभराने उठून परत मोटरसायकल हाणली आणि उजाडत्या सूर्याला हातखंब्यापाशी गाठले. अजून झोप मिळाली तर बरे असे वाटू लागले म्हणताना गाडी वळवली आणि रत्नांग्रीला गेलो. परकाश एव्हाना 'रत्नागिरी, जहांपे रत्ना गिरी थी' अशा पातळीवर पोहोचला होता. मधूकाकांच्या घरी जाऊन चार तास झोप काढली आणि भर दुपारी परत मोटरसायकलला लाथ घातली.
संगमेश्वर, चिपळूण, खेड, कशेडी, पोलादपूर.... गावांमागून गावे मागे पडत होती. परकाश मागल्यामागे सिगारेट पेटवून द्यायचा, ती ओढत मी गाडी हाकत होतो. डोके तिरतिरत होते.
यावेळेस वरंधा घाट घेतला. भोरला पोहोचेपर्यंत 'हँगओव्हर' साथीला होता. भोरला एक 'देशी दारूचे दुकान' दिसल्यावर परकाश चेकाळला आणि 'कॅफे रम'चे दोन दोन घोट घेऊन आम्ही परत सुस्थितीत आलो.
अशा रीतीने चार दिवसांत साधारण सव्वा हजार किलोमीटर प्रवास करून आम्ही परत आलो.
सहप्रसिद्धी: 'मनोगत'

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

छान आहे हा भागदेखील.
अजुन येउद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलेच. लेन कटिंग करू न देणारा पोलिस मुंबईत होता हे वाचून 'गेले ते दिवस' असा सुस्कारा टाकला आणि डोळेही पाणावून घेतले.
क्रमशःबद्दल खूपच उत्सुकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ही भाग आवडला, पण आधीचा जास्त आवडला.

परकाशचं वेगळं एक व्यक्तिचित्रच का लिहीत नाही तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीसारखंच म्हण्टो.. हा भाग छान आहे पण आधीचाच अधिक आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!