उत्तर कर्नाटकः काही क्षणचित्रे (२/३)

भाग - | | ३
~~~~~~~~
"कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू" वगैरे मध्ये विठ्ठल कर्नाटकाशी निगडित आहे हे कसे? असा प्रश्न पूर्वी अनेकदा पडत असे. मात्र तेव्हाच एका परिचितांनी मूळ कर्नाटकातले विठ्ठल मंदिर, बहामनी राज्यांचा हल्ला वगैरेची उत्तम माहिती दिली होती. त्याही आधी तेनालीरामा वगैरे मालिका आणि एकूणच विजयनगर साम्राज्याच्या संपन्नतेविषयी अनेकांनी केलेले लेखन, आणि हम्पीतील स्थापत्याला मातीस मिळवायला लागलेले सहा महिने वगैरे ऐकून एकूणच "हम्पी"बद्दल अतिशय उत्सुकता होती.

हम्पीला पोचलो आणि समोरच्या विरूपाक्ष मंदिराच्या उंचच उंच कळसाकडे बघत राहिलो. आता "शिल्लक राहिलेले" हम्पी व्यवस्थित बघायला ३ दिवस हवेत असे आमच्याभोवती अधिकृत गाइडचा घोळका जमला होता त्यापैकी एकाने सांगितले. मात्र आमच्या कार्यक्रमात केवळ एक दिवस असल्याने आम्ही ५-६ तासांच्यावर देऊ शकत नव्हतो कारण पुन्हा रात्री हुबळीत पोचायचे होते. समोरच सायकली भाड्याने मिळत होत्या. अनेक परदेशी पर्यटक, हातात संदर्भपुस्तके घेऊन त्या सायकली भाड्याने घेताना दिसत होते. आम्ही गाइडची मदत घ्यायची हे ठरवूनच आलो होतो. आपल्या वाक्चातुर्याने एरवी भाजीवाल्यापासून ते बोहारणी अन् साडीवाल्यांपर्यंत अनेकांना जेरीस आणणार्‍या आमच्यातल्या रणरागिणींनाही इथे भाषेअभावी प्रभावी बार्गेनिंग जमेना. इतक्यात "मी तुम्हाला पाच तासात सगळ्या महत्त्वाच्या वास्तूंमध्ये घेऊन जाईन. तुमची कार असल्याने बरीच ठिकाणं कव्हर करायचा प्रयत्न करता येईल" असं बर्‍यापैकी सफाईदार ढंगात मराठीत बोललेली वाक्ये कानावर आली आणि मग बार्गेनिंगकारांनी आपला किल्ला व्यवस्थित लढवला आणि विंग्रजी व हिंदी गाईडांपेक्षा किंचित अधिक पैसे द्यायला तयार होऊन आम्ही हा गाईड निवडला.
काही वर्षांपूर्वी विरूपाक्ष मंदिरापासून हम्पी बघायला सुरवात होत असे. मात्र आता त्याच्या बाहेरच काही पडझड झालेले खांब आहेत तिथे थांबून गाईड माहिती देऊ लागला. "हा हम्पी बाजार. तुम्ही काही वर्षांपूर्वी इथे आला असता तर इथे तुम्हाला बाजार दिसला असता."
"काही वर्षांपूर्वी? पण हे सगळं शेकडो वर्षांपूर्वी नाहीसं झालं ना?"
अपेक्षित प्रश्नावर हसून तो म्हणाला "शेकडो वर्षांपूर्वी या बाजारात ढिगाचे वाटे करून सोनं विकलं जात होतं.. आता इथे हॉटेले, कॅसेट, फोटो यांची दुकाने होती."
माझ्या ग्रुपमधील एकजण आठ-दहा वर्षापूर्वी आला होता तेव्हा तिथेच ते जेवल्याचे त्याला आठवत होते.
"मग? आता ती दुकाने कुठायत?"
"हटवली. हे ठिकाण वर्ल्ड हेरिटेज साईट झाल्यावर राज्यसरकारने इथली सगळी अतिक्रमणं हटवली आहेत."
(बाजूला दिलेला फोटो विकिपीडियावरील २००७ सालचा आहे. विरूपाक्ष मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली आधुनिक घरे, दुकाने, वाहने त्यात स्पष्ट दिसतात. आता हे सारे हटवले आहे. मूळ बाजाराच्या खांबाच्या आधाराने तिथे वस्ती होती. मागे जी नदी दिसते तेथील घाट वहिवाटीचा होता जिथे आता जायला बंदी आहे व तेथे पुरातत्त्व खात्याचे काम चालू आहे.)
समोरचे खांब, भिंती आता ऑईलपेंट किंवा डिस्टेंपरने रंगवलेले दिसत होते. मात्र तेव्हढं नजरेआड केलं तर या बाजाराच्या व्याप्तीची सहज कल्पना येत होती.
"चला, किमान कुठेतरी सरकार काहीतरी करतंय" असा एक जनमताने सुस्कारा सोडला, अतिक्रमण करणार्‍यांना नावं ठेवली आणि विरूपाक्ष मंदिराकडे मोर्चा वळवला. गाइडने मंदिराच्या रचनेची, तेथील कोरीव कामातील मूर्तीची यथोचित माहिती दिली. त्याला माहीत असलेल्या पौराणिक कथांबद्दल आमच्या ग्रुपमधील काही मंडळींना जरा अधिकच माहिती असल्याने काही वेळ त्याने श्रवणभक्ती केली हे आम्हाला विशेष आवडले. भाषणबाजीपेक्षा किंवा अनेकदा गाईड करतात तशा पोपटपंचीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तो माहिती देत होताच शिवाय विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना त्याच्याकडे योग्य उत्तरे होती.
विरूपाक्ष मंदिरात अर्धा-पाऊण तास भटकल्यावर आमचा मोर्चा पुन्हा गाडीकडे वळवला. गणेश मंदिरातील एका दगडापासून बनलेली उंचच उंच गणेश मूर्ती, लक्ष्मी-नरसिंह मंदीरातील विशाल नरसिंहमुर्ती, गजशाळा, राणीचा तत्कालीन एअर कंडीशनिंग सिस्टिम असलेला महाल, राजाचा महाल, दरबाराची जागा, त्यावेळची दगडी पाईपलाईन, जलविहार करायचा स्विमिंग पूल वगैरे बरेच काही अतिशय उत्साहाने दाखवले. शेवटी विठ्ठल मंदिराकडे जात होतो तेव्हा गाडीत झालेला संवाद
"बाकी काय हो, तुम्ही राहता कुठे?" आम्ही गाइडना विचारले
"इथेच नव्या वस्तीत."
"नव्या वस्तीत म्हणजे?"
"आधी विरूपाक्ष मंदिराच्या भोवती दुकानं घरं होती ना तिथे एक घर माझंही होतं. ते तोडून आम्हाला नव्या वस्तीत हालवलं आहे."
काही क्षण सगळेच गप्प झाले.
"पण काय हो मगाशी आम्ही अतिक्रमण करणार्‍यांबद्दल जे काही बोललो तसे अनेक पर्यटक बोलत असतील. मग तुम्हाला वाईट नाही वाटत?"
"आता वाईट काय वाटून करणार? आमच्या आधीच्या पिढ्याही तिथेच राहत होत्या. इंग्रज येईपर्यंत आपण बघितली ती ठिकाणं तर शेतात वगैरे विखुरलेली होती. काही चंदनाच्या वास्तू जाळल्या गेल्या होत्या त्याचे बेस जमिनी खाली गाडलेही गेले होते. हम्पी हाव फक्त विरूपाक्ष मंदिरापुरते त्याच्या भोवती शिल्लक राहिले होते. आमची रोजी रोटी या मंदिराच्या साहाय्याने चालू होती."
"मग तुम्हाला इथून निघून जायला सांगितल्यावर आंदोलन वगैरे नाही झालं?"
"झालं ना. लोकांनी विरोध केला. पण आमच्यातले एक गृहस्थ आहेत आम्ही त्यांना "अण्णा" म्हणतो. त्यांनी आमच्यातल्या काहींना सांगितलं की आज ना उद्या सरकार इथून आपल्याला हटवणार आहे. तुम्ही हक्कांसाठी झगडा, पण त्याच बरोबर पुढे काय करता येईल तेही बघा. आम्ही मग हम्पीचं महत्त्व, विजयनगर साम्राज्य, इथे पुरातत्त्व खात्याला मिळत गेलेल्या वास्तू यांची माहिती मिळवायला लागलो. इथे शनिवारी-रविवारी उत्खनन बंद असतं तेव्हा लपून त्या साईटवर जाता यायचं. तेव्हा 'फर्स्ट हँड' माहिती मिळवायचा छंद लागला. काही पुरातत्त्व खात्यातील अधिकारी ओळखीचे झाले त्यांच्याकडूनही बरीच माहिती, स्थापत्य बघताना बघायच्या गोष्टी याबद्दल शिकलो. जेव्हा हे ठिकाण 'वर्ल्ड हेरिटेज' झाले तेव्हा इथे अधिकृत गाईड नेमायसाठी परीक्षा झाल्या. आम्हाला चांगल्या मार्कांनी अधिकृत गाइडचा हा बॅच मिळाला. वस्तीवरचे कित्येक जण उत्खननाच्या कामावर अजूनही जातात. आमचंही लक्ष नवं काय बाहेर येतंय याकडे असतंच. मूळ वस्ती गेल्याचं आता तितकंसं दु:ख वाटत नाही. नवीन वस्ती हम्पीपासून दूर नाही. शिवाय अनेकांना रोजगार मिळतोच आहे. मात्र आम्हाला विरोधासोबत भविष्याची तजवीज करून ठेवायचं श्रेय मात्र आमच्या "अण्णांचं" आहे. त्यांच्यामुळेच आमचं हॉटेल तोडल्यावरही आम्ही दोन्ही पायांवर उभे आहोत आणि अधिक जास्त कमावतोय. दोन वर्षांपूर्वीच गेले ते!" मग तो अचानक गप्प झाला.
इतका वेळ सगळे जण फक्त ऐकत होत. विठ्ठल मंदिर समोर आलं. आमच्या सोबत वेगळ्या विषयावर बोलणार्‍या त्या गृहस्थातील "गाईड" पुन्हा जागा झाला. विठ्ठल मंदिरातील विविध वाद्यांच्या आवाजात वाजणारे खांब, त्यांचं इंजिनियरिंग कसं अजून कोणालाच समजलं नाहीये वगैरे माहिती देण्यात तो दंग झाला. अन् आम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाचा मूळचा गाभारा आता रिकामा बघत होतो!

~~~~~~~~

आमचा ड्रायव्हर हा खरंतर स्वतंत्र व्यक्तिचित्र लिहायचा विषय आहे. त्याचे आमचा रथ सुरक्षित हाकणे, हिंदी भाषा अवगत असणे, गाडी उत्तम स्थितीत राखणे वगैरे चांगल्या गोष्टी आहेतच. पण हा मनुष्य प्रचंड लाजरा होता, विशेषतः जेव्हा बायका त्याच्याशी बोलायच्या तेव्हा. हम्पीमधुन पुन्हा हॉस्पेटला पोचायला ३ वाजले होते. आमच्या हॉटेलातील वीज गेलेली होती. इतक्या जवळ तुंगभद्रा डॅम असूनही अख्खे हॉस्पेट बहुदा जनरेटर्सवरच चालते. आमच्या हाटेलवाल्याचा जनरेटर रात्रभर चालून गतप्रभ झाला होता. एसी असल्याने रेस्टॉरंटमध्ये पंखे बसवलेले नव्हते, खिडक्यांचीही योजना नव्हती. तेव्हा त्या भट्टीत बसून जेवणे अशक्य होते. मी ड्रायव्हरभौला सांगितले की "आम्ही आता चेक-आऊट करतोय. तुला एखादं चांगलं वेजिटेरीयन जेवण मिळणारं हॉटेल माहीत असेल तर तिथे जेवूयात आणि मग निघूयात".
"ठीक है!" असं तो म्हणाला.
सामान गाडीवर चढवून आम्ही निघालो. सुटसुटीतपणे बसावे + नेहमी मुलग्यांनीच का आरामात बसायचं? वगैरे म्हणून बायकोने पुढे, ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर, बसायचे ठरवले. आम्ही निघालो. हॉस्पेट तसेही अत्यंत गलिच्छ शहर आहे. त्यात अजून काही बघण्यासारखे नसल्याने आम्ही बाहेर लक्ष ठेवून नव्हतो. एक-दोन वळणांनंतर एका हॉटेलकडे बघत ड्रायव्हर बायकोला "ये एक अच्छा हॉटेल" का असंच कायससं म्हणाला आणि गप्प झाला.
तरी मला संशय आलाच म्हणून मी एकदम मागे बसलो होतो, तेथून बायकोला विचारले "काय गं? इथेच जेवायचं म्हणत होता का तो?" तर तिलाही त्याचं बोलणं नीट ऐकू न न आल्याने "नाही तसं काही बोलला नाही".
नंतर दहा मिनिटांनी आमच्या एका भगिनींनी "कितना टाइम है हॉटेल आने को?" असं विचारल्यावर तो काहीतरी पुटपुटला जे कोणालाच कळलं नाही. ताईने त्याचा अर्थ "बस पाच मिनिट" असा काढला. आता मात्र आम्ही शहराबाहेर पोचलो तरी हॉटेलची लक्षणं दिसेनात तेव्हा मी मागून विचारले "भाईसाब, हॉस्पेट खतम हो गया, हॉटेल कहा है?"
मी विचारल्यावर अगदी नॉर्मल आवाजात तो म्हणाला "वो क्या पिछे गया ना"
आम्ही गाडी वळवायला लागली. अत्यंत कळकट्ट हॉटेलात ट्रीपमधील एक अत्यंत रुचकर जेवण जेवून बाहेर आलो. ड्रायव्हर आणि आम्ही काही पानाच्या ठेल्यावर पान घेत होतो तेव्हा त्याला विचारलं "क्या रे, भाभीजी के साथ जोर सें बोला होता तो समझ जाता ना?"
"सरजी आदत नही है. शरमा जाता हूं"

त्यानंतर मात्र आमचा "लिंगभेद न मानणे" बाजूला सारून एखाद्या पुरुषानेच ड्रायव्हर बाजूच्या सीटवर बसायचे धोरण ट्रीप संपेपर्यंत पाळले.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

खणखणीत! किस्से, व्यक्तिचित्रं, 'प्रेक्षणीय ठिकाणाची माहिती' ओलांडून पुरवलेला स्थानिक दृष्टिकोन... आवड्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्षणचित्रे आवडली!!! पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋ, तू अगदी कमी शब्दांत व्यवस्थित माहिती देतो आहेस. रोचक वाटत आहे. एकंदरीत तुझी ट्रीप झकासच झालेली दिसते आहे

विठ्ठल मंदिरातील विविध वाद्यांच्या आवाजात वाजणारे खांब, त्यांचं इंजिनियरिंग याविषयी अजून माहिती मिळाली असती तर आवडले असते. खरेच असे आवाज खांबांतून येतात का? तू ते कसे तपासून पाहिलेस? की ही केवळ एक (तेथील लोकांनी) वाढवून सांगितलेली खांबांची खुबी आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे आवाज त्या खांबांतून येत असावेत. माझ्या ग्रुपमधील एकाने दहा-एक वर्षांपूर्वी या ठिकाणाला भेट दिली होती तेव्हा त्याला दोन-तीन वाद्यांचे आवाज काढून दाखवल्याचे स्मरत होते.

आता पर्यटकांची गजबज वाढल्यावर पुरातत्त्वखात्याने 'त्या' मंडपात जायला बंदी घातली आहे. सभागृह बाहेरून बघता येते व मागच्या दाराने थेट आतल्या गर्भगृहात आणि गाभार्‍यात जाता येते. या खांबांपैकी काही खांब इंग्रजांनी अभ्यासासाठी कापले होते तेही खांब दिसतात. त्यांना त्यातून काही मिळाले नाही असे म्हणतात.
(या खांबांपैकी प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या संख्येने छोटे खांब आहेत, ते पोकळ असल्यास वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीत आवाज येणे शक्य व्हावे असे प्रथमदर्शनी वाटले)

इथे दिलेल्या माहितीनूसार :

The main highlight of the Maha-Mantapa is its richly carved giant monolithic pillars. The outermost of the pillars are popularly called the musical pillars. These slender and short pilasters carved out of the giant pillars emit musical tones when tapped. Probably these do not belong to any of the standard musical notes, but the musical tone of the vibes earned it’s the name. Unmindful curiosity of the visitors has damaged many of these pilasters and tapping on it is banned for the sake of preservation.

तेथील वॉचमनला १००/२०० रु चारून तिथे जाता येते व त्याने दोन खांब वाजवलेले ऐकता येतात असे गाईडने सांगितले. एका गृपने तसे केल्याचेही आम्ही दुरून पाहिले. मात्र पुरातत्त्व खात्याचा उद्देश योग्य असल्याचे वाटल्याने आम्ही तसे काही न करता तेथून निघालो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे काही खांब अजिंठ्यालाही आहेत. तिथे पुरातत्त्व खात्याने बंदी घातलेली नाही. चिरीमिरीसाठी स्थानिक्/गाईड ते आवाज काढून दाखवतात. असं काही करण्यापेक्षा दर तासाला त्या आवाजांचे खेळ पुरातत्त्व खातंच का सुरू करत नाही?

मस्त भाग आहे रे ऋ! प्रवासवर्णन आणि किस्से दोन्ही मजेशीर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तू दिलेले पोकळ नळ्यांमुळे वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीत आवाज निर्माण होऊ शकतात हे लॉजिक पटण्यासारखे आहे. पण इंग्रजांनी ते खांब कापून नेऊनही त्यांना ते रहस्य उलगडले नसेल तर नक्कीच काहीतरी वेगळे कारण असावे. तू दिलेला दुवा नक्कीच उपयुक्त आहे. त्यावरुन ढोबळ माहिती मिळतेच.

पुरातत्त्व खात्याचा उद्देश योग्य असल्याचे वाटल्याने आम्ही तसे काही न करता तेथून निघालो

असा दूरगामी विचार करुन खूप कमी पर्यटक जातात. राष्ट्रीय ठेवा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहेच. पण तू तुझ्या कृतीतून हे सिद्ध केले आहेस.यासाठी तुला धन्यवादच दिले पाहिजेत ऋ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्षणचित्रे आवडली! पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचनीय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गाईडबरोबर तुमचा झालेला संवाद माझ्या लक्षात राहील...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे लिखाण वाचताना नारायण धारपांच्या लिखाणाची आठवण झाली. धारपांच्या लिखाणात मूळ भय, भूत, अमानवी शक्ती यांविषयी जे वर्णन असते, ते फारसे वाचनीय नसते. ते सोडून बाकीचे जे बारकावे धारप टिपतात, त्याला जवाब नाही. टुरिष्ट गायडांमध्ये जी माहिती असते ती काय कुठेही मिळते. ती सोडून या लिखाणात उमटलेले आसपासचे निश्वास फार आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मस्तच!
ऐसपैस वर्णन करणारे लिखाण आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकीपंडितांच्या माहितीवजा गुळगुळीत लिखाणापेक्षा स्थानिक खरबरीत पोताचं हे लिखाण वाचायला जास्त आवडतं आहे. जुना बाजार गजबजलेला असताना हंपीला भेट दिली होती; तेव्हा तिथलं वातावरण खूप खटकलं होतं. मुंबई-पुण्याच्या बायकांना बुजणारे बरेच भारतीय पुरुष पाहिले आहेत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हम्पिची सहल मीपण डिसेंबर २०१२ मध्ये केली होती. मी अगोदरच माहिती ( ऐतिहासिक आणि नकाशा) वाचून गेलो होतो त्यामुळे त्यासाठी एक दिवस राखून ठेवला होता. सकाळी साडे सात ते तीन वाजेपर्यंत सर्व गाईड न घेता पायी फिरून पाहिले. गाईड लोक एका दिवसात तीन चार फेऱ्या करायला बघतात आणि उरकतात. दुसऱ्या दिवशी हुबळीकडे येताना लखुंडी पाहिले आणि तीनच्या मुंबई गाडीने परत आलो. फोटो आणि ब्लॉग येथे आहे .ज्यांना संगीत खांब नीट वाजवून अनुभव घ्यायचा असेल त्यांनी कन्याकुमारी जवळचे सुचिँद्रम (१३किमी) मंदिर पाहावे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या हम्पि लखुंडी सहलीचे फोटो आणि वर्णन येथे आहे :
विजापूर हम्पि १
विजापूर बदामि भाग २
विजापूर बदामि फोटो
हम्पि आणि लखुंडी: फोटो पाहा

संपादकः दुवा डकवण्यासाठी या धाग्याची मदत घेता येईल. तुर्तास हा प्रतिसाद संपादित करून दुवे एम्बेड केले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंजूळ किंवा घुमणारा आवाज काढणार एक दगड्/शिळा ही संत एकनाथ जिथे विद्याभ्यास्/ध्यानधारणा करायला यायचे असे मानले जाते त्या शूलीभंजन/शूलभंजन ह्याही ठिकाणी आहे. हे मंदिर दौलताबादपासून साताठ किलोमीटरवर आहे. औरंगाबदपासून वीसेक किमी असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हंपीला तीन एक वर्षांपूर्वी गेलो होतो.. तुमच्या वर्णनामुळे आठवण झाली..
थोडी छायाचित्रे असती तर अजून मस्त वाटलं असतं. तेव्हाही विजय विठठल मंदीरात पुरातत्व खात्याचं काम चालू असल्याने आत जाता आलं नव्हतं.
पण कृष्ण मंदिर / हजारी राम मंदिर इथे खात्याने घेतलेले परिश्रम दिसत होते.

जिथ सोनं मोती इ. विकले जात होते तो हंपी बाजार विरुपाक्ष नव्हे तर कृष्ण मंदिरासमोर होता असं आठवतंय.. तिथे जरा नीट दुकानं, देवडिवजा रचना, पाण्याचं टाकं वगैरे होतं.
हा नवा हंपी बाजार म्हणजे केवळ जत्रा होती.. दोन तीन पुस्तक दुकानं देवळाच्या अगदी दारात आणि तिथून बस स्टॉप पर्यंत भजी वगैरेची एकदम गावाची आठवण करुन देणारी हॉटेल्स, मण्यांच्या माळा विकणार्‍या लमाण बायका, काही त्या ठिकाणचा कसलाही संदर्भ नसलेले हँडीक्राफ्ट ..
सगळा बेंगरूळ कारभार..
पुढे अच्युतराय मंदिराच्या रस्त्यावर वाटेत अनेक खाटकांची घरं.. त्यांच्या सरळ रस्त्यात मांडलेल्या कोंबड्यांचे खुराडे, बांधलेले बोकड आणि बकर्‍या..
रस्त्यात मिश्री लावत बसलेले घरदार आणि खेळणारी उघडी पोरं..
यातली अनेक घरं ही जुन्या दगडी तुळया, किंवा थेट जुन्या दगडी सोप्याचा आधार घेऊन बांधलेली..काहि अगदी स्पष्ट लक्षात येत होतं की सरळ कुठल्या तरी पडक्या देवळातून उचलून आणलेली आहेत.
आता लुंगी लावलेल्या दाढीवाल्या खाटकाच्या सोप्यात एकदम किरकोळ कोरीव काम असलेले दगड..नीट तासलेले दहा पंधरा फुट उंच चौरस..

आम्ही तुंगभद्रा नदीपलिकडे विसापूर गद्दे/ गड्डे इथं राहिलो होतो. एकेकाळी हिप्पीचा आणि बेसिक ड्रग्जचा अड्डा होता. आता सुधारणा आहे. पण अनेक परदेशी प्रवासी.. चक्क हिब्रू भाषेतले अनेक बोर्ड! सहजपणे मिळणारं ज्यू, इटालियन, आणि इतर युरोपियन जेवण.. तेही चांगल्या दर्जाचं!
सोय चांगली होती त्या आडगावासाठी..

एवढं मोठं आणि समृद्ध शहर पाचशे वर्षांपूर्वी होतं या विचारानं थक्कही होतं आणि भारावून जायलाही होतं..
इतका मोठा ऐतिहासिक ठेवा (युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून कधीच नामांकन झालं आहे) तर युके सारख्या देशात त्याचा मोठा गवगवा झाला असता आणि बोर्ड, सोयी, रस्ते, चांगली माहीती ठेवली असती..
होस्पेट गाव गचाळ आहे. आणि एक कर्नाटक स्टेटचे बरे हॉटेल सोडता हंपी जवळ फार सोयि नाहीत.. बहुतेक होम स्टे आणि गेस्ट हाउसेस आहेत. सोय वाईट नक्कीच नाही. पण विश्वासार्हतेचा प्रश्न येतो..
जाता जाता ते मंदिराचे वाजणारे खांब.. वाजवून पाहता आले नाहीत अर्थात..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार

जिथ सोनं मोती इ. विकले जात होते तो हंपी बाजार विरुपाक्ष नव्हे तर कृष्ण मंदिरासमोर होता असं आठवतंय.. तिथे जरा नीट दुकानं, देवडिवजा रचना, पाण्याचं टाकं वगैरे होतं.

आम्हाला एकूण तीन बाजार दाखवण्यात आले. एक विरुपक्ष मंदीरासमोरचा, दुसरा कृष्ण मंदिरासमोरचा आणि तिसरा विठ्ठल मंदीराच्या रस्त्यावर. पैकी कृष्ण आनि विरुपक्षा मंदिरासमोर इथे सोनं मोती विकले जायचे असे सांगितले तर विठ्ठल मंदिरा जमळ रोजच्या वस्तु, कला साहित्य, वाद्य साहित्य वगैरे विकले जायचे

हा नवा हंपी बाजार म्हणजे केवळ जत्रा होती.. दोन तीन पुस्तक दुकानं देवळाच्या अगदी दारात आणि तिथून बस स्टॉप पर्यंत भजी वगैरेची एकदम गावाची आठवण करुन देणारी हॉटेल्स, मण्यांच्या माळा विकणार्‍या लमाण बायका, काही त्या ठिकाणचा कसलाही संदर्भ नसलेले हँडीक्राफ्ट ..
सगळा बेंगरूळ कारभार..

होय हेच सगळे हटवले गेले आहे. आता विरुपाक्ष मंदीरासमोरच्या बाजारा ऐवजी पुरातन खांब आहेत (अजून त्यावरचे आधुनिक रंग वगैरे हटवणे चालु आहे, प्रवेश नाही)

याशिवाय एनक ठिकाणि जसे राणी महाल, गजशाळा वगैरेच्या प्रवेशद्वारावर वॉचमन बसवले आहेत. काही ठिकाणी माफक तिकिटे ठेवली आहेत जेणे करून नासधुस कमी होईल. काही नवे उत्खनन चाललेल्या साईट्सही दूरून बघता आल्या.

आम्ही तुंगभद्रा नदीपलिकडे विसापूर गद्दे/ गड्डे इथं राहिलो होतो. एकेकाळी हिप्पीचा आणि बेसिक ड्रग्जचा अड्डा होता. आता सुधारणा आहे. पण अनेक परदेशी प्रवासी.. चक्क हिब्रू भाषेतले अनेक बोर्ड! सहजपणे मिळणारं ज्यू, इटालियन, आणि इतर युरोपियन जेवण.. तेही चांगल्या दर्जाचं!
सोय चांगली होती त्या आडगावासाठी..

याबद्द्ल अजिबातच माहित नव्हते. त्या गचाळ हॉस्पेटपेक्षा काहिहि परवडले असते Wink

एवढं मोठं आणि समृद्ध शहर पाचशे वर्षांपूर्वी होतं या विचारानं थक्कही होतं आणि भारावून जायलाही होतं..

अगदी खरंय.. सध्या तिथे चाललेलं पुरातत्त्व खात्याचं काम बघितलं तर अजून आठ दहा वर्षांनी या शहराच्या भव्यतेचा अधिक आस्वाद घेता येईल याची खात्री वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या नक्कीच खूप चांगल्या सुधारणा आहेत.
पुरातत्व खाते काम करते पण त्याच जुन्या सरकारी गतीने. राम आणि कृष्ण मंदिरात संपूर्ण भिंती एक एक तुकडा शोधून जोडून उभारल्या आहेत.
संवर्धनाचेही काम पुष्कळ आहे.
गेस्ट हाऊसेस बरीच आहेत. नदीवर छोट्या बोटी असतात ज्या १५-२० रुपये घेऊन पलि़कडे सोडतात. (विरुपाक्ष मंदिराच्या उजव्या बाजूला घाटाजवळ)
या इथे --

तीन एक वर्षांपूर्वी शांती गेस्ट हाऊस हे नाव जालावर / tripadvisor वर वाचून फोन करून गेलो होतो. एकच मातीच्या बांधकामाची आणि लाकडी सांगाड्यावर husk चे छत असलेली खोली. मच्छरदाणी :), पडवीत एक झोपाळा! समोर नदीपर्यंत भातशेती.. rice paddies. किमान गरजेच्या सोयी.
जेवणासाठी बांबू / तट्ट्या असलेली एक जागा. सगळी भारतीय बैठक. किंवा खाली एका जागेत आडोसा करून बैठका घातलेल्या. म्हणजे एक चक्क गादी आणि तक्क्या बसायला. बाजूला ग्लास/ प्लेट / अ‍ॅशट्रे इ. ठेवायला केलेले कडाप्प्याचे छोटे उंचवटे. आणि समोर शेत.
निवांत बसा पुस्तक घेऊन, गप्पा मारत. खूपच चांगली food quality .. मस्त वैशालीसारखे ग्लास मध्ये ग्लास भरून चहा कॉफी..
हंपीचा काही संबंध नाही. एक आराम करण्याची जागा.
बहुतेक परदेशी प्रवासी. थोडे फार जवळपासचे कर्नाटकातले हौशी तरूण.. हे शेतातून दिसणारे गेस्ट हाउस..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0