माझ्या आयुष्यातले वसंत

सगळ्यात शेवटी भेटलेला वसंत हा माझा जुना कलीग. वसंत कुलकर्णी. अजूनही त्याचं वय माझ्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. पण वसंत हा तसा 'मैत्रीखोर' माणूस असल्यामुळे नवीनच आलेला पोस्टग्रॅडही वसंतला फार न घाबरता वसंत म्हणू शकतो. थोडा वातावरणाचाही भाग असावा. वसंत आणि त्याच्या दोन तृतीयांश वयाच्या त्याच्या आणि माझ्या, (म्हणजे मित्र माझेही) मित्रांच्या म्हणण्यानुसार मुलींशी मैत्री करण्यासाठी वसंत फार उतावीळ असतो. मागे एकदा म्हणे त्याच्याकडे समर स्टुडंट म्हणून काम करायला कोणीही मुलगी तयार न झाल्यामुळे त्याने एक टेप ड्राईव्ह असूयेचा अटॅक आल्यामुळे मोडला होता. पाच-सात समर-स्टुडंट्समधे एकच मुलगी होती आणि साधारण तेवढ्याच लोकांनी समर प्रोजेक्ट्सचे गाईड म्हणून काम करण्याची तयारी दाखवली होती. पण त्या मुलीने ज्याच्याबरोबर प्रोजेक्ट केलं त्याच्याबद्दल वसंतला तेव्हा फारच राग होता. मी त्याच फॅकल्टीबरोबर एका पेपरवर काम करत होते. वसंत अधूनमधून त्यावरून माझ्यासमोर गॉसिप मारायचा. मला त्यात फार गंमत वाटायची. उगाचच बायकांना bitching करण्याबद्दल बदनाम करतात. असो, मुद्दा असा की वसंत आणि माझी मैत्री व्हायला फार वेळ लागला नाही.

डोक्यावरचे केस उडत चाललेले, उरलेले पांढरेच. मध्यम उंची, मध्यम बांधा आणि शांतपणे चालणं. कन्नडीगा तसे बेंगरूळच असतात अशी प्रतिमा पक्की करणारे कपडे. वसंतचं मूळ गाव बेळगाव. मातृभाषा कन्नडा. मराठी समजते... असं तो म्हणतो. मी कधी त्याच्याशी मराठीत काही बोलले नाही. काही पिढ्यांपूर्वीच त्याचे पूर्वज पुण्याहून बेळगावला गेले असले तरीही वसंतकडे तसा पुणेरी बाणा चिक्कार आहे. त्यातला एक मुख्य मुद्दा म्हणजे "तू काही सदाशिव पेठेतली नाहीस. तुझं मराठी काय प्रमाण मराठी नाही." असं तो मला नेहेमी प्रमाण भारतीय इंग्लिशमधे ऐकवत असे. प्रमाण मराठी कोणतं, तर ग्रंथपाल सुनीता मुळची सदाशिव पेठेतली, ती पुण्यात पूर्वी सायकल चालवायची, नंतर अनेक वर्ष स्कूटर चालवते, तिचं मराठी हे प्रमाण मराठी. वसंत आवडीने मराठी सारेगमप वगैरे पहातो, बहुतेक त्याला त्यातली ती भावगीतं वगैरे वयानुसार आवडत असणार. आणि मला ते फार बोअर होतं. म्हणून त्याला मराठीबद्दल माझ्यापेक्षा अधिक प्रेम. म्हणजे निदान असं तो तरी समजतो. वसंतला मी कधीही मराठी बोलताना ऐकलेलं नाही. ऑफिसातल्या बाकीच्या अ‍ॅडमिनच्या लोकांशी तो हिंदी किंवा इंग्लिशमधे बोलत असे. मी कधी त्या लोकांशी गप्पा मारायचे तेव्हा हे लोकं मला विचारायचेही, "ते कुलकर्णीसाहेब काय बोलतात ते तुम्हाला समजतं का?". वसंतच्या तोंडातल्या तोंडात बोलण्याची सुरूवातीला सगळेच गंमत करत असत. काही काळानंतर सवय झाली की तो काय बोलायचा ते समजायचं... किंवा असं आपणच समजून घ्यायचं. मी एकदा त्याला (अर्थातच इंग्लिशमधून) म्हटलंही, "वसंत, मी असं-असं मराठी संस्थळांवर मराठीत लिहीते. तिथे मला कोणी माझं मराठी 'खराब' असल्याचं सांगितलेलं नाही. तिथे चिक्कार पुणेकरही आहेत." वसंतने ते कधीच मान्य केलं नाही. पण आम्ही दोघं कधीच सुनीताची साक्ष काढायला गेलो नाही. आमचं दोघांचंही सुनीताबद्दल चांगलं मत असल्यामुळे भांडणापायी तिच्या गुडबुकातून जाण्याची भीती बहुदा वाटत असावी.

मी तिथेच नोकरी करत असताना वसंत निवृत्त झाला. त्याने सगळ्यांना कँपसवरच डिनर-पार्टी दिली. आम्ही पुख्खा झोडला. आता चहाबरोबर वसंतच्या गप्पा नाहीत असं काही फार जाणवलं नाही. पण मला ऑफिसातून कॅण्टीनमधे जाताना काही दिवस एकटेपणा आला. आम्ही बर्‍याचदा एकत्रच कॅण्टीनला जायचो. वसंत अधूनमधून कँपसवर येत असे, आठवड्यातून दोनेक दिवस. त्याची खासगी इंपाला आहे, ती बरेचदा कँपसवर दिसत असे. इंपाला म्हणजे रिक्षा. तो रिक्षावाला वसंतच्या ओळखीचा होता. ठराविक वेळेला वसंतला इंपालामधे लिफ्ट मिळत असे. कँपसवर बँक आणि डॉक्टर असल्यामुळेही वसंतच्या फेर्‍या होत असत. एक दिवस वसंतला स्कूटर चालवता येते असाही शोध आम्हाला, म्हणजे पोराटोरांना, लागला. वसंत निवृत्तीनंतरच एक दिवस ऑफिसात आला होता. दुपारी बाराच्या सुमारास माझ्या ऑफिसात आला. "तुझी अ‍ॅक्टीव्हा आहे ना?" त्याला विद्यापीठाच्या आवारात दोन-चार ठिकाणी कामं होती, 'उन्हातून कोण चालणार' म्हणून स्कूटर हवी होती. मला काहीच अडचण नव्हती. मी नेहेमीप्रमाणे सव्वा-दीडच्या सुमारास जेवायला कॅण्टीनमधे गेले. वसंत आणि माझे (तेच ते दोन लाईनमारू, मध्यमवयीन) मित्र मला येताना पाहून जोरजोरात हशा-टाळ्यांची देवाणघेवाण करायला लागले. माझं जेवणाचं ताट घेऊन तिथे गेले तर म्हणे, "तुझ्या स्कूटरचे इंडीकेटर्स चालत नाहीत. तुम्हां पोरींना आम्ही एवढे प्रेमाने वागवतो ("हं, प्रेमाने काय!") आणि तू अशी मोडकी स्कूटर देतेस मला? मला या वयात काही झालं असतं म्हणजे?" मला काही समजेचना! "वसंत, चिल माडी!" मी एक जालीय ड्वायलाक मारला. वसंत माझ्या तोंडून "माडी" ऐकून उडलाच. पण पट्टा सुरूच होता. शेवटी एका मित्राला बोलायची संधी मिळाली, "वसंत, तू इंडीकेटर लावून पुण्यात गाडी चालवतोस? बरा आहेस ना? आत्तापर्यंत एकही अपघात नाही झाला तुझा?" वसंत आता दमला होता. मग मलाही संधी मिळाली, "इंडीकेटर मोडले आहेत म्हणजे? मी कालच रात्री साडेबारावाजता बाहेरून परत आले. अंधारात मला तर दिसले इंडीकेटरचे दिवे चमकताना. रात्री थंडीने मोडले का काय दिवे?" वसंतचा चेहेरा फुलला, "आवाज करत नाही तो कसला इंडीकेटर!" अन्य दोन मित्रांनी माझी 'मोडकी' स्कूटर आणि वसंतचं ड्रायव्हींग यावरून स्वतःची भरपूर करमणूक करून घेतली. वसंतनेही, मुलींनी ओढणी घेऊन स्कूटरवर बसताना काळजी घेतली नाही तर काय होतं, याचा एक प्रसंग सांगितला. तशी ती गोष्ट बरेचदा ऐकलेली असल्यामुळे, मी नेहेमीप्रमाणे नाव ऐकण्याचा प्रयत्न करून बाकी दुर्लक्ष केलं. हा प्रसंग नक्की कोणाच्य बाबतीत घडला होता ते मला अजूनपर्यंत समजलेलं नाही.

वसंत हा 'मेड इन इंडीया'च्या पहिल्या पिढीचा रेडीओ अ‍ॅस्ट्रॉनॉमर. गोविंद स्वरूपांनी भारतात रेडीओ टेलिस्कोप बनवले. त्यांच्या चेल्यांपैकी एक वसंत. मूळ शिक्षण सॉलिड स्टेट फिजीक्समधे. तेव्हा तो TIFRमधे होता. गोविंदनी त्याला तिथूनच उटीला नेला. तर वसंत असाच एक दिवस चहाला आला होता. एप्रिल महिना, दुपारचे चार वाजलेले. आम्ही कँटीनबाहेर झाडाच्या सावलीत, घाम पुसत चहा-कॉफी-सरबतं घेऊन उभे होतो. कोणाचं कशावर फार प्रेम आहे, अशी चर्चा सुरू होती. वसंतकडे नजर फिरली. "माझं सॉलिड स्टेट फिजीक्सवरच खरं प्रेम आहे. पहिलं प्रेम हेच खरं." आम्ही तरूण पिढीने वसंतकडे फार आश्चर्याने पाहिलं. सिनीयर मंडळींना हा विनोद माहितीचा असावा. दोन मध्यमवर्गीय मित्रांचा चेहेरा डँबिस आनंदाने फुललेला दिसलाच. वसंतने आम्हां पोराटोरांकडे पाहिलं, "खरं प्रेम आहे म्हणून तर सॉलिड स्टेट फिजिक्स सोडून अस्ट्रॉनॉमी केलं ना आयुष्यभर!"

---

दुसरा वसंत भेटला किंवा न भेटला त्यांना मी वसंत असं तोंडावर कधीच म्हटलं नाही. पण डोक्यात कायमचं बसलेलं 'वश्या'. वडलांपेक्षा दहा-पंधरा वर्षांनी वश्या **** मोठा असेल. उगाच आडनाव सांगून ओळख कशाला जाहीर करा?

आमच्या ओळखीतले, आमचे बा-बापू वगळता, बाकीचे लोक त्यांचा उल्लेख वश्या आठवले किंवा वश्याकाका असा करत. अर्थातच आमच्या वयाचे लोकं मोठ्यांसमोर वसंताकाका म्हणायचे आणि मोठे लोकं वसंता. पण तृतीयपुरुषी उल्लेख 'वश्या' असाच. आम्ही लहान होतो तेव्हा वसंताकाका हेच ऐकत आलो होतो, पण एकच अपवाद होता तो म्हणजे बाळमामाचा.

हा काही नात्याचा मामा नव्हे, आई-बाबांचा मित्र. मामा वसंताकाकाचा उल्लेख न चुकता "वश्या भडवा" असाच करत असे. भडव्या आणि भोसडीचा हे शब्द काही मोठे लोकं वापरतात आणि काही मोठे लोकं वापरत नाहीत अशी माझी लहानपणची समजूत होती. (मोठं झाल्यानंतर ते खोटं नाही याचा साक्षात्कार झाला.) मामी त्याला बर्‍याचदा ओरडायची, "अहो, पोरांसमोर भाषा सांभाळा तुमची! त्यांच्या समोर काय शिव्या घालता?" अशा वेळेस मामा आपल्याला कानच नाहीत असा आव आणून बाबांच्या दिशेला बघत असे. माझा असा अंदाज आहे की बाबा मामीला आमच्या मागे सांगायचे, "पोरांसमोर बाळ्याला बोलू नकोस. असे शब्द वापरणं शिष्टसंमत नाही असं आमच्या पोरांना समजलं तर ते उगाच आणखी चौकशा करतील. त्यापेक्षा बाळ्याचं जे चाल्लंय ते काही वाईट नाही." आमच्याकडे मामा बरेचदा यायचा. आमच्याशीही चिक्कार गप्पा मारायचा. "गणपतीशप्पथ तुला सांगतो मन्या ..." असं म्हटलं की ते खोटं असतं अशी शेजारच्या सोहोनी काकांची थिअरी. पालीच्या गणपतीची मामाने शपथ घेतली की हे काहीतरी धडधडीत खोटंच असतं, अशी आमची लहानपणापासून समजूत होतीच. मामाचा पालीच्या गणपतीवर फार विश्वास आहे. दर चतुर्थीला त्याचा उपासही असतो, रविवार असेल तरीही! असो. तर मुख्य विषय वसंता काकाचा.

माझा वसंताकाकाशी फारसा संबंध आला नाही कधी. तो काही बाबांचा जवळचा मित्र नव्हे. बाबांचे बहुतेकसे मित्र एकतर मध्यमवर्गीय इंटुक, कॉलेजातले मास्तर, किंवा संघवाले. वसंताकाका प्रामाणिकपणे यांच्यातला एकही नसावा. मध्यम उंची, वयाप्रमाणे आलेलं स्थौल्य, डोक्यावर पांढर्‍या, तुरळक केसांची झालर आणि एकदा चेहेरा पाहिला तर पुन्हा लक्षात न रहाण्याची शक्यता बरीच जास्त. कदाचित तरूण वयात वसंताकाका तसा सरासरी हँडसम असावा ... अशी शंका वसंताकाकाची मुलगी पाहून येत असे. मामाच्या भाषेत वसंताकाकाच्या मुलीचं वर्णन ... नको, नकोच ते! पांढरपेशा शेंडीगोपाळांनी हे वाचलं तर त्यांना उगाच त्रास होईल. वसंताकाकाच्या गुडघ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असावा. त्याचे दोन्ही गुडघे एकमेकांकडे वळलेले होते. त्यामुळे तो थोडा विचित्र चालत असे. वरच्या मजल्यावरच्या संघवाल्यांकडे तो आला असेल आणि वेळ असेल तर आमच्याकडेही यायचा. बाबांचे आणि त्याचे काही कॉमन संघवाले मित्र होते, हेच बहुदा बाबा आणि त्याचं "कनेक्शन". घरी आला तर बाबा आणि काका काहीतरी बोलत असत, ते न ऐकण्याची आम्हाला दोघा भावंडांना परवानगी होती. त्यामुळे वसंताकाका घरी आलाच तर आम्ही दोघं आतल्या खोलीत बसून गॉसिप मारणार हे समीकरण नेहेमीचंच होतं. त्यातून वसंताकाकाही हाफप्यांटवालाच. एकंदर संघवाल्यांचं वेळी-अवेळी घरी येणं, घरी आल्यानंतर भारतीय संस्कृतीवरून विशेषतः मला पकवणं वगैरेंमुळे आम्ही बाबांच्या या मित्रांपासून लांबच रहायचो. वसंताकाका त्या सुक्या लाकडांमधे ओल्यातला होता हे बाबांच्या मागे लक्षात आलं.

त्याला आम्ही दोघं शिंग फुटेपर्यंत वसंताकाका म्हणायचो. यथावकाश त्याचं दोघांपुरतं नामकरण केलं. कारण मामाच. मामा त्याच्या चालण्याची अशी काही नक्कल करायचा की त्याचं नाव 'शिशिर' ठेवावं का 'ग्रीष्म' यावरून माझं आणि भावाचं भांडण झालं. शेवटी अभिव्यक्तीस्वातंत्र्यच खरं असं मानून आम्ही दोघांनी 'agree to disagree' यावर समेट केला. कधी सोयीसवडीनेही नाव ठरवलं जात असेल. भाऊ चहा करणार असेल तर मी त्याच्या नावालाच मत देत असे; बाबांनी चहा केला तर मी माझा हेका सोडत नसे. यथावकाश मित्रमंडळात 'वश्याकाका' किंवा 'वश्या'ही झालं.

मामाचं घर तळमजल्याला. आमच्या घरापासून अगदीच जवळ आणि नेहेमीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्याला. वसंताकाका त्याच इमारतीत रहात असे. मामाकडे चिक्कार प्राणी-पक्षी होते. कबूतरं, पोपट, लव्हबर्ड्स असं काय काय होतं. हे सगळे पक्षी घराबाहेर भिंतीला लागून पिंजर्‍यांमधे होते. कबुतरं मात्र दारात जो पॅसेज होता त्यावर माळा बनवून त्यावर. एक कुत्रा तर पाहिजेच पाहिजे. माझ्या लहानपणी एल्सा नावाची डॉबरमन होती. काही महिने तर त्याच्याकडे गिधाडही होतं. कोणालातरी सापडलं. या आमच्या वरणभात लोकांना काय माहित गिधाडाचं काय करायचं ते! जखमी होतं. मामाकडे आणून सोडलं. मामाकडे त्या काळात कबूतरं, पोपट, लव्हबर्ड्स आणि एक गिधाड होतं. वसंताकाका रोज त्याच्या नातीला खेळवायला खाली घेऊन यायचा आणि पक्षी दाखवायचा. वसंताकाका बाहेर उभा दिसला की आम्ही मामाकडे जाणं टाळायचोच. का कोण जाणे! बहुदा त्याचं कारणही मामाच असावा. शनिवारी संध्याकाळी बरेचदा मामा आमच्याकडे डोकावून जात असे. अधूनमधून मामाचा वैतागही दिसायचा, "हा वश्या भडवा रोज नातीला खेळायला घेऊन येतो. कधी पोपटासाठी एखादा पेरू नाहीतर मिरची आणली तर याच्या बोच्याला मिरची लागणारे का? पण बाळ्या करतोय ना, मग बघा फुकट!" बोचा हा शब्द मला खूप आधीपासून माहित असला तरी अर्थ फारच उशीरा समजला.

हा वसंताकाका कधी आमच्याशी फार बोलत नसे. आम्हीपण त्याला टाळतच असू. शेवटचं त्याला कधी भेटले होते कोण जाणे! ठाणंही कधीचंच सोडलंय.

---

तिसर्‍या वसंताला मी कधीच भेटलेले नाही. हा वसंता बहुदा माझ्या जन्माआधीच मेला असावा. त्याच्या मरणाचा कोणाला कधी शोक झाला होता का नाही असाही प्रश्न पडत असे. कारण हा वश्या मामाचा कुत्रा होता. आणि या कुत्र्याचं नाव मामाने वसंताकाकावरून ठेवलं होतं. तसा मामाकडे मोरेश्वर नावाचाही एक कुत्रा होता म्हणे! वसंताकाका बिल्डींगबाहेर पडताना दिसला की मामा घरातूनच ओरडायचा, "वश्या भडव्या, कुठे शेण खाल्लंस रे?" आणि पुन्हा बाहेर बघत, "नाही, या आमच्या वश्याला ओरडतोय मी!" वसंताकाका खरंतर एवढा गरीब होता की तो "हो" म्हणून जात असे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

छान लिहीलय. आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सफाईदार आणि रंजक आहे.
तिसर्‍या वसंताबद्दल वाचून प्रिय मिठुनदांचा "तेरे नामका कुत्ता पालू" हा प्रसिद्ध ड्वायलॉक आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यैच बोलता, बहुत आवड्या!!!
विश्वेश म्हणून मित्राला वश्या म्हणायचो, सध्या वासुदेवनराजमोहन नावाचा आमचा मास्तर आहे त्याला वाश्या म्हणतोय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हात्तिच्या ! यात तुझ्या हृदयात :love: फुललेल्या वसंताचा ;;) समावेश नव्हताच .
तेंव्हा त्याबद्दल लिहून आम्हाला उपकृत करावे अशी विनंती ! Wink
उत्सुकतेने मांजर मरू लागलेय त्वरा कर . Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडलच.
एकदम या वश्याच्या जागी एखाद्याच्या भावविश्वात आम्ही देखील असू शकतो याची अचानक जाणीव झाली.
बोच्या वरुन आठवण झाली. गावी पोर टोर फिरताना थोडी सिनियर मंडळी एक गंमत नेहमी करायचे." ए क्वाँचा रे तू? 'ब्वॉ'चा का? हॅहॅहॅ!" म्हणजे असे कि त्या मुलाचा बाप हा गंध-टिळा (स्थानिक भाषेत गंटिळा) लावणारा माणुस असतो. सहसा वारकरी संप्रदायातला . त्यांची नावे निवृत्ती बुवा तुकाराम बुवा रामदास बुवा अशी संबोधली जायची. हे लोक कपाळाला अष्टगंधाचा ठिपका, कानाच्या पाळीला, गळ्याला, छातीला असा ठिपका लावीत. आमच्या वर्गात असा एक मुलगा (ब्वॉ) होता त्याची टिंगल करत आमचे देवगुरुजी म्हणायचे हे लोक कुठ कुठ गंध लावतात कानाला गळ्याला छातीला.... बोच्याला हॅहॅहॅ"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मस्तंय!

अवांतर पण महत्त्वाचे:
शिव्या, त्यांच्याशी ओळख, सवय, परिणाम, शिव्यांच्या प्रांतातली सर्जनशीलता... यावर तू लिहिणं लागतेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रकटन आवडलं. मुद्दाम सुरूवात - किस्से - हळव्या/स्मरणकातर आठवणींनी किंवा एखाद्या निष्कर्षाने शेवट ह्या साच्याशिवाय असल्याने काहीसे अधिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की काय आवडलं ते नाही सांगता येणार पण काहीतरी चांगलं वाचलं असं वाटलं. घरगुती पण परिपक्व असं काहीतरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद काय द्यावा अशा विचारात होतो तेव्हा हा प्रतिसाद पाहिला. नेमके हेच म्हणायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>मी असं-असं मराठी संस्थळांवर मराठीत लिहीते. तिथे मला कोणी माझं मराठी 'खराब' असल्याचं सांगितलेलं नाही.

हे वाचून खूप करमणूक झाली Wink

मला आवडलेले वसंत -
१. वसंत सरवटे
२. हा पु.लं.च्या 'ती फुलराणी'मधला. त्याच्याबरोबर फुलराणीचं आयुष्य सुखात गेलं असतं असं मला शॉ वाचून नेहमी वाटतं.
३. कानेटकरी नाटकांचा जनक. ते नसते, तर मराठी साहित्य नकळत झालेल्या पुष्कळ विनोदांना मुकलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुद्दा क्रमांक ३ वाचून प्रतिसादाला 'खवचट' श्रेणी देण्याची सोय व्हावी असं मनापासून वाटलं. (हे असं प्रथम नि वरचेवर वाटायला लावण्याचं श्रेय श्रामोंना दिलं पाहिजे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कंस वाचला. त्यामुळं अलीकडच्या सूचनेशी पूर्ण सहमत. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जोजोकाकू, करूनच टाका आता सोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वडलांपेक्षा दहा-पंधरा वर्षांनी वश्या **** मोठा असेल. उगाच आडनाव सांगून ओळख कशाला जाहीर करा?
आमच्या ओळखीतले, आमचे बा-बापू वगळता, बाकीचे लोक त्यांचा उल्लेख वश्या आठवले किंवा वश्याकाका असा करत.

आडनाव खरेच लपवायचे होते की नंतर 'आठवले'? Wink
प्रतिसाद संपादनाची सोय असल्याचा छोटा फायदा घेतला.
व्यक्तिचित्रं ठीक. एक मॉडेल तयार होतंय. या रीतीनं आता घासू, चिंतु, मुसु वगैरेंनी 'माझ्या आयुष्यातील उषा, प्रभा, संध्या, निशा, रजनी...' वगैरे लिहायला हरकत नाही. दोनदोन, तीनतीन नक्कीच असतील. तेव्हा गुर्जींनो, लिहाच. जालीय साहित्यात नेमके बसेल हे प्रकरण. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>या रीतीनं आता घासू, चिंतु, मुसु वगैरेंनी 'माझ्या आयुष्यातील उषा, प्रभा, संध्या, निशा, रजनी...' वगैरे लिहायला हरकत नाही. दोनदोन, तीनतीन नक्कीच असतील.

आहेत की. फक्त तुम्ही एक निकृष्ट लेखनाची स्पर्धा तेवढी जाहीर करा. मग बघू कोणकोणत्या (आठवणी हो!) काढायच्या ते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा मला भडकावण्याचा प्रयत्न आहे. पण तो वृथा असेल. असल्या स्पर्धावगैरेच्या प्रेरणेची तुम्हा गुर्जींना गरज नाही हे मला माहितीये. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीचा माहितीपूर्ण्,वैचारिक वगैरे ट्रॅक बदलेला दिसतोय.
असो.
पण साधेपणानं केलेलं लिखाण जमलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"अदिती आणि व्यक्तीचित्रण?" असं म्हणत चकित होऊन वाचला.. आणि आवडलाही.

खरंतर दिवाळी अंकातील माऊचरित्रातच तू हा प्रकार छान हाताळतेस हे जाणवलं होतं तरी का कोण जाणे तु व्यक्तीचित्र लिहिशील - ते ही इतकं छान Wink - असं वाटलं प्रामाणिकपणे वाटलं नव्हतं..

लगे रहो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखन वाचताना मजा आली. आमच्या आयुष्यातल्या काही वसंत राव/काका/मामा यांची आठवण झाली.

चिंतातूर जंतूंसारखे आमचे आवडते वसंत :
१. देशपांडे. ( हे जंतूना आवडत नाहीत - म्हणजे यांची कला पसंत नाही - याची आम्हाला कल्पना आहे. ) यांच्यावरचे पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडे यांचे लेख भारी आहेत.

२. आमचे आवडते नसले तरी या पर्टीक्युलर "वसंत"रावांना कसे विसरायचें ? बापट. Smile

३. तिसरा वसंत "बसंत" म्हणून येतो. माझ्या यादीतील क्रमांक १ च्या वसंतने गायलेला ऐकला आहे. त्यांच्या नातवाने गायलेलाही ऐकलेला आहे. हा वसंत त्याच्या "बहार" नावाच्या सौ. ला घेऊन येतो तेव्हाही मजा आणतो. उदा. "केतकी गुलाब जूही चंपक बन फूले" हे भीमाण्णा आणि मन्नाडे यांचे गाणे ऐकावे.

४. बाकी म्हाराष्ट्रात गेल्या साठ पासष्ट वर्षांत गाजलेले तीन संगीतकार वसंत सर्वज्ञात आहेतच : प्रभू, पवार, देसाई.

५. डहाके. यांचं लिखाण नव्वदीच्या दशकाच्या सुरवातीला झपाटल्यासारखं वाचलं होतं. काही काही कविता तेव्हांपासून आजतागायत स्मरणांत आहेत. पुढे काफ्काचं थोडं लेखन वाचलं तेव्हा यांच्या ललित लेखनामागची प्रेरणा किंचित लक्षांत आल्यासारखी वाटली. गेल्या दहा वर्षांत दोनदा भेटीचा योग आला तो मात्र भारताबाहेर पडल्यानंतर. या गोष्टीबद्दल मौज वाटते. अस्तित्त्ववाद, मराठी कविता, जी ए कुलकर्णी यांच्यासारख्या विषयांवरचं यांचं लिखाण आवडलेलं आहे. अलिकडे बरंच ललितलेखवजा लिखाण केल्याचं दिसलं. तेही आवडलं. काहीसा गंभीर प्रकृतीचा विद्वान माणूस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.