आयगरची उत्तरभिंत ... टोनी कुर्झ आणि ऊली स्टेक

आय्गरची उत्तरभिंत

इन्टरलाकेनच्या लेक थुनमधून दिसणारी बर्नीज आल्प्समधली ही डोंगररांग. डावीकडे आय्गर, मध्ये मॉन्ख आणि उजवीकडे युन्ग्फ़्राउ. मॉन्ख आणि युन्ग्फ़्राउला जोडणार्याग खिंडीपर्यंत रेल्वे नेलेली आहे. स्वित्झर्लंडला जाणार्‍या पर्यटकांमध्ये (अति)प्रसिद्ध युन्ग्फ़्राउयॉक रेल्वे स्टेशन इथेच आहे.

डावीकडे आकाशात घुसलेलं आय्गरचं शिखर आणि खाली ग्रिंडलवॉल्ड शहर.

आयगरचा नकाशा आणि युन्गफ़्राउबान ट्रेनचा मार्ग.

उत्तरभिंतीच्या पायथ्यापासून दिसणारा सरळ कडा

इन्टरलाकेन परिसरात बरेच साहसी ( ऊर्फ़ आचरट) खेळ खेळले जातात. आयगर शिखरावरून बेस जंपिंग, पॅरा ग्लायडिंग, हेलिकॉप्टरमधून पायाला स्कीज बांधून पर्वतावर उडी मारून घसरत खाली येणे, किंवा नुसतेच स्कीज लावून पॅरा ग्लायडर पाठीला अडकवून स्कीजने घसरता घसरता उत्तरभिंतीवरून उडी मारणे आणि ग्लायडरच्या सहाय्याने खाली येणे.... वगैरे वगैरे. एकसे एक भयंकर. आणि या सर्वांत अल्पाईन गिर्यारोहण हा प्रचंड लोकप्रिय साहसप्रकार.

गिर्यारोहकांना आयगरचे आव्हान
खरंतर आयगर म्हणजे काही सर्वांत उंच शिखर नाही. सुमारे चार हजार मीटर उंची म्हणजे फ़ार थोर नाही. ( एवरेस्टहून निम्मीच.. एवरेस्ट ८८४८ मीटर). युरोपामधलेही आय्गर हे सर्वांत उंच शिखर नाही. आल्प्समधले मॊंट ब्लांक शिखर सर्वात उंच. पण आयगर शिखर गिर्यारोहकांसाठी कायमच आव्हान होतं. पश्चिम बाजूने आयगर फ़ार पूर्वीच सर केलं गेलं होतं तरीही त्याची उत्तरभिंत मात्र १९३० च्या दशकापर्यंत अजिंक्य राहिलेली होती.

आय्गर शिखर उत्तरबाजूने चढणे म्हणजे एक शुद्ध वेडेपणा आहे किंवा आत्महत्या आहे, असं मानणारेही लोक होते.
याला काही कारणं होती. हा साधारण प्रचंड सरळसोट अठराशे मीटरचा लाईमस्टोनचा कडा आहे. कुशल तांत्रिक चढाईची इथे गरज पडते. आल्प्समधल्या बर्यांचशा उत्तरभिंती कायम सावलीत असतात. तिथपर्यंत सूर्यप्रकाश फ़ारसा पोचत नाही. हिमवादळे आणि हिमघसरण नेहमीचीच. हवामान अत्यंत बेभरवशाचं आहे. पश्चिम बाजूला हवामान चांगलं असलं तरी उत्तरभिंतीवर हिमवादळ आणि हिमघसरण असू शकते.या अडचणींमुळे एकदा चढाईला सुरुवात केली की माघार घेणं अत्यंत कठीण.
ग्रिंडेलवॉल्डमधून दिसणारा आयगर.

क्लाईनशायडेगच्या हॉटेलातून दिसणारा आयगर

पहिल्या यशस्वी चढाईचा “हैकमीर” ( १९३८) मार्ग... या प्रत्येक ठिकाणांचं चढाईच्या दृष्टीनं स्पेशल महत्त्व. विशेषत: दोन महत्त्वाचे ट्रॅवर्स आणि आईसफ़ील्ड्स..

चढाईच्या तेरा टप्प्यांबद्दल इथे http://www.climbing.com/route/blank-check/ वाचता येईल


उत्तरभिंतीवरच्या चढाईचे प्रयत्न

१९३० च्या सुमारास युरोपातली इतर सर्व शिखरं सर झालेली होती. आणि हा प्रचंड कडा गिर्यारोहकांना आता खुणावू लागला होता. ब्रिटिश आरोहकांचं लक्ष हिमालयातल्या शिखरांकडं आणि एवरेस्टकडं लागलेलं असताना जर्मन ( आणि ऑस्ट्रियन) आरोहक युरोपातली आरोहणाची शेवटची कसोटी पार करण्यासाठी सज्ज झाले होते. हिटलर राज्यावर आल्यानंतर “ आपल्याला काहीही अशक्य नाही” अशा स्वरूपाचा तथाकथित जर्मन प्रोपोगंडा सुरू झाला होता. त्याच सुमारास बर्लिन ऑलिम्पिकचं आयोजन यशस्वी होत होतं आणि अशक्य ते शक्य करून दाखवायची जबाबदारी आता गिर्यारोहकांवरती येऊन पडणं स्वाभाविक होतं. या सार्‍या भानगडीत ही उत्तरभिंत सर करण्याचे अनेक प्रयत्न झाले. बरेचसे अयशस्वी. या सार्याह कथा शोकांतिका बनून आय्गर इतिहासात जाऊन बसल्या. आयगर उत्तरबाजूच्या आरोहणाच्या थरारक इतिहासाबद्दल सांगणारी ही http://www.youtube.com/watch?v=4Yxqy3WdxOk बीबीसीची एक महत्त्वाची तासाभराची चित्रफ़ीत तूनळीवर उपलब्ध आहे.

१९३५ मध्ये श्टेडलमायर आणि मेरिंगर असे दोन जर्मन गिर्यारोहक बरेच वरपर्यंत पोचले. मात्र त्यांनी पहिला मुक्काम केला तिथे हवामान बदलले, हिमवादळ झाले आणि त्यांचे मृतदेह त्या गुहेत सापडले. क्लाईनशायडेगहून त्यांना शेवटचं पाहिलं गेलं त्या छोट्याशा गुहेसारख्या मुक्कामाच्या जागेला नाव मिळाले “ मृत्युमुक्काम” Death bivouac .
तिथला सध्याचा फोटो

१९३६ ची शोकांतिका म्हणजे सर्वांत प्रसिद्ध. ऍन्डी हिंटरस्टॉयसर आणि टोनी कुर्झ हे दोघे जर्मन गिर्यारोहक.मित्र. दोघांनी एकत्र पुष्कळ शिखरं सर केली होती.

त्यांनी दोन ऑस्ट्रियन गिर्यारोहकांबरोबर चढाईला सुरुवात केली.हवामान सुरुवातीला खूप चांगले होते. त्यांनी वेगात चढाई केली. एका खडकाळ ओवरहॅन्गपाशी हिंटरस्टॉयसरने आरोहणातले विशिष्ट तंत्र वापरून सुमारे दीडशे फ़ुटाचा एक आडवा मार्ग शोधून काढला आणि तिथे दोर लावून त्याने बाकी तिघांना पुढे घेतले. त्या मार्गाला पुढे हिंटरस्टॉयसर ट्रॅवर्स असे नाव मिळाले. ( उत्तरबाजू सर करण्यातली महत्त्वाची अडचण हिंटरस्टॉयसरने दूर केली)
सध्याचा हिंटरस्टॉयसर ट्रॅवर्स.

या मोहीमेला बरीच प्रसिद्धी मिळत होती. क्लाईनशाय्डेगच्या हॉटेलात बसून दुर्बिणीतून उत्तरभिंतीवरचे हे नाट्य थेट बघता येत होते. अनेक पत्रकार , श्रीमंत लोक आणि एकूणच जर्मनीत या मोहीमेबद्दल बरीच उत्सुकता होती.

गुहेत रात्री मुक्काम करून त्यांनी दुसर्यात दिवशी पुढे चढाई सुरू केली परंतु एका ऑस्ट्रियन गिर्यारोहकाला डोक्याला दगड लागून तो जखमी झाला. त्यामुळे वेग मंदावला. हवामान बिघडले. त्यामुळे सार्याल टीमने परत उतरायचा निर्णय घेतला. खाली येऊन परत गुहेत मुक्काम केला. मात्र तिसर्या दिवशी सकाळी ट्रॅवर्सपाशी सारे अडले. त्यांनी तिथे फ़िक्स्ड दोर ठेवले नव्हते. आणि निसरड्या खडकावर पुन्हा आधीसारखा ट्रॅवर्स मारणं हिंटरस्टॉयसर ला शक्य झालं नाही. अनेक तास खटपट करूनही यशस्वी न झाल्यामुळे नाईलाजाने सार्यांनी अवघड मार्गाने खाली उतरायचा निर्णय घेतला. मग हिमवादळ सुरू झाले , त्यात हिंटरस्टॉयसर दोरापासून अलग होऊन पडून मेला आणि दोघे ऑस्ट्रियन खडकावर आपटून मेले. टोनी कुर्झ एकटा लटकत राहिला. दूरवरून त्याच्या हाका ऐकून आय्गरच्या गॅलरी खिडकीतून काही स्विस्स वाटाड्यांनी त्याची सुटका करण्यासाठी त्याच्यापर्यंत जायचा प्रयत्न सुरू केला.
( युंगफ़्राउबान ही रेल्वे आयगर पर्वताच्या आतून जाते. तिथे आत एक छोटेसे रेल्वेस्टेशन आहे. पर्यटकांसाठी बनवलेली आयगरच्या उत्तरभिंतीवर उघडणारी खिडकी आहे. तिथून थेट उत्तरभिंतीवर जाता येते. या गोष्टीचा वापर गिर्यारोहकांच्या सुटकेसाठी केला जातो). पण प्रतिकूल हवामानामुळे हे स्विस गाईड्स त्या रात्री टोनीपर्यंत पोचू शकले नाहीत. प्रचंड थंडीत रात्रभर टोनी कुर्झ दोराला लटकत राहिला. ही त्याची आयगरवरची तिसरी रात्र. सकाळी वाटाड्ये त्याच्याजवळ पोचले परंतु त्यांच्याकडे दोर कमी पडत होता म्हणून त्यांनी टोनीला जास्तीचा दोर जोडून अजून खाली उतरायला सांगितले. हाताला हिमदंश झालेला टोनी पुन्हा वर गेला. त्याने जास्तीचा दोर गाठी मारून मारून तयार केला आणि उतरू लागला. पण वाटाड्यांपाशी पंधरा वीस फ़ुटांपर्यंत आल्यावर त्याच्या दोराची गाठ कॅरिबीनरमध्ये अडकली आणि त्याला खाली येता येइना. तशाही स्थितीत त्याने प्रचंड प्रयत्न केला पण तो खाली येऊ शकला नाही. अखेर सुटकेच्या इतक्या जवळ पोचूनही टोनी थंडीने गारठून गेला.
टोनी कुर्झची दुर्दैवी अखेर

या संपूर्ण मोहिमेला प्रचंड नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. आय्गर उत्तरबाजूला मृत्युभिंत असे नाव पडले. बर्नच्या तत्कालीन सरकारने उत्तरभिंतीच्या मोहिमांवर बंदी घातली. तरीही आरोहकांचं या भिंतीबद्दलचे आकर्षण कमी झाले नाही. (ही बंदी लगेच काही महिन्यातच उठवली गेली).
या घटनेवर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेली. चित्रफ़िती निघाल्या. सिनेमे निघाले.
२००८ चा नॉर्डवॉन्ड नावाच्या जर्मन सिनेमाचे छायाचित्रण छान आहे. http://www.youtube.com/watch?v=xbbXWyI2AqE

( त्यात थोड्या फ़िल्मी सूट घेऊन टोनीचे एक पत्रकार प्रेमपात्र दाखवले आहे ते असो)
शिवाय बेकनिंग सायलेन्स नावाची ही http://www.youtube.com/watch?v=zVkJBsUSdGs सव्वातासाची डॉक्युमेन्टरी तूनळीवर उपलब्ध आहे. त्यात या सार्‍या घटनेचे तपशीलवार वर्णन आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन आरोहक कलाकारांकडून चौघांची कामं करून घेतलीय्त. अप्रतिम छायाचित्रण आणि प्रत्यक्ष त्या त्या जागी केलेलं शूटिंग हे या डॉक्युमेन्टरीचं वैशिष्ट्य.

१९३८ मध्ये हैक्मीर आणि इतर तीन गिर्यारोहकांच्या टीमने उत्तरभिंत सर केली. चारही वाचले. जर्मनीत त्यांची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. ऑलिम्पिक स्टेडिअममध्ये त्यांना खास पदके देऊन गौरवण्यात आले. ( त्यातल्या हॅररवर नाझी असल्याचा आरोप वगैरे झालाच आणि त्याने आपल्याबरोबर स्वस्तिक निशाण नेले होते वगैरे वगैरे)

यशस्वी आरोहण आणि तेव्हाचा हिंटरट्रॉयसर ट्रॅवर्स ( ब्रिटिश वर्तमानपत्रातली बातमी )

त्यानंतरही अनेक वर्षे विविध मार्गाने उत्तरभिंत सर करण्याचे प्रयत्न झाले. अजूनही होतात. पण आता तंत्रात पुष्कळ बदल झालाय. गिर्यारोहण पुष्कळ सुरक्षित झालंय., हेल्मेट्स, बूट ,दोर , हारनेस आणि पुष्कळ साहित्य हलकं आणि सुरक्षित झालंय.. हवामानाचा बराचसा अचूक अंदाज वर्तवता येतो. रेडियो संदेशांची देवाणघेवाण करता येते. सुटकेसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध होऊ शकते.

आयगर चढाईची अलिकडच्या काळातली काही छायाचित्रे
ट्रॅवर्स ऑफ़ गॉड्स


व्हाईट स्पायडरवरती

समिट

आयगर उत्तरभिंतीबद्दल सांगताना अल्पाईन स्टाईल सोलो क्लाईम्बिंगबद्दल सांगायला पाहिजे.
Extreme alpine style solo speed climbing म्हणजे फ़िक्स्ड दोर न लावता ,जोडीदाराविना एकट्याने केलेली ऑक्सिजनविना चढाई. हे लोक अंगावर जास्ती वजन घेत नाहीत.आणि प्रचंड वेगाने चढाई करतात.. ऊली स्टेक नावाचा हा स्विस गिर्यारोहक या सोलो अल्पाईन पद्धतीच्या आरोहरणात पटाईत.

पटाईत म्हणजे इतका की याने ही आयगरची अठराशे मीटरची उत्तरभिंत एकट्याने २००७ मध्ये तीन तास चोपन्न मिनिटात पार केली. मग स्वत:चा विक्रम २००८ मध्ये मोडला पावणेतीन तासात. उगीच नाही याला स्विस मशीन म्हणत. http://www.youtube.com/watch?v=VUWBbepsdmY हा विडीओ हाय क्वॉलिटीत बघा.
http://www.alpinist.com/doc/web07-08w/newswire-steck-eiger-record-again

दुसर्‍या वेळच्या विक्रमासाठी त्याने कॅमेरा क्रू, हेलिकॉप्टर वगैरे शूटिंगसाठी बरोबर घेतले. २ तास सत्तेचाळीस मिनिटे हे त्याचे आयगर उत्तरभिंत आरोहणाचे रेकॉर्ड. पहिल्या विक्रमानंतर ऊलीने पुन्हा वर्षभर ट्रेन केलं स्वत:ला. स्विस ऑलिम्पिक धावकांबरोबर प्रशिक्षण घेतलं. स्वत:चं वजन कमी केलं. अंगावर घेतलेलं वजनही अजून कमी केलं. ( त्याच्या पहिल्या सोलो क्लाईंबच्या वेळी त्याने २५० मीटरचे दोन दोर बरोबर घेतले होते. आणि शेवटच्या विक्रमाच्या वेळी पस्तीस मीटरचा एक दोर .. परत उतरावं लागलं तर तेवढा दोर आता पुरेसा आहे असं त्याला वाटतं. Smile ).. ऊलीच्या या साईटवरती त्याची इतरही अनेक रेकॉर्ड्स पहायला मिळतील.

उत्तरभिंत सुमारे १८०० मीटर उंचीची असली तरी चढाईच्या वेळेस कधी तिरकी आणि आडवी चढाई करावी लागते आणि अंतर दुपटीने वाढतं... म्हणजे सुमारे २४ मीटर दर मिनिटाला या वेगाने तो चढला. (मी सपाट रस्त्यावर या वेगाने चालू शकतो.).. ऊलीच्या या मोहिमेचा छोटा थरारक विडीओ तूनळीवर उपलब्ध आहे. फ़क्त तीन अवघड ठिकाणी त्याने दोर वापरला , बाकी सारा फ़्री सोलो क्लाईम्ब. स्पायडरमॅनच जणू.. घरात बसून हा विडीओ पाहतानाही काही ठिकाणी पाय थरथरतात.
http://www.youtube.com/watch?v=d-U6enHvEUA

त्यात शेवटी समिट जवळ आल्यावर मिटलेगी रिजवर बर्फ़ात तो अशक्य वेगात धावतो तेव्हा विश्वास बसत नाही. दोघा किंवा तिघांच्या टीमने आयगर उत्तरभिंत चढायचा विक्रम आहे ६ तास पन्नास मिनिटांचा... आणि हा एकटा माणूस पावणेतीन तास घेतो फ़क्त.

त्यानंतर ऊलीचं लक्ष हिमालयाकडे गेलं. २०१२ मध्ये त्याने एवरेस्ट सोलो विना ऑक्सिजन केला.
ऊलीला आयगर आता घरासमोरच्या अंगणाइतका माहिती झालाय.डिसेंबर २०१२ पर्यन्त त्याचा ३५ वेळा आय्गर नॉर्थफ़ेस चढून झालाय.. ३५ वेळा. ( त्याचं लग्न एका स्विस गिर्यारोहक मुलीशी झालंय आणि गेस व्हॉट त्यांनी हनीमून दोन दिवस आयगरची उत्तरभिंत चढून साजरा केला. !!!!)
http://www.markhorrell.com/blog/2012/ueli-stecks-ridiculous-mountaineeri...

२००८ मध्ये ऊलीला आयगर ऍवॉर्ड दिलं गेलं. ग्रिंडलवॉल्डमध्ये ब्रेकफ़ास्ट आणि लंच समिटवर असं म्हणताना तो हेही मान्य करतो , “मी काही हैकमीर किंवा हिंटरस्टॉयसरपेक्षा भारी आरोहक नाही. आता फ़क्त काळ बदललाय, आयुधं बदललेली आहेत इतकंच.” ऊली आता मोठा हीरो गिर्यारोहक झालाय. तो अल्पिनिझमवर लेक्चर्स देतो, टीवी शो करतो, मुलाखती देतो. पण त्याचं ट्रेनिग शेड्यूल भन्नाट असतं.. त्याच्याबरोबर दोन दिवस घालवून केलेलं फोटोशूट इथे http://patitucciphoto.com/2011/02/09/training-with-ueli-steck/ पहायला मिळेल.

( डानी अर्नोल्ड नावाचा अजून एक स्विस सोलो अल्पाईन आरोहक.. त्याने २ तास अठ्ठावीस मिनिटात आयगरवरती चढाई केली पण तो हिवाळ्यात न गेल्याने त्याने हिन्टरट्रोयसर ट्रॅवर्सवरती फ़िक्स्ड दोर वापरले त्यामुळे त्याचा विक्रम एक्स्ट्रीम सोलो आरोहणाप्रमाणे विक्रम म्हणून धरत नाहीत .. आयगरवरचे सोलो स्पीड क्लाईम्ब सामान्यपणे हिवाळ्यात केले जातात. जेव्हा भरपूर बर्फ़ असतो तेव्हा ट्रॅवर्सवरती फ़िक्स्ड दोर वापरावे लागत नाहीत)

तीसच्या दशकात तीन तीन दिवस घेणारी ही भिंत आता लोक अडीच पावणेतीन तासात चढायला लागले आहेत. अर्थात सारेच नाहीत. आजही दोन रात्री भिंतीवर मुक्काम करत सावकाश चढणारे आरोहकही आहेत. पण ऊली ष्टेक सारखा अचाट आणि भन्नाट माणूस जगात एखादाच. अत्यंत कुशल गिर्यारोहकसुद्धा ऊली स्टेक लैच उच्च आहे हे मान्य करतात.

२०१२ च्या सप्टेंबरात माझे युन्ग्फ़्रौयॉक रेल्वे पर्यटन करून झाले. त्या वेळी आयगरबद्दल प्रथम ऐकले. पण त्याबद्दल इतक्या गोष्टी नंतर वाचल्या. आधी वाचल्या असत्या तर जरा क्लाईनशायडेगला उतरून थोडावेळ थांबून शांतपणे पुन्हा ती उत्तरभिंत पाहिली असती. आय्गरग्लेशर स्टेशनवरून थोडा चालत फ़िरलो असतो. असो.. आता पुन्हा कधीतरी...

आय्गर वॉक

डोंगराच्या पोटात शिरणारी युंग्फ़्रौबान.. मागे आयगर

आय्गर्ग्लेशर स्टेशनजवळ...

( सर्व छायाचित्रे जालावरून साभार)
_________________________________________________________________________

संपादकः width="" height="" मुळे काही ब्राऊझर्सवरून चित्रे दिसत नव्हती. आता सुधारणा केली आहे. या टॅग्ज्सचा वापर टाळावा ही विनंती

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

__/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त!

मी कोणे एके काळी मनालीमध्ये भारतीय गिर्यारोहण संस्थेतर्फे बेसिक ट्रेनिंग कोर्स इन माउंटेनिअरिंग केला होता. त्यात पायाला क्रॅंपॉन लावून बर्फाची छोटीशी भिंत चढणे वगैरे गोष्टी शिकवल्या होत्या. या कोर्समुळे प्रत्यक्षात शिकण्यापेक्षा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी येत नाहीत आणि बापजन्मात जमणार नाहीत हे अधिक स्पष्टपणे कळलं. रॉक क्लाइंबिंग हा आपला प्रांत नाही हे त्यावेळी ठरवून टाकलं होतं. त्यामुळे या गड्याने केलेल्या गोष्टींनी आदरार्थी वासलेला आ अधिक प्रचंड मोठा झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान!
जिवाला प्रचंड धोका आहे हे पूर्णपणे माहिती असूनही हे लोक अशी कृत्ये का करतात हे कोडे सनातन आहे. त्यावरचे 'बिकॉज इट इज देअर' हे उत्तरही सनातन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आयगरच्या शिखराबद्दल चांगली माहिती मिळाली. लेखकाचा हेतू कदाचित तसा नसेल, पण लेख जरा ऊली स्टेकचा उदो उदो करणारा वाटला.
व्यक्तिशः मला हा "speed climbing" हा प्रकार तितकासा पटत नाही. इथे निसर्गावर विजय मिळवण्याची भावना दिसते. त्याऐवजी निसर्गाला सोबत घेऊन माऊंटन क्लाईंबिंग करणे, मला जास्त योग्य वाटते.

गेल्या वर्षी युंगफ्रॉला जाण्याचा योग आला. Top of the Europe एकंदरीत ठीक वाटले, पण हिमालयात गेले की आपण निसर्गापुढे जसे नकळत नतमस्तक होतो, तसे अजिबात वाटले नाही. हिमालयाची सर त्याला नाही. Kleine Scheidegg ते Wengen चा ट्रेक मात्र खूप आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युंगफ्रॉ ठीकठाक आहे, या मताशी सहमत. अति टूरिस्टी ठिकाण आहे. उत्तम मेन्टेन केलेले आहे, प्रचंड गर्दी असते.

लेख जरा ऊली स्टेकचा उदो उदो करणारा वाटला.
तसं झालंय खरं ... अजून लिहायचं राहून गेलं की बर्‍याच गिर्यारोहकांच्या मते ऊलीच्या या विक्रमाच्या हौसेमुळे एक मूर्ख स्पर्धा निर्माण व्हायचा धोका आहे.. वेग हेच सर्व काही, ही भावना बळावण्याचा धोका आहे, वगैरे वगैरे.

अवांतर : या ऊली स्टेकवर एप्रिल २०१३च्या शेवटच्या आठवड्यात हिमालयामध्ये ल्होत्से शिखराखालच्या बेस क्याम्पवर शेर्पा मंडळीच्या १०० च्या जमावाने हल्ला केला आणि फटकावले .. कारण होते, काही तासांपूर्वी शेर्पा फिक्स्ड रोप लावत असताना ऊलीचा ग्रुप शेजारून गेला म्हणून ऊलीचा ग्रुप आणि या शेर्पा मंडळींची शिखराजवळ बाचाबाची झाली होती. ( शेर्पांचे म्हणणे की आम्ही फिक्स्ड रोप लावत असताना कोणीही जवळून जायचे नाही आणि तसा आम्ही करार केला आहे.. पण ऊलीच्या ग्रुपच्या मते तुमचा करार व्यावसायिक संस्थांशी आहे, त्यांचा आमचा काहीही संबंध नाही.. थोडक्यात डोंगर तुमच्या बापाचा नाही) ऊलीच्या सहकार्‍याने त्याच्यावर आईस अ‍ॅक्स उगारणार्‍या एका शेर्पाला नेपाळीत शिवी दिली होती आणि रेडियोवर " बघून घेइन " अशा टाईपचे आव्हान दिले असे म्हणतात. यामुळे शेर्पा प्रचंड चिडले आणि बेस क्याम्पवरती हाणामारी झाली.
शेर्पा मंडळींनी ऊली आणि त्याच्या ग्रुपला अक्षरशः पळवून लावले. जीवाच्या भीतीने ते पळून गेले.

प्रकरण मुळातून तपशीलवार वाचण्यासारखे आहे. एवरेस्टचे प्रचंड व्यावसायिकीकरण, शेर्पा मंडळींमध्ये खदखदणारा प्रचंड असंतोष , कदाचित खालच्या लेवलच्या शेर्पांना मिळणारे कमी पैसे अशी अनेक कंगोरे असलेली सामाजिक कारणे असावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अल्पाइन क्लाईंबिंग मध्ये मानाचे नाव घेता येईल असे १ नाव म्हणजे राइनहोल्ड मेसनर. त्याने अल्पाइन क्लाईंबिंग ही पद्धत (technique) हिमालयात नेली. त्याच्या मते expedition style ही निसर्ग आणि डोंगर यांच्या विषयी अनादर दाखवणारी आहे. (disrespectful to nature and mountains).

मेसनर चे ऊलीबद्दल मत आहे: Someone like Ueli Steck, a very sympathetic and cultured fellow, after his ascent of Everest on usual routes, however, has to prove that he wants to do real alpinism, not only speed climbing. संदर्भ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी वाचल्या असत्या तर जरा क्लाईनशायडेगला उतरून थोडावेळ थांबून शांतपणे पुन्हा ती उत्तरभिंत पाहिली असती.

या लेखामुळे आम्हाला तिथे जायला मिळाले तर ही संधी जरूर साधता येईल, त्याबद्दल सर्वप्रथम आभार!

यातील सारे म्हणजे सारे काही नवे आहे आणि रंजकही! सावकाशीने विडीयो बघून अधिकचे लिहेन.

तुर्तास केवळ पोच आणि या महत्त्वपूर्ण माहितीबद्ध आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थरारक.

टिटलीस पाहणे झाले.. युंगफ्राऊ राहिला. Sad

टिटलीसदेखील रुद्रभीषण आहे. मला वाटतं टिटलिसचे उतार जास्त तीव्र आहेत. त्यातल्या काही अतिभयानक उतारांवरुन स्कीअर्स सरासरा खाली घसरताना पाहिले तेव्हा ते एखादं शिखर सर करण्याइतक्या तोडीचं साहसच वाटलं होतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय फोटो आहेत, एकदम यक्षनगरीच!!! दिल आयगर आयगर हो गया!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका नव्या विषयाची ओळख करून देणारा आणि त्यावरची चर्चा विचारप्रवण करणारी. माहितीप्रद लेख - आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही व्हीडीओही पाहिले. मस्त आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहितीपुर्ण लेख.

अभिज्ञ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0