भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी

भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी

लेखिका - कविता महाजन

चित्रकार : शुभा गोखले


गोष्ट पहिली


श्रद्धा डोक्यात जाते बहुतेकांच्या. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं, असं वाटणारी सगळीच माणसं हमखास डोक्यात जातात – ही त्यातलीच. त्या दिवशी खरंतर सगळे थकले होते. पद्मजाला तर पेंग येऊ लागलेली. एकेक दिवा गळून पडत होता. टप. टप. टप. आणि वायरींची ती भेंडोळी पानसापांसारखी सरपटू लागली होती. पापण्यांवर कुणीतरी कृष्णकमळाची फुलं आणून ठेवली. त्यांचे जांभळे-पांढरे तुरे झुलू लागले. झोप येऊ लागली. आणि हिचे रिटेक संपेनात.

दृश्य असं होतं की पद्मजा – तीही फ्लॅशबॅकमधली तरुण – पलंगावर निजलेली आहे. तिच्याजवळ एका बाजूला दोन जुळी बाळं आणि दुसऱ्या बाजूला भूषण – हा सिनेमातला नवरा – निजलेला आहे. खलनायक खिडकीची झडप उघडतो. बाहेर वारे घोंघावताहेत. तो पद्मजाकडे बघतो. मग मुलांकडे. मग एक विकृत कल्पना सुचल्याप्रमाणे हसतो. खिडकीतून अलगद आत उडी टाकतो. दोन बाळांपैकी एकाला उचलून खिडकीबाहेर जातो. पुन्हा एकदा आत झोपलेल्या पद्मजाकडे पाहून खुनशी हसतो. आणि दिसेनासा होतो.

… तर पद्मजाचं म्हणणं होतं की तिनं कुशीवर निजावं. घरंदाज बायका उताण्या निजत नाहीत. तसं निजणं 'चांगलं नसतं'; म्हणजे थोडक्यात पुरुषाला स्वतःहून बोलावणारं असतं, असं म्हणतात. म्हणून त्या कुशीवर निजतात. हे एक. आणि दुसरं म्हणजे मूल बाजूला असेल तर आई त्याच्याकडे तोंड करून निजेल. लहान बाळांना असं कुणी कधी पलंगाच्या कडेला निजवत नाही. बाळं आईबाबांच्यामध्ये झोपवली जातात. पण श्रद्धाच्या मते ते कॅमेरात चांगलं दिसणार नव्हतं.

लग्नाला जाताना तयार व्हावं तितकी सजून पद्मजा पलंगावर ताठ, उताणी झोपली. पांघरुण गुडघ्यापर्यंत. म्हणजे पोट, कंबर, छाती सारं नीट दिसलं पाहिजे. पद्मजाचा कंटाळा वाढत गेला. एक मोठी जांभई येईल आणि तिच्या अजस्त्र तोंडात हा बंगला, हे लाइट्स्, ही माणसं, सगळ्यांना खेचून घेईल, तर किती बरं होईल असं तिला वाटलं. पण तसं होण्याचं चिन्ह कुठेही उमटलेलं दिसत नव्हतं. मग पद्मजानं हात कसा ठेवायचा याबाबत तिच्या सूचना सुरू झाल्या. हळूहळू पद्मजाचा संयम सुटत चालला होता. तिने पंचवीस प्रकारे निजून दाखवलं, शेवटी पुन्हा पहिलाच प्रकार केला सव्वीसावा म्हणून आणि श्रद्धानं एकदाचं ओके केलं. पद्मजाच्या डोक्यात तण तण तण वाजायला सुरूवात झाली. एक तुटक्या, सैल झालेल्या तारांचं तंतुवाद्य वाजवत तिच्या डोक्यात कुणीतरी ठाण मांडून बसलं होतं.

मग श्रद्धाचा मोहोरा दिलीपकडे वळला. त्याचं खुनशी हसणं तिला पुरेसं खुनशी वाटत नव्हतं. समोर आलेल्या दातांची फळी लावून, आवाज न करता तो किती वेगळं हसू शकणार होता? तरी त्यानं तीन प्रकार दाखवले. हे पाहताना पद्मजा उकळायला लागली होती. त्या उकळीचे बुडबुडे तिच्या चेहेऱ्यावर दिसू लागले. भूषण हळूच कुजबुजला, "तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. दिलीपचा चेहरा बघा बदलतोय. आता काहीतरी धमाल घडणार इथं."

पद्मजानं पाहिलं, दिलीपचा चेहरा हळूहळू एखाद्या लहान मुलासारखा निरागस होत चालला होता. डोळ्यांत उत्सुकता ओथंबून आली होती. आता तो इयत्ता पहिलीत होता आणि श्रद्धा त्याच्या प्रिय बाई! त्या सांगतील, शिकवतील ते सगळं तो उत्कंठेनं ऐकणार होता. पद्मजाचे डोळे आपोआपच विस्फारले गेले. दिलीप ओठांचा चंबू करून सहज सुरात म्हणाला, "एक विनंती करू का? तुम्ही करून दाखवा ना प्लीज." श्रद्धाच्या अंगभर अहंकार झळकला. तिनं पोझ घेतली आणि दिलीपला खुनशी हसून दाखवलं. सगळे पाहात होते. दिलीप म्हणाला, "माझ्या लक्षात नाही आलं ..." श्रद्धानं पुन्हा हसून दाखवलं. दिलीपच्या चेहेर्‍यावर नासमझी कायम - "पण हा अँगल नाहीये ना आपला? मान अशी इकडे, पद्मजाकडे हवी ना?" श्रद्धानं पुन्हा एकदा पद्मजाकडे मान करून हसून दाखवलं.

पद्मजाला आता कुठल्याही क्षणी खदखदून हसू फुटेल असं झालं होतं. अखेर भूषणने पांघरुणातून तिचा हात गच्च दाबून ठेवला. दिलीपने या अँगलने त्या अँगलने करून श्रद्धाकडून विकट हसवून घेतलं. अखेर चौदाव्या वेळी तिला खिडकीतून बाहेर जाऊन हसू दाखवायला लावलं. मग म्हणाला, "आता थोडं समजलं असं वाटतंय. प्रयत्न करून बघतो."

हा शेवटचा शॉट ओके झाला. पॅकअप झालं. श्रद्धाचं पाऊल तिथून बाहे पडल्याक्षणीच पद्मजाला हसू फुटलं. सगळेच हसत होते. दिलीप मात्र आपण काही केलंच नाही अशा आविर्भावात टेचात खिडकीतून आत आला पुन्हा उडी मारून. भूषण म्हणाला, "याला म्हणतात सभ्यतेनं शेटं उपटणं. थांबवा आता हसू आणि निघा घरी."

यानंतर कधीही चिडचिड होईल असे प्रसंग आले की पद्मजानं फक्त दिलीपनं तो निरागस बनवलेला चेहेरा डोळ्यांसमोर आणायला सुरुवात केली. पुढच्या काळात तिला जे शांत, संयमी म्हणून वाखाणलं जाऊ लागलं, त्याचं रहस्य इथं होतं.

गोष्ट दुसरी

ही व्हीलचेअरमधे बसलेली आई. तिच्या बाळाला कोणीतरी पळवून नेलं, या धक्क्याने तिच्या पायातलं बळ गेलं आणि ती पांगळी झाली. पुन्हा त्या धक्क्याने तिचा स्मृतिभ्रंशही झाला आहे. त्यामुळे तिचा चेहरा मख्ख आहे.

तर आता या पांगळ्या आईला रोज शालू कसा नेसवतात? आणि कशासाठी? इतक्या सुबक निऱ्या तिला बिछान्यावर निजवून घालता येतात? की तिच्यासाठी खास शिवून घेतल्यात भरजरी साड्या? पुन्हा मेकअप, दागिने, हेअरस्टाईल, गजरे हे सगळं आलंच. तयार होण्यात दीड तास जायचा पद्मजाचा. हे इतकं केल्यावर आई पेशंट कशी दिसणार? पण ती मुळी पेशंट दिसायला नकोच आहे. व्हीलचेअर आहे ना तिच्या विरहाचा धक्का व्यक्त करायला. इतकी सुंदर, सेक्सी आई व्हीलचेअरवर पाहून लोक हळहळणारच.

तर एकवीस वर्षांनी तिचा मुलगा त्याच गावात योगायोगाने परत येतो. त्याची ट्रेन गावात शिरली की तिच्या पापण्या फडफडायला लागतात. तो घरात आला की डोळ्यांतून पाणी ओघळू लागतं. तो तिच्यासमोर आला की ओठ विलग होऊन शब्द फुटतात - 'बेटा!' आणि त्याने हातात हात घेतला की त्याच्या स्पर्शाने पायांत बळ येतं. पुढच्या क्षणी ती सोफ्यावरून उठावं तशा सहजपणे चटकन व्हीलचेअरवरून उठते. मग मुलगा 'माँ' अशी साद घालत तिच्या पाया पडतो. ती त्याला घट्ट जवळ घेते.

पद्मजाच्या मनात आलं, की सिनेमात अजून बायकांचे स्तन उघडे दाखवायची पद्धत नाही म्हणून, नाहीतर डोळ्यांतून अश्रू वाहवतात ग्लिसरीन टाकून, तशा स्तनांतून दुधाच्या धारा घळाघळा वाहताना दाखवल्या असत्या यांनी नक्कीच एखादी ट्रिक शोधून.

गोष्ट तिसरी

पद्मजा गारुडीण आहे. म्हणजे गारुड्याची बायको. गारुड्याची जमीन गावच्या जमीनदाराला बळकवायची आहे. तो त्यांचं घर जाळतो. गारुडी त्याची नागाची टोपली घेऊन आणि गारुडीण दुपट्यात गुंडाळलेलं बाळ घेऊन जीव वाचवून जंगलात पळतात. जमीनदार त्यांच्या मागावर आहे. अखेर तो गारुड्याला गाठतो आणि त्याची हत्या करतो. गारुड्याच्या टोपलीतला नाग झुडपाआडून हे पाहात असतो. गारुडीण मात्र जमीनदाराच्या हाती लागत नाही. तो निघून जातो. माग गारुडीण गारुड्याच्या प्रेताजवळ येऊन विलाप करते. नाग तिच्याजवळ येऊन थांबतो. ती नागाजवळ बाळाला ठेवते आणि लाकडं आणून सरण रचते. नवऱ्याचं प्रेत खेचून नेऊन सरणावर ठेवते. त्याला बाळाच्या हातून अग्नी देते. गारुडी जळून गेल्यावर बाळ रडू लागतं. मग ती बाळाला दूध पाजायला बसते. नाग तिच्या समोर येऊन थांबतो. 'भुकेनं बाळ रडू शकतं, पण नाग रडू शकत नाही' - असं म्हणत ती एक वाटी घेऊन पदराआड नेते आणि वाटीभर दूध काढून नागासमोर ठेवते. नागाला म्हणते, 'तू देखील माझा मुलगाच आहेस!' मग नाग मनाशी ठरवतो, की मी माझ्या वडलांच्या - म्हणजे गारुड्याच्या हत्येचा बदला घेईन आणि माझ्या आईच्या - म्हणजे गारुडिणीच्या दुधाचं कर्ज फेडेन. त्या दुष्टानं ब्राह्मणाची हत्या केली आहे.'

दिग्दर्शकानं प्रसंग समजावून सांगितला. पद्मजा ठप्प. कोणता गारुडी ब्राह्मण असतो? आणि पुन्हा एका गावात राहून शेती करत असतो? गारुडिणीचे कपडे बंजारा बायकांसारखे असतात का? तिला जंगलात अशी कापलेली लाकडं कुठून मिळतात? नवऱ्याला सरणापर्यंत खेचत नेणं ठीक, पण ती त्याला उचलून इतक्या उंच सरणावर कशी ठेवते? नागाला वाटीत दूध देते ती स्टीलची वाटी तिला जंगलात कुठं मिळते?
दिग्दर्शक तिच्या प्रश्नांनी हैराण झाला. जुन्या काळात अशिक्षित नट्या होत्या हे किती चांगलं होतं असं त्याला वाटू लागलं. त्याच्या बडबडीने पद्मजा गप्प बसली. मग अमरीश तिच्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, "तू नवी आहेस का?" पद्मजा म्हणाली, "हिंदीत नवीच. म्हणजे ही माझी तशी दुसरीच फिल्म."

"मलाही असा पेच पडला होता. मी तेव्हा अमिताभशी बोललो. त्याने मला सांगितलं होतं तेच तुला सांगतो. तो म्हणाला होता - काम करत रहा. हा व्यावसायिक सिनेमा आहे. इथं 'का' हा प्रश्नच पडू द्यायचा नाही. करा नाहीतर मरा!" पद्मजाला हसू आलं.

"काही कामं चरितार्थासाठी करावी लागतात. व्यावसायिक कामं करण्यात काही वाईट नाही. इथं फार विचार करायचा नाही. हे मनोरंजन आहे आणि ते अशा अतार्किक गोष्टींमधून करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तू काय नाटकांमधून आली आहेस?" तिनं मान डोलावली.

"वाटलंच. इथं ते सगळं विसरायचं. त्याचा इथं काहीही उपयोग नाही. दिग्दर्शकानं सांगितलं तेवढं आणि सांगितलं तसं करायचं." त्यानं समजावलं. बाकी तर पार पडलं, पण आता तो दुधाचा शॉट. ती थोडी संकोचली. विचित्र वाटत होतं. बाळाला पदराखाली घ्यायचं असतं तर काही हरकत नव्हती. पण हे बाळाला पदराखाली घेऊन, दुसरीकडे, म्हणजे दुसर्‍या स्तनातून वाटीत दूध काढणं? हे कसं करायचं? तिनं पदर नीट घेतला. पदरात हात घालून ब्लाउज वर सरकवला, मग जमिनीवरची वाटी उचलून पदराआड नेली आणि दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार दोन सेकंदात ती नागापुढे ठेवली. वाटी नेण्याचा शॉट व्यवस्थित झाला. मग कुणीतरी वाटीत दूध आणून दिलं पुढच्या शॉटसाठी.

"इतकं दूध?" ती ओरडलीच.
"याहून कमी ठेवलं तर कॅमेरात दिसणार नाही हो... तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका." दिग्दर्शक म्हणाला.
पद्मजानं निमूट मान डोलावली. पुढच्या काळात, सिनेमासाठी काही तर्कशुद्ध लिहिलेलं असेल, तरच नवल वाटू शकतं, हे तिच्या ध्यानात आलं.

'हे हृदय कसे आईचे ...' चे शेवटचे प्रयोग सुरू होते. मग पद्मजाकडे दुसरं नाटक नव्हतं. काम घेणं गरजेचं होतं. अनाहितासाठी आणि घरासाठी. या सिनेमानं तिला अजून एक गोष्ट दिली - अमरीशची मैत्री. एक दिवस वेळ काढून तो तिचं 'हे हृदय...' पाहण्यास आला आणि भारावून गेला. त्याचा अभिप्राय पद्मजासाठी फार मोलाचा होता.


गोष्ट चौथी


'हे हृदय कसे आईचे ...' हे एक नृत्यनाट्य होतं. या नाटकानं तिला पुष्कळ नव्या गोष्टी शिकवल्या. त्यात सगळ्यात महत्त्वाचं फूटवर्क. रंगमंचावर वावरताना पायांचं काय करायचं? कुठून कुठे, किती वेगात, कसं जायचं? कुठे थबकायचं? कुठे थांबायचं? नृत्य होतंच, पण पायांचा हा वावर फार देखणा होता. पायांचा असा आणि इतका वापर तिला त्यानंतर कधीही करायला मिळाला नाही.


एक आईवेडा, एकुलता एक मुलगा आहे. आई एकटी आहे. ती मुलाला वाढवते, या जगात वावरायला शिकवते. अक्षरओळख, कलांचा आस्वाद, शेतीचं काम शिकवते. एके दिवशी मुलाला रस्त्यात एक सोन्याचं नाणं सापडतं. या आकस्मिक लाभलेल्या धनाचं करायचं काय? तो पर्यायांचा विचार करू लागतो. त्याला निरनिराळे लोक सल्ला देतात. माती म्हणते, "हे पैसे तू आईला दे किंवा या पैशांतून आईसाठी काहीतरी घे. तिचे कष्ट ज्यातून कमी होतील अशी एखादी भेट आईला दे." वाट म्हणते, "आता पुन्हा आईकडे परत जाण्यात काय मतलब? तिच्या गर्भाशयातून बाहेर आलास, तसा तिच्या प्रभावातूनही बाहेर ये. नव्याने जन्म घे. मगच तुला नवं जग दिसेल. तिनं तुला जे काही शिकवलं आहे, ते या नव्या जगात जाण्यासाठीच आहे."


पुढे त्याला एक सरडा भेटतो. तो म्हणतो, "कुठलं नवं जग? आहे त्याच जगातली मजा तू अजून अनुभवलेली नाहीस. एका नाण्यात कुठलं नवं जग दिसणार तुला? त्यापेक्षा ते इथंच खर्च कर. मित्रांसोबत वारुणी पी. धुंद हो. आनंद मिळव." मग पाखरांचं जोडपं दिसतं, प्रणयचेष्टा करणारं. तो जागीच थबकून त्यांचं पिसं फुलवणं, एकमेकांभोवती फिरणं, नाचणं, गाणं पाहू लागतो. त्याचं भान हरवतं. पाखरं त्याला हसतात. तो विचारतो, "हे सगळं काय होतं?"
"तुला माहीत नाही?" पाखरांना आश्चर्य वाटतं.
"नाही. हे तर मला माझ्या आईने कधी सांगितलं नाही, शिकवलं नाही." तो म्हणतो.
"अरे, हे आई कसं शिकवेल? हे शिकवणारी तुझी दुसरीच कुणी जोडीदारीण असेल. जे तुझ्यातच आहे, ते कसं व्यक्त करायचं हे तिच्या सहवासातच तुला कळेल. तिच्या सोबतच तू फुलशील. जा, आता आधी तिचा शोध घे." पाखरं सांगतात.


तो तिच्या शोधात फिरतो आणि एके स्थळी ती त्याला दिसते. ते सोन्याचं नाणं खर्च करून तो तिच्या एकेक मागण्या पूर्ण करतो आणि तिला जिंकतो. ती त्याच्याशी लग्न करते. काही काळ सुखात जातो. तो दिवसभर श्रम करतो, संध्याकाळी आनंदाने गाणी गातो, पत्नीच्या वक्षावर चंदनाची नक्षी काढतो, तिला फुलांनी सजवतो. एके दिवशी पत्नी विचारते, "हे शेती करणं, गाणं, चित्रं - हे सारं तुला कुणी शिकवलं? इतक्या मधुर भाषेत तू माझ्याशी बोलतोस, ही भाषा तुला कुणी शिकवली?"

त्याला आईचं स्मरण होतं. पत्नीच्या सुखात आपण तिला असे कसे विसरलो या जाणिवेनं तो ओशाळा होतो. पत्नीला हे सारं मोकळेपणानं सांगतो. आईच्या आठवणी, तिचं कर्तृत्व, तिची थोरवी वर्णन करतो. पत्नीच्या चेहऱ्याकडे त्याचं लक्षच जात नाही, इतका तो आईच्या आठवणीत मग्न होतो.

पत्नीचा जळफळाट होतो. आपणच याला सुखाचा मार्ग दाखवला आणि त्यावर वाटचाल कशी करायची ते शिकवलं, याविषयीचा तिचा अहंकार कोमेजलेल्या फुलासारखा गळून पडतो. मत्सरानं ती पेटून उठते. आता हा दोन गुरूंमधला संघर्ष आहे असं तिला वाटतं. ती मनाशी डाव रचते. त्याला सांगते की, "मला तुझ्या आईचं हृदय आणून दे. ते मला हवं आहे. मग माझ्यात काही त्रुटी राहाणार नाही. मी परिपूर्ण होईन आणि तू पूर्ण सुखी." तो आईच्या घरी जातो. आई झोपलेली. निळी, शांत रात्र. आईला मारून, तिचं हृदय घेऊन तो निघतो. वाटेत त्याला ठेच लागते आणि हृदय हातातून खाली पडतं. पडताक्षणी ते मुलाला विचारतं, "तुला फार लागलं तर नाही ना बाळ?"


मुलाला आपण कोणती चूक करून बसलो आहोत, याची जाणीव होते. त्याला रडू फुटतं. तो मनोमन क्षमा मागतो. आईचं हृदय त्याला माफ करतं. घरी जाऊन तो पत्नीला ते हृदय देतो. ती ते स्वीकारते आणि तिच्यात अंतर्बाह्य बदल होतो. आपण आता कायमच्या हरलो आणि आई जिंकली हे तिच्या ध्यानात येतं. यापुढे जग कायम तिची निर्भत्सना करणार असतं आणि आईच्या त्यागाचे गोडवे गाणार असतं. ती स्वतः आई होईल, तेव्हा आणि तरच तिला या जगात उच्चासन मिळणार असतं. स्त्रीची सर्वात महत्त्वाची भूमिका आईचीच, हे त्याक्षणी जे ठसलं, ते आजवर सुरू आहे आणि यापुढेही सुरूच राहील, हे तिला कळून चुकतं. दुखावलेला पती तिच्याकडे दुर्लक्ष करत राहतो, पण जेव्हा त्याला समजतं की ती आई होणार आहे, तेव्हा सारं विसरून तो पुन्हा तिच्या जवळ जातो.

हे कथानक. यातली पत्नीची भूमिका पद्मजानं केली होती. विक्रम पतीच्या भूमिकेत आणि सुलभाताई आईच्या. नाटकात प्रकाशाचा अप्रतिम खेळ होता. प्रवास, दिवस, रात्र, प्रणय, सत्तासंघर्ष सारं काही प्रभावी घडवण्यात प्रकाशयोजनेचं काम मोठं होतं. बाकी सेट असा विशेष नव्हता. पडद्यांचा वापर केला होता. हे सगळं तिच्यासाठी खूप वेगळं होतं. नाटकाला लोकसंगीताचा बाज होता. या नाटकाची खूप चांगली चर्चा झाली. नाटकाचा दिग्दर्शक वेगळा, नृत्य दिग्दर्शक वेगळा हे तिनं इथं पहिल्यांदा पाहिलं. तीन महिने तालमी चालल्या. संध्या नांबियारांकडे तर तिनं नृत्य शिकलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं सोपं होतं. पण नाटकात नृत्य करायचं नसतं, तर नृत्यात्म हालचाली तेवढ्या करायच्या असतात, हे तिला ताराबाईंनी शिकवलं.

शौनक या नाटकानं अगदीच खुळावून गेला. शक्य तितक्या प्रयोगांना तो हजर रहायचा. एकदा विंगेतून प्रयोग पाहण्याची त्याची इच्छा होती. ताराबाईंनी नाराजीनेच परवानगी दिली. त्यांना तिचं हे प्रकरण काही आवडलं नव्हतं. मुळात घटस्फोट घेणंच फारसं रुचलं नव्हतं, पण त्यामागची अपरिहार्यता त्यांनी समजून घेतली होती.

शौनकच्या हे लक्षात आलंच. तो म्हणाला, "फार पझेसिव्ह आहेत या बाई. तुझ्याबाबत जरा जास्तच पझेसिव्ह दिसताहेत." ताराबाई माणसांना कामापुरतं खूप जवळ घेतात, पण त्यांच्यात कधीच गुंतत नाहीत, काम संपलं किंवा मनाविरुद्ध होऊ लागलं की परस्पर त्या तुमचा धागा कापून टाकतात, हे तिनं अद्याप अनुभवायचं होतं. तोवर ती त्यांच्या इतकी प्रेमात होती की एकदा त्या दोघीच बोलत चहा घेत असताना तिनं त्यांना म्हटलंही होतं की, "बाई तुम्ही पुरुष नाहीत ही किती चांगली गोष्ट आहे. नाहीतर पुन्हा एकदा कुणा विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणं हे किती त्रासाचं झालं असतं."
आणि बाई नेहमीसारखं गोड हसल्या होत्या. एरवी त्या खटकलेलं चटकन सांगायच्या, पण आवडलेल्याची दाद मात्र क्वचितच द्यायच्या. मात्र या नाटकाची चांगली चर्चा झाली आणि बाईंची थाप पाठीवर पडली. पद्मजा खुशालून गेली अगदी.

उत्तम दारू चांगल्या पद्धतीने कशी प्यायची, हे पद्मजाला शिकवलं ते विक्रम आणि शौनकनं. त्याआधी तिनं काही चुका करून झाल्या होत्या. त्यांची वाईट चर्चाही झाली होती. त्यामुळे ती तेवढ्यापुरती पस्तावायची, काही काळ दूर रहायची, मग पुन्हा हळूहळू सारं सुरू व्हायचं आणि हातात रहायचं नाही. तिचं नुकसान होत होतं ते या अडाणीपणापायी.

विक्रमचे स्वतःचे काही नियम होते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे प्रयोगाआधी आणि प्रयोग सुरू असताना दारू प्यायची नाही. साधी वाईन किंवा बिअर देखील नाही. कशाचाही अपवाद करायचा नाही. कारण बघता बघता अपवादांचा नियम होतो आणि नवे नियम चालतात तर जुन्यांनी काय घोडं मारलंय असं वाटायला लागतं. नवा कुठलाही ब्रँड बाजारात आला पद्मजा गमतीनं 'अपवाद' म्हणायची, जुने ते अर्थातच 'नियम'.

शौनकनं एक गोष्ट सांगितली - "एकदा 'अपवादात्मक स्थितीत ठकी गप्प बसली होती आणि ठेंगू बडबड करत होता. ठकी त्याला म्हणाली, "दारू प्यायलीस की तू फारच बहकतोस आणि काहीही बडबडायला लागतोस. जे कुणाला कधी सांगू नये, ते ही सांगून टाकतोस." ठेंगू हसला. म्हणाला, 'ते कुणाला कधी सांगू नये असं असतं, हे तू कशावरून ठरवलंस?' ठकी वैतागून म्हणाली, 'त्यामुळे लोकांना तुझ्याविषयी सत्य काय ते समजतं आणि आपली सत्यं अशी इतरांना माहीत असणं त्रासदायक ठरतं.' ठेंगू पुन्हा हसला. म्हणाला, 'नाही. आपली सत्यं इतरांना माहीत असणं हे त्यांच्यासाठी त्रासदायक असतं, आपल्यासाठी नाही. कारण त्यामुळे माणसं आपल्याला त्यांचा खरा रंग दाखवतात. एरवी ज्यांना आपण आपली काळजी घेणारे समजत असतो, ते किती स्वार्थी आणि प्रत्यक्षात आपला गैरफायदा घेणारे आहेत, हे अन्यथा आपल्याला समजलंच नसतं."

'हे हृदय..'च्या प्रयोगानंतर ते खूप वेळा पद्मजाच्या घरी जमत. येतायेता श्रावणीला - विक्रमच्या बायकोला घेऊन येत. आधी ठरलं असेल तर श्रावणी आधीच पद्मजाच्या घरी जाऊन थांबायची आणि बाईला स्वयंपाकाच्या सूचना देत सारं करून घ्यायची, कधी मनात आलं तर स्वतः एखादा पदार्थ बनवायची. नाटकात सुरेश आणि देवेंद्रही होते. कधी ते दोघेही विक्रमसोबत येत. मस्त मैफिल जमे. देवेंद्र उत्तम गायचा. त्याचा आवाज खणखणीत होता. तो गायला की अनाहिता टकमक त्याच्याकडे पहात बसायची.

कशात काय, किती मिसळायचं आणि कॉकटेल्स कशी तयार करायची, यातला विक्रम तज्ज्ञ होता. त्याची बायको श्रावणी दारू प्यायची नाही, तर तो तिच्यासाठी फळांचे रस वापरून, सुंदर पेय बनवून - ग्लास अगदी सजवून - पेश करी. ते इतकं सुंदर दिसत असे, की दारू बाजूला ठेवून रस पिण्याचा मोह व्हावा. विक्रमचं सारं कामच असं आखीवरेखीव, नेटकं असे. 'मर्यादा आखावी आणि मर्यादेत स्वातंत्र्य घ्यावं,' असं त्याचं लाडकं मत होतं. भूमिकेची तो पूर्ण तयारी करायचा, तिचा बारीकसारीक तपशीलांचा आतून-बाहेरून विचार करायचा आणि मग त्या चौकटीत मात्र तो रंगमंचावर अक्षरश: बागडायचा. हाच नियम बाकीच्या जगण्यालाही लागू होता.

कधी प्रयोगात कुणाकडून एखादी विलक्षण गोष्ट होऊन जाते. तसं एके दिवशी पद्मजाचं झालं. प्रयोग आता चांगला मुरला होता आणि आकस्मिक तिला एक नवी जागा सापडली. पत्नी पतीला आईचं हृदय घेऊन यायला सांगते, तो खाली बसून तिची विनवणी करू लागतो. ती कृतक नाराजी दाखवत त्याला पायानं दूर लोटते - असा प्रसंग होता. यात ती त्याच्या छातीवर उजवा पाय टेकवायची, तो ढकलल्यागत मागे हटायचा, एका हाताने तोल सावरत दुसऱ्या हाताच्या मुद्रा दर्शवत शब्दांशिवाय बोलायचा आणि तीही तशीच शब्दांशिवाय उत्तरं द्यायची. या सगळ्यात तिचा निष्ठुर धाक आणि त्याचं अगतिक भय दिसणं ताराबाईंना अभिप्रेत होतं. तसा ते तो प्रसंग उत्तम रंगवत.

आज पद्मजानं पाय नुसता छातीवर न टेकवता अंगठा त्याच्या स्तनाग्राला टेकवून छातीच्या मध्यावर हलकेच सरकवत नेला आणि नजरेत निष्ठुरपणाऐवजी मादकता आणली. पतीच्या मनात पत्नी दुरावण्याचं वा नातं तुटण्याचं भय असतं तर निष्ठुरता ठीक होती. पण तो तिच्या अंगगंधानं वेडापिसा झालेला आहे, तिच्या शरीराचं तीव्र आकर्षण त्याच्या शरीरात उफाळून आलेलं आहे आणि तिच्या सोबतीनं मिळणाऱ्या लैंगिक सुखापासून वंचित होण्याचं, लालसेची किनार असलेलं भय त्याच्या मनात आहे. इथं तिचं रुसणं नाही, रडणं नाही, त्याला धाक घालणारं धमकावणं नाही. त्याला घाबरवून नव्हे, तर वश करून त्याला विवश बनवेल आणि आपला कुटील हेतू साध्य करेल - असं काहीसं पद्मजाच्या मनात सुरू होतं. तिनं ते अवचित कृतीत आणलं. विक्रम क्षणभर चक्रावला, पण सावरला. भयात त्यानंही लालसा मिसळली आणि त्याच लालसेनं तिच्याकडे पाहत, तिच्या चकव्यात अडकलेल्या अश्राप जीवासारखा तो आईचं हृदय आणायला निघाला. हे इंप्रोवायझेशन इतकं सूक्ष्म होतं, की ते केवळ कॅमेराच्या क्लोजपमध्ये ध्यानात आलं असतं. इथं कुणाला कळण्याचं कारण नव्हतं.


विक्रम तिला लिफ्ट देणार होता. आजच्या प्रयोगाला नेमका शौनक नव्हता. पद्मजा इतकी आनंदात होती की तो साजरा करावा वाटणं स्वाभाविकच होतंच. घर येईतो दोघं अगदी भरभरून बोलत होते. विक्रमला हे नैसर्गिक अभिनय, उर्मी इत्यादि चोचले एरवी खपायचे नाहीत. त्याला सारं प्रमाणात, मापात हवं असायचं. पण आज पद्मजाकडून जे आकस्मिक घडलं ते वरवर आकस्मिक दिसत असलं तरी त्यामागे तिचं बऱ्याच दिवसांचं चिंतन होतं, त्या चिंतनातून ती एका निष्कर्षापाशी आली होती, असं त्याला वाटलं.
कारमध्ये त्यांचा तोच विषय होता.

पद्मजा म्हणाली, "या कथेत 'समाज' कुठेच आलेला नाहीये. समाज, म्हणजे समाजातली माणसं आणि त्यांचे कायदेकानून, नीतीनियम कुठेच आले नाहीत. एक बाई, तिचा मुलगा, त्याचे दोन मित्र, मग त्याची बायको… इतकेच घटक. बाकी विजन. म्हणजे सल्ले देताहेत ते लोक कोण? तर माती, वाट आणि पाखरं. म्हणजे प्रभाव निसर्गाचा आहे. एका स्त्रीमधल्या मादीने एका पुरुषामधल्या नराला जागं करणं ही नैसर्गिक गोष्ट आहे."

विक्रमला हे रोचक वाटलं. तो म्हणाला, "आई आणि बायको यांच्यातल्या संघर्षाची तुलना दोन गुरूंशी झाली, तेव्हा मी असाच दचकलो होतो. तू हे शोधलंस आणि तुला हे सापडलं, हेच मला फार फार मजेशीर वाटतंय. म्हणजे बहुतेक सारेच टिपिकल सुमार विनोदबुद्धी असणारे नवरे अशा पद्धतीचे विनोद करत असतात… की ते कसे बायकोच्या ताटाखालचं मांजर आहेत, तिचे गुलाम आहेत, तिचं सारं ऐकतात वगैरे. पण बायको निर्णय घेताना क्वचित दिसते. सत्ता नवऱ्यांच्याच हाती असते. तर हे सांगता, दाखवता, कबूल करता न येणारं भय नेमकं कशाचं असतं? हे तू अगदी अचूक शोधलंस…"
"बायकोवर बळजोरीही करता येते विक्रम. अनेकजण करतात. पण त्याने शरीराची भूक तेव्हढी भागते पुरुषाच्या, मनाची तहान नाही भागत."

"म्हणजे काय?"
"म्हणजे इतकंच की त्यात गरज भागते, पण सुख नाही मिळत. कोणत्याही पुरुषाला सुख तेव्हाच मिळतं, जेव्हा त्याला आपल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर तृप्ती दिसते, तिच्या त्वचेवर समाधानाचं वस्त्र दिसतं. संभोगानंतरच्या मिठीतून ते एकमेकांच्या कुशीत शांत झोपून जातात." विक्रम तिच्या बोलण्यावर एकदम शांत झाला. त्याच्या डोक्यात विचारांची चक्रं फिरत होती. पद्मजाची बॅग घेऊन तो तिच्यासोबत लिफ्टमधून वर आला. बाईनं दार उघडलं आणि बॅग घेऊन ती आत गेली. ती पेंगुळली होती.


"अना झोपलीये? त्रास नाही ना दिला तिनं?" पद्मजानं विचारलं.
तिनं नुसती मान हलवली.
"तू झोप जाऊन तिच्याजवळ. आम्ही घेतो जेवण वाढून." पद्मजानं सांगितलं.
पद्मजा आंघोळ करून, नाईटगाऊन घालून आली, तोवर विक्रमनं ग्लास काढून ठेवले होते, प्लेटमधे चखणा काढला होता. चीजचे काप करून ठेवले होते. "टेरेसवर बसूया. तू हे सगळं घे बाहेर. तोवर मी वॉशरूमला भेट देऊन येतो." त्यानं सभ्यपणे सांगितलं. तिनं हसून मान डोलावत म्हटलं, "भेटताच आहात तर ख्यालीखुशाली विचारून या सगळ्यांची."

टेरेसवर तिची लहानशी बाग फुलली होती. मोठी बंगई होती. दोन बाजा आमोरासमोर होत्या. काही मोढे आणि टीपॉय. पद्मजाच्या घरच्या छोट्या पार्ट्यांची ठरलेली जागा. हवेत गारवा होता. आकाशात फारसं चांदणं नव्हतं, पण काळोखालाही स्वतःचा प्रकाश असतो, तो होताच. मग तिनं दिवे लावण्याचं टाळलं. प्लेट्स आणून ठेवून ती ग्लासकडे वळली तर चक्क वाईन ग्लास. ती थक्क झाली. व्हिस्की नाहीच. चक्क वाईन? ठीकाय ना विक्रम? ती ग्लासकडे पाहत असताना विक्रम आलाच. म्हणाला, "मी घेतो ग्लास. तू बाटली घेऊन ये." पद्मजानं मुकाट्यानं रेड वाईनची बाटली उचलली आणि त्याच्या मागे मागे टेरेसवर आली.

सुरेख, कमनीय, उंच, निमुळते स्तनाकार ग्लास. वाईन विशेष आवडत नसली तरी हे ग्लास तिला फार आवडत. ग्लास भिडवल्यानंतरचा किणकिणाटही आवडे. आताही तिचे डोळे चकाकले. विक्रम तिच्या डोळ्यांचा हिरवा रंग प्रथमच पाहत असल्यासारखा खिळून राहिला. ती आपल्याच धुनकीत होती. संगीत नव्हतं, पण रात्रीचे स्वतःचे सूक्ष्म आवाज होते. पद्मजा नुकतीच आंघोळ करून आल्यानं तिच्या अंगाला साबणाचा सुगंध होता. त्यात विक्रमच्या घामाचा वास हलकेच मिसळून जाऊ लागला.

विक्रमनं उठून टेरेसचं काचांची तावदानं असलेलं चार पदरी दार बंद केलं आणि पडदे सरकवून घेतले. पद्मजा बंगईवर बसली होती. समोरच्या मोढ्यावर तिनं पाय लांब करून ठेवले होते. तिच्या डोळ्यांसमोर अजून रंगमंचच होता. तिथंच होती ती. प्रेक्षक, आसपासच्या विंगा, पडदे काहीही दिसत नव्हतं. तिचा पाय विक्रमच्या छातीवर होता. त्याच्या छातीवरच्या कुरळ्या केसांचा बोटांना तरल स्पर्श जाणवत होता. त्याच्या स्तनाग्राला अंगठ्याचा स्पर्श होताक्षणी आतल्याआत ठिणगी पेटून ते तरारून आल्याचं तिला जाणवलं होतं. दोघांवर स्पॉटलाईट होता. त्या उजेडात त्यांची त्वचा केशरानं न्हाल्यासारखी दिसत होती. दोघांचा मिळून एक आकार तयार झाला होता, तो तिला आतून जाणवत होता. आता पद्मजाला वाटलं की बाहेरूनही हे दृश्य पाहता आलं पाहिजे होतं. सिनेमातल्या स्वप्नदृश्यात जसं आपण स्वतःला दिसतो, तसंच. विक्रम तिच्या तंद्रीकडे चकित होऊन पाहत उभा होता. त्याची आई म्हणायची, "कुठल्याही कामात, कशातही मग्न असलेली माणसं फार सुंदर दिसतात बघ विक्रमा."

आई साधी साधी कामंही मन लावून करायची. चित्रकारानं ज्या असोशीनं कॅनव्हासवर ब्रश फिरवावा तशी ती केरसुणी फिरवत घर स्वच्छ करायची. केरसुणीला लक्ष्मी म्हणायची. भाजी चिरताना तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्या किणकिणत हलायच्या, सोन्याच्या पाटल्यांवर आदळायच्या, तिच्या पूर्ण शरीरात एक निराळीच लय होती. तिच्या अंगाला स्वयंपाकघरातले हळदीमसाल्याचे वास असत. ती हसली की घर उजळून निघे. आज इतक्या दिवसांनी आई अशी इतक्या तीव्रतेने का आठवावी, हे त्याला कळेना.

पद्मजानं ग्लास उचलून वाईनचा अजून एक सिप घेतला. तिच्या हालचालीनं बंगई किंचित हेलकावली. ग्लास किंचित डुचमळला. वाईनचे थेंब तिच्या ओठांवर ओठंगून थांबले होते. तिचा खालचा ओठ जरा जाडसर होता. भारावल्यासारखा विक्रम पुढे सरकला. डाव्या हातानं बंगईची साखळी पकडून त्यानं उजव्या हाताचा पंजा तिच्या खांद्यावर रुतवला आणि वाकून तिच्या ओठांवरचे थेंब जिभेने शोषून घेतले. बर्फाचा एक इवला स्फटिक घशातून, स्तनांतून, पोटातून आणि मांड्यामधून वेगाने घरंगळत तिच्या उजव्या पायाच्या त्या अंगठ्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि नखाखाली विरघळला. तिचा तो जाडा ओठ आता त्याच्या ओठात होता. विक्रमचे ओठ अगदी पातळ होते, नीट दिसायचेच नाहीत. मेकअप करताना रेषा वाढवून रंगवावे लागत. मिशा ठेवल्याच नव्हत्या. अगदी जवळून त्याचा चेहेरा तिला दिसत होता आणि नव्हताही. तिनं पापण्या मिटवल्या. हलकेच जीभ तिच्या पापण्यांवरून फिरली… काजळ लावावं तसं एकेक पापणी जिभेनंच उघडत डोळ्यांच्या कडेतूनही… मग कानाच्या पाळीमागून, कानाच्या प्रत्येक पाकळीची ओळख करून घेत... मग हनुवटीवर थबकली. काहीतरी मनात येऊन तो विलगला. थोडा दूर होऊन तिला न्याहाळू लागला. पद्मजाच्या हातात अजूनही ग्लास तसाच होता, तो उचलून तिनं एक सिप घेतला. तीच वाईन आता वेगळ्या चवीची वाटत होती.

पद्मजाचा गाऊन टू पीस होता. विक्रमनं तिचा ग्लास सावरत वरचा अर्धा पीस उतरवला. तिचे नितळ सुंदर खांदे आता उघडे होते, त्यावर गाऊनची आमसुली रंगाची स्ट्रीप झुळझुळत होती. तिच्याखाली ब्रेसियरची काळी पट्टी रुतली होती. तिचा वाईनचा ग्लास टीपॉयवर ठेवत त्यानं तिला बंगईवरून उठवत उभी केली आणि गाऊनमधून डावा हात सरकवून ब्रेसियरचं हूक हलकेच मोकळं केलं. गाऊन आणि ब्रेसियर सोबतीनंच ओघळवले. तिचं शरीर ना कोवळं होतं, ना अनाघ्रात. या शरीरानं एक गरोदरपण, एक बाळंतपण अनुभवलेलं होतं. त्याला मांसल गोलाई होती, पण बेढबपणा अजिबातच नव्हता. तिची त्वचा मऊ, नितळ दिसत होती. त्यानं ग्लास उचलून तिला वाईन चाखवली आणि हनुवटीवर जराशी ओतली, ती ओघळण्याआधी सराईतपणे ओठांनी टिपली. पद्मजानं मान उंचावली. तिची मान मुळातच उंच, सुराहीदार म्हणतात तशी होती. त्या मानेवर, मग स्तनांवर वाईन हलकेच ओतत जिभेनं तो शोषून घेऊ लागला. ती खुळावली.

त्यानं हलकेच तिला उचलून बाजेवर निजवली. सगळं आकाश ओठंगून आल्यासारखं वाटत होतं. अंगांग जडावून, तटतटून आलं होतं. सगळा बर्फ कडकडून तुटावा आणि विरघळून जावा अशी मागणी करत होतं. विक्रम अजिबात अधीर नव्हता. त्यानं शांतपणे रिकामा झालेला ग्लास भरला आणि तिच्या बाजेशेजारी गुडघे टेकवून बसला. तिची नाभी वाईनच्या ग्लासासारखीच खोल दिसत होती. ती त्यानं वाईनने भरून टाकली आणि सावकाश पीत राहिला. अधूनमधून त्याची जीभ तिच्या पोटावर फिरत होती. सारं निःशब्द होतं.

संपलेला ग्लास बाजूला ठेवून तो तिच्या पायांजवळ आला. पाय उचलून त्यानं बोटं चोखली आणि पाय खांद्यावर ठेवला. पुन्हा पाय दुमडून ठेवत त्यानं आपला कुडता काढून ठेवला आणि पद्मजानं आपला दुसरा पाय उचलून त्याच्या छातीवर रोवला. खेळ सुरू झाला होता. ही बाज एक चौकट होती, त्याच चौकटीत तो खेळायचा होता. दोघेही अनुभवी होते, तरी एकमेकांना नवे होते. रोज भेटत होते, ओळखत होते, तरी एक अनोळखी डोंगररांगांचा-जंगलांचा प्रदेश त्यांच्या दरम्यान होता, ज्यावरून ते आता वाटचाल करत होते. त्यांचे दर्प आता अलग राहिले नाहीत; एकच शरीर असावं तसे ते एकमेकांत मिसळून गेले. एकमेकांना विळखे, वळसे घालत ते आनंदाच्या जागा शोधत राहिले. इतके ओळखीचे झाले की आजवर जणू असे हजार वेळा भेटले असावेत.

मग हळूहळू गारठा वाढता गेला. पद्मजाला एरवीही फार थंडी वाजायची. वाईनची ऊब आता ओसरली होती आणि शरीरावरचा सुखाचा तवंग सारत शहाऱ्यांची राई उगवू लागली होती. उठून बसत विक्रमने तिचे कपडे आणून दिले, आपले चढवले. पायांत सपाता सरकवून ती बेडरूमकडे वळली. जाताना वळून पाहिलं तर तो शिस्तीत सारं ग्लासबिस आवरून आत किचनमध्ये नेऊन ठेवत होता. तिला हसू आलं.
सकाळी चहा घेऊन तो निघाला, तेव्हा अना जागी झाली होती. पद्मजा तिचे केस विंचरून वेण्या घालून देत होती.


त्या रात्रीनंतरही एकदा असाच तो तिला घरी पोचवायला आला, पण घरात आला नाही. त्यानं लिफ्टमध्येच तिचं एक पुसट चुंबन घेतलं आणि म्हणाला, “मला जमणार नाही पद्मजा.”
तिनं त्याच्याकडे रोखून पाहिलं. विचारलं, “तुला अपराधी वाटतंय? चुकीचं? अनैतिक?”
“नाही.” तो शांतपणे म्हणाला, “आपल्यात जे घडलं ते खूप सहज आणि सुंदर होतं. म्हणजे... मी अगदी मेलो तरी विसरणार नाही असं. एक विलक्षण, उत्कट अनुभव होता तो. अगदी दुर्मीळ. त्याला मी असा अपराधी भावनेचा चिमटा लावणार नाही. तो क्षण तसेच जपूयात. पण आता पुन्हा जवळ आलो, तर ते मुद्दामहून, जाणीवपूर्वक असेल. मला श्रावणीचा चेहरा आठवत राहील. आत्ताही आठवला तुझं चुंबन घेताना. मग ते चुंबन निरर्थक होऊन गेलं.”

पद्मजाला असं वाटलं की, विक्रम त्या रात्री भूमिकेतच होता. तंत्रशुद्ध अभिनय. प्रियकर आहे असं वाटणं हा आपला भास. तो तर समरस झाल्याचा उत्कृष्ट अभिनय करत होता. आपणां दोघांनाही एका नाटकाचा तात्पुरता मोह झाला होता, इतकंच. लिफ्ट एकोणिसाव्या मजल्यावर येऊन थांबली होती. पद्मजाने डोअरबेल वाजवून, बाईनं दार उघडेपर्यंत विक्रम थांबला. तिनं हसून 'गुडनाइट' म्हटल्यावर पुन्हा लिफ्टमध्ये शिरला. लिफ्ट झुपकन खाली आली पोटात खड्डा पडावा तशी.


❊

आजचा 'हे हृदय…' चा प्रयोग अंदाजे सत्ताविसावा असावा. गच्च भरलेलं थिएटर. भारावलेली माणसं. प्रेक्षकांच्या देहातही ती नृत्याची लहर पाझरून जाई. कातडीच्या आत माणसं नाचू लागलेली असत. पद्मजा आज लवकर निघाली, तेव्हा लोक अद्याप पांगलेले नव्हते. ती दिसताच त्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पार्किंग लॉटमधून कार बाहेर काढून ती सुळकन् गेटच्या बाहेर पडेपर्यंत थिएटरबाहेर एक नाटक सुरू असल्याप्रमाणे लोक शांत, स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होते. तिला जाणवत होतं. मरीन ड्राइव्ह मागे पडला आणि तिची कार एका म्युझियममध्ये शिरली. कुणीतरी ती ताब्यात घेतली. आणि पद्मजा सहज पावलं टाकत आत शिरली. तिच्या पावलांचे गुलालासारखे ठसे शुभ्र संगमरवरावर उमटत होते. मागून येणार कुणीतरी त्या ठशाचा पातळ पापुद्रा अलगद उचलून घेत हातातल्या टोपलीत ठेवत होतं. ती आपल्याच नादात आत आत गेली. तिच्यात एक अनोळखी घुंगुर वाजत होतं. आत कितीतरी बाहुल्या होत्या. अनेक दालनांमधून त्या मांडलेल्या होत्या. त्याच्या त्वचेचे रंग निरनिराळे होते. लाकडाच्या, फायबरच्या, प्लास्टिकच्या, काचेच्या, कापडाच्या, कागदाच्या, मातीच्या, दगडाच्या, मेणाच्या, हाडामांसाच्या अगणित बाहुल्या. त्यांची वस्त्रं अनेक देशांमधली आणि विविध काळातली होती. त्यांची प्रमाणं निरनिराळी होती. पद्मजा आपल्या निश्चित जागी जाऊन थांबली. तिथं पोहोचताच शॉट फ्रीज झाला. एका मोठ्या प्रवेशद्वारातून तिकीट फाडून घेत लोक आत शिरत होते. अर्धं तिकीट खिशात सुरक्षित ठेवून मनसोक्त फिरत होते. कुणी दमून जात, कुणी तिथंच झोपत, कुणी घाईघाईनं चालते होत, कुणी सराईत थबकत, कुणी चकवा लागल्यागत पुनः पुन्हा एकाच दालनात एकाच बाहुलीसमोर येऊन थांबत. त्यांचं काय होतंय याच्याशी बाहुल्यांचं देणंघेणं नव्हतं. त्या आपलं काम चोख बजावत असत. वेळ संपत आली तसं लोक अदृश्य होऊ लागले. सगळं कोरं झालं. पद्मजा कारमध्ये बसली तेव्हा घुंगुर ओघळून गेलेलं होतं. ती घरी परतली तेव्हा अंग कचकचत होतं. ओठाखालच्या तिळावर चिकटलेला एक डोळा तिनं उपसून काढला आणि कचऱ्यात टाकला. तिच्या शरीरभर, अगदी नखापासून केसांपर्यंत डोळे चिकटलेले होते. लहान मोठे टपोरे मिचमिचे. काळी निळी हिरवी तपकिरी बुबुळं एकटक पहात होती. पापण्या बंद होत नव्हत्या. एकेक डोळा उपसून फेकण्यात खूप वेळ वाया जाणार होता. पण तसं केलं नाही तर गवताच्या तुसांसारखे ते टोचत राहिले असते, त्वचेला खाज सुटली असती, पुरळ आले असते, पिकून ठुसठुसत राहिले असते. त्यानंतर डोळे काढून फेकणं फारच मुश्किल बनलं असतं. वेळीच स्वच्छता करणं महत्त्वाचं. तिनं निःश्वास सोडून काम सुरू केलं. अनेक डोळ्यांना निरनिराळे अवयव फुटलेले होते. कुणा डोळ्याला हात, कुणाला नुसतीच बोटं होती. काही डोळ्यांच्या जिभा लपलपत होत्या, काहींचे ओठ थरथरत होते, कुणाचे दात चमकत होते. अनेक डोळ्यांना लिंगं फुटली होती. अनेक डोळे हपापलेले होते. ते इतके घट्ट चिकटले होते की उपसून काढताना त्वचेला छिद्रं पडतील असं भय वाटत होतं. अचानक एका डोळ्यात पद्मजाला अश्रू दिसला. एक सुस्कारा टाकून तिनं तोही डोळा उपसला. काही डोळ्यांमध्ये मत्सर होता. दोन चार डोळ्यांत तर तिला घृणाही दिसली. काही कोवळ्या नव्या डोळ्यांमध्ये कुतूहलदेखील होतं. इतके डोळे उपसून काढून ती थकून गेली. कचऱ्याच्या टोपल्या तिनं दाराबाहेर नेऊन ठेवल्या. मग स्वच्छ आंघोळ करून ती शांत झोपून गेली.

'हे हृदय...' चे प्रयोग वर्षभर चालले. मग थांबले. सारे नेहमीसारखे एकमेकांना भेटत, बोलत राहिले. पद्मजाच्या घरी अजून काही पार्ट्या झाल्या. श्रावणीही येतजात राहिली आणि शौनक तर होताच.

❊


शौनक एकदा पद्मजाला म्हणाला, “तू तुझी विशलिस्ट तयार कर.” पद्मजाला मज्जाच वाटली. मग यादी तयार केली तर अधिकच मज्जा आली. तिचं घर तर झालं होतं, पण अजून गाडी घ्यायची होती. तर तिथून सुरुवात केली:

१. स्वतःची कार.

२. एक असा प्रशस्त आवार असलेला बंगला, ज्यात मोठं लॉन असेल आणि स्वतंत्र स्वीमिंग पूल असेल. म्हणजे ती केव्हाही पाण्यात उतरून निवांत पोहू शकेल, अगदी मध्यरात्रीदेखील.

३. हिऱ्यांच्या कुड्या.

४. मिंकच्या कातडीचा कोट.


अजून काय हवंय? आठवेना. मग तिनं म्हटलं, “एक चांगला जावई हवाय. अनासाठी एक चांगला नवरा.”
तर शौनक खो खो हसला म्हणाला, “अगं, आत्ताशिक ती चार वर्षांची आहे. नशीब की नातवंडं हवीत म्हणाली नाहीस.” पद्मजालाही हसू आलं.

मग तो म्हणाला, “या वरवरच्या गोष्टी झाल्या. आता तुझी खरी, अगदी अंतःकरणातली इच्छा शोध. आठव की तुला आधीपासून काय हवं होतं, आता काय हवं आहे आणि पुढेही काय हवं असेल.”
पद्मजाचं हसू ओसरलं. ती थोडावेळ गप्प बसली. मग म्हणाली, “मला माझे आईबाप हवेत, माझ्या कल्पनेतले. वास्तवात हवेत. ही एक इच्छा. आणि दुसरी इच्छा म्हणजे - मला एक भूमिका हवीय. माझी भूमिका. जी केवळ माझ्यासाठीच लिहिली गेली असेल आणि जी केवळ मीच करू शकेन.”

आणि मग ते दोघेही एकमेकांची नजर चुकवत गप्प बसून राहिले.


---
(राजहंस प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित होत असलेल्या 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' या आगामी कादंबरीतून साभार.)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्कंठा वाढली कादंबरीबद्दल. सुंदर आहे लिखाण. जे आहे ते आवडलं इतकंच तूर्तास... शाही सरबताची चव नंतर झिरपत जावी तसं काहीसं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

बाबौ! वाचावंच लागेल हे जे काही आहे ते. आभार केवळ तूर्तास आधीच या अनुभवाची चव दाखवल्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त आहे. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्टी आवडल्या. कादंबरी एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर पुढेमागे वाचेनच केव्हातरी, पण तोपर्यंत ती त्रोटकपणे का होईना पण माझ्याच डोक्यात पूर्ण करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

रोचक आहे.. कादंबरी प्रकाशित झाल्यावर वाचावीशी वाटू लागली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नवीन वाचून छान वाटले. पुस्तकाबद्दल उत्कंठा वाढली आहे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशाखा

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars