छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २८ : दृश्य आणि दृश्येतर कला यांची सांगड

बरेचदा एखादे दृश्य पाहताना आपल्याला एखादी कवितेची ओळ, एखादा संगीताचा तुकडा, एखादे उद्धृत आठवून जाते. मग त्या दोन गोष्टींची सांगड आपल्या कायम लक्षात राहते आणि त्या दृश्याचा अनुभव अधिक चमकदार, तजेलदार, जिवंत होतो.

तर यावेळच्या पाक्षिक आव्हानात, तुम्हांला आवडलेला एखादा पद्य / गद्य / गाणे / संगीत या दृश्येतर कलानिर्मितीचा तुकडा* आणि त्याला अनुसरून असणारे तुम्ही टिपलेले चित्र, जे त्या ओळीचे वा तुकड्याचे तुमच्या अर्थान्वयानुसार** दृश्यात रूपांतर करते, अशी जोडी देणे अपेक्षित आहे. शक्यतो गद्य/पद्य/ संगीताच्या निर्मात्या व्यक्तीचा आणि संबंधित वाङ्मयसंदर्भाचा ऋणनिर्देश करावा किंवा एखादा दुवा असेल, तर तो द्यावा. निर्माता/संदर्भ माहीत नसल्यास तसे नमूद करावे.
.
* तुकड्याची भाषा ही मराठी/हिंदी/इंग्रजीपुरती मर्यादित ठेवावी, ही अपेक्षा.
** अर्थान्वयाचे स्वातंत्र्य दिले असले तरी 'एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन जी मी स्वप्राणाने' ही केशवसुतांची ओळ आणि नुसते तुतारीचे चित्र अशी जोडी देण्याचे बाळबोधपण टाळावे, ही विनंती Smile.
-------------

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १५ नोव्हेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १६ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------
मागचा धागा: विषय 'विनोद' आणि विजेते छायाचित्र.
----------

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुदतीत एकही प्रतिसाद न आल्याने धाग्यातील पाक्षिक आव्हानाबाबत तीन शक्यता सुचतात -

१. ह्या आव्हानाचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवावा.
किंवा
२. मागच्या आव्हानातील दुसरा क्रमांक मिळविलेल्या व्यक्तीने पुढील आव्हानासाठी विषय द्यावा.
किंवा
३. व्यवस्थापकांनी नवा विषय द्यावा.

निर्णय व्यवस्थापकांवर सोडत आहे..

अजून एक पर्याय म्हणजे तुम्हीच जरा तुलनेने कमी आव्हानात्मक आव्हान द्या. (अर्थात तुम्हाला आणि व्यवस्थापकांना मान्य असल्यास.)
आणि ह्या धाग्यावर एक सुरुवात म्हणून चित्र टाका. या धाग्यावर येतील ती चित्र पहाण्याची उत्सुकता नक्कीच आहे आणि सुचली तर स्वतः इथे चित्र टाकायचीसुद्धा इच्छा आहे.
धागा आला तेव्हा पहिला असला तरी दिवाळीच्या धामधुमीत पुरेसा विचार केला गेला नाही या विषयाचा.

या धाग्यावर एक सुरुवात म्हणून चित्र टाका.
...........उदाहरणेच द्यायची, तर ह्यापूर्वी मी अशी चित्रे वा प्रतिसाद पाक्षिक आव्हानातच दिले आहेत.
१. रवींद्रनाथ ठाकुरांच्या ओळी
२. ग्रेस यांच्या ओळी
३. ज्ञानेश्वर
४. बा. भ. बोरकर (गाण्याचा दुवा)

गद्याचे उदाहरण म्हणजे हे चित्र पाहून ऋषिकेश यांनी दिलेला माधव आचवल यांच्या पुस्तकातील उतारा.

--

बाकी अव्हानाच्या क्लिष्टतेबद्दल मी काय बोलू ?
ह्यापेक्षा सोपी वा कठीण आव्हाने देणारे भेटतीलच.

मला जे त्यावेळी सुचले, भावले ते दिले, इतकेच. Smile

विषय रोचक आहे आणि आवडला, बदलू नका. पण थोडा अवधी अजून द्या, काही प्रतिसाद नक्की येतील.

चित्र-संगीताचा आलेला एक अनुभव आज लोकसत्तेत मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिला आहे.

जिंदगी क्या है, कोई चाक-ए-कफन है 'फाकीर'
उम्र के हाथों से हम जिसको सिए जाते हैं

व्यवस्थापकांच्या प्रतिसादाअभावी, धागाकार म्हणून स्वातंत्र्य घेऊन आव्हानाची कालमर्यादा ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवित आहे.
इच्छुकांनी लाभ घ्यावा :).

"नुसते तुतारीचे चित्र अशी जोडी देण्याचे बाळबोधपण टाळावे"
अमुकराव,इच्छुकांना आपला बाळबोधपणा दिसेल याची भिती वाटतीय वाटतं... Wink

धन्यवाद अमुक.

हा विषय रोचक आहे. थोडा अधिक अवधी मिळाल्यास अनेक उत्तम प्रतिसाद येतील अशी आशा वाटते.

खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. (विरामचिन्हं मला हवी तिथे टाकली म्हणून तक्रार करू नये.)


कॅनन टी ३, १८-५५ मिमी, ISO 800, f/5.2, 1 sec.

बाकी काय ती पानंबिनं गळायला लागली आहेत. काही झाडांचे रंग बदलले आहेत. दिवस लहान झालेला आहे. गुलाबी का कायशीशी थंडीही आलेली आहे. पण आता याचे फोटो काढले तरी कविता कुठून आणायच्या?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. (विरामचिन्हं मला हवी तिथे टाकली म्हणून तक्रार करू नये.)

पहिल्या वाक्याच्या निकटसान्निध्यात आणि संदर्भात कंसातले दुसरे वाक्य हे धमकी म्हणून घ्यावे काय?

फ़ारेनला असा डबल पात्याचा, बिन धारेचा आडकित्ता असतोय व्हय?

याने सुपारी कशी फोडणार?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पहिल्या वाक्याच्या निकटसान्निध्यात आणि संदर्भात कंसातले दुसरे वाक्य हे धमकी म्हणून घ्यावे काय?

तोच डाव होता... एवढ्यात का उघड केलात?

याने सुपारी कशी फोडणार?

नवरी नटल्यावर आपोआप फुटत नाही का सुपारी?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याने सुपारी कशी फोडणार?
..........या विषयाबाबत श्री. 'आडकित्ता' यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्या तिथे सर्व नट्स् क्रॅक् करून मिळतात. Smile

तो धारवाला आडकित्ता आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शिशिरऋतूच्या पुनरागमे लागले एकेक पान गळावया
नकळे का मज येतसे रडावया

- बा. सी. मर्ढेकर

तो दुरून येतो हासत फाल्गुनवारा
अन गळती वेफर झाडावरुनि भरारा

- बा. सी. मर्ढेकर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

कविता:औंदुबर
कवी: बालकवी

चित्र कवितेला पुर्ण न्याय देत नाही हे खरंय पण नावेतुन हे दृष्य पाहिल्यावर असेच भाव मनात आले हे खरं, प्रत्यक्ष पाहिलेलं कॅमेरा नीटसं उतरवू शकला नाही ह्याची खंतही आहेच.

फोटो मस्त अन ओळीही मस्तच. फक्त समुद्र वाटतोय तो फटूत. अन त्यामुळे जरा मिसम्याच वाट्टेय दोहोंत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरयं, ते बॅकवॉटर आहे हे लक्षात आलं नाही.

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी...दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !

बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गं पिवळे केशरमळे
हि किमया केवळ घडते प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी
दिसशी तू ...नवतरुणी काश्मिरी !

गीत-ग.दि.माडगूळकर चित्रपट-मधुचंद्र काल-१९६७, स्वर-महेन्द्र कपूर ,संगीत- एन. दत्ता (दत्ता नाईक)


(येथे ऐकता येईल : )

स्लो शटर स्पिडवर गाडीतुन जाताना हलणार्‍या झाडांचे(फॉल) छायाचित्र आहे काय?

निकाल पुढीलप्रमाणे -

क्र. ४ : विसुनाना
मला वाटते, विसुनानांनी दिलेले हे आत्तापर्यंतचे तांत्रिक दृष्ट्या सर्वोत्तम चित्र. गाण्यातल्या स्थान-भान-स्थित्यंतराशी मात्र जरा विसंगत.

क्र. ३ : मी
चित्राबद्दल तुम्ही व्यक्त केलेली खंत मलाही वाटली.

क्र. २ : ३_१४ विक्षिप्त अदिती
जोरदार चित्र ! आवडले.
तांत्रिकदृष्ट्या चारही चित्रांत उठून दिसणारे. पाहणार्‍याचे लक्ष योग्य त्या जागी खेचले जाते. तरी, आक्रोडांच्या, उडालेल्या तुकड्यांच्या मांडणीतून ओळींतील बेमुरवतपणा अधिक प्रत्ययकारी करता आला असता असे वाटत राहिले. तिथे थोडे गुण कापले गेले.
.

क्र. १ : धनंजय
'पागानीनी'ची 'काप्रीच्यो' (इतालीय उच्चार) ही सुरावट ऐकताना, विशेषतः पहिला तुकडा ऐकताना, ज्या प्रति़क्षिप्त भावभावना उमटल्या, त्या चित्रात पकडण्यात धनंजय बरेच यशस्वी झाले आहेत. विशेषतः 'काप्रीच्यो' हे नांव सार्थ करणारी उत्स्फूर्तता, लहरीपणा, अचानक केलेली उधळण, अस्ताव्यस्तपणा इ. चित्रात दिसते. 'एखादी काढलेली खोडी' अश्या दुसर्‍या अर्थानेदेखील हे चित्र चपखल आहे. चित्र टिपणारा एकाग्रतेने क्षण टिपण्यासाठी सज्ज आहे आणि ऐन टिपण्याच्या क्षणी कुणी मजेखातर खोडसाळ धक्का देऊन चित्र उधळून लावावे, असे वाटते. Smile

तांत्रिक दृष्ट्याही उल्लेखनीय चित्र.
सामान्यतः कॅमेर्‍याचे छिद्र उघडे ठेवण्याचा काळ हा कॅमेरा हलण्याच्या कालावधीपेक्षा मोठा असला की अश्या प्रकारचे चित्र हमखास मिळते. (किंबहुना आपण सर्वचजण त्या 'च्च् च्च्'पणातून गेलेलो असतो. Wink ) मात्र अश्या चित्रांत कॅमेरा कुठल्या दिशेला हलला आहे हे चित्रातील वस्तूंनी 'ओढलेल्या रेषांतून' कळते. धनंजय यांच्या चित्रातली तांत्रिक गंमत म्हणजे त्या रेषा अस्ताव्यस्त करून कॅमेरा कसा हलविला हे सहज कळू न देता, चित्र तरीही बघण्यालायक ठेवणे हे छान जमले आहे. अनेक चित्रे टिपून त्यातले साजेसे निवडले असावे असा कयास.

अभिनंदन !

आव्हानाला प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार आणि धनंजय यांनी पुढील पाक्षिक आव्हान द्यावे, की विनंती.