पद्मभूषण रामचंद्र गुहा

"इकॉलॉजी अँड इक्वुइटी" चे जुने गुहा आता राहिले नाहीत,"

~ रोचना, असे जरी असले तरी रामचंद्र गुहा यांच्यासारख्या सर्वार्थाने "स्कॉलर" ने शांत बसूनही या देशाला चालणार नाही. डॉ.मॉन्तेकसिंग अहलुवालिया, डॉ.बिमल जालन आणि त्यांच्या परंपरेतील रामचंद्र गुहा अशा विद्वानांना 'इंटेलेक्च्युअल काईंड' म्हटले जाते ते त्यांच्यातील स्कॉलरवृत्तीमुळेच; त्यामुळे असे इंटुक 'जुने' होऊदेखील नयेत असे मी मानतो. हे मान्य की भले श्री.गुहा, अरुंधती रॉय, मेधा पाटकर यांच्यात पर्यावरण विषयावरून मतभेद असतील पण त्यामुळे गुहा यांचे त्या विषयावरील अधिकार कमी होत नाहीत आणि आजही त्यानी त्या विषयावर लिहिले तर त्यांचे विचार गांभिर्याने घेणारा त्यांचा असा एक वाचकवर्ग आहेच. [मी त्यांच्या Makers of Modern India तसेच India After Gandhi या दोन पुस्तकांच्या अगदी प्रेमात आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वाचकाला इतिहास विषयाची गोडी लावणारी त्यांची भाषाशैली आहे.]

'नेहरू मेमोरिअल' आणि मृदुला मुखर्जी संदर्भातील केसमुळे त्याना काहीसा सेटबॅक बसला असला तरी त्यांच्या सातत्यपूर्ण लिखाणावर काही परिणाम होईल असे संभवत नाही.
(असो...'दिवाळी अंका' पासून काहीसा फटकून हा प्रतिसाद आहे. पण तुम्ही या निमित्ताने का होईना कधीतरी श्री.रामचंद्र गुहा यांच्याविषयी इथे लिहावे. तितका तुमचा अभ्यास आणि अधिकारही आहेच.)

(श्री.मुक्तसुनीत यांच्या 'दिवाळी अंक २०११' या धाग्यावर प्रतिसाद देत असताना योगायोगाने रोचना आणि मी यांच्यात 'श्री.रामचंद्र गुहा' या संशोधक लेखकाचा आणि त्याच्या सामाजिक कार्याचा उल्लेख झाला. मूळ धाग्यात ते प्रतिसाद अवांतर होत असल्याचे पाहून ऐसी अक्षरे अ‍ॅडमिनने योग्य तो निर्णय घेऊन त्या दोन प्रतिसादांना "स्वतंत्र धाग्या'चे रूप दिले आहे ते योग्य आहे. पण निव्वळ त्रोटक प्रतिसादावरून श्री.गुहा यांच्याविषयी नीट माहिती (कदाचित) इथल्या सदस्यांना होणार नाही, म्हणून त्यांच्याविषयी काही जादाची माहिती इथे देत आहे.)

"पद्मभूषण रामचंद्र गुहा" (जन्म १९५८) या व्यक्तीविषयी मला माहिती झाली ती त्यांच्या "इंडिया आफ्टर गांधी" या ग्रंथामुळे. त्यातील भाषा, विचार आणि विषयाची गोडी लावणारी मांडणी यामुळे वाचक प्रभावित होत जातो. नंतर अन्य पुस्तकांचीही ओळख होत गेली तसेच त्याचबरोबर पर्यावरण, चिपको प्रश्नावरून त्यांचे याच क्षेत्रात कार्यरत असणार्‍या अन्य कार्यकर्त्यांसमवेतचे मतभेदही वेळोवेळी समोर येत गेले. श्री.रामचंद्र गुहा आजच्या घडीला देशातील आघाडीच्या विचारवंतांमध्ये गणले जात असून भारताचा इतिहास, पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय या विविध विषयांवरील त्यांचे भाष्य आणि लेखन जगभर नावाजले जात आहे.

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त या लेखक आणि कार्यकर्ता असलेल्या व्यक्तीला ज्यावेळी दंतेवाडा कांडप्रसंगी सलवा जुडूमच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन 'नक्षलवादी' म्हणून अटक केली होती आणि जवळपास त्याना तिथेच मारून टाकण्याचा प्रसंग आणला होता, ज्यातून ते सुदैवाने सुटले आणि मग तेहलका.डॉट.कॉम तसेच हिंदुस्थान टाईम्सच्या माध्यमातून ते प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशातच नव्हे तर त्याना मानणार्‍या बाहेरच्या अनेक शिक्षणसंस्थांतूनही 'श्री.रामचंद्र गुहा' हे नाव सर्वतोमुखी झाले. दंतेवाडा प्रकरण तर देशभर गाजले होतेच. नक्षलवाद्यांनी घातलेल्या त्या हैदोसाचा बदला म्हणून सलवा जुडूम आणि पोलिस या दोघांनी मिळून कशातही सहभागी नसलेल्या आदिवासीना सरसकट 'नक्षलवादी' समजून त्यांच्यावर हल्ले सुरू केल्याच्या बातम्यामुळे दिल्लीहून जे पथक पाहणीसाठी दंतेवाडा तेथे गेले होते त्यामध्ये रामचंद्र गुहा आणि दिल्ली विद्यापीठाच्या प्रो.डॉ.नंदिनी सुन्दरदेखील सहभागी होते. पण या दोघांना सलवा जुडूमच्या कार्यकर्त्यांनी 'नक्षलवाद्यांचे समर्थक' या आरोपाखाली अटक करून भैरमगड पोलिसांच्या ताब्यात दिले. तिथे त्याना जो त्रास झाला आणि त्यातून त्यांची कशी (कशीबशी) सुटका झाली ती एक चित्तरकथाच आहे. पण त्या संदर्भात त्यानी राज्य शासनाविरुद्ध मनी कसलीही अढी ठेवली नाही आणि त्यानंतरही स्वतःला आपल्या संशोधनकार्यात मग्न करून घेतले. खूप मोठी ग्रंथसंपदा आहे त्यांची पण त्यांच्या लिखाणाचा बाज आणि संशोधनवृत्तीचा नमुनाच पाहायचा असेल तर तो "India After Gandhi" या ग्रंथात पाहावा.

थोडेसे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत : दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजचे ते पदवीधर असून अर्थशास्त्र हा त्यांचा प्रमुख विषय. कलकत्यातून आय.आय.एम. केल्यानंतर त्यानी मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे चिपको आंदोलनावर सखोल संशोधन केले. प्राध्यापक पेशा पत्करल्यानंतर अर्थशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयांतील त्यांची गती पाहून भारतातील तसेच युरोप आणि अमेरिकेतील विविध विद्यापीठानी त्यांना आदरपूर्वक फॅकल्टीपदी निमंत्रण दिले व त्यानुसार त्यानी विविध राष्ट्रांत अध्ययन केले आहे. त्या त्या देशातील संबंधित विद्यापीठांनी श्री.गुहा याना विविध पारितोषिकांनी गौरविले आहे. चालू घडीला रामचंद्र गुहा यानी आपला पूर्ण वेळ लिखाणासाठीस दिला असून टेलिग्राफ आणि हिंदुस्थान टाईम्स यांच्या विविध आवृत्यांतून त्यांचे इतिहास, राजकारण, पर्यावरण आणि अर्थशास्त्र यावरील लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. पत्नी आणि दोन मुले यांच्यासह त्यांचे बंगलोरमध्ये वास्तव्य आहे.

भारत आणि परदेशात त्याना मिळालेल्या अ‍ॅवॉर्डसची यादी करणे म्हणजे एक पानभरून मजकूर लिहावा लागेल इतकी त्यांच्या संशोधनाचे आणि अभ्यासाचे सर्वत्र कौतुक झाले आहे. अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसी मॅगेझिनन जगातील १०० इंटेलेक्च्युअल व्यक्तीमध्ये श्री.रामचंद्र गुहा यांचा समावेश केला आहे. वयाच्या पन्नाशीतच श्री.रामचंद्र गुहा याना भारत सरकारने 'पद्मभूषण' किताबाने यथोचित गौरविले आहे.

अशोक पाटील

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हो, त्यांची शैली इतिहासाची गोडी लावणारी आहे, पण सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये जी तळमळ आणि संशोधनाची धार होती, ती अलिकडच्या लेखनात कमी होत गेली आहे - चौफेर सतत लेखन-व्याख्यान चालू झाले की तसे होतेच. वर टीव्हीवरही सारखे येणे - एकूण त्यांचा पब्लिक इंटेलेक्च्युअल ची प्रतिमा बळावली असली तरी संशोधनात्मक लेखन आधीसारखे राहिले नाही असे वाटते - क्रिकेटच्या पुस्तक याचे एक उदाहरण (आणि मी इंडिया आफ्टर इंडिपेंडेन्स ची फॅन नाही) पण हो, हे उगीच अवांतर होतंय, त्यामुळे खरडवहीत, किंवा पुन्हा कधीतरी बोलूया....
बॅक टू दिवाळी अंक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुख्य विषयावरील अवांतरांतून नव्या विषयांची दालनं उघडतात. ती तिथल्या तिथे मिटू नयेत, तसंच मूळ चर्चेवर अवांतर वाढू नये म्हणून त्याचा स्वतंत्र धागा निर्माण केलेला आहे. कृपया या विषयावर खरडवहीत, किंवा नंतर कधीतरी लिहिण्याऐवजी इथे लिहावं ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थॅन्क्स अ‍ॅडमिन. हा प्रकार आवडला. खुद्द रोचना आणि मलाही 'श्री.रामचंद्र गुहा' या व्यक्तीसंबंधी 'दिवाळी अंक' इथे चर्चा करणे अप्रस्तुत वाटले होतेच. पण आता एवीतेवी नूतन धागाच तयार झाला असल्याने हा विषय इथून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे.

(विषय पूर्ण केला आहे.)

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0