गुरुत्वीय लहरी - अलिकडे काय संशोधन सुरू आहे?

मार्च महिन्यापासून खगोलशास्त्राच्या क्षेत्रात बरीच खळबळ सुरू आहे, आणि याचं कारण काही स्कॅम नाही. उलट आत्तापर्यंत जो प्रचलित सिद्धांत होता त्यात दोन मोठ्या आणि इतर बऱ्याच बारीक उणीवा आहेत. त्यातली एक उणीव काही प्रमाणात भरून काढणारं हे संशोधन आहे. या संशोधनाचं महत्त्व असं की कोणत्याही मानवनिर्मित उपकरणातून, अगदी 'सर्न'मध्येही, अतिप्रचंड ऊर्जा-तापमान तयार करता येत नाही, त्यामुळे त्या परिस्थितीत भौतिकशास्त्राचे नियम तपासता येत नाहीत, अशा अतिप्रचंड प्रक्रियेचं निरीक्षण केल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. सकृतदर्शनी हा दावा मान्य करण्यासारखा आहे. नक्की कोणता सिद्धांत, काय उणीवा आणि कसला दावा?

महास्फोट

खगोलशास्त्रातला सध्याचा सगळ्यात जास्त मान्यता पावलेला आणि ज्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजलेल्या नाहीत असा हा सिद्धांत म्हणजे महास्फोट. विश्व आहे तसं का आहे, त्याची रचना कशी हे समजावून सांगणारा सिद्धांत. त्यातल्या उणीवा काय आहेत हे समजून घेण्यासाठी त्याचा थोडा इतिहास आणि तपशील पाहू या. आता हा सिद्धांत बहुतेक शास्त्रज्ञांना मान्य असला, खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांनाही त्याबद्दल थोडी-बहुत माहिती असते तरीही जेव्हा हा सिद्धांत मांडला तेव्हा त्याची रेवडी उडवली गेली. या सिद्धांताला मिळालेलं नाव Big Bang (किंवा महास्फोट) हे थोर खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयलने ठेवलं असं म्हणतात.

या सिद्धांतानुसार, साधारण १४ अब्ज वर्षांपूर्वी विश्वातलं सगळं वस्तुमान आणि ऊर्जा एका बिंदूत एकवटलेले होते आणि त्यांचं प्रसरण सुरू झालं. या प्रसरणातून अवकाशाची पोकळी तयार होत गेली. त्या काळात विश्वाबद्दल स्थिरस्थिती सिद्धांत प्रचलित होता. स्थिरस्थिती सिद्धांतानुसार, विश्व अनंत काळापासून आहे तसंच आता आहे, आणि पुढेही तसंच राहील. कोणत्याही नव्या सिद्धांताला होतो तसा विरोध महास्फोटाच्या सिद्धांतालाही झाला, पुढे सगळ्यांनी हा सिद्धांत मान्यही केला पण हॉयल यांनी टिंगल करण्यासाठी ठेवलेलं नाव मात्र तसंच राहिलं.

या नावाला टिंगल का म्हणायचं? स्फोट होतो तेव्हा एखादी गोष्ट फुटते आणि त्यातले कण बाहेर पसरतात. महास्फोटाच्या सिद्धांतात बहुतांशी हेच झालं, पण जो फरक आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो असा की महास्फोटातून अवकाश तयार झालं. दिवाळीचे फटाके फुटतात, किंवा फुगा फुगवताना फुटतो, तेव्हा मुळात अस्तित्वात असणाऱ्या अवकाशात, जागेत या गोष्टी पसरतात. विश्वाचं प्रसरण होतंय तशी ही जागा तयार होते आहे. समजा, आपली पृथ्वी ही एक फुगा असेल, आणि आतून कोणीतरी हा फुगा फुगवतंय. तर नवीन जमीन सतत तयार होत राहिल. महास्फोटात अवकाशाची पोकळी अशीच तयार झाली. फुगा फुगवायला कोणी माणूस किंवा यंत्र लागेल. विश्व फुगण्यासाठी, पसरण्यासाठी सुरुवातीला वस्तुमानाला मिळालेली गती आतल्या प्रारणाच्या उर्जेमुळे मिळाली. अजूनही हे प्रसरण सुरू आहे कारण प्रसरण थांबवू शकेल ते गुरुत्वाकर्षण पुरेसं ताकदवान नाही. जेव्हा हे प्रसरण सुरू झालं, १४ अब्ज वर्षांपूर्वी, तेव्हा सगळ्या वस्तू - म्हणजे कण, कारण तेव्हा तारे, ग्रह, दीर्घिका असं काहीच नव्हतं - एकमेकांपासून लांब जायला लागले. आणि एकदा एका दिशेला गती मिळाली की जोपर्यंत काही अडथळा येत नाही, इतर कोणतं बल वापरून ही गती रोखली जात नाही तोपर्यंत कणांचं एकमेकांपासून लांब जाणं सुरूच राहणार. जवळचे काही कण एकत्र आले, त्यातून तारे, दीर्घिका तयार झाल्या तरीही हे लांब जाणं थांबलेलं नाही. आणि त्यातून नवीन अवकाश, जागा विश्वात तयार होत आहे. आपल्याला माहित असलेला इतर कोणताही स्फोट, मग तो ताऱ्याचाही का असेना, आणि विश्वाचा 'स्फोट' यांच्यात हा मुख्य फरक आहे. त्यामुळे हे अयोग्य नाव आहे, पण रूढ आहे. "टेढा है पर मेरा है।"

हे चित्र आहे बाळविश्वाचं. बाळ म्हणजे किती लहान तर, विश्वाचं वय साधारण चार लाख वर्ष असतानाचं. चार लाख वर्ष म्हणायला फार जास्त वाटतात. पण सध्याचं विश्वाचं वय आहे १४ अब्ज वर्ष. हे वय ६० वर्ष मानलं, आपलं विश्व आता नोकरीतून निवृत्त होतंय असं मानलं तर हे चित्र आहे विश्व साधारण ११ तास वयाचं असताना काढलेला हा फोटो आहे. या चित्रात नक्की काय पहायचं आणि हे चित्र असंच का दिसतं याचा थोडा विचार करू या.

मुळात, बाळविश्वाचा जन्मताक्षणीचा फोटो मिळणार नाही का? याचं उत्तर आहे नाही. याचं कारण, तेव्हा विश्व सगळं फार ढवळलेलं होतं. तलावातला चिखल पाण्यात मिसळला गेला की तलावाचा तळ अजिबातच दिसणार नाही, पण तो चिखल खाली बसला की मग तलावाचा तळ दिसेल तसंच हे काही. तेव्हा विश्वातला 'चिखल' होता प्लाझ्माचा. हा प्लाझ्मा होता भारित कणांचा. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे कण. हे सगळे प्रचंड गतीने हालचाल करत होते. आणि समजा एका ठिकाणाहून प्रकाशाचा एक किरण निघाला, तर तो आपल्याला दिसण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचायला हवा. पण तसं होण्याआधीच या भारित कणांमुळे तो इकडेतिकडे फेकला जात होता. पुन्हा चिखल पसरलेल्या तलावाचं उदाहरण पाहू. तलावाच्या तळातून परावर्तित झालेला कण चिखलाच्या कणामुळे भलत्या दिशेला गेला, आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही, तर आपल्याला तळ दिसणार नाही. नुकत्याच जन्मलेल्या विश्वातही हेच होत होतं. पण जसं विश्वाचं प्रसरण होत होतं तसं, तुरटी फिरवल्यासारखा, हा गाळ बाजूला होत गेला, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मिळून हायड्रोजनचे अणू तयार झाले आणि ठराविक क्षणाला विश्वाच्या आतलं दिसायला सुरूवात झाली. विश्वातलं विद्युतचुंबकीय प्रारण तेव्हा तेव्हा कणांपासून मोकळं झालं. तेव्हा विश्वाचं वय होतं साधारण चार लाख वर्ष.

हे चित्र बनवलेलं आहे मायक्रोवेव्ह लहरी वापरून. मायक्रोवेव्हच का? सुरूवातीला हे प्रारण अतिनील किंवा दृश्य प्रकाशकिरण म्हणून बाहेर पडलं. या किरणांची तरंगलांबी कमी असते. पण विश्वाच्या प्रसरणामुळे ही प्रारणं, समजा, खेचली गेली आणि त्यांची तरंगलांबी वाढली. (चित्र पहा.) आता विश्वाचा आकार एवढा आहे की ही प्रारणं मायक्रोवेव्ह लहरींच्या रुपात दिसतात. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर 'प्लँक' नावाचा उपग्रह आहे. त्यावर जी दुर्बिण आहे त्यातून त्यांनी संपूर्ण आकाशाचं, एक प्रकारे संपूर्ण विश्वाचं निरीक्षण केलं. त्यातून समोर असणारे तारे, वायूचे ढग, दीर्घिका, अशा सगळ्या वस्तू वजा केल्या. आता जी उरली ती आपल्या विश्वाची पार्श्वभूमी. Cosmic Microwave Background (CMB). जेव्हा महास्फोटाचा सिद्धांत मांडला गेला तेव्हा अशा प्रकारचं, संपूर्ण ‌विश्वात भरून राहिलेलं प्रारण सापडेल असं वर्तवलं होतं. १९६४ साली आर्नो पेन्झियज आणि रॉबर्ट विल्सन या दोघांना, चुकूनच या प्रारणांचा शोध लागला.

हे दोघे त्या काळात बेल लॅबोरेटरीजमधे काम करत होते. त्यांचं काम होतं, एका कृत्रिम उपग्रहाकडून आलेले संदेश गोळा करणं. त्यात त्यांना लक्षात आलं की त्यांच्या उपकरणातून, कोणत्याही दिशेला पाहिलं तरी ठराविक प्रकारचा नॉईज, नकोसा संदेश मिळतो आहे. त्यांना हे पण लक्षात आलं की या नॉईजचं तापमान आहे उणे २७० अंश सेल्सियस. आधी त्यांना वाटलं, आपल्या दुर्बीणीवर काही घाण असेल त्यामुळे हा भलता सिग्नल आपल्याला मिळतो आहे. बाकी सगळं सुधारूनही हा सिग्नल जाईना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा नॉईज अवकाशातून येतो आहे. सगळ्या दिशांनी येतो आहे. आणि सगळ्या दिशांनी तो समान प्रमाणात येतो आहे. या शोधाबद्दल त्या दोघांना १९७८ सालचा, भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला. पेन्झियज आणि विल्सन यांच्या उपकरणात विश्वाचा फार अचूक नकाशा बनवण्याची, बाळ विश्वाचा फोटो काढण्याची, क्षमता नव्हती. Cosmic Background Explorer (COBE) या कृत्रिम उपग्रह-दुर्बिणीने या प्रकारचा, बाळ विश्वाचा पहिला फोटो काढला. या शोधाबद्दल कोबेच्या दोन मुख्य संशोधकांना, जॉर्ज स्मूट आणि जॉन मेथर यांना २००६ सालचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला. दोन नोबेल पुरस्कार पटकावणारा हा विषय अर्थातच फार महत्त्वाचा आहे.

तर वरचं हे चित्र आहे ते त्या प्रारणांचं आहे. गेल्या वर्षीच हा नकाशा किंवा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यातून तारे, दीर्घिका वगैरे वजा केलेले असले तरीही त्यात बरेच गोळे दिसत आहेत. त्यातले पिवळे, लाल म्हणजे त्यातल्या त्यात गरम भाग आणि निळे, हिरवे हे थंड भाग. यातला फरक आहे तो फारच सूक्ष्म आहे. हा फरक किती कमी आहे तर, एक लाख भागात एक भाग एवढा कमी फरक आहे. म्हणजे हा एवढा फरक वगळता आपलं विश्व हे सगळीकडे समान आहे. हा फरक महत्त्वाचा आहे. कारण त्यातून ठिकठिकाणी वस्तुमान गोळा झालं. जिथे थोडं वस्तुमान गोळा झालं तिथे गुरुत्वाकर्षणातून आणखी जास्त वस्तुमान जमलं. आणि असं करत करत तारे, दीर्घिका तयार झाले. हे झालं नसतं तर अर्थातच आपण तयार झालो नसतो. पण इथेच एक मोठी उणीव आहे. मुळात हे वस्तुमान कसं तयार झालं तर E=mc2 हा ऊर्जा-वस्तुमानाचा नियम आपल्याला माहित आहेच. ऊर्जेतून कण आणि प्रतिकण अशा जोड्या त्या बाळविश्वात तयार होत होत्या आणि पुन्हा कण-प्रतिकण एकत्र येऊन ऊर्जा मुक्त होत होती. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन ही एक जोडी. अशा वेगवेगळ्या मूलभूत कणांच्या जोड्या तयार झाल्या. जेवढे प्रतिकण होते, तेवढे ते कणांबरोबर एकत्र झाले आणि पुन्हा ऊर्जा तयार झाली. पण जास्तीचे कण होते तेवढे राहिले. त्यांचे अधेमधे गोळे तयार झाले, आणि त्यातून पुढे मोठे गोळे बनत गेले. मुळात जेवढे प्रतिकण होते त्यापेक्षा किंचित जास्त कण तयार झाले. ही अनियमितता - baryongenesis - कशी आली हे कोडं आत्तापर्यंत सुटलेलं नाही. महास्फोटाच्या सिद्धांतामधली ही एक मोठी उणीव आहे. आणि त्याचं उत्तर अजूनही आपल्याला सापडलेलं नाही. पण ही अनियमितता होती म्हणून आपण आहोत. मुळात दीर्घिका, तारे तयार झाले नसते तर आपण कुठून येणार होतो?

आत्ता आपण किंचित असणाऱ्या अनियमिततेचा विचार केला. आता पुन्हा नियमिततेकडे येऊ. विश्वाचं वय चार लाख वर्ष असताना निघालेलं हे प्रारण आणि आजचं विश्वाचं वय आहे १४ अब्ज वर्ष. एवढा सगळा काळ या प्रारणाने प्रवास केला आणि इतर कुठेही न धडक देता हे किरण आपल्या दुर्बिणीपर्यंत आले, म्हणून आपल्याला सापडले. या काळात विश्वाचं बरंच प्रसरण झालं. विश्वाचा आकार आहे १४ अब्ज प्रकाश वर्ष. आणि या महाप्रचंड वस्तूच्या आतलं तापमान सगळीकडे समान आहे. फरक आहे तो एक लाख भागात एक भाग एवढा कमी. हे कसं शक्य आहे? याचं स्पष्टीकरण देण्यासाठी दुसरी 'उणीव', अतर्क्य कल्पना सुचवली गेली. ही उणीव म्हणजे 'वैश्विक तेजी' (cosmic inflation). यात विश्वाचं अगदी क्षणापेक्षा कमी काळासाठी प्रचंड वेगाने प्रसरण झालं असं म्हणतात. हा काळ किती कमी तर, १०-३४ सेकंद (म्हणजे ०.००००... अशी ३४ शून्य आणि मग १) प्रचंड वेग म्हणजे प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेग. याचा विश्वाच्या तापमानावर कसा परिणाम झाला ते पाहू. समजा मोबाईलने काढलेला एक फोटो आहे. तो छापला तर फक्त पोस्टकार्डाच्या आकाराचाच होतो. समजा त्या फोटोचा कोणताही, पण फक्त एक दशांश भाग घेतला आणि तेवढाच मोठा करून
फ्लेक्स बोर्डावर छापला तर काय दिसेल? सगळीकडे फक्त एकच रंग पसरलेला आहे असं दिसेल. बाळविश्वातही हेच झालं. विश्वाचं प्रसरण एवढ्या जलद गतीने झालं की सगळीकडचं तापमान एकसमान झालं... असा सिद्धांत आहे. आणि मग सगळीकडे समान तापमान असणाऱ्या विश्वाचं प्रसरण झालेलं आपण पाहतो, तेव्हा सगळीकडचं तापमान, अगदी बारीकसा बदल वगळता, समान दिसतं. यात सगळ्यात मोठी उणीव अशी की यामुळे आपल्याला जे दिसतं त्याचं स्पष्टीकरण मिळतं, पण असं काही झालं याचा पुरावा म्हणून गुरुत्वीय लहरी असल्या पाहिजेत असा सिद्धांत होता. १९८० च्या दशकात हा सिद्धांत मांडल्यापासून हा पुरावा सापडला नव्हता. सध्याची 'ब्रेकिंग न्यूज' अशी की हा पुरावा मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांना एका टीमने केला आहे.

गुरुत्वीय लहरी

गुरुत्वीय लहरी म्हणजे काय? त्यांचा इतिहास सुरू होतो १९१६ पासून, जेव्हा आईनस्टाईनने, त्याच्या सापेक्षता सिद्धांतामधे मांडलं की या लहरी गुरुत्वीय प्रारण वाहून नेतात. या शोधायच्या कुठे तर दोन जड गोष्टी, उदा: द्वैती तारे, दोन न्यूट्रॉन तारे एकमेकांभोवती फिरत असतील तर त्यातून गुरुत्वीय लहरी बाहेर पडतील आणि त्या शोधणं तुलनात्मकरित्या सोपं असेल. (गुरुत्वाकर्षण लहरी निराळ्या. या लहरींच्या आदानप्रदानातून गुरुत्वाकर्षणाची देवघेव होते असा सिद्धांत आहे. पण त्याचा इथे संबंध नाही.) जसा विद्युतभार हलवला तर त्यातून विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडतील, तसं वस्तुमान हलवलं तर गुरुत्त्वीय लहरी बाहेर पडतील. पण या लहरींची ऊर्जा फारच कमी असते, त्यामुळे त्या शोधण्यासाठी फार काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागतं.

या लहरींचं आत्तापर्यंत थेट निरीक्षण झालेलं नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्या शोधल्या गेल्या होत्या. १९९३ सालचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार हल्स-टेलर द्वैती ताऱ्यांच्या निरीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाला, ज्यांनी गुरुत्वीय लहरी या काही गणिती खुडबुटापलिकडे काही असतील हे अप्रत्यक्ष निरीक्षणांमधून दाखवलं. पण आता, गेल्या महिन्यात हार्वर्ड-स्मिथसोनियन संस्थेच्या निरीक्षकांनी, गुरुत्वीय लहरी शोधल्याचं जाहीर केलं आहे. आणि या लहरी थेट वैश्विक तेजीशी संबंधित आहेत. वैश्विक तेजीच्या संदर्भातलं हे सगळ्यात पहिलं निरीक्षण आहे. आत्तापर्यंत वैश्विक तेजी हा सिद्धांत, आपल्या इतर निरीक्षणांची संगती लागावी म्हणून मांडला होता.

वैश्विक तेजी झाली तेव्हा प्रचंड वस्तुमान झपाट्याने हललं, त्यामुळे गुरूत्वीय लहरी तयार झाल्या पाहिजेत असा सिद्धांत होता. शास्त्रज्ञांच्या या गटाने, लहरी शोधण्यासाठी दक्षिण ध्रुवावर एक दुर्बिण उभारली. तिचं नाव BICEP-2. त्यांनी आकाशाच्या छोट्याशा भागाचं निरीक्षण करून, प्लँकने जसा विश्वाचा नकाशा बनवलेला आहे त्याच प्रकारचा दुसरा नकाशा बनवला. पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी या प्रारणाच्या पोलरायझेशन किंवा ध्रुवीयतेचंही निरीक्षण केलं. प्रारणाची ध्रुवीयता म्हणजे काय? वरचं चित्र पहा. असं समजा की चित्राकडून विद्युतचुंबकीय लहरी आपल्या दिशेने येत आहेत. या लहरी ज्या प्रतलात हिंदकळत असतील ती त्यांची ध्रुवीयता. डाव्या बाजूच्या चित्रात वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळ्या शक्यता दर्शवलेल्या आहेत. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार, या लहरींच्या प्रवासाची दिशा आणि त्या ज्या प्रतलात हिंदकळतात, ती दिशा एकमेकांना लंब असते. आता वरच्या चित्रातली मधली आकृती पहा. त्यात बहुतेकशी प्रारणं वर-खाली किंवा उत्तर-दक्षिण अशा प्रतलातच आहेत. ज्या वस्तूकडून या लहरी येत आहेत त्याकडे आपण आपल्या दुर्बिणीतून पाहिलं तर उजव्या बाजूला जी आकृती दिसते आहे तशी
दिसेल. (प्रत्यक्षात हे काही निराळं दिसतं, पण दाखवण्याची पद्धत ही अशी असते.) सगळ्यात डाव्या बाजूला जी आकृती आहे तसं प्रारण आपल्या दुर्बिणीत आलं आणि आपण त्या वस्तूची ध्रुवीयता मोजली तर काय दिसेल? शून्य. ध्रुवीयता तेव्हाच दिसते जेव्हा एका दिशेला जास्त झुकतं माप असतं. अगदी आपल्या मतदानासारखंच. कोणी उमेदवार जिंकण्यासाठी त्यांना ५०% मतं मिळवायची गरज नाही. सगळ्यात जास्त मतं मिळवणारी व्यक्ती जिंकणार. आणि सगळ्या उमेदवारांना अगदी एकसमान मतं पडली तर कोणीच जिंकणार नाही.

पुढे जे चित्र आहे ते या संशोधकांनी प्रसिद्ध केलं आहे. या चित्राचा नक्की अर्थ काय?

यातले रंग नेहेमीप्रमाणे, केशरी रंग उष्ण आणि निळा थंड भागाचा. शिवाय रेषा दिसत आहेत. या त्या ध्रुवीयतेच्या रेषा. रेषांची लांबी जिथे जास्त आहे तिथे प्रारण जास्त प्रमाणात ठराविक कोनातून येत आहे, जिथे रेषेची लांबी कमी आहे त्या दिशेने येणारं प्रारण सगळ्या कोनांमध्ये हिंदकळत आहे.

ध्रुवीयतेचा गुरुत्वीय लहरींशी संबंध आहे. त्याचं कारण आहे ही ध्रुवीयता निर्माण होण्याची प्रक्रिया. विश्वाचं वय ४ लाख वर्ष होतं तेव्हा प्रारण आणि कण सुटे झाले म्हणून आपल्याला आता तो फोटो दिसतो हे आपण मगाशी पाहिलं. पण प्रारण कण किंवा वस्तुमानापासून सुटलं, त्याच्या नुकतंच आधी ते कोणत्यातरी कणावर आपटलेलं होतं. भारित कणावर जेव्हा प्रारण आपटतं तेव्हा त्याची दिशा बदलते. दिशा बदलते याचा अर्थ ध्रुवीयता बदलते. (त्याला 'कॉंप्टन परिणाम' असं नाव आहे.) आणि कणांची जागा गुरुत्वाकर्षणामुळे ठरली होती. अशा प्रकारे कणांची ध्रुवीयता आणि गुरुत्वाकर्षण, पर्यायाने गुरुत्वीय लहरी यांचा परस्परसंबंध आहे. या चित्रातून, वैश्विक तेजीच्या वेळी निघालेल्या गुरुत्वीय लहरी शोधण्याचा दावा बायसेप-२ च्या टीममधल्या लोकांनी केला आहे.

अजूनही हे संशोधन इतर शास्त्रज्ञांच्या नजरेखालून जात आहे. हे निरीक्षण-संशोधन बिनचूक असेल तरीही वैश्विक तेजी सिद्ध करणारा हा संपूर्ण पुरावा नाही. अन्य निरीक्षणं करून त्याला जोड द्यावी लागेल. पण विश्वरचनेसंदर्भातल्या एक मोठं भोक बुजवण्याची ही पहिली पायरी असू शकते.

हे संशोधन गुरुत्वीय लहरींचं थेट मापनही नाही. ते करता यावं म्हणून Laser Interferometer Gravitational-Wave Observatory (LIGO) नामक दुर्बीण बनवली जात आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी LIGO-India बनवण्याची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. त्यातून वैश्विक तेजी आणि गुरुत्वीय लहरी या दोन्हीच्या अस्तित्व किंवा नसण्याबद्दल ठोस काही हाती लागू शकेल.

पण या संशोधनाला शास्त्रज्ञांची मान्यता मिळाली, हे काम ग्राह्य समजलं गेलं तर या संशोधनामुळे महास्फोटाच्या या सिद्धांताला चौथा नोबेल पुरस्कार निश्चित असेल असं तज्ञांचं मत आहे.

---

काल प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार गुरुत्वीय लहरी मिळाल्या याला किंवा मिळाल्या नाहीत यालासुद्धा ठोस पुरावा सापडलेला नाही. याबद्दल असलेला आक्षेप समजून घेण्यासाठी आधी ध्रुवीयता कशी निर्माण होते हे थोडक्यात पहावं लागेल.

भारित कण विद्युतचुंबकीय क्षेत्रात हालचाल करतात तेव्हा दृश्य प्रकाश किंवा कमी-अधिक उर्जेचं इतर प्रारण तयार होतं. या प्रारणाला मुळातच काही प्रमाणात ध्रुवीयता असते. दुसरं कारण असतं अवकाशातली धूळ, धूलिकण. अवकाशातल्या धूलिकणांच्या रेणूंचा आकार जर लांबुळका असेल आणि त्यातले बऱ्याच रेणूंचा लांबुळका एका दिशेने असेल तर त्या धूलिकणांमधून प्रवास करणाऱ्या प्रारणाची ध्रुवीयता बदलते. बदलते म्हणण्यापेक्षा फिल्टरींग होतं. समजा लांबुळके रेणू उत्तर-दक्षिण किंवा उभे असतील तर आडव्या प्रतलात ध्रुवीयता असणारी प्रारणं गाळली जातील. बाहेर येणाऱ्या प्रकाशाची ध्रुवीयता उभ्या प्रतलातच असेल असं दिसतं. याचा आपल्या बातमीशी संबंध म्हणजे, गेल्या वर्षी प्लांक अवकाशयानातून मिळालेल्या विदेचा अभ्यास करणाऱ्या एका सैंद्धातिक खगोलविदाचा दावा आहे की, बायसेप-२ च्या प्रयोगात धुलिकणांमुळे होणाऱ्या ध्रुवीयतेचं मोजमाप चुकलेलं आहे. योग्य ते मोजमाप वापरल्यास गुरुत्वीय लहरी म्हणून जो सिग्नल वापरला जात आहे त्याची तीव्रता नाहीशी होईल किंवा फारच कमी होईल.

अजून काही महिन्यात प्लांककडून आणखी विदा येईल तेव्हा कदाचित या शक्याशक्यतांबद्दल अधिक भक्कम निष्कर्ष काढता येतील.

लेखाचा बहुतांश भाग मे २०१४ च्या 'खगोल वार्ता'मध्ये पूर्वप्रकाशित

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

जड गेला समजवून घेताना जरा. पुन्हा वाचयला लागेल. पण नव्या अनेक संकल्पना ऐकल्या जसे की cosmic inflation आणि baryongenesis

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काय समजून घेताना त्रास झाला हे सांगितलं तर आणखी स्पष्ट करायचा प्रयत्न करते. कदाचित या लेखमालिकेचा उपयोग होऊ शकेल -
विश्वरूपदर्शन - १, भाग २, भाग ३

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थ्यांकू
एके काळच्या आवडत्या विषयावरचा लेख वाचून मस्त वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख जरा नीट लक्ष देऊन वाचला. बह्वंशी समजला-ऑर समजल्यासारखा वाटला तरी किमान. लेमॅनला समजेल अशा भाषेत अन मस्त उपमा देऊन लिहिलेला आहे. वाचायला मज्जा आली एकदम. ते गुरुत्वीय लहरी अन गुरुत्वाकर्षण लहरी यांत कन्फ्यूजन झालं पण नंतर क्लीअर झालं. तरी एक प्रश्न उरला. लेखाशी डैरेक्ट संबंध नाही पण स्टिल..

तर कोणे एके काळी आम्ही वाचले होते की क्वांटम फिजिक्स=मायक्रो अन रिलेटिव्हिटी=मॅक्रो असे समीकरण होते अन यांना सांधणारा पूल, अर्थात 'क्वांटम थेरी ऑफ ग्रॅव्हिटी' अजून तरी अस्तित्वात नाही. ती येईल तेव्हा हा प्रश्न सुटेल. त्यात वरील संशोधन कसं बसतं? काही अर्थाअर्थी संबंध तरी आहे की मी गफलत करतो आहे?

आता रिलेव्हंट प्रश्नाकडे येतो. लेखातल्या परिभाषेप्रमाणे 'गुरुत्वीय लहरी' म्ह. काय ते कळाले, पण खगोलशास्त्राच्या पापिलवार पुस्तकात (वेध विश्वाचा बाय निवास पाटील असावे भौतेक- फार कै पापिलवार नसावे पण लहान असताना तेवढेच पुरले-अलाँग विथ यूज्वल नारळीकर फेअर) ग्रॅव्हिटेशनल वेव्ह्ज म्ह. ज्या गुरुत्वाकर्षण वाहून नेतात त्या असे काहीसे वाचल्याचे आठवते. त्याशी संबंधित अवांतर प्रश्न असा की 'गुरुत्वाकर्षण लहरी' अ‍ॅज़ अपोज्ड टु 'गुरुत्वीय लहरी' समजा मोजता आल्या तर करंट सिद्धांतात भर-तूट काही येईल का? नक्की कशाचे प्रूफ मिळेल, काय अ‍ॅडिशन होईल, इ. संक्षिप्त रूपात थोडे कळल्यास आभारी राहीन, लेखिकेचे आगाऊच धन्यवाद. एकेकाळच्या आवडत्या विषयावर पुन्हा वाचनाचा आनंद मिळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख बराचसा समजला आणि आवडला. गुरुत्वीय लहरी सापडल्याचे सिद्ध झाले म्हणजे महास्फोटाच्या सिद्धांताला आधार मिळेल हे कळले; पण baryongenesis हा प्रकार फारच रोचक वाटला.
म्हणजे आधी फक्त प्रचंड वेगाने प्रसरण पावणारी ऊर्जा होती आणि हळूहळू तिच्यातून वस्तुमान निर्माण व्हायला लागले असे म्हणता येईल का? विश्व अजूनही प्रसरण पावते आहे तर baryongenesis अजूनही चालू आहे का आणि असल्यास कधीतरी खूप जास्त वस्तुमानाने विश्व आकुंचन पावू लागेल का? म्हणजे अशी काही थियरी आहे का की विश्वाला जन्म असेल तर अंतही असेल असं काही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. पुन्हा एकदा निवांत विश्वरुपदर्शनाच्या लेखमालेसह वाचायचा आहे.

तर वरचं हे चित्र आहे ते त्या प्रारणांचं आहे. गेल्या वर्षीच हा नकाशा किंवा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यातून तारे, दीर्घिका वगैरे वजा केलेले असले तरीही त्यात बरेच गोळे दिसत आहेत. त्यातले पिवळे, लाल म्हणजे त्यातल्या त्यात गरम भाग आणि निळे, हिरवे हे थंड भाग. यातला फरक आहे तो फारच सूक्ष्म आहे. हा फरक किती कमी आहे तर, एक लाख भागात एक भाग एवढा कमी फरक आहे. म्हणजे हा एवढा फरक वगळता आपलं विश्व हे सगळीकडे समान आहे. हा फरक महत्त्वाचा आहे. कारण त्यातून ठिकठिकाणी वस्तुमान गोळा झालं. जिथे थोडं वस्तुमान गोळा झालं तिथे गुरुत्वाकर्षणातून आणखी जास्त वस्तुमान जमलं. आणि असं करत करत तारे, दीर्घिका तयार झाले.

या फरकामागचा 'पॅटर्न' शोधण्याचे काही प्रयत्न चालू आहेत का? आणि बाळविश्वाच्या 'वय वर्षे चार लाख' नंतरच्या आवृत्त्या टप्प्याटप्प्याने मिळवणे कितपत शक्य आहे?

अवांतर - आर्नो पेन्झियज आणि रॉबर्ट विल्सन या जोडगोळीच्या शोधाबद्दल अलीकडेच एनपीआरवर एका कार्यक्रमात ऐकलेला हा भाग.

Another possibility? Birds.

"There was a pair of pigeons living in the antenna," Wilson says. Wilson and Penzias got on their lab coats, climbed inside their giant microwave contraption, and wiped out the pigeon poop. The birds kept roosting in there. Penzias and a lab technician eventually took matters into their own hands: "The only humane way of doing it was to buy a box of shotgun shells," Penzias says. "So that's what finally happened to the pigeons."

But when they turned on the de-pigeoned antenna, the static was still there.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(सध्या प्रवासात आहे, पण जमेल तसं प्रश्नांना उत्तरं देत चर्चा पुढे सरकवायचा प्रयत्न करत राहते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकदा वाचल्यावर समजायला जड! पण परत वाचल्यावर थोडं फार समजत असल्याचं लक्षांत आलं. इतका कठीण विषय सोपा करुन आमच्यासमोर मांडण्यासाठी अदितीचे आभार.
पुढे मनांत ननिं सारख्याच शंका आल्या. प्रसरणाला काही विरोधच नसेल तर ते थांबणार कसे ?
शेवटचं चित्र बघितल्यावर, माणसाच्या मनाचे ध्रुवीकरणही असेच बदलत असते की काय, असा मनांत विचार आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

लेख आवडला. ढवळलेल्या चिखलाची उपमा मस्त आहे, आवडली.

गुरुत्वाकर्षण लहरी निराळ्या. या लहरींच्या आदानप्रदानातून गुरुत्वाकर्षणाची देवघेव होते असा सिद्धांत आहे. पण त्याचा इथे संबंध नाही.

ह्यामुळे थोडाफार गोंधळ झाला. ह्याबद्दल बोलणे सुरू आहे का? आणखी थोडे स्पष्टीकरण देता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमीबद्दल माहिती छान सांगितली आहे.
धन्य, ३_१४ विक्षिप्त अदिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम, फक्त गुरुत्वीय लहरींबद्दल वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छानच. नंदन म्हणतो तसे आधीच्या (जवळजवळ विस्मरणात गेलेल्या) लेखांसकट सलग वाचावा लागेल
आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अद्ययावत संशोधन -
Planck Speaks: Bad News for Primordial Gravitational Waves?

कधीतरी गुरूत्वीय लहरी सापडतील अशी आशा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कॉस्मिक बॅक्ग्राउन्डवाल्यांच्या उत्साह-अपेक्षांचा बी-मोड होण्याची शक्यता आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Galactic dust sounds death knell for BICEP2 gravitational wave claim

बातमीनुसार, बायसेप-२ ने मार्च २०१४ मध्ये केलेला दावा मागे घेतला आहे. त्यांना 'दिसलेला' सिग्नल धूलिकणांमुळे होता. गेल्या वर्षी प्लँकची विदा प्रकाशित झाली तेव्हाच मूळ निष्कर्ष चूक असण्याची शक्यता वाढली होती. आता पुरता 'बीमोड' झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप छान लेख. माझ्या सारख्या विज्ञानात अभिजात 'ढ' असलेल्या प्राण्याला सुद्धा काही काही गोष्टी समजल्या. (किमान असं वाटतंय तरी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

தநுஷ்

कोणत्याही मानवनिर्मित उपकरणातून, अगदी 'सर्न'मध्येही, अतिप्रचंड ऊर्जा-तापमान तयार करता येत नाही.

असं नसावं. म्हणजे अतिप्रचंड उर्जा नसेल, पण ज्या पार्टीकल्सना ती इंपार्ट करायची आहे त्यांची ऐपत/क्षमता (जे काय ते ) पाहिली तर ही उर्जा अतिप्रचंडच असते. विश्वप्रारंभासदृश हा शब्द त्यामुळेच वापरला जातो. सर्नपेक्षा दुप्पट क्षमतेचा, ८० किमी लांबीचा पॉझिट्रॉन पॉझिट्रोन प्लस इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कोलायडर चीन उभा करत आहे. तेव्हा ही स्थिती सदृश पासून सम कडे सरकते आहे.
---------
दुसरं म्हणजे स्टीफन हॉकिंग यांनी म्हटलेली बातमी होती कि हिग्ज बोसॉनला १०० बिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी उर्जा मिळाली तर त्यातून "स्पेसवेव" निघेल. लेमॅनच्या शब्दात ती विश्वाला प्रकाशाच्या गतीने नष्टवत (गट्टम करत) प्रोपागेट होईल. काही दिवसानी अशी बातमी होती कि इतकी उर्जा इंपार्ट करणारा कोलायडर थेट पृथ्वीच्या आकाराचा असावा लागेल. मंजे नसेल. पण तरी याने मनात एक किडा राहून गेला - पृथ्वीवर जरी असं नाही झालं (म्हणजे माणसांनी नाही केलं) तरी अवकाशात १०० Bn eV काहीच नाही. तिथे प्रचंड तीव्र विद्यउत चूंबकीय बले असतात. आपल्या मागच्या एका लेखात आपण आपल्या दीर्घीकेच्या केंद्री जबर्‍या चूंबकीय क्षेत्र आहे असे म्हणाल्याचे आठवते, तसे. चूकून माकून ... तर कधी असली वेव आली आणि कधी आपण नष्ट झालो याचा पत्त्या पण लागणार नाही.
---------
यातला तापमान शब्द अचूक आहे असे प्रारंभी वाटले. पण नंतर हा विचार आला कि तापमान शेवटी आण्विक पातळीवर कणांच्या गतीय उर्जेचे प्रतीक आहे. सर्नमधे गतीय उर्जा तर देतात कणांना. विश्वाच्या सार्‍या वस्तुमानाला ( ज्याचं अजून काही नीट रुडीमेंटरी इस्टीमेट नसावं) थोडीच उर्जा, तापमान द्यायचंय? फक्त चंद कणांना द्यायचं आहे. आणि साधारण अशी कल्पना होती कि तसं होत आहे.
-------------
आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विश्व फुगण्यासाठी, पसरण्यासाठी सुरुवातीला वस्तुमानाला मिळालेली गती आतल्या प्रारणाच्या उर्जेमुळे मिळाली. अजूनही हे प्रसरण सुरू आहे कारण प्रसरण थांबवू शकेल ते गुरुत्वाकर्षण पुरेसं ताकदवान नाही.

पुन्हा असं नसावं. मी जितकं ऐकलं आहे त्याप्रमाणे आजघडीला (म्हणजे काही काळापूर्वीच) स्फोटाच्या मोमेंटमला गुरुत्वाकर्षण ओवर्कम करेल नि आज विश्व सकुंचन (कि संकुचन, जे काय ते) पावत असेल असा आडाखा होता. उलटं निघालं म्हणून बिग बँग थेरी स्क्रॅप व्हायच्या अवस्थेला पोचलेली. तेव्हा दीर्घीकांना खेचणारे (आपल्यासारख्या मॅटरपेक्षा पटीचं) डार्क मॅटर विश्वाच्या बाहेर चोहीकडून असावं (किंवा आहे) असा कयास मांडला गेला.
---------------
प्रसरण थांबवू शकेल इतकं गुरुत्वाकर्षण ताकदवान नाही हे विधान टेक्निकली चूक आहे. मंजे ऑपोझिट फोर्सच नाही, तेव्हा बल किती कमी असेना, प्रसरण थांबायलाच पाहिजे, फक्त वेळेचा प्रश्न आहे. अर्थात डार्क मॅटर , एनर्जी नाही हे गृहितक इथे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रसरणातून अवकाशाची पोकळी तयार होत गेली.

इथे तयार होत गेली मंजे नवनिर्मित असे म्हणायचे आहे का? फाल्स स्पेस? स्फोटापूर्वीची खरी स्पेस आणि आपण राहत असलेली फाल्स स्पेस यांत कोणते गुणधर्म वेगळे आहेत?

Cosmic Microwave Background (CMB). जेव्हा महास्फोटाचा सिद्धांत मांडला गेला तेव्हा अशा प्रकारचं, संपूर्ण ‌विश्वात भरून राहिलेलं प्रारण सापडेल असं वर्तवलं होतं. १९६४ साली आर्नो पेन्झियज आणि रॉबर्ट विल्सन या दोघांना, चुकूनच या प्रारणांचा शोध लागला.

मला एक कुतुहल आहे.
कॉस्मिक रे, ग्रॅविटी, इ इ सोडले तर बाकीचे जवळजवळ सगळे प्रारणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतात. एकदा असे म्हटले कि केवळ त्यांची फ्रिक्वेन्सी हाच अस्पेक्ट वेगळा उरतो. विश्वातल्या प्रत्येक स्रोतापासून जवळजवळ सारा स्पेट्रम उत्सर्जित होत असतो. मग शास्त्रज्ञ त्यांना मिळत असलेली प्रारणे याच स्रोताची हे कसे ठरवतात. सी एम बी फायनली विद्युतचुंबकीय प्रारण असणार. ते (जेव्हा शास्त्रज्ञांच्या उपकरनात येतं तेव्हा) नक्की कोठून आणि केव्हा तयार झालं आहे ते शास्त्रज्ञ कसे ठरवतात?
I will write it again. We receive electromagnetic radiations in our observatories. Forget CMB, when we receive any electromagnetic radiation what we receive is 1. type of radiation 2. Frequency 3. Energy density. It does not come with the information on what is the source and how long it has travelled from that source, etc. Or does it? How do scientists know the source?
-------------
In an analogous experiment, if a minimum mechanical sound was always detected by these two scientist, how would they deduce that the same was result of some bang very long back?
---------------
Will this CMB always (all Bn years) there? Would it not travel out from where it is and subsequently disappear? The idea of a continuously powered flash of light looks normal, but the idea of an illuminated space without a light source looks bizzare. The light created at one place should travel, propagate to another place and render the original space, point dark.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्राप्त झालेल्या ध्वनिलहरी एका ठिकाणून आल्या की अनेक ठिकाणाहून? हे ठरवण्याचा वैयक्तिक अनुभव आपल्यापाशी आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन्ही कानांपाशी (प्रत्येकी) पोचणार्‍या मिश्रणलहरींमुळे प्रत्येक कानाचे पडदे स्पंदित होतात. प्रत्येक कानात पोचणारे मिश्रण काहीसे वेगळे आणि काहीसे सारखे असते. त्या मिश्रणातील सारखे आणि वेगळे भाग वेगळे करून ध्वनीचे वेगवेगळे स्रोत आपण ओळखू शकतो. म्हणजे एकाच वेळी गच्चीतल्या मुलाने घातलेली शीळ आणि पलीकडे रस्त्यावरून जाणार्‍या गाडीचा भोंगा वेगळा करून ऐकू येतो.

आपल्या कानात मिश्र लहरींचे सारखे/वेगळेपण जोखून स्त्रोत वेगळे करण्याचे "गणित" मज्जापेशी करतात; तेच गणित यंत्रेसुद्धा करू शकतात. म्हणूनच वेगवेगळ्या देशांत असलेल्या भूचलनमापक यंत्रांपाशी (seismograph) पोचणार्‍या लहरींचे मापन करून वेवक्षित भूकंपाचे स्रोतस्थान ओळखता येते.

विद्युच्चुंबकीय लहरींबाबत आपले शारित उदाहरण म्हणजे दोन डोळ्यांनी बघणे, आणि दोहोंवर पडणार्‍या काहीशावेगळ्याकाहीशासमान प्रतिमांनी प्रकाशाचा एकच स्त्रोत कुठला तो जोखणे.

Not only a single-number frequency, but frequency spectrum, amplitude, and shifting of spectral lines in electromagnetic radiation. For multiple sensors phase shift and parallax are further sources of information.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता नवीन कोण काय सापडल्याचा दावा करत आहे हे सांगतानाच आधिच्या संशोधनाचा दिलेला गोषवारा फारच आवडला. केवळ एक सनसनाटी बातमी देण्याच्या नादात काही मूलभूत कल्पना आणि समिकरणांकडे बऱ्याचवेळा संशोधक दुर्लक्ष करतात. त्यातलंच एक म्हणजे पदार्थाचे वस्तुमान आणि त्यातली सुप्त गतिमानता(momentum?) मोजायला गेल्यास एकाचवेळी दोन्ही अचूक मोजता येत नाही. एक को मनावु तो दूजा रूठ जाता है अशी परिस्थिती असते.हेच अवकाश, गुरूत्व, प्रारण, कण लहरी, काळ इत्यादींना लागू आहे. नेति नेति असे कपिलमुनी सांगतात. आताची निरीक्षणे ही काही तापमापक, मोजपट्टी, घड़याळ, भिंग वगैरे वापरून हे पाहिले आणि हे सापडले अशी ठळक बातमी पेपरात फोटुसकट छापून येण्यापलीकडची आहेत.
=== ===
अभ्यास करुन प्रवचन लांबच्या रेल्वेप्रवासात सहप्रवाशांना झोप आणतं निरर्थक बोलणं उत्साहित ठेवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'लीगो' ने शोध जाहीर केला आहे.
https://www.ligo.caltech.edu/news/ligo20160211

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शोधाशोध करायला सोपं जावं म्हणून नव्या लेखाचा दुवा - गुरुत्वीय लहरी - लायगोचं यश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.