आजोळच्या गोष्टी

आजोळच्या गोष्टी

आईचं गाव औदुंबर. चांगला तासभर धुरळा उडवला कि बस पोचवायची ते औदुंबर फाट्यावर.
लाडका मामा गाडी घेऊन बराच वेळ उन्हात, पावसात वाट पाहत असायचा. मोजकीच घरे असल्याने गावातील हरेक गृहस्थ माझ्या घरच्यांना माहितीच असायचा. अगदीच न्यायला कोणी आले नसल्यास लिफ्ट मागणे आणि लिफ्ट मिळाल्यावरचा आनंद म्हणजे....! एखाद्या बैलगाडीतून जायला मिळणे म्हणजे पर्वणी असायची. उगाचच चक-चक आवाज काढत घरापर्यंत पोचायचे ते म्हणजे जणू मी गाडी हाकत आणली अशा आविर्भावात.

आम्ही येत असल्याची वार्ता मिळताच आजी खास रव्याचे लाडू वळायला घ्यायची. घरी येताच आजीला कडकडून मिठी मारायची आणि लाडू हातात घेत नदीकाठावरील दत्ताच्या मंदिरात ( देवाखाली) दर्शनाला पळायचे. छान तासभर झाला की नदीकाठाने घाटावर इकडे तिकडे भटकत, चिंचा पाडायचा कंटाळा येईपर्यंत धुपारतीची वेळ झालेली असायची. गावातील सर्व आबालवृद्ध महिला गट आपसूकच महादेव, मारुती, गुरु देव दत्त आणि मठ ह्यांच्या दर्शनास निघायचे. दत्ताची आरती, हळदी कुंकू वाहून झाले की आपला तीर्थ प्रसाद संपवून, आजीचा प्रसाद खात खात घाटावरून पायर्‍या मोजत मोजत घरी. मामा पूजा करत असायचा आणि मी गडबडीत शुभंकरोती म्हणून पुन्हा दंगा करायला तयार व्हायचो.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)