निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको.

निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.

मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे. कारण निंदा करणारा हा स्वत: कोणत्या ना कोणत्या बाबतीत कमजोर असेलच की ज्यामुळे इतर लोकांच्या तो निंदेला पात्र असेल. मग निंदा करून मिळते काय? निंदा ही एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला त्याचा बुद्धीनुसार झालेले आकलन असते. त्यामुळे निंदा व्यक्तिसापेक्ष असते जसे की सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. तसेच निंदेचे असते.

काही निंदक लोक दोन्ही बाजूंनी बोलतात.
समाजात अशा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध असले पाहिजे. एकवेळ एका विशिष्ट विचारसरणीला धरून चालणारा शत्रू आणि निंदक परवडला पण सतत रंग बदलणारे सतत स्वत:च्या फायद्यासाठी आपले विचार बदलणारे व ते विचार त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्यांवर लादणारे मित्र आणि नातेवाईक यापासून मात्र सावध असले पाहिजे.

उदाहरणार्थ, कुणी मुद्दाम आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण शांत असलो तर "बर्फासारखा थंड" आणि संतापलो तर "भडकू डोक्याचा" असा शिक्का आपल्या कपाळावर मारतात. पण आपण लोकांच्या प्रत्येक म्हणण्यानुसार सतत स्वत:ला बदलत गेलो तर आपल्याला जगणे मुश्कील होईल आणि आपले स्वत्व उरणार नाही, म्हणून शांत राहणे व बोलणे हेच फायदेशीर असते कारण हे दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक स्वत: सुद्धा आदर्श नसतात आणि संताप हा केव्हाही चांगला नसतोच. तसेच "थंड आणि संताप" यातील सुवर्णमध्य कधीच अस्तित्वात नसतो. मुळात सुवर्ण मध्य ही संकल्पनाच व्यक्तिसापेक्ष आणि प्रसंग सापेक्ष आहे. म्हणून शांत राहणे योग्य!

शिक्केवाले निंदक प्रत्येकाला "हा असा आहे आणि तो तसा आहे" असे शिक्के मारत फिरतात. स्वत:च्या कपाळावर कोणता शिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे विसर पडतो.

त्याचप्रमाणे काही निंदक हे सतत एखाद्या व्यक्तीतला दोष काढण्यात गुंतलेले असतात. त्यांना फक्त ठराविक व्यक्तीतले गुण तर ठराविक व्यक्तीतले दोषच दिसतात. हे तर फारच विषारी निंदक. अशा निंदकांच्या सहवासात राहिल्यावर आत्मविश्वासाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि हे निंदक आपल्या घरातलेच असतील तर मग काही पाहायलाच नको.

काही निंदक सतत तुलना करतात. इतरांच्या मुलावरून स्वत:च्या मुलांना बोलणे, तो बघ कसा आहे आणि तू? यात "तू" हा "तो" चा आदर्श घेणे तर दूरच राहाते पण "तो" आणि "तू" मध्ये तुलनेमुळे द्वेष मात्र वाढीस लागतो. हे तुलनाबाज कहर करतात. हे सतत आपल्या दोन मुलांमध्ये तुलना करतात, त्या दोन मुलांच्या मुलांमध्ये सुद्धा तुलना करतात.

आता तुम्ही म्हणाल निंदकांकडे लक्ष न देता आपले मार्गक्रमण करत राहावे. पण प्रत्येकाला प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. प्रत्येक जण स्वचालक (internally driven) नसतो, काही जण लोकप्रमाणचालक (externally driven) असतात आणि ते या निंदकांना बळी पडतात.
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुर केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.

निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||
सव्वाशेर दणका द्या जरा | निंदकांची निंदा करा ||
म्हणा त्याला परनिंदा सोडा | थोडी स्वनिंदा करा ||
तेव्हा निंदक होई बरा | अन समाज सुदृढ होईल खरा ||
आपल्याला काय वाटते? सांगता का जरा ....!!
निंदाबुद्धी विनश्यते । ओम शांती शांती शांती ॥

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)