... आणि माझी काशी झाली! (एका फील्डवर्कचा वृत्तांत)

१. आधीचा लेख संपादित केल्यावरही ट्रॅकरमध्ये दिसत नसल्याने तोच मजकूर या वेगळ्या धाग्यावर चिकटवतेय.

२. वेळ मिळेल तसतसा हा लेख तुकड्यातुकड्यात प्रसिद्ध करेन. गैरसोयीबद्दल क्षमस्व.
____________________________________________________

पांघरुणातच गुरगुटून रहावं, उठूच नये असं वाटायला लावणारी छान थंडी पडलीये. मी अंथरुणात पडल्या पडल्या परिस्थितीचा आढावा घेतेय. संगमरवरी फरशी, बुरशी लागलेल्या भिंती, वाळवीने पोखरलेला दरवाजा, डाग आणि भोकं पडलेली चादर असा एकंदर थाट. ३-४ फील्डवर्क्सचा अनुभव गाठीशी असल्याने याहून वाईट परिस्थितीत राहण्याची सवय मला आहे. प्रत्यक्षात मात्र, याहून कैक पटींनी चांगल्या अशा दुसर्‍या एका ठिकाणी आमची व्यवस्था करण्यात आली होती. पण आम्हाला आमचे पंतप्रधान आडवे आले. त्यांनी इथे वाराणसीत येऊन गंगास्नान करण्याचा घाट घातला, आणि अनेक गेस्ट हाऊसेसची सर्व बुकिंग्ज रद्द करण्याचे आदेश वरून आले. आमचंही बुकिंग अशा प्रकारे गंगेला मिळालं. पण सुदैवाने, आज सकाळपासून अधिक चांगल्या अशा एका ठिकाणी आमची सोय होईल.

मी इथे आलेय ती भाषावैज्ञानिकांच्या एका चमूसोबत. इथे पिढ्यान् पिढ्या राहणार्‍या मराठीभाषकांच्या मराठीचा अभ्यास करायला. पण प्रत्यक्षात माझं फील्डवर्क कालच, वाराणसीपर्यंतच्या रेल्वेप्रवासात सुरू झालं.
___________________________________________________

आमची रेल्वे रात्री जळगावला पोहोचल्यावर एक भलंमोठ्ठं कुटुंब आमच्या डब्यात चढलं. आपल्या सीट्स शोधतानाचा त्यांचा प्रचंड कलकलाट ऐकताना त्यांची भाषा म्हणजे मराठी आणि हिंदीचं अजब मिश्रण आहे हे माझ्या लक्षात आलं. मला वाटलं हे वाराणसीत राहणारे मराठीभाषकच असावेत. त्यामुळे सकाळी आपण यांचाच डेटा घेऊन चमूतल्या इतरांच्याही आधी फील्डवर्कचा नारळ फोडू असं मी ठरवलं. दुसर्‍या दिवशी उठून मी त्या कुटुंबातल्या लोकांचं निरीक्षण करू लागले. त्यांच्यासोबतच्या बच्चेकंपनीतली सगळ्यात लहान मुलगी माझ्याकडे पाहून हळूच हसली. मी लगेच ती संधी साधून माझ्याकडच्या लिमलेटच्या गोळ्या तिच्या हातात दिल्या आणि तिच्या सर्व भावंडांना त्या वाटायला सांगितलं. फील्डवर्कला जाताना लिमलेटच्या गोळ्यांचा वापर हा आपल्या मजेसाठी, तसेच गाडी लागत असेल, तर तो त्रास होऊ नये यासाठी आणि फील्डमधल्या लहान मुलांना त्या गोळ्या देऊन त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी अशा तीन वेगवेगळ्या प्रकारे होतो हा शोध मला गेल्या फील्डट्रीपला लागला होता. आणि त्यामुळे यावेळी मी या गोळ्यांची पाकिटं आवर्जून विकत घेतली होती. माझी ही दूरदृष्टी फारच उपयोगी पडली कारण ट्रेनमधल्या त्या मुलीशी १० गोळ्यांच्या फुटकळ भांडवलावर माझी चांगलीच गट्टी जमली, इतकी की तिची भावंडं नंतर आमच्याभोवती जमली तेव्हा तिने माझी ओळख 'म्हारी फ्रेंड' अशी करून दिली.

तिच्याशी गप्पा मारताना मला कळलं की त्यांची भाषा मराठी नसून मारवाडी आहे. पण त्याने माझ्या डेटा कलेक्शन करण्याच्या निश्चयावर काडीमात्रही फरक पडला नाही. कारण या लोकांची मारवाडी मुंबईत ऐकलेल्या मारवाडीपेक्षा बरीच वेगळी वाटत होती. म्हणून मी तिला हिंदीत म्हटलं, 'तुझं नाव काय आहे ते मला मारवाडीतून सांग ना!'
ती उत्तरली : म्हारो नाव इशा हे.
मी : तुझं वय काय?
ती : म्हे छे सालरी हू.

तिचं प्रत्येक उत्तर आणि तिच्या उच्चारातले बारकावे मी माझ्याकडच्या टिपणवहीत टिपत होते. मी तिच्याकडून काहीतरी माहिती घेतेय आणि वर ती लिहूनही घेतेय. याची तिला बहुधा मजा वाटत असावी.

मी : तुला कोणता प्राणी आवडतो?
ती : मने हरीन घनो आवडे.

इथे 'आवडे' हा शब्द गुजरातीप्रमाणे 'येणे/जमणे' या अर्थी वापरलेला नसून 'आवडणे' याच अर्थी वापरलेला पाहून मला फारच आश्चर्य वाटलं.

मी : तू कितवीत शिकतेस?

इथे मात्र ती गडबडली. शेवटी तिचे आजोबा धावून आले आणि त्यांच्या मदतीने तिने हे उत्तर रचलं : म्हे फस्ट स्टँडर्डमे शिकू.

इथे 'शिकू' हा शब्द ऐकून तर मला अधिकच आश्चर्य वाटलं. या भाषेवर मराठीचा प्रभाव नेमका कुठे आणि किती पडलाय हे पहावं लागेल अशी मनात नोंद करून मी अधिकाधिक डेटा गोळा करू लागले.

थोड्या वेळाने आजोबांनी न राहवून तू हे काय करतेयस, का करतेयस वगैरे प्रश्न विचारले. मला भाषांचा अभ्यास करायला आवडतो आणि त्याच कामासाठी मी वाराणसीला चालले आहे असं मी त्यांना सांगितलं तेव्हा ते माझ्याकडे 'ही वेडी की खुळी?' अशा नजरेने पहायला लागले. मला या कामाचे पैसे मिळतात असं सांगितल्यावर त्यांना माझ्या शहाणपणाची खात्री पटली. मग तेही उत्साहाने मला डेटा द्यायला तयार झाले. मी त्यांना 'मी वाराणसीत गेलो', 'मी वाराणसीत गेले' अशा प्रकारची काही वाक्य मारवाडीत भाषांतरित करायला सांगितली. त्यांनी दिलेल्या भाषांतरांचं विश्लेषण करून मला हे शोधून काढायचं होतं की अमुक एका काळात (वर्तमान, भूत वगैरे) वाक्य घडवताना क्रियापदानंतर लागणारा प्रत्यय हा कर्त्याच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलतो का. उदाहरणार्थ, मराठीतली पुढील दोन वाक्यं पहा-
१. मी (पुरुष) वाराणसीत गेलो.
२. मी (स्त्री) वाराणसीत गेले.

इथे कर्त्याच्या लिंगावरून 'त' या प्रत्ययाच्या पुढे 'ओ' लावायचा की 'ए' हे ठरतं.

मारवाडीतही (किमान त्या आजोबांच्या भाषावापरामध्ये तरी) कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापदाला लागणार्‍या प्रत्ययात फरक पडतो असं दिसून आलं. त्यांनी वरील वाक्यांची दिलेली भाषांतरं पुढीलप्रमाणे :
१.मा) मे (पुरुष) वाराणसीमे गयो.
२.मा) मे (स्त्री) वाराणसीमे ग.

त्याचप्रमाणे कर्त्याच्या वचनानुसारही प्रत्ययात फरक पडत होता.
३.मा) म्हा* (आम्ही) वाराणसीमे गया.
* - सगळे पुरुष की सगळ्या स्त्रिया की पुरुष + स्त्रिया हा प्रश्न मी इथे विचारायला हवा होता पण विचारला नाही.

परंतु कर्त्याच्या पुरुषाचा मात्र प्रत्ययावर काहीच परिणाम होत नव्हता.
४.मा) तू (पुरुष, द्वि.पु.) वाराणसीमे गयो.
५.मा) वो (पुरुष, तृ.पु.) वाराणसीमे गयो.

कर्त्याचा पुरुष कोणता हे फक्त सर्वनामावरूनच कळत होतं.

एका माणसाकडून एकदा घेतलेल्या भाषांतरांवरून त्या भाषेबद्दल सार्वत्रिक विधानं करता येत नाहीत हे तर झालंच. परंतु, कोणत्याही भाषेशी पहिल्यांदा परिचय झाला की भेटेल त्या व्यक्तीकडून अशा प्रकारे डेटा घेत रहायचा, आपल्याला सापडलेली वैशिष्ट्ये इतरांच्याही बोलण्यात दिसतायत का हे तपासून पहायचं आणि मग भाषेत भाषकाचं स्त्री किंवा पुरुष असणं, म्हातारं किंवा तरुण असणं, साक्षर किंवा निरक्षर असणं अशा गोष्टींनी त्याच्या भाषावापरात काही फरक पडतोय का हे तपासून पाहण्यासाठी अधिक पद्धतशीर प्रकारे डेटा गोळा करायचा अशी साधारण प्रक्रिया असते. पहिल्यांदा घेतलेल्या डेटाचा उद्देश हा चाचपणी आणि त्या भाषेवर नंतर काम करू इच्छिणार्‍या इतरांना उपयोगी पडेल अशी त्याची नोंद हा एवढाच उद्देश असतो. इथेही माझे हेच दोन उद्देश होते.

थोड्या वेळाने आजोबांना आला कंटाळा आणि त्यांनी गाडी वळवली माझी चौकशी करण्याकडे. 'तुम्ही ब्राह्मण की मराठा' हा प्रश्न या शब्दांत विचारून त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. यापूर्वी हा प्रश्न इतक्या स्पष्टपणे मला फक्त मराठी साहित्याच्या विभागातच विचारला गेला होता. यावर मी दिलेलं उत्तर त्यांच्या ओळखीचं न निघाल्याने पुढची सुमारे १५-२० मिनिटे 'ही जात नेमकी कोणती' या विषयावर त्यांनी आपल्या कुटुंबियांशी खल केला. त्यांचा खल संपण्याची लक्षणं दिसेनात तेव्हा मी माझी जात कोणत्या गटात (ओपन, ओबीसी, एसटी वगैरे) येते ते सांगून त्यांचे आत्मे शांत केले.

पण खरी मजा घडली ती पुढेच. 'एकटीच प्रवास करतेयस?' असा प्रश्न त्यांनी विचारल्यावर इतका वेळ हा सारा प्रकार तोंडातून अवाक्षरही न काढता शांतपणे पाहणार्‍या, माझ्या समोरच्या सीटवरच्या तरुणाकडे बोट दाखवून मी म्हटलं, "नाही, हा माझा मित्र आहे ना सोबत." झालं! आजोबांच्या चेहर्‍यावर 'शांतं पापं' असे भाव उमटले. "मित्र म्हणजे, आम्ही एकत्र काम करणार आहोत. काल प्रथमच भेट झाली आमची," असू म्हणून मी सावरून घ्यायचा प्रयत्न केला, तर घडलं उलटंच. एक तरुण मुलगी काही तासांच्या ओळखीच्या भांडवलावर एका तरुण मुलासोबत ३१ तासांचा रेल्वे प्रवास दुकट्याने करू शकते ही कल्पना पचवण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता.
आजोबा - म्हणजे? तुम्ही योगायोगाने भेटलात?
मी - नाही, आमच्या वरिष्ठांनी आमची तिकिटं एकत्र काढून दिली. आम्ही एकत्र प्रवास करणार हे आधीच ठरलं होतं.
'ठीक आहे ब्वा. तिच्या बॉसच्या संमतीने चालू आहे हे' हे लक्षात आल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर आलेला सुटकेचा भाव स्पष्टपणे दिसला.

नंतर दिवसभरात कुटुंबातल्या इतरांशीही मी गप्पा मारल्या आणि त्यांच्याकडूनही डेटा गोळा केला. 'मी वडा खाल्ला' अशाप्रकारच्या सकर्मक क्रियापदे वापरणार्‍या वाक्यांतल्या क्रियापदांना लागणारे प्रत्यय हे कर्त्याच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलतात, की कर्त्याच्या, की दोन्हींच्या या आणि इतर काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी हा अधिकचा डेटा गोळा करत होते. ही मारवाडी (आजोबा आणि त्यांचे कुटुंबीय लातूर, बीड या जिल्ह्यांतले होते, त्यामुळे आपण सध्या हिला लातूर-बीडची मारवाडी म्हणू) राजस्थानच्या मारवाडीपेक्षा वेगळी असावी असं माझं मत झालं. आजोबांनीही राजस्थानची मारवाडी आणि त्यांची मारवाडी यात काय फरक पडतो हे सांगण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. पण राजस्थान्यांना आमची आणि आम्हाला त्यांची मारवाडी बर्‍याचदा कळत नाही असं ते जेव्हा म्हणाले, तेव्हा तर या लातूर-बीडकडच्या मारवाडीचा अधिक अभ्यास करायला हवा या माझ्या मताला पुष्टीच मिळाली. आपल्याला बहुधा एका नव्याच भाषेचा 'शोध' लागलाय हे लक्षात येऊन मला जाम आनंद झाला.

आणि ते कुटुंब अलाहाबादला उतरायची तयारी करू लागलं, तेव्हा मला माझी एक अत्यंत आवडती गोष्ट करायला मिळाली. आम्ही भाषावैज्ञानिक फील्डवर्कला जातो आणि लोकांचा भरपूर वेळ खाऊन त्यांच्याकडून त्यांच्या भाषेबद्दल माहिती घेतो. पण दरवेळी आम्ही त्यांना काही देऊ शकतोच असं नाही. भरपूर फंडिंग असलेल्या मोठ्या प्रकल्पांतच फक्त त्या त्या भाषांच्या भाषकांना त्यांनी वेळ दिल्याबद्दल आर्थिक किंवा एखाद्या वेगळ्या प्रकारचा मोबदला देणं परवडू शकतो. एरवी मात्र आम्ही भाषावैज्ञानिक फाटकेच असतो. अशा वेळी भाषाविचाराबद्दलची जाणीव, भाषाविज्ञानाचा परिचय, जमल्यास भाषाविज्ञानाचं जुजबी प्रशिक्षण किमान काही भाषकांना तरी देता यावं यासाठी माझे प्रयत्न असतात.

रेल्वेमध्ये माझ्याकडे फार वेळ उपलब्ध नव्हता. त्यामुळे सगळी बच्चेकंपनी माझ्याभोवती जमल्यावर मी त्यांना 'भाषाविज्ञान' या शब्दाची ओळख करून दिली. त्यांनी कुतुहलाने मी काय काम करते असं विचारल्यावर मी फ्रीलान्सिंग करते, म्हणजे काय करते, काय काय कामं करते हे शक्य तितक्या सोप्या शब्दांत सांगितलं (बच्चेकंपनी ६ ते १५ या वयोगटातली होती). माझ्या टिपणवहीतला, त्यांच्या आजोबा-काका-काकू-ताई-माई-आक्का अशा सगळ्यांकडून घेतलेला डेटा त्यांना दाखवला. त्यात मी वापरलेली आयपीए ही लिपी दाखवली, तिची माहिती दिली आणि तेवढ्या डेटावरून 'कर्त्याच्या लिंगवचनावरून क्रियापदाच्या प्रत्ययात फरक होतो' वगैरे निष्कर्ष मी कसे काढले ते थोडक्यात दाखवलं. अर्थात, लहान पोरांना ते समजेल अशी अपेक्षा नव्हतीच. १४-१५ वर्षे वयाच्या त्यांच्या तायांना मी हे सांगत होते. तायांना या प्रकारात फारच रस वाटला, एकीने आईला लगेच, 'बघ आई, लोक इंजिनियरिंग करतात ना तसं हेपण करता येतं' असं सांगितलं, तेव्हा घरातल्यांच्या 'डॉक्टर-इंजिनियर व्हायचं' या धाकाने ती त्रासलेली असणार हे मी लगेच ताडलं आणि भाषाविज्ञानाची व त्या मुलीची बाजू घेऊन तिच्या आईला अधिक माहिती दिली. त्यांनी आणखी रस दाखवल्यावर आंतरजालावरून या विषयावरची अधिक माहिती मिळवण्यासाठी काय सर्च टर्म्स वापरायच्या हेही त्यांना सांगितलं आणि लगोलग भाषाविज्ञानाच्या ऑलिंपियाडची जाहिरात करून त्याच्या प्रशिक्षणवर्गाचं आमंत्रणही देऊन टाकलं. त्यांचा उत्साह पाहून आणि त्यांना हे सगळं सांगायला मिळाल्यामुळे मला फारच समाधान झालं. आणि अलाहाबाद आल्यावर इशाला 'आता मी तुला माझ्यासोबत घेऊन जाते आणि माझी मदतनीस बनवते. आईला आणि आजोबांना जाऊ दे त्यांच्या वाटेने' वगैरे माफक चिडवत त्यांचा निरोप घेतला.
_______________________________________________________________________

वाराणसी स्थानकावर उतरून चमूतल्या इतरांशी भेट झाली तेव्हा माझ्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे, मी सोडता उरलेले सगळे बाप्ये असूनही त्यांच्याकडे माझ्याकडच्या सामानाहून खूप जास्त सामान होतं आणि ते त्यांनी अशा बॅगांतून आणलेलं की ते वाहून नेणं त्रासदायक होतं. माझं मात्र १२ दिवसांचं मुख्य सामान पाठीवरच्या दप्तरात भरलेलं होतं, खांद्याला अडकवलेल्या झोल्यात पाण्याची बाटली वगैरे अशा सतत लागणार्‍या वस्तू होत्या आणि गळ्यात लटकवलेल्या छोट्या स्लिंगबॅगमध्ये मोबाईल होता. त्यामुळे माझे दोन्ही हात पूर्णपणे रिकामे राहत होते आणि कमी सामान आणल्याने वाहून नेताना फारसा थकवाही जाणवत नव्हता. मनातल्या मनात मी स्वतःला शाबासकी दिली.

त्यानंतर लक्षात आलेली दुसरी गोष्ट म्हणजे फलाटावरची आणि पुलावरची गर्दी आणि आपण उत्तर प्रदेशात आलेलो आहोत याची पुन्हा नव्याने झालेली जाणीव. मग माझी सगळी शक्ती सतत आपण इतरांच्या सोबत आहोत ना, आपण एकट्या मागे राहत नाही आहोत ना हे याची खात्री करून घेण्यात गेला. त्या गडबडीत मी स्थानकाच्या इमारतीकडे नीट पाहिलंही नाही. सोबतच्या मित्राने त्याकडे माझं लक्ष वेधलं तेव्हा कळलं की स्थानकाची इमारत म्हणजे बाहेरून देऊळ्च वाटतं, तिचं स्थापत्य देवळासारखंच आहे.

वाराणसी स्थानकाची इमारत (हे छायाचित्र मी काढलेले नसून आंतरजालावरून घेतलेले आहे)

मग ऑटोरिक्षावाल्यांशी थोडी घासाघीस करून आम्ही या महाभंगार लॉजवर आलो. आता त्या नव्या गेस्ट हाऊसमध्ये स्थलांतर करून पुढचे बेत आखू.
______________________________________________________________________

पुढे काय झालं ते सांगण्याआधी या कहाणीतल्या पात्रांचा परिचय करून देते. मुळात वाराणसीत बोलल्या जाणार्‍या मराठीचा अभ्यास करण्याचा हा प्रकल्प ज्यांनी हाती घेतला व त्यातल्या एका फील्डवर्कसाठी (एक फील्डवर्क काही महिन्यांपूर्वी होऊन गेलं होतं) आमच्या गटाची नियुक्ती ज्यांनी केली ते गृहस्थ म्हणजे प्रकल्प सूत्रधार. आपण त्यांना प्र.सू. म्हणू. मला ज्या विषयावर पीएचडी करायची होती त्या विषयावर या प्र.सूं.नी काही वर्षांपूर्वीच पीएचडी करून ठेवल्याने मी आधीपासूनच त्यांच्यावर खार खाऊन होते (चांगल्या अर्थाने). प्रत्यक्ष फील्डवर्क सुरू होण्यापूर्वी दोन-अडीच महिने आमचं फील्डवर्कच्या प्रत्यक्ष आखणीसंबंधी बोलणं झालं होतं. पण वाराणसीला पोहोचल्याच्या दुसर्‍या दिवसापर्यंत त्यांच्याकडून मला प्रकल्पाची काहीच नीट माहिती मिळाली नव्हती. आधीच्या फील्डवर्कचा डेटा मिळाला नव्हता आणि आत्ताच्या फील्डवर्कमध्ये नेमकं काय काम करायचं आहे याचीही माहिती मिळाली नव्हती. भाषेबद्दल काहीच माहीत नसताना फील्डवर्कला जाण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नव्हती. त्यामुळे मला अगदीच अंधारात चाचपडत असल्यासारखं वाटत होतं. शिवाय, फील्डवर्कमध्ये नेमकं काय काम करायचं त्याची आखणी फील्डला जाण्यापूर्वी करून ठेवायची, भाषांतरित करून घ्यायच्या वाक्यांची यादी त्यानुसार आधीच बनवून ठेवायची आणि फील्डवर्कचा शक्य तितका वेळ हा तिथल्या लोकांशी बोलण्यात, त्यांच्याकडून डेटा घेण्यात घालवायचा अशी आत्तापर्यंतची सवय. त्यामुळे थोडा त्रास झाला.

गटात फील्डवर्कर म्हणून नियुक्त केलेले आम्ही एकूण सहा जण होतो. त्यातल्या तिघांना फील्डवर्कचा बर्‍यापैकी अनुभव होता. तर उरलेले तिघे नवखे होते. सुरवातीपासूनच आम्ही अनुभवी लोकांनी नवख्यांची शाळा घेणं सुरू केलं होतं. पहिल्या दिवशीच्या नाश्त्याला आम्ही अनुभवी लोकांनी नीट पोटभरीचे पदार्थ मागवले, तर नवख्यांनी इडली. लगेच 'फील्डवर्कला गेल्यावर खायला मिळेल तेव्हा पोटभर खाऊन घ्यायचं असतं, कारण पुढचं खाणं दिवसभरात होईल की नाही, झालं तर कधी होईल याची शाश्वती नसते' असं पहिलं ज्ञानामृत पाजलं. नवखे बिचारे घाबरून गेले.

या सहा जणांतली एक मी. फ्रीलान्सिंग लिंग्विस्ट म्हणून काम करणारी. मुळात भाषाविज्ञान हे कार्यक्षेत्र निवडणं हेच सर्वसामान्यांच्या पठडीच्या बाहेर आहे. पण त्यातही, भाषावैज्ञानिकांनी अ‍ॅकेडेमिशियन्सच्या परंपरेला जागून आपली अशी एक वेगळी उपपठडी तयार केली आहे. या उपपठडीच्याही एक किलोमीटर बाहेरून जाणारा माझा व्यवसाय. मला फील्डवर्क हा प्रकार मनापासून आवडतो. यापूर्वी मी बिहार येथे जाऊन तिथल्या मैथिली भाषेवर, मालवणात जाऊन मालवणी भाषे/बोलीवर जाऊन स्वतः काम केलं होतं, तर डहाणूला एका वारली पाड्यावर जाऊन वारली भाषेचं डेटा कलेक्शन करणार्‍या ज्युनियर्सना मार्गदर्शन करणं, गोव्यात जाऊन कोंकणीच्या बोलींतील वैविध्यावर काम करणार्‍या मैत्रिणीला मदत करणं असे प्रकार केले होते. फील्डवर्क या प्रकरणाचा मला शोध लागण्यापूर्वी मला बाहेरगावी प्रवास करण्याचा प्रचंड तिटकारा होता. कारण तोवर माझी प्रवासाची कल्पना नातेवाईकांसोबत होणार्‍या तीर्थयात्रा आणि केसरीसोबत होणार्‍या 'आम्ही दाखवू त्याच आणि तेवढ्याच जागा पहायच्या, ज्या जागा पहायला मिळतील त्या वेळापत्रकानुसार फटाफट पाहून मऊ गाद्यांच्या हाटलात परतायचं, स्थानिक माणसांपासून दोन हात दूर रहायचं, स्थानिक पदार्थ चाखून पहायची जोखीम मुळीच न घेता, घरचे, रोजचे पदार्थ खायचे' या छापाच्या टूर्सच्या अनुभवावर आधारलेली होती.

फील्डवर्क या प्रकाराने मला प्रवासाचा एक वेगळा मार्ग खुला करून दिला. कोणती ट्रेन घ्यायची, कोणकोणत्या ठिकाणी जायचं, तिथे कुठे किती दिवस रहायचं, तिथल्या कोणत्या जागा पहायच्या हे सगळं आपलं आपण ठरवून आपली एक कस्टमाईज्ड टूर आखायची. प्रत्यक्ष फील्डवर गेल्यावर आपलं काम कुठे कसं होतंय यानुसार वेळापत्रकात बदल करण्याची लवचिकता ठेवायची. तिथली सर्वसामान्य माणसं ज्या परिस्थितीत राहतात, तशाच परिस्थितीत रहायचं, त्यांच्या स्थानिक साधनांनी प्रवास करायचा, स्थानिक जेवण जेवायचं, तिथे घराघरात जाऊन त्यांची दारं ठोठावून त्यांना आपल्याला डेटा देण्याची विनंती करायची, मग त्यांचं जीवन पाहत, त्यांच्याशी गप्पा मारत, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करत डेटा मिळवायचा. बंद दारांआडच्या सूनांकडून, पोलिस स्टेशनच्या ओसरीवर पोट खाजवत बसलेल्या पोलिसाकडून, वाटेत लागलेल्या देवळाच्या पुजार्‍याकडून, ट्रेनमधल्य सहप्रवाशांकडून अशा भेटतील त्यांच्याकडून डेटा गोळा करायचा. मग रात्री त्याचं विश्लेषण करून आपापसात चर्चा करायची आणि दुसर्‍या दिवशीचा बेत आखायचा. फील्डवर्क आटपून वेळ उरलाच तर स्थानिक थेटरात जाऊन एखादा गर्दीकाढू पिक्चर पहायचा आणि त्यावर प्रेक्षक कुठे कशा प्रतिक्रिया देतायत ते पाहत बसायचं. आणखी वेळ गाठीशी असला, तर आसपासची आपल्याला हवी असलेली प्रेक्षणीय स्थळे पाहून घ्यायची. अशी सगळी चैन.

माझं पहिलं फील्डवर्क बिहारला झालं. तोपर्यंतच्या प्रवासाचा तिटकारा असल्याने मी तिथे गेले ती नाखुशीने आणि मला नालंदा पहायाला घेऊन जायचंच या बोलीवर. प्रत्यक्षात बिहारला गेल्यावर खूपच मजा आली, पण मी या प्रकाराच्या खरी प्रेमात पडले ती गटातल्या इतरांना आणि टुरिस्टांच्या गर्दीला मागे टाकून एकटीने नालंदा फिरले, तिथल्या दगडांवर हात ठेवून कसं असेल तेव्हाचं जग असा विचार करायचा प्रयत्न केला तेव्हा. तेव्हापासून मी फील्डवर्कचं काम मिळण्याची वाट पाहू लागले. फील्डवर गेले की मी एक वेगळी व्यक्ती असते. एरवी पाली, झुरळं, थोडंसं मातकट पाणी अशा गोष्टींवरून आकांडतांडव करणारी मी आंघोळीला पिवळ्या रंगाचं पाणी मिळालं तरी हू की चू करत नाही. इतर वेळी काहीशी अंतर्मुख स्वभावाची असणारी मी फिल्डवर गेल्यावर शक्य तितक्या लोकांना भेटते, त्यांना बोलतं करते, त्यांच्याशी भरभरून बोलते आणि मुख्य म्हणजे, वाद खूप कमी घालते, कारण तिथे जाऊन स्थानिक लोकांशी वाकड्यात शिरण्यात काहीच हशील नसतं.

त्यामुळे प्र.सूं.नी व्यवस्था नीट केली नसली, दुसर्‍या कोणत्याही मुलीची सोबत नसली आणि ३१ तासांचा रेल्वेप्रवास करावा लागणार असला, तरी मी या फील्डवर्कमध्ये भाग घ्यायला तयार झाले. पण त्यामागे हे एकच कारण नव्हे. या फील्डवर्कमध्ये भाग घेण्याची इच्छा अधिक प्रबळ करण्यासाठी दुसरं एक कारण होतं आणि ते म्हणजे- आमच्या गटातली आठवी व्यक्ती- एक ज्येष्ठ भाषावैज्ञानिक. ते आमच्या विभागातल्या एका प्राध्यापकांचे पी.एच.डी. गाईड असल्याने त्यांच्या (म्हणजे ज्ये. भा. वैं.च्या) पाठीमागे मी त्यांना 'माझे आजेसर' असं म्हणते. तर हे आजेसर म्हणजे या गटातली माझी ज्यांच्याशी आधीपासून ओळख होती अशी एकमेव व्यक्ती. मालवणच्या फील्डट्रीपला आम्ही एकत्र काम केलं होतं. मला त्यांची कार्यपद्धती तेव्हा फारच आवडली होती. मालवणच्या आमच्या संपूर्ण गटात आम्ही दोघेच भाषावैज्ञानिक असल्याने त्यांनी मला त्यांच्या पर्सनल असिस्टंटची कामगिरी दिली होती. अमुक प्रकारच्या शब्दांची यादी काढ. तमुक प्रकारच्या वाक्यांत कोणकोणते प्रत्यय वापरले जातायत त्याची यादी काढ अशी कामं ते मला देत. त्यामुळे मला डेटा नीट लक्षात राहिला होता आणि मुख्य म्हणजे त्यांची विचार आणि अभ्यास करण्याची पद्धत त्यांच्याचकडून शिकायला मिळाली होती. त्यामुळे ते वाराणसीला येणारेत हे ऐकल्यावर मी खूश होते.

मुख्य म्हणजे, एवढे ज्येष्ठ आणि नावाजलेले भाषावैज्ञानिक असूनही त्यांना आमच्यासारख्या फुटकळ विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला, चर्चा करायला आवडतं. वाराणसीत भेट झाल्यावर आधी आम्ही अमकीचा प्रबंध सबमिट झाला का (अमुका, घाबरू नकोस. त्यांनी तुझ्या प्रबंधाबद्दल काही विचारलं नाही आणि मी त्यांना काही सांगितलं नाही), तमक्याच्या संशोधनाचा चांगलाच समाचार घेणारा एक नवा पेपर प्रसिद्ध झालाय, ढमक्या प्रकल्पाचं पुढे काय झालं असं गॉसिप गॉसिप केलं. मग मी त्यांना रेल्वेत मिळालेल्या मारवाडी भाषेबद्दल सांगितलं. त्यांनाही 'शिकू' आणि 'आवडे' या शब्दांचा प्रयोग आश्चर्यकारक वाटला. आणि मग गप्पांची गाडी इतरत्र वळली.

सध्या एवढा पात्रपरिचय पुरे.
_______________________________________________________________

आत्तापर्यंत मी भाषाविज्ञान, डेटा कलेक्शन, फील्डवर्क यांबद्दल जे लिहिलं आहे, आणि यापुढे जे लिहिणार आहे त्याने भाषाविज्ञानाची एकच बाजू समोर येऊन वाचकांसमोर एकांगी चित्र उभं राहू शकतं. त्यामुळे या विषयावर इथे थोडं अधिक लिहिते.

भाषाविज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात भाषावैज्ञानिकांनी मुख्यत्वे फील्डवर्क केलं. तो काळ होता तो गोर्‍यांच्या आक्रमणामुळे आणि अतिक्रमणामुळे रेड इंडियन लोकांच्या जमाती लोप पावत जाण्याचा. त्यामुळे त्या त्या जमातीतली शेवटची व्यक्ती मरण्यापूर्वी तिच्या भाषेचा अभ्यास करून ती 'प्रिझर्व्ह' (माफ करा मला या नेमक्या अर्थच्छटेचा मराठी शब्द आत्ता या क्षणी सुचत नाहीये) करण्याचा प्रयत्न त्या काळच्या भाषावैज्ञानिकांनी चालवला होता. त्यात फील्डवर जाऊन डेटा कलेक्शन करणे आणि त्या भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करणे यावर मुख्य भर होता. परंतु प्रत्यक्षात भाषाविज्ञानाचा आवाका याहून खूप मोठा आहे.

भाषाविज्ञानाचा अभ्यासविषय आहे भाषा. त्यामुळे मानवेतर प्राणी आपापसांतल्या संवादासाठी जी प्रणाली वापरतात तिला भाषा म्हणता येईल का, येत असल्यास त्यांची भाषा आणि मानवांच्या भाषा यात काय फरक आहे इथपासून भाषाविचाराला सुरुवात होते आणि मेंदूचा भाषावापरातला सहभाग, सर्व मानवी भाषांतले सामाईक मुद्दे कोणते आणि या सामाईक मुद्द्यांच्या कोणत्या पैलूंत कसा फरक पडल्याने एक भाषा दुसर्‍या भाषेहून वेगळी ठरते (उदा. गुंतागुंत टाळून सोप्या भाषेत सांगायचं तर, वाक्यातले शब्द एकानंतर एक येणार म्हणजे काळाच्या अक्षावर एकरेषीय आणि एकदिशी (एकाच दिशेने जाणारे या अर्थाने मी आत्ता, आत्तापुरता घडवलेला शब्द) पद्धतीने येणार हा सर्व मानवी भाषांतला सामाईक मुद्दा झाला. पण काही भाषांमध्ये कर्त्यानंतर आधी क्रियापद येतं आणि मगच कर्म. तर काहींमध्ये कर्त्यानंतर कर्म आणि मग क्रियापद. असे कर्ता-कर्म-क्रियापद या त्रिकूटाच्या रचनेच्या ६ शक्यता हे या मुद्द्याचे सहा पैलू आहेत, ज्यांनुसार एक भाषा ही दुसर्‍या भाषेवर वेगळी ठरते. असे अनेक मुद्दे आणि त्यांचे अनेक पैलू आहेत.), भाषा आणि समाज यांच्यातला परस्परसंबंध, भाषावापरातून अभिव्यक्त होणारे दोन किंवा अधिक समाजांमधले सत्तासंबंध, भाषेत कालपरत्वे होत जाणारे बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भाषांच्या वंशावळी, भाषांतर, भाषाध्ययन, भाषाध्यापन अशा क्षेत्रांमध्ये भाषाविज्ञानाचे उपयोजन, विचारांची भाषा, विचार आणि भाषा यांतला परस्परसंबंध असे अनेक फाटे त्याला फुटत जाऊन भाषाविचार हा आपले अवघे भाषिक आणि सामाजिक आणि कॉग्निटिव्ह जग व्यापतो.

मानवी भाषांबद्दल सार्वत्रिक विधाने करण्यासाठी विविध भाषांतला डेटा घेऊन त्याचे विविध मुद्द्यांनुसार विश्लेषण करून दोन किंवा अधिक भाषांची त्या मुद्द्यांवर आधारित तुलना करणे हा एक मार्ग झाला. त्यासाठी फील्डवर्क हा काही मार्गांपैकीचा एक मार्ग. अर्थातच, इथे डेटा कलेक्शन आणि डेटाचे विश्लेषण या दोन क्रियांमध्ये सरळसरळ फरक केलेला आहे. आधी डेटा मिळवायचा, त्यावर आधारित विश्लेषण करून कच्चे सिद्धांत तयार करायचे, मग ते सिद्धांत तपासून पाहण्यासाठी गरजेनुसार अधिक डेटा घ्यायचा आणि त्याचं विश्लेषण करायचा, त्या कसोटीवर कच्चा सिद्धांत तरला, तर त्याला आणखी नवा डेटा आणि त्याचं विश्लेषण या कसोट्यांवर तपासायचं आणि नाही तरला तर तो कच्चा सिद्धांत मोडून आधीचा डेटा आणि नवा डेटा यांच्या एकत्रित विश्लेषणाच्या आधारे एक नवा कच्चा सिद्धांत तयार करायचा आणि त्याच्या कसोट्या घेत बसायचं.

उदाहरणार्थ- मी जर लातूर-बीडकडच्या मारवाडीभाषकांच्या मारवाडीचा अभ्यास करायला लातूरला गेले, तर मी तिथला एखादा भाषक पकडून रेल्वेतल्या आजोबांकडून भाषांतरित करून घेतलेली वाक्ये त्याच्याकडूनही भाषांतरित करून घेणार. हा झाला माझा सुरुवातीचा डेटा. आजोबांच्या डेटाचं जसं विश्लेषण केलं होतं तसंच विश्लेषण नव्या भाषकाच्या डेटाचं करणार. मग हे दोन्ही डेटासेट्स आणि दोन्हींवरची माझी विश्लेषणे एकमेकांशी ताडून पाहणार. त्यांतली साधर्म्ये आणि फरक दोन्हींची नोंद करणार. साधर्म्यांच्या आधारे या भाषेत अमुक एक गोष्ट घडते असा एक कच्चा सिद्धांत मांडणार. फरकांकडे पाहून हे फरक नेमके कशामुळे पडलेत- दोन्ही भाषकांच्या वयातल्या फरकामुळे, की त्यांच्या राहण्याच्या जागेतल्या फरकामुळे की त्यांच्या शिक्षणाच्या पातळीमुळे की आणखी कशामुळे हे शोधून काढायचे असा प्रश्न तयार करणार. मग साधर्म्याच्या आधारे मांडलेला कच्चा सिद्धांत आणि फरकाच्या आधारे तयार केलेला प्रश्न यांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करण्यासाठी त्याच भाषकाकडून अधिक डेटा घेणार आणि विविध वयोगटांचे, विविध ठिकाणी राहणारे, साक्षर आणि निरक्षर, स्त्री आणि पुरुष भाषक पकडून त्यांच्याकडून अधिक डेटा गोळा करत डेटा-विश्लेषण-आधीच्या विश्लेषणाशी तुलना-त्यावर आधारित कच्चा सिद्धांत आणि प्रश्न-त्यासाठी अधिक डेटा हे सुष्टचक्र जमेल आणि/किंवा लागेल तितका काळ चालू ठेवणार.

थोडक्यात काय, फील्डवर्क म्हणजे भाषाविज्ञानाचा एक छोटासा पण महत्त्वाचा कोपरा आहे.

भाषाविज्ञान या नवव्या पात्राचा एवढा परिचय तूर्तास पुरे.
__________________________________________________________

क्रमशः

या लेखाचा पुढचा भाग इथे वाचा.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्तच! वाचतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास' नावाचे आत्मचरित्रपर पुस्तक काशीचेच एक जुन्या पिढीतील मराठी विद्वान भाऊशास्त्री वझे (१८८८-१९५०च्या सुमारास केव्हातरी) ह्यांनी लिहिलेले Digital Library of India च्या संग्रहामध्ये उपलब्ध आहे. भाऊशास्त्रींचे आजोबा १८४५ च्या सुमारास परशुरामपंत प्रतिनिधि ह्यांची पत्नी रमाबाई हिच्या आश्रयाने काशीमध्ये राहण्यास आले तेव्हापासून हे कुटुंब काशीनिवासी होऊन गेले. ह्या पुस्तकामध्ये काशीच्या जडणघडणीमध्ये मराठी सरदार-धनिक इत्यादींचे कार्य, महाराष्ट्रीय साधुसंतांचा काशीशी आलेला संबंध, तसेच तेथे पिढीजात वास्तव्य केलेले पंडित, ज्योतिषी, वैद्य, पुराणिक आणि हरदास, मल्ल, संस्था आणि वर्तमानपत्रे अशा विषयांवर बरीच माहिती उपलब्ध आहे.

तुमच्या कामाला उपयुक्त अशी काही माहिती तेथे मिळते का ते पहावे असे सुचवितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच उपयुक्त माहिती आणि सुचवणी.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

आहा! एकच नंबर. बहुत धन्यवाद! पण त्या पुस्तकाचे स्पेलिंग इ. नेमके सांगावे ही विनंती, कारण ते तिथे आजिबात स्टँडर्डाईझ्ड नसते. चुकीच्या स्पेलिंगमुळे ते मिळणारही नाही.

तदुपरि- या विषयाशी संबंधित रोझालिंड ओ हॅनलॉन यांनी काही रोचक पेपर्स लिहिलेले आहेत. तेही जमल्यास पाहिले तर अतिउत्तम. बरीच माहिती मिळेल त्यांतून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

लेख आवडला, पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे. माझ्या नातेवाईकांपैकी काही सिंधी, काही मारवाडी आहेत (आत्याचा नवरा, मामेभावाची बायको इ.). त्यांची भाषा ऐकताना मराठी-गुजराती-हिंदीशी तुलना होत असते (उदा. सिंधीतलं मराठीसारखंच 'आहे' हे क्रियापद); त्यामुळे हा विषय विशेष आवडीचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख बहुत म्हणजे बहुतच आवडला, पुढील भागाच्या आतुरतेने प्रतीक्षेत. जिव्हाळ्याचा विषय असल्याने आय कॅन टोटली रिलेट टु सम पार्ट ऑफ धिस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास' हे पुस्तक मी archive.org येथे अपलोड केले असून ते येथे मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप खूप धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

वा, बहुत धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त.

पुढच्या भागांची वाट पाहत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पात्रपरीचयामुळे खुमारी वाढली. वाचते आहे. आवडत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखनातून अभ्यासाचा मानवी चेहरा पुढे येेतो आहे. त्यामुळे लिखाण आकर्षक झालेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रचंड आवडला हा भाग. पु. भा. प्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखन प्र चं ड आवडले!

बर्‍याच वाक्यावर "वाह!" असे तोंडून निघाले.

फील्डवर्क या प्रकाराने मला प्रवासाचा एक वेगळा मार्ग खुला करून दिला. कोणती ट्रेन घ्यायची, कोणकोणत्या ठिकाणी जायचं, तिथे कुठे किती दिवस रहायचं, तिथल्या कोणत्या जागा पहायच्या हे सगळं आपलं आपण ठरवून आपली एक कस्टमाईज्ड टूर आखायची.

हे असे फिरणे नुसते लोभसवाणे वगैरेच नसते किंवा ते नुसते छान वा हवेहवेसे न्सते तर त्याचा आपला एक कैफ असतो, बेफाम आणि बेहद्द अशी नशा असते.
एक कधीही सुटू नये असे वाटायला लावणारे व्यसन!

खूब रंगलेला लेख!
पुढिल भागाची वाट पाहतोय

===

आधीचा लेख तांत्रिक कारणाने गंडूनही पुन्हा चिकाटीने टंकल्याबद्दल आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॉडकास्ट वरून जया राव त्यांच्या बोली भाषेतील तज्ज्ञांना बोलते करतात. त्यातील एका भागात या बोलीचे बिहार मधे झालेले भोजपुरी पण वगैरे चर्चा रंगतदार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माहीत नव्हते धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

माजा अस्तित्वा भाग १५

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुनश्च धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

खूप आवडला लेख. वेगळाच विषय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

झकास!

तिचं प्रत्येक उत्तर आणि तिच्या उच्चारातले बारकावे मी माझ्याकडच्या टिपणवहीत टिपत होते

त्यापेक्षा रेकॉर्ड का करून ठेवत नाही? मग शांतपणे पुन्हा ऐकून टिपणे काढावीत (हा आगाऊ सल्ला!) Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सल्ल्याबद्दल आभार. आम्ही शक्यतो हेच करतो. पण यात काही व्यावहारिक अडचणी असतात. नव्या इन्फॉर्मंटला (डेटा देणार्‍या व्यक्तीला आम्ही 'इन्फॉर्मंट' असं म्हणतो) आम्ही त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड करणार असं सुरुवातीलाच सांगितलं तर ते बर्‍याचदा बुजतात. हे सगळं कायमचं रेकॉर्ड होणार आहे या कल्पनेने 'शुद्ध' बोलायचं त्यांच्यावरचं दडपण वाढतं. त्यामुळे आधी त्यांना कंफर्टेबल वाटेल असं वातावरण तयार करावं लागतं. मग एक विश्वास निर्माण झाला की रेकॉर्डर बाहेर काढतो. ही प्रक्रिया अर्थातच परिस्थितीनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार बदलावी लागते.

त्यात आम्ही होतो ट्रेनमध्ये आणि माझ्याकडे चांगला रेकॉर्डर नव्हता. ट्रेनमधली मुलं जरा खुलून बोलू लागल्यावर 'तुम्ही मला मारवाडीतून एखादी गोष्ट सांगणार का? ती मी रेकॉर्ड केली तर चालेल का?' असं विचारून दोन्हींवर होकारार्थी उत्तर मिळाल्यावर माझ्या नव्या स्मार्टफोनचा रेकॉर्डर वापरून त्यांच्या गोष्टी रेकॉर्ड केल्या. पण दुर्दैवाने ट्रेनचा आवाज, मुलांचा दबलेला आवाज, रेकॉर्डरचा कमी दर्जा यांमुळे ती रेकॉर्डिंग्ज चांगली झालेली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

टिपणे काढण्यासाठी केवळ रेकॉर्डिंगवर विसंबून राहण्यात मोठा धोका असतो. आवाजातले काही महत्त्वाचे बारकावे रेकॉर्डरमध्ये पकडले जात नाहीत. काही बारकावे विकृत स्वरुपात ऐकावे लागतात. त्यामुळे आदर्श पद्धत ही आहे, की डेटा घेताना एकीकडे रेकॉर्डिंग करायचं, दुसरीकडे पटापट टिपणे काढायची आणि नंतर इन्फॉर्मंट सोबत नसताना पुन्हा रेकॉर्डिंग बारकाईने ऐकून अधिकच्या टिपणांची भर घालायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भटकंती दरम्यानच्या चित्र विचीत्र (समस्या आणि) अनुभवांबद्दल केव्हातरी धागा काढणार होतो. आपल्या धाग्यातील उल्लेखाचे निमीत्त साधून या धाग्यात आपल्या अनुभवांची दखल घेत मिपावर भारतातील प्रवासात येणारे लॉजींगचे चित्र विचीत्र अनुभव हा स्वतंत्र धागा काढला.

आपली हि लेखमाला वाचनीय होते आहे त्यासाठी धन्यवाद. आपण आपल्या सोबतच्या इतर भाषा अभ्यासकांसाठी ऐसीवर कसे लिहावे याची सुद्धा कार्यशाळा घ्यावी हि आमची स्वार्थी विनंती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माझ्या लेखाचा उल्लेख तुम्ही तुमच्या एका लेखात केलात याची सूचना इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

बाकी,

आपण आपल्या सोबतच्या इतर भाषा अभ्यासकांसाठी ऐसीवर कसे लिहावे याची सुद्धा कार्यशाळा घ्यावी हि आमची स्वार्थी विनंती आहे.

कसचं, कसचं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

'प्रिझर्व्ह' म्हणजे 'जतन करुन ठेवणे' असाच अर्थ तुम्हाला अपेक्षीत आहे की काही वेगळा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्रिझर्व्ह' म्हणजे 'जतन करुन ठेवणे

मलाही असे वाटतेय परंतु भाषावैज्ञानीक मंडळी जे करताहेत ते 'प्रिझर्व्ह' या शब्दातच मोडते का अर्काईव्हींगमध्ये मोडते अशी मला नेहमी साशंकता वाटते. 'प्रिझर्व्ह' / 'जतन करुन ठेवणे मध्ये वृद्धी नाही झाली तरी आहे ते जतन करण्यात हातभार असा होतो. भाषावैज्ञानीक मंडळी स्वतःचा अभ्यासकरून भविष्यातील अभ्यासासाठी अर्काईव्हींग करत असावेत कारण 'प्रिझर्व्ह' / 'जतन करुन ठेवणे मध्ये संबंधीत भाषा वापरकर्त्या गटाला काही भाषिक मदत व्हावयास हवी तसे घडत असेल असे वाटत नाहीए. राधिकातैंना एवढा छान लेख लिहून हे असे खुसपट का असे वाटेल पण ज्याचा संबंधीत समाजाला उपयोग होण्याची शक्यता कमीच असेल जे ज्ञान कुठलाशा बंद फडताळांमध्ये अडकून राहणार त्याला उत्खनन आणि अर्काईव्हींग असे शब्द जास्त चांगले असावेत हि टिका केवळ लेखिकेवर म्हणून नाही भाषा विषयाच्या अभ्यासकांवर आहे. (हि माझी मनमोकळी टिका आहे ह. घ्या. हि लेखिकेस आणि इतर सर्वांना विनंती)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.