स्वीकार

स्वीकार
तसं ४०-५० उंबरठ्यांचं गाव. फार मोठंही नाही आणि नावाजलेलंही नाही. आज गावासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या गावातील एक मुलगा शहरात जाऊन रितसर शिक्षण घेऊन गावात परत येणार आहे. गावातील तो पहिलाच मुलगा आहे जो शहरात एवढं शिक्षण घेऊन गावात परतणार आहे आणि त्यामुळे गावाला त्या मुलाचं फार कौतुक वाटतंय. गावातील वृद्ध व्यक्तिंना बर्याच वर्षांपूर्वीची गावभर दुडूदुडू धावणारी त्या मुलाची लहान पावलं आठवत आहेत. आईवडिलांना आणि भावा-बहिणींना तर आज अभिमान वाटावा असं काही घडणार आहे. ज्याची गाव उत्सुकतेने वाट पाहत होतं त्या मुलाचं गावात आगमन होतं. पण आता तो लहान राहिला नसून तरुण झालाय. कोण आनंद होतो गावाला. अख्खं गाव त्याचा सत्कार करतो, स्वागत करतो. सुटाबुटातल्या त्या तरुणाला पाहून आईवडिलांना तर प्रश्नच पडतो की हा तोच आपला मुलगा आहे की आणखीन कुणी निराळा? त्यांचे डोळे भरून येतात. एखाद्या गावात जत्रा भरल्यावर कसं वातावरण असतं जणू काही तसंच आज वातावरण गावात आढळून येत होतं. शहरातून आलेल्या त्या मुलालादेखील हे असं जंगी स्वागत झाल्यावर खूप आनंद होतो. पुढचे काही दिवस असेच जल्लोष करण्यात जातात.

एक दिवस वडील मुलाला विचारतात, ‘एवढा शिकलास तू आणि शिकून परत गावात आलास, एकप्रकारे चांगलंच केलंस, पण आता तू या गावात काय करणार आहेस?’ मुलाला गावाचा विकास करायचा आहे आणि त्यासाठीच तो परत गावात आला आहे असं जेव्हा वडिलांना स्वतःच्या प्रश्नाला अनुसरून आलेल्या उत्तरातून कळतं तेव्हा वडिलांना आश्चर्य वाटतं. या गावात विकास करण्यासारखं काय आहे? आणि विकास म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? असे अनेक प्रश्न ते मुलासमोर मांडतात. मुलगा उत्तर देतो, ‘बाबा, मी नक्की काय काय करणार आहे ते मलादेखील आता नीटसं सांगता नाही येणार पण सुरुवात कुठून करायची आहे हे मात्र माझं नक्की ठरलेलं आहे.’ वडील म्हणतात, ‘बोल… तुला काय मदत हवी आहे? अख्खं गाव तुझ्याबरोबर आहे.’ त्यावर मुलगा थोडंसं हसून म्हणतो, ‘बाबा, मला लहानपणापासून आपल्या गावाच्या वेशीवर असलेल्या त्या भुताच्या वाड्याबद्दल खूप उत्सुकता आहे. मला मान्य आहे की त्या वाड्याबद्दल अनेक कहाण्या आहेत. कुणी म्हणतं की त्या वाड्यात पिशाच्च आहे किंवा तो वाडा भुताने झपाटलेला आहे. कुणी म्हणतं की बर्याच वर्षांपूर्वी त्या वाड्यात राहत असलेल्या जमिनदाराचा आणि त्याच्या कुटुंबाचा वाड्याला लागलेल्या आगीत जळून दुर्दैवी अंत झाला होता आणि आता त्या सगळ्यांचे आत्मे तिथे राहतात. अंधार पडल्यावर रोज ते आत्मे बाहेर येतात आणि त्यामुळेच त्या वाड्याकडे कुणी फिरकतदेखील नाही. जर कुणी त्या वाड्याकडे चुकून गेलंच तर त्या व्यक्तिचा आणि कुटुंबाचा सर्वनाश होतो. अशा अनेक कथा आहेत त्या वाड्याबद्दल. मला तो वाडा गावकर्यांसाठी, गावाच्या विकासासाठी वापरात आणायचा आहे.’ मुलाचं हे उत्तर ऐकून वडिलांना प्रचंड घाम फुटतो. ते खूप घाबरतात. आपला मुलगा हे असं काही बोलेल याची त्यांना कल्पनाच नसते. आधी वडील आणि नंतर कुटुंबातील प्रत्येकजण मुलाला प्रचंड विरोध करतात. हळूहळू ही बातमी गावभर पसरते. पूर्ण गाव त्या मुलाच्या या निर्णयाला विरोध करतं. काही जण तर त्याला वेड्यात काढतात. त्या मुलाचे लहानपणीचे मित्र त्याला समजवण्याचा प्रयत्नही करतात. ‘अरे पण का?, कशासाठी?, कशाला विषाची परीक्षा घेतो? आणि असं त्या वाड्याचं नक्की काय तू करणार आहेस?, काय उपयोग आहे त्या वाड्याचा?’ अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार त्या मुलावर होतो ज्यांची उत्तरं निदान, सद्य परिस्थितीत, तरी त्याच्याकडे नसतात.

सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता तो मुलगा त्या गावाच्या वेशीवर असलेल्या वाड्यात आपलं बस्तान मांडतो. हा सगळा प्रकार तो शहरात असलेल्या आपल्या प्रेयसीला कळवतो. त्याला पाठिंबा देण्यासाठी ती स्वतः त्या गावात येते आणि त्याच्याबरोबर त्या वाड्यात राहू लागते. पूर्ण वाड्याची साफसफाई आणि मोजकी डागडुजी ते आधी करतात. पुढे जाऊन ते एका मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने लग्न करतात आणि त्यांच्या संसाराचा गाडा त्या भुताच्या वाड्यात सुरू होतो. हळूहळू त्या वाड्याचं स्वरूप बदलू लागतं. रंगरंगोटी होते, नवीन लाकडी सामान वाड्यात येतं. वाडा इतका चमकू लागतो की तो गावकर्यांच्या नजरेतून सुटण्याची शक्यता कमी होते. त्या मुलाच्या मित्रमंडळींचं आणि कुटुंबाचं त्या वाड्याबद्दलचं मत हळूहळू बदलू लागतं. गावकर्यांनादेखील त्या वाड्याबद्दल विश्वास वाटू लागतो. सगळ्यांची भीती हळूहळू कमी होऊ लागते. त्याचवेळी त्या वाड्यात एक लहान बाळ जन्माला येतं. पुढे काही दिवस चांगले जातात. पण एक दिवस ते बाळ आजारी पडतं आणि त्या आजारपणातच ते दगावतं. पुन्हा गावामध्ये भीतीचं सावट निर्माण होतं. भूतपिशाच्चामुळेच त्या बाळाचा मृत्यू झाला असा समज गावकर्यांचा होतो. त्यातच योगायोग म्हणा किंवा दुर्दैव म्हणा इकडे गावामध्ये त्या मृत बाळाच्या आजोबांचादेखील मृत्यू होतो. जरी मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला असला तरी त्याचा थेट संबंध गावकरी त्या वाड्याशी जोडतात. पुन्हा सगळी परिस्थिती पूर्वपदावर येते. पण ते जोडपं हार मानत नाही.

काही वर्षांनी पुन्हा त्या जोडप्याला पुत्रप्राप्ती होते. ते लहान मूल थोडंसं मोठं होतं. आता तर ते त्याच्या वडिलांना वाड्यामागच्या आधुनिक शेतीमध्ये मदतही करू लागतं. अख्ख्या गावाने त्या तिघांना वाळीत टाकल्यामुळे त्या लहान मुलाला खेळण्यासाठी कुणी जोडीदार नसतो. त्यामुळे त्याला शेतीचं काम हाच एक खेळण्याचा प्रकार आहे असं वाटत असतं. त्याचवेळी इकडे गावात त्या लहान मुलाच्या वयाच्या बरोबरीची पिढी जन्माला आलेली असते. हळूहळू का होईना पण पुन्हा, नवीन पिढीच्या माध्यमातून का होईना, त्या वाड्याबद्दल गावकर्यांमध्ये विश्वास वाढू लागतो. योगायोग म्हणा किंवा सुदैव म्हणा पण पुढे मात्र काहीही अघटित घडत नाही. सगळं सुरळीत होतं. धिम्या गतीने का होईना पण गावकर्यांच्या विचारसरणीत सुधारणा होऊ लागते. गावकर्यांचं त्या वाड्यातलं येणं-जाणंही वाढतं.

एकेदिवशी त्या वाड्यात राहणार्या त्या कुटुंबाकडून गावकर्यांसमोर एक प्रस्ताव ठेवण्यात येतो. ते कुटुंब म्हणतं की आमचं मत आहे की हा वाडा गावाच्या वेशीवर असल्यामुळे म्हणजेच शहरापासून त्यामानाने जवळ असल्यामुळे या वाड्याचा एक माध्यम म्हणून उपयोग व्हावा. गावातली थोडीफार शिकलेली जी काही ४-५ मुलं आहेत, त्यांना या वाड्यात एक कचेरी किंवा कार्यालय उघडून देऊया. तुमची शहराशी निगडित जी काही कामं आहेत त्याची नोंद या कचेरीत होईल. तुम्हा सगळ्यांच्या कामाचं वर्गीकरण करून या कार्यालयातील ही मुलं शहरात जाऊन तुमची सगळी कामं करतील. जेणेकरून तुम्हा सगळ्यांना आपापल्या शेतात पूर्ण वेळ देणं शक्य होईल. त्याबरोबरच आम्ही त्या मुलांना आधुनिक शेतीच्या निरनिराळ्या पद्धतींबद्दल माहिती देऊ. तुम्ही जेव्हा आपापली कामं त्या मुलांकडे घेऊन याल तेव्हा ते तुम्हाला आधुनिक शेतीबद्दल माहिती देतील. त्या कुटुंबाचा हा प्रस्ताव गावकरी एकमुखाने मान्य करतात. पुढे जाऊन तो वाडा गावकर्यांसाठी अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतो. गावात काही छोटे-मोठे तंटे-भांडणं झाली तर त्या वाड्यावर पंचायत बोलावून त्याचं निराकरण केलं जाऊ लागतं. एक छोटीशी शाळादेखील तिथे सुरू होते. पुढच्या काळात अनेक विकासाच्या कामांची निर्मिती वेगवेगळ्या योजनांच्या रूपात त्या वाड्यावर होते.

पुढे जाऊन तर एक दिवस सगळे गावकरी त्या वाड्यात जन्मलेल्या मुलाची गावाचा प्रमुख म्हणून नियुक्ती करतात. परंतु तो दिवस बघण्यासाठी त्याचे आईवडील त्यावेळी हयात नसतात. ते पूर्ण गावाचा, हळूहळू का होईना, झालेला विकास उघड्या डोळ्यांनी बघू शकले नाहीत याचं दुःख अख्ख्या गावाला होत असतं. परंतु ज्यांनी विकासाच्या कामाचा पाया रचला, ज्यांनी चारही बाजूने होणार्या विरोधाला नेटाने तोंड दिलं,

ज्यांनी आपलं अर्ध्यापेक्षा अधिक आयुष्य गावाच्या कल्याणासाठी वेचलं ते जरी स्वतः आज हयात नसले तरी त्यांच्या एकूणच कामातून/कार्यातून ते कायमचेच अजरामर झाले होते.

वरील कथेचा मूळ गाभा आहे स्वीकार/स्वीकारणं (Accept / Acceptance). जी बाब आपली आहे, मग ती निर्जीव असो वा सजीव, तिचा पूर्णपणे स्वीकार करणं. पूर्णपणे स्वीकारणं म्हणजेच ती बाब जशी आहे, तशीच्या तशी स्वीकारणं (न कमी ना जास्त म्हणजेच आपल्या सोयीनुसार किंवा सोयीपुरतं हवं तेवढं स्वीकारू किंवा नाकारू नये). पण त्याचवेळी पूर्णपणे स्वीकार करताना ‘स्वीकार करणं’ आणि ‘सहन करणं’ यात गल्लत तर होणार नाही ना याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जी बाब (निर्जीव/सजीव) आपली आहे तिला सर्व गुण-दोषांसकट आपलं मानणं म्हणजेच Accept (स्वीकार) करणं होय.

वरील कथेमध्ये त्या मुलाने तो वाडा किंवा ती वास्तू ही आपल्या गावातील आहे, म्हणजेच ती आपली आहे असं मानून त्या वास्तुचा सर्वप्रथम पूर्णपणे स्वीकार केला. आपल्याच गावातील एक वास्तू आपल्याच लोकांसाठी निरुपयोगी आहे या गोष्टीचं त्याला वाईट वाटत होतं. एखादी बाब काही जणांसाठी निरुपयोगी असू शकते. पण प्रत्यक्षात जगात कुठलीच बाब कधीच निरुपयोगी नसते. त्यातून ती बाब जर आपली/जवळची असेल तर तिचा स्वीकार करून तिची उपयोगिता सिद्ध करणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे. तो वाडा किंवा ती वास्तू काही कारणास्तव गावकर्यांसाठी निरुपयोगी बनली होती. पण त्या वास्तूचा त्या मुलाने आधी स्वीकार केला, त्याला आपलं मानलं आणि त्यानंतर त्या वास्तुची उपयुक्तता सिद्ध केली. यावरून स्पष्ट होतं की मुळातच कुणीही कधीही निरुपयोगी (Useless) नसतं. सुरुवातीच्या काळात गावकर्यांनी त्या मुलाला विचारलं होतं की त्या वाड्याचा काय उपयोग आहे? त्या वेळेस त्या मुलाकडे काहीही उत्तर नव्हतं. कारण जोपर्यंत विचारांचं प्रत्यक्ष कृतिमध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत एखाद्याची उपयुक्तता काय आहे हे सांगणं अवघड असतं. म्हणजेच केवळ मनापासून स्वीकार करून पुरेसं नाही तर त्याचबरोबर निर्भयपणे आणि पूर्ण विचारांती त्याचं कृतिमध्ये यशस्वीरित्या रूपांतर करणं किंवा रूपांतरित होण्यासाठी निरंतर प्रयत्न करणं हेही तितकंच गरजेचं आहे. वरील कथेतून आणखीन एक मुद्दा समोर येतो की एखाद्या बाबीची उपयुक्तता सिद्ध करताना सहजासहजी यश मिळत नाही. त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. ही एक संयमाची कठोर परीक्षाच असते.

जे आपलं आहे त्याला कधीही टाळू नये आणि सहनही करू नये, याउलट जे आपलं आहे त्याचा नेहमीच निर्भयपणे आणि आनंदाने स्वीकार करावा.

शिरीष फडकेकलमनामा – २२/०९/२०१४ – लेख ४ – स्वीकार

field_vote: 
0
No votes yet