मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...भाग १

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...भाग १

मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मघांची तलम झालरही होती. स्वर्गाच्या वेशीवरून उधळलेल्या ताऱ्यांची रुपेरी ओंझळ सुद्धा मला या छताकडून भेटीदाखल मिळत होती....”

मैत्रीचे कसे असते पहा. नेहमी प्रत्यक्ष भेटले पाहिजे असे नाही. ना ओळख ना पाळख. एके सकासकाळी मी प्रवासात असताना मोबाईल खणाणला. ‘मी अरूण, दिल्लीतील शरद सोवनीचा मित्र. खूप वर्षापुर्वी 1979 साली श्रीनगरला घरी भेटायला आलो होतो. पण न भेट होऊन परतलो. आता 2015 सालापर्यंत मी तुम्हाला गेले कित्येक वर्षे शोधतोय. आज तुमचा फोन मिळाला. म्हणून हा संपर्क’...
‘बर, पण तू शरदचा मित्र ना? मग ‘तुम्ही’ काय सरळ तू म्हण मित्रा! म्हणून मी त्याची भीड चेपली अन् अरे-तुरे वर आलो, झाले, त्यानंतर काही ईमेल झाल्या, त्याच्या सायकलबाजीबद्दल कळले. पुन्हा भेटायचे ठरले पण मुहुर्त साधेना. तो क्षण नेमका शरदच्या चिरंजीवाच्या विवाहेच्या निमित्ताने आला. तोही असा की 10-15 मिनिटांचा... नव्या मुंबईतील महापे मिलेनियम पार्कमधील रमाडा हॉटेलात सुंदर विवाह सोहळा व नंतरचे विविध खाद्य पदार्थांनी सजलेले स्वरुची भोज संपत आले. मी शरदला विचारले, ‘अरे तो तुझा सायकलवाला मित्र अजून दिसला नाही?
‘अरे तो काय नुकताच आलाय’. एका सूट परिधान केलेल्या, फ्रेंचकट दाढीतील स्मार्ट व्यक्तीने ‘मी अरूण’ म्हणून हस्तांदोलनातून प्रत्यक्ष भेटीचा आनंद सामावला... ! पुढील 15 -20 मिनिटात त्याच्या गाडीतून वाशीला पुण्याची बस पकडायला उतरलो. तोवर त्याने आगत्याने सायकल सफरचे 400पानी सुबक पुस्तक सप्रेम भेट देण्याने माझ्या अनुभव विश्वाला पुन्हा श्रीनगरातील आठवणीत डुंबायला प्रेरित केले... त्या पुस्तकातील अनुभवांची संक्षिप्त ओळख नंतर करून द्यावी याची ही आगामी तुतारी...
सुरवातीला सफरवाचकांशी संवाद साधताना मयूरडौलात मराठीभाषेशी लडिवाळ साधत अरूण म्हणतो,
“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मघांची तलम झालरही होती. स्वर्गाच्या वेशीवरून उधळलेल्या ताऱ्यांची रुपेरी ओंझळ सुद्धा मला या छताकडून भेटीदाखल मिळत होती....”

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet