नासिक लेणी (पांडवलेणी)

सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेन
सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.

नासिक हे माझे आजोळ असल्याने पांडवलेणी तशी असंख्य वेळा बघितली होतीच, पण तिचे महत्व मात्र माहित नव्हते. यावेळी ३ दिवस सुट्टी घेउन नासिकला जायचा उद्देशच होता की पांडवलेण्याची निवांत भेट. मामेभावाला घेऊन सकाळी ७ वाजताच पांडवलेणी पायथ्याला पोहोचलो. पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे. १५ मिनिटांची उत्तम पायर्‍या असणारी झाडीभरली चढण चढून पांडवलेण्यांपाशी पोहोचलो. मधून मधून मोरांची केकावली ऐकू येत होती.

१. पांडवलेणीकडे जाणारी झाडीभरली वाट

वास्तविक पांडवलेणीचा आणि पांडवांचा काहिही संबंध नाही. पांडवलेणी ही सातवाहन आणि क्षत्रप कालखंडात खोदली गेली. इथल्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच हे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले.

२. अशा स्वरूपाच्या काही शिल्पांमुळेच या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधले गेले.

पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पेम विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन.

३. नहपान विहाराचे प्रथमदर्शन

४ व ५.  गज, वृषभ, सिंहशिल्पे (पाठीमागील भिंतीवर क्षत्रपांचे शिलालेख दिसत आहेत)

इथे ओसरीतील स्तंभांवर पुढील बाजूस सिंह, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. पण खरी गंमत आहे ती स्तंभांच्या मागील बाजूस ओसरीतील भागात.

इथे वरच्या भागाकडे नीट निरखून पाहिले असता काहिशी वेगळी शिल्पे दिसतात. शिर गरूडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा. हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता.

६ व ७. ग्रिफिन

पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यचकित करणारे शिल्प सामोरे येते. हे शिल्प आहे मानवी शिर असणारे आणि शरीर मात्र सिंहाचे. तोच तो इजिप्तच्या पिरॅमिडजवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स.
स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्‍या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्‍यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते.

८,९, व १० स्फिंक्स

हे सर्व पाहून विहारात प्रवेश केला, हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. विहारातून बाहेर आलो, ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे.

११. नहपान विहाराचा अंतर्भाग.

आता पाहणार होतो ते गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेले ३ र्‍या क्रमाकांचे महाराष्ट्रातील कदाचित सर्वात महत्वाचे असे देवीलेणे. हे लेणे खोदवले आहे ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पौत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी याने. गौतमी बलश्री स्वतःला महादेवी म्हणवून घेत असे म्हणूनही हे देवीलेणे.

१२. देवीलेणीचे मुखदर्शन

इथल्याही स्तंभांवर ग्रिफिन, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथर्‍याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत  जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहात आहेत.

१३. लेणीचा भार वाहणारे यक्ष

१४.

इथेही ओसरीतल्या भिंतीवर गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो.

गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नासिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नासिक जवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला त्याचे शिलालेख या लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत.हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले. म्हणूनच उएथील शिलालेखात त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता.
त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'असा गौरवपूर्वक उल्लेख केला येथे केला गेला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात, उत्तर,दक्षिण मोहिमआंमध्ये गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असेही म्हटले गेले आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदम' असेही येथे म्हटले आहे.

१५. गौतमी बलश्रीचा शिलालेख

गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री येथील शिलालेखात आपल्या पुत्राचे मोठे लोभस वर्णन करते-
गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.

वरील शिलालेख गौतमीपुत्राच्या मृत्युंनतर गौतमी बलश्रीच्या वृद्धपणी गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुवामीकडून तिने खोदवून घेतला आहे.

१६. गौतमीपुत्राने पाडलेले अस्सल चांदीचे नाणे जे त्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकते. (विकिपेडीयावरून साभार)

याच शिलालेखांखाली गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे.
हा एक शिल्पपटच आहे.
या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे.

१७ व १८.
 

१९ व २०
 

२० व २१ . शिल्पपटाचे संपूर्ण दर्शन

हे सर्व डोळ्यांत भरून पाहातच विहाराच्या आतमध्ये गेलो. हाही एक प्रशस्त विहार. याच्या आत काही कक्ष असून समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तूपाच्या दोन्ही बाजूस स्त्री प्रतिमा कोरलेल्या आहेत. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वर गंधर्व विहार करताना दाखवले आहेत.

२२. देवीलेणीचा अंतर्भाग

विहारातील स्तूपाची रचना

हे सर्व पाहातच बाहेर आलो व आजूबाजूची लेणी पाहायला लागलो.

क्रमशः

हा भाग प्रवासवर्णन आणि इतिहास यांची नीटशी सांगड घालता न आल्यामुळे  विस्कळीत झाला आहे तरी आपण तो गोड मानून घ्यावा. पुढील भागात पांडवलेण्यातील इतर लेण्यांचे फक्त फोटो व थोडेसेच वर्णन टाकेन.

संदर्भ पुस्तके:
लिटररी अ‍ॅन्ड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडोलोजी -वा. वि. मिराशी'
सार्थवाह-मोतीचंद्र,
सातवाहनास अ‍ॅन्ड वेस्टर्न क्षत्रप्स् - अजय शास्त्री,
महाराष्ट्राची कुळकथा - मधुकर ढवळीकर,
सातवाहनकालीन महाराष्ट्र- रा. श्री. मोरवंचीकर

मिपावर पूर्वप्रकाशित, येथे किरकोळ बदल करून इतर सदस्यांच्या माहितीसाठी परत प्रकाशित करत आहे. धोरणात बसत नसल्यास उडवला तरी चालेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पांडवलेण्याची सचित्र सहल आवडली. पांडवलेण्याला अनेकदा गेलेलो आहे. त्या डोंगराच्या शिखरावरही जाऊन आलो आहे पण पांडव लेण्यांचा इतिहास माहीत करून घेण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. या लेखाच्या निमित्ताने आयतीच माहिती मिळाली. धन्यवाद.

गुगल बुक्सवर 'द केव टेम्पल्स ऑफ इंडिया' हे पुस्तक मिळाले. त्यात काही इतिहासाबरोबरच सुरेख रेखाटनेही आहेत. तुमच्या संदर्भसूचीत हे पुस्तक न आढळल्याने खाली देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0