शून्य दिवसानंतर आठ वर्षं दहा महिने आणि एकोणतीस दिवसांनी

शून्य दिवसानंतर आठ वर्षं दहा महिने आणि एकोणतीस दिवसांनी

- राजेश घासकडवी

***
.
अनेक वर्षांपूर्वीचा एक दिवस. याला आपण शून्य दिवस म्हणू.

.
शून्य दिवस

मी तिला 'मुक्काम शेंडेनक्षत्र'मधला एक भाग वाचून दाखवत होतो.

"या तीन तऱ्हेच्या वक्राकृती म्हणजे धूमकेतूंचे संभाव्य मार्ग होत. काही धूमकेतूंची कक्षा हायपरबोल्यासारखी असते; काहींची पॅराबोलासारखी असते; तर काहींची लंबवर्तुळाकृती. यापैकी पहिल्या दोन पद्धतींनी जर धूमकेतू फिरत असेल तर पृथ्वीवरच्या लोकांना त्याचं एकदाच दर्शन घडेल आणि अवकाशाच्या पोकळीत तो गडप होईल. पण तिसऱ्या जातीचे म्हणजे लंबवर्तुळाकार भ्रमण करणारे धूमकेतू आपल्याला ठरावीक काळाने पुन्हा पुन्हा दिसतात. कधी कधी त्यांचं आगमन आपल्याला थक्क करण्याइतकं वक्तशीर असतं."

मी वाचून दाखवल्यावर तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहेऱ्यावर अजूनही प्रश्नच होते.

"मला नीट कळलं नाही. हे हायपरबोला आणि पॅराबोला म्हणजे नक्की काय?"

"हायपरबोला म्हणजे इथे लिहिलं आहे त्याप्रमाणे अपास्त, आणि पॅराबोला म्हणजे अन्वस्त."

"पण त्याने काहीच अर्थ कळत नाही. ते नुसते प्रतिशब्द आहेत."

आठवीतल्या मुलीला हायपरबोला आणि पॅराबोला कसे समजावून सांगावेत असा विचार करत मी डोकं खाजवलं.

.
वजा १ दिवस

मी माझ्या जानी दोस्ताकडे गेलो होतो. हा माझा शाळेतला वर्गमित्र. आता आम्ही दोघेही तेरावीत असल्यामुळे तशा भेटीगाठी फार होत नसत. नेहमीच्या गप्पाटप्पा झाल्यावर मी कामाचा विषय काढला.

"अरे, तुझं 'मुक्काम शेंडेनक्षत्र' घेऊन जाऊ का? दोनचार दिवसांसाठीच हवं आहे."

"हो, ने की. पण तुझं काय झालं?"

"माझं सापडत नाहीये."

"विद्यार्थी घासकडवी! उद्या पाचशे ओळी लिहून आण!" मुशेमधल्या प्रोफेसरांचा एक डायलॉग त्याने म्हणून दाखवला आणि गडगडाटी हसला. मी कसनुसा हसलो. आमच्या घरी एरवी पुस्तकं हरवत नसत. पण मी तेव्हापासूनच थोडा विसराळू होतो. त्यामुळे ते कोणाला दिलं होतं का हेही लक्षात नव्हतं.

"पण तुला पुन्हा वाचायला म्हणूनच हवं आहे की... "

"अरे, एका मुलीला हवंय... म्हणजे आमचे बाबा तिची ट्यूशन घेतात. तिला हॅलेच्या धूमकेतूबद्दल निबंध लिहायचा आहे. तर तिच्याकडचं पुस्तक हरवलंय. मग त्यांनी म्हटलं 'राजेश करेल मदत. आमच्याकडे आहे ते पुस्तक.' "

"ओ हो, लडकी का मामला है... घेऊन जा." पुन्हा एक गडगडाटी हास्य. आणि माझं कसनुसं.
.


'मुशे'

.

पुन्हा शून्य दिवस

"तुम्हांला को-ऑर्डिनेट जॉमेट्री शिकवली आहे का?"

"को-ऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय?"

"म्हणजे ते क्ष अक्ष, य अक्ष वगैरे असतं ना?"

"हो हो."

"मग तुला ग्राफ पेपरवर बिंदू प्लॉट करता येतात ना..."

"अं... हो." तिच्या उत्तरावरून मला खात्री वाटली नाही. म्हणून मी एक कागद घेतला. त्यावर क्ष आणि य अक्ष काढले. त्यावर दोन बिंदू काढले.

"आता हा बघ, हा बिंदू आहे तो क्ष = २ आणि य = ४. हा दुसरा बिंदू आहे तो क्ष = ३ आणि य = ६. मग आता हे दोन बिंदू जोडणारी रेषा काढली तर त्यावरच्या सर्व बिंदूंसाठी य = २क्ष हे समीकरण लागू पडेल."

"बरं, मग?"

"म्हणजे आपल्याला क्ष आणि यचं कुठचंही समीकरण घेतलं तरी त्यासाठी एक कर्व्ह काढता येतो."

"हम्म्म... " 'आता तू म्हणतो आहेस म्हणून ठीक आहे', असा काहीसा स्वर होता. पण मी हताश न होता पुढे चालू ठेवलं.

"आता पॅराबोला म्हणजे 'य = क्ष वर्ग'ने जो कर्व्ह होतो तो. आणि हायपरबोला म्हणजे 'क्ष वर्ग वजा य वर्ग = १' याचा कर्व्ह."

"हे मला नीटसं कळत नाहीये." आता मात्र हे फारच झालं, हे तिने कबूल केलं. आणि आम्हांला आठवीनंतरच्या पुढच्या पाच वर्षांत जे शिकवलं ते आठवीतल्या मुलीला दोन मिनिटांत समजावून सांगणं कठीण आहे हे मलाही दिसत होतं. मी पुन्हा डोकं खाजवायला लागलो. काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी वापरायला हवी होती.
.
शून्य दिवसाच्या सुमारे चारेक वर्षांपूर्वी

आमच्या घरी दिवाळीच्या वेळी फटाके आणून ते जाळून टाकण्याऐवजी तेवढ्याच पैशांची पुस्तकं आणण्याची पद्धत होती. मलाही ती आवडायची. कधीतरी एखाद्या दिवाळीत फटाके उडवणारी इतर मुलं बघितली की वाटायचं, आपल्यालाही उडवायला मिळावेत. पण पुस्तकं वाचायचीही प्रचंड हौस होतीच. त्या दिवाळीत किंचित काही असं वाटत असताना बाबांनी आणलेली पुस्तकं बघितली. त्यातलं एक पुस्तक होतं 'मुक्काम शेंडेनक्षत्र'. मूळ लेखक ज्यूल व्हर्न, भाषांतर भा. रा. भागवत. मी ते वाचायला घेतलं आणि पुढचे बरेच दिवस शेंडेनक्षत्रावरच वावरलो. त्यातला नायक हेक्तर सार्वादाक; त्याचा विनोदी नोकर बेन झूफ; जाडजूड चष्मा लावणारे, अंड्यासारख्या डोक्याचे प्रकांडपंडित प्रोफेसर रोझेत यांच्याबरोबर अंतराळाची सफर करण्यात गुंग झालो.

.
शून्य दिवसाच्या सुमारे चारेक वर्षांपूर्वी अधिक सुमारे साताठ दिवस

दिवाळीच्या सुटीनंतर शाळेत गेल्यावर माझ्या जानी दोस्ताला 'मुक्काम शेंडेनक्षत्र'बद्दल सांगितलं.

"आयला, तू वाचलंस! दे टाळी. माझ्याकडेपण आहे ते. धम्माल पुस्तक आहे." पुस्तकाच्या प्रेमात दोघेही पडलेलो असल्यामुळे आम्ही पुस्तकाबद्दल बडबड सुरू केली.

"...सर्वात मस्त भाग म्हणजे प्रोफेसर रोझेत बेन झूफवर क्विंटिलियन आणि सेक्स्टिलियनच्या तोफा डागायला लागतात तो."

"आणि बेन झूफपण काही कमीचा नसतो. त्यांच्या गालियाला तो 'हं, धूमकेतू म्हणे! मोहरीचं बी, वाळूचा कण! 'काही-नाही'चं टोक! जन्मभर दुर्बिणीला डोळा लावून मला हे असलंच भूत सापडलं असतं तर मी शरमेने दुकान बंद केलं असतं.' असं म्हणतो तेव्हा प्रोफेसर कसला चिडतो! "

"हो, आणि तोपण बेनला सांगतो की 'गालियाने जर तुझ्या माँतमार्त्रला टक्कर दिली तर त्याला पंधरा हजार फुटाचं भोक पडेल', तेव्हा बेन झूफपण चिडतो. "

"हो, त्यांची सारखी चाललेली मारामारी सॉल्लिड आहे."

"हो! "

त्यानंतर अनेक दिवस आम्ही 'मुक्काम शेंडेनक्षत्र'च्या भाषेतच बोलत होतो. म्हणजे शिव्या द्यायच्या असतील तर ज्यू इसाकला बेन झूफ म्हणतो तसं एकमेकांना ज्यूडास, इसाचार, पॉटिफर वगैरे म्हणायचं; "उत्तम! निराशेचं कारण नाही." असं म्हणायचं असेल तर गंभीरपणे प्रोफेसर रोझेतसारखं 'निल डेस्परेंडम' म्हणायचं; उगाच मध्येच 'विद्यार्थी घासकडवी! उद्या पाचशे ओळी लिहून आण!' वगैरे ओरडायचं; एखादी गोष्ट माझी आहे असं ठासून म्हणायचं असेल तर 'गालिया माझा धूमकेतू आहे! माझा!' असं म्हणायचं... एक ना दोन अनेक गोष्टी. मुशेने आमचा जणू काही ताबाच घेतलेला होता.

.
पुन्हा शून्य दिवस


प्रोफेसर रोझेत

.
"आपण हे समीकरण वगैरे जरा बाजूला ठेवू. आता आपास्त, म्हणजे हायपरबोला, हा साधारण असा दिसतो. म्हणजे कल्पना कर, की आपण बाणाच्या टोकासारख्या या दोन रेषा काढलेल्या आहेत. आता समजा बाणाचं हे टोक थोडं घासून गुळगुळीत, गोलसर केलं तर असं दिसेल. अगदी बरोबर गोल नाही, पण टोकाला गोलसर आणि तो गोलसर भाग किंचित सरळ सरळ होत या रेषांना मिळतो."

"ठीक आहे, पण धूमकेतूचा काय संबंध?"

"हां, आता अशी कल्पना करायची की या गोलसर भागाच्या केंद्राला सूर्य आहे. लांबून धूमकेतू येतो तो असा सरळ रेषेत. मग तो सूर्याच्या जवळ येतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे खेचला जातो, थोडा कलतो. आणखीन जवळ आल्यावर मग तो झर्रकन गोलात वळतो आणि मग या दुसऱ्या रेषेजवळ जायला लागतो. तो जसजसा लांब जातो, तसतसा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम नाहीसा होतो आणि तो सरळ रेषेत दुसऱ्या दिशेने निघून जातो."

"ओह, समजलं." तिच्या चेहऱ्यावर खरोखरच समजल्याचे भाव होते.

"आणि अन्वस्त म्हणजे असंच थोडंसं. मात्र तो थोड्या लहान कोनातून आल्यामुळे त्याचा गोलसर भाग हा लांबपर्यंत गोलसर राहातो. म्हणूनच 'दूर जाणारे चिमट्याचे पाख म्हणजे आपास्त, तर लहान कोनात असणारे चिमट्याचे पाख म्हणजे अन्वस्त.' असं लिहिलंय." मी पुस्तकातल्या ओळी दाखवल्या.

"ठीक आहे."

"आणि लंबवर्तुळ म्हणजे... लांबट गोल. समजा, तू गोल कणकेची लाटी घेतलीस आणि केंद्राजवळ दोन्ही चिमटीत धरून ती खेचलीस तर त्या वर्तुळाचं लंबवर्तुळ होईल. आणि त्याचं केंद्र दोन ठिकाणी सरकेल. त्यातल्या एका केंद्रावर सूर्य असेल तर त्याभोवती फिरणारा धूमकेतू हा असा लंबवर्तुळात फिरेल. पृथ्वी आणि इतर ग्रहही किंचित लंबवर्तुळातच फिरतात. पण ते इतकं कमी ताणलेलं असतं, की त्याला आपण जवळपास वर्तुळच म्हणू शकतो."

"अच्छा." तिचं निश्चितच समाधान झालेलं दिसलं.

.
फास्ट फॉरवर्ड टू आजचा दिवस

'मुक्काम शेंडेनक्षत्र'चा विचार करताना मूळ लेखक ज्यूल व्हर्न आणि भाषांतरकार भा. रा. भागवत या दोघांचा विचार करायला लागतो. ज्यूल व्हर्न हा एकोणिसाव्या शतकातला विज्ञानकथालेखक. 'ट्वेंटी थाउजंड लीग्ज...', 'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज', 'जर्नी टु द सेंटर ऑफ द अर्थ' ही त्याची इतर पुस्तकं वाचकांना परिचित असतील. एक भन्नाट वैज्ञानिक संकल्पना घ्यायची आणि तिचे अनेक पैलू तांत्रिक बारकाव्यांसह मांडायचे यात त्याचा हातखंडा. त्यासाठी तो प्रचंड अभ्यास करत असे. त्याने गोळा केलेली आकडेवारी, त्या त्या तंत्राचे बारकावे, नव्या संशोधनातून पुढे काय होऊ शकेल याच्या कल्पना यांनी त्याची पुस्तकं भरलेली असायची. एकोणिसाव्या शतकाचा काळ हा यांत्रिकीकरणाचा होता. औद्योगिक क्रांतीने जोर घेतलेला होता. रेलवे नुकत्याच धावायला लागल्या होत्या. संपूर्ण युरोप यंत्रमय होण्याकडे वाटचाल चालू होती. वैज्ञानिक प्रगतीलाही वेग आला होता. जगाबद्दल नवीन नवीन गोष्टी विज्ञानातून समजण्याचा हा कालखंड होता. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाविषयी प्रचंड उत्सुकता होती. ज्या वाचकांसाठी ज्यूल व्हर्न लेखन करत असे त्यांना या तंत्रज्ञानाच्या कणाकणाबद्दल आकर्षण होतं. 'ट्वेंटी थाउजंड लीग्ज..' मध्ये त्याने महाकाय पाणबुडीवरच्या आयुष्याबद्दल लिहिलं. समुद्रातले जलचर, पाणबुडीतून युद्ध, अज्ञात-गूढ इंधन... अशा अनेक अचंबा वाटणाऱ्या तांत्रिक कल्पनांचा त्यात भरणा आहे. 'मुक्काम शेंडेनक्षत्र'च्या मूळ पुस्तकातही - 'हेक्तर सार्वादाक'मध्ये - धूमकेतू म्हणजे काय, ते कसे असतात याबद्दलच्या बारीकसारीक तांत्रिक माहितीची रेलचेल आहे. कितीतरी ठिकाणी प्रोफेसर रोझेत एक भाषणच देऊन सगळी माहिती सांगतात. पण गमतीची गोष्ट अशी की एखाद्या विज्ञानाच्या पुस्तकात आली तर कंटाळवाणी वाटेल अशी माहिती या पुस्तकात सहज खपून जाते. इतकंच नाही, तर वाचकच त्या यात्रेत सामील असल्यामुळे त्याला ती महत्त्वाची वाटते - त्यामुळे पुस्तकाच्या रंजकतेचा भाग बनते. वाचकालाच त्या कल्पनेच्या प्रवासाला घेऊन जाणं हे ज्यूल व्हर्नचं शक्तिस्थान होतं.

मागे वळून पाहताना ज्यूल व्हर्नच्या काही मर्यादाही दिसतात. त्या ठिकाणी जमलेले चार देशांचे छत्तीस-चाळीस जीव हे त्या त्या देशांचे स्टीरिओटाइप्स दाखवले आहेत. म्हणजे उदार, शूर, न्याय्य फ्रेंच हे हेक्तर सार्वादाकच्या नायकाच्या रूपात अवतरतात. त्यांची हुशारी आणि गोड वाटावा असा विक्षिप्तपणा प्रोफेसर रोझेतमधून दिसतो. तर रशियन हे उमदे, तरीही काहीसे कोरडे दिसतात. ब्रिटिशांच्या वर्णनातून त्यांची नोकरशाही वृत्ती, आढ्यताखोरपणा पुढे येतो. तर ज्यूंचं प्रातिनिधित्व करणारा इसाक हा पै पै करणारा चिक्कू मारवाडी आहे. (या ठोकळेबाजीचं वर्णन करतानाही मला 'चिक्कू मारवाडी'सारखी ठोकळेबाज प्रतिमाच वापरावीशी वाटली यातच ठोकळेबाजीची मर्यादा आणि तरीही सामर्थ्य दिसून येतं.) इसाकचं मूळ वर्णन हे अधिक बोचरं होतं - म्हणजे नावाऐवजी त्याला नुसतंच ज्यू म्हटलेलं होतं. त्यावरून या पुस्तकावर टीकाही झाली होती. त्यानंतर काही लहानसहान का होईना, पण बदल करावे लागले. हे केवळ ज्यूंबद्दलच मर्यादित नाही. पुस्तकातल्या लोकांना जेव्हा पृथ्वीवरचे देश दिसतात, तेव्हाही त्यांच्या वर्णनातून अशाच प्रकारचे स्टिरिओटाइप्स दिसून येतात. पण एकोणिसाव्या शतकातल्या युरोपीय विचारसरणीत हे देशांप्रमाणे प्रवृत्तींची विभागणी करणं ठाम होतं. किती बरोबर, किंवा उपयुक्त होतं हे फारसं महत्त्वाचं नाही. पण त्या काळात जो दृष्टिकोन, जी विचारपद्धती होती; तिचंच प्रतिबिंब ज्यूल व्हर्नच्या लेखनात पडलेलं दिसतं.

आधुनिक विज्ञानकथा लेखनानुसार ज्यूल व्हर्नच्या कथा 'तांत्रिक किंवा संकल्पनाप्रधान विज्ञानकथा' ठरतात. जेव्हा विज्ञानकथा लेखनाला सुरूवात झाली तेव्हा 'समजा असं झालं तर?' अशी काहीतरी संकल्पना घेऊन तिचे वेगवेगळे पैलू न्याहाळायचे, असा प्रयत्न असे. मग त्यासाठी कथानक किंवा पात्रं हे पूर्णपणे दुय्यम असतात. केवळ त्या आश्चर्यकारक विश्वाची वाचकाला सैर घडवून आणायची हा त्यांचा उद्देश असे. यात अर्थातच काही गैर नाही. आर्थर सी. क्लार्कसारख्या प्रतिभावंत लेखकाने अशा अनेक संकल्पना-पैलू-वर्णनात्मक उत्कृष्ट लिखाण केलेलं आहे. त्याच्या 'राँदेवू विथ रामा'मध्ये एक अज्ञात यान येतं आणि त्यावर काही लोक जातात. आत जे दिसतं ते विस्मयचकित करणारं असतं. यात ते लोक कोण असतात, वगैरे फारसं महत्त्वाचं ठरत नाही. त्यांना दिसणारं जग हाच खरा कथेचा नायक आहे. ज्यूल व्हर्नच्या लेखनातही त्याने चित्रण केलेलं विश्व हेच नायक असतं. मग त्या अनुषंगाने येणारी तांत्रिक माहिती ही त्या नायकाची व्यक्तिरेखा उभी करणारी असते.

आधुनिक विज्ञानकथा लेखकांना प्रस्थापित विज्ञानकथा मासिकांचे संपादक यापासून दूर जायला सांगतात. त्यांना कथा हव्या असतात त्या माणसांच्या - ज्यात हे नवीन विश्व पार्श्वभूमी म्हणून येईल. ही भूमिका घेण्यामागे काही ऐतिहासिक कारणं आहेत. उदाहरणार्थ, त्याच त्याच कल्पना पुन्हा पुन्हा मांडल्या गेल्या. उदाहरणार्थ 'कालप्रवास करणारा नायक एका ग्रहावर उतरतो. तिथलं वर्तन पाहून त्याला आश्चर्य वाटतं आणि कथेच्या शेवटी त्याला - ही आपली पृथ्वीच! - असं लक्षात येऊन महाप्रचंड धक्का बसतो.' ही कल्पना किती वेळा पुन्हा पुन्हा मांडली गेली याची गणतीच नाही. कारण प्रत्येक नवख्या लेखकाला एकदा तरी ती सुचते. हा तोचतोपणा टाळण्याच्या प्रयत्नांमुळे सध्याचं विज्ञानकथा लेखन हे मानवकेंद्रित झालेलं आहे. अर्थात याचेही तोटे आहेत. कारण मग प्रत्येक नायकाला काही ना काही वैयक्तिक प्रश्न दाखवायचे, वडिलांशी असलेलं वाकडं नातं दाखवायचं, कोणीतरी गे असल्यामुळे येणारे प्रश्न दाखवायचे असे ठोकळेबाज 'मानवीकरणा'चेही प्रयत्नही होताना दिसतात. फारच थोड्या विज्ञानकथांमध्ये ती संकल्पना इतकी वेढून टाकते (असिमॉव्हची 'नाइटफॉल') किंवा मानवी प्रश्न आणि वैज्ञानिक संकल्पना एकमेकांत अनिवार्यपणे गुंफल्या जातात (डॅनिएल कीजची 'फ्लॉवर्स फॉर अल्गरनॉन'). जेव्हा संकल्पनांचं अवकाश मोकळं, अस्पर्शित, न वापरलेलं होतं. त्या काळात ज्यूल व्हर्नने त्यातली मोठमोठाली क्षेत्रं काबीज केली. या नवेपणामुळे आणि ताजेपणामुळे त्या काळी कदाचित मोठी माणसंही चवीने ही पुस्तकं वाचत असतील, पण मुख्य रोख तरुण - दहा ते सोळा वर्षांच्या - मुलांकडे होता.

.
शून्य दिवसांनंतर चार दिवसांनी

बाबा शिकवणीवरून घरी आले. तिचा निबंध मस्त झाला असं सांगितलं. वर सांगत होते, "गंमत म्हणजे ती म्हणत होती, 'काका, राजेश तुमच्यापेक्षा जास्त चांगला शिकवतो'."

मी सॉल्लिड खूश.

.
फास्ट फॉरवर्ड टु आजचा दिवस

भा. रा. भागवतांच्या कथा आज पुन्हा वाचतानाही गंमत वाटतेच, पण त्या वयात वाचताना त्या अंगात जशा भिनायच्या तशा भिनत नाहीत. आता 'मुक्काम शेंडेनक्षत्रा'तली पात्रं किंचित जास्त कृत्रिम आणि ठाशीव वाटतात. त्या काळी हपापून वाचलेली माहिती आता किंचित अतिरेकी वाटते. त्यातल्या साहसांनी थरारून जाणं कमी होतं. हे 'मुक्काम शेंडेनक्षत्र'बाबतच नाही, तर फास्टर फेणेच्या पुस्तकांबाबतही होतं. किंवा लहानपणी पत्रावळ्या होईपर्यंत वाचलेल्या रॉबिन हूडबाबतही होतं. हा अर्थातच भारांच्या लेखनाचा दोष नाही. त्यात माझ्या वयाचा भाग आहे. ज्यूल व्हर्नप्रमाणे त्यांचं लिखाणही १० ते १६ वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी होतं. भारांच्या लढाया, भांडणं ही लुटुपुटूची नसली तरी हलकीफुलकी असतात - त्या वयोगटातल्या मुलांना आकर्षक वाटावीत पण अंगावर येऊ नयेत इतपतच. त्यांनी स्वतः लिहिलेली असोत की भाषांतर केलेली असोत - भारांची सर्वच पुस्तकं वाचताना पोरासोरांना बाजूला बसवून धमाल साहसाच्या गोष्टी सांगत बसलेल्या गोष्टीवेल्हाळ काकांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहातं. एक साहजिक बोलण्यासारखी लय त्यांच्या लिखाणाला आहे. म्हणूनच ते लिखाण क्लिष्ट, बोजड कधीच होत नाही.

ज्यूल व्हर्नप्रमाणेच त्यांचाही पिंड शास्त्रीय बाबतीत काटेकोर. त्यांच्या पत्नी लीलावती भागवतांनी भारांबद्दलच्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली, त्यात त्या म्हणतात -
'शास्त्रीय कथांची त्यांना विलक्षणच आवड आहे. पण शास्त्रीय माहिती आत्मसात करण्यावरही त्यांचा कटाक्ष असतो. या बाबतीत ते आपल्या मुलाशीही वाद घालतील… ...अशा वादावादीतून ते बरं काही मनाशी टिपून घेतात. ही त्यांची टिपणवृत्ती त्यांना ज्यूल व्हर्नच्या डझनभर कादंबऱ्यांच्या अनुवादाकडे खेचून घेऊन गेली. रुपांतरित 'चंद्रावर स्वारी'मध्ये तर त्यांनी जुनी पंचांगं शोधून आकाशातील ग्रहताऱ्यांचं भारतीय गणित मांडलं. कारण कादंबरी असली तरी शास्त्रीय माहिती बिनचूक असलीच पाहिजे, असा त्यांचा रास्त आग्रह असतो.'

त्याच प्रस्तावनेत त्यांनी भारांच्या विनोदबुद्धीबद्दलही लिहिलेलं आहे. भारांनी अनेक विनोदी कथा लिहिल्या आणि त्या गाजल्याही. त्यांचा हा मिश्किल दृष्टिकोन त्यांच्या भाषांतरातूनही जागोजाग दिसतो. त्यापोटीच त्यांच्या भाषांतरात मूळचा इंग्रजी विनोद अस्सल मराठी होऊन येतो. त्यांची गोष्टीवेल्हाळ प्रवृत्ती, विनोदाची जाण, आणि गप्पा मारल्यागत भाषा यामुळेच त्यांची भाषांतरं अत्यंत नैसर्गिक झालेली आहेत. 'चंद्रावर स्वारी'चं त्यांनी रूपांतर केलेलं आहे, तर 'मुक्काम शेंडेनक्षत्र'चं भाषांतर. दोन्ही वाचताना आपल्याला याचं मूळ बिनमराठी आहे, हे जाणवतच नाही. (अर्थात 'शेंडेनक्षत्रा'तली परदेशी नावं सोडली तर...) त्यांची अनेक भाषांतरं ही भाषांतरकलेचा नमुना म्हणून वाचता येतात.

म्हणून अजूनही 'मुक्काम शेंडेनक्षत्रा'चा प्रभाव त्या काळच्याइतका जाणवत नसला तरी वाचायला मजा निश्चितच येते. शिवाय त्याच्याशी आमच्या खूप जुन्या आठवणी निगडित आहेत हेही वेगळंच.

.
शून्य दिवसानंतर आठ वर्षं दहा महिने आणि एकोणतीस दिवसांनी

धूमकेतू आपल्या दर्शनाने जगात उत्पात घडवतात म्हणे... ते अगदीच काही खोटं नाही. माझ्याही जगात गालियाने उत्पात घडवून आणला.

माझं आणि त्या मुलीचं लग्न झालं.

***

प्रोफेसर रोझेतचे चित्रः जालावरून साभार
'मुशे'चे मुखपृष्ठः मेघना भुस्कुटे

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (8 votes)

प्रतिक्रिया

मस्तं लिहिलय गुर्जी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Smile छान!
छान रंगवून लिहिलीये कहाणी! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जबरी लिहिलंय... मजा आ गया. शून्य दिवस आणि त्याच्या संदर्भाने आलेल्या कालपटाची ऐड्या जबरी आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाहाहा! नीट बारकाईनं (=चिकित्सकपणे!) वाचलं, तर वाटतं, लेख चांगला आहे, पण तुकड्यातुकड्यांत. 'मुशे'नी भारलेले मित्र आणि त्यांची गडगडाटी हास्य आणि मन लावून केलेली मास्तरकी, यांच्या मधेच ज्यूल व्हर्नची माहिती येते; नि तो भाग जरा 'चला, आता निबंध लिहू'छाप वाटतो. भारांबद्दल अजून थोडं सविस्तार लिहिलं असतं तर आवडलं असतं... वगैरे कुरकुर करावीशी वाटते.

पण शून्य दिवसाची संकल्पना वापरून मारलेल्या काळाच्या अफलातून उड्यांमुळे त्या लेखाला भारीपैकी लय आलीय. नि शेवटचं वाक्य, खतरनाकच! एकदम झर्रदिशी वर जाऊन पुन्हा शून्य दिवस वाचावा लागतो, त्या वाक्यामुळे. मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नि तो भाग जरा 'चला, आता निबंध लिहू'छाप वाटतो.

हो, कथा आणि निबंध यांचं द्वैत शिल्लक राहिलंय खरं. कथास्वरूपात पुस्तकाविषयी किंवा लेखनाविषयी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच लिहिता येतं. त्यामुळे माझ्यावरचा भारांचा पगडा दाखवण्यासाठी नैसर्गिक कथाप्रकार, आणि त्यांच्याबद्दल किंवा ज्यूल व्हर्नबद्दलचं मोठं झाल्यानंतरचं मत मांडण्यासाठी निबंध आलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय बोलू! एकदम खिळवून टाकलं.
___
उलटापालटा क्रम अन गणितिय संज्ञांनी बहार आली.
_____
शेवट तर - A BIG WOW

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यूल व्हर्नचं एकही भाषांतरीत साहीत्य वाचलेलं नाही, आता वाचायला हवं. बाकी लेखाची रचना छानच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम भारी! माँतमार्त्र, निल डेस्परेंडम यांनी आमच्या विद्यार्थीदशेतले पण काही प्लस-मायनस दिवस मंतरून टाकलेले....
भारांनी रूपांतरलेली व्हर्नची खूप पुस्तकं नंतर इंग्लिशमधून वाचली - पण हे मात्र नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही दोन पुस्तके माझीही प्रचंड आवडती (शाळकरी वयात वाचलेली)..
उच्च शिक्षण घेत असताना योगायोगाने इंग्रजी भाषांतर नजरेस पडलं आणि घासकडवींनी वर म्हटल्याप्रमाणं प्रचलित पूर्वग्रहांवर आधारलेलं वर्णन वाचलं - विशेषत: ज्यूंचं -
त्यातून भारांची महती नव्याने कळली ती अशी:
माझ्या आठवणीप्रमाणं या इंग्रजी भाषांतरात इसाक हाखाबुत हा सरसकट दुर्गुणांचा पुतळा दाखवला आहे, इतका की चांगला गुण औषधालाही मिळू नये..
भारांनी मात्र या व्यक्तिरेखेत काही गुण असे बेमालूमपणे भरले (उदा. नव्या वर्षाच्या प्रार्थनेवेळी निनाने इसाकचा उल्लेख करणे, कहाणीच्या अंती इसाकने तिच्या (व पाब्लोच्याही?) शिक्षणाचा खर्च उचलणे..) या झालरीने एकूण कथेचा (Impressionable?) वाचकावर फारच वेगळा परिणाम होतो.

कथेच्या आत्म्याला हात न लावता त्यातील व्यक्तिरेखेच्या खुपणार्‍या कडा विवेकबुद्धीने बोथट करणे हे भारांचं मला भावलेलं मोठेपण!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0