इदं न मम!

इदं न मम!

- अमृतवल्ली

.
गावातल्या किर्तनेकर यांच्या किराणामालाच्या दुकानाच्या व्हरांड्यात पायपोस नि सतरंज्या टाकून दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत महोदय पाठक गुर्जी ऊर्फ म्हाद्या गुर्जी संध्याकाळी पाच वाजता पायावर पायावर टाकून आम्हां पोराटोरांची वाट बघत उच्चस्थानी बसायचे. 'संस्कृत ही बोली-भाषा व्हायला हवी' असा चंग बांधलेले हे आमचे पाठक गुर्जी दर वर्षी दोन-तीन आठवड्यांची 'अभिजन' कार्यशाळा ('महोदय', 'उच्चस्थान'सारखा हाही त्यांचाच शब्द!) घेण्यासाठी गावात महिनाभर मुक्काम ठोकायचे आणि सालाबादप्रमाणे आम्हीही 'अहम् खावामि| अहम् बैठामि|'चं रवंथ करायला जायचो. पाठाची सांगता संस्कृत श्लोकाच्या पठणाने व्हायची. गुर्जींच्या मागे डोळे मिटून श्लोक म्हणायचा, तो संपल्यावर 'परमेश्वराचे स्मरण' करायचे आणि त्यांनी सांगितल्यावर डोळे उघडायचे, असा शिरस्ता असायचा.

श्लोक संपल्यासंपल्या आमची चुळबुळ सुरू व्हायची. मग एक डोळा हळूच उघडून गुर्जी म्हणायचे 'ओम भाराय नम:|'. मग लगेच एखादं पोरगं उठून किर्तनेकरांच्या रद्दीच्या कपाटातून एक ट्रंक बाहेर काढणार आणि सगळी पोरंपोरी त्याच्यावर झडप घालायला धावणार. हाच श्लोक कधी 'टागोराय नम:|' किंवा 'छात्रप्रबोधानाय नम:|'च्या चालीवर संपायचा. आता पुस्तकं काय आमच्या गावच्या वाचनालयात नव्हती का? चांगली बक्कळ होती. घरीपण आणि नगरवाचनालयातसुद्धा. पण तरी, त्या ट्रंकेच्या पोटातली पुस्तकं वाचायची/चाळायची इतकी उत्सुकता होती, याचं कारण म्हणजे त्यांतली बरीचशी किंवा जवळजवळ सगळी आमच्यासाठी नवीन होती. कुठल्याच वाचानालयात याआधी ती आम्हाला पाहायला मिळाली नव्हती. 'छात्रप्रबोधना'च्या अंकातल्या विज्ञानकथा, गणितातली कोडी, प्रयोग इतक्या सोप्या नि आम्हांला समजणाऱ्या भाषेत होत्या, की आमच्या विज्ञानाच्या मास्तरांची आणि पुस्तकाची भाषा त्रेतायुगातली आहे, असा आमचा पक्का समज झाला होता. शाळेची प्रयोगशाळा फक्त नववी-दहावीच्या विद्यार्थांच्या वापरासाठी होती. बाकीच्या इयत्तांना वर्षातून दोन-तीनदा प्रवेश असायचा आणि शिक्षकच सगळे प्रयोग करून दाखवायचे. पण या अंकातल्या सोप्या सोप्या कृतींमुळे प्रयोगशाळेचं अप्रूप थोडं कमी झालं होतं. तसंच काहीसं टागोरांच्या अनुवादित कथा आणि कवितांचं होतं. महाभारतातल्या भीष्मांसारखे दिसणारे हे आजोबा दूरच्या देशात राहूनही अगदी मनातलं ओळखून आपल्यासाठीच कसं काय लिहितात, याची भारी मजा वाटायची.

पाठक गुर्जींच्या याच ट्रंकेतून भा. रा. भागवतांची बरीचशी पुस्तकं आम्हांला वाचायला मिळाली. त्यातली काही आठवणारी पुस्तकं म्हणजे .. 'भुताळी जहाज', 'शाब्बास शरलॉक होम्स', 'थॅंक्यू मिस्टर शार्क', 'भटाच्या वाड्यातली भुतावळ' आणि बराचसा 'फास्टर फेणे'. यांतली काही पुस्तकं वाचताना धमाल मजा आली होती. कारण 'भुताळी जहाज'च्या अद्भुत सफरीबद्दल वाचल्यानंतर वाड्याच्या चौसोपीत चाच्यांबरोबरचं युद्ध चांगलंच रंगल्याच्या आठवणी आहेत. एकदा पाठक गुरुजींनी 'बालमित्र'चा खूप जुना अंक वाचून दाखवला होता, त्या संध्याकाळचं पुसटसं चित्र आठवत आहे.

पण या आठवणी सोडल्या, तर इतर पुस्तकं जशी मी झपाटून वाचली होती, तशी भारांची पुस्तकं झपाटून वाचल्याचं माझ्या स्मरणात किंवा जाणिवेत नाही. त्यांची पुस्तकं, विशेषत: फास्टर फेणेचं गारूड माझ्यावर झालंच नाही. आपल्या बऱ्याच मैतरांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेला हा फेणे आपल्याला 'अपील' झालाच नव्हता याची लख्ख जाणीव मात्र माझ्यासोबत आहे. लहानपणी वाचलेल्या चंपक, चांदोबा, पंचतंत्र, राम-कृष्ण-कर्ण, ज्ञानेश्वर-तुकाराम वगैरेंच्या गोष्टींत फास्टर फेणेच्याच आठवणी इतक्या पुसट का आहेत? शिवाय हे मलाच वाटतंय की माझ्याबरोबर वाढलेल्या भावा-बहिणींना/मित्र-मैत्रिणींना हीच भावना आहे, याचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यायोगे एक ठळक बाब माझ्या निदर्शनाला आली, ती म्हणजे ग्रामीण किंवा निमशहरी बालपण घालवलेल्या बऱ्याच लोकांना भागवतांची पुस्तकं, विशेषतः फास्टर फेणे, फार भावत नाही. मला हे वाक्य लिहून किंवा माझं मत ठामपणे मांडून उगाचच वादाला वाद घालायचा नाही. भारांच्या १०५व्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांचं फॅन-फॉलोइंग इथे लिहायला आणि वाचायला येणार आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. मुळातच आपण भारांविषयी लिहितो-बोलतो आहोत, तेव्हा एका अर्थाने आपण आपल्या लहानपणीच्या आठवणींविषयी लिहितो आहोत. स्मरणरंजन हा भारांविषयीच्या लेखांमधला अविभाज्य भाग आहे. तेव्हा, मी इथे लिहीत असलेली मतं ही माझ्या आणि माझ्या काही मित्र-मैत्रिणींच्या लहानपणीच्या आठवणी/घटना यांच्या आधारे मांडत आहे. पुराव्यानिशी गोष्टी शाबित करायचा माझा रोख नाही. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे 'स्मरणरंजन' हा प्रकार वैयक्तिक अनुभवात मोडत असल्यामुळे इथे सडेतोड वकिली विधानं नसली तरी चालतील, अश्या धारणेने लिहीत आहे.

कुठल्याही पुस्तकातली पात्रं ही वाचकांना किती आपलीशी वाटतात, त्या पात्रांच्या व्यक्तिरेखा कश्या आहेत, कथानक काय आहे, यावर वाचक त्या पुस्तकात किती गुंततो हे अवलंबून असतं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत पात्रांबरोबरचं भावनिक नातं यावर फार अवलंबून असतं. 'फास्टर फेणे'मधली आमच्या वयाची पात्रं - म्हणजे दस्तुरखुद्द फेणे, माली आणि त्यांचे मित्र - आम्हांला (इथे प्रत्येक वेळी आम्हांला - म्हणजे मला आणि माझ्या काही मित्र-मैत्रिणींना) आपलीशी वाटली नाहीत. याचं एक कारण म्हणजे, मुळात आम्ही मुलं-मुली जराही फेणेसारखी नव्हतो. चौकटीचौकटीचे शर्टं, पायात बूट, केसांचा लफ्फेद्दार कोंबडा, पाठीवर असणारी सॅक, छोटा चाकू, पाण्याची बाटली कधीच आमच्याजवळ नव्हती. फेणेच्या आणि आमच्या दिसण्या-बोलण्यामध्ये फार फरक होता. सायकलवरून गावकुसात हुंदडताना, भरधाव वेगाने ती दामटताना, काळ-काम-वेगाचं गणित आणि फेणेला असणारं त्याचं व्यवधान कधीच आमच्या डोक्यात नव्हतं. अर्थात याचं कारण - गावातलं लहानसं संकुचित जग - हे असू शकेल. फेणेकडे असणारा शहरी स्ट्रीटस्मार्टपणा आमच्याकडे जराही नव्हता आणि त्याचं आकर्षणही एका मर्यादेपलीकडे नव्हतं. सठीसामाशी पुण्या-मुंबईहून हुरड्याच्या दिवसात येणाऱ्या लांबच्या आत्या-मावश्यांच्या मुलांप्रमाणे हा फेणे दिसायचा. त्या मुलांशी खेळताना, बोलताना थोडं बिचकायला व्हायचं; तसंच फेणेबरोबर काहीतरी.

फेणे शहरी असल्यामुळे त्याच्या आजूबाजूचं वातावरणही शहरी आहे. आजूबाजूला फिरणाऱ्या मोटारी, वेगवेगळ्या प्रकारची लोकं, (एक उदाहरण देते, जसं की, टॅक्सी चालवणारा सरदारजी. आमच्या गावात औषधालाही ही टॅक्सी आणि सरदारजी सापडणार नाही), उल्लेखलेले सायकलचे वेगवेगळे ब्रॅंड, त्याची शाळा, त्याच्या ट्रिपा, वगैरे वगैरे. आमच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाशी ते बऱ्याच अंशी विसंगत होतं. मग तुम्ही म्हणाल की बाकीच्या चंपक, चांदोबा किंवा तत्सम बालमासिकांमधल्या कथांचं वातावरण तरी कुठे जुळतं? तरीपण रंगून जाऊन आपण त्या कथा वाचतच होतो ना? इथे येते भागवतांनी घेतलेली 'लीप ऑफ फेथ', याच 'लीप ऑफ फेथ'मुळे फास्टर फेणेला सुपर हिरोची झालर मिळते आणि मग मुले पळवणाऱ्यांना पकडून देणे, पानशेतच्या पुरातला धाडसीपणा, काश्मीरमधल्या पाकिस्तानच्या गुप्तहेरांना अद्दल घडवणे, लहान गावातून मोठ्या गावात एकट्याने शिकायला जाणे, सायकलवरून पाठलाग करणे, वगैरे करामती तो लीलया पार पाडतो. ही 'लीप ऑफ फेथ' शहरी वाचकांच्या पचनी पडते, कारण मुळातच 'फास्टर फेणे'मधलं वातावरण त्यांच्या ओळखीचं आहे. थोडसं अतिशयोक्तीनं सांगायचं तर शहरातल्या पेपरमध्ये मुलं पळवणाऱ्या टोळ्यांच्या बातम्या येतात, ही मुलं सुट्टीत आई-बाबांबरोबर काश्मीरच्या ट्रीपला जातात, शाळेतल्या ट्रिपा दिल्लीला वगैरे जातात शिवाय कथांमधे आलेले बरेचसे स्थळविशेष त्यांच्या आजूबाजूला दिसतात, विशेषतः पुण्यातल्या मुलांनी पानशेतचे धरण फुटल्याच्या आठवणी थोरांकडून ऐकलेल्या असतात. त्यामुळे अशा प्रसंगांतली त्यांच्यासारख्याच दिसणार्‍या, वागणार्‍या फेणेची सुपरहिरोगिरी अगदी सहज पचनी पडते. लहान गावातल्या मुलांना ही झेप भावेलच असं नाही.

मित्र-मैत्रिणींच्या बोलण्यातून आलेली अजून एक गोष्ट म्हणजे फेणेला भेटणारी माणसं. त्याला भेटणारे हवालदार, दुकानदार, चोर, कैदी, पोलीस सुप्रिटेंडंट, शाळेतले शिक्षक, मित्रांचे आई-वडील आम्हांला एकाच पठडीतले वाटतात. इथला हवालदार बिल्लेवाला, पोट सुटलेला असतो. शाळेतले शिक्षक आदर्श आणि कनवाळू असतात. मित्रांचे आई-वडील धाडसी आणि समजूतदार असतात. थोडक्यात सांगायचं तर या पात्रांचं जरा 'बॉलिवुडायझेशन' झालंय. लहान मुलांना व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांमधला क्लिष्टपणा किंवा नात्यांची पेड उमजत नाही, असं थोडंच आहे? आपण कितीही लहान असलो तरी रोज भेटणारी माणसं, त्यांच्यातले हेवेदावे-प्रेम, शिक्षकांची वर्तणूक, गावातल्या सभा, बाजार, दंगली, उत्सव अशा असंख्य गोष्टींनी आपल्याभोवतीचा गोफ विणलेला असतो. जसजसं वय, समज वाढत जाते, तसतशी या गोफाची उलगड प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो. असे कंगोरे नकळतपणे टिपणाऱ्या आमच्यातल्या काहींना फेणे-पठडीतलं जग भावलं नसावं. इथे आमच्यातले काही जण - असं मी मुद्दाम म्हणते आहे, कारण काही जणांना फेणेची नेमकी हीच गोष्ट फार आवडली आहे. त्यांच्या भाषेत सांगायचं तर त्यामुळे 'फेणेची गोष्ट एकदम सरळ-सोपी झालेली आहे'. 'कुंभ के मेले में' हरवलेले भाऊ नक्की भेटणार, याची त्यांना जशी खात्री आहे, तसंच काहीही झालं तरी फेणे अमुक एक संकटातून सहीसलामत बाहेर पडणार, याची खात्री त्यांना आहे. आणि या खात्रीमुळे निर्धास्तपणे ते फेणेच्या लीला दंग होऊन वाचतात.

आमच्यातल्या बऱ्याच जणांना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे फेणेच्या गोष्टीत कुठेच झाडा-फुलांना, डोंगर-नद्यांना, पशुपक्षी, किडेमुंग्यांना स्थान नाही. गोष्टीतल्या जागा म्हणून फुरसुंगी, पुणे, प्रतापगड यांचे उल्लेख येतात पण तिथे फेणे रमत नाही. त्याची गोष्ट प्रतापगडावरचा खजिना शोधायला किंवा खूँखार कैद्याला पकडायला धावू लागते. गोष्टीत आलेले कुत्र्यांचे उल्लेखसुद्धा त्या अनुषंगानेच आलेले आहेत. अर्थात सगळ्यांच्या नाही, पण काही मुलांच्या भावविश्वात दारातली रांगोळी, रोज उगवणारा सूर्य, बागेतल्या कुंडीतल्या झाडाचं फूल, गोग्रास खायला न चुकता येणारी गाय यांना अढळ स्थान असतं. फेणेच्या गोष्टीत मला हे सापडलं नाही. कदाचित म्हणूनच माझी त्याच्याशी गट्टी जमली नसावी.

इथे मला माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगावसं वाटतंय की साधारण त्याच वयात श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या 'डोह'मधल्या काही गोष्टी आणि प्र. ना. संतांच्या 'लंपन'च्या काही गोष्टी वाचल्या होत्या. आणि त्या मला प्रचंड जवळच्या वाटल्या होत्या. त्या गोष्टींत आणि माझ्या लहानपणात खूप साम्य होतं, अशातला भाग नाही. पण लंपनचा जसा 'विठोबा होतो' तसा आपलाही कधीमधी व्हायचा किंवा 'डोह'मध्ये पुराच्या पाण्यात उडी मारताना जशी घालमेल झाली, तशी आपलीही एकटीने विहीरीत उडी मारताना झाली होती, अशा ओळखीच्या खुणा मला त्या पुस्तकांत जागोजागी भेटल्या होत्या. मला याची पूर्ण कल्पना आहे, की मुळात फास्टर फेणे, 'वनवास' आणि 'डोह' यांची तुलनाच होऊ शकत नाही. फेणे एका विशिष्ट वयाच्या मुला-मुलींना समोर ठेवून त्यांच्यासाठी लिहिलं आहे, तर 'वनवास', 'डोह' यांतल्या गोष्टी म्हणजे ते वय ओलांडल्यावर आलेली अनुभूती आहे. तरीसुद्धा ही तुलना करायचा मोह मला आवरत नाही.

जाता जाता अजून एक मुद्दा. फाफेवरच्या संभाषणाची गाडी पुस्तकातल्या भाषेवर आली. तुमची भाषा, आमची भाषा, पुण्याची भाषा, फेणेची भाषा असा कीस पाडताना ही चर्चा अनेक गटांत विभागली गेली. अनेक लोकांचं असं मत होतं, की फाफेतल्या पात्रांची भाषा त्याच्या वाचकांच्या बोली भाषेपेक्षा बरीच वेगळी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती एकाच छापातली आहे. उदाहरणार्थ, शहरी प्रसंगात पुणेरी छापाची भाषा, खेड्यातल्या किंवा आडगावच्या गावातील प्रसंगात एकाच बाजाची (शक्यतो कोल्हापूरची) ग्रामीण बोली आणि चिनी युद्ध असो किंवा दिल्लीतला प्रसंग असो, थोडी 'बंबय्या' हिंदी भाषा. थोडक्यात भाषा पात्रानुरूप असली तरी साचेबंद आहे. मला मात्र हे मत अगदीच पटलं नाही. मूळ कथाच जर फुरसुंगी, पुणे-मुंबईच्या आजूबाजूला घडत असेल तर उर्वरित महाराष्ट्रातल्या भाषांचा बाज मांडणार कसा? अर्थात हे मत असणारे बरेचसे मित्र मराठवाडा-विदर्भातले असल्यामुळे फाफेमधली भाषा त्यांना जवळची वाटली नाही यात नवल नाही. पण याच लोकांना असाही प्रश्न विचारला, की जर फाफेमधल्या पात्रांपैकी एखादं पात्र तुमची भाषा बोलणारं असतं, तर फेणे जास्त भावला असता का? तर त्याचं उत्तर बव्हंशी 'होय' असं आलं. याच चर्चेत ऐकलेलं, सातारा-कोल्हापूरला वडिलांची बदली झालेल्या एका मैत्रिणीचं उत्तर फार मजेशीर होतं. तिला भाषेपेक्षाही फाफेमधलं काय आवडलं असेल, तर फाफेतल्या काही पात्रांच्या तोंडी 'हरामखोर', 'लुच्चा' अश्या शिव्या आहेत हे! तिच्या घरातल्या संस्कारी पुस्तकांच्या जंजाळात न मिळणार्‍या या गोष्टीसाठी तिला फाफे आवडला होता. आजूबाजूच्या वातावरणाशी आणि भाषेशी मिळतंजुळतं घेणारं काही तिला त्या गोष्टींत मिळालं होतं.

असो. ह्या संपूर्ण लेखात कुठे तक्रारीचा सूर लागला असेल तर तो तसा अभिप्रेत नाही. भागवतांच्या शैलीला निंदालण्याचा हा प्रयत्न नाही. मला इतकंच म्हणायचं आहे, की कुणाला काय भावावं आणि कुणाला काय उमजावं हा ज्याच्या त्याच्या पिंडाचा आणि जडणघडणीचा प्रश्न आहे.

....

इथे मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट ठळक आठवते आहे. आमचं घर म्हणजे मोठं बारदानच असल्यामुळे दळण टाकणं, तांदूळ निवडणं, फारफार तर भाजीला वाफ देणं सोडलं, तर स्वैपाकघरातली कामं मी फारशी कधी केली नव्हती. एकदा दुपारच्या खुडबुडी करताना 'किशोर'च्या एका अंकात 'सुट्टीतले स्वयंपाकघरातले प्रयोग' किंवा तत्सम मथळ्याखाली छापलेलं 'तिरंगी सॅन्डविच' करायचा मी घाट घातला. टॉमेटो सॉस, पुदिन्याची चटणी, लोणी ब्रेडला लावून ते एकावर एक ठेवायची अशी काहीशी कृती होती. कृती बघितल्यावर माझ्या लक्षात आलं, की त्यातलं लोणी सोडलं, तर एकही घटक घरात सहजासहजी मिळणारा नव्हता. टॉमेटो सॉस आणि ब्रेडसाठी तर अख्खा दिवस किरकिर करावी लागली असती आणि वर आईने तासाभराचं आख्यान ऐकवलं असतं ते वेगळं. तस्मात् - सहज करता येणारा - असं म्हणून छापलेल्या त्या पदार्थाचा मी 'इदं न मम!' असं म्हणून नाद सोडला होता.
***
मैदानातील फाफेचे रेखाचित्र: जालावरून साभार
इतर रेखाचित्रे: अमृतवल्ली

***
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

अगदीच छान आणि पटणीय लेख! शिवाय लेखातील नेमकी भाषाही आवडली - पोचली - पटली!
मस्त लेख - पाच तारे!

---
हा लेख काय, तो कर्णिकांचा अनुवादावरचा लेख काय, भा.रा.विशेषांकात त्यांच्या लेखनाची अशी वेगवेगळ्या बाजुने चिकित्सा यावी हे या अंकातील वैविध्य आणि वैशिष्ट्य अधोरेखित करणारं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी सगळा लेख सडेतोड आहे. ते छानच. पण शेवटच्या परिच्छेदानं त्या लेखाला एकदम निराळाच आयाम दिला आहे. वर जे सांगितलं आहे, ते सगळं त्या एका परिच्छेदामुळे निराळ्या प्रकाशात, नेमकं आणि साधंसरळ-प्रांजळ दिसायला लागतं. आधी साधं वाटणारं एखादं पुडकं वर बांधलेल्या फितीच्या गाठीमुळे निराळंच, झोकदार दिसायला लागावं, तसं. मस्तच!

आणि शेवटचं चित्र विशेष आवडलं. त्या पोरीच्या कपाळावर एक आठी आहे की काय, असं वाटायला लावणारं बोलकं प्रश्नचिन्ह शेजारी असल्यामुळे विशेष समर्पक. जियो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेखातल्या भावनेशी अतिशय सहमत आहे. शिवाय लंपन का आवडला याची मीमांसा एकदम नेमकी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख पटला. सर्वसमावेशकतेचा आग्रह नाही हे आवडलं. चित्रं झकास जमली आहेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेगळा दृष्टीकोन मांडल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१.
शैली नेहमी प्रमाणेच सुंदर. चित्रे मस्तच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0