भारा - मराठी 'व्हर्नीश' वाचकांचे लाडके अनुवादक

भारा - मराठी 'व्हर्नीश' वाचकांचे लाडके अनुवादक

- ऋषिकेश

.
ही आठवण आहे तेव्हाची, जेव्हा पनवेल हे मुंबईहून नुसते वेगळेच नाही, तर दूरवर प्रवास करून पोचायचे एक हिरवेकंच गाव होते. तिथल्या मामाकडे आम्ही दर वर्षी, उन्हाळ्याच्या नि गणपतीच्या सुट्टीत, असे दोनदा जात असू. गणपतीच्या निमित्ताने जमल्यावर चालू असलेला दंगा, आरास, उन्हाळ्यात गच्चीतल्या खोलीत रचलेली आंब्याची अढी आणि तिन्ही त्रिकाळ आमची चालणारी आंबाखादाडी, इत्यादी अनेक गोष्टींमध्ये दंग असलेली आम्ही जवळपास सारख्याच वयाची भाचरे आमचा मामा एकट्याने अक्षरशः हाकीत असे.

या सगळ्याबरोबर पनवेल नि मामाचे घर म्हटले की डोळ्यासमोर हमखास येणारी गोष्ट म्हणजे त्याचे पुस्तकांचे कपाट. तसे अस्मादिक मामाच्या इतर भाचरांच्या मानाने अधिक नशीबवान होते. आमच्या घरी 'ठकठक', 'चंपक' यांचा नियमित, तर प्रसंगी 'टॉनिक' आणि दिवाळीत 'अबब हत्ती' यांचा रतीब बाबांतर्फे चालू असायचा. त्याचबरोबर 'मुंमग्रंसं'ची शाखा घराजवळ उपलब्ध झाल्याने, तेथील बालविभागातून आठवड्याला एक पुस्तक आणायची ऐष मी नुकतीच करू लागलो होतो. तरीही मामाकडे असलेल्या पुस्तकांचा खजिना, त्याचे वैविध्य आणि त्यातही तीन-चार खण फक्त लहान मुलांच्या (म्हणजे अभ्यासाच्या नसलेल्या) पुस्तकांनी भरलेले बघायला मिळणं, असं त्यानंतर आजतागायत कोणत्याही घरात दिसलेलं नाही. दर सुट्टीआधी, खास मुलांसाठी म्हणून प्रयत्नपूर्वक काहीतरी शोधून त्या कपाटात भर घालणार्‍या मामाने आम्हांला न मागता बरेच काही दिले. त्याच कपाटात आम्हांला 'देनीसच्या गोष्टी' सांगणारा द्रागून्स्की भेटला, 'साखरेचं बाळ', 'चांदोबा', 'काळा पहाड' आणि 'खजिन्यांच्या कथा' इत्यादींपासून 'पाश्चात्त्य लोक भारतातील लोकांची कल्पना कशी करत असत?', 'जगाचे वेगवेगळे नकाशे कसे घडत गेले?' याची इत्थंभूत माहिती देणारे एक पुस्तक ('लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला?', अनु. - अनिल हवालदार), ब्रिजवासीची स्वच्छ छपाई व देवनागरीतले अ‍ॅटलास (नुसते हाताळायलाच नाही तर त्या निमित्ताने विविध शहरे शोधून त्यावर बोलायला मामा हजर), अजून थोड्या मोठ्या वयात तर 'चीपर बाय द डझन', 'तोत्तोचान', 'गोट्या' वगैरे पुस्तके तिथेच मिळाली.

अशाच एका उन्हाळ्यात मामाकडे एक संच आला होता. त्यातील पुस्तकांवर एका नव्या लेखकाचे (म्हणजे माझ्यासाठी नवे) नाव होते 'भा. रा. भागवत'. आम्ही त्या पुस्तकांवरील चित्रे अधाश्यासारखी पाहू लागल्याचे नेमके आठवते आहे. पुस्तकांची नावेच उत्कंठा वाढवणारी होती. 'कंपनी चालली सूर्याकडे', 'गिरिशिखराचे गुपित', 'चंद्रावर स्वारी', 'साता समुद्राचा सुलतान', 'पाताळलोकाची अद्भुत यात्रा', 'ध्रुवाने लावले वेड' इत्यादी पुस्तके आणि त्यावरील चित्रे हा लेख लिहिताना इतक्या वर्षांनंतरही डोळ्यांसमोर येताहेत. आम्हांला ती पुस्तके मनसोक्त हाताळू दिल्यानंतर आम्ही आपापसात ती पुस्तके वाटू लागलो असता, मामाने पहिला प्रश्न केला,

"कशी वाटताहेत?"

"सॉल्लिड!" आमच्यातलं कुणीतरी पुस्तकांवरची भिरभिरणारी नजर न हटवता म्हणाले.

"लेखक बघितलात?"

"हो!", एका सुरात आम्ही सगळे म्हणालो, "भा. रा. भागवत!"

"पूर्णतः बरोबर नाही!"

"अं! पुस्तकावर तर भा. रा. भागवत असंच लिहिलंय."

"बरोबर, पण या पुस्तकांचे ते अनुवादक आहेत."

"म्हणजे? देनीसच्या गोष्टींसारखे?" आमच्यापैकी बहुतेकांसाठी तोवर हाती आलेले एकमेव अनुवादित पुस्तक 'देनीसच्या गोष्टी' होते. त्याच्या मूळ लेखकाचे नावही एका दमात सांगता येणे आमच्यासाठी अप्रुपाचा (नि अभिमानाचा) विषय होता.

"बरोबर! या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे 'ज्यूल व्हर्न' आणि भागवतांनी त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलाय. 'ज्यूल व्हर्न' हा लेखक तुम्हाला ऐकून तरी माहितीये का?"

आम्हांला अर्थातच माहीत नव्हते.

"ही जी पुस्तके आहेत ना, त्यांना 'विज्ञानकादंबरी' म्हटले जाते. तुमच्यासाठी जरा नवीन काहीतरी म्हणून हा संच आणलाय. 'विज्ञानकादंबर्‍यांचे जनक' म्हणून ज्या तीन लेखकांकडे बोट दाखवले जाते, त्यांपैकी एक म्हणजे 'ज्यूल व्हर्न'. या लेखकाची गंमत अशी की त्याने जवळ जवळ शंभर-एक वर्षांपूर्वी ज्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या त्यातल्या बर्‍याच आज खर्‍या होताना दिसताहेत."

"म्हणजे तो ज्योतिषी होता?"

"नाही रे, ज्योतिषी नव्हता; पण विज्ञानाची उत्तम जाण असलेला लेखक होता. त्याने सांगितलेल्या गोष्टी या केवळ कल्पनेतले तीर नव्हते, तर फार विचार करून केलेले काही तर्कशुद्ध आराखडे होते. त्या कथांमध्ये सांगितलेल्या अनेक कल्पना केवळ प्रत्यक्षात आल्या असेच नाही; तर त्या घटना घडण्यामागचा तर्क, त्यांची कल्पिलेली रचना, कारणांमागची मीमांसादेखील प्रत्यक्षात जवळपास त्या कथांप्रमाणे आहे."

मामा तेव्हा काय म्हणाला ते पूर्णपणे कळले नव्हते. पण शंभर-एक वर्षांपूर्वी अशा प्रकारचे शोध लागले नसताना अंतराळप्रवासापासून ते भूगर्भशास्त्रापर्यंत अनेक विषयांशी संबंधित हा गोष्टी लिहिणारा अवलिया काहीतरी भलतेच इंटरेस्टिंग प्रकरण आहे, इतकी खूणगाठ बांधली गेली होती.

भागवतांच्या अनुवादाच्याही आधी मूळ पुस्तकांवर व मूळ लेखकावर काही लिहिणे अगत्याचे व आवश्यक ठरावे.

पण मी काही लिहिण्यापेक्षा स्वतः भागवतांनी 'मुक्काम शेंडेनक्षत्र' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ज्यूल व्हर्नबद्दल लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, "विमान नावाचे हवेपेक्षा जड असे वाहन शक्य कोटीतही आले नसताना या प्रतिभाशाली लेखकाने बलून व विमानाच्या विस्मयजनक गोष्टी लिहिल्याच. इतकेच नाही तर अंतराळाचा भेद करून त्याच्या कल्पनेची भरारी चंद्रसूर्यापर्यंत जाऊन पोचली. अंतराळयुगाचा हा द्रष्टा लेखक म्हणजेच फ्रान्समधील नाँत (Nantes) गावी जन्मलेला ज्यूल व्हर्न होय. आज वैज्ञानिक चमत्कारांच्या कथांना अमेरिकेत इतका ऊत आला आहे - त्यातील ९५ टक्के कथा खरोखरच 'चमत्कारिक' असतात! - की ललित वाड्मयाचा तो एक स्वतंत्र विभाग बनला आहे. पण विज्ञानकथाकारांच्या पंक्तीतले ज्यूल व्हर्नचे स्थान आजदेखील एकमेवाद्वितीयम् असेच आहे. महान पंडित एच्.जी.वेल्स आणि आधुनिकांतला 'रे ब्रॅडबरी' हेदेखील त्याचे आदरणीय स्थान हिरावून घेऊ शकले नाहीत. याचे एक कारण ज्यूल व्हर्नचा तर्कशुद्ध शास्त्रीय दृष्टिकोन हे तर आहेच; पण त्याचे साहित्यगुणही त्याला कारण आहेत. स्त्रीपात्रे बव्हंशी गैरहजर असूनही मनाची पकड घेणारे कथानक, मती गुंग करणार्‍या घटना आणि तलवारीच्या फटक्यांसारखे चपल संवाद हे त्याच्या साहित्याचे गुणविशेष होत. त्याची कथनशैली इतकी आकर्षक असते की गोष्टीच्या ओघात एखाद्या वैज्ञानिक विषयाची त्याने दिलेली काटेकोर माहिती आपल्या नकळत पचनी पडते."

आज इतक्या वर्षांनीही मूळ लेखकाचे नाव विसरलेलो नाही, की त्या कथांची कथासूत्रे. याचे जितके श्रेय ज्यूल व्हर्नच्या कथासूत्राला म्हणा किंवा कथानकाला आहे, तितकेच श्रेय भा.रा.भागवतांच्या अतिशय सहज अनुवादाला आहे. आता हे माझं नशीब म्हणावं का माहीत नाही, पण 'फास्टर फेणे' किंवा इतर कोणत्याही पुस्तकांच्या आधी माझ्या हाती भागवतांच्या या ज्यूल व्हर्नच्या पुस्तकांचे अनुवाद लागले. किंवा नारळीकर, मोहन आपटे आदिंचीची पुस्तके, व्याख्याने वगैरे ऐकायच्याही कितीतरी आधी ज्यूल व्हर्नने मोहिनी घातली होती. त्यामुळे विज्ञानकथा या नुसत्याच 'अद्भुतकथा' किंवा 'कल्पितकथा' न राहता एकूणच तर्कसंगत विचार करणे, प्रयोगशीलता, भावना आणि प्रत्यक्ष माहिती यांच्यात फरक करून प्रसंगी योग्य निर्णय घेणे, आदी गुणांना बर्‍याच लहान वयात अप्रत्यक्ष प्रेरणा/चालना देणार्‍या ठरल्या. व्हर्न यांच्या कथा आणि नारळीकर आदी प्रभृतींच्या विज्ञानकथा यांत रंजकता नि तर्क समसमान असले तरी भागवतांच्या अनुवादांमुळे मुलांना सहज समजणार्‍या आणि अचूक शब्दरचना, कथेव्यतिरिक्त परिसरातील तपशिलांचे भान, रंजक स्थळयोजना, निरागस पात्रयोजना इत्यादींमुळे व्हर्नकथा मनाचा अधिकच ठाव घेतात.

भागवतांनी ज्यूल व्हर्नच्या अनेक कादंबर्‍यांचा अनुवाद , तर काही कादंबर्‍यांचे रूपांतर केले आहे. कोणत्याही चांगल्या अनुवादाप्रमाणे भागवतांच्या या अनुवादाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मूळ कथांमधील भाव, मूळ लेखनाचे वैशिष्ट्य जपून तसेच्या तसे वाचकांपुढे उभे करणे. स्वतः भागवतांनी म्हटल्याप्रमाणे व्हर्न यांच्या लेखनाचा गुणविशेष म्हणजे पकड घेणारे कथानक आणि त्यातील पात्रांचे नेमके व नेमक्या शब्दयोजनेत झालेले संवाद. अनुवादकाला अर्थातच केवळ पर्यायी शब्द शोधून जोडण्याचे काम नसते, तर ही वैशिष्ट्ये अनुवादातही उतरावी लागतात. भागवत इथेच बहुतांश बाजी मारून जातात. या अनुवादातही संवादांची खुमारी जराही कमी झालेली नाही. मग ते पल्लेदार वाक्यांतील संवाद असोत वा अल्पाक्षरी. परदेशातील कित्येक गोष्टी मराठी वाचकाला - त्यातही कुमारवयीन मुलांना - समजतील असे नाही. हे लक्षात घेऊनच त्याचा अनुवाद इतका 'देशी' करतात की त्या स्थळाची, क्रियेची अगर वस्तूची लगेच कल्पना येते.

आता 'एका चिन्याचा जमालगोटा' ही काही विज्ञानकादंबरी नाही. पण ज्यूल व्हर्नने दीडशे वर्षांपूर्वीच्या चिनी साम्राज्यवादाचे चित्र त्यात रंगवले आहे. त्याचा अनुवाद करताना चिनी वातावरण नेमके उतरतेच, शिवाय पात्रांची नावेही चिनीच (व अगम्य) ठेवल्याने एका नव्या प्रदेशाबद्दलचे मुलांचे कुतूहल तसेच राहते. त्यात एके ठिकाणी त्यांनी केलेल्या चिनी पदार्थांच्या अनुवादाचा नमुना पहा: (कंसातील टिपण्या माझ्या)

स्वैपाकाचा थाट तोंडाला पाणी आणील असा होता. साखरेच्या केका (म्हणजे बहुदा हा केक असावा), खाव्यार मासे (इंग्रजीत Cavior, पर्शियन उच्चार खाव्यार), तळलेले टोळ, सुका मेवा, निंग-पो कालवे (निंग पो हे स्थळाचे नाव आहे, तर कालवे माशांचे. निंग पो हे मासेमारीच्या विशेष तंत्रासाठी पूर्वी प्रसिद्ध असलेले गाव) ). हे खाऊन झाल्यावर पुढे येत होती ती बदकाची नि कबुतराची नि पिवित पक्ष्यांची अंडी (पिवीत पक्षी हा भारतात फारसा नसतो. दक्षिण/पूर्व चीन आणि रशिया व युरोपात आढळतो. तिथे त्याला लॅपविंग म्हणतात. मूळ कथेत बहुदा लॅपविंग हे नाव असावं), जिनत्सान कंदाची कोशिंबीर, गोड्या खारात मिसळलेले देवमाशाचे स्नायू, गोड्या पाण्यातल्या बेटकुळ्या (अर्थात बेडक्या), तळलेले खेकडे, चिमण्यांची आतडी, लसूण भरलेले मेंढीचे डोळे, जर्दाळूच्या शिकरणीत मुळ्यांच्या फोडी (हे काय असावे?), सरबतात घोळलेले बांबूचे कोवळे अंकूर (बांबू तिथे अतीव औषधी मानला जातो), आणि नाना जातींचे मधुर मुरंबे.

या उदाहरणावरून हेही लक्षात यावे की 'लहान मुलांना काय चिमणीची आतडी खातात वगैरे सांगायचे' असा त्यांचा दृष्टिकोन नव्हता, उलट एकीकडे वातावरणनिर्मितीसाठी तेथील नावे, स्थळे तशीच ठेवताना त्या देशातल्या पदार्थांच्या नावांची मात्र कोरडी जंत्री देणे त्यांनी टाळले होते. मुलांना वाचताना तिथे नक्की काय खातात याचा चांगला लेखाजोखा, एका सक्षम व मुलांना समजेल अशा अनुवादातून त्यांनी मांडला होता. केवळ अशा लेखनातच नाही तर विज्ञानकथालेखनातही जेव्हा लहान मुलांसाठी लिहिले जाते व त्याचा अनुवाद करायचा असतो, तेव्हा ही 'नेमक्या' अनुवादाची मेख अधिकच अवघड होते. कारण केवळ अर्थाशी व भावाशी सुसंगत शब्दयोजना पुरेशी नसते, तर वाचकाला - म्हणजे इथे मराठी मुलांना - समजेल व त्याचा कथेत निर्माण झालेला रस, वेग व सातत्यात खंड पडणार नाही अश्या बेताने शब्दनिवड करावी लागते. अर्थात, भागवतांसारख्या कसलेल्या लेखकाला हे फारसे कठीण गेलेले दिसत नाही.

इथे अजून एका बाबतीत भागवतांची कमाल वाटते. या कथांमध्ये अनेक वैज्ञानिक, भौगोलिक विषयातील शब्द येतात. त्यांच्या व्याख्या, यंत्रांची नेमकी रचना, त्या त्या परिसरांचे वर्णन येते. पण हे मराठीत आणताना कुठेही ओढाताण झालीये असे वाचताना वाटतही नाही. प्रत्येक शब्दाला हट्टाने मराठी शब्दनिर्मितीचा बालिश कारखानाही भागवतांनी सुरू केलेला दिसत नाही. 'हवाई हुकूमशहा' व त्यातील 'रोबर' आणि त्याचे यंत्र हा ज्यूल व्हर्नच्या अचाट कल्पनाशक्तीचा नमुना मानला जातो. 'एरोडायनॅमिक्स'मधील अनेक संज्ञा, रोबरने बनवलेल्या यंत्रांचे विभागवार व तपशीलवार वर्णन इत्यादी करताना त्यांनी 'एंजिनियर', 'स्क्रू', 'इन्स्टिट्यूट' इत्यादी शब्द तसेच ठेवले आहेत. इतकेच नाही तर 'एरोप्लेन' किंवा 'आर्थॉप्टर' वगैरेंचे वर्णन करताना मूळ तंत्राचे वर्णन अतिशय नेमके केले आहे. त्यातही अनेक इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. खोल्या, घुमट, शिडे, पंखे वगैरे मुलांना परिचित शब्द एकीकडे वापरताना कप्तानाची खोली न म्हणता 'कॅबिन' हा शब्द मात्र तसाच ठेवला आहे. ज्या कल्पना मुळातच परदेशी आहेत, तिथे देशी शब्द शोधण्यात आपली ऊर्जा न घालवता मुलांना ती माहिती, ते वापरतात त्या भाषेत अधिक सुलभ कशी करून देता येईल याकडे त्यांचे अधिक लक्ष असावे.

आधी म्हटल्याप्रमाणे स्थळे, शहरे, डोंगर/पर्वतांची नावे याचबरोबर कथानकातील पात्रांची नावे देखील पाश्चात्त्यच आहेत व ती तशीच ठेवली आहेत, त्यामुळे त्या त्या देशातील वातावरण, परिसर नेमका चित्रित होतोच; शिवाय कथानक एखाद्या काल्पनिक जागी न घडता अस्तित्वात असलेल्याच (व मुले नकाशात शोधू शकत असतील अशा) जागी घडत असल्याने मुलांना ती कथा काल्पनिक आहे की नाही, असे वाटत राहतेच नि कथेला एक सत्याची चौकट मिळते. अजून एक गंमत जाणवलेली अशी की त्यांनी संवाद लिहिताना कित्येक उद्गारवाचक शब्द, चटकन येणारी संबोधने वगैरे अस्सल मराठी वापरली आहे. हात्तिच्या, अबब!, धत्तेरेकी वगैरे उद्गारांमुळे पात्रांची नावे बाहेरची असली तरी अशा परिचित भाषेमुळे, संवादांमुळे लहानगे वाचक मात्र कथेशी लगेचच जोडले जातात.

भागवतांनी सगळ्याच व्हर्न कथांचे थेट अनुवाद केलेले नाहीत. काही कथांचे त्यांनी भारतीय वातावरणात रूपांतरही केले आहे (चंद्रावर स्वारी, पाताळलोकाची अद्भुत यात्रा). इतकेच नाही तर काही पुस्तकांच्या प्रस्तावनेत मूळ पुस्तकांवर परीक्षणात्मक/चिकित्सात्मक टिप्पणीही आहे.

'पाताळलोकाची अद्भुत यात्रा' या पुस्तकाच्या पूर्वपरिचयात ते म्हणतात, "आजवर आकाश-अवकाशात नि समुद्रावर संचार करणार्‍या ज्यूल व्हर्नने एका विवरात उतरून पृथ्वीचा मध्य गाठायलाही कमी केले नाही! हा चमत्कारिक आणि 'अशक्यप्राय' (कारण पृथ्वी खरोखर पोकळ तरी आहे का?') वाटणारा प्रवास त्याने एका कथानकात गोवला. त्या फ्रेंच कादंबरीचा इंग्रजी अनुवाद म्हणजे जगप्रसिद्ध 'जर्नी टू दि सेंटर ऑफ दि अर्थ '." इथे त्यांची टिपणी एका 'अशक्यप्राय' या शब्दाने संपत नाही. ते प्रस्तावनेत म्हणतात, "पाताळ-लोकाची यात्रा-कथा चित्तथरारक आहे, पण शास्त्रीयदृष्ट्या ज्यूल व्हर्नला न शोभणारी कथा वाटते." मग अशा पुस्तकांची त्यांनी भाषांतरे का केली असावीत, याचे उत्तरही तेच देतात. ते म्हणतात "पाश्चात्त्य देशांत - विशेषतः फ्रान्समध्ये, गिर्यारोहणाप्रमाणे, विवरोतरणाचा छंद म्हणजे एक शास्त्र बनले आहे. नॉर्बर्त कॅस्तरे नावाच्या संशोधकाने ५०० गुहांचे संशोधन करून 'टेन इयर्स अंडर द सी' नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. ही काल्पनिक कथा वाचल्यावर 'ती' सत्यकथाही तुम्हांला कदाचित वाचावीशी वाटेल."

तेव्हा भागवत हे व्हर्नप्रेमी असले तरी एक साक्षेपी अनुवादक होते, असे म्हणता येईल. ते कोणत्या दर्जाच्या पुस्तकांचा अनुवाद करत आहेत, त्याचा उद्देश काय, त्यातून मुलांना/वाचकांना नक्की काय मिळू शकेल, त्यांनी नक्की काय घ्यावे, कोणत्या कल्पनांकडे लक्ष देऊ नये इत्यादी बाबी त्यांच्यासाठी स्पष्ट होत्या. आता जालावर ज्यूल व्हर्नच्या सगळ्या कथांचा संग्रह विकत मिळतो. त्यातील काही कथांचे संक्षेप प्रकाशित झाले आहेत. मात्र ते संक्षेपही कथांची व अनुवादाची खुमारी दाखवून देण्यास पुरेसे आहेत, असे वाटते.

परदेशात 'व्हर्नीश' लोकांचा कल्ट असतो. आपण 'व्हर्न परंपरा' चालवतो सांगणे लेखकांना सांगणे भूषणावह वाटते. मात्र भारतात, मराठीत व्हर्न मुलांपर्यंत पोचला तो भागवतांच्या शब्दांत! तेव्हा भागवत हेच आमचे मराठी व्हर्न. दुर्दैव हेच की इतक्या लालित्याने भरलेले, अद्भुतरसाने परिपूर्ण तरीही भरपूर माहिती देणारे बालवाङ्मय, त्यानंतर मराठीत (मारून मुटकून करायचाच तर नारळीकरांचा अपवाद करता येईल; पण तोही 'प्रेषित' वगैरे त्यांच्या सुरुवातीच्या कादंबर्‍यांपुरताच) अजिबातच दिसत नाही. स्वतः लिहिलेले तर नाहीच, पण अनुवादितही नाही. जसा व्हर्न कल्ट निर्माण झाला तसा भागवतांचा कल्ट निर्माण झाला असता, तर इथल्या मुलांचे भाग्य फळफळले असते. मराठी मुलांना अजूनही भागवतांच्याच या अनुवादित पुस्तकमालिकेचा आधार असावा, ही भागवतांची कमाई की मराठी सारस्वताची ढळढळीत मर्यादा, असा प्रश्न राहून राहून पडतो.

असो. या पुस्तकांचे नि त्या योगे भागवतांचे माझ्यासारख्या अनेकांवर मोठे उपकार आहेत. 'फास्टर फेणे'सारख्या तद्दन देशी हिरोने आमचे विश्व व्यापण्यापूर्वी भागवतांनी अनेक वैज्ञानिक कल्पनांची बीजे आमच्यात पेरली. आमच्यातला प्रत्येक जण शास्त्रज्ञ झाला असं नाही; पण जी वैज्ञानिक, शास्त्रकाट्याची कसोटी लावण्याची वृत्ती आमच्यात निर्माण झाली त्याबद्दल भागवतांप्रती कृतज्ञतेशिवाय दुसरी भावना मनाला शिवत नाही.
---

सर्व चित्रे जालावरून साभार.

***
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त आहे लेख. मी ज्यूल व्हर्नच्या सगळ्या कादंबर्‍या वाचल्या नव्हत्या. 'चंद्रावर स्वारी'सारख्या काही मोजक्याच कादंबर्‍या वाचल्या होत्या. या उपक्रमाच्या निमित्तानं त्या वाचल्या, तेव्हा हे किती मोठं काम आहे ते लक्षात आलं. तू नशीबवान. तुला मामा लवकर भेटला!

बाकी 'जमालगोट्या'तील पदार्थांचे वर्णन आवडण्यात आल्या गेले आहे!

एका बाबतीत मात्र असहमती आहे. मराठीत भागवतांचा कल्ट निर्माण झाला 'असता तर?' म्हणजे? तसा तो झालाच! त्याची नाळ पुढच्या पिढीशी जोडली गेलेली आहे का, हा मात्र प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कल्ट फक्त फाफेचा निर्माण झाला असे कसेबसे म्हणता येईल, पण भागवतांचा? मोठं धाडसी विधान होईल! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय की... इंग्रजीशी तुलना करता मराठीतला साहित्यव्यवहार केविलवाणा वाटतो, संख्याबळ आणि उलाढालींचं स्वरूप, या दोन्हीमुळेही. दोन्हीच्या पातळीत फरक आहे हे मला मान्यच आहे. पण इंग्रजीशी तुलना न करता फक्त मराठी बालसाहित्याकडे पाहिलं, तर भागवतांचं नाव प्रचंड मोठं आहे. इतकं, की अनेक महत्त्वाची, आपापल्या काळात धूमकेतूसारखी उगवून नाहीशी झालेली, नावं त्यामुळे झाकोळून गेलेली, प्रभावित झालेली दिसतात. हा मराठी बालसाहित्याच्या टिकलीएवढ्या विस्तारापेक्षाही भारांच्या कामाच्या प्रचंड आवाक्याचा आणि त्यांच्या धमाल भाषेचाच परिणाम असणार, असं मला वाटतं.

पुलं जसे आणि जितके मोठे झाले, टिकून राहिले, त्यांनी एका प्रकारे मराठी साहित्य जसं 'डिफाईन' केलं (त्याचे तोटे निराळे, पण ते चर्चायची जागा ही नव्हे); तसंच आणि तितकंच काम भारांनी मराठी मुलांसाठी केलं. त्याचेही तोटे असतीलच... पण त्याबद्दल समकालीन बालसाहित्यकारांनी बोललं पाहिजे.

छ्या! 'कल्ट'वरून बरंच वाहवत गेलं हे प्रकरण. या धाग्यावरच्या अवांतराकरता स्वारी. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

व्हर्नीश हा कल्ट आहे तो लेखकांचा नी लेखनशैलीचा आहे, वाचकांचा नव्हे!
त्या अर्थाने भागवत आपल्या लेखनाचा, शैलीचा कल्ट घडवू शकले नाहीत. मी "भागवतीश" (व्हर्नीशच्या चालीवर) लेखन करतो असे कोणी म्हणणारे झाले नाही.

पुलंचं तसं नाही, त्याच्या लेखनशैलीची भलीबुरी (बहुतांश बुरीच) नक्कल अनेकांच्या लेखनात उतरली. त्यांचा (नेमाड्यांचाही) कल्ट झाला असे म्हणता येईल

या समांतराला आता माझ्याकडूनही विराम! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या चर्चेत अवांतर काय आहे?

भारा भागवतांविषयीच्या आदरातून हा अंक, फीचर बनवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून, औचित्याचं भान ठेवून योग्य शब्दांत अशी चर्चा व्हायला काहीच हरकत नसावी किंवा ते अवांतरही नसावं.

भारा भागवतांचा कल्ट होता आणि पिढीसोबत मागे गेला असला तरी अजूनही तो आहे हे नि:संशय.

फक्त फाफे नव्हे, इथेच उल्लेखलेल्या व्हर्नीय कथा, खजिनाकथा, साहसकथा या प्रकारात मराठी भाषेत भारांसारखं आणि भारांइतकं कोणी लिहिलेलं नाही. एका मोठ्या एक्स-कुमारवयीन गटावर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे.

पुलंच्या लिखाणातले उल्लेख नेहमीच्या संभाषणात वापरताना जसे संदर्भ द्यावे लागत नाहीत तसेच या भाराप्रेमी गटाला भारांच्या प्रसिद्ध लिखाणापैकी कशाचाही उल्लेख केल्यास अधिकचे संदर्भ द्यावे लागत नाहीत.

कल्ट अर्थातच इंग्रजी किंवा हिंदी सिनेमांच्या कल्टच्या मानाने छोट्या आकाराचा आहे. हे मान्यच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भाषांतरित कथानमधे त्यांचा नक्कीच cult होता. त्यांच्यासरखा मराठी अनुवाद तो अनुवाद न जाणवत करणारा लेखक मराठीत अगदीच एक दोन. कुमारसाहित्यत (अत्यंत दुर्लक्षीत प्रकार )तर हे एकटेच. लेख अर्थातच खूप आवडला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0