उदे उदे गं!

उदे उदे गं!

- स्नेहल नागोरी

.भा. रा. भागवत माझ्या कुमारवयातल्या वाचनाचा महत्त्वाचा भाग होते. लेखक, त्याची विशिष्ट लेखनशैली असं काही प्रकरण असतं हे समजण्यापूर्वी त्यांची बरीच पुस्तकं मला आवडायला लागली होती. भारा त्यांच्या गोष्टींमध्ये वाचकाला सामावून घेत असत. त्यांनी शब्दबंबाळ लेखन केलं नाही, पण त्यांनी केलेलं वर्णन थेट चित्र डोळ्यासमोर उभं करतं. भारांबद्दल बोलायचं झालं तर असंख्य गोष्टी आहेत. स्वत:च्या भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि परकीय भाषेतील अमर्याद वाचन यांमधून त्यांनी मराठी भाषेत वैज्ञानिक बालसाहित्याचं एक नवं दालन उघडून दिलं. परदेशी अनोळखी वातावरणाला देशी लिहाज चढवून संहितेचे मूळ सौंदर्य न घालवता रूपांतरं करण्यात भारांचा हातखंडा होता. ती रूपांतरं अगदी अस्सल मराठमोळ्या मातीत रंगलेली वठत. त्यातलं मला सगळ्यांत आवडणारं पुस्तक म्हणजे 'भुताळी जहाज'.

भारांनी साहसांच्या थरारक गोष्टी लिहिल्या, गूढ आणि सुरस गोष्टीही लिहिल्या, पण पूर्वजन्म-पुनर्जन्म-भुतंखेतं अशा संकल्पना त्यांनी अजिबात हाताळलेल्या नाहीत.

'भुताळी जहाज' हा एकच सणसणीत अपवाद.

पेशवाईच्या उत्तरार्धात पार जपानच्याही पुढच्या समुद्रात जहाज घेऊन जाण्याचं धाडस दाखवणाऱ्या उदाजीरावांच्या खापरपणतूने उदाजीरावांच्या हरवलेल्या जहाजाचा शोध कसा लावला, याची शब्दचित्रकथा म्हणजे 'भुताळी जहाज'. प्रवीण पतंगे हा या गोष्टीचा नायक. प्रवीणचे खापरपणजोबा असलेल्या उदाजीरावांनी 'जय मल्हार' नावाचं एक लढाऊ जहाज घेऊन चाचे लोकांचा पाठलाग केला. या पाठलागात ते पार जपानच्याही पुढे पोचले. पण तिथून ते कधीच परतले नाहीत. पुढे त्यांचं काय झालं याचाही काहीच पत्ता लागला नाही. प्रवीणचे वडील जयाजीराव पतंगे यांनी उदाजीरावांच्या जहाजाचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ८ शिडांचं एक जहाज खरेदी केलं. त्याचं नाव 'अष्टावसू'. पण या शोधमोहिमेवर असतानाच त्यांना मरण आलं. प्रवीणला लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीत, ही कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी प्रवीणनं घ्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून ठेवली होती.

प्रवीणनं त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 'पुनर्वसू' नावाच्या नव्या जहाजातून त्यानं केलेल्या शोधप्रवासाची ही गोष्ट. या शोधात प्रवीणला आणि त्यांच्या साथीदारांना चक्क एका भुताळी जहाजाचं मार्गदर्शन मिळालं आणि अनेक संकटांना तोंड देत ही सफर यशस्वी झाली.

जहाजाचं वर्णन जरी 'भुताळी' अशा विशेषणानं केलेलं असलं, तरी भूत म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर ज्या भीतिदायक प्रतिमा उभ्या राहतात, त्याहून अगदी विरोधी स्वभावाचं हे जहाज आहे. जपानच्या आसपासच्या समुद्रात वावरणाऱ्या सगळ्या खलांश्यांमध्ये या जहाजाबद्दल चर्चा रंगत असते.. ते जहाज - ना अभद्र आहे, ना जीवघेणं. पण त्याच्याभोवती सांगता न येणाऱ्या कसल्यातरी गूढाचं वलय आहे, एवढं मात्र नक्की. या भुताळी जहाजाचं फार सुरेख वर्णन भारा करतात. 'क्षितिजावरील धुसर धुक्यातून झळाळत बाहेर पडणारं ते स्वर्गीय जहाज, त्याची राजहंसाच्या डौलाची चाल आणि त्याच्या पंखांप्रमाणे दिमाखाने फडफडणारी पांढरीशुभ्र शिडं' ही पुस्तक संपल्यानंतरही बराच काळ आपल्या नजरेसमोर तरळत राहतात. समुद्राच्या प्रवासात अनुभवास येणारे हवामानाचे टोकाचे बदल - म्हणजे प्रचंड कोंदट, घामेजून टाकणारा असह्य उकाडा आणि कपड्यांचे थर चढवूनही हाडांपर्यंत शिरणारी बोचरी थंडी - यांचं वर्णन थेट शारीर अनुभूती देऊन जातं. समुद्राच्या पार्श्वभूमीवर उलगडत जाणाऱ्या या गोष्टीला खाऱ्या पाण्याचा - खाऱ्या वाऱ्याचा 'फील' आहे असं वाटत राहतं.

सरतेशेवटी प्रवीणच्या जहाजावर कोसळणारी संकटं, तिथं घडणारी कटकारस्थानं, या सगळ्यांवर मात करत प्रवीण त्याच्या ध्येयापर्यंत पोचतोच.

इंजीन बंद पडल्यामुळे शिडाच्या आधारे चालणारं जहाज अनेकदा मृत्युसंकटातून वाचतं, त्यात भुताळी जहाजाचा मोठा वाटा असतोच. पण कप्तान आणि खलाशी यांनी वारंवार प्रयत्न करूनही भुताळी जहाजानं दाखवलेल्या वाटेखेरीज इतर कुठल्याही मार्गावर जाणं त्यांना अशक्य होतं. खलाशांच्या इच्छेप्रमाणे किनारा गाठण्याचे प्रयत्नही फोल ठरतात. भुताळी जहाज त्यांना एका विशिष्ट मार्गावर हाकारत राहतं.

गंमत म्हणजे या पुस्तकाखेरीज इतर कुठेही भारा इतिहास वा पुराणकथांच्या आकर्षणात गुंतलेले दिसत नाहीत. पण या गोष्टीला मात्र एक मराठमोळा ऐतिहासिक-पौराणिक बाज आहे. 'उदे उदे गं, उदे उदे गं' अशी अंबेची हाक आणि भंडाऱ्याच्या पिवळ्या रज:कणांनी भारून टाकलेलं ते भुताळी जहाज थेट आंग्र्यांच्या आरमारातून अवतरलेलं गुराबा जातीचं ऐटबाज लढाऊ जहाज आहे. त्याचा उंचावणारा बाकदार पुढा आणि त्याच्यावर केलेलं नक्षीकाम, जुन्या मजबूत लाकडांचा काठ, काळ्या रोगणाच्या गुळगुळीत, भक्कम नि उंच डोलकाठ्या, त्यावर फडफडणारे भगवे ध्वज, तक्तपोशीवरच्या देवदार लाकडाच्या फळ्या, त्यावर पडलेला ऐतिहासिक धाटणीचा कर्णा आणि तुतारी; यांखेरीज जहाजावर सापडलेली विविध हत्यारं - तलवारी, ढाली, कट्यारी, जंबिये, भाले... हे सगळं आपल्याला थेट मराठी आरमारात घेऊन जातं.

नुसतं समुद्राचं आणि प्रवासाचं वर्णन करून भारा थांबत नाहीत, तर प्रवीण आणि साथीदारांच्या सफरीचा एक नकाशाही पुस्तकात देतात. मजा म्हणजे, हा नकाशा काल्पनिक गोष्टीसाठी काढलेला असला, तरी तो काल्पनिक प्रदेशाचा नाही. तो खऱ्या भूगोलाचे मार्ग अनुसरत जातो.

भारांच्या लेखनात मला सतत जाणवणारी गोष्ट म्हणजे वयाला शोभेल असा समजूतदारपणा असलेले त्यांचे नायक आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला समजून घेणारी, त्यांच्याशी मैत्री असलेली, त्यांच्या जवळची मोठी माणसं. भारांच्या लेखनकाळात ही गोष्ट फारशी प्रचलित नव्हती. मुलांना समजून न घेणारी, 'त्यांना काही समजत नाही' असं म्हणत त्यांची मतं धुडकावून लावणारी मोठी माणसं, ही खरं तर 'टिपिकल' मराठी संस्कृती. पण भारांनी ती सपशेल मोडून काढली. या पुस्तकातले कॅप्टन नायर किंवा शामूभय्या काय, 'फाफे'मधले सुर्वे सर किंवा इन्स्पेक्टर बखले काय, अशी अनेक उदाहरणं देता येतील. ही सगळी मोठी माणसं मुलांच्या मताला महत्त्व तर देतातच, पण साहस करायला प्रोत्साहनही देतात; एवढंच नाही, तर त्या साहसांत सहभागीही होतात.

भारा वेगवेगळ्या प्रदेशांचं अप्रतिम आणि चित्रदर्शी वर्णन करतात. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे गोष्टीच्या ओघात ते त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीची नेमकी वैशिष्ट्यं गोष्टीत सहजपणे गुंफतात. भारतातून जपानला जाणाऱ्या जहाजाच्या मार्गाचं प्रवासवर्णन करताना नागासाकीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे ते आशिया-पॅसिफिफ मार्गाने होणाऱ्या व्यापाराचं प्रवेशद्वार बनलं आहे आणि महायुद्धातल्या अणुहल्ल्यानंतर जपान्यांनी तिथे अवघ्या २० वर्षांत उत्तम बंदर उभं केलं आहे, अशी माहिती भारा सहजपणे नोंदवून जातात.

भारांच्या सगळ्या लेखनाचा शेवटही नीट, रीतसर केलेला असतो. त्यांनी गोष्टींचा शेवट कधीच संदिग्ध किंवा अर्धवट सोडलेला नाही. लहान असताना मला सगळ्या गोष्टी अशाच नीटपणे संपलेल्या आवडत. लहानपणी का म्हणा, अजूनही गोष्टींतल्या सगळ्या भागांची शेवटची टोकं नीट जुळवून संपवलेली गोष्ट मला अधिक समाधान देते. भारांच्या जवळजवळ सगळ्याच गोष्टींचा शेवट '... and they lived happily ever after… ' अशा बाजाचाच आहे. पूर्वजांचा मिळालेला खजिना प्रवीणला देताना भारा सगळ्या कायदेशीर बाबी आणि अर्थात नैतिक बाजू व्यवस्थित सुरळीत करून घेऊन मगच त्याला तो खजिना प्राप्त होऊ देतात. 'प्रतापगडावर फाफे'मध्येही फाफेला सापडलेला गडावरचा खजिना तो कोयना भूकंपनिधीला देऊन टाकतो, फक्त एक माणिक तेवढं चुकून त्याच्याकडे राहतं, त्याची इथे आठवण येते!

लहान मुलांसाठी लिहिलेली जादुई आणि भुताखेतांच्या गोष्टी असलेली पुस्तकं मोठेपणी त्यातली जादू हरवून बसतात. पण भारांचं हे पुस्तक मात्र तसं नाही. इतक्या वर्षांनंतर एक अडल्ट म्हणून वाचतानाही त्यातला थरार जसाच्या तसा जिवंत आहे.

असे बालसाहित्यिक खूप कमी असतात, ज्यांचं लेखन वेगवेगळ्या वयात आणि बदललेल्या दृष्टिकोनातून वाचलं, तरीही ते कालबाह्य वाटत नाही. आपण आजही त्या लेखनापेक्षा मोठे झालेले नसतो.
***
'भुताळी जहाज'चे मुखपृष्ठचित्र: जालावरून साभार
प्रवीणच्या प्रवासमार्गाचे चित्रः स्नेहल नागोरी यांच्याकडून

***
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला स्नेहल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलाही हे पुस्तक आवडल्याचं आठवतंय.. लेख वाचताना स्मरणरंजन झाले!

शिवाय, फाफे, बुकलवार यांच्याव्यतिरिक्त असलेल्या मुख्य पात्रांना घेऊन लिहिलेल्या पुस्तकाबद्दल तपशीलवार यावं हे या अंकात वेगवेगळे पैलु उलगडण्याला साजेसेच!

परिचयही सुरेख उतरलाय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!