बाल'मित्र'!

बाल'मित्र'!

- सुबोध जावडेकर

.
सुमारे साठ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळी मी प्राथमिक शाळेत होतो. एका मराठी मासिकाचा अंक पोस्टानं माझ्या पत्त्यावर आला. अंकाचं नाव होतं 'बालमित्र'. रॅपरवर माझं नाव वाचून झालेला प्रचंड आनंद मला आजही आठवतो. माझ्या वडिलांनी माझ्या नावानं त्या मासिकाची वर्गणी गुपचूप भरली होती. चक्क आपल्या नावावर हा अंक आला याचं मला इतकं अप्रूप वाटलं होतं की त्या दिवशी संध्याकाळी खेळायला न जाता तो अंक वाचून संपवला. तो पुरा झाला तेव्हाच जेवायला उठलो. मग हा नित्यक्रमच झाला. दर महिन्याला 'बालमित्रा'ची वाट पाहायची. अंक आला की रॅपरवरचं आपलं नाव डोळे भरून पाहायचं आणि मग अंकाचा फडशा पाडायचा. त्यातला मजकूर इतका गुंगवून टाकणारा असे, की खेळाचीच काय पण जेवणाचीही शुद्ध राहत नसे.

तसं आमच्या घरात वाचनाचं वातावरण होतं. मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं आणली जात. आमच्याकडे येणारे बहुतेक पाहुणे माझ्यासाठी साने गुरुजींचं 'श्यामची आई' नाहीतर 'धडपडणारी मुले' घेऊन येत. (त्यामुळे माझ्याकडे 'श्यामच्या आई'च्या सात प्रती जमल्या होत्या आणि 'इसापनीती'च्या तेरा!). 'शालापत्रक' नावाचं, शाळेच्या वेळापत्रकाची कटू आठवण करून देणारं, एक मासिक होतं. 'आनंद' नावाचं एक मासिकही अधूनमधून येत असे. 'चांदोबा'चा अंकही यायचा. बऱ्याचशा वर्तमानपत्रांत रविवारी मुलांसाठी मजकूर असे. 'साधना' नियमित यायचा. त्यात मुलांसाठी एक पान असे. दर वर्षी त्याचा एक कुमार-अंक काढत असत. पण इतकं असलं, तरी 'बालमित्र'ची सर कशालाही नव्हती. असं काय असे 'बालमित्र'मध्ये?

तसं पाहिलं तर 'बालमित्र' अगदी साधा असे. त्यात चित्रं असत. पण ती 'चांदोबा'त असत तशी रंगीत नसत. खेळ, कोडी, विनोद, चुटके हे सगळं जसं 'बालमित्रा'त असे, तसं मुलांसाठी असलेल्या सगळ्याच मासिकांत असे. पण तरीही 'बालमित्र' वेगळा वाटे तो त्यातल्या मजकुरामुळे. त्यातला मजकूर मुलांसाठी असे; पण त्यात मुलांकडे लहान 'पोर' म्हणून पाहिलेलं नसे, तर छोटा 'माणूस' म्हणून पहिलेलं असे. तो वाचताना आपल्याला कुणीतरी बरोबरीच्या नात्यानं वागवतंय, खांद्यावर हात टाकून बोलतंय, असं वाटत असे. त्यांत मुलांना उपदेशाचे डोस पाजलेले नसत. ते वाचल्यानं मुलांवर चांगले संस्कार होत असत; पण ते कळत नकळत. संस्कार करण्याचा अट्टाहास त्यात नसे.

हे सगळं अर्थातच त्या वेळी कळत नव्हतं. ते आज लक्षात येतंय! पण मुलांसाठी असलेल्या सगळ्या पुस्तकांपेक्षा आणि इतर मासिकांपेक्षा 'बालमित्र' निराळा आहे, आपला मित्र आहे, हे कुठंतरी नक्कीच जाणवत असणार. ही सगळी भा. रा. भागवत या व्यक्तीची करामत होती. खऱ्या अर्थानं ते बालमित्र होते.

'बालमित्रा'च्या अंकावर संपादक म्हणून भारांचं नाव असायचं. पण ते तेव्हा आमच्या गावीही नसे. मासिकाला संपादक असतो, तो ते मासिक काढतो, मासिकला रूप देतो, हे समजण्याची अक्कलच त्या वयात नव्हती. खरं सांगायचं तर लेखकाच्या किंवा कवीच्या नावाकडे तेव्हा लक्षही जात नसे. एखादी गोष्ट किंवा कविता आवडायची. ती कुणी लिहिली आहे, त्याला आमच्या लेखी महत्त्व नसेच मुळी!

जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचे मराठीत केलेले अनुवाद 'बालमित्रा'त क्रमशः प्रसिद्ध होत. भारा स्वतःच त्यांची रूपांतरं करत असत. त्यातली पात्रं मराठी नावं घेऊन, मराठी पेहराव चढवून येत. त्यामुळे ती परकी वाटत नसत. आपल्याच देशात राहणारी, आपल्या संस्कृतीत वाढलेली, आपली भाषा बोलणारी माणसं वाटत.

'बालमित्रा'त अगदी सुरुवातीला वाचलेली कादंबरी म्हणजे 'मायापूरचे रंगेल राक्षस'. त्याआधी कितीतरी गोष्टींमध्ये राक्षस भेटलेले होते. पण ते अक्राळविक्राळ रूपातले. अगडबंब शरीराचे. माणसांना भाजून खाणारे. राजकन्येला पळवून नेऊन तुरुंगात डांबणारे. राजपुत्राचा कुत्रा नाहीतर कावळा करून टाकणारे. मायापूरचे राक्षस मात्र आकारानं अगडबंब असले तरी आधीच्या राक्षसांसारखे दुष्ट नव्हते, प्रेमळ होते - एवढंच आठवतं. बाकी कथानक काही आठवत नाही, पण हे काहीतरी वेगळं आहे, नेहमीच्या पठडीतलं नाही, हे आत कुठंतरी तेव्हाही लक्षात आलं होतं. एका गावातले राक्षस दुसऱ्या गावातल्या राक्षसांकडे पाहुणे म्हणून जेवायला येतात तो त्यातला प्रसंग मात्र चांगलाच आठवणीत आहे. कारण त्या प्रसंगात जेवायला जिलबी, लाडू, श्रीखंड अशी पंचपक्वान्न तर केलेली असतातच पण प्यायला पाण्याऐवजी उसाचा रस ठेवलेला असतो. त्या काळी रस्तोरस्ती उसाच्या रसाची दुकानं नव्हती. क्वचित कधीतरी, सठीसामाशी शेतावरच्या गुर्‍हाळात गेलं, तर रस मिळायचा. अशा काळात प्यायला पाण्याऐवजी उसाचा रस - या कल्पनेनं तोंडाला किती पाणी सुटलं असेल, याची कल्पना आजच्या पिढीला करताच येणार नाही.

त्यानंतर वाचली, ती 'जाईची नवलकहाणी'. लुई कॅरॉलच्या 'अॅलिस इन वंडरलँड'चा हा भावानुवाद. तो भागवतांनी इतका सरस केला आहे की मूळ कादंबरी परकीय आहे याचा पत्ताच लागत नाही. शांता गोखलेंसारख्या काही तज्ज्ञांच्या मते, मूळ कादंबरी दुसऱ्या भाषेत आहे याचा पत्ता न लागणे हे काही चांगल्या अनुवादाचं लक्षण नव्हे. अनुवादात मूळ भाषेचा लहेजा प्रकटला, मूळ वातावरणाचा 'फील' आला, तरच तो चांगला अनुवाद. या व्याख्येनुसार 'जाईची नवलकहाणी' हा काही चांगला अनुवाद ठरत नाही. कारण त्याला 'अॅलिस इन वंडरलँड'चा स्वाद नाही. त्यातली जाई ही 'अॅलिस' न वाटता एक मराठी मुलगी वाटते, असं म्हणून कुणी कितीही नाकं मुरडली तरी बालवाचकांना मात्र त्यात जाईच्या रूपानं शेजारच्या घरात राहणारी मैत्रीण भेटते. 'जाईची नवलकहाणी'मध्ये ससा बोलतो. कासव बोलतं. झाडं बोलतात. पत्त्यातले राजाराणी बोलतात. वस्तुही बोलतात. पण तसं तर सगळ्याच गोष्टींतले पशुपक्षी बोलत असतात. नेहमीच बोलतात. हसतात. रडतात. गातात, नाचतात. इसापनीतीत आणि पंचतंत्रात तर प्राणी युक्तीच्या चार गोष्टीही सांगतात. मग 'जाईची नवलकहाणी'मध्ये असं वेगळं काय आहे, की ती सगळ्या वयाच्या वाचकांना इतकी आवडावी? या प्रश्नाचं उत्तर मला अगदी अलीकडं मिळालं. ते मिळालं 'आशय'च्या या वर्षी प्रसिद्ध झालेल्या विशेषांकातल्या 'वाचनाचेनी आधारे...' या डॉ. आनंद जोशींनी लिहिलेल्या लेखात. एखादी गोष्ट आपल्याला अगदी ठासून, ठामपणे सांगितली तर ती आपल्यापर्यंत पोचत नाही. कानापर्यंत पोचते पण अंतःकरणापर्यंत जात नाही. पण तीच जर सूचकतेनं सांगितली तर मात्र पटते, मनाला भावते. जे सूचक असतं त्याचा आपण आतिथ्यशीलतेनं स्वीकार करतो. तेच जर जोरानं, ओरडून, कंठाळी स्वरात सांगितलं तर आपण त्याचा तिरस्कार करतो. जाईची नवलकहाणीमध्ये लेखकला जे सांगायचं आहे ते अतिशय तरलपणे, सूचकतेनं वाचकासमोर येतं, वाचकांच्या हृदयाला हात घालतं. ही किमया भारांची की लुई कॅरॉलची? सांगता येणार नाही. पण मला वाटतं, त्यातली जाई ही दूर देशीची अॅलिस न वाटता शेजारी राहणारी आपली मैत्रीण वाटते, त्यामुळे हे घडत असावं. यात भागवतांच्या लेखणीचा वाटा निश्चितपणे अतिशय मोठा आहे.

'बालमित्र'मध्ये 'चंद्रावर स्वारी' या कादंबरीचा पहिला भाग मी वाचला आणि मी थरारूनच गेलो. राजाराण्यांच्या गोष्टी खोट्याखोट्या असतात हे तोपर्यंत कळायला लागलं होतं. प्रेमकथा वाचायचं वय अजून झालं नव्हतं. अशा आडनिड्या वयात दर्जेदार सायन्स-फिक्शन वाचायला मिळणं हा खरोखरच भाग्ययोग होता. 'चंद्रावर स्वारी' हे 'फ्रॉम अर्थ टू द मून' या ज्यूल व्हर्नच्या कादंबरीचं भारतीय रूपडं होतं. नेमका त्याच सुमारास रशियानं अंतराळात पहिला 'स्पुटनिक' उपग्रह सोडला आणि चंद्रप्रवास अचानक शक्यतेच्या कोटीत आला. चंद्रावरच्या स्वारीत एक आगळा वेगळा रंग भरला गेला. भारांनी मला अंतराळयुगात आणून ठेवलं होतं.

'चंद्रावर स्वारी'मध्ये वाचलेला एक प्रसंग मला अजून आठवतो. अंतराळयानातल्या हवेचं शुद्धीकरण करणाऱ्या यंत्रात काहीतरी बिघाड होतो. ऑक्सिजनची पातळी बरीच वाढते. त्याचा परिणाम अंतराळयानातल्या सर्व जणांवर होतो. ते वेड्यासारखे वागायला लागतात. ''चंद्रावर जायचंय आम्हांला, माझं मत गामाला'' असं काहीबाही बरळायला लागतात. (अल्फा, बीटा आणि गामा ही त्यांच्या कुत्र्यांची नावं. ती त्यांनी बरोबर घेतलेली असतात. तीही वेड्यावाकड्या उड्या मारत भुंकायला लागतात). हे अंतराळप्रवासी आधीच थोडे चक्रम असतात. त्यात ऑक्सिजन प्यायलेले! मग काय विचारता? ऑक्सिजन पिऊन धिंगाणा घालायचा हा प्रसंग भागवतांनी असा काही रंगवलाय की ज्याचं नाव ते!

'चंद्रावर स्वारी' पाठोपाठ 'अदृश्य माणूस' आली. हे एच. जी. वेल्सच्या 'इन्व्हिजिबल मॅन'चं भाषांतर. आपण अदृश्य होऊन धमाल करावी, हे लहानपणी प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण अदृश्य होऊन जगताना प्रत्यक्षात किती अडचणी येतात ते 'इन्व्हिजिबल मॅन' वाचताना लक्षात येतं. या खेपेस भागवतांनी वेल्सच्या कादंबरीचं भाषांतरच केलं आहे. रूपांतर नाही. पात्रांची नावं, स्थळं सगळी परकीय. त्यामुळे शंभर वर्षापूर्वीचं युरोपातलं खेडं, त्यातली खेडवळ माणसं, तिथली खानावळ, सभोवार पसरलेलं धुकं, साठून राहिलेला धूर, सारं काही साक्षात डोळ्यासमोर उभं राहत असे. भागवतांनी या कादंबरीत 'इन्व्हिजिबल मॅन' या मूळ कलाकृतीचा, त्यातल्या वातावरणाचा 'फील' दिला आहे.

मग 'बालमित्रा'त 'झपाटलेला प्रवासी' आणि 'समुद्र-सैतान' या नावानं ज्यूल व्हर्नच्या 'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज' व 'ट्वेंटी थाउजंट लीग्स अंडर द सी' ची भाषांतरं एकामागोमाग एक क्रमशः प्रकाशित होऊ लागली. यांतही भागवतांनी पात्रांची मूळ नावं कायम ठेवली आहेत. 'फिलियस फॉग' आणि 'कॅप्टन नेमो'चं 'फाल्गुनराव फुगे' आणि 'कप्तान नेमाडे' केलेलं नाही. ते अर्थातच योग्य आहे, कारण या पात्रांना मराठी साज चढवला असता तर ते फार विनोदी झालं असतं. अलीकडे काही लग्नसभारंभांत सूटबूट घालून डोक्यावर पगडी घालायची फॅशन आली आहे, तसं! या कादंबऱ्या जेव्हा 'बालमित्रा'त प्रसिद्ध होत असत, तेव्हा कथानायकाला एखाद्या बिकट परिस्थितीत सोडून देऊन भागवत 'मग पुढे काय झाले ते पुढील अंकात वाचा' अशी घोषणा करत आणि कथानकावर पडदा टाकत. तेव्हा मात्र मला त्यांचा फार राग येत असे. कारण महिन्यानंतर पुढचा अंक येईपर्यंत माझा जीव टांगणीला लागलेला असे.

भारांनी भाषांतर केलेल्या ज्यूल व्हर्नच्या बाकी कादंबऱ्या ('पाताळलोकची अद्भुत यात्रा', 'सूर्यावर स्वारी' आणि 'मुक्काम शेंडेनक्षत्र') या मात्र 'बालमित्रा'त आल्या नाहीत. कारण तो पर्यंत 'बालमित्र' बंद पडलं होतं. ते चालवताना भागवतांना खूप कर्ज झाल्यामुळे नाईलाजानं त्यांना ते बंद करावं लागलं. पण त्यांची दानत अशी की वर्गणीदारांची उरलेली वर्गणी त्यांनी इमानदारीत परत केली. प्रचंड गाजावाजा करून एखादं नवं मासिक सुरू करत असल्याची घोषणा करायची, लोकांकडून हजारो रुपये वर्गणीच्या रूपानं गोळा करून आपलं 'घरदार' भरून घ्यायचं आणि नंतर काखा वर करून लोकांच्या तोंडाला पानं पुसायची, ही पंधरावीस वर्षांपूर्वी घडलेली हकिगत अजूनही काही जणांना आठवत असेल. या पार्श्वभूमीवर, भागवतांनी स्वतः कर्जात असूनही वर्गणीदारांची उरलेली पैन् पै चक्क मनीऑर्डरनं परत केली होती, ही दंतकथा वाटण्याची शक्यता आहे.

भारांनी अनुवादित केलेल्या एच. जी. वेल्स आणि ज्यूल व्हर्न यांच्या कादंबऱ्यानी मला विज्ञानसाहित्याची ओळख करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा जन्मभर ऋणी राहीन. 'अपोलो' चांद्रमोहिमेत भाग घेतलेले अंतराळप्रवासी आणि त्या प्रकल्पावर काम करणारे कितीतरी शास्त्रज्ञ 'व्हर्नच्या कादंबऱ्यानी आम्हाला प्रेरणा दिली' असं सांगतात. मला वाटतं, आज 'नासा' आणि 'इस्रो'त काम करणाऱ्या मराठी शास्त्रज्ञांना विचारलं तर 'भारांनी अनुवादित केलेल्या विज्ञानकादंबऱ्यांनी आम्हांला हे क्षेत्र निवडायची प्रेरणा दिली', असं बरेच जण सांगतील. इतकंच नव्हे; तर विज्ञानाच्या इतर क्षेत्रात काम करणारे कितीतरी जणही हेच सांगतील.

मी काही समीक्षक नाही. एक साहित्यिक म्हणून भा. रा. भागवतांचे स्थान, त्यांचे गुणावगुण, त्यांची बलस्थानं, त्यांच्या मर्यादा ह्यांविषयी मला फार काही सांगता येणार नाही. भागवतांचे लेखन मी ज्या वयात वाचलं, त्या वयात हे सगळं जाणण्याइतकी समज नव्हती. (आताही आहे याची खात्री नाही). पण एक विज्ञानकथा लेखक म्हणून भागवतांनी मला खूप काही दिलं. विज्ञानसाहित्याची केवळ ओळख करून दिली असं नाही, तर विज्ञानसाहित्याकडे बघायची एक दृष्टी दिली. विज्ञानसाहित्यातून विज्ञानातला थरार जाणून घ्यायचा असतो, विज्ञान शिकायचं नसतं, हे मला त्यांनी न बोलता सांगितलं. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते, विज्ञानाची असत नाही, हे त्यांनी अनुवादित केलेल्या कथा-कादंबऱ्या वाचून मी शिकलो.

मीच काय, आमची सगळी पिढीच त्यांची आजन्म ऋणी राहील.

***
'बालमित्र'चे मुखपृष्ठचित्र : भागवत कुटुंबीयांकडून
'अदृश्य माणूस'चे मुखपृष्ठचित्र : स्नेहल नागोरी यांच्याकडून

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

फार आवडले..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच आवडले! खासकरून हे -

एक विज्ञानकथा लेखक म्हणून भागवतांनी मला खूप काही दिलं. विज्ञानसाहित्याची केवळ ओळख करून दिली असं नाही, तर विज्ञानसाहित्याकडे बघायची एक दृष्टी दिली. विज्ञानसाहित्यातून विज्ञानातला थरार जाणून घ्यायचा असतो, विज्ञान शिकायचं नसतं, हे मला त्यांनी न बोलता सांगितलं. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते, विज्ञानाची असत नाही, हे त्यांनी अनुवादित केलेल्या कथा-कादंबऱ्या वाचून मी शिकलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे! लेखकाच्या नावाचा कायापालट झालेला दिसतो! संस्थळीय गंमतीमध्ये लेखकाचं मन:पूर्वक स्वागत!

’अदृश्य माणूस’ मलापण जाम आवडतं. त्यातली तोंडाळ, भोचक खानावळवाली बया; केम्प नामक विक्षिप्त, सहृदय विद्वान; इंग्लिश खेड्यातलं गावंढळ आणि डबकंसदृश वातावरण; नायकाची बुद्धिमत्ता आणि माथेफिरूपणा - हे सगळं डोक्यात पक्कं आहे. पण ते डोक्यात इतकं पक्कं राहण्यामागे फक्त वेल्सचं श्रेय नसावं. ’कालवणात मोहरी फेसून घालणार्‍या’ त्या बाई डोळ्यांसमोर स्वच्छ उभ्या राहतात, कारण भागवतांचं शुद्ध मराठी भाषांतर. रूपांतराचा मोह टाळून केलेलं.

त्याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत भागवतांनी नोंदलेलं एक नेमकं निरीक्षणही लक्षात राहून गेलं आहे.’ज्यूल व्हर्न माणसं आणि यंत्रांचे तपशील रेखाटण्याकरता पानंच्या पानं खर्ची घाली. उलट वेल्स मात्र एखाददुसर्‍या पानातच आपली पात्रं नेमकेपणानं जिवंत करीत असे...’

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'बालमित्र' वेगळा वाटे तो त्यातल्या मजकुरामुळे. त्यातला मजकूर मुलांसाठी असे; पण त्यात मुलांकडे लहान 'पोर' म्हणून पाहिलेलं नसे, तर छोटा 'माणूस' म्हणून पहिलेलं असे. तो वाचताना आपल्याला कुणीतरी बरोबरीच्या नात्यानं वागवतंय, खांद्यावर हात टाकून बोलतंय, असं वाटत असे. त्यांत मुलांना उपदेशाचे डोस पाजलेले नसत. ते वाचल्यानं मुलांवर चांगले संस्कार होत असत; पण ते कळत नकळत. संस्कार करण्याचा अट्टाहास त्यात नसे.

मुलांसाठी लेखन कसं असावं याचा वस्तुपाठच आहे हा!

विज्ञानसाहित्याकडे बघण्याची भारांची "भारावलेली" दृष्टी होती म्हणून आम्हीही विज्ञानसाहित्य आवडीने वाचायला लागलो. धन्यवाद सुबोध!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समग्र PDF कुठे मिळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कशाची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इथे जी असणार होती ती http://aisiakshare.com/brbf

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून तिच्यावर काम चालू आहे. लवकर काम झालं तर उत्तमच, पण उशिरात उशिरा आठवड्याच्या अखेरीपर्यंत ती देण्याचा प्रयत्न करतो आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन