आनंद मार्ग

आनंद मार्ग ह्या पंथाची बिहारात (पुरुलिया,भागलपुर) येथे ५-१-१९५५ रोजी स्थापना झाली. सुरुवातीला ह्या पंथाचे स्वरूप आध्यात्मिक, धार्मिक आणि आत्मोन्नतीवर भर देणारे असे होते. या पंथात सुरुवातीला मद्य मांस, लसूण, कांदा निषिद्ध होते. (पुढे हा पंथ तंत्रमार्गाकडे वळला.) यांचे गुरु पुरुषांच्या सुंतेच्याही विरोधात होते. मार्गाची दीक्षा घेतल्यानंतरचे मार्गीयांचे आह्निक कडक होते. सोळा नियम त्यांना पाळावे लागत. पहिले पाच नियम स्वच्छताविषयक होते. शौचविसर्जन, जननेंद्रियांची स्वच्छता (यात अडथळा येत असेल तर क्वचित सुंतेस अनुमती), मस्तकाव्यतिरिक्त अंगावरील इतर ठिकाणचे केश न कापणे किंवा उपटणे, ते स्नानानंतर तेल लावून विंचरणे, लंगोट कसणे, अर्धस्नान ( ध्यान, अन्नभक्षण आणि निद्रा या तीन क्रियांपूर्वी अर्धस्नान करणे म्हणजे प्रथम जननेंद्रिय पाण्याने धुणे, कोपरापर्यंत हात आणि गुढग्यापर्यंत पाय धुणे, चूळ भरणे, चेहरा आणि डोळे यांवर कमीत कमी बारा वेळां पाण्याचे हबके मारणे, नाक कान धुणे, जमल्यास नस्य करणे, इ.) पितृयज्ञयुक्त स्नान, योग्य अन्नग्रहण, उपवास, साधना, जे आपले इष्ट,त्याची पवित्रता राखणे, आदर्शांची पवित्रता (ह्या दोनही प्रकारांना साधनशुचिता मानता येईल.) आचार कठोरपणे पाळणे, आनंदमार्गावर अविचल निष्ठा, धर्मचक्र(हा एक सामूहिक मानसोन्नतीचा कार्यक्रम मधून अधून असे.) दीक्षेच्या वेळच्या शपथा-वचनांचे नित्यस्मरण आणि शेवटी चर्याचर्य ह्या गुरूंनी सांगितलेल्या तत्त्वांनुसार वर्तन राखणे असे हे सोळा नियम होते. आनंदमार्गाच्या स्वरूपाची सुरुवातीलाच कल्पना यावी यासाठी हे विस्ताराने लिहिले.
एका बाजूने गुरूंची प्रगाढ विद्वत्ता, दुसर्‍या बाजूने कर्मठ आचारांवर भर, आत्मोन्नती साधता साधता त्वरितच त्यांच्या पद्धतीने समाजोन्नतीकडे वळलेला कल, समाजकल्याणसंस्थांसाठी सक्तीने जमीन ताब्यात घेण्याच्या तुरळक घटना आणि मुख्य म्हणजे अत्यल्प काळात जगभर फोफावणे आणि प्रचंड साधनसामुग्री कमावणे यामुळे हा पंथ सदैव वादाच्या भोवर्‍यात राहिला.
यांचे संस्थापक गुरू प्रभात रंजन सरकार(२१-५-१९२१ ते २१-१०-१९९५) हे गाढे विद्वान होते. केवळ अध्यात्मावरच नव्हे तर इतर अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. भाषाशास्त्रावरची विशेषतः बंगाली भाषेवरची त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रचंड लेखनाची सूची विकीवर उपलब्ध आहे. त्यात त्यांची १५०० पानांची 'प्राउट' थिअरीसुद्धा आहे.
१९५५ मधल्या आनंद मार्गाच्या स्थापनेपासूनच मार्गाची घोडदौड सुरू झाली. मार्गाच्या कार्याच्या उघड उघड कर्मठ धार्मिक रूपामुळे बंगालमधल्या कम्युनिस्टांशी यांचे बिनसणे क्रमप्राप्त होते. ही दुष्मनी केवळ आय्डिऑलॉजीपुरती मर्यादित नव्हती. १९५९ साली प्रभात रंजनांची 'Progressive Utilization Theory' प्रसिद्ध झाली. यातील तत्त्वांनुसार केवळ आत्मोन्नती एव्हढेच उद्दिष्ट नसून समाजोन्नती म्हणजे त्यांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मिती हेही उद्दिष्ट बनले. किंबहुना तेच प्रमुख उद्दिष्ट झाले. समान संधी, संधींची समान उपलब्धता यावर यात भर होता. वर्गहीन समाजाची निर्मिती हे तर कम्युनिस्टांचेही उद्दिष्ट होतेच. बंगालमध्ये सशस्त्र चळवळ सुमारे शतकभर खोल रुजली होती. युगांतर, अनुशीलन समिती हे गट पहिल्या महायुद्धाच्या आधीपासून गुप्तपणे कार्यरत होते. यांपैकी अनेकांची धरपकड होऊन त्यांना कारावास, काळे पाणी, फाशी अश्या शिक्षा झाल्या होत्या. पहिल्या युद्धानंतरच्या सार्वत्रिक माफीमुळे यातल्या बहुतेकांची सुटका झाली. मुक्ततेनंतर त्यांनी वैयक्तिक कलानुसार १)गांधीजींची असहकार चळवळ, २)देशबंधू दासांचा स्वराज्य पक्ष,३)कम्युनिस्ट पार्टी, ४)मानवेंद्रनाथ राय यांची रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी ५) आणि पुढे नंतर सुभाषचंद्रांचा फॉर्वर्ड ब्लॉक हे पक्ष निवडले. यातले शेवटचे तीन हे डावे म्हणता येतील असे पक्ष होते. यामुळे बंगाली कम्युनिस्टांकडे सशस्त्र चळवळीचा वारसा आला होता. स्वातंत्र्यानंतरच्या दहा वर्षांत बंगालवरचा त्यांचा पगडा कमी न होता वाढतच गेला. आणि आता त्यांच्या अंगणात आनंद मार्ग त्यांना आव्हान देऊ लागला होता.
तर आनंद मार्ग आणि कम्युनिस्ट यांचे चांगलेच बिनसले. प्रभात रंजनांनी 'Progressive Utilization Theory' च्या तत्त्वांवर आधारित 'PROUTist Universal' या शाखेची स्थापना केली. ही त्यांची राजकीय शाखा बनली. राजकीय आणि हिंसक. याला 'PROUTist Block' असे नाव मिळाले. प्राउटिस्ट ब्लॉक ने हिंसेचा पुरस्कार केला. हिंदू सण आणि आनंदमार्गस्थापना दिवस या दिवशी आनंदमार्गीयांच्या भव्य मिरवणुका निघू लागल्या. भगवी वस्त्रे नेसलेले, हातांत नंग्या तलवारी आणि मानवी कवट्या धारण केलेले मार्गी रस्त्यातून नाचत नाचत जात. कित्येकदा जिवंत सर्पही त्यांच्या गळ्यात असत. याला ते तांडव नृत्य म्हणत आणि तो साधनेचा एक प्रकार मानत. त्यामुळे दहशत निर्माण होऊ लागली. कम्युनिस्ट आणि मार्गी यांच्या चकमकी आणि त्यातून हिंसा रोजच्या झाल्या. ५ मार्च १९६७ रोजी पाच आनंदमार्गीयांची हत्या झाली. ती कम्युनिस्टांनी केली अशी वदंता होती.
योगायोग असा की अगदी याच सुमारास मुंबईत कम्युनिस्टांविरुद्ध लढण्यासाठी एक लढाऊ संघटना निर्माण झाली होती. कॉम्रेड कृष्णा देसाई हे एका हिंसक हल्ल्यातून वाचले, पण जून १९७०मध्ये त्यांची हत्या झालीच. मुंबईत कम्युनिस्टांविरुद्ध भूमिका घेताना हिंसेला न कचरणारी शिवसेना सशक्त झाली आणि कलकत्त्यात आनंदमार्गही त्याच भूमिकेवर प्रबळ बनला. अश्या रीतीने मुंबई आणि कलकत्ता या दोनही आर्थिक महत्त्वाच्या शहरांत कम्युनिस्टांना चाप लावण्यात यश येऊ लागले. हा कदाचित आणि केवळ योगायोग नसावाच.
या रोजच्या झगड्यामुळे आनंदमार्गीयांतही थोडी चलबिचल सुरू झाली. मतभेद झाले. १९७१मध्ये आपल्या दोन सहकार्‍यांची हत्या घडवून आणल्यामुळे आनंदमूर्तींना (प्रभात रंजन सरकार) अटक झाली. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. याचा निषेध म्हणून जगभर निदर्शने झाली. त्यातच प्रभात रंजन यांची पत्नी उमा ही गौतम या त्यांच्या मुलासहित आनंदमार्ग सोडून गेली. उमा यांचे मार्गातले स्थान अत्यंत आदराचे आणि प्रतिष्ठेचे होते. त्यांच्याबरोबर काही मार्गीही पंथ सोडून गेले. पंथ सोडताना तिने प्रभात रंजनांवर लैंगिक गैरवर्तणूक आणि गुन्हेगारीचे आरोप केले होते.
२-१-१९७५ रोजी माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र यांची एका बाँबस्फोटात आनंदमार्गीयांनी हत्या केली. आणीबाणीमध्ये आनंद मार्गावर बंदी आली. भारताचे सरन्यायाधीश अजित नाथ राय यांचीही हत्या करण्याचा मार्गीयांचा इरादा होता असे पुढे स्पष्ट झाले. प्रभात रंजनांची सुटका होईना तेव्हा मार्गीयांनी दबावतंत्र म्हणून अतिहिंसक मार्ग अनुसरले. १९७७मध्ये एका भारतीय राजनीतीज्ञ आणि त्याच्या पत्नीवर कॅन्बेरा येथे हल्ला झाला. एक महिन्यानंतर मेल्बर्न येथे इंडिअन एअरलाइन्सच्या एका कर्मचार्‍याला भोसकले गेले. पुढे १९७८ मध्ये सिड्नी येथे चोग्रम राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद भरली होती. (Commonwealth Heads Of Government Regional Meeting.) हॉटेल हिल्टन येथे भारतीय प्रतिनिधींची (मला वाटते त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई हे तिथे होते.) सोय करण्यात आली होती. त्या इमारतीसमोर बॉम्बस्फोट झाला. तीन लोकांना प्राण गमवावे लागले. या खटल्यादरम्यान ऑस्ट्रेलिअन सुरक्षाव्यवस्थेतल्या अगदी प्राथमिक त्रुटी उघडकीस आल्या. कोणतेही सरकार इतक्या हलगर्जीपणाने, निष्काळजीपणाने वागले नसते. उलटसुलट जबाब होऊन आणि अनेकांकडे संशयाचे बोट वळून शेवटी यात ऑस्ट्रेलियातल्या आनंदमार्गीयांचा हात सिद्ध झाला. ह्या खटल्याची हकीगत वाचली तर आजही पुरावे, जबान्या आणि आरोपपत्रे यांबाबत धूसरता जाणवते. आंतरराष्ट्रीय हाताचा संशय येतो.
पुढे २-८-१९७८ रोजी प्रभात रंजनांची सुटका झाली. काही काळ वातावरण थंड राहिले. एव्हाना आणीबाणी उठली होती, जनता पक्षाचे राज्य आले होते, इंदिरा गांधी कोपर्‍यात फेकल्या गेल्या होत्या. मग पुन्हा पडझड झाली. पुन्हा १९८२मध्ये इंदिरा काँग्रेस धूमधडाक्यात सत्तेवर आली. कलकत्त्यात पुन्हा आनंदमार्गाच्या सभा, मेळावे सुरू झाले. अशीच एक परिषद कलकत्त्यात भरली होती. ३०-४-१९८२ रोजी त्या परिषदेला जात असताना १७ मार्गी संन्याशांना जमावाने गाड्यांतून खेचून बाहेर काढले. त्यांना मरेपर्यंत मारझोड केली. इतकेच नव्हे तर जमावाने त्यांची प्रेतेही जाळून टाकली. चौकशी झाली, खटला झाला पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. संशयाची सुई माकपकडे वळलेली राहिली. पुढे कित्येक वर्षांनी म्हणजे अलीकडे अलीकडे, आनंदमार्गातले विचारवंत ही हिंसा खवळलेल्या जमावाकडून झाली असावी असे मत व्यक्त करू लागले आहेत. याच्या पुष्टीसाठे एक गोष्ट मांडली गेली आहे की आनंदमार्गी हे नेहमी लहान मुलांना त्यांच्या संस्थांमध्ये दाखल करून घेत. शक्यतो लहान वयापासूनच या मुलांवर आनंदमार्गाचे संस्कार व्हावेत असा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे ते मुले पळवतात अशी एक अफवा जोर धरू लागली. त्यातच तोपर्यंत आनंद मार्गाविषयीची बरीच माहिती उजेडात आली होती. लोकांमध्ये मार्गींविषयी संशय आणि तिरस्कार वाढू लागला. त्यात त्यांची या परिषदेनिमित्त मोठ्या प्रमाणात जमवाजमव होताना बघून जमाव बिथरला आणि हे प्रकरण घडले. खर्‍याखोट्याचा अजूनही तपास लागलेला नाही. पण या निमित्तने ३१-५-१९८२च्या अंकात इन्डिया टुडेने एक लेख प्रसिद्ध केला. त्यात अशी माहिती होती की तोवर संपूर्ण जगामध्ये १५६ भूखंड या संस्थेच्या मालकीचे होते. त्यावरचे प्रचंड असे शेतकी उत्पन्न त्यांना मिळत होते. ही संस्था ४०० शाळा चालवीत होती. त्यांचा छापखाना तर जणू नोटा छापीत होता. कारण आनंद मार्गाचे अतिप्रचंड सांप्रदायिक साहित्य भक्तीने आणि सक्तीने जगभर वाचले जात होते. तरीही पाच खंडात या संस्थेचे कार्य इतक्या झपाट्याने इतके कसे विस्तारले हे एक गूढ होते आणि काही जणांसाठी ते अजूनही गूढ आहे.
त्यानंतर १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. काही काळाने राजीव गांधींचीही झाली. दरम्यान जगाच्या पाठीवर खूप दूरवर काही घटना आधीपासून घडत होत्या. पोलादी पकडीतल्या पूर्व यूरपमधल्या पोलंडमधला एक प्रभावी धर्मगुरू वॅटिकनच्या सर्वश्रेष्ठ कॅथलिक धर्मपीठावर पोप जॉन पॉल दुसरे या नावाने आरूढ झाला. (१६-१०-१९७८). नजीकच्या भूतकाळात या पट्ट्यातून असा सन्मान कोणालाही मिळाला नव्हता. पोलंडमध्ये आणि एकंदरीतच पूर्व यूरपमध्ये आनंदाची आणि धर्मप्रेमाची लाट उसळली. कॅथलिक धर्मपंथाला या भागात नवसंजीवन मिळाले. पोलादी पकडीमुळे ओस पडलेली चर्चेस आता निर्भय अनुयायांनी भरून जाऊ लागली. लोक भेटू लागले, चर्चा होऊ लागल्या. जाहीरपणे धर्माचरण होऊ लागले. हवेत एक 'डिफायन्स' आला होता आणि त्याला जणू एक ईश्वरी अधिष्ठान, ईश्वरी मान्यता मिळाली होती. हळू हळू पोलंडमघ्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळ आकार घेऊ लागली.
इकडे १९८० पासून सोवियत यूनियनची अर्थव्यवस्था घसरगुंडीला लागली होती. त्यांची पूर्व यूरपमधली राजकीय, आर्थिक आणि सामरिक गुंतवणूक आणि बांधिलकी त्यांना जड जाऊ लागली होती. अमेरिकेचे अध्यक्ष रेगन हे या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते. १९८९ च्या सुरुवातीला सोवियत यूनियन मध्ये ग्लास्नॉस्त आणि पेरिस्त्रॉय्का यांचे युग सुरू झाले. पोलादी पकड ढिली झाली.
पोलंडमधले सॉलिडॅरिटीचे वारे पोलंड ओलांडून झटकन शेजारच्या पूर्व यूरपमध्ये शिरले. मे १९८९ मध्ये पोलादी पडद्याला न जुमानता हंगेरीने आपल्या सीमा खुल्या केल्या. पूर्व जर्मन लोकांना आता हंगेरीतून ऑस्ट्रिया आणि पश्चिम जर्मनीमध्ये जाणे शक्य झाले. पूर्व जर्मनांचे लोंढेच्या लोंढे हंगेरीमार्गे पश्चिम जर्मनीकडे निघाले. ९-११-१९८९ला कुप्रसिद्ध बर्लिन भिंत उत्साही आणि उन्मादी जमावाने तोडली. यथावकाश पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे विलीकरण झाले.
ही सोवियत यूनियनच्या विघटनाची सुरुवात होती. अखेर २६-१२ १९९१ रोजी सोवियत यूनियन तुटले. भारताचा एक मोठा आणि कदाचित एकमेव तारणहार लुळा पडला. स्वतःची आणि काळाची गरज म्हणून भारताने आपले धोरण बदलले. आर्थिक उदारीकरणाचे पाऊल उचलले गेले. सुप्रसिद्ध 'डावीकडे झुकलेल्या मध्यममार्गा'कडून भारत, मध्य गाठण्यासाठी का होईना, उजवीकडे झुकू लागला. कम्युनिस्टांचा आधार कुबड्यांपुरताच म्हणजे संसदेत आवश्यक संख्याबळ गाठण्यापुरता उरला. त्यांच्या आय्डिऑलॉजीची गरज उरली नाही.
आता आनंदमार्गाच्या राजकीय आघाडीला फारसे काम उरले नाही. आता पुढे काय? आनंद मार्गाच्या राजकीय आघाडीवर सारे कसे शांत शांत झाले. जणू कसले प्रयोजनच उरले नाही. पण अजूनही एक नाट्य घडायचे बाकी होते.
आणि नंतर आले पुरुलिया प्रकरण. १९९५ मधले हे पुरुलिया शस्त्र पुरवठा प्रकरण चांगलेच गाजले. वयाच्या पस्तिशीच्यापुढच्या अनेक लोकांच्या स्मरणात ते नक्की असेल. कारण ते खूपच सनसनाटी आणि खळबळजनक होते. वृत्तपत्रांनी आणि तोवर प्रगत झालेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याला भरपूर प्रसिद्धी दिली. १७-१२-१९९५ च्या रात्री एक जुन्यापुराण्या रशियन AN-26 विमानाने कराचीहून उडडाण केले. ते ढाक्याला जाणार होते. वाराणसी येथे त्या विमानाने इंधन भरून घेतले. उड्डाणानंतर ते मार्ग बदलून गयेच्या दिशेने वळले. त्याच मार्गावर पुढे जाताना वाटेत पुरुलिया लागले. इथे हे विमान अगदी खाली आले. चार टन एव्हढा शस्त्रसाठा रात्रीच्या काळोखात त्याने पुरुलिया या आनंदमार्गीयांच्या बालेकिल्ल्यात, जमिनीवर टाकला. पुढे ते विमान फुकेतला ऐटीत निघून गेले. पुढे खूप गोष्टी घडल्या. त्याचे वर्णन लांबलचक होईल. त्यापेक्षा ते इथे वाचता येईल. हा अगदी अद्यतन दुवा आहे. या प्रकरणाच्या आंतरखंडीय चौकश्या झाल्या. मुख्य आरोपी किम डेव्हीने उलटसुलट जबाब दिले. अनेक शोधपत्रकारांनी वेगवेगळे फाटे फोडून आपापले निष्कर्ष मांडले. या प्रकरणाच्या याआधीच्या अनेक दुव्यांतल्या माहितीच्या सत्यतेविषयी शंका उत्पन्न होतात. काहीतरी निसटतेय, कुठेतरी धागा जुळत नाहीय, कोणीतरी कुणालातरी पाठीशी घालतेय अशी शंका येत राहाते. पण या दुव्यामुळे निदान माझ्यातरी शंका फिटल्या, खर्‍या ठरल्या.
यानंतर आनंदमार्गीयांना गुप्तपणे काम करण्याचे कारण उरले नाही. कदाचित त्यांची राजकीय उपयुक्तता संपली असावी. गुप्तपणा राहिला नसल्याने जगाचीही त्यांच्या खिडकीत डोकावण्यातली उत्सुकता संपली. दरम्यान त्यांचे गुरूही निवर्तले. आता आनंद मार्गाचे आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक काम शांतपणे चालू आहे. नाही म्हणायला जनवरी २०१२ला भरलेल्या तिलंजला(Tilanjala) येथील अधिवेशनात थोडीशी बाचाबाची झाली, काही अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. किंवा ऑस्ट्रेलियामध्ये तिथल्या मालमत्तेच्या मालकीवरून कोर्टकचेर्‍या झाल्या. पण अश्या किरकोळ घटना सोडल्या तर एकंदरीत, नि:शत्रू अशा प्रदेशात आनंदमार्गाची वाटचाल सुखेनैव चालू आहे.
समाप्त.
(आणि अर्थात 'विकी'चे आभार.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

अतिरोचक माहिती. अनेक धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेच बोल्तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान माहिती. अ‍ाणखी येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉलिड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आनंदी आनंद आहे. रोचक इतिहास आहे तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राही यांनी अधिक सातत्याने लिहित राहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूपच छान माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वाह! जालावर दुवे हुडका, ते वाचा (त्यात ते इंग्रजीत !) त्यापेक्षा अशी माहिती मराठीत आयती मिळणे काय सुखाचे आहे!
भरगच्च माहितीबद्दल आभार! आता शेवटचा दुवा वाचतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.
जर घटनाक्रम निश्चित ठाऊक असेल आणि त्यामुळे मनामध्ये काही एक 'थीम' तयार झालेली असेल तर जालावर दुवे हुडकणे सोपे जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर कोणीतरी खवचट का दिलीये माहिती नाही, गैरसमज नसावा - खरंच आभार मानले होते.

आणि मीही जालावर आनंद मार्गींची माहिती शोधायचा प्रयत्न केला, पण मराठीत तर अगदीच प्राथमिक माहिती होती, तर इंग्रजीतले बहुतांश लेखन कोणत्याशा पुस्तकांत दडलेले होते. नुसताच गोषवारा होता. तुम्ही दिलेला हिं.टा. चा दुवा मला मिळाला नाही. तेव्हा नेमके दुवे हुडकण्याचेही कौतुक आहेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'खवचट' श्रेणीमुळे खरेच थोssडा गैरसमज झाला होता; तो आता मिटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनिल अवचटांच्या "दिसले ते" या जरा वेगळ्या प्रकारच्या पुस्तकात पहिलंच प्रकरण या आनंदमार्गीविषयी आहे. कोयनेच्या भूकंपानंतर खूपच भयंकर पडझड झाली होती आणि त्यात अवचट आणि त्यांच्यासारखेच काही डॉक्टर (त्यावेळी विद्यार्थीदशेत असलेले) पीडितांच्या मदतीला गेले होते. मर्यादित औषधसाठा आणि वैद्यकीय उपकरणं सोबत घेऊन ते त्या परिसरात गेले. शाळेत वर्गांमधे/उघड्यावर अशी राहायची सोय होती. जखमींवर जमतील तसे उपचार आणि मदतकेंद्रं उघडली गेली होती. अशा वेळी आनंदमार्गींचा एक गट तिथे "समाजसेवे"साठी आलेला होता. त्यातल्या एका आनंदमार्गीने हा अवचटांचा ग्रुप पकडला. बाकी लोकांना जेमतेम कोरडं शिळं अन्न मिळत असताना आनंदमार्गी गट सुकामेव्याचा ढीग करुन त्याचा फराळ करत होते आणि सोबत मच्छरदाण्या बिछान्यासहित सारा आरामदायक जामानिमा बाळगला होता. त्यांना कसं परवडतं ते विचारलं असता त्याने आनंदमार्गी पंथाची माहिती दिली आणि आमचा एक माणूस "फिल्ड"वर असतो तेव्हा जगातले सारे आनंदमार्गी त्याच्यामागे उभे असतात असं सांगितलं.

दुसर्‍या दिवशी अवचट आणि त्यांच्या मित्रांना एका खेडुताकडून कळलं की कराड किंवा शहरी भागापेक्षाही दुर्गम डोंगरदर्‍यांतल्या अनेक खेड्यांमधे अन वस्त्यांमधे आणखीच जास्त नुकसान आहे आणि तिथे कोणतीच मदत पोचलेली नाही. तेव्हा त्यांनी अशा एका गावी .. म्हणजे "वर सरकून बाजं" नावाच्या अत्यंत दुर्गम गावात भूकंपग्रस्तांना मदत करायला जायचं ठरवलं. तो खेडूत त्यांचा गाईड बनला आणि जीप सोडून देऊन त्यांनी डोंगरदर्‍या चढत त्या गावाकडे जायला सुरुवात केली. तो एक हौसेखातर आलेला आनंदमार्गी भिडेखातर परत न जाता त्यांना जॉईन झाला. वाटेत जेव्हा लक्षात आलं की कल्पना केली त्याहून अंतर आणि चढ खूप जास्त आहे तेव्हा तो आनंदमार्गी पार गळपटला आणि त्या खेडुताला नावं ठेवू लागला. "साला ये आदमी बदमाश है.. कितना दूर है बराबर बताता नही" वगैरे. रात्री त्या गावी पोचल्यावर फारच भीषण अवस्था दिसली. अनेकांना डोली करुन शहरात नेण्याखेरीज इलाज नव्हता. कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर्स, इन्फेक्शन्स असं बरंच काही. त्यावेळी त्यांना मदत करण्यात सर्वजण झटत असताना तो आनंदमार्गी एका ठिकाणी बसून फक्त जखमींची नावं लिहून घेत होता. शेवटी अनेक लोकांना गावात तसंच सोडून शक्य होतं तेवढ्यांना गावकर्‍यांच्या मदतीने डोल्यांत घेऊन सर्वजण परतले.

नंतर काही काळाने आनंदमार्गींचं एक नियतकालिक त्यांच्या वाचनात आलं त्यामधे पूर्ण आनंदमार्गी गटाचा फोटो आणि त्यांनी धाडसाने "वर सरकून बाजं" या गावी जाऊन भूकंपग्रस्तांना वाचवले इ इ वृत्तांत होता. त्यात विश्वासार्हतेसाठी तिथल्या जखमींची नावं यादीरुपात दिली होते.

इत्यादि..

हे पुस्तक वेगळं अशासाठी की बहुतांश सगळे लेख कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणाचातरी (स्वत: इन्क्लुडेड) दांभिकपणा आणि निगेटिव्हिटी उघड करण्याचं धाडसी कन्फेशनवालं बेअरिंग बाळगणारे आहेत.

या लेखाच्या शेवटी हे सर्व ऐकणारा मित्राचा एक लहान मुलगा प्रश्न विचारता झाला की "काका, त्यावेळी गावात मागे राहिलेल्यांचं मग पुढे काय झालं?" तेव्हा आपणही पुढे त्यांचा विचार केलाच नाही हे लक्षात येऊन केवळ इन्स्पिरेशनपुरताच आपण या घटनेचा उपयोग करुन घेतला की काय असा धक्का अवचटांना बसला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर

अच्छा! या विषयावर आहे होय ते पुस्तक. नाव वाचून माझा समज झाला होता की दिसेल त्या व्यक्ती/घटनेवर लेख पाडले असावेत. आता वाचतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाही. ते पुस्तक निव्वळ या घटनेवर नाही. समाजातल्या अश्या अनेक ढोंगी घटना आणि ढोंगी माणसे यावरचे ते एक 'रिपोर्ताज़' आहे. अनेक लेख आहेत त्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर प्रतिसाद. (श्रेणी देता येत नाहीय.) याच लेखाचा उल्लेख 'आणीबाणी' या लेखावरच्या प्रतिसादात 'चार्वी' यांनी केला आहे.
आनंदमार्गाविषयी मराठीतही जुन्या काळात काही लेख प्रसिद्ध झाले होते. एक डाय्जेस्टसदृश मासिक मराठीत निघत असे. कदाचित नवनीत किंवा त्याहीपूर्वीचे अमृत. त्यात या पंथाच्या अघोरी, राजकीय आणि गुप्त बाजूंची माहिती होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या लेखातल्या वर्णनावरुन "सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स घेताना..." अर्थात, "इन ट्यून विथ द ट्यून" टाईपचे वाटले होते. आता हा अघोरी वगैरे अँगल नव्यानेच कळला. तपशीलवार लेखाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती करता धन्यवाद. एकाच लेखात बरेच तपशिलवार वर्णन/माहिती दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नितिन थत्ते, सुधीर, आदू बाळ, अदिती, अतिशहाणा, बॅट्मॅन, अनुप ढेरे, घनु, गवि, ऋषिकेश आणि सर्व वाचकांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0