तुम गगन के चंद्रमा हो

बरेच दिवस झाले या गोष्टीला. तेव्हा ज्या घरात मी रहायचे त्या घराला एक छानशी गच्ची होती. रात्री जेवण झाल्यावर त्या गच्चीत अगदी मस्त शतपावली करता यायची. ती सवयच झाली होती. आणि मग बरेचदा त्यावेळी काही काही विचार चालू असायचे मनात.

असंच एकदा शतपावली चालू होती. आजूबाजूला अगदी शांत वातावरण होतं. कानात हेडफोनवर मंद आवाजात रेडिओ चालू होता. रात्रीची विविध भारतीवर सुंदर सुंदर जुनी हिंदी गाणी लागतात. मुख्य म्हणजे त्यात आता एफेम वाहिन्यांवर चालते तशी बकबक नसते. निवेदक कामापुरतंच बोलतात. गाण्यांचा मूड जात नाही त्यामुळं. निवेदक सांगत होता की आता पुढचं गाणं सती-सावित्री चित्रपटातलं आहे आणि लता मंगेशकर / मन्ना डे यांनी गायलंय. गीतकार भरत व्यास आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत आहे.

गाणं सुरू झालं... आणि पुढची तीन-चार मिनिटं फक्त काहीतरी होतंय आपल्याला एवढंच जाणवत होतं. काय होतंय ते कळत नव्हतं... अजूनही कळलेलं नाहीये. काहीतरी जादू होत होती हे नक्की. मधले सगळे क्षण 'ना मी इथली! ना इथले कोणी माझे!' अशी माझी अवस्था झाली होती. गाणं संपून पुन्हा निवेदक महाशय बोलायला लागले तेव्हा ती तंद्री भंगली. मला आलेला सुरांचा साक्षात अनुभव.

त्यानंतर ते गाणं शोधण्याकरता मी जालावर कुठे कुठे नाही शोधलं! जंग जंग पछाडलं! शेवटी कुठल्यातरी एका गाण्यांच्या संस्थळावर सापडलं. आता युट्युबवर सहज उपलब्ध आहे. त्यानंतर ते गाणं मी कित्येकवेळा ऐकलं! भरभरून ऐकलं!! वाट्टेल तेव्हा ऐकलं!!! वारंवार ऐकूनही कायम माझ्या मनाला मोहिनी घालणारं हे गाणं गेल्या आठवड्यात असंच परत एकदा ऐकलं आणि त्याबद्दल लिहावंसं वाटलं.

हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे तो मी कधी पाहिलेला नाही की गाणं पाहिलेलं नाही. गाण्यातले अभिनय करणारे कलाकार कोण, गाण्याची पार्श्वभूमी, आधी-नंतरचा प्रसंग, काही-काही माहिती नाही. माहिती आहे ते गाणं, त्याचे शब्द, संगीत आणि आवाज! बास, तेवढ्याच आधारावर जे काही वाटतं ते लिहितेय!

*****

ते गाणं आहे ... तुम गगन के चंद्रमा हो, मै धरा की धूल हूं!

*****

गाण्याच्या सुरुवातीला असलेलं साधंच पण अतिशय मधुर संगीत जाणीव करून देतं की पुढे आपण काहीतरी सुरेख अनुभव घेणार आहोत, मूड सेट होतो आणि तेवढ्यात लताबाईंचा अतिशय गोड आवाज आपल्या कानातून मनाचा ताबा घेतो. त्यांच्या गळ्याबद्दल काय बोलावं? तो दैवी आहेच. पण त्यांचा असा आवाज मी तरी पहिल्यांदाच ऐकला होता. (ते गाणं खरं तर सुमन कल्याणपूर यांनी गायलंय असाही एक प्रवाद नंतर वाचला. पण त्यात किती तथ्य आहे याची मला कल्पना नाही). गाण्यातलं मला फारसं कळत नाही. सूर, ताल, रस काहीच नाही. पण हे युगलगीत असलं तरी मला त्यात शृंगारापेक्षा शांतरस जास्त आहे असं वाटतं. हा शृंगार शांतवणारा आहे, भरभरून तृप्त करणारा आहे. गाणं ऐकताना निखळ, नि:स्वार्थी भावना जाग्या होतात. एका शांत चांदण्या उत्तररात्री एखाद्या सरोवरातल्या नौकेवर शांतपणे विहार करतोय असं वाटतं.

अतिशय अर्थवाही आणि समर्पक शब्द, उपमा... गायक-गायिकेचा सुमधुर आवाज आणि परिणामकारक संगीत या एखाद्या गाण्याला गरजेच्या असणार्‍या सर्वच गोष्टी या ठिकाणी छान जुळून आल्या आहेत.

*****

तुम गगन के चंद्रमा हो, मै धरा की धूल हूं!
तुम प्रणय के देवता हो, मै समर्पित फूल हूं!!

लताबाईंच्या आवाजातील ओळींनी गाण्याला सुरुवात होते. निरतिशय प्रेमात असलेल्या प्रेयसीने तिच्या प्रियकराला तिच्या भावविश्वात सर्वोच्च स्थान दिलं आहे. तिच्याकरता तो आकाशिचा चंद्र आहे आणि त्याच्यापुढे ती केवळ जमिनीवरची धूळ आहे. इथे ती त्याला आपल्या प्रेमविश्वात सर्वोच्च स्थानी बघतेय आणि स्वतःला मात्र त्याच्यापुढे तितकीशी अनुरूप(पात्र) समजत नाही. तो तिच्या प्रेमाची देवता आहे आणि ती त्या देवाला अर्पण केलेलं फूल आहे. आह्ह्ह! मला सगळ्यात जास्त आवडलेली उपमा आहे ही. गाण्याला आणि आपल्या मूडला एका वेगळ्याच उंचीवर घेवून जाणारी.

तुम हो पूजा मै पुजारी, तुम सुधा मै प्यास हुं

प्रेयसी आपल्या प्रियकराला देवता मानतेय तर प्रियकर तिला त्याच्या जगण्याचं कारण मानतोय. तो पुजारी तर ती त्याच्या आयुष्याचं एकमेव कारण, ध्येय, साध्य आहे. त्याच्यासारख्या तहानलेल्यासाठी ती सुधा म्हणजेच संजीवनी आहे.

तुम महासागर की सीमा, मै किनारे की लहर
तुम महासंगीत के स्वर, मै अधुरी सांस पर
तुम हो काया मै हुं छाया, तुम क्षमा मै भूल हूं

इथे पुन्हा एकदा प्रेयसी आपल्या प्रियकराला सर्वच क्षेत्रांत सर्वोच्च स्थानावर बघतेय. या ओळी केवळ इथे नुसत्या वाचणं वेगळं... ऐकताना जाणवतं की त्याचं प्रेम मिळवून ती इतकी तृप्त आणि धन्य झालीये की या जगात तिच्याकरता आता अजून काही मिळवायचं बाकी राहिलंच नाहीये आणि तिचं अस्तित्व आता त्याच्यासाठीच आहे. त्याला शरीर आणि स्वतःला सावली म्हणवून घेत ती हेच सांगतेय की त्याच्याशिवाय तिला काही अस्तित्वच नाही. तो आहे म्हणून ती आहे, तो नसेल तर ती असण्याचा प्रश्नच नाही. त्याला क्षमा आणि स्वतःला चूक म्हणून ती तिचं त्याच्यामुळे असलेलं अस्तित्व तर दाखवतेच आहे आणि सोबतीला पुन्हा त्याच्या उच्च स्थानाचा आणि तुलनेत स्वतःच्या दुय्यम स्थानाचा उल्लेख करतेय.

खरं तर तीसुद्धा त्याच्यावर तेवढेच प्रेम करतेय पण त्याच्याकडून मिळणार्‍या प्रेमाने ती एवढी भारावून गेलीये की तिला तिचे प्रेम त्याच्या प्रेमाच्या तुलनेत कमी वाटतेय. त्याच भ्रमामुळे ती वारंवार स्वतःला सर्वात खालच्या पायरीवर ठेवून तेथून सर्वोच्च स्थानी असलेल्या प्रियकराच्या बरोबरीला येण्याइतपत भरभरून प्रेम करू इच्छित आहे.

तुम उषा की लालिमा हो, भोर का सिंदूर हो
मेरे प्राणो की हो गुंजन, मेरे मन की मयुर हो

तुम हो पुजा मै पुजारी, तुम सुधा मै प्यास हूं

आपल्या प्रेयसीला तिचं स्वतःचंच प्रेम कमी वाटतंय हे बघून प्रियकर तिचा भ्रम दूर करण्याकरता तिला तिच्या सुंदर, लोभस, मोहक व्यक्तिमत्वाची जाणीव करून देतोय. जशी ती त्याच्या उत्कट प्रेमाने भारावून गेली आहे त्याचप्रमाणे त्याचंही हृदय तिच्या समर्पित प्रेमाच्या अधीन झालंय. त्याच्या मनात तिचे विचार मोरासारखे थुईथुई नाचत असताना आणि तिचेच विचार श्वासागणिक गात असतानाही ती त्याला पहाटेच्या लालीप्रमाणे पवित्र वाटते. हे सांगून तो तिला पुन्हा पटवून देतोय की केवळ तीच आता त्याच्या जीवनाचे सार्थक आहे, तीच त्याच्या आयुष्याची संजीवनी आहे.

वाह! काय ते उत्कट प्रेम आहे. भलेही त्यांनी एकमेकांना दिलेल्या उपमा निव्वळ अतिशयोक्तीपूर्ण असतील, पण प्रेमात आकंठ बुडाल्यावर मनाची काय स्थिती होते ती प्रत्येकाने केव्हा ना केव्हा तरी अनुभवली असणारच! या गाण्यातून नायक-नायिकेची तीच स्थिती दिसून येतेय.

असं एखादं गाणं आपण ऐकतो... नव्हे असं एखादं गाणं अवचित आपल्या पुढ्यात उभं ठाकतं, त्यातही नेमकं एखाद्या हळव्या वळणावर गाठतं तेव्हा ते सगळं उसळून वर येतं... त्या शब्दात आपल्याच भावना गुंफत जातो आपण आणि ते मनोमन आपल्या प्रणय देवतेला अर्पणही होऊन जातं!

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

उत्तम गाणं. त्याविषयीचं हे लेखनही उत्तम.
गाण्यातील 'मैं धरा की धूल' हे पटणारं नाही. पण म्हणून गाणं कमअस्सल होतं असं नाही. म्हणजे, इथं गाणं स्त्रीच्या मुखी असल्यानं 'मै धरा की धूल' ही पुरषी व्यवस्थेतून आकाराला येणारी उपमा मान्य करणार नाही. पण एखादी प्रेमिका तसंच मानत असेल तर त्याला इलाज नाही. त्या नाईलाजातून पाहिलं तर गाणं उत्तमच राहतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाण्यातील 'मैं धरा की धूल' हे पटणारं नाही. पण म्हणून गाणं कमअस्सल होतं असं नाही. म्हणजे, इथं गाणं स्त्रीच्या मुखी असल्यानं 'मै धरा की धूल' ही पुरषी व्यवस्थेतून आकाराला येणारी उपमा मान्य करणार नाही. पण एखादी प्रेमिका तसंच मानत असेल तर त्याला इलाज नाही. त्या नाईलाजातून पाहिलं तर गाणं उत्तमच राहतं.

या मताशी पूर्ण सहमत. तत्त्वतः विचार करता पूर्ण गाण्यातलाच 'धरा की धूल' आणि बाकी सर्वच उपमा न पटणार्‍याच आहे, मलाही ते खटकलंच! पण एकंदरीत गाण्याचा मूड आणि काळ बघता तिकडे दुर्लक्ष केल्यास बाकी गाणे मनाला आनंद देवून जाते. म्हणून लेख लिहितांना वारंवार हा स्त्रिवादी विचार मनात येत असूनही मुद्दाम त्या विषयावर मी काही भाष्य केलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

गाणं आवडलं. लेखनही.
श्रावणशी करड्या रंगातल्या प्रतिसादाशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तर सुरेख आहेच. पण मस्त लिहिलय स्मिता. खूप खूप आवडलं! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सविता

गाणं रेडीयोवरच एक-दोनदा ऐकलं होतं.. तेव्हा तितकं लक्ष देऊन ऐकलं नव्हतं. आता नीट ऐकलं.. त्या (काळच्या त्या)'समर्पित' प्रेयसीच्या दृष्टीकोनातून बघितलं की आवडतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझे अतिशय आवड्ते गाणे.. आणि त्यावर भावविभोर लेखन. खूप आवडले.

मोडकांच्या करड्या प्रतिसादाशी पूर्ण असहमत. प्रेमी एकमेकांविषयी बोलताना, एकमेकांचा उल्लेख करताना स्वत: कडे कमीपणा घेतात अनेकदा.. हे ईंग्रजी साहित्यात तर नियमित दिसते, गालिबचे काही शेर सुद्धा हेच दर्शवितात( कुठले ते स्पेसिफिकली सांगू शकणार नाही ... शायरी किंवा उर्दू भाषा हे माझे अभ्यासाचे विषय नाहीत)..
येथे प्रेमिका आहे म्हणून 'धूल' हा स्त्रीलिंगी शब्द योजला आहे.. हेच प्रेमी असता तर जर्रा किंवा कतरा हा शब्द सुद्धा येउ शकला असता. 'धरा की धूल' हे त्याकाळच्या स्त्रिच्या प्रतिमेचे प्रातिनिधिक नाही... येथे पुरुषी व्यवस्थेचा संबंध नाही ( मी मुक्त स्त्री आहे आणि पुरुषी व्यवस्थेशी योग्य ठिकाणी मी झगडा केलेलाच आहे पण जिथे तिथे याच नजरेतुन बघण्याची मला गरज वाटत नाही हे येथे नम्रपणे नमुद करावेसे वाटते)
सिनेमा मी देखिल बघितला नाही त्यामुळे गाण्याच्या प्रसंगाचा संदर्भ ईथे कुणाच कडे नाही असे दिसते... पुढच्या एका कडव्यात प्रेमिका ' तुम क्षमा मै भूल हूं ' असे म्हणते, कदाचित याचाच संदर्भ 'गगनके चंद्रमा' आणि 'धराकी धूल' शी असावा काय असे वाटून गेले.

गाणे आवडते आहेच आणि त्यातली समर्पणाची दोघांचीही भावना छान प्रकट झाली आहे, या समर्पणामुळे ह्या प्रेमी युगुलाला कुठेही कमीपणा येतो असे वाटत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोडकांच्या करड्या प्रतिसादाशी पूर्ण असहमत. प्रेमी एकमेकांविषयी बोलताना, एकमेकांचा उल्लेख करताना स्वत: कडे कमीपणा घेतात अनेकदा.. हे ईंग्रजी साहित्यात तर नियमित दिसते, गालिबचे काही शेर सुद्धा हेच दर्शवितात( कुठले ते स्पेसिफिकली सांगू शकणार नाही ... शायरी किंवा उर्दू भाषा हे माझे अभ्यासाचे विषय नाहीत)..

अब का बताए हम! जाने दो! Wink

बाकी प्रतिसादाशी सहमत आहे. या व्यवहारात प्रेमी प्रेमिका असं लिंगभेद करून फारसं न बघणंही श्रेयस्कर असतं बरेच वेळेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सुंदर गाणं. खूप पूर्वी ऐकलं असावं बहुतेक. स्वरांबरोबरच कवितेच्या शब्दांमध्येही भारून टाकण्याचं सामर्थ्य असलं की गाण्यात गुंगून जायला होतं. लेखाविषयी काय बोलावं! एखाद्या गाण्याच्या प्रेमात पडलं असलं की वर्णनात तो भाव उतरतो. व्हाईट बर्च यांच्याशी सहमत.

गाणं ऐकताना सतत शुक्र तारा मंद वारा ची आठवण होत होती. दोन्ही एकाच रागातली असतील ही शक्यता आहे. मूळ कुठल्यातरी बंदिशीवरून घेतलं असेल अशी शंका बळावण्याचं आणखीन कारण म्हणजे केरव्याचा ठेका. अर्थात कोणी तरी कोणाची तरी चाल चोरली असण्याची शक्यताही दाट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री.घासकडवी यानी दोन गाण्याच्या रागाविषयी उल्लेखिलेल्या एका शक्यतेबाबत.

"तुम गगन के चंद्रमा" ही राग "कल्याण" मधील रचना असून खळेकाकांची अमर रचना "शुक्रतारा मंद वारा" याच कुटुंबातील "यमन" रागात बांधलेली रचना आहे. 'शुक्रतारा' चा जन्म १९६३ च्या आगेमागे तर 'सती सावित्री' चित्रपट १९६४ चा. पण समयसंकेत इतक्या जवळचा आहे म्हणून अ याने ब ची चाल चोरली [वा व्हाईस-व्हर्सा] असे संगीतक्षेत्रात घडत नाही. साठचे ते पूर्ण दशकच शास्त्रीय संगीताच्या धामधुमीत न्हावून निघाले होते. मग ते मराठी भावगीतांचे असो वा हिंदी चित्रपट संगीताचे. एकाच पठडीतील रागमालिका असल्याने साम्यस्थळे जरूर असतात; पण शास्त्रीय रागदारी हा काही 'कॉपीराईट' चा मुद्दा होत नसल्याने चोरीचा मुद्दाही गैरलागू मानतात या क्षेत्रात. असे जरूर होत असते की काही वेळा व्यावसायिक ईर्षेपोटी हेत्वारोप नक्कीच होत असतात. उदा. मदनमोहन यांच्या "आखरी दाव" या चित्रपटातील रफीचे गाजलेले "तुझे क्या सुनाऊं मै दिलरुबा" गाणे सहीसही सज्जाद हुसेन यांच्या 'संगदील" मधील तलतच्या "ये हवा ये रात ये चांदनी" ची नक्कल होती. याबद्दल सज्जादने मदनमोहनला एका पार्टीत खडे बोलही सुनावले असता, मदन यानी उत्तर दिले होते "होय, तसे असेलही. पण मी चोरीच केली असली तर ती हिर्‍याची केली आहे एवढे लक्षात घे !" काय बोलणार यावर सज्जाद ?

एस.डी.बर्मन यांच्या १९५२ च्या "नौजवान" मधील लताचे "ठंडी हवाये लेहराके के आये" हे गाणे चालीच्या दृष्टीने जसेच्या तसे रोशन यानी १९७४ च्या 'ममता' मध्ये "रहे ना रहे हम' साठी, तर आणखी पंधरा वर्षांनी आर.डी.बर्मन यानी १९८० मध्ये 'सागर' मध्ये "सागर किनारे दिल ये पुकारे" साठी घेतले. याला अमुक एका रागाची आवड म्हटले तर योग्य आहे, पण म्हणून ती उचलेगिरी वा चोरी होऊ शकत नाही.

असो. बाकी वरील व्हाईट बर्च यांच्या प्रतिसादात व्यक्त झालेल्या मताशी १००% सहमती व्यक्त करीत आह.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

@व्हाईट बर्चः तुमचे स्पष्टिकरण आवडले. मलाही असेच काहिसे म्हणायचे होते ते तुम्ही व्यवस्थित शब्दांत मांडले.

@राजेशः गाण्यातले राग वगैरे मला फारसे कळत नाहीत पण हे गाणं ऐकताना 'शुक्र तारा मंद वारा'ची आठवण येणं सहाजिकच वाटतं कारण दोन्ही गाण्यातून बराचसा सारखा म्हणजे शांत मूड व्यक्त होतो. अशोक पाटील यांनी सविस्तर माहिती दिलेली आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...