कालदंश

कथा नव्वदोत्तरी

कालदंश

लेखक - जुई

----

ती नाग चावून मेली. या चार शब्दांत गोष्ट संपली.

***

ती तिची टचटचीत, टवटवीत केवड्यासारखी पोटरी सापाला नैवेद्य दाखवत होती; ते एक नागाला कळलं,
दुसरं मृत्यूला, तिसरं तिला.
त्या अथांग समुद्रकिनाऱ्यावर ती आपलं आयुष्य हरून बसलेली असताना एक नागाला कळलं, दुसरं तिला. तिसरं मृत्यूला. चौथं समुद्राला.

त्या दिवशी समुद्रात जायची इच्छा मारमारून ती मृत्यूचा अंधार शोधत परत किनाऱ्यावर आली. समुद्राने तिला नाकारलं. त्याच्या नावावर ढीगभर मृत्यू होतेच लागू, फार फरक पडला नसता; पण तो मोठ्या दिलाचा. त्याला या गांजल्या स्त्रीचे प्राण नको होते. त्यासाठी पुरुषी हलकट नागच बरा असं त्याचं मत पडलं.

काळाला वसायला तर काय, काहीही निमित्त पुरतं.
तिचं पोर काळाने ओढून नेलं तेव्हांच तिच्या मृत्यूची अर्धी तजवीज काळाने केलेली. काळाच्या भानगडी हजार असतात. जन्मणारे एवढे. तेवढ्या सगळ्यांना मारायचं हे सोपं काम नव्हे.

***

तर या एकीच्या नावावर तरी फुली मारून काळ पुढे गेला.
जबाबदारी नागावर सोपवली. पण तिथेच थोडीशी गफलत झाली.
ती तिची टचटचीत, टवटवीत केवड्यासारखी पोटरी - नागाला भूल घातली तिनेच - केवड्याचं कणीस जणू.
पोटरी अशी आहे, तर ही कशी असेल?
शितावरून भाताची परीक्षा अशी माणसांची म्हण आहे ती का उगीच? माणसं कशीही असली तरी त्यांच्या म्हणी बेफाट हुशार असतात. जन्मभर तिच्या सौंदर्याची पुरुषांना वखवख वाटायची. शांत न होणारी ही भूक.
नाग तर आदिपुरुष.
नागालाही त्यातून सुटका मिळाली नाही.
ती पोटरी चाखून चावायचं सोडून तो नुसताच थंड वेटोळं कवटाळून बसला…
का?

ते एक नागाला कळलं, दुसरं भुकेला, तिसरं तिला.

***

नागाच्या भुकेला संपवण्याचा एकच मार्ग तिच्यापुढे होता. त्यालाच चिरडू बघणे.
पुरुषाला चिरडायला लागलं की त्याच्यातलं जनावर जागं होतंच होतं.
नागालाही तेच लागू होतं.

***

ती नाग चावून मेली, या चार शब्दांतच खरंतर गोष्ट संपली.
पण म्हणून ती तितकीच असेल असंही नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

तुम्ही ही गोष्ट सांगितली म्हणून ती तिच्याशिवाय, नागाला, तुम्हाला, मला आणि आणखी १२१ लोकांना समजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

भारी आहे कथा..अप्रतिम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0