नव्वदोत्तरी शब्दप्रयोगाचा फार कंटाळा आला.

संवाद नव्वदोत्तरी

नव्वदोत्तरी शब्दप्रयोगाचा फार कंटाळा आला.

सलील वाघयांच्याशी संवाद

नव्वदोत्तर काळ आणि समकालीनता अधिक समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या काही व्यक्तींसाठी आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती. त्यांच्याशी बोली किंवा लेखी संवाद साधून त्या प्रश्नावलीची त्यांनी दिलेली उत्तरं आम्ही अंकासाठी संकलित केली आहेत.

नव्वदोत्तरी कवितांमधून मराठीत वेगळा साहित्यप्रवाह रुजवणाऱ्या कवींमध्ये सलील वाघ हे एक महत्त्वाचं नाव आहे.

'समकालीन' असं काही असतं का? तुमच्या मते कशाला समकालीन म्हणता यावं?

'कंटेंपररी'चा प्रतिशब्द म्हणून समकालीन हा शब्द सहसा वापरला जातो. तो आत्ता याक्षणी विचार करता तितका समर्पक वाटत नाही. त्यापेक्षा मी सहकालीन असा शब्द वापरीन. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडताना जे बंध किंवा जी बंधके वापरली जातात, (उदाहरणार्थ जात, वर्ग, भाषा, प्रांत, डावेपणा, उजवेपणा इत्यादी) त्यातले एक बंधक म्हणजे सहकालीनता. एकदा सहकालीनता हा पुरेसा बोलका शब्द वापरल्यावर सहकालीन कशाला म्हणता यावे, हे आपोआप स्पष्ट होऊन शकेल.

'नव्वदोत्तरी' वास्तव किंवा संवेदना आधीच्या वास्तवाहून किंवा संवेदनांहून वेगळ्या होत्या का? त्यात जर वेगळेपणा होता तर तो कशा प्रकारचा होता? एखादी कलाकृती समोर आल्यावर ती 'नव्वदोत्तरी' आहे, हे ठरवायला ह्या वेगळेपणाचा कसा उपयोग होऊ शकेल?

नव्वदोत्तरी शब्दप्रयोगाचा फार कंटाळा आला. आता काहीतरी वेगळं काढा!

स्वातंत्र्योत्तर (किंवा महायुद्धोत्तर) काळ म्हणजे १९४७ ते १९६०. शीतयुद्धाचा काळ म्हणजे १९६१ ते १९८८. शीतयुद्धोत्तर काळ म्हणजे १९८८ ते १९९२. जागतिकीकरणाचा काळ म्हणजे १९९२ ते २००२. जागतिकीकरणोत्तर काळ म्हणजे २००२ ते सध्यापर्यंत. हे अंदाजे ढोबळ कालखंड आहेत, काटेकोर नाहीत. शिवाय यातले काही ओव्हरलॅपिंग आहेत. म्हणजे बर्लिनची भिंत बांधली जाणे आणि तोडली जाणे हा शीतयुद्धाचा काळ मानला तरी पेरेस्त्रोय्का आणि ग्लासनोस्त अशी शीतयुद्धोत्तर काळाची चाहूल १९८५-८६ पासून लागलेली होती. रशियाने केलेले उदारीकरण हे बव्हंशी आर्थिक, राजकीय आणि काही प्रमाणात सांस्कृतिक-भाषिक आघाड्यांवरचे होते, आणि ते मजबुरीपोटी होते. त्याने मार्क्सवादाच्या तात्त्विक गाभ्याला धक्का लागला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे हे काळाचे खंडीकरण फार गुंतागुंतीचे आहे.

आपल्याकडे वरदराजन, व्यंकटेश माडगूळकर, हाजी मस्तान, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, अनुप जलोटा, वसंतदादा पाटील, वि. स. खांडेकर, गोपाळ देऊस्कर, एम. एफ. हुसेन, रतन टाटा, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, धर्मेंद्र, धीरूभाई अंबानी, एन. टी. रामाराव, भाऊ पाध्ये, बाळ ठाकरे अश्या दिग्गजांना समकालीन म्हणता येईल का? हे कोणता काळ, कोणत्या समान संवेदना शेअर करतात? साठोत्तरी? या सगळ्यांच्या कारकीर्दीचा काळ १९६० नंतरचा आहे.

खरं तर नव्वदोत्तरी असलं काही फार खोलवर नसतं. नव्वदोत्तरी ही संकल्पनाच बऱ्यापैकी आभासी आणि काल्पनिक (नोशनल) आहे. शिवाय अलीकडे ती ज्या भाविकतेने जपली-पुजली जाते, ते तर फारच चमत्कारिक आहे. यातल्या प्रत्येक कालखंडातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि एकूणच मानवी संवेदना वेगळ्या-वेगळ्या आहेत. नव्वदोत्तरी अशा नावाचा कुठलाही कालखंड मराठी कवितेत कधीही नव्हता. सोयीसाठी नव्वदोत्तरी असे गोळाबेरीज संबोधले गेले तरी त्याला कोणतेही तात्त्विक अधिष्ठान नव्हते आणि नाही. आज एखादा कालखंड आला आणि दुसऱ्या दिवशी त्यावर काहीतरी रिअॅक्शनरी लिहिले गेले तर ती कविता होत नाही. सिनेमा-नाटकात असे चालत असेल. गाण्या-गिण्यातही असे चालत असेल. पण कविता ही या सगळ्याहून गंभीर गोष्ट आहे. जेवण पचायला जसे पाच तास लागतात, तसा काळ कळायला अन् पचायला कवीला काही काळ जावा लागतो. 'रियल टाईम'मध्ये राहणे अन्‌ तो अनुभवगोचर करणे शक्य नसते. ज्या काळात आपण जगतो, तो काळ आपल्याला त्या वेळी कधीच कळत नाही. आपल्याला जो कळतो तो त्या काळाचा इतिहास कळतो. ज्ञान हे नेहमी भूतकाळाचे होते. घडणाऱ्या गोष्टी विशिष्ट ऐतिहासिक अंतरावर गेल्याशिवाय, 'डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजनवर' गेल्याशिवाय दिसत नाहीत. नव्वदोत्तरी ही सुलभीकरणाकरता वापरली गेलेली अत्यंत ढोबळ, गोळाबेरीज शब्दयोजना आहे. नेमकेपणाचा अन्‌ अचूकतेचा आग्रह धरायचा असेल तर घळेपणाचा आग्रह सोडायला हवा. ज्याला नव्वदोत्तरी म्हणून संबोधले जाते तो काळ अन्‌ त्यातल्या संवेदना या संमिश्र आहेत. शीतयुद्ध काळ, शीतयुद्धोत्तर काळ, जागतिकीकरणाचा अन्‌ जागतिकीकरणोत्तर काळ असा संमिश्र असा हा कालखंड आहे — आणि मुख्य म्हणजे तो अजून चालूच आहे — संपलेला नाही; त्यामुळे आत्ताच त्याच्यावर काही समाजशास्त्रीय नेमकेपणाने बोलणे म्हणजे स्टेशन यायच्या आधीच चालत्या गाडीतून उडी मारण्यासारखे आहे.

ही नवी संवेदना आणि वास्तव व्यक्त करण्यासाठी आधीची रुळलेली भाषा कमी पडली का? पडली असेल तर काही उदाहरणांनी ते स्पष्ट करता येईल का?

कवितेच्या बाबतीत नेहमीच, कधी रुळलेली भाषारूपे कमी पडतात तर कधी कवी कमी पडतात. कमी पडतात म्हणजे गुणवत्तेत, संख्येत नव्हे! तसंच याही बाबतीत झालं असणार. नवी भाषारूपे आपोआप निर्माण होतात. कसेल त्याची जमीन अन्‌ वापरेल त्याची भाषा असं या बाबतीत असतं.

नव्वदोत्तरी वास्तव आणि संवेदना आताच्या काळातही वैध आहेत का? की आताचं वास्तव आणि संवेदना आणखी वेगळ्या आहेत? वेगळ्या असतील तर कशा?

जागतिकीकरणोत्तर वास्तव हे आता इथून पुढे सतत वैधच आहे. दर दहा वर्षांनी पिढी, संवेदना आणि भाषा बदलते. जर एखादा कलाकार, लेखक छोट्या का होईना पण स्वत:च्या अश्या आस्वादकवर्गात तीन पिढ्या टिकला तर तो तरला, नाही तर तो बुडाला असे म्हणावे लागेल. काळाचे कप्पे करता येतील का? आणि साहित्य, कला यांना या कटाप्पांच्याद्वारे एकमेकांपासून तोडता येईल का?; याविषयी शंका वाटते. संवेदनांची साखळी असते. कप्पे नसतात. कुठल्याच कप्पेबाजीवर विश्वास ठेवू नये. कविता ही शास्त्रीय संगीताइतकी पवित्र गोष्ट आहे. मालकंस किंवा दरबारी हा कुठल्या -ओत्तरी असतो का? नाही ना? मग कवितेतही नका असं करू.

शीतयुद्धकालीन, शीतयुद्धोत्तरकालीन, जागतिकीकरणकालीन अन्‌ जागतिकीकरणोत्तरकालीन अश्या सर्व संवेदना आज मौजूद आहेत. त्यांना बयाजवार मांडून त्या गुंतागुंतीच्या अनुषंगाने कवीच्या सेन्सिबिलीटीचा वेध घेतला जायला पाहिजे. पण हे काय कवीचे काम आहे का? खरं तर साहित्याचा वगेरे अकॅडमिक अभ्यास नाही माझा प्रामाणिकपणे. आधुनिकोत्तर वगैरे वाद, इझम अश्या गोष्टी कळत अन्‌ दिसतच नाहीत मला. दिसतायत, जाणवतायत त्या फक्त प्रक्रिया, वेगवेगळ्या. मी त्यातच बुडालोय अन्‌ संभ्रमित झालोय — त्यातून डोके वरच काढता येत नाहीय फार. फक्त एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ती म्हणजे आता गेल्या दहाएक वर्षात स्मृतिकातर (नॉस्टॅल्जिक) होण्याचा स्पॅन अन्‌ मेकॅनिझम बदललाय. म्हणजे बदलल्यासारखा दिसतोय ठळकपणे. यात सोनेशाहीचा (सोशल नेटवर्किंग) वाटाही आहेच. अगोदर माणूस भूतकाळात जायचा, त्याला भूतकाळाचा नॉस्टॅल्जिया यायचा. आता वर्तमानकाळाचा येतोय. गेल्या दहाएक वर्षात माणूस वर्तमानकाळाबाबत अगदी क्षणार्धात, आधीच्या किंवा त्याच क्षणाशी; अगदी शेजारच्या क्षणाशीही नॉस्टॅल्जिक होताना दिसतो. आणि ते होताना त्याचा धीर सुटलाय. टीनएज हेच सोनेसाक्षर मानवाचे सरासरी वय झालेय. पण हा आजार आहे — सारामागोच्या ब्लाइंडनेससारखा. अभ्यासकांच्या मते जगभरच्या मानवजातीला येत्या काळात ज्या कोणत्या भीषण समस्येला सामोरे जावे लागणार आहे, ती समस्या म्हणजे बोअरडम! बोअरडमशी डील करायचे फंडे निघत राहतील जगभर. जे मानवसमाज त्यातून तावून-सुलाखून सर्व्हाइव्ह होतील, बोअरडमवर मात करतील ते नीटतील-सावरतील बाकीचे वाया जातील किंवा गुलाम किंवा वेडे म्हणून राहतील. सर्टन हिस्टॉरिकल डिस्टन्सवर गेल्याशिवाय काही कळणार नाही, याक्षणी काळाच्या सीसीटिव्ह्यांवर काय चाललेय ते — आत्ता सगळं धुकं आहे. इतकीच काय ती क्लॅरिटी!

मराठीची म्हणजे आपली (तुमची-आमची) भाषिक चेतना टिकली तर कविता टिकेल. ती विझली तर अजून काही वर्षांनी आपण कविता तरी का लिहिली अन् आयुष्य वाया का घालवलं, याची खंत करत खंगून खंगून मरू…

साहित्य, दृश्यकला, संगीत, नाटक, सिनेमा वगैरे कलांचा परस्परांशी संबंध असावा का? तो कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

हो. आतून सगळे जवळपास एकच आहे — पृथ्वीच्या भूरसासारखे. कुठल्या बाजूच्या भूपृष्ठावरचे पाषाण उखडून लाव्हा उसळेल काही सांगता येत नाही. लय हे मुख्य तत्त्व आहे, सगळ्या कलांना सामाईक आणि इंद्रियगोचर असणारं. लय म्हणजे आवर्तनात बांधला गेलेला काळ. किंवा dy/dt. कोणतेतरी एलीमेंट आहे जे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतेय. ते म्हणजे लय. पण हे झालं अगदी आदर्शवादी किंवा तात्त्विक. सध्याच्या काळात एक विधा जमत नाही म्हणून दुसरी; किंवा एक थोडी जमायला लागली म्हणून दुसऱ्या विधेत लुडबुड करणारे उंदीर प्रचंड प्रमाणात झालेत. आणि ते वाढत आणि माजत जाणार. हे येणाऱ्या अरिष्टाचे लक्षण आहे.

खालील गोष्टींशी कलेचा किंवा कलाकाराचा संबंध कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?
- सामाजिक वास्तव;
- बाजारपेठ;
- विचारसरणी;
- राजकारण.

कलाकाराने आपल्या भूमिकेच्या राजकीयतेचा फार बाऊ करू नये. कोणत्याही एकांगी राजकीय बाजूशी प्रामाणिक राहू नये. स्वदेश संबंधु त्याज्य, स्वग्राम संबंधु त्याज्य, संबधीयांचा संबंधु तो विशेषत: त्याज्य हे चक्रधरांनी सांगितलेय तसे कवीने स्वत:च्या भौतिक बांधिलक्यांशी सुटवंग मोकळे असावं. ग्रामण्याची भीती बाळगू नये. कलेशी अन्‌ माणुसकीशी प्रामाणिक असावं. मात्र राजकीय-सामाजिक भूमिका घ्यायची वेळ आली तर शेपूट घालू नये. किंवा कारण नसताना दुसऱ्याला आवडतं म्हणून उगाच भूमिकांच्या शेपट्या उंचावत उंडारु नये. साईबाबांची अंगठी बोटात घालून साम्यवादी पक्षाची झूल चढवून फिरू नये अन्‌ पल्याड बीफस्टेक खाऊन पेपरन्याप्कीनने तोंड पुसत इथल्या रयतेला शाकाहार अन्‌ देवधर्म शिकवू नये. विचारसरणी आणि धर्म ह्या खाजगी गोष्टी आहेत, त्या सार्वजनिक करू नयेत. बाजारपेठेवर डोळा ठेऊन कला आखली तर वाट्टेल त्या तडजोडी कराव्या लागतात. लवासात जाऊन काव्यगायन करायची वेळ येते! त्यामुळे बाजारकेंद्री दृष्टी टाळावी.

सामाजिक वास्तव सतत बदलतं, विचारसरणींची कालोचितता सदोदित बदलते, राजकारण पदोपदी बदलतं त्यामुळे कवीच्या भावजीवनात हे सर्व असावं, पण अंतर्मनात मात्र कालातीत निसर्ग असावा. निसर्गाशी जोडलेले असावे. निसर्गाशी संधान हवे. निसर्ग — जो कलावंताचा अन्‌ कलेचा मूळपुरुष आहे. तो सोडला वाऱ्यावर अन्‌ सामाजिक वास्तव, बाजारपेठ, विचारसरणी, राजकारण असल्या कचरातुल्य सुपरस्ट्रक्चर गोष्टीत पडलोय गुंतून असे करू नये.

ह्याच काळादरम्यान भारताबाहेरच्या कलाविष्कारांवर तिथल्या सामाजिक-राजकीय वास्तवाचा परिणाम झालेला दिसतो का? भारतातल्या परिस्थितीशी ताडून पाहता त्याला समांतर किंवा त्याहून वेगळे परिणाम दिसतात का?

कामासाठी भारतभर अनेकदा अनेक ठिकाणी य वेळा फिरलो पण अजून भारत नीट कळलेला नाही. भारताबाहेरच्या वास्तवाबद्दल नुसते वाचून, गुगलुन किंवा सिनेमे पाहून काही कळणार नाही. तिथले लाइव्ह एक्स्पोजर पाहिजे. ते मला नाही. त्यामुळे काही सांगता येत नाही.

ह्या काळात समाजाच्या नैतिकतेमध्ये बदल झाले का? कलाविष्कारावर त्याचा काय परिणाम झाला? नैतिकतेमधला किंवा त्यामुळे कलाविष्कारात झालेला हा बदल स्थानिक पातळीवर कितपत सीमित होता आणि जागतिक पातळीवर कितपत झाला?

कवीला हे इतकं कुठलं कळायला. त्याला ज्ञानी किंवा तज्ञच पाहिजे याचं उत्तर द्यायला.

ह्या काळात समाजाच्या वापरायच्या भाषेत काही बदल झाले का? त्याचे सामाजिक-राजकीय-नैतिक परिणाम काय झाले?

जागतिकीकरणोत्तर समाजाची भाषा बदलली. औचित्यकल्पना बदलल्या. काल अशिष्ट समजले जाणारे शब्दप्रयोग किंवा अत्यंत घाण ज्योक पूर्ण कुटुंबेच्या कुटुंबे एन्जॉय करू लागली. वाह्यात शब्दयोजनेच्या शर्यतीत स्त्रिया आणि नवज्येष्ठ नागरिक हिरीरीने उतरले. भाषा कमालीची पुरुषी झाली. लॉरा मुल्वे (Laura Mulvey)नी लिहिले होते तसा भाषेचा कॅमेरा जास्त पुरुषी झाला. पुरुषी म्हणजे श्रेष्ठ किंवा ग्रेट, अशी खूणगाठ मनाशी बाळगून स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात पुरुषी भाषेचा स्वीकार या काळात केला. स्त्रीवादसुद्धा उसन्या पुरुषी भाषेत मांडला जाऊ लागला. मेंदूतली इन्हिबिशन सेन्टर्स दुबळी झाली. आता चावट बोलले जात नाही, अन्‌ बोलले तरी त्यातला चावटार्थ कुणाला भावत नाही. आता उघडउघड भडक, अश्लील अन्‌ लैंगिक बोलले जाते. चावटपणाची संवेदनाच, मजाच हरवत गेली. पुढच्या पिढ्यांत चावट गोष्टींना लाजत खुदूखुदू हसत एन्जॉय करणे कमी होईल. जसा 'व' हा शब्द आता आपल्या भाषेतून हटत चालला आहे, तसा चावटपणा हाही बटबटीततेच्या डूबक्षेत्रात विसर्जित होईल. भाषा आखूड झाली. रिमिक्स आणि कॉपी पेस्ट प्रवृत्तीची झाली. ओरीजीनॅलिटी ओसरली. अनंतध्वनित्व गेले. भाषा सपाट झाली. अर्थांधळेपणा वाढला. अर्थाची नादवलये लोपली. व्याकरणाच्या दृष्टीने, 'क्रियापदाचे बदलले स्थान'!!

जागतिकीकरणानंतरच्या आजच्या 'सपाट जगा'त 'देशीवाद' ह्या संकल्पनेला काय मूल्य आहे?

हा प्रश्न नसता तर आनंद वाटला असता.

कलाकार आणि समीक्षक ह्यांचा परस्परांशी संबंध कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

तीस-चाळीस वर्षापूर्वी समीक्षकाला वाजवीपेक्षा जास्त मान होता. आज उलट झालेय. हे असे चालूच राहणार. कधी हा थोरला भाऊ कधी तो धाकटा. कभी गाडी नाव पर, कभी नाव गाडी पर.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ज्यांचे वय पंचवीसपेक्षा कमी आहे ते आता जगााकडे कसं बघत आहेत हा अर्थ मी घेऊन चाललो आहे.त्यांनी पुर्वीचे साहित्य वाचलेले असते परंतू अनुभवलेले नसते.हे वाचक लिहितात तेव्हा "आमच्यावेळी असे होते "-छाप अनुभव येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ह्या नव्या शिलेदारांबद्दल एक अडचण आहे. नव्या म्हणजे नवद्दोत्तरी या कॉलम खाली जेवढे सारता येतील तेवढे लेखक कवी. ह्यांच्यात एक कळकळ आणि एक तुच्छता सलगीने नांदत असते. खूपदा हताश वाटत राहतं. भाषा उडाणटप्पू वाटावी इतकी सहज असते, आणि बर्‍याचदा नेम ड्रॉपिंग करतात हे लोक. म्हणजे त्यांच्या म्हणण्याला प्रामाणिक वजनही येते. या लोकांच्यातला जिव्हाळा मात्र कुठेतरी लपून राहिलाय की काय असं वाटत राहतं. नशीब सलील वाघांसारखे लोक समकालीन(किंवा सहकालीन) मराठी भवतालाचा उगाच घाऊक द्वेष करत नाहीत. तेवढंच जरा बरं वाटतं जीवाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

"सिनेमा-नाटकात असे चालत असेल. गाण्या-गिण्यातही असे चालत असेल. पण कविता ही या सगळ्याहून गंभीर गोष्ट आहे." आणि "कविता ही शास्त्रीय संगीताइतकी पवित्र गोष्ट आहे." या विधानांमध्येही विरोधाभास दिसत नसेल, तर समकालीन काही दिसेल असे वाटत नाही! असो. कविता हाही एक बुवाबाजीचा प्रकार करण्याचा प्रकार मुलाखतीत जाणवला. असो. भक्त मिळतीलच. कविता ही बाकीच्या घडामोडींहून उच्च व स्वायत्त घडामोड आहे अशी परिकल्पना आताच्या काळातही असेल, तर मराठी कवितेला समकाल पेलणे अवघडच दिसते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या मुलाखतीनंतर मन्या जोशी यांच्या कविता वाचल्या. "कलाकाराने आपल्या भूमिकेच्या राजकीयतेचा फार बाऊ करू नये. कोणत्याही एकांगी राजकीय बाजूशी प्रामाणिक राहू नये" हे वाक्य आणि जोशींच्या कविता हे सगळे सुसंगतच वाटले. असो. कवितेचा एवढा (स्वायत्त) बाऊ करणे हेच एकांगी राजकीय वर्तन आहे, हेही यांना समजत नसावे, याचे सखेद आश्चर्य वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0