सौंदर्यलहरी - भाग १

http://www.vedicbooks.net/images/saundaryalahari_of_Sri_Sankaracarya%20(Shankaracharya)_medium.jpg
वर उधृत केलेले, "सौंदर्यलहरी" ची मीमांसा करणारे एक इंग्रजी भाषेतील पुस्तक ""सौंदर्यलहरी - inundation of divine splendour" पुस्तक" परत वाचते आहे. फार पूर्वीपासून त्याचा जमेल, झेपेल तितका अनुवाद येथे माहीती म्हणून देण्याची इच्छा होती. आजपासून ती सुरुवात करते आहे. १०० श्लोक आहेत. जमेल तसा अनुवाद लिहीत जाईन. हाच धागा वेळोवेळी संपादित करीत राहीन. असे प्रत्येकी १० श्लोकांचा एक भाग असे भाग काढत राहीन.
________________
शिव-शक्ती सायुज्ज्यता व दोहोंची परस्पर अभिन्नता असलेले अस्तित्व यांचे वर्णन पुढील व प्रथम श्लोकात येते.
.
शिवः शक्त्यायुक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं
न् चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि ।
अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि
प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ॥१॥
.
शिव तत्वास शक्ती तत्वाबरोबर सायुज्ज्याता प्राप्त झाल्या कारणाने, जगाची निर्मिती करण्याची क्षमता प्राप्त झाली. अन्यथा त्याला (शिव तत्व) जराशी हालचाल करता येणेदेखॆल शक्य नव्हते. त्यामुळे ब्रह्मा-विष्णू व महेश या तीनही देवता ज्या देवीची पूजा करतात अशा हे देवी, पूर्वसुकृताचा साठा जवळ असल्याखेरीज कोणालाही तुझी प्रार्थना अथवा स्तुती करण्याचे अहोभाग्य व इच्छा लाभत नाही.
.
शिव आणि शक्ती या दोन तत्वांमध्ये शिव अर्थात पुरुष हा स्थिर , अचल मानला जातो. शक्ती अर्थात तीन प्रकारची शक्ती - इच्छाशक्ती , ज्ञानशक्ती व क्रयशक्ती मानली जाते. व शक्ती तत्वाच्या शिवाशी असलेल्या सायुज्ज्यतेमुळे, या विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते. शैव व वैष्णव पंथांमध्ये शक्तीला , स्त्रीरूप समजले जाते. परंतु "समय" नावाच्या शाक्त पंथामध्ये शक्ती ही निव्वळ शिवाचे आभूषण न रहाता, शक्तीला समान दर्जा दिला जातो. तर "कौल" नावाच्या शाक्त पंथामध्ये तर शक्तीस, शिवाहूनाही उच्च दर्जाचे किंवा महत्त्वाचे समजले जाते.
भारतात, प्रत्येक पंथात त्या त्या पंथाच्या देवतेस अन्य देवतांपेक्षा अधिक उच्च स्थान दिले जाते. वरील श्लोक हा शाक्त पंथीय स्वरुपाचा असल्याने, यामध्ये निर्मिती करणारा ब्रह्मदेव, पालनकर्ता विष्णू व संहारक शंकर हे तिघेही शक्तीची स्तुती करता असे उधृत केलेले आहे.
____________
देवीच्या अफाट महतीचे, क्षुद्रशा मानवी मेंदूच्या कल्पनाशक्तीबाहेरचे वर्णन पुढील श्लोकात येते.
.
तनीयांसं पासुं तव चरणपङ्केरुहभवं
विरिञ्चिः सञ्चिन्वन् विरचयति लोकानविकलम् ।
वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसां
हरः संक्षुद्यै(भ्यै)नं भजति भसितोद्धूलनविधिम् ॥२॥
.
हे देवी तुझ्या पायाच्या धूळीच्या एका कणाने प्रभावित होऊन, ब्रह्मदेव या विराट विश्वाची निर्मिती करतो. याच धूलीकणामुळे साक्षात विष्णु हा शेषावतार घेऊन आपल्या सहस्र फण्यांवर विश्वाचा डोलारा सांभाळतो तर तुझ्या पायाच्या धूलीकणामुळे शंकर हा अंतकाळी विश्वाचा संहार करुन, त्या विश्वाची राख स्वतःच्या अंगास माखतो.
.
मानवाला माहीत असलेले विराट व रहस्यमय विश्व हे केवळ देवीच्या पायाच्या धूलीकणासम आहे हे सांगून, या श्लोकामधून, कविस, देवीचे महत्त्व वाचकाच्या मनात ठसवायचे आहे. मानवास ज्ञात असलेले तीन अलौकिक देव अर्थात ब्रह्मा, विष्णु व शंकर हेदेखील आपापली कार्ये या धूळीच्या कणामुळे करु शकतात हे कवि वाचकाच्या मनावर बिंबवतो.
असे मानले जाते की हे विश्व एकूण चवदा लोकांमध्ये विभागलेल आहे. महाविष्णु अधःस्थित सप्तलोक अर्थात सप्तपाताळांना आधार देतो तर स्वतः आदिशेषाचे रुप घेऊन प्रूथ्वी व तिच्यावरील सप्तलोक शीर्षावर धारण करतो.
______________
जिथे वरील दुसरा श्लोक देवीची शक्ती वर्णतो तिथे खालील, तीसरा श्लोक देवीचे प्रेमस्वरुप वर्णन करतो
.
अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी
जडानां चैतन्यस्तबकमकरन्दस्रुतिझरी ।
दरिद्राणां चिन्तामणिगुणनिका जन्मजलधौ
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ॥३॥
.
हे देवी घोर अज्ञानात बुडालेल्या भक्तांकरता, तू म्हणजे जणू अशी नगरीच आहेस जिच्यातील आत्मिक प्रकाशाच्या सूर्योद्याने या भक्तांच्या हृदयातील अज्ञानरुपी घोर अंधःकार दूर होतो. मंदमती जनांकरता, तू म्हणजे असे जणू असे पुष्पगुच्छ आहेस ज्यांच्या मधुसेवनामुळे मंदमती जनांच्या, मंदत्वाचा नाश होतो. व दारीद्र्यात बुडून गेलेल्या लोकांकरता तू म्हणजे जणू ऐच्छिक गोष्टी पुरविणार्‍या चिंतामणी रत्नांचा हारच आहे. तर भवसागरात गटांगळ्या खाणार्‍या दुर्दैवी जनांकरता जणू तू त्यांना तारणारा वराहरुपी विष्णुचा सुळाच आहेस.
.
या श्लोकामध्ये भक्तांच्या लौकिक व अध्यात्मिक कल्याणाकरता झटणार्‍या देवीचे मातृरुप वर्णिले आहे. हिरण्यकेश राक्षसाने पृथ्वीला प्रलयकाळच्या जलामध्ये लपविले असताना पृथ्वीला त्या जलामधुन बाहेर काढणार्‍या विष्णुच्या वराहरुपाचा संदर्भ देखील श्लोकामध्ये येतो.
______________
पुढील ओळींमधुन, कवि देवीच्या कृपाळु रुपाचेच परत वर्णन करतो
.
त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः
त्वमेका नैवासि प्रकिटितवराभीत्यभिनया ।
भयात्त्रातुं दातुं फलमपि च वाञ्झासमधिकं
शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ ॥४॥
.
अन्य सर्व देवतांचे वरदप्रद व अभयप्रद रुप हे त्यांच्या हस्त-मुद्रांमधून (तळहात वरच्या दिशेने वळविलेला ही अभयमुद्रा तर तळहात खालच्या दिशेने वळविलेला ही वरदमुद्रा) प्रकट होते. परंतु हे देवी तू एकमेव अशी देवता आहेस जिला या हस्तमुद्रा आदि बाह्य प्रकटीकरण धारण करण्याची काहीही आवश्यकता नाही कारण तुझे कमलचरण हेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे तसेच भक्तांना अभय देणारे आहेत, भक्तांना संसारा (सागरा)मध्ये आसरा देणारे तसेच भक्तांनी इच्छिलेल्या , मनीषाच पूर्ण करणारे नव्हे तर त्यापेक्षाही भरभरुन देणारे आहेत.
.
अन्य देवतांपेक्षा देवीचे वेगळेपण या ओळींमधून कवि ठसवितो. भक्तांचे रक्षण करणे व त्यांच्या अपेक्षांपेक्षाही अधिक वर देणे हा देवीचा स्वभावधर्मच आहे. आणि "अभय-वरद-मुद्रेमधून" या स्वभावाचा दिखावा करण्याचे तिला काहीही कारण नाही.
___________
स्वर्गीय सुंदर देवी ही सर्व आकर्षणांचा मूळ स्रोत आहे असे म्हटले आहे.
.
हरिस्त्वामाराध्य प्रणतजनसौभाग्यजननीं
पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत्
स्मरोऽपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येनवपुषा
मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम् ॥५॥
.
भक्तांना सौभाग्य प्रदान करणार्‍या अशा तुझी आराधना करुन, कोणे एके काळी, विष्णुने स्त्रीरुप घेऊन, त्रिपुर आणि मदनास जाळणार्‍या (अर्थात कामावरती विजय मिळविलेल्या) प्रत्यक्ष शंकरास वश केले. तुझी आराधना केल्यामुळेच, केवळ स्वतःच्या जोडीदारास रतीस दृष्यमान होणारा कामदेव, हा भल्याभल्या तपस्वी जनांना विचलित करु शकतो.
.
पहील्या ओळीमध्ये विष्णुच्या अतिशय सौंदर्यपूर्ण अशा मोहीनी रुपाचा संदर्भ येतो. देवीच्या "वैष्णवी मंत्राचा" कर्ता विष्णु हा ऋषी मानून तो देवीची आराधनाच करतो असे कविला म्हणायचे आहे. या आराधनेमधुनच विष्णुने देवीसम लावण्य प्राप्त करुन, शंकरास मोहीत केले. कामदेव मदन यानेही देवीची आराधना करुनच तपस्वी जनांना विचलित केले असे कवि म्हणतो.
____________
पुढे असे म्हटले आहे की देवीच्या अनुग्रहामुळेच, कामदेव हा सर्व चराचर सृष्टीवरती अधिकार गाजवु शकतो.
.
धनुः पौष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्चविशिखाः
वसन्तः सामन्तो मलयमरुदायोधनरथः ।
तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपा-
मपाङ्गात्ते लब्ध्वा जगदिदमनङ्गो विजयते ॥६॥
.
ज्याचे धनुष्य हे फुलांनी बनलेले आहे, ज्याच्या धनुष्याची प्रत्यंचा ही मधमाशांची रांगच आहे, ज्याच्या बाणभात्यात केवळ पाच बाण आहेत, ज्याचा सखा हा चंचल असा वसंत ऋतु आहे व ज्याचा रथ म्हणजे मलय पर्वताचा सुगंधी वारा आहे, एवढेच काय जो स्वतः अनंग अर्थात शरीररहीत आहे, अशा कामदेवाची आयुधे अतिशय कोमल नाजूक असुनही हे हिमवानकन्ये, तुझ्या केवळ डोळ्यांच्या कोनातून टाकलेल्या कटाक्षांमुळे तो त्रैलोक्यावरती विजय गाजवु शकतो.
.
स्वतः शरीरविहीन असूनही आणि त्याची आयुधे नाजूक व बेभरवशाची असुनही, केवळ देवीच्या ओझरत्या कृपाकटाक्षामुळे, मदन त्रैलोक्याला त्याच्या इशार्‍यावरती नाचवु शकतो.
______________
देवी त्रिपुरसुंदरीच्या रुपाचे वर्णन आणि आवाहन केलेले आहे.
.
क्वणत्काञ्चीदामा करिकलभकुंभस्तननता
परिक्षीणामध्ये परिणतशरच्चन्द्रवदना ।
धनुर्बाणान् पाशं सृणिमपि दधाना करतलैः
पुरस्तादास्तां नः पुरमथितुराहोपुरुषिका ॥७॥
.
जिने स्वतःच्या नाजुक कमरेभोवती मंजुळ किणकिणाट करणार्‍या मेखला धारण केलेल्या आहेत, बाळ हतींच्या गंडस्थळांसम उरोजभाराने जिचे शरीर किंचीत वाकले आहे, पूर्ण शरदचंद्रासम जिचे मुख तेजाळलेले आहे आणि जिने धनुष्य, बाण, पाश आणि गदा धारण केलेली आहे अशा त्रिपुराचा विनाश करणार्‍या शिवाचे अर्धांग आणि स्व त्रिपुरसुंदरीने आम्हास दर्शन द्यावे.
.
देवीला अहो-पुरुषिका किंवा शिवाचे "स्व" असे संबोधिले आहे कारण अचल आणि तेजोमय अशा पुरुषास, शिव तत्वास केवळ त्याच्या विमर्ष-शक्तीमध्ये प्रतिबिंबित झाल्यानंतर स्वभान येत. आणि शिवाला "स्व" प्रदान करणारी ती विमर्ष-शक्ती अन्य कोणी नसून देवी हीच आहे. जेव्हा "समय" पंथाचा साधक, देवीच्या चातुष्ट्य(?) रुपाचे ध्यान करतो तेव्हा श्लोकामध्ये वर्णिलेले देवीचे रुप हे "समय" पंथाच्या त्या साधकाच्या मणीपूर चक्रामध्ये तेजाळून प्रकट होते.
__________________
श्रीचक्राची बाह्योपचारे उपासना वर्णिली आहे.
.
सुधासिन्धोर्मध्ये सुरविटपिवाटीपरिवृते
मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे ।
शिवाकारे मञ्चे परमशिवपर्यंकनिलयां
भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीम् ॥८॥
.
अमृताच्या महासमुद्रामधील, निपा वृक्षांच्या आनंदमयी वाटिकेमधील, आणि जिच्या दुतर्फा कल्पवृक्षांची दाटी आहे, अशा मणीद्वीप नगरीमध्ये, चिंतामणी रत्नांनी मढवलेल्या गृहामध्ये, ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि इश्वर हे ज्या मंचकाचे पाय आहेत अशा परमशिव स्वरुपाच्या मंचकावरती स्थानापन्न अशा तुझी उपासना करण्याचा आनंद केवळ पुण्यवान जनांनाच लाभतो.
.
वरील श्लोक गूढ आहे. या श्लोकाचा संबंध कौल आणि समय या दोन्ही शाक्त पंथांशी जोडता येतो. श्रीचक्राच्या उपासनेचे वर्णन वरील ओळी करतात.श्रीचक्राच्या रेखाटनांतील विविध भागांचा संदर्भ या ओळींमध्ये आलेला आहे. वरील श्लोकात उधृत केलेला अमृताचा सागर अर्थात सुधा-सिंधु हे श्रीचक्राचे बिंदू स्थान दर्शविते. हे आकृतीच्या बरोबर मध्य भागातील वर्तुळाने दाखविले जाते. श्रीचक्र जर समयचर (सृष्टी-चक्र) नियमांनुसार रेखाटले तर हे जे आतील वर्तुळ आहे ते अनेक त्रिकोणांनी बनलेल्या चौकोनामध्ये येते. यातील ४ त्रिकोण ज्यांचा शिरोबिंदू अधोमुख आहे ते शिव स्वरुप त्रिकोण आहेत तर ५ त्रिकोण ज्यांचा शिरोबिंदू उर्ध्वमुखी आहे ते शक्ती तत्वाचे त्रिकोण आहेत. परंतु जर कौलपंथिय(संहार चक्र) पद्धतीनुसार श्रीचक्र रेखाटले तर, हे आतील वर्तुळ लहानशा त्रिकोणात सामावले जाते. हा त्रिकोण, सर्व अधोमुखी शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणातील पहीला त्रिकोण असून हे शक्ती स्वरुपाचे त्रिकोण मानले जातात तर अन्य उर्ध्व शिरोबिंदू असलेले ४ त्रिकोण हे शिव तत्वाचे मानले जातात. अशा रीतीने त्रिकोणांची संख्या तसेच त्यांची दिशा ही दोन्ही पंथात भिन्न आढळते.
.
४३ त्रिकोणांनी बनलेले श्रीचक्र हे शिव-शक्ती यांचे स्थान अथवा शरीर मानले जाते. बिंदू स्थान जे वर्तुळाने दर्शवितात, हे वर्तुळ श्रीचक्राच्या सर्व त्रिकोणांपासून बनलेले असल्याने याला शिव-शक्तीचे मुख्य स्थान मानले जाते. अशा रीतीने, ब्रह्मा,विष्णु, रुद्र व ईश्वर सर्व देवतांना मंचकाचे पाय केल्याने, या सर्व देवतांवरील देवीचे सार्वभौमत्त्व वरील ओळींमधुन प्रकट होते.
____________________
देहातील, सर्व चक्रांना भेदून, सहस्रार चक्रापर्यंत गेलेली अशी देवीची जागृत कुंडलिनी स्वरुपातील उपासना वर्णिली आहे.
.
महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि ।
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ॥९॥
.
हे देवी, सुषुम्ना नाडीद्वारे प्रवास करत, पृथ्वी तत्वाच्या मूलाधार चक्रास भेदून नंतर जल तत्वाच्या मणीपुर चक्रास भेदून, पुढे अग्नि तत्वाच्या स्वाधिष्ठान चक्रास भेदून, नंतर वायु तत्वाच्या अनहताचा भेद करुन त्याच्या वरील, आकाश तत्वाच्या आज्ञा चक्रास भेदून , हजार पाकळ्यांच्या सहस्रार चक्रामध्ये तू तुझ्या पती सदाशिवासह विहार करतेस.
.
सहसा स्वाधिष्ठान चक्र हे मणीपूर चक्राच्या आधी येते परंतु सर्व तत्वांच्या निर्मितीचा क्रम सुयोग्य यावा याकारणे, वरील श्लोकामध्ये हा क्रम उलटा केलेला आहे. या श्लोकामध्ये समय पंथीय उपासना वर्णिली आहे. यामध्ये कुंडलिनी जागृती आणि मस्तकावरील सहस्रार चक्र भेदन यांचे वर्णन येते. कुंडलिनी ही "जीव" स्वरुपाची शक्ती असून, जीवाचेच पारलौकिक आणि कॉस्मिक(मराठी शब्द?) रुप हे शिव असून, शिवाची शक्ती त्रिपुरसुंदरी आहे जी अखिल ब्रह्मांडाची माता आहे. जीव हा शिवाचेच दुसरे रुप असल्याने, कुंडलिनी शक्ती ही त्रिपुरसुंदरी शक्तीचेच दुसरे रुप आहे. शिवाची शक्ती त्रिपुरसुंदरी हीचे "जीवाची" शक्ती कुंडलिनी या रुपातील मूळ स्थान हे मूलाधार चक्र असून हे चक्र त्रिकोण रुपानेच दर्शविले जाते तर हजार पाकळ्यांचे सहस्रार चक्र हे मेंदूचे स्थान असते. नागिणरुपी, कुंडलिनी शक्तीचा शरीरातील संपूर्ण चेतासंस्थेशीच निकटचा संबंध आहे. जीवास या चेतारज्जुंमुळे, चेतासंस्थेमुळे विश्वाचे ज्ञान होते व तो मायेत गुरफटतो. अशा रीतीने, पाठीचा मणका/कणा हा जीव आणि शिव यामधील सांधा असून, निद्रीस्त कुंडलिनी जागृत झाली की मूलाधारापासून निघून सहस्रारामधल्या शिवास जाऊन मिळते व जीवास सत्यास्वरुपाचे ज्ञान होते.
.
शिवाच्या स्थानामुळे अर्थात मेंदूमुळे हा ज्ञान (ज्ञानशक्ती) आणि कृती (क्रियाशक्ती) स्फुरण पावते, प्रत्यक्षात येऊ शकते. वरील शक्ती प्रत्यक्षात मेंदूच्या नियंत्रणाखालीच प्रत्यक्षात येऊ शकतात आणि हा जो संदेश मेंदू निर्माण करतो तो इडा आणि पिंगला या दोन नाडींमार्फतच मेंदूला पोचविला जातो.
.
पुढे पुस्तकामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांचे कार्य आणि त्यांचा कुंडलिनी आणि मेंदूशी असलेला सबंध बराचसा वैज्ञानिक भाषेत लिहीलेला आहे ज्याचे भाषांतर प्रचंड अवघड वाटले.
९ नंतरच्या बर्‍याचशा श्लोकांचे वर्णन फार क्लिष्ट भाषेत येते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet