डॉ. स्यूस : सगळ्या वयांच्या मुलांसाठी बालसाहित्य

संकीर्ण डॉ स्यूस सूस

डॉ. स्यूस : सगळ्या वयांच्या मुलांसाठी बालसाहित्य

लेखिका - सतलज

थिओडोर स्यूस गाईसेल अर्थात डॉ. स्यूस हे अमेरिकन बालसाहित्यातील एक अग्रगण्य नाव. डॉ. स्यूस यांच्या कलंदर लेखनाने अमेरिकेतील बालसाहित्याचा चेहेरामोहराच बदलून टाकला. एवढेच नव्हे; तर बालसाहित्य म्हणजे काय, बालसाहित्याचा उद्देश काय असावा, पुस्तके मुलांना काय देतात, धर्म, राजकारण, सामाजिक प्रश्न यावर बालसाहित्याने बोलावे का, असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आणि त्यांचा आपल्या पद्धतीने शोधही घेतला. १९३६ साली डॉ. स्यूसनी आपले पहिले पुस्तक लिहिले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी एकूण ५७ पुस्तके लिहिली. या पुस्तकांचा २० भाषांत अनुवाद झाला आणि जवळजवळ साठ कोटी प्रती विकल्या गेल्या. जगातील कुठल्याही बालसाहित्यकारला लाभली नाही एवढी प्रसिद्धी, पैसा आणि अर्थात टीका डॉ. स्यूसच्या वाट्याला आली. आजही डॉ. स्यूसच्या पुस्तकांना अमेरिकेत खप आहे; डॉ. स्यूसच्या पुस्तकांवर चित्रपट, नाटके बसवली जातात; बालमानसशास्त्रात त्यांचा अभ्यास केला जातो, एवढेच नव्हे तर दर वर्षी त्यांच्या वाढदिवस अमेरिकेतील सगळ्या शाळेत 'वाचन दिन' म्हणून साजरा केला जातो. मुलांचे एवढे प्रेमसुद्धा दुसर्‍या कुठल्या लेखकाला लाभले नाही.

डॉ. स्यूसच्या मते त्यांची पुस्तके मुलांना आवडतात, कारण त्यांनी मुलांची पुस्तके मुलांसाठी लिहिली. मुलांना कमी न लेखता, उपदेश न करता, मुलांना आवडतील अशा विषयांवर त्यांनी लिहिले. आजच्या जमान्यात हा विचार फार नवीन वाटणार नाही, पण हा विचार रुजवण्यामध्ये ज्या लेखकांचा वाटा आहे त्यांत डॉ. स्यूस अग्रभागी होते. १९३०च्या काळात बहुतेक बालसाहित्य बोधप्रद असायचे. मुलांना काय वाचायला आवडते यापेक्षा पालकांना आणि शिक्षकांना मुलांनी काय वाचावे असे वाटते याचा विचार करून पुस्तके लिहिली जात. 'पीटर पॅन'चा लेखक जे. एम. बॅरी, 'पीटर रॅबीट'ची लेखिका बिअ‍ॅट्रिक्स पॉटर, एडिथ नेस्बिट, मार्क ट्वेन असे काही मोजके लेखक मुलांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करत होते. पण एकुणात ते अपवादच. बहुतांशी साहित्य सद्गुणी मुलांची प्रगती आणि दुर्गुणी मुलांची अधोगती हाच संदेश देण्याचे काम करायचे. या पार्श्वभूमीवर कथाही म्हणता येणार नाही, कवितापण नाही, कुठलाही संदेश नाही, धार्मिक शिकवण नाही; फक्त एका मुलाचे कल्पनाविश्व मांडणारे 'And to Think I Saw It on Mulberry Street ' हे पुस्तक आले आणि एकच धमाल उडाली.

And to Think I Saw It on Mulberry Street या पुस्तकाला कथा अशी नव्हतीच. मार्को नावाचा एका छोटा मुलगा शाळेतून घरी येताना एक घोडागाडी पाहतो. आपल्या कल्पनेत तो त्या घोड्याचा झेब्रा करतो. मग झेब्र्याला साधी गाडी कशी शोभेल म्हणून एक रथ जोडतो. मग रथाला झेब्रा कसा शोभेल म्हणून रेनडीअर जोडतो. मग रेनडीअरला रथ कसा चालेल म्हणून उडती स्लेज जोडतो. मग रेनडीअर बरोबर हत्ती, जिराफ आणि शहामृग आणतो. मग हत्तीवर एक अंबारी ठेवतो. मग आपल्या गोष्टीत राजा तर हवाच म्हणून भारतातून आलेला एक हिरेजडित राजा अंबरीत बसवतो. हळूहळू या कल्पनविस्तारामध्ये मलबरी स्ट्रीटवर एक मोठी परेडच तयार होते. मग परेडमध्ये मेयर येतो, परेड सांभाळायला पोलीस येतात, पत्रकार येतात. मार्कोचा कल्पनाविस्तार वाढतच जातो. शेवटी शेवटी तर या कल्पनेतील परेडमध्ये एक चिनी माणूस, एक जादूगार आणि एक दहा फूट दाढी असलेला अवलियापण येतात. घरी पोचताना छोटा मार्को फार उत्साही असतो. कधी एकदा या परेडची गोष्ट बाबांना सांगीन असे त्याला होते. घरी येताच बाबा त्याला विचारतात, "हां, काय काय बघितले आज घरी येताना सांग बघू!" बाबांच्या कडक नजरेपुढे मार्कोचे सगळे अवसान गळून पडते. "काही नाही." तो बारीकसा आवाज काढून म्हणतो, "एक घोडा गाडी. बस."

मलबरी स्ट्रीट

डॉ. स्यूसचे हे पहिले पुस्तक तब्बल २७ प्रकाशकांच्या 'साभार परत' अभिप्रायाचे धनी झाले. एवढेच नव्हे, तर 'आपल्याला बालसाहित्यामध्ये फार गती दिसत नाही, तरी आपण व्यंगचित्रकारितेतच रस घ्यावा' असे शेरेही मिळाले. शेवटी गाईसेलच्या एका प्रकाशक मित्राने हे पुस्तक छापले आणि डॉ. स्यूसचा जन्म झाला. प्रकाशकांनी मोडीत काढलेले हे पुस्तक मुलांना मात्र आवडले. डॉ. स्यूसच्या पुस्तकांना असलेली मागणी वाढतच गेली. छोटयांना आवडतील अशी चित्रे आणि मुलांना लक्षात राहतील असे सोपे, पण गेय शब्द यामुळे डॉ. स्यूस मुलांचे लाडके लेखक झाले. दुसर्‍या महायुद्धाचा सुमारास त्यांनी इंग्लंडमधल्या प्रसिद्ध 'Punch' साप्ताहिकामध्ये नोकरी स्वीकारली. युद्धकाळात त्यांनी जवळ जवळ ४०० व्यंगचित्रे काढली. हिटलर आणि मुसोलिनीला त्यांचा पहिल्यापासून विरोध होता. नाझीवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेने लवकरात लवकर युद्धात उतरावे असे त्यांचे मत होते. युद्ध संपल्यावर गाईसेलनी आपली 'Punch' मासिकातील नोकरी सोडून बालसाहित्यावर लक्ष केन्द्रित करायचे ठरवले.

१९५७ साली आलेल्या त्यांच्या 'The Cat in the Hat' या पुस्तकाने बालसाहित्यातील विक्रीचे सर्व विक्रम मोडले. एवढेच नव्हे, तर या पुस्तकानंतर डॉ. स्यूसच्या आधीच्या पुस्तकांचापण खप वाढला. या पुस्तकानंतर डॉ. स्यूस अमेरिकेतीलच नव्हे, तर जगातील प्रथितयश बालसाहित्यकार म्हणून ओळखले जाऊ लागले. या पुस्तकाची जन्मकथापण गमतीची आहे. त्या काळात मुलांना अक्षर ओळख करून देण्यासाठी डिक अँड जेन या नावाची प्रायमर असायची. म्हणजे साधारणपणे आपल्या 'छगन छत बघ' पुस्तकांसारखी. डॉ. स्यूसच्या मते ही सरकारी पुस्तके अतिशय कंटाळवाणी आणि भिकार साहित्यमूल्ये असलेली होती. आपले हे आवडते विधान ते अगदी जाहीर कार्यक्रमातपण करायचे. त्यांचे हे मत अनेकदा ऐकल्यावर होग्टोन मिफीन या प्रकाशनगृहात काम करणार्‍या त्यांच्या मित्राने विचारले, "मग तू का नाही मुलांना अक्षर ओळख करून देणारी पुस्तके लिहीत?" डॉ. स्यूसने हे आव्हान स्वीकारले. अमेरिकन शिक्षण खात्याने त्यांना मुलांना शिकवायच्या २०० शब्दांची यादी दिली. हे २०० शब्द घेऊन त्यांनी 'The Cat in the Hat' लिहिले. 'The Cat in the Hat' तुफान गाजले. केवळ अक्षरओळख करून देणारे प्रायमर म्हणून नाही, तर एक अभिजात बालसाहित्य म्हणून या पुस्तकाने मान्यता मिळवली. १९७१ साली या पुस्तकावर टेलीफिल्म बनली, तर २००३ साली त्यावर चित्रपट निघाला. एका पावसाळी दिवशी दोन मुले घरात एकटी असताना एक हॅट घातलेला बोका त्यांच्या घरी येतो. विविध खेळ करून तो मुलांना खूप हसवतो. मुले आणि बोका मनसोक्त पसारा घालतात. घरातला मासा या बोक्याला निक्षून विरोध करतो. पण बोका ऐकत नाही. उलट तो माशालाच त्रास द्यायला लागतो. त्याचा फिशटँक काठीवर ठेवून बॅलन्स करतो. त्याला हवेत उंच उडवतो. थोड्या वेळात मुलांनापण कंटाळा येतो. पसारा बघून आई ओरडेल अशी काळजी वाटायला लागते. पण हा बोका काही घराबाहेर जायला तयार नसतो. शेवटी माशाला कोपर्‍यावरून घराकडे येणारी आई दिसते. छोटा मुलगापण धीट होऊन बोक्याला त्याचे खेळ थांबवायला सांगतो. मुलांनी ओरडून सांगितल्यावर बोका थांबतो आणि आपल्या स्पेशल मशीनने सगळे अस्ताव्यस्त घर साफ करून देतो. आई घरात पाय टाकते तेव्हा बोका घरातून गेलेला असतो आणि सगळे घर नीटनेटके असते. पुस्तकाच्या शेवटी आई मुलांना विचारते, "मग, मी नसताना तुम्ही काय केले?" पण मुले काही उत्तर देत नाहीत. उलट वाचकांनाच विचारतात, "तुमच्या आईने तुम्हांला असे विचारले तर काय तुम्ही काय बरे सांगाल?"

कॅट इन ट हॅट

'The Cat in the Hat 'मुलांना एवढे का आवडते हे मोठ्यांना न कळणारे कोडे आहे. सगळी मुले हे पुस्तक वाचताना मनमुराद हसतात. या पुस्तकाचा नक्की अर्थ काय यावर अनेक वाद आणि प्रवाद झाले. काही तज्ज्ञांच्या मते 'द कॅट इन द हॅट' मुलांच्या छुप्या बंडखोरीला उत्तेजन देते. सारखे शहाणे बनवून सोडणार्‍या पुस्तकांच्या मध्ये हे पुस्तक, आईबाबा बाहेर गेल्यावर दंगा करण्याची, पसारा करण्याची मुलांची हौस भागवते. कुठल्या मुलाने आई-बाबा बाहेर गेल्यावर पसारा घातला नाही? मोठ्यांपासून लपवून ठेवलेले छोट्यांचे हे सीक्रेट आहे. काहींना वाटते की हे पुस्तक मुलांना वास्तव जगातील अनिश्चितता आणि अराजकता दाखवते. सतत सुबक, सुंदर, बांधीव जग दाखवणार्‍या पुस्तकांपेक्षा मुलांना हे पुस्तक इंट्रेस्टिंग वाटते. सध्या अमेरिकेतील anti bullying campaign मुलांना शाळेतील बुली कसं असतो हे समजावून देताना 'कॅट इन द हॅट'चे उदाहरण देते. घरातल्या मुलांशी मधाळ बोलणारा हा बोका माशाला मात्र भरपूर त्रास देतो. एवढेच नाही, तर मुलेपण त्यांच्याही नकळत बोक्याच्या उद्योगात सामील होतात. सुरुवातीला गोड बोलणारा बोका नंतर मुलांचेपण ऐकत नाही. पण निक्षून 'Stop' सांगितल्यावर मात्र मान खाली घालून निघून जातो. 'The Cat in the Hat'चा अर्थ काय हा वाद इतका मोठा झाला की काही लोकांनी सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉईडला त्याचा अर्थ विचारला. त्यावर फ्रॉईडने उत्तर दिले की "Sometimes the cat in the hat is just a cat in the hat". मग आता या वाक्याचा अर्थ काय यावर पुन्हा वाद सुरू झाले.

डॉ. स्यूस यांचे खरे वेगेळेपण दिसले ते त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विषयावर लिहिलेल्या बालसाहित्यामध्ये. मुलांना सारखे पंतोजीप्रमाणे धडे देऊ नयेत असे त्यांचे मत असले तरी मुलांना कुठलीच मूल्ये शिकवू नये असे त्यांना वाटत नव्हते. मात्र शिस्त, वक्तशीरपणा, आज्ञाधारकपणा, मोठ्या माणसांचे ऐकणे एवढेच गुण असतात हे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या मते न्याय, समता, बंधुता, लोकशाही, निसर्गसंवर्धन ही खरी महत्त्वाची मूल्ये आहेत आणि त्यांची ओळख आपण मुलांना करून द्यायला पाहिजे. त्यांच्या 'Horton Hears a Who', 'Lorax', 'The Year Grinch Stole our Christmas', 'Snitches','Yertle the Turtle' या पुस्तकांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयांचा आढावा घेतला. 'Horton Hears a Who' यात एका हॉर्टन नावाच्या हत्तीची गोष्ट आहे. एकदा पाण्यात खेळताना हॉर्टनला "वाचवा वाचवा" अशी मदतीची हाक ऐकू येते. खूप वेळ शोधल्यावर हॉर्टनच्या लक्षात येते की एका छोट्याशा धुळीच्या कणावरून हा आवाज येत आहे. हॉर्टनच्या लक्षात येते की आपण पाण्यात खेळताना त्या कणावर पाणी उडाले असणार. हॉर्टन ठरवतो की या छोट्या प्राण्याला आपल्या मदतीची गरज आहे, तेव्हा आपण त्याचे रक्षण करायला हवे. तो धुळीचा कण नाजूकपणे एका फुलावर ठेवतो आणि त्या फुलासाठी सुरक्षित जागा शोधू लागतो. इतर सगळे प्राणी सोंडेवर फूल घेऊन फिरणार्‍या हॉर्टनला बघून हसायला लागतात. इतर कुणालाच तो छोटा आवाज ऐकू येत नाही. उलट आता सगळे प्राणी खोड्या काढयला लागतात. हॉर्टनला तो धुळीचा कण टाकून द्यायला सांगतात. गरूड हॉर्टनचे फूल एका मोठ्या शेतात टाकून देतो. हॉर्टन खूप शोधून ते फूल परत मिळवतो. सगळे प्राणी त्याला सांगतात, "आम्हांला तर तू आता वेडा वाटायला लागला आहेस. तुला आता शिक्षा नको असेल तर तो धुळीचा कण टाकून दे." हॉर्टन स्पष्ट नकार देतो. तो म्हणतो, "If I do, this small person may come to a great harm. I can't put it down and I won't! After all, a person is a person, no matter how small!" हॉर्टनचे हे बोलणे ऐकून त्या छोट्या कणावरून आवाज येतो "थॅंक यू! तुम्ही आम्हांला मदत केलीत. तुमच्यामुळे आमचे गाव वाचले." आता हॉर्टनच्या लक्षात येते की त्या धुलिकणावर केवळ एक प्राणी नाही, तर एक आख्खे गाव आहे. हॉर्टनची जबाबदारी अजूनच वाढते. गावाचे नाव असते 'हुवाईल' आणि त्या छोट्या माणसांचे नाव असते 'हू'. हॉर्टन सगळ्या छोट्या हूंना मोठयाने आवाज करायला सांगतो. सगळे हू मोठा आवाज करतात. ढोलताशे वाजवतात. पण इतर प्राण्यांना काही तो आवाज ऐकू येत नाही. प्राणी हॉर्टनला पिंजर्‍यात कैद करतात आणि हूवाईलचा निवारा असलेले फूल उकळत्या तेलात टाकायची तयारी करतात. हॉर्टन हूंना अजून मोठयाने आवाज करायला सांगतो. हुवाईलचा मेयर सगळीकडे धावून लोकांना जोरात ढोलताशे-पिपाण्या वाजवायला सांगतो. तेवढ्यात मेयरला दिसते की एक छोटा मुलगा आपल्या खेळातच दंग आहे. त्याचे या सगळ्या खटाटोपाकडे लक्ष नाही आहे. हुवईलचा मेयर त्यालाही आवाज करायला सांगतो. तो छोटा आपला खारूताईचा आवाज मोठ्या आवाजात मिसळतो आणि काय आश्चर्य! जंगलातील प्राण्यांना हुवाईलचा आवाज ऐकू येतो. प्राणी हॉर्टनला सोडवतात आणि हुवाईल ज्यावर वसलेले असते ते फूल सुरक्षित ठेवून देतात. हुवाईलची पाचां उत्तरांची गोष्ट साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होते.

हॉर्टन

'Horton Hears a Who' अतिशय गाजले. राजकीय आणि सामाजिक बालसाहित्याचा एक वेगळा प्रांत या पुस्तकाने शोधला. त्याआधी कुठल्याही बालसाहित्यकाराने थेटपणे राजकीय आणि सामाजिक विषयाला हात घातला नव्हता. 'Uncle Tom's Cabin' मुलांमध्ये लोकप्रिय झाली असली तरी मुळात ही कादंबरी बालसाहित्य म्हणून लिहिली नव्हती. तर मार्क ट्वेनच्या 'Huckleberry Finn'मध्ये गरीब काळ्या समाजाचे प्रभावी चित्र असले तरी त्यात प्रत्यक्ष राजकीय भाष्य केले नव्हते. 'Horton Hears a Who'ने मुलांशी सामाजिक विषमता, सत्ता या विषयांवर प्रत्यक्ष संवाद साधला. मुलांमध्ये 'Horton Hears a Who' अतिशय लोकप्रिय झाली. त्यातील A person is a person, no matter how small! हे वाक्य अनेक सामाजिक चळवळींची घोषणा झाले. आजही अमेरिकेत गाड्यांवर, घरांत 'A person is a person, no matter how small'चे स्टिकर दिसतात. अमेरिकेतील अँटी-अबॉरशन चळवळीनेसुद्धा हे वाक्य आपले घोषणा वाक्य म्हणून घेतले होते. पण डॉ. स्यूसने त्यांच्यावर खटला भरून ते काढून टाकायला लावले.

'लोरॅक्स' हे डॉ. स्यूसचे अजून एक गाजलेले पुस्तक. 'लोरॅक्स'मध्ये डॉ. स्यूसने पर्यावरणाच्या प्रश्नाची मुलांना ओळख करून दिली. १९७१ मध्ये लिहिलेले हे पुस्तक काळाच्या भलतेच पुढे होते. नुकताच २०१२ मध्ये युनिवर्सल स्टुडियोने या पुस्तकावर अॅनिमेशन चित्रपट बनवला आणि तोही तितकाच लोकप्रिय झाला. 'लोरॅक्स'ची कहाणी सुरू होते एका उजाड माळरानावर. या माळरानात एका पडक्या घरात लेखकाला वन्सलर नावाचा माणूस भेटतो. वन्सलर त्या माळरानाची कहाणी सांगू लागतो. पूर्वी हे माळरान म्हणजे एक सुंदर जंगल होते. जागोजागी तळी होती, सुस्वर गाणारे हंस होते, रंगीबेरंगी मासे होते आणि अप्रतिम सुगंधाने दरवळणारी टफेटाची झाडे होती. या टफेटा झाडांचा धागा रेशमसारखा मऊ मुलायम होता. ही झाडे बघताच वन्सलरच्या तोंडाला पाणी सुटते आणि तो ही झाडे तोडून धागे तयार करायच्या उद्योगाला लागतो. तो झाड तोडणार तेवढ्यात एक बुटुकबैंगण माणूस उडी मारून बाहेर येतो आणि म्हणतो, "My name is Lorax. I speak for the trees. I speak for the trees, because the trees have no tongue". लोरॅक्स वन्सलरला झाडे तोडण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण वन्सलर काही ऐकत नाही. तो झाडे तोडतच राहतो. जंगल तोडून एक गावच वसवतो. मोठी मोठी यंत्रं आणतो. कारखाने बांधतो. बंदरे बांधतो. लोरॅक्स सतत वन्सलरला भेटून झाडे तोडण्याचे दुष्परिणाम सांगत राहतो. कधी तो सांगतो, "आज सगळे मासे मेले. तू जे दूषित पाणी तळ्यात सोडतोस, ते माशांना सोसवत नाही." कधी सांगतो "आज सगळे हंस उडून गेले. इथल्या हवेचा त्यांना त्रास होतो. त्यांना गाता येत नाही." कधी म्हणतो, "आज माकडे निघून गेली. टफेटा झाडांची फळे खाऊन ती बिचारी राहायची. तू सगळी झाडे तोडलीस, आता ती काय खाणार?" वन्सलरलापण हवेत, पाण्यात होणारा बदल कळत असतो. पण आपल्या पैशांच्या मोहापायी त्याला थांबता येत नसते. तो म्हणत राहतो, "Business is a business and business must grow, regardless of crummies and tummies you know!" पण अखेरीस शेवटचे टफेटा झाड पडते आणि सगळे उद्योग धंदे, कारखाने बंद पडतात. कामगार शहर सोडून निघून जाता. घरे ओस पडतात. मागे राहतात फक्त लोरॅक्स आणि वन्सलर. लोरॅक्स वन्सलरला भेटायला येतो आणि फक्त म्हणतो, "unless". वन्सलरला त्या शब्दाचा अर्थ तेव्हा कळत नाही, पण आज लेखकाला भेटल्यावर त्याला अर्थ अचानक उमगतो. लोरॅक्स आपल्या छोट्याशा घरात टफेटा झाडांची एक बी ठेवून गेला असतो. वन्सलर त्याला म्हणतो, "UNLESS someone like you cares a whole awful lot, nothing is going to get better. No, it's not." वन्सलर ती बी लेखकाला देतो. त्याला ती रुजवायला सांगतो. त्याची काळजी घ्यायला सांगतो. जंगल तयार करायला सांगतो. वन्सलरला आशा असते की कदाचित मग लोरॅक्स आणि त्याचे मित्र परत येतील.

लोरॅक्स

१९७१ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक काळाच्या पुढे होते. जागतिक तापमानवाढ जेव्हा शास्त्रज्ञांच्यापण लक्षात आली नव्हती, तेव्हा लोरॅक्स पर्यावरणाचे महत्त्व मुलांना सांगत होता. आणि ते फक्त 'झाडे लावा झाडे जगवा' अशा गुडीगुडी भूमिकेतून नाही तर बेलगाम औद्योगीकरणाचे दुष्परिणाम सांगून. अर्थात १९७१ साली लोरॅक्स अनेकांना आवडले नाही. हे पुस्तक मुलांना भविष्याचे निराशावादी चित्र दाखवते, मुलांना खोटी भीती दाखवते अशी भरपूर टीका झाली. पण 1990 सालापर्यंत जशी लोरॅक्सची भविष्यवाणी खरी दिसायची चिन्हे दिसू लागली, तशी या पुस्तकाची प्रसिद्धी वाढत गेली. अचानक सगळ्यांना पुस्तक निराशावादी न वाटता वास्तववादी वाटू लागले. एकूणच 'UNLESS'चा अर्थ कळायला फक्त वन्सलरला नाही, तर सगळ्यांनाच वेळ लागला.

अनेक मुलांसाठी अतिशय वादग्रस्त आणि राजकीय वाटतील अशा प्रश्नांवरदेखील डॉ. स्यूसने बेधडक लिहिले. त्यांचे 'Yurtle the Turtle' हुकूमशाहीच्या विरोधात भाष्य करते. 'How the Grinch Stole Christmas' आणि 'Snitches' बाजारीकरणावर आणि चंगळवादावर टीका करते. 'Green Eggs and Ham' हे असेच गमतीदार पुस्तक. यात सॅम आय अॅम नावाचा एक छोटा उंदीर मांजराला हिरव्या रंगाची अंडी खायचा आग्रह करत असतो. वरवर पाहता हे पुस्तक मुलांना हिरव्या रंगाच्या गोष्टी खायला शिकवते असे वाटते. पण अभ्यासकांच्या मते ह्या पुस्तकात अधिक खोलवर अर्थ दडलेला आहे. १९५७ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी सिव्हील लिबर्टी अॅक्ट मंजूर केला. या कायद्याने शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी कृष्णवर्णीय आणि इतर वर्णाच्या लोकांना प्रवेश नाकारणे हा गुन्हा ठरला. या सामाजिक पार्श्वभूमीवर 'Green Eggs and Ham' आले. इतकी वर्षे अनेक शाळा, कॉलेज, क्लब्स, रेस्टॉरंट अशा सार्वजनिक ठिकाणी केवळ गोर्‍या लोकांना प्रवेश होता. गोर्‍या समाजाला हा मोठा बदल पचवणे कठीण होत होते. डॉ. स्यूसना ही गोर्‍या समाजाची 'कळते पण वळत नाही' मनस्थिती लक्षात आली. कोंबडीचे अंडे पांढरे सोडून इतर कुठल्या रंगाचे असेल अशी आपण कल्पना तरी करतो का? (त्या काळी भुरी अंडी मिळत नव्हती.) पण ज्या गोष्टी पांढर्‍याच रंगाच्याच असायला हव्यात असे आपल्याला वाटते त्या इतर रंगांच्यापण असू शकतात. या रंगीबेरंगी जगाला एक आपण संधी तर द्यायला हवी. काय माहीत, आपल्याला वाटते त्यापेक्षा ते जग फार सुंदर असू शकेल! कुठेही आक्रमक न होता, कोणालाही कमी न लेखता आणि शिकवणीचा आव न आणता, वर्ण समानतेची कल्पना 'Green Eggs and Ham' सुचवून जाते.

अशा साध्या, सोप्या, पण थेट भाषेत लिहिलेल्या अशा पुस्तकांनी पाच दशके बालमनावर राज्य केले. राजकारण, समाजकारण हे मुलांचे विषय नाहीत. गरिबी, विषमता, जगातील अन्याय या विषयावर मुलांशी बोलू नये. ते त्यांना कळणार नाही किंवा मुले घाबरून जातील असे आजही अनेकांना वाटते. (मुले टीव्हीवरच्या भडक बातम्या बघत असतात हे आपण विसरून जातो). डॉ. स्यूसना हे म्हणणे मान्य नव्हते. न्याय, अन्याय, समता, याची मुलांना उपजत जाणीव असते. मात्र या संकल्पनांचे संस्कार करायला लागतात. आपण धार्मिक संस्कार नाही का मुलांवर करत? मग सामाजिक संस्कार का नाही करायचे? अशी त्यांची भूमिका होती. डॉ. स्यूसची पुस्तके या संकल्पना शिकवण्याची भाषा आपल्याला देतात. मुलांना बोअर न करता, त्यांना समजेल, रस वाटेल अशा पद्धतीने सामाजिक संस्कार करतात. पुढे शाळेत आपण मानवी हक्क, न्याय, समता, बंधुता या सगळ्या गोष्टी शिकतो. पण आधी कधी त्याच्याशी संबंध आला नसेल तर या गोष्टी फक्त ५ मार्कांचे प्रश्न होतात. मुलांच्या मनात रुजत नाहीत. Human rights are universal, inalienable, indivisible, independent and interrelated अशी वाक्यं फक्त पाठ केली जातात. पण 'a person is a person, no matter how small!' मानवी हक्क म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने मुलांना शिकवते. "Unless someone like you cares a whole awful lot, nothing is going to get better. No, it's not!" असे शब्द चळवळींची गरज का असते ते सांगतात.

सुंदर, दर्जेदार आणि समाजाभिमुख बालसाहित्य कसे असावे हे समजून घ्यायचे असेल तर डॉ. स्यूस जरूर वाचावे. डॉ. स्यूसचा मराठीत कुणी अनुवाद केला आहे की नाही माहीत नाही, पण ते सहजपणे उपलब्ध नक्कीच नाही. हा खटाटोप कुणीतरी करायला हवा. कारण फक्त दोन ते दहा वर्षांच्या मुलांसाठीच नाही तर सगळ्या वयांच्या उत्साही मुलामुलींसाठी डॉ. स्यूस ही एक वाचनपर्वणी आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर ओळख करून दिलीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

वा! डॉ.स्युस यांची ओळख खरच फार अप्रतिम रीत्या करुन दिलेली आहे. एक काळ होता जेव्हा डॉ. स्युस ने घरावरती राज्य गाजविले होते नंतर एक काळ "स्पंजबॉब आणि डोरा" यांचाही धुडगूस सहन केला. परंतु बालमानस्शास्त्राच्या दृष्टीने काही गोष्टींना महत्त्व असते हे लक्षात आले नाही. अलास!
पण या लेखामुळे जो नवा दृष्टीकोन लाभला आहे त्यामुळे डोळस आई बनले नसले तरी डोळस आज्जी नक्की बनेन याची खात्री पटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला आता यांची पुस्तके घ्यायची वेळ झाली! उत्तम परिचय!
मनापासून खूप खूप आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी साध्यासरळ शैलीत करून दिलेली ओळख. हे गृहस्थ इतके प्रसिद्ध असल्याचं मला अजिबात माहीत नव्हतं. लेख आवडला आणि माहितीपूर्ण-उपयुक्तही वाटला. अजून लिहीत जा की...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुरेख लेख. डॉ. स्यूसचे कोट्स आंतरजालावर प्रसिद्ध आहेत, मात्र त्यापलिकडे त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. आता उत्सुकता वाढली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेख. अतिशय आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेख. नुकताच लोरॅक्स सिनेमा बघितला आणि त्याच्या साधेपणाने आणि सहजपणाने प्रभावित झालो होतो. डॉ. स्यूसची कॅट इन द हॅट अगदी मोजक्या शब्दांत बनवलेली आहे हेही माहिती होतं. स्यूसच्या विचित्र प्राण्यांचं विचित्र विश्व वेगवेगळ्या पातळ्यांवर कसं भुरळ घालतं हे नीट समजावून सांगितलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहान मुलांचे विश्व समृद्ध करण्याबरोबरच मोठ्यांच्याही मनाला पंख लावणार्‍या डॉक्टर स्युस यांच्या लिखाणावरील हा लेख अतिशय आवडला. ओघवत्या शैलीमध्ये आणि मुख्य म्हणजे, मधे मधे कथा पेरुन लिहील्याने, लेख फार रोचक झाला आहे. वाचताना मन परत बालपणात जाऊन आले. स्युस यांच्या कथांमधील वेडपटपणालाही एक मेथड असते. कॅट इन द हॅटमधील लहान मुलांची जाचक शिस्तबद्धपणातून मुक्तता करणारा बोका अफलातूनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज डॉ. स्युस यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त नव्या व जुन्या सर्वांकरता हा धागा वर काढते आहे. १-४-टॅन ऐकताय ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!