एक शेपूट... दोघांचं

मधुरा आणि चारुता एकदा चेकाळल्या की त्यांना आवरणं कठीण जातं. चारुताच्या घरी आम्ही जमलो होतो तेव्हा आमच्या गप्पा थांबवून तिने आवर्जून कबड्डीची मॅच लावली.
"कोणाची मॅच आहे?" उगाच आपल्याला रस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. लहानपणापासूनच मी कबड्डी वगैरे खेळांपेक्षा कॅरम आणि बुद्धिबळ यांसारख्या सुरक्षित खेळांचा चाहता आहे.
"मला काय माहीत!" चारुता म्हणाली.
"म्हणजे?"
"कोणी का खेळत असेना. मी बघते." तिने मधुराकडे किंचितकाही कटाक्ष टाकला. त्या दोघी आचरट हसल्या.
"..." मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.
"थांबरे जरा... ए.. बघ बघ, तो कसला आहे ना!" चारुता मधुराला म्हणाली.
"तो, डावीकडून तिसरा?" मधुरा.
"हो. मला फार म्हणजे फारच आवडला तो."

मुलींचा विषय निघाला की प्रसादच्या चेहेऱ्यावर जसे लाळघोटे भाव येतात तसले भाव त्यांंच्या चेहेऱ्यावर होतेे. मी, रोहन आणि प्रसाद त्या दोघींकडे अवाक् होऊन बघत होतो.
"बघ बघ, आपला हिरो आता चढाई करायला चाललाय"
"मला आवडेल ते बघायला." त्या दोघी पुन्हा खिदळल्या. संपूर्ण मॅचभर त्यांचं हेच चालू होतं. मध्ये जेव्हा थोडा वेळ मिळाला तेव्हा रोहनने विचारलं.
"काय तुम्हाला बायकांना एवढं पुरुषांकडे बघायला आवडतं कोण जाणे!"
"मग, तुम्ही नाही का तोकडे कपडे घातलेल्या बायका बघत? हिंदी सिनेमांमध्ये काय असतं दुसरं?" चारुता.
"ते वेगळं."
"वेगळं कसं? आता हीच कबड्डीची मॅच बायकांची असती तर तुम्ही बघितली नसती?"
"हो, मी बघितली असती." प्रसादचा इतका वेळ गप्प असलेला लाळघोटेपणा पुन्हा उफाळून आला. त्याच्या डोळ्यासमोर तरुणी एकमेकींना घेरताहेत, पकडताहेत अशी रम्य चित्रं तरळायला लागली.
"मग! तसेच बायकांना पण मुश्टंडे आवडतात." हे बोलणं मधुराकडून! ही सध्या तिच्या मागे कोणीतरी लागलंय म्हणून कुरुप दिसण्याचा प्रयत्न करत्ये आणि मुद्दाम लावलेल्या जाडजूड फ्रेमच्या बारकुड्या ढापणांतून चवीचवीने हे पुरुष बघत्ये.

मी घरी गेल्यावर शर्ट काढून आरशात निरखून पाहिलं. पोट आत घेतलं, श्वास खेचून घेऊन छाती जमेल तितकी फुगवली. ५६ इंच नाही तरी गेला बाजार ४४-४५ तरी असायला हवी होती. हात बाजूला घेऊन दंडाच्या बेटकुळ्या शक्य तितक्या फुगवल्या. पण तिथे काहीतरी टरारलेलं दिसण्याऐवजी किंचित काही हालचाल आणि थोडासा मांसल फुगवटा दिसला फक्त. आपण अनाकर्षक असल्याची भावना पुन्हा भडकून आली. ते काही नाही आपणही जरा दणकट व्हायला हवं असं मी ठरवून टाकलं.

जिम निवडायचं, कपडे घ्यायचे हे सगळं करण्यासाठी मी आठवडाभर नेटवर रीसर्च केला. एक दिवस मधुराने ते पाहिलं आणि मला चिडवत म्हणाली,
"या गावचा, त्या गावचा, शिंपी नाही आला, कपडे नाही मला, कसा मी जिमला जाऊ!" मधुराला नेहमी मी आळशीपणा करतो असं वाटतं. पण बरोब्बर गोष्टी नाही झाल्या तर पुढचा सगळाच प्लॅन फसतो यावर तिचा विश्वास बसत नाही. चांगले कपडे नसले तर तिथल्या सुडौल तरुणींवर माझं इंप्रेशन कसं पडणार? ते पडलं नाही तर जिममध्ये जाण्याचा फायदा तरी काय? हे मी तिला सांगून पाहिलं पण मी ही सगळी कारणं आळशीपणापोटी देतो आहे, मला जिममध्ये जाण्याची भीतीच वाटते आहे हेच ध्रुवपद तिने लावून धरलं. तिच्या या कुजकटपणाचा वचपा काढण्यासाठी मी तिला तिच्या मागे लागलेल्या मजनूबद्दल विचारलं. तिने कितीही प्रयत्न केले तरी तिला चिकटलेलं शेपूट काही तिला धडावेगळं करता येत नव्हतं. विषय योग्य दिशेला वळवल्यामुळे अर्थातच माझी चेष्टा थांबली आणि तिचा वैताग वैताग सुरू झाला.

जिममध्ये न जायला आता माझ्याकडे काहीच कारण उरलं नव्हतं. तरीही संध्याकाळी ऑफिसमधून परत यायला मला उशीर व्हायला लागला. असाच एक दिवस उशीरा परत आल्यावर टीव्ही लावला आणि पुन्हा मला कबड्डीची मॅच दिसली. रिंगण घालणारी, घुमणारी, एकमेकांशी लीलया धसमुसळेपणा करणारी घामाने घमघमणारी शरीरं डोळ्यासमोर आली. आरशात पाहिल्यावर दिसून येणारं पोट, आणि स्नायूंच्या जागी जाणवायला लागलेला थुलथुलीत पदार्थही आठवला. मग तिरीमिरीत ठरवलं की नाही, आपण टाळल्यामुळे हा प्रश्न काही नाहीसा होणार नाहीये. तेव्हा उद्या सकाळपासून शेंडी तुटो वा पारंबी, आपण जिममध्ये जायलाच हवं.

सकाळी सात वाजता मी जिममध्ये पोचलो तेव्हा माझा उत्साह शिगेला पोचलेला होता. जिममध्ये यंत्रांचा खणखणाट आणि डंबेलांचा दणदणाट ऐकून उत्साह आणखीनच दुणावला. त्यांनी माझ्याकडून बरेच फॉर्म भरून घेतले, मापं घेतली. माझं ध्येय मसल बिल्डायचं आहे की फॅट रिड्यूसायचं आहे वगैरे विचारून घेतलं. मला दोन्ही करायचं आहे म्हटल्यावर त्यांनी माझ्यासाठी एका कागदावर लांबलचक प्रोग्राम लिहून दिला. त्यावर मशिनची नावं, नंबर आणि त्यावर करण्याच्या रेप्स वगैरे होत्या. 'रेप' शब्दावर कोटी करायचा विचार ट्रेनर बयेच्या चेहऱ्याकडे पाहून गिळला. तिने माझ्या आहाराची माहिती लिहून घेतली आणि ‘कसला वरणभात छाप खातोस‘ असे चेहेऱ्यावर भाव आणून व्हे प्रोटिन, अंडी, लीन मीट वगैरे खायला सांगितलं. हे खायला माझी तशी हरकत नव्हती पण भात कमी खा, नान, तेलकट वगैरे तर नकोच सांगितलं. वर भेंडीच्या भाजीतून काही सूट मिळाली नाही. उगाच विचारत बसण्यापेक्षा वाईट चवीचं असेल तर ते चालेल, आणि चमचमीत छान चवीचं असेल तर ते वर्ज्य असा नियम मी माझ्यापुरता करून टाकला.

पहिल्याच दिवशी मी जरा जास्तच यंत्रांबरोबर पुष्कळ काळ सलगी केल्यामुळे अंग दुखवून बसलो होतो. मला माहीतही नसलेले स्नायू ‘आम्ही दुखतो आहोत’ म्हणून बोंबलत होते.

"नो पेन नो गेन" बाजूने आवाज आला. मी वळून बघितलं तर एक स्नायूंनी लडबडलेला गडी मला एक वीतभर हास्य देऊन राहिला होता. मी कसनुसा हसलो. त्याने हात पुढे केला. हस्तांदोलन केल्यावर माझ्या हस्ताचे इतका वेळ न दुखणारे स्नायू आणि हाडं दुखायला लागलीच, पण आंदोलन करायला आवश्यक जागाही दुखायला लागल्या. आत्तापर्यंत फक्त मला पेन आणि झालंच असेल तर त्याला गेन इतकंच झालं होतं.
"फर्स्ट डे?"
"हो"
"मी बारा वर्षांचा असल्यापासून जिममध्ये जातोय. दररोज. रिलिजियसली." हा सांड सत्तावीस वर्षांंचा तरी असेल. म्हणजे मला याच्यासारखी ब्वॉडी मिळवायची तर पार चाळिशी उलटून जावी लागेल. मी पुन्हा कसनुसं हास्य चेहेऱ्यावर बरबटवत त्याच्या रिलिजियसपणाचं कौतुक केलं. तेव्हापासून आमची मैत्री खूपच घट्ट झाली. इतकी की त्याने माझा पूर्ण ताबा घेतला. माझ्या घरी येऊन फ्रिज रिकामा करून भलतेसलते पदार्थ आणून कोंबले. किचनचं पानिपत केलं - दोन वाईनच्या बाटल्या गळाल्या, सत्तावीस फरसााण-वेफर-चिवड्याचे डबे हरवले आणि चीज-चॉकलेटं किती गेली याची तर गणतीच नाही. या सगळ्याच्या जागी उकडण्यासाठी भाज्या, उकडलेली अंडी आणि उकडलेलं चिकन या सगळ्याचा उकाडा टाकला.

जिममध्ये जाण्यायेण्याची त्याची वेळ त्याने माझ्याबरोबरच जमवून घेतली होती. त्यामुळे झक मारत मला आठवड्यातून दोन वेळा लोअर बॉडी आणि तीन वेळा अप्पर बॉडी एक्सरसाइझ करायला लावत होता. अॅब्स, ट्रायसेप्स, लंजेस, पुशअप्स वगैरे शब्दांनी मेंदूचे स्नायूही पिळत होता. नंतर नंतर जिमचे पाच दिवस व्यायाम कसा करायचा हे शिकवण्यापलिकडे उरलेल्या दोन दिवसांत योग्य पद्धतीने आराम कसा करायचा हेही सांगायला लागला. एकंदरीत मला मुश्टंडेगिरी नको पण मांसल प्रकरण आवर असं झालं.
"हेल्लो समीर..." आपलं वीतभर हास्य पसरवत तो माझ्या घरात भल्या रविवारी सकाळी शिरला. मामलेदारची मिसळ त्याने पाहिली.
"छे छे छे… मिसळीतून तुला पुरेसं प्रोटीन मिळणार नाही. तुझ्यासाठी खास एग-चिकन-गवारीचा शेक घेऊन आलोय." मिसळीमुळे माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी ती कचऱ्याच्या डब्यात जाताना पाहून कोरडं झालंच होतंं. या शेकचं नाव ऐकून उरलंसुरलं तोंडचं पाणी पळालं. नाईलाजाने शेक पिताना त्याचं बोलणं ऐकून घेणंही भाग होतं.
"मग, एकदा खरं सांग. कुठच्या पोरीसाठी करतो आहेस हे?"
"पोरीसाठी?"
"ऑफ कोर्स. लाजू नकोस. पोरी मसल्सवर फिदा असतात. म्हणूनच तू जिम वगैरे करतोयस हे उघड आहे."
"नाही नाही, तसं काही नाही."
"हा, हा. लाजलास तू. लेट मी टेल यू अ सीक्रेट. मीदेखील एका पोरीला इंप्रेस करण्यासाठी पुन्हा जरा जिममध्ये येतो आहे. तशी ती आधीच माझ्यावर फिदा आहे."
"हं"
"आयल टेल यू व्हॉट. मी तुला उद्या माझ्या फ्लेमला तुला भेटवतो. मग तू मला तुझी लाइन दाखव. काय?" त्याने तिथून निघून जावं यासाठी मी काहीही करायला तयार होतो. हा सौदा फारच सोपा वाटला. मधुराला सांंगितल्यावर तिने चिडवून विचारलं, “मग तू कोण दाखवणार त्याला?” सध्या मला गर्लफ्रेंडसदृश काही नाही, डेटही मिळत नाहीयेत हे तिला माहीत होतंं. त्या टोमण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हटलं, “ते पुढचं पुढे बघू.”

दुसऱ्या दिवशी तो मला जेव्हा त्याच्या ऑफिसात घेऊन गेला, तेव्हाच माझ्या छातीत धडकी भरली. पाय लोअर बॉडीवर फार काम केल्यामुळे लटपटत होते की ऑफिस बघितल्याने हे समजेना. तिसऱ्या मजल्यावर गेलो तेव्हा तर माझी हार्टबीट कुठचाही कार्डिओ न करता १८०च्या वर जायला लागली. ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच खरी झाली. त्याने मला मधुराशी ओळख करून दिली. तिचं लक्ष नसताना, हीच ती असंं डोळ्यांनी दाखवलं. त्याचं लक्ष नसताना तिने डोळ्यांनी हाच तो शेपूट असं मला सांगितलं.

तो त्याच्या जागी गेल्यावर मी मधुराला म्हटलं - मला दोन शेपटं असलेेले प्राणी माहीत होते. पण दोन प्राण्यांना एकच शेपूट? आम्हाला दोघांनाही हे शेपूट दुसरीकडे लावण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आम्ही एकमेकांकडे बघितलंं… एकाचवेळी दोघं म्हणालो… “चारुता!!??”

('मी मराठी लाईव्ह'मध्ये पूर्वप्रकाशित)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहे. 'रेप' आवडलं. 'बंडू आणि स्नेहलता' मधल्या स्नेहलतेच्या व्यायामप्रकरणाची आठवण झाली. थोडी कृत्रिमता आहे पण तेव्हधी चालायचीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा!
छान 'जिमलंय' Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आरं कुणी लिहिलयं हे? गेल्यावेळ सारखा ठसका नाही राव ह्यात.
शेपटाची एंट्री लगेच समजली. दम नाही राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठसका नाही हे योग्यच ना? यातला 'मी' म्हणजे समीर; तो ठसकेबाज नाहीच्चे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण जोडा भारी आला होता पायाला. त्या मानाने शेपटी जरा चिकटवलेली झालीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दोन वाईनच्या बाटल्या गळाल्या, सत्तावीस फरसााण-वेफर-चिवड्याचे डबे हरवले आणि चीज-चॉकलेटं किती गेली याची तर गणतीच नाही.

लोल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.