काही आठवणी

या इयत्ता चौथीतल्या काही आठवणी आहेत. क्वचित काही पाचवीतल्याही असतील. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा या तालुक्याच्या गावच्या.

कधीतरी कुठल्यातरी गोष्टी लक्षात राहतात. त्याच का राहतात, इतर का नाही याला काही कारण नसते.

आता हेच पहा ना, दरवाजाच्या वरील काचेच्या फुटलेल्या तावदानातून वारे आत येऊ नये म्हणून एक वर्तमानपत्राच्या कागदाचा तुकडा घडी करून लावलेला होता. येता जाता त्या कागदावरील एका बातमीकडे लक्ष जाई. ‘दिवसअखेर भारत इंग्लंडविरुद्ध ५१/४’ अशी एक बातमी होती, ती आजही लक्षात आहे. आजही टोनी ग्रेगच्या संघाच्या १९७६च्या दौ-यातले रेकॉर्ड तपासले तर यात चूक होणार नाही. त्याच दौ-यात भारताने एक कसोटी १४० धावांनी जिंकल्याचेही लक्षात आहे.

क्रिकेटची कॉमेंटरी ऐकणे म्हणजे फारच अवघड काम असे. इंग्रजीतली कॉमेंटरी अंदाजानेच समजे. आउट असे स्पष्ट शब्द ऐकू आले तरच काय ते समजायचे. पण कॉमेंटेटरने दुस-या कुठल्या कारणासाठी आउट शब्द वापरला तर प्रश्न पडे की इतक्या लवकर पुन्हा आउट झाला? हिंदीतली कॉमेंटरी म्हणजे त्यामानाने आधार असे. सुशील दोशी त्या दौ-यात होते का लक्षात नाही, पण 'लेकिन एक रन लेने से रोक नहीं पायेंगे बैट्समन को' ही त्यांची बोलण्याची लकब चांगली लक्षात आहे.

ही कॉमेंटरी ऐकण्याची हौस मग मी स्वत:च कॉमेंटरी करून पुरी करत असे. रस्त्याने चालता चालता भारत विरूद्ध इंग्लंड ही माझी मॅच रंगे. माहित असलेले खेळाडुच बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग करत. त्यामुळे भारताच्या टीममध्ये ११ खेळाडु न भरल्यामुळे पूर्ण संघ तयार होत नसे, तेथे इंग्लंडला तर अर्धाच संघ खेळवावा लागे. याचा परिणाम असा होई, की भारताचे खूप रन्स होत आणि इंग्लंड फार लवकर आउट होई. बरे ही कॉमेंटरी करताना सारखे चौके-छक्के मारले तरी समाधान होत नसे. मग मीच त्यावर उपाय शोधून काढला. त्यानंतर एकेका शॉटवर २० वगैरे रन निघू लागले. कॉमेंटरी सांगताना आधीच्या डावांमध्ये किती धावा झाल्या होत्या म्हणजे आता लीड कितीचे झाले वगैरे गोष्टींचे भान ठेवावे लागे. त्यामुळे कळतनकळत आकडेमोड करण्यामध्ये मी पारंगत झालो होतो. कधीकधी लीड किती धावांचे झाले हे मोजण्यासाठी वजाबाकी करावी लागायची, ती पूर्ण होईपर्यंत मॅच थांबलेली असे. माझी कॉमेंटरी इतकी महत्त्वाची असे. मग मोठे आकडे हाताळता येऊ लागले तेव्हा तर एका फटक्यावर शेकडो धावा होऊ लागल्या, एकाच डावात संघांच्या पाच आकडी धावा होऊ लागल्या.

एवढ्या धावा होत असताना फलंदाजाचे कौतुक तर व्हायला हवे ना. मग आपण तोंड न उघडता च्च्च असा उच्चार करतो, तसा च्च्च्या च्च्च्या च्च्च्या अशा टाळ्या मी तयर केल्या प्रत्येक १०-२० धावांच्या शॉटनंतर च्च्च्या च्च्च्या च्च्च्या. त्यामुळे अगदी स्टेडियममध्ये बसून कॉमेंटरी करत असल्यासारखे वातावरण तयार होत असे.

नंतरची प्रगती अशी की संडाससाठी बसल्यावर कॉमेंटरीला जोडून बातम्या देणे सुरू झाले. ‘आकाशवाणी, राजेश कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे’. त्यातही रेडियोवरील काही जण स्वत:ला ‘बातम्या देत आहे’ असे म्हणायचे, तर काही जण ‘बातम्या देत आहेत’ असे स्वत:लाच आदरार्थी संबोधायचे. त्यामुळे कधी कधी ‘राजेश कुलकर्णी बातम्या देत आहेत’ असे म्हणावे लागायचे. माझ्या बातम्यांची सुरूवात क्रिकेटच्या बातम्यांनी होई. भारत व अमुकअमुक यांच्यात चालू असलेल्या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने अमुकअमुकवर दहा गडी राखून विजय मिळवला ही माझी सर्वात आवडती बातमी असे. आता दहा गडी राखून जिंकायचे तर आधीच्या डावांमधल्या धावांचा मेळही बसायला हवा असायचा. त्यापेक्षा कधीकधी एका डावाने जिंकवलेले बरे असायचे. पण काहीही झाले तरी भारतच जिंके आणि तोही एक तर दहा गडी राखून किंवा एका डावाने. इतके जाज्वल्य देशप्रेम लहानपणापासूनच होते. चुकूनही कोणाला भारताविरूद्ध पहिल्या डावातही लीड घेता आला नाही.

ज्ञानेश्वर गुंड नावाचे शेतकरी दूध द्यायला सकाळी घरी यायचे. दुधाबरोबर त्यांच्या बागेतली लिंबे, पेरू फुकट मिळायचे. एकदा देवळाली गावच्या त्यांच्या शेतात गेलो होतो, तर तेव्हाच्या माझ्या चेह-याएवढे मोठे पेरू लगडलेले दिसले. एका हातात एकापेक्षा अधिक पेरू बसत नसत. आणि फळही भरपूर. पेरूच्या बागेत फिरता फिरता पिकलेला पेरू दिसला की तो खा असे ते म्हणाले. इतके पेरू आहेत, पण आपण ते सगळे खाऊ शकत नाही या भावनेने तेव्हा खूप वाईट वाटले होते. त्यांचा माझ्यावर फार जीव होता. आमचा पोरगा काही शिकत नाही, तुम्ही तरी शिका असे म्हणायचे. मला अहो-जाहो म्हणायचे.

त्याच सुमारास आणीबाणी उठल्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या. ‘रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहुकडे, गेला मोहन कुणीकडे’ हे गाणे मोहन धारिया यांच्यावर टीका करण्यासाठी वाजवले जायचे, हेही लक्षात आहे. यात टीका काय होती हा प्रश्न आता पडतो. कारण एवढ्या सभ्य टीकेची सवय राहिलेली नाही आता.

कधी एस.टी. स्टॅंडवर गेलो तर मुंबईला जाणारी एस.टी. नेहमी फलाटाला लागलेली असतानाही नेहमीच चालू करून ठेवलेली दिसे. बाकीच्या एसट्यापण कोठे ना कोठे जाणा-याच असत, पण त्या बंद करून ठेवलेल्या असत. त्यामुळे या मुंबईला जाणा-या एसटीची वेगळीच शान वाटे. त्या एसटीचा ड्रायवरही का कोणास ठाऊक इतरांपेक्षा अधिकच रूबाबदार वाटे. पुढे मुंबईचे पहिले दर्शन आठवीच्या सुट्टीत घडले.

एकदा गोट्या खेळायला माझ्यापेक्षा मोठ्या मुलांचा गल्लीतला ग्रुप होता. प्रथमच एका डावात मी कितीतरी गोट्या जिंकल्या, पण त्यांनी मला तेथून जाऊ दिले नाही. आणखी खेळायला भाग पाडले. मग पुन्हा पुन्हा थोडेच जिंकता येते! जिंकलेल्या गोट्याही गमावल्या, एवढेच नव्हे तर माझ्याकडच्या आधीच्या विकत घेतलेल्याही. हाच प्रकार काही कॅसिनोंमध्येही वापरला जातो हे कळले आणि करमाळ्यातली मुले तेव्हाही काळाच्या किती पुढे होती तेही.

आमची शाळा मुलांची जीवन शिक्षण मंदिर क्र. १ होती. तेव्हा खासगी शाळा हा प्रकार नव्हताच बहुतेक. राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद गेले तेव्हा भोंगा वाजल्याचे लक्षात आहे.

ओंभासे नावाचे गुरूजी होते. त्यांचाच मुलगा वर्गात होता. आणखी एक जण महेंद्र थोरात नावाचा मुलगा होता. त्याचे वडील इन्स्पेक्टर होते. बंडु गवळी नावाचा अर्थातच गवळ्याचा मुलगा होता. या बंडुने एकदा माझी फारच पंचाईत केली. शाळेत इन्पेक्शन होणार होते. गुरूजींनी माझे अक्षर चांगले म्हणून माझ्याकडून तीन वह्या लिहून घेतल्या होत्या. एक वही सुविचारांची होती. ‘नाही निर्मळ जीवन, काय करील साबण’ हा सुविचारही लक्षात आहे. बोरूने लिहित असताना या बंडुने धक्का दिला तेव्हा मेजावर ठेवलेल्या बाटलीतली शाई त्या वहीवर सांडली. म्हणून गुरूजींनी ती वही गठ्ठ्यात मध्ये कोठे तरी ठेवली. चांगली वही सर्वात वर. पण इन्स्पेक्टर इतके अनुभवी की त्यांनी बरोबर गठ्ठ्याच्या मध्येच हात घातला. आणि माझ्या दुर्दैवाने ती शाई सांडलेली वहीच त्यांच्या हाती लागली. वहीवरील नाव पाहून त्यांनी मला बोलावले. अक्षर छान आहे म्हणून कौतुक केले. त्यामुळे खुष होऊन मग त्यांनी विचारले नसतानाही मी बंडुने धक्का दिल्यामुळे वहीवर शाई सांडल्याचे सांगितले व बंडुवरचा राग व्यक्त केला. इन्स्पेक्शन संपल्यावर बंडुने त्याचा वचपा माझ्या पाठीत जोरात गुद्दा मारून काढलाच.

चौथीमध्येच स्कॉलरशिपची परीक्षा होती. परीक्षेच्या दरम्यानच्या सुट्टीमध्ये परीक्षेला बसलेल्या जवळजवळ सगळयाच मुलांच्या आया क्रिमची बिस्किटे घेऊन आल्या होत्या. त्यामुळे ही स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे काहीतरी भारी प्रकरण आहे असे वाटले होते.

तेव्हा चौथीला बोर्डाची परीक्षा होती. माझा नंबर माझ्याच शाळेत होता. तरी आजुबाजुला वेगवेगळ्या गावांहून आलेली अनोळखी मुले होती. वर्गात बसायला बाक वगैरे लागतात अशी अपेक्षाच नव्हती. फरशीवरच बसायचे. तेच पुढे पाचवीत गेल्यावर बसण्यासाठी बाक पाहिल्यावर अचानक मोठे झाल्यासारखे वाटल्याचे आठवते. चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेतली गणिताची परीक्षा आठवते. धोतर नेसलेले तिरळे गुरूजी सुपरवायझर म्हणून वर्गावर होते. परीक्षा सुरू झाल्यावर अर्ध्या एक तासाने त्यांना काय झाले कोणास ठाऊक, हातात खडु घेऊन उठले, फळ्याजवळ गेले आणि एका पाठोपाठ गणिते फळ्यावर सोडवायला सुरूवात केली. मी माझ्याच पेपरमध्ये गुंग असल्यामुळे ते काय करताहेत ते माझ्या लक्षात आले नाही. थोड्या वेळाने कळल्यावर मी माझी उत्तरे त्यांच्या उत्तराबरोबर तपासून पहायला सुरूवात केली. काही उत्तरे मेळ खात होती, तर काही नव्हती. मग जी उत्तरे मेळ खात नव्हती ती तपासून पाहणे माझे मलाच क्रमप्राप्त झाले. तरी माझी उत्तरे काही बदलेनात आणि गुरूजींची उत्तरे तर वेगळी! आता काय करावे! अखेर धीर एकवटून म्हटले, गुरूजी अमुकअमुक उत्तर चुकले आहे. गुरूजींनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. मग थोड्या वेळाने आणखी एक उत्तर चुकल्याचे सांगितले. मग मात्र गुरूजींनी काहीही न बोलता मला माझ्या जागेवरून उठवले आणि वर्गाच्या बाहेर पॅसेजमध्ये बसवले. तेव्हा का कोणास ठाऊक, मी सांगतो त्यात चूक काही नाही, तरी शिक्षा आपल्यालाच होत आहे हे जाणवून अपमान वगैरे झाल्यासारखे वाटले खरे आणि ध्रुवाच्या गोष्टीचीच आठवण झाली. मला वर्गाच्या बाहेर बसवल्यानंतर मात्र गुरुजींसाठी परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा संपल्यावर आईला झाला प्रकार सांगितला, तिने ओंभासे गुरूजींना त्याबद्दल सांगितले, तेव्हा गुरूजी सहज म्हणाले इथली बरीच मुले गावाकडून आलेली असतात. गणिताचा पेपर त्यातल्या त्यात अवघड. म्हणून गुरूजी ३५ मार्कांची बरोबर उत्तरे फळ्यावर लिहून देतात, ज्यायोगे सगळी मुले कमीत कमी पास तरी व्हावीत. सगळीच बरोबर आलेली दिसली तर संशय येईल म्हणून काही उत्तरे मुद्दाम चुकीची लिहून द्यायची. त्याउप्पर ज्याला अधिक जमेल, त्याला अधिक गुण मिळतील अशी सरळ साधी स्ट्रॅटेजी. तेव्हाच्या गुरूजींना मुलांची एवढी काळजी असे हे आठवून आजही गहिवरून येते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

‘आकाशवाणी, राजेश कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे' )))
मेलो, मेलो , मेलो.
Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा! मजेशीर आठवणी आहेत..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आठवणी आवडल्या. पण एक शंका, १९७६-७८पर्यंत तुमच्या शाळेत विद्यार्थी बोरूने आणि शाईने लिहीत असत का? मला वाटत होते की बोरू १९५०च्या सुमारासच हद्दपार झाला असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुद्धलेखन की सुवाच्य हस्ताक्षर या नावाच्या पुस्तिका मिळत. त्यात काही सुविचार लिहिलेले असत. उदा. नाही नि्र्मळ जीवन, काय करील साबण?
त्याखाली चार-पाच ओळींमध्ये तोच सुविचार लिहिलेला असायचा, त्यावर बोरूने गिरवायचे. हाताला लिहिण्याचे चांगले वळण लागणे हा हेतू असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त आठवणी. असं काही ना काही अडकून राहातं खरं आपल्या स्मरणात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

आवडलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खरं तर इतर सदस्यांनीही अश्या आठवणी लिहाव्या. त्यामुळे 'ऐसी'मध्ये थोडा ओलावा आणि वैयक्तिक स्पर्श जाणवेल. ऐसीच्या सभासदांची सध्याची राहाण्याची ठिकाणे आणि त्यांच्या मूळ गावांमध्येही बर्‍यापैकी विविधता दिसते. त्यामुळे आठवणींतही वेगळेपणा येऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म्म - अनेक रम्य आठवणी आहेत आणि गंमत म्हणजे त्या सगळ्या निसर्गाशी जोडलेल्या आहेत.
(१) लहानपणी आमच्या सोसायटॆमध्ये रोपांचे वाटप केले गेले. हवे ते रोप घेउन जा, लावा आणि वाढवा. ज्यायोगे सोसायटी हरित होईल, सुशोभित होईल. बाबांनी २ गुलमोहराची रोपटी लावली. त्यांचे नाव जय-विजय ठेवले. आणि मी मोठी होता गेले तशी ती झाडेही जोमाने वाढू लागली. खूप प्रेम होतं माझं त्या झाडांवरती. एकदा संध्याकाळी संधी प्रकाशात त्या झाडांना आणि आकाशाला अक्षरक्ष: (अतिशयोक्ती नाही) पण पेटलेले पाहिले आहे.
.
(२) एकदा मुसळधार पावसात एक काळ्या रंगाचे व पंखांवर २ निळे ठिपके असलेले फुलपाखरू आडोशाला म्हणून गॅलरी त येउन बसलेले पाहिले आहे. बाबांनी दाखविले होते Smile
.
(३) मी मध्ये बाबांचा वाढदिवस असतो म्हणून "मे फ्लॉवर" भेट दिले होते. ते रोप बसने आणताना पुरेवाट झालेली होती. इतका मोठ्ठा फुलाचा डोलारा त्या इवल्याश्या कुंडीत सांभाळत आणलेलं. पण बसमध्ये कौतुकाच्या नजरा झेलायला मजा आली होती.

http://1.bp.blogspot.com/-U1YRgvsUdt4/UbSB_NgzhAI/AAAAAAAAEWk/bmI4tTqs2dY/s640/footballlily-collage.jpg
चित्र जालावरुन साभार.
.
(४) पावसाळा, डोंगरावर मुक्तपणे चरणाऱ्या मेंढ्या, हिरवळ, हिरवळी वरचे मोती सदृश पाण्याचे थेंब , पहाटे अंगभर फुललेली कोरांटी , मोगरा, प्राजक्ताचा सडा (क्रांतीच्या भाषेत - माणिकमोत्यांचा सडा) ही काही दृश्ये विसरता येत नाहीत. किंबहुना हेच पूर्वसुकृताचे देणे आहे असे म्हणेन., ऊंबराच्या झाडाखाली पडलेली ऊंबरे खाणे, जांभळे, चिंचा,कैर्‍या पाडणे.
.
(५) आई-बाबांच्या कडेवर बसून गर्दी पहाणे ही आठवण देखील आहे. पुण्याचे गणपती आई-बांबां बरोबर फिरत पहाणे हा आनंदसोहळा असायचा.
.
(६) पुढे दर दिवाळीत वानवडी/कोंढवा side पासून ते कॅम्पमधल्या लायब्ररीत पर्यंत सायकलवर जाउन पुस्तके आणायची हा अतिशय आवडीचा कार्यक्रम असायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0