शोक

काय???" तो ओरडलाच मोठ्यांदा. दोन मिनिटं काहीच कळलं नाही त्याला. कसं,कुठे,कधी हे विचारायचंदेखील भान राहिलं नाही. त्याने फोन कट केला.
ती गेली? एवढयात? किती असेल वय? 24 पण नसेल अजुन. त्याला हळूहळू भूतकाळ आठवायला लागला. दहा मिनिटं तो तसाच सुन्न बसून राहिला.

तसं आता दोघांमध्ये काहीही नव्हतं. जवळजवळ एक वर्ष झालच होतं ब्रेकअप होऊन. सगळेच संबंध संपले होते. तिच्या मित्र मैत्रिणींशी देखील संपर्क तोड़लेला त्याने. दोन-तीन वेळा फोन केला होता तिला ' कशी आहेस ' विचारायला पण तिने उचलला नाही. बहुधा विसरली असावी सर्व काही. काय समजायचं ते समजून त्याने तो नाद सोडला.
काही महिन्यांत लग्नासाठी मुली शोधायला सुरुवात करायचा त्याचा विचार होता. आता तिला पूर्ण विसरावं लागणार होतं. जिम , गिटारचे क्लासेस , ट्रेकिंग ग्रुप वगैरे जॉइन केलं.आठवण पण अशी येत नव्हती आता. सुटल्यासारखं वाटत होतं.पण आता अचानक हे असं अनपेक्षित सगळं. नाही म्हटलं तरी 2 वर्षे एकत्र होतो आपण. तिच्यावर राग होताच खुप पण असं काही व्हावं हे स्वप्नातपण नाही आलं.

तो थोडा भानावर आला. तिच्या एका मैत्रिणीला फोन करून त्याने सगळी चौकशी केली. अपघात झाला होता. आदल्या दिवशी सकाळीच झालेला ऑफिसला जाताना.फार काही न बोलता तिने फोन ठेऊन दिला.
आई बाबांना त्याने फोन करून सांगितलं. काही मित्रांना सांगितलं. '' अरेरे खुप वाईट झालं. असं नको होतं व्हायला, तू जास्त त्रास नको करून घेऊ मनाला". याखेरीज जास्त अजुन कोणी बोललं नाही. बस ? इतकच? रागच आला क्षणभर. "त्रास करून कसा नको घेऊ? यांना काहीच नाही का या गोष्टीचं?" पण पुन्हा त्यांची तरी काय चूक? असा विचार त्याने केला.

"भेटायला जावं का? पण काय म्हणून जाणार? घरी सांगितलच नव्हतं तिने आपल्याबद्दल. योग्य वेळ आल्यावर सांगते म्हणायची. का नसेल सांगितलं तिने? तुला भीती वाटत असेल तर मी घरी येऊन भेटायला तयार आहे. कितीदा बोललो होतो तिला. पण नाहीच ऐकायची ती. कदाचित नसेलच मनात. पण आता भेटायला कोणत्या नात्यानं जाणार? वर्गमित्र म्हणून जावं का? की माणुसकीच्या नात्यानं? "
होय-नाही पुन्हा होय. पुन्हा नाही.नकोच जायला. त्यानं मनाशी ठरवलं.
"मग आता काय करायच? सरळ ऑफिसला निघुन जाऊ का? की बसून राहु इथे असाच शोक करत. रडत. पण रडायला तरी कुठं येतय.
मगापासून तगमग चालली आहे. खुप काही साचलय मनात. ते बाहेर काढायला हवं"
त्याने हुंदके देण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण रडु येईचना.
'आपल्याला जितकं दुःख व्हायला हवं तितकं झाल नाहीये का?' असं त्याला वाटून गेलं.

"जाउदे!! असं दिवसभर बसून राहण्यापेक्षा ऑफिसला जाऊन यावं.कामं पण बरीच आहेत." त्यानं मनाशी ठरवलं आणि घडयाळाकड़े पहिलं.

इथेच दहा वाजत आलेले. म्हणजे उशीर झालाय.

"अजुन अर्धा तास लागेल यायला. ट्रैफिकमध्ये अडकलोय. सरांना निरोप दे." त्यानं ऑफिसातल्या मित्राला फोन करून कळवलं.
"खरं कारण नाही सांगितलं आपण. नकळतपणे सुद्धा." पुन्हा मनात विचार आला. घाईघाईनं तो ऑफिसला निघण्याची तयारी करू लागला.

………………… * ……………………

'का केलं असेल तिनं असं माझ्यासोबत? सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक का तोडलं ? म्हणजे मीच तोडलं म्हणा तिच्या वागण्याला कंटाळून. पण पुन्हा तिने एका शब्दाने नाही विचारलं. तू असं का केलस असा जाब पण नाही विचारला तिने. तिला तेच हवं होतं का म्हणजे? का मी सोडावं म्हणून मुद्दाम अशी वागली?वाईटपणा येऊ नये म्हणून. पण का? आई-बाबांनी चांगलं स्थळ आणलं असेल बहुतेक. नाहीतरी परदेशातली स्थळ् यायचीच तिला.'

यापूर्वी हजारदा येऊन गेलेल्या या सगळ्या गोष्टी पुन्हा त्याने मनाशी उगाळल्या.

"काय रे? बरं नाहीये का वाटत? असा का बसलायस ?कसला विचार चालू आहे?" त्याला डोक्याला हात धरून ऑफिसमधे बसलेला पाहुन 2-3 जणांनी उगाचच चौकशी केली.

काही न बोलता तो फक्त कसंनुसं हसला.हे सगळं कुणाला सांगावस त्याला वाटलं नाही.
त्याचं काम त्याने तीन तासांत संपवलं होतं. इतर छोटी मोठी अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही संपवून त्याने इतरत्र नजर फिरवली. आणि कोणतं काम बाकी आहे का बघितलं.
'त्यांचीही कामे घेऊन पूर्ण करून टाकावीत का आज?' रमत गमत काम करणाऱ्या इतर लोकांकडे पाहिल्यानंतर त्याला वाटून गेलं. उरलेला वेळ त्याने कसाबसा काढला आणि पाचच्या ठोक्याला ऑफिसमधुन निघाला.

' तिला तिच्या चुकीबद्दल शिक्षा व्हावी असं वाटायचं आपल्याला. पण मृत्यु ही ती शिक्षा कधीच नव्हती. तिला स्वतःची चूक कळावी आणि कधीतरी आपल्यासमोर तिने ती चूक कबूल करावी. एवढीच् काय ती शिक्षा आणि इतकीच आपली अपेक्षा. तिच्या आयुष्यात याच्यापेक्षा वाईट काही व्हावं असं कधीच नाही वाटलं. पण मृत्यु? कधी कल्पनापण नव्हती केली.'

विचारांच्या तंद्रीत तो घरी आला.

………………….*………………….

त्यांचे काही जुने फोटो काढून ते चाळत बसला. पण त्याला तो एकटेपणा सहन होईना.त्यानं अजुन एकदा तिच्या मैत्रिणीला फोन लावला.पण यावेळी तिने उचलला नाही.
'काय करावं?मित्राकडे जाव का? एकटेपणा खायला येतोय पण कुणाची सोबतपण नकोय आज.मित्र नकोच. पिक्चर टाकावा एखादा?'
तीन तास थिएटरमधे स्थितप्रज्ञासारखा बसून त्याने पिक्चर पाहिला. लक्ष नव्हतच लागत. तेच विचार पुन्हा पुन्हा.

' तिला एकदा तरी भेटायला हवं होतं आपण. पण ती भेटली असती का? फोन तर नाहीच उचलला तिने आपला. पण आपण तरी असा कितीवेळा केला? कदाचित भेटलीही असती. पण भेटून काय होणार होतं? कोण जाणे!! '

पिक्चर संपला.

जिथे अपघात झालेला त्या पोलिस स्टेशनमधे जाऊन त्याने थोडिफार चौकशी केली. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघुन आला. अपघाताचा कोणताच मागमुस आता तिथे नव्हता. रात्री 11ला देखील खुप ट्रेफिक होतं तिथं. तसाच परत आला.

दिवसभर जास्ती काही खाल्लच नव्हतं याची जाणीव अचानक त्याला झाली. पोटात डोंब उसळलेला.घराशेजारच्या गाड्यावर जाऊन त्यानं पोटभर खाऊन घेतलं. घटाघटा पाणी प्याला.

' कितीतरी आठवणी. जवळजवळ 4 वर्षांपासूनच्या. ती जिवंत असेपर्यंत सोबत करायच्या. ती परत येईल असा विश्वास द्यायच्या. पोकळ असेल कदाचित पण तरीही. पण आता विसरायला हव्यात. नाहीतर छळत राहतील आयुष्यभर. छे!!! विसरायला हवं सर्व आता. पण काय हे!!! एक टिपुसही नाही आला आपल्या डोळ्यातून. रडून मोकळं होता आलं तर. '

त्यानं पुन्हा एकदा हुंदके देण्याचा प्रयत्न केला. पण येतच नव्हतं रडायला. भळाभळा रडून मनावरच ओझं उतरवणाऱ्या लोकांचा
त्याला हेवा वाटला.
मग त्याच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत आणि विसरण्याचा प्रयत्न करत तो तसाच तळमळत बिछान्यात पडुन राहिला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मनात चाललेला गोंधळ अचूक आणि प्रामाणिकपणे मांडलाय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

लेखन खूप आवडलं. शोकाचं एक शब्दचित्र, काहीशा अपुऱ्या रेषांमधून आखलेलं.

काहीवेळा अपुरेपण ही लिखाणाची शक्ती ठरते, तर काही वेळा मर्यादा. इथे मर्यादा वाटते. या लेखात अनेक ठिकाणी कुठचेच संदर्भ न देता केवळ विचारांचं चित्रण 'टॉप लेव्हल'ला केलेलं आहे. म्हणजे दहा हजार फुटांवरून एखाद्या खुनाचं चित्रण व्हावं, अस्फूटशी किंकाळी ऐकू यावी इतकंच. त्यातून नक्की कोणाचा खून झाला असेल आणि त्यावेळी काय वेदना झाल्या असतील याची कल्पना करणंच पाहाणाऱ्याच्या हाती राहाते. पण वाचकाला प्रत्यक्ष अनुभव द्यायचा असेल तर यापेक्षा अधिक जवळ जायला हवं असं वाटतं. कुठचीतरी तिची एखादी वस्तू असेल, तिच्या आठवणी चिकटवून जपलेली? आणि त्या आठवणीच्या क्षणाला काही ना काही स्पर्शाचे, वासाचे, दृश्याचे, भावनांचे पैलू असतील... हे सर्व पैलू लपवून फक्त 'होता एक हिरा' असं सांगितलेलं आहे कथेत.

ही कथा काही ना काही विशिष्ट रेषांनी फुलवून गहिरी करावी ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद राजेशजी. मुळात लिहितानाच काहीतरी अपुरं पडतंय असं वाचणाऱ्याला वाटून जावं हाच हेतू आहे. आपल्या प्रतिक्रियेवरून तो हेतू साध्य झालाय असे वाटते. आता जरी यात बदल केला तरी कदाचित ओढून ताणून केल्याप्रमाणे वाटू शकतो. पण आपला सल्ला मी पुढील वेळी नक्की ध्यानात ठेवेन. पुन:श्च धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेखन!
ललित लेखनाची वेगळी कथात्म जातकुळी.. लिहित रहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!