फुसके बार – १६ जानेवारी २०१६

फुसके बार – १६ जानेवारी २०१६

१) त्याचे घरातील बारीकसारीक गोष्टींकडेही इतके लक्ष असे, की तो एक्स्पायरी डेट जवळ येणा-या औषधांवरही लक्ष ठेवे आणि ती वाया घालवण्याऐवजी शक्य असेल तर स्वत: घेऊन टाके.

२) लष्करातील रोखठोकपणा आपल्याला माहित असतो. ज्यांचे नवरे आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाची सोय लष्कराच्या क्वार्टर्समध्ये केली जाते. साधारणपणे फार तर फार दोन किंवा तीन मजली एकाच छापाची घरे असतात ही.

अशा वासाहतींचे नावदेखील छानपैकी ‘सेपरेटेड फॅमिली क्वार्टर्स’ असे स्पष्टपणे लिहिलेले असते. आहे की नाही गंमत?

३) देवाला दाखवलेला नैवेद्य त्याच्यापर्यंत पोहोचत असेल तर आज संक्रांतीच्या निमित्ताने फेसबुकवर दिसलेल्या तीळगुळाच्या वड्या-लाडवांनी वाचकांनाही हमखास डायबेटीस जडायला हवा. आता रथसप्तमीपर्यंत तर हे नक्कीच होईल.

४) उद्या श्रीपाल सबनिसांच्या संमेलनाध्यक्ष होण्यासाठीच्या हिकमतींचा परमबिंदू. म्हणजे त्यांचे अध्यक्षीय भाषण. त्याच्या एक दिवस आधी का होईना, पण तीळगुळाचा दिवस आला हा केवढा विलक्षण योगायोग. त्याची मिठास उद्याच्या भाषणापर्यंत टिकावी बहुतेक, ज्यायोगे त्यातून काही वाद उद्भवू नयेत.

५) राजू शेट्टी ब-याच दिवसांनी जागे झाले

शेतमालाशी संबंधित वस्तुंच्या वायदेबाजारात होणा-या सट्टेबाजारामुळे शेतकरी व ग्राहक या दोघांचेही नुकसान होत असल्याची तक्रार राजू शेट्टी यांनी सेबीकडे केली आहे.

शेतमाल वायदेबाजारावर असावा का याबद्दल फारच थोडी चर्चा झाली. उलट तत्कालीन सरकारने समिती नेमल्याचे नाटक करून शेतमालाच्या वायदेबाजारामुळे भावांवर काही परिणाम होत नाही असा निष्कर्ष आधीच ठरवून काढल्यासारखे केले होते.

मुळात जो प्रश्न लोकांच्या, विशेषत: शेतक-यांच्या जीवनमरणाशी संबंधित आहे त्याच्याशी का खेळावे, हा प्रश्नच राज्यकर्त्यांना पडला नाही. आता पंचाहत्तरीचे सत्कार घेणा-या जाणत्या राजालाही हे चुकीचे असल्याचे कधी वाटले नाही, त्यामुळे धान्याचा वायदेबाजार बंद होण्याचा प्रश्नच नव्हता. कांद्याचे किंवा डाळींचे दर काही काळासाठी वाढलेले राहिले, तर किती हजार कोटींचा लाभ राजकारण्यांना व्यापा-यांमार्फत होत असतो याच्या बातम्या अलीकडे येत असतात. या वायदेबाजारातून आजवर कोणी किती कमावले असतील व कोणाचे शोषण झाले असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.

शेतक-यांच्या आत्महत्या किंवा हलाखीच्या परिस्थितीला एक नेमके असे कारण नाही. तेव्हा जेवढे शक्य तेवढे उपाय योजायलाच हवेत. तेव्हा राजू शेट्टींनी आता हा विषय हाती घेतलाच आहे तर तो तडीला न्यावा.

६) वर्तमानपत्राच्या कागदात दिले जाणारे खाद्यपदार्थ

आरोग्यावर परिणाम करणा-या सामान्यपणे दिसणा-या कोणत्या गोष्टी आहेत याचा विचार करता वर्तमानपत्राच्या कागद जो भेळ, वडापाव, इ. खाद्यपदार्थ देण्यासाठी वापर केला जातो तो डोळ्यांसमोर येतो. लगेच हे पदार्थ म्हणजे गरीबाचे खाद्य आहे, कागद वापरणे बंद करून तेही महाग करून टाकणार का वगैरे सूर नको.

कागदाच्या शाईचा बेस सोयबीन तेलाचा असतो असे कळते. मात्र त्यात वापरले जाणारे इतर अनेक घटक मात्र आरोग्यासाठी घातक असतात. रंगीत बातम्या-जाहिरातींसाठी वापरली जाणारी क्रोमियम-कॅडमियमसारखी रसायने तर आणखी घातक असतात.

मुळातच वर्तमानपत्रातीसाठी वापरल्या जाणा-या काळ्या व रंगीत शाईचा आरोग्यावर व पर्यावरणावर होणारा परिणाम यावर कोणी संशोधन केलेले अहे काय?

वर म्हटल्याप्रमाणे वर्तमानपत्राच्या शाईचा परिणाम हा रोजच्या वापरातील एक भाग आहे. पर्यावरणावर, आरोग्यावर परिणाम करणारी रोजच्या वापरातील अशी आणखी कोणती उदाहरणे सुचतात का?

७) विजय तासे यांनी नुकतीच नॉनस्टिक तवा, कढई वगैरे वापरण्याच्या अट्टाहासामुळे आपल्या आरोग्यावर होणा-या भीषण परिणामांबद्दलची पोस्ट टाकली होती. मीदेखील काही महिन्यांपूर्वी या दुष्परिणामांचा उल्लेख केला होता.
https://www.facebook.com/vijay.tase/posts/10154501438851038?pnref=story
त्या पोस्टला मिळालेला तुरळक प्रतिसाद निराश करणारा आहे. किती दिवस आपण स्वत: सगळी माहिती रेडीमेड होऊन आपल्यापर्यंत येण्याची वाट पाहणार आहोत? स्वत: थोडे प्रयत्न करून माहितीच्या मुळापर्यंत जायला हवे. या बातमीत दाखवलेले आरोग्याबद्दलचे धोके खोटे नाहीत. ते पाहता आपण स्वयंपाकघरातील नॉनस्टिक भांडी, तवे, कढया हद्दपार करणार आहोत काय? हेच आपल्या मित्र-मैत्रिणींना करायला सांगणार आहोत काय? कपडे-दागिने-हॉटेलिंग-सिनेमा-टीव्हीवरच्या मालिका अशा गोष्टींबाबत मित्रांशी नातेवाईकांशी बोलायला आपल्याला फार आवडते. मात्र आरोग्याशी संबंधित अशा महत्त्वाच्या विषयांना आपल्या संभाषणात आपण तेवढेच महत्त्व देतो काय? आता तरी जागे होऊयात.

टेफ्लॉनचा थर असलेली नॉनस्टिकची भांडी हटाव अशी मोहिम काढण्याची वेळ केव्हाच उलटून गेली आहे. आपल्याकडे त्याबाबतची जागरूकता जवळजवळ शून्य आहे.

आणखी एक उदाहरण म्हणजे रविन्द्र पोखरकरांनी औषधे विकत घेण्यावरून डॉक्टर-औषधविक्रेते यांच्यातल्या साखळीचा त्यांना आलेल्या लुटालुटीच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे. पण केवळ त्यांच्या पोस्टवर त्यांचे अभिनंदन करून आपण मात्र हे असेच चालणार, आपण एकटे काय करू शकणार असे म्हणून उदासिन राहणार आहोत का?

field_vote: 
0
No votes yet