माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे?

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे हे वाक्य एकूण पकाऊच. जन्मापासून ज्या गोष्टीला भवतालातली एक म्हणून गृहित धरली, तिच्यावर प्रेम आहे असं एकदम उठून म्हणणं भंपकच. तर प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस.

याच एका भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात. भांडण करताना संतापानं-भीतीनं गुडघे लटपटले, तरी या भाषेतले शब्द दगा देत नाहीत. आपलाच इमानेइतबारे काम करणारा अवयव असावा, तसे आपसूक शब्द सुचत जातात. याच एका भाषेतून मनःपूत प्रेम करता येतं. कविता लिहिता येते. शब्द मनाजोगते तोडलेमोडले नि मला हवे तसे घडवून मांडले तरी या भाषेत मला अपराधी, संकोचल्यासारखं, गंडल्यासारखं वाटत नाही. मस्त मोकळ्याढाकळ्या घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त अस्ताव्यस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. माझ्याआतला गोंधळ एका नीटस आकारात मांडून देते. उत्तर देतेच, नवे प्रश्नही काढून देते.

अक्षरं आणि पर्यायानं शब्द म्हणजे साकार नि निराकार वस्तूंची चिन्हं. इतर कुठल्या भाषेतली ही चिन्हं माझ्याकरता फक्त चिन्हंच उरतात. वस्तू नि संकल्पना सजीव होऊन त्यांच्यामागे उंबर्‍यात येऊन थांबत नाहीत. मग कोशांच्या मदतीनं चिन्हांचे अर्थ कळले, तरीही झोपताना ब्रा काढायला विसरून जावं, सारखं अस्वस्थपणे कूस वळवत राहावं नि काही केल्या शांतपणे झोप लागूच नये, तसं वाटत राहतं. तीच माझ्या भाषेतली चिन्हं वाचताना मात्र, चिन्हं उरतच नाहीत. बघता बघता चित्रं होतात. नाद होतात. वास होतात. रंग होतात. माणूस, झाड, जंगल, गाव, शहर... सत्य, न्याय, समता, कविता... होतात. एकातून अनंत होतात. जिवंत होतात.

ही एकच भाषा आहे मला अशी. माझे हातपायडोळे असल्यासारखी माझा भाग असलेली. मीच असलेली. ती संपली तर माझ्यातलं काहीतरी संपेल. मी अर्धीमुर्धी अपंग उरेन. माझी म्हणून जी काही ताकद आहे, त्यातली बरीच ताकद माझ्या या भाषेच्या वापरातून, त्यातल्या सराईतपणातून, सफाईदारपणातून, कौशल्यातून आणि त्या कौशल्यातून येणार्‍या वरचश्म्यातून येते. शब्द हेच शस्त्र ही म्हण कितीही गुळगुळीत झालेली असली, तरी ती अजुनी चपखल आहेच. आहेच ती माझं शस्त्र आणि ढाल. तीच संपली, तर त्या उदारपणाचा दीडशहाणपणा करून मग स्वत:चाच पोपट करून घेतलेल्या कर्णासारखीच माझी अवस्था व्हायची. फक्त त्याने स्वत:हून दीडशहाणपणा केला. इथे माझ्या हातात काही करणं वा न करणं नाही, निदान पूर्णपणे नाही. असली अवस्था येण्याची मला भीती वाटते, नि म्हणून माझी भाषा नि पर्यायानं माझ्या भाषेत बोलणारे लोक उरावेत असं मला वाटतं. एरवी प्रेमबिम भोंगळ. प्रेम आहे का माझं माझ्या भाषेवर? तर नाहीच.

(आता हे आता जरा ऑफ दी ट्रॅक आणि मूलभूत प्रकारचं होणार आहे. पण होऊन जाऊ द्या. तर माझं नाहीच आहे प्रेम माझ्या भाषेवर. प्रेम या शब्दाच्या माझ्या व्याख्येत मला निवडीचं स्वातंत्र्य अभिप्रेत आहे आणि खेरीज ओढ, आपुलकी, लळा, जिव्हाळा, लिप्ताळा... इत्यादी गोष्टी आहेत. त्यामुळे माझं माझ्या आईवडिलांवरसुद्धा किंवा फॉर दॅट मॅटर देशावरसुद्धा प्रेम नाहीच आहे. माया, लळा, जिव्हाळा, लिप्ताळा, ओढ, आपलेपणा, सवय, कृतज्ञता? अर्थात. मी जन्माला आले ती या आईबापांपाशी. ते मला उपलब्धच होते कायम. त्या सहवासानं माया वाटते. आपलेपणा वाटतो. कम्फर्ट झोन (मराठी शब्द काये?!) तयार होतो. हीच एखाद्या चणेवाल्याच्या किंवा वेश्येच्या पोटी आले असते, तर त्यांच्याबद्दल वाटली असती माया. तसंच देशाचं. पाकिस्तानात जन्माला आले असते तर पाकिस्तानाबद्दल वाटलं असतं असं. पण मुद्दा असा आहे की, हे जे काही वाटणं आहे, त्याला मी प्रेम म्हणत नाही.

दुसरं असं की या भावना माणसांबद्दल वाटणं मला जायज वाटतं. पण हेच सगळं जीव नसलेल्या गोष्टींबद्दल वा अमूर्त संकल्पनांबद्दल वाटणं अंमळ विनोदीच वाटतं. दगडावर पाणी ओतल्यासारखं. म्हणजे ओतावं, ज्यांना त्यात रस वाटतो त्यांनी. मला नाही वाटत रस. माझ्यावर तशी जबरदस्ती नको. भाषा काय किंवा देश काय किंवा देव काय - ज्या गोष्टींना उलटून माझ्याबद्दल काही वाटायला भावनाच नाहीत, त्यांच्यावर ही कृतज्ञता आणि बाकी सगळं ओतत बसायला मला काय तुकारामासारखा अध्यात्माचा किडा चावला आहे थोडाच? तर - असो. मुद्दा असा की, दिव्याबद्दल कृतज्ञता, पंख्याबद्दल कृतज्ञता, चाकाबद्दल नि एसीबद्दल नि नेटबद्दल... अशी जनरल कृतज्ञता हल्ली माझ्यातून गेली आहे. हे जरा कोरडं का काय म्हणतात तसलं आहे. पण तसंच आहे. त्यामुळे भाषेबद्दलही मला प्रेम तर सोडाच, कृतज्ञताही नाही वाटत. तरी ही विचारांची भेंडोळी नि मराठीदिनाचं निमित्त का? तर त्याचंच उत्तर शोधायचा हा प्रयत्न. असो. बॅक टू मायभाषावश्यकता.)

तशा बाकीही भाषा ठाऊक आहेत मला. पण त्यांच्या-माझ्यात द्वैत आहे. आठवणींना सुरुवात होते त्याच्याही आधीपासून त्या माझा भाग असत्या, तर त्या माझ्या असत्याही. जशी माझी भाषा आहे तशाच. अशा अधिकाधिक भाषा असाव्यात माणसांना. श्रीमंतीच की ती. पण माझ्यापाशी नाहीत. ठीक.

माझा भाचा जी भाषा शिकतो, ती त्याची भाषा असेल; की शिकण्याआधी शिकतो, ती त्याची भाषा असेल? तो कुठली भाषा शिकतो? हा प्रश्न बहुधा चुकीचा आहे. तो कुठली भाषा बोलतो? परवा त्याच्या हातातला पोळीचा घास चुकून ताटात पडला, तर तो उत्स्फूर्तपणे 'च्यायला' म्हणाला. तो सशाला ससा न म्हणता 'ससुल्ल्या' म्हणतो, घरातल्या कुत्र्यावर भडकून त्याला 'ए कुतरड्या' असं म्हणतो. लाडात आला, तर 'मेघना-आत्या' असं लांबलचक न संबोधता 'आत्तू' असं म्हणतो. पण त्याला राजकारणही नीटच कळतं. आईबापावर छाप पाडायची असेल, त्यांना नॉनप्लस करायचं असेल, त्यांना कौतुकावायचं असेल, की तो रीतसर एखादं अस्खलित इंग्रजी वाक्य फेकून देतो. त्याला इंग्रजीतून गोष्ट सांगितली, तर बावचळून बघत राहतो. पण त्याला त्याच्या वर्गात वापरली जाणारी आज्ञार्थी इंग्रजी मात्र बरोब्बर कळते. मग त्याची भाषा कोणती? "उद्या शाळेत रेड कलरे बाबू, मला रेड कलरचं ऍपल दे!" असं म्हणतो नि "तांबडं पेन देऊ?" असं विचारल्यावर शुंभासारखा तोंडाकडे बघत राहतो किंवा "ए! तांबडा! तांबडा म्हंजे?" असं ओरडत खिदळत सुटतो.

कुठली आहे त्याची भाषा? पण हे काही नवं नाही. असे प्रश्न माझ्याही पिढीच्या बाबतीत नि त्याआधीही पडले असतीलच कुणालातरी कधीतरी. तरी अजून माझी भाषा मला आहेचे. मग ती नक्की किती टक्के 'शुद्ध' असली की एकसंध नि जिवंत नि रसरशीत नि पूर्ण म्हणायची? काय की. असल्या शुद्धाशुद्धता नि टक्केवार्‍या वेडगळ. पण तरी एकालगतच्या एक अशा तीन पिढ्यांना तरी एकमेकांच्या बोलण्याचा सारांश कळावा, इतपत तरी सलगता, एकसंधता भाषेच्या प्रवाहात राहावी, अशी अपेक्षा रास्त म्हणायला पाहिजे. अजून तरी माझ्या आजीला मी काय बोलते हे कळतं. (कळतं का?! बहुधा हो. पिढीचा फरक वजा करायचा. "व्हॉट्सॅपवर पिंग आलं." म्हणजे तिच्या डोळ्यासमोर व्हॉट्सॅपचं चित्र तरळत नसेल. पण फोनशी संबंधित काहीतरी व्यत्ययसदृश झेंगट घडलं नि नात आता फोनमध्ये डोकं खुपसून बसणार हे बरोबर कळतं. म्हणजे भाषा कळते का? तर होच.) माझा भाचा काय बोलतो हेही मला अचूक कळतं. अजून तरी. पण हे आजचं झालं. घराबाहेर नि घरातही माझी भाषा माध्यम म्हणून उरूच नये, अशा दिशेनं बदल होतायत. बदलांना ना नाहीय. ती असू शकतही नाही. पण भाषेत बदल होणं निराळं नि भाषाच न उरणं निराळं. मग हा प्रवाह खंडित व्हायला किती पिढ्या पुरतील? एक. फार तर दोन? दोन पिढ्यांत मी काही मरणार नाही बहुतेक. मी दोन पिढ्यांनंतरही उरेन. म्हणजे - मरता मरता माझ्याशी माझ्या भाषेत बोलायला कुणीच उरायचं नाही? उपर्‍यासारखं दुसर्‍या कुठल्या भाषेच्या आसर्‍याला जावं लागेल... नि इतक्या लांब जायची गरज नाही. आज-उद्यातही होईल हे कदाचित.

बाप रे.

या परावलंबित्वाची भीती वाटते. पूर्णपणे स्वार्थी, खरी, निखळ भीती वाटते. या भीतीपायीच इतर भाषांमध्ये थोडेतरी हातपाय मारले जातात. पॉप कल्चरशी जोडून राहून तरुणपणाशी संबंध बळंच तरी टिकून राहावा म्हणून थोडे कष्ट घेतले जातात, तसेच. तशा इतर भाषा तितक्या परक्या नाहीतही म्हणा. अखेरशेवट कायम माजघरात, रस्त्यावर आणि दप्तरात तीन निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांच्या देशातली आहे मी. तितकं तर जमेलच. जमतंच.

पण म्हणून माझ्या - माझ्या हक्काच्या - भाषेमध्ये अडकलेला जीव कमी होईल? सॉरी बॉस. तिच्यासाठी होता होईतो हातपाय मारणं आलं. कारण ते माझ्यासाठीच आहे.

भाषा वापरणं म्हणजे या भीतीचा आविष्कार करत राहणं इतकंच फक्त नाही, हे मला ठाऊक आहे. आपल्याला सहज वापरता येणारं, आपला भाग असणारं एखादं टूल - अवयव सराईतपणे वापरण्यात-वागवण्यात-परजण्यात-मिरवण्यात आनंद आहेच. पण त्याखेरीज तो वापरत राहण्याच्या नितांत आवश्यकतेची जाणीवही आहे. जवळजवळ नेणिवेच्या पातळीवरची, खोल जाणीव आहे. म्हणून रेषेरेषेचा कीस पाडत नवे शब्द पाडणं. घासून, वापरून पाहणं, प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते तयार आणि अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. माध्यमासाठी वाद घालणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप माझ्या भाषेत आणि माझ्या लिपीत गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मागणं, मांडणं, भांडणं...

एकुणात प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे. त्यामुळे बीलेटेड हॅप्पी मराठी दिन.

***

(लेखन इथे पूर्वप्रकाशित. त्यावर झालेल्या चर्चेतून काही नवीन मुद्देही हाती आले. त्यांची भरही इथल्या आवृत्तीत घातलेली आहे.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

'वैयक्तिक पातळीवर भाषा आपल्याला जगवत असते. समूहाच्या पातळीवर आपण भाषेला जगवण्याचा प्रयत्न करीत असतो'
असे एक घोषवाक्य ठोकून द्यावेसे वाटतेय. (म्हणून दिले ठोकून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निबंध पोहोचला.इतकं चांगलं लेखन करता येत असतं त? अगदी एकटाकी सरसर विचार उतरत गेलेत.
"इथे" गेलो पण त्या तुमच्या हिरवट चादरीवरच्या अक्षरांनी आमच्या मोबल्याच्या सक्रीन कॅान्ट्रास्टचं पार भुस्कट पाडलं.नाही वाचता येत .काही वेगळा कलर शोधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदलला बरं का चादरीचा रंग! मोबाईलवरून आपलाच ब्लॉग वाचायची वेळ येत नसल्यामुळे लक्ष्यातच आलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

व्वा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कम्फर्ट झोन
कम्फर्ट- आराम
झोन- पट्टा
यावरून आरामपट्टा हा शब्द बनवता येईल पण झोनला पट्टा असं जसं च्या तसं भाषांतर जरा ऐकायला बरं नाही वाटत.
झोन या अर्थाने इथे गल्ली हा शब्द बसू शकेल. म्हणजे अमक्या अमक्याला साधी गल्लीबाहेरची अक्कल नाही असं आपण म्हणतो. किंवा एखादा माणूस गल्ली सोडून कधी गेला नाही असं ऐकायलाही मिळतं. या शुंभाला गल्लीबाहेर जायला नको असं पण म्हणतात.

त्यामुळे 'आरामगल्ली' किंवा 'निवांतगल्ली' किंवा 'आरामवाडा'
असा शब्द हा पर्याय होऊ शकेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला नामास नाम अशा तर्‍हेनं केलेला प्रतिशब्द फारसा आवडत नाही, हे माझ्या पूर्वीही लक्षात आलं आहे. तसंच याही बाबतीत. नाही आवडला एकही. सुचवण्यांसाठी आभारी आहे, पण सॉरी. त्याहून 'अमुक एक ठिकाण आपल्याला सवयीचं होतं, घरच्यासारखं वाटतं, तिथे आपण सैलावतो' असं म्हणीन. आणि जिथे नामच हवं असेल, तिथे सरळ 'कम्फर्ट झोन'च म्हणीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असो. कंसात मराठी प्रतिशब्द काय असं लिहिलेलं दिसलं आणि सहजच आपलं हे सुचून गेलं म्हणून सुचवलं.बाकी काही नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आश्वस्त-परीघ हा शब्द मला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुदा "माझी गल्ली" किंवा "माझा इलाका" असा शब्द समुह मी वापरेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

...मगर मैंने ये राज़ अब तक ना जाना के क्यों प्यारी लगती हैं बातें तुम्हारी
मैं क्यों तुमसे मिलने का ढूँढू बहाना..
कभी मैंने चाहा तुम्हे छू के देखूँ
कभी मैंने चाहा तुम्हे पास लाना...

मगर फिर भी इस बात का तो यकीं है
मुझे प्यार तुमसे नहीं है, नहीं है
...

मस्त गाणं..!!

तशी ती एक कुसुमाग्रजांनी एक कविताही मस्तः

कधी तुझ्यास्तव
मनात भरते
मेघ पिणारे
चांदल नाते
दवात जे घर
बांधूनि राही
पण ते नाही
प्रेम वगैरे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खास!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वा गवि, अगदी बरोबर ५ दिवसापूर्वी डाउनलोड केले गाडीत ऐकण्यासाठी. फार पूर्वीपासुन आवडायचे.
एकुणात तो सिनेमा पण आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख जरा शब्दबंबाळ आहे. वाचून दमलो आणि तरी थोडसंच समजलं. आणि जे समजलं ते फारसं पटलं नाही. अशा भावना मुळात परकीय पण नंतर आत्मसात केलेल्या भाषेबद्दलही असू शकतात. माझं मराठीपेक्षा इंग्रजीवर ज्यास्त प्रेम आहे. शेवटी भाषा हे मुख्यत: माध्यम आहे. आशयक्षमता, अभिव्यक्तीक्षमता, पैस, कालसुसंगतता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भाविष्यवेधिता या गोष्टी फार ज्यास्त महत्वाच्या आहेत आणि इंग्रजी ही या सर्व बाबतीत मराठीपेक्षा मैलोगणती श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे (मराठी माध्यमात शालेय शिक्षण झालेले असून, मराठीत बरेच वाचलेले असून आणि मराठी आवडत असूनही!). जी भाषा टिकवण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतात तिचे भवितव्य मला फार काही बरे दिसत नाही - बोलीभाषा म्हणून उरली तर उरेल बहुधा. आणि मराठीतल्याच एका श्रेष्ठ कवितेत म्हणल्याप्रमाणे : जुने जाउद्या मरणालागुनि, जाळुनि किंवा पुरुनी टाका; सावध ऐका पुढल्या हाका …

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा भावना कोणत्याही भाषेबद्दल असू शकतात, अगदी अगदी. मला त्या मराठी या मातृभाषेबद्दल आहेत, इतकंच. बाकी - मराठीचं जे काही व्हायचं असेल ते तिच्या-तिच्या मरणानं होईलच. पण मी काही तिला जाळायला वा पुरायला जाणार नाही!
बाकी - शब्दबंबाळपणाबद्दल, स्वारी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्या काहीश्या आगाऊ प्रतिक्रियेला संयत आणि खेळकर प्रतिसाद दिलात. धन्यवाद. आता आपला समेट झाला हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्या टाळी! (आपला बखेडा कधी झाला होता बादवे?!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ये बात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मराठी भाषा कलौघात नष्ट होणार हे तर दिसतच आहे. आणि मराठीवर प्रेम आही हेही सत्यच आहे..पुढे स्पष्टीकरण देणार नाहीये कारण शब्दात मांडता येत नाहीये. पण प्रेमच आहे.
____
लेख आवडला. वरचष्मा हा शब्द फारा दिवसांनी ऐकला. रॅशनल दृष्टीकोनातून जे पातळ पदर मांडले आहेत ते फार आवडले. क्रिएटिव्ह रायटिंगचे उत्तम उदाहरण म्हणता यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिखाण आवडलं.

आपल्या भाषेत आपण व्यवहार का करतो, त्यातच व्यक्त झाल्यावर आपल्याला समाधान का मिळतं याचं व्यक्तिगत पातळीवरचं एक उत्तम वक्तव्य अशी नोंद घेता येईल. आपल्यापैकी काहींचा फोकस काही विशिष्ट बाबींमधे फार चांगला असतो. लेखिकेचा "स्व" आणि "स्व"चा अविभाज्य भाग असलेली त्या "स्व"ची भाषा यांबद्दलची मतं तासून तासून नेमकी, टोकदार आणि म्हणून प्रभावी झालेली या लिखाणात प्रत्ययाला येतात.

भाषेचा सामाजिक व्यवहार, भाषेचं राजकारण, भाषेच्या अस्तित्त्वापासून तिचं माहात्म्य टिकवून धरणं, भाषेचं संवर्धन या सार्‍या समष्टीच्या गोष्टींवर ही ऊर्जा आपोआप वापरली जाते. आपोआप, कारण तुमच्या जगण्यातूनच ती आलेली असते. "जरी उद्धरणीं व्यय न तिचा हो सांचा, हा व्यर्थ भार विद्येचा" हे "विद्ये"इतकंच आपल्या अंगभूत, सेंद्रिय प्रवृत्तींच्याबाबतही लागू आहेच.

तुम्ही आम्ही मराठी सायटी नि ब्लॉग्ज नि मराठी लिपीतल्या सोशल मिडियावर एकमेकांशी बोलतो हीच आपल्या भाषेबद्दलच्या आपल्या प्रेमाची साक्ष आहे. ज्यांना भाषेबद्दल आस्था नाही ते लोक इथे फिरकत नाहीत. वार्‍याला उभे राहात नाहीत. भाषेपासून स्वतःला दूर ठेवतात. भाषेच्याबद्दल अंगभूत प्रेम असलेला आणि पर्यायाने फार चांगला फोकस असलेला वर्ग (ज्यांच्यात लेखिकेचं स्थान नक्कीच सन्मानाचं ठरतं) आणि हा भाषेबद्दल जवळजवळ कृतघ्नभाव असलेला वर्ग या दोहोंमधे कुठेतरी भाषेच्या वर्तुळाकडे बाहेरून बघत असलेला, आत येण्याबद्दल कुतुहल आणि त्याचबरोबर अनिश्चितता बाळगणारा एक वर्ग आहे. त्या वर्गाला वर्तुळात आणायचं काम आपण जितकं अधिक डोळसपणे करू तितकं "आपल्या हक्काच्या, जिच्यात आपला जीव अडकलेला आहे अशा तिच्यासाठी होता होईतो हातपाय मारणं" अधिक अर्थपूर्ण बनेल असं मला दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'कंफर्ट झोन'ला मराठीत संदर्भ बघून ऊब (किंवा गारेगार) वाटते ती जागा/भाषा/व्यक्ती/संवाद/विषय इ., आपलीच गल्ली असे निरनिराळे शब्दप्रयोग वापरता येतील. अर्थातच वाक्यरचनाही त्यानुसार बदलावी लागेल.

लेखन आवडलंच. सगळ्यात जास्त आवडलं ते हे -

शब्द मनाजोगते तोडलेमोडले नि मला हवे तसे घडवून मांडले तरी या भाषेत मला अपराधी, संकोचल्यासारखं, गंडल्यासारखं वाटत नाही.

आणि हे

माझं नाहीच आहे प्रेम माझ्या भाषेवर. प्रेम या शब्दाच्या माझ्या व्याख्येत मला निवडीचं स्वातंत्र्य अभिप्रेत आहे आणि खेरीज ओढ, आपुलकी, लळा, जिव्हाळा, लिप्ताळा... इत्यादी गोष्टी आहेत. त्यामुळे माझं माझ्या आईवडिलांवरसुद्धा किंवा फॉर दॅट मॅटर देशावरसुद्धा प्रेम नाहीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"कुशित" मध्ये कंफर्ट झोन ची कल्पना येतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय, बरोबर. काही अंशी '(राखीव) कुरण' हाही शब्दप्रयोग चालण्यासारखा आहे. सगळ्या संदर्भांत नाही चालणार. पण काही ठिकाणी चालेल. वर सुचवलेले इलाका, गल्ली हेही काही संदर्भांत चपखल बसतील. आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्तच!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.
हे मुख्यत्वेकरून भाषेबद्दल असलं, तरी वर अदितीनं हेरल्याप्रमाणे, त्याला इतरही काही पदर आहेत. माणसं, प्राणी, ज्यांच्या जाणिवेबद्दल शंका आहेत अशा सजीव गोष्टी, निर्जीव गोष्टी आणि अमूर्त संकल्पना... यांच्यामध्ये नक्की कोणत्या भावना गुंतलेल्या असतात, का, नि त्या असाव्यात की नसाव्यात - असा सगळाच विचार या निमित्तानं झाला. त्याला अर्थातच सध्याच्या देशप्रेमाच्या लाटेची पार्श्वभूमी होती. त्याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं, हे स्वतःशी नक्की करून पाहणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. फक्त स्व आणि स्वमत यासाठी नव्हे; तर भाषा हे एक प्रभावी टूल (आता इथे मला हत्यार असा शब्द वापरायचा नाहीय, कारण मग त्यात आक्रमकता येते. पण उपकरण अगदीच प्रयोगशाळेत नेऊन सोडणारा शब्द आहे. त्याच्याबरोबरीनं हायड्रोजन सल्फाईडचा रेंगाळलेला वासही येतो. त्यामुळे तो बाद. म्हणून टूल.) असतं - त्यामुळे शब्द नक्की कोणत्या अर्थानं वापरतो याचं भान आपल्याला असणं कळीचं ठरतं, नेमक्या शब्दयोजनेमुळे आपल्या कृतींमध्येही निर्णायक फरक पडू शकतात असं मला वाटतं म्हणून.
***
अमुक यांनी सुचवल्याप्रमाणे साधन हा शब्द इथे अचूक बसेल. पण मला टूल हा शब्दही आवडलाच आहे आणि फक्त फारसी-अरबी, संस्कृत किंवा इतर देशी भाषांमार्फतच आपण नवे शब्द घ्यावेत हे थोडं आडमुठं वाटत असल्यामुळे मी मुद्दामहून टूल तसाच ठेवते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम परफेक्ट! मनातलं बोललीस.

--मयुरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख फार्फार आवडला.

भाषा वापरणं म्हणजे या भीतीचा आविष्कार करत राहणं इतकंच फक्त नाही, हे मला ठाऊक आहे. आपल्याला सहज वापरता येणारं, आपला भाग असणारं एखादं टूल - अवयव सराईतपणे वापरण्यात-वागवण्यात-परजण्यात-मिरवण्यात आनंद आहेच. पण त्याखेरीज तो वापरत राहण्याच्या नितांत आवश्यकतेची जाणीवही आहे. जवळजवळ नेणिवेच्या पातळीवरची, खोल जाणीव आहे. म्हणून रेषेरेषेचा कीस पाडत नवे शब्द पाडणं. घासून, वापरून पाहणं, प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते तयार आणि अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. माध्यमासाठी वाद घालणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप माझ्या भाषेत आणि माझ्या लिपीत गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मागणं, मांडणं, भांडणं...

'अर्थ बोलाची वाट पाहे। तेथ अभिप्रावोचि अभिप्रायातें विये। भावाचा फुलौरा होत जाये। मतीवरी॥' आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख खूप आवडला. विचारांचं लेखात उतरलेलं ओघवतेपण आवडलं. मुख्य म्हणजे विचार पटला. आपल्याला जे जन्मतः मिळालय त्याविषयी आपलेपणा वाटणं ठिकाय पण गर्व, अभिमान, प्रेम वैगेरे वाटायलाच हवं का? कधीकधी वाटतं हा आपलेपणा आटायला लागला की हे प्रेम वैगेरे उतू जायला लागतं बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख खूप आवडला. "मायभाषावश्यकता" हा शब्द विशेष आवडला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंखरं प्रेमबिम आहेबिहे असं वाटलंबिटलं.
आणि साधंसरळ आहे.
कम्फर्ट झोन ला मराठी शब्द अगदी प्रतिशब्द नसावाच.
आजोळसुखाची जागा, किंवा सायसावली असं असावं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजोळसुखाची जागा, किंवा सायसावली

खूपच भावगीत-इश लाडिक वगैरे आहेत राव हे शब्द.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा.. हो ना!
त्यात मेघना असं काही बोलू लागली तर समोरचा बोलताना पटकन कवळी पडली तर जसं वाटतं तसंच फिलिंग येईल Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"आजोळबिजोळ सुखाबिखाची सायबिय सावलीबिवली असलं काही मला सुदैवाने होत नसल्याने" वगैरे असं म्हणून ती बोलायला सुरुवात करेल.

त्यातू पुढे भावुकबिवुक वगैरे झाल्याचं कोणाला दिसलं तर? आणि भावुकही कशाने, तर असल्या चारचौघांना भावुक करणार्‍या गोष्टींनी? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋ आणि गवि यांच्याकरता पेश्शलः माझं एक जुनं(आट) ब्लॉगपोस्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अत्यंत अश्लील लेख आहे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन