आस्वलीची पुनर्भेट...

आस्वलीला जायची सुरसुरी आली धनंजयला. सकाळीसकाळी त्याला ताडी नि भाजलेले बोंबील अशी आठवण आली. गेलो. सूर्यहास चौधरी याने पंचवीस वर्षांपूर्वी जंगल फार्म कॅम्पिंग सुरू केलं होतं, तेही पाहायचं होतं. या मे महिन्यात मुलांसाठी एक नवीन शिबीर आयोजित करण्याची कल्पना माझ्या डोक्यात घोळते आहे- त्या दृष्टीनेही पाहाणी करायची होती. गेल्या वीस वर्षांपासून आस्वाली-भिनारी परिसरात स्वतःची नर्सरी सुरू करून ती यशस्वी करणाऱ्या उपेंद्र करमरकरची नर्सरीही पाहायला नीट वेळ देऊन जायचं होतं. आणि अर्थातच आस्वलीच्या आमच्या मित्रांनाही भेटायचं होतं.
शनिवारी संध्याकाळी निघालो. घोलवडपासून पटरी तुडवत मग आस्वलीच्या दिशेने कच्च्या वाटा तुडवत जाण्याच्या आठवणी अजूनही बुजलेल्या नाहीत. पण आता बुडाखाली गाडी घेऊन निघालो होतो. छान गुळगुळीत रस्ता झालेला. बोर्डीची पटरी ओलांडून गेलो आणि जुन्या खुणा शोधायला डोळे तयार झाले. पटरी शेजारचा लावरीपाडा थोडा हटवलेला- रस्त्यापासून थोडा दूर गेलेला. त्याचं रूपही अर्थात पालटलेलं.
चाळीस वर्षांपूर्वी रस्त्याकडेच्या सुनसान, उजाड जमिनी आता धरणाच्या पाण्यामुळे बागायती झालेल्या. गच्च चिकूच्या वाड्या, खजुरींच्या बरोबरीने केळी, आंबे, शेवगे अशी बागायत लागोपाठ होती. बऱ्याच बंगल्या उठलेल्या दिसत होत्या. आणि वारलींची घरेही पक्की दिसत होती. काही बिनप्लास्टरची, काही प्लास्टर लावलेली. वारल्यांची घरे असण्याचा कुठे काही ठसाच नाही. क्वचित घराची एखादी वाढीव फांदी कुडाकारवीची असेल... सिमेंटचे पत्रे तर होतेच सगळ्यांच्या छपरांवर.
सूर्यहासच्या जंगल फार्मवर पोहोचलो तोवर अंधार पडलेला. सूर्यहाससोबत चैतन्य नावाचा आदिवासी मुलगा होता. मग एक गोविंदा नावाचा मुलगाही आला. सूर्यहास म्हणाला, हे आमचे जंगल ट्रेकचे गाईड्स. पक्षी निरीक्षणासाठी एकदम तय्यार आहे चैतन्य. बीएनएचएस पासून कोणतेही कॅम्पर्स आले की त्यांना चैतन्य बरोबर हवा असतो. तीनचार मुलं आहेत. त्यातला एक शाळेत जातो, बाकीचे ड्रॉप आउट्स.
सूर्यहासचा उत्साह जबरी होता. आल्याआल्या कॅम्पिंग साईट्स, ट्री हाऊस सगळंच दाखवून आणलं. पाच झाडांच्या आधाराने बांधलेलं ट्री हाऊस खरंच फार सुंदर आहे. आसमंत आत्ताच गंधात न्हाऊन निघालेला. लोखंडीचा- जंगली पांढऱ्या इक्झोराचा, आंब्याच्या मोहराचा, करवंदीच्या फुलांचा असा मजमुआ हलकेच पसरलेला तलम मलमलीसारखा. या सुगंधात दरवळतच ट्री हाऊसवर गेलो. बांबू, लाकडं यांचा आणि लोखंडी खांबांचा एकत्रित वापर करून त्याने हे ट्रीहाऊस सुरक्षितही केलंय आणि देखणंही. ट्रीहाऊसमध्ये बांबूच्याच खिट्ट्या वापरून नळांचं क्लॅडिंग केलंय. वरच अतिशय सुरेख पध्दतीने बांधलेलं कमोडचं टॉयलेट, बाथरूम आहे. अगदी इवलीशी किचनेट आहे. एक बंद खोली त्यात बिछायती, बाहेर गॅलरीतही दोन तीन बिछाने टाकण्याची सोय. हवं तिथे झोपावं. सकाळी जाग येणार ती पक्ष्यांच्या किलबिलाटानेच.
कॅम्पिंगसाठीही जमिनीपासून तीन फूट वर उचललेले चौथरे आणि त्यावर छत. चादरींचे, तट्ट्यांचे दरवाजे, भिंती. प्रत्येक रचनेत जंगल डोकावण्याची आणि जंगलात डोकावण्याचीही सोय. मधूनमधून पक्षीनिरीक्षणासाठी बांधलेली मचाणं... कॅम्पिंगसाठी आलेल्या मुलांना तिथेही झोपता येतं हवं तर. मज्जा! अल्युमिनियमच्या किटल्या आडव्या काठीवर टांगलेल्या. खाली विझलेली राख. आलेल्या मुलांनी सकाळीच आपला चहा अशाच प्रकारे स्वतः करायचा असतो. आणि मग उनाडायला, खेळायला, साहस करायला भरपूर साधने. धनुष्यबाण, झाडावर चढणे, भिंतीवर चढणे, लाकडी फळ्यांचा पूल ओलांडणे, झिप क्रॉसिंग, साऱ्याच गमती.
सूर्यहास अगदी आनंदाने मजेने एक चांगला प्रकल्प राबवून पैसेही बरे कमावतोय, आणि खरंच एक चांगली सोय उपलब्ध करून देतोय हे पाहाणं फार आनंददायी होतं. वारली मुलांसाठी सायकलिंगची स्पर्धा भरवणे, त्यांना ड्रायविंग शिकवून लायसन्स काढायला मदत करणे हे तो सहजपणे करून जातो.
यात सगळ्यात मुख्य सांगायचं म्हणजे त्याने जेव्हा हा टेप- चढणीवरची जमीन विकत घेतली तेव्हा तो एक उजाड माळ होता. पण पाणी आल्यावर तिथं त्याने टिपिकल वाडी न करता शेकडो जंगली झाडं वाढवली, वाढू दिली. जंगलालाच वाव दिला. कोंबडे-कोंबड्याही कुठे बांधून ठेवलेल्या नाहीत. रानभर असतात. बावलासारखे शिकारी बारीकसारीक प्राणी सोडले तर बाकी सारं निरुपद्रवी प्राणीजीवन आहे.
थोडं ताजंतवानं होऊन आम्ही गेलो आमच्या राजू, विजय वरठाच्या घरी. त्यांचं मूळ घर सोडून ते नदीपलिकडे नवं घर बांधून राहायला गेल्याचं समजलं होतं. आम्ही रहात होतो तेव्हा नदीचं पात्र दगडागोट्यांतून, घोटाभर पाण्यातून ओलांडून पलिकडे जावं लागत असे. पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून जावं लागत असे. आता झकाससा पूल झालेला. झप्पकन् पलिकडे गेलो. रस्त्यावर राजू वाट पाहात उभाच होता. नवंनवं पक्कं घर. अजून गिलावाही नव्हता.
विचारलं का रे ते घर सोडलं. आणि मग समजली कहाणी- भावाभावातल्या भांडणाची. पंचायतीत सरपंच होऊन बळीकानपिळी झालेल्या राजकारणी धाकट्या भावाने इतकी वर्षं घर, म्हातारे वडील यांना सांभाळलेल्या, शेतीत खपलेल्या, विहीर खणताना काळाठिक्कर पडलेल्या मोठ्या भावाला घराबाहेर काढल्याची. वाटेचा हिस्साही नाकारल्याची... आदिवासी हे? पैसा आणि सत्ता सर्व माणसांना सारख्याच नीच पातळीवर आणून ठेवतो हे चर्रकन् पुन्हा एकदा समजलं.
समजलं की बचतगटाच्या पैशांचा सतरा लाखाचा गैरव्यवहार पंचायतीत झालाय- एका दहावी शिकलेल्या बाईने तो केला- आणि दुसऱ्या दहावी शिकलेल्या बाईने तो उघडकीस आणला.
धनंजयसाठी ताडी आणलेलीच. तिथेच दुसरा बारीकसा धक्का बसला. मातीच्या लोटक्यांतून ताडी पाहायची डोळ्याला सवय. आता ताडी आली प्लास्टिकच्या झाकणवाल्या जगमधून...
“हे काय... लोटकं नाय?” धनंजयने विचारलं.
“नाहीं रे... आथा कोण्ही नाहें लोटकं आणत.” विजय उत्तरला.
भाजलेले बोंबील, परतलेले कोंबडीचे तुकडे, ओतभाकरी, आंबाडी घातलेली डाळ, भात आणि कोंबडी-बटाट्याची भाजी असा बेत होता. जेवताना सगळ्या आठवणी निघाल्या- हो कुठे, तो कुठे... ती कुठे...
अर्धेअधिक जुने परिचित मित्र मरून गेलेले. दारू पिऊन खंगून, आजाराने, आणि दोघांनी तर फास घेऊन... अनेक बायकाही मरून गेलेल्या. किंवा आजारी तरी होत्या. घास कडू झाले.
पण राजूचा साडेतीन वर्षाचा मुलगा भोवतीने बागडत होता, बडबड करीत होता. राजूची बायको डॉक्टर धर्मी- उधव्याला चांगली प्रॅक्टिस करते. ती सांगत होती- मला विरारलाही विचारलंय एका डॉक्टरने की माझा दवाखाना मी सोडतेय तू चालवणार का. पण इथे मला बरं वाटतं. सेवा होते. पैसेही बरे मिळतात. त्यांना आपण काही दिशा देऊ शकतो. मोठे आजार असले तर नक्की कुठं जावं हे त्यांना न फसवता सांगणारं कुणीतरी हवं ना... धावपळ होते पण ठीक आहे. गाडी शिकतेय. ती चालवायला जमली की विरारहून डहाणूला ट्रेनने येईन आणि डहाणू उधवा गाडीने येजा करीन, मग जरा त्रास कमी होईल... बघू.
राजू म्हणाला, बीएमसीत पैसे खाणारे खूप आहेतच. पण मी नाहींच त्यात. त्या खाणाऱ्यांना कसलेकसले त्रास जडतात ते पाहातोय रोज. सगळ्यांना माहीत झालंय- हा त्यातला नाही म्हणून.
मग काही घास गोड झाले.
उशीरपर्यंत गप्पा करीत, आठवणी काढत, झालेले बदल कसकसे होत गेले ते टिपत थांबून होतो. अखेर दमून पुन्हा जंगल फार्मवर जायला निघालो.
गावात एक लग्न वाजत होतं. डीज्जे.
दूर आमच्या उंचावरच्या बेडरूमपर्यंत आवाज येत होता.
रात्रभर तो कर्कश गोंगाट जिवाला भिववत राहिला...
तारप्याचे सूर नव्हते लग्नातल्या नाचाला.
दारू आणि डीजेचे लग्न लागले होते.

बरीचशी रात्र अस्वस्थ गोंगाटाची गेली तरीही कधीतरी तीन वाजता पहाटे आवाज थांबले आणि झोप लागली. आणि पहाटे जाग आली ती पक्ष्यांचे किलबिलाट सुरू होतहोत. एकाही कावळ्याने मधेच कावकाव केली नव्हती. नव्हतेच तिथे कावळे. उठून खिडकीपाशी पहाट पहायला गेले तर कुसुंबाचे झाड अंगभर मोहरून उभे राहिलेले. चष्मा लावलेला नव्हता तरीही सारे झाड गजबजलेले आहे असे काहीसे जाणवले. चष्मा चढवला नाकावर. कुसुंबाची लालस पालवी ओळखीची होती, एकदा आस्वलीला असताना गुरांमागे, पोरांमागे गेले होते तेव्हा त्याची आंबटढाण फळे भुकेपोटी खाल्ली होती त्यामुळे फळेही माहितीची होती. पण कुसुंबाचा नवलपरीचा फुलोरा प्रथमच इतक्या जवळून पाहात होते. आणि या फुलोऱ्यावर कितीकिती... अनंत मधमाशा रुंजावत होत्या. लहान, मोठ्या, साताठ जातींच्या मधमाशा कुसुंबाच्या अंगाखांद्यावर फुललेल्या इवलाल्या नाजूक फुलांच्या मोहोरात स्वतःला घुसळत होत्या. खाली जाऊन पाहिलं तर कुसुंबाच्या मोहराचे केसर, पराग मधमाशांच्या धसमुसळ्या धडकांनी गळून खाली सडाच पडलेला. पुन्हा दुसऱ्या खिडकीजवळ गेले तर गुंगू आवाज अगदी जवळूनच आला. पाहिलं तर पडदा आणि खिडकीची काच यांच्या मधे आठदहा मधमाशा दिग्मूढ होऊन अडकून पडलेल्या. खिडकी उघडल्यावर पाचसहा उडाल्या आणि बाकीच्यांना हलकेच ढोसकून बाहेर जायचा रस्ता दाखवावा लागला.
पुन्हा एकदा साऱ्या फार्मवर चक्कर मारून आलो. सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हायलेले शिबिर... ताडाच्या ओंडक्यांपासून बनवलेल्या बैठका, चपटे पृष्टभाग असलेले खडक यातून फिरताना पुन्हापुन्हा त्या सुगंधाचे बिलगणे.
कितीतरी वर्षांनंतर झाडाला बांधलेल्या दोरीवरच्या फळकुट-झोपाळ्यावर बसून झोके घेतले.
वर आलो तोवर चैतन्य, गोविंदा या पोरांनी छानपैकी पोहे तयार ठेवलेले. सूर्यहासही आला. मग त्याच्याशी गप्पा मारत, त्याचं कौतुक करत कुसुंबपराग मिश्रित पोहे खाल्ले. कारण बसलो होतो तिथं वरून सतत कुसुंबकेसर झिमझिमत होतेच. आमचे आस्वलीचे वास्तव्य वगैरे सूर्यहासला तसे प्रथमच कळत होते. त्याने आताची परिस्थिती सांगायला सुरुवात केली.
मुलं शिकत आहेत. दहावीनंतर काय करायचं कळत नाही. दहावी पास किंवा नापास झालेली मुलं कोणतंही कष्टाचं ‘खालचं’ काम करायला मागत नाहीत. आईवडील घरात शेतात राबतात. ही पोरं बरेचदा मोबाईल घेऊन त्यावर काहीतरी पाहात इथंतिथं उभी रहातात. मग चारपाच वर्षं वाय घालवल्यावर कारखान्यांत कामाला जायला सुरुवात करतात. उंबरगाव पलिकडे कारखानदारी आहेच. तिथे जातात. कौशल्य शिकून घेणारी मुलं फार थोडी आहेत.
तो सांगत होता- इथे कॅंपिंगसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मी वारली जनजीवनाशी ओळख म्हणून सर्वे करायला सांगत आलो आहे. मग ते तिथे जातात, त्यांच्याशी बोलतात त्यातून संवाद होतो. पण पूर्वी स्वागत करायला ताडी ऑफर केली जात असे- आता बीअर ऑफर केली जाते... अनेकांकडे टीवी, फ्रीझ आहे हे चांगलंच आहे. पण त्यांनी वारली असण्याचा एकही सांस्कृतिक ठसा घरात जपू नये हे मला कसंसंच वाटतं.
मी विचारलं, पण अजूनही वारली बायका तशाच चोळी नि खाली अर्धी साडी, त्यावर गुंडाळलेला टॉवेल अशाच पेहरावात दिसतात. म्हणजे त्यांची परिस्थिती तशी आहे की त्या वेष टिकवून आहेत म्हणायचं.
त्याने उत्तर दिलं,- “नाही परिस्थिती बरी असली तरीही हाच वेष जुन्या बायका घालतात. पण आता त्यांचा वेष गाऊन्स हा होत चाललाय. लाकडं आणायला जातानाही कंबरेवर खोचून बांधलेला गाऊन घातलेला असतो.” गावात त्याचं प्रत्यंतर आलंच नंतर.
पुन्हा आस्वलीत शिरलो. आम्ही ज्या गावठाणात रहात होतो ते थोडंसंच बदललेलं. पण नदीजवळच्या सामायिक विहिरीजवळची भली भव्य चिंचेची झाडं तोडून टाकलेली. ती विहीरही गावच्या सरपंचाने आपल्या कंपाउंडात अर्धी घेतलेली. बळकावण्याची कला किती झटकन् साध्य होते...
विजयकडे पुन्हा गेलो आणि मग समोर मेकी नि काकडच्या घराचं बांधकाम चालू होतं तिथे गेलो. मेकी आणि काकड. काकड रेल्वेत नोकरीला होता. नीट नोकरी करणारा त्या काळातला तो एकटाच वारली. घरोऱ्या- लग्नाचा खर्च करायला जमत नाही, परवडत नाही तोवर बायकोच्या घरी येऊन रहाणारा आणि तिथे काम करणारा वारली जावई घरोऱ्या म्हणून ओळखला जातो. तसा काकड घरोऱ्या म्हणून आलेला. दोन मुलं झाल्यानंतर त्यांचं लग्न लागलेलं. धनंजय आणि तेव्हा तिथे रहाणारे विद्यापीठाचे चारचौघेजण त्यांच्या लग्नात होते. अशी विशेष मैत्री.
मेकी आता पार म्हातारी दिसते, पण अजून ताठ आहे. काकडही दणकट आहे. अभिमानाने त्यांनी घर दाखवलं. चांगलं प्रशस्त बांधलेलं घर. मुलगे, मुलीही कामं करीत होत्या. मेकीने सांगितलं- सहा पोरांच्याथ एकुच ही कमल शिकल. नर्सिंग शिकली. आता वसईला जाणार नोकरीसाठी.
मग त्यांच्या जुन्या- चारीबाजूंनी उघड्या घरात गेलो. काकडने ताब्बडतोब ताडी आणवली. सकाळची ताडी म्हणजे जरा गोड. मलाही प्रचंड आग्रह. मला नाहीच आवडत ताडी. आमच्या वाडघ्याला फावलंच. पण थोडी साखर वाढण्याची नि थोडी बायकोच्या ओरड्याची भीती वाटून फक्त बिचाऱ्याने एकच ग्लास रिचवला.
पुन्हा एकदा आणखी थोड्या वारली सवंगड्यांची वास्तपुस्त सुरू झाली आणि आणखी काही मृत्यूंच्या नोंदी झाल्या.
राणे सरांच्या येण्यापासून, विद्यापीठाच्या शिबिरांच्या गर्दीपासून साऱ्या गप्पा निघाल्या.
“खरजेची काय रे आता परिस्थिती?” मी विचारलं.
“गेलीsss. आथा नाहें खरज.” मेकी म्हणाली, “पहलीं तं फार खरज रहं नाहीं... मी तं साळंत जायची बंद केली. ओडाक् खरज झाली मला साळत जावन्.”
ही सुखावणारी एक बातमी.
“आथा लोक पहल्यासारके दिसभर दारू पन नाहें पेत. सगली कामावर जाथ. दारूबारू सांजचे घरी आल्ह्यांवर. रईवारचे दारू.”
ही सुखावणारी दुसरी बातमी.
“आथा गाडी घेथली मदनने. पुरा देशांत फिरला- भाड्यावर. टावॅरा घेथली. बऱ्याच लोकांनी घेथल्या गाड्या. धंदा मिलतो. मग दारू पिन्ना चालथच नाहे ना.”
आणखी एक बरी बातमी.
“बार्डावरचं जंगल आहे का रे अजून बरं?”
“आहे... पण फार तुटला. प्लॉट झाले ना. त्याच्या आदीच तुटला. मोठीं झाडां तं नाहेंतच.”
दौर ये चलता रहे... र
कमलला फोन नंबर देऊन- काही मदत लागली तर कॉन्टॅक्ट करायला सांगून निघालो. विजयच्या घरी जाऊन पुन्हा जेवलो. गावठाणात उतरून उरलेल्यांना भेटायची इच्छाच नव्हती. तेव्हाचे मित्र-मैत्रिणी तर सगळेच गेलेले मरून. आता त्यांची पोरंबाळं होती. सुमनची मुलगी भेटली, विष्णूचा मुलगा मोटरसायकलीवरून जाताना विजयने दाखवला... तेव्हा मी शाळा घेत असे त्या मुली तर सगळ्या लग्न होऊन दूर गेलेल्या. गावठाण पार करून विजय, राजू, आणि बाळाला घेऊन खुनवड्यातून उपेनच्या नर्सरीवर गेलो.
उपेनच्या नर्सरीत साठएक वारली काम करतात. जरा बेभरवशीच काम असतं. पण आता पैसे मिळवायला पाहिजेत एवढं कळतंय, त्यामुळे पहिल्याइतकी गैरहजेरी नाही. किमान वेतनाप्रमाणे काहीजण पैसे देतात. काहीजण नाही देत. पण कारखानदारी जवळ आल्यामुळे वारली सौदा करू शकतात. जास्त देतोस का तर रहातो- नायतर पुढचे पंधरा दिवस जातोय उंबरगावास नायतर वापीला... तिथं तीनशे रुपये रोज मिळतो. औद्योगीकरणामुळे हे शक्य होते. हे होऊ नये म्हणूनच तर डहाणू घोलवडच्या इराण्यांनी हरितपट्ट्याचा आवाज करून कारखानदारी दूर ठेवलेली. जाण्यायेण्याची साधनं नव्हती तेव्हा वारली गाव सोडून जाऊ शकत नव्हते. आता प्रवासाची साधनं आहेत, रस्ते आहेत. कमी पैशातही स्थानिक वाडीवरच राबायची तेवढीशी गरज उरलेली नाही. तरीही काही अनाडी वारल्यांना फसवणारे किमान वेतनाच्या निम्म्या दरात काम करवून घेणाऱ्या स्थानिक हलकट प्रवृत्ती आहेतच. पण हळुहळू होईल सारं कमी. पण शहाणी तरूण माणसं, आपलाच नफा तेवढा वाढवायचा विचार न करता किमान वेतनाच्या कायद्याचा मान राखतात असंही दिसतं.
उपेन करमरकरने नेहमीच्या नोकरीच्या रुळलेल्या वाटेवर कधी पाऊलच ठेवलं नाही. त्याने वीसेक वर्षांपूर्वी आपल्या झाडाझुडांच्या प्रेमाच्या छंदालाच धंद्याचं वळण दिलं. एक एकरापासून सुरुवात करत त्याने आता खूप मोठी नर्सरी केलीय. शेत तळं करून त्या पाण्यावर त्याचे नर्सरी खरेच एक ओअसिस झालीय. हिरवळीचे गालिचे करून विकणे, वेगवेगळे कॅक्टाय-सक्युलन्ट्स, ऑर्किड्, कमळणी, नेची, परीपरीची झाडं, दुर्मिळ झाडं, फुलझाडं, सावलीतली झाडं, कंद असं सारं काही तो फुलवतो. टिलापिया मासेही विकतो.
डिलेनिया इंडिकाचं- (भव्य- कमरक- एलेफन्ट ऍपलचः घसघशीत झाड पाहून मी नेहमीच वेडावत आलेय. या वेळेला उपेनकडून मला त्याचं रोप मिळालं. ठाणे जिल्ह्यातून आता ते रत्नागिरीत जाईल.
या नर्सरीत आमच्या गार्डनिंगच्या विद्यार्थ्यांना घेऊन जायला पाहिजे. उपेनने राजू आणि विजयला त्यांच्या वाट्याला आलेल्या पाऊण एकरात काय चांगल्या प्रकारे करता येईल त्याच्या सूचना केल्या. जमीन चांगली पैसे देणारी पिकाऊ करायला शिकणं हे वारली भूधारकांचं पुढचं पाऊल असलं पाहिजे.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

खूप मस्त लेख आहे. धन्यवाद! काही वर्षे आधी माहित असते तर तारापुरला रहात असताना आणि मुले लहान असताना जाता आले असते. पण अजूनही जाता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्का

मटक्याऐवजी प्लास्टिक मग आणि ताडीऐवजी बिअर, तारप्याऐवजी डीजे असे काही बदल क्लेशकारक वाटले तरी बहुतेक बदल सुखावणारे आहेत. कधी ना कधी या जमाती मुख्य प्रवाहात येणारच आहेत. हे संक्रमण शक्य तितके नैसर्गिक, आपोआप घडलेले असावे इतकेच. रस्ते, गाड्या, मोबाईल, टीवी यामुळे हे लोक इतरांच्या संपर्कात येऊन आपोआपच (अर्थात आपल्यासारख्यांचे पायाभूत कार्य त्यामागे आहेच.) सरमिसळ झाली हे योग्यच झाले म्हणायचे. चित्रदर्शी शैली आवडली, आवडते. अधूनमधून झालेली नर्म विनोदाची पखरण कुसुंबपरागांप्रमाणे सुखावून गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी हेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हेच.

आणि हा मागच्या लेखनाचा दुवा, पुढच्या वाचकांच्या सोयीसाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते बदलले आणि आपण तरी ते जुनेच कुठे राहिलो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला वाटत असतं की जुन्यातलं आपल्याला आवडत होतं तेव्हढंच टिकून राहावं. बाकी सगळं नाश पावलं तरी चालेल. पण असं सिलेक्टिव टिकणं होत नसतं ना? म्हणजे लोणच्यातली आंब्याची फोड नासली तरी चालेल पण खार टिकायला हवा वगैरे?
अर्थात लेखिकेने असला काही सूर आळवलेला नाहीय, खरं तर कोणताच सूर आळवलेला नाहीय.
कधी कधी वाटतं की अमेरिकेत कसं इंडियन खेडी नमुना म्हणून जपून ठेवलीयत किंवा मुद्दाम उभारून ठेवलीयत तसं आपल्या प्रत्येक आदिवासी जमातीसाठी व्हावं. किंवा त्या सूर्यहास चौधरींनी केलंय त्या प्रमाणे परंतु आपली गतसंस्कृती जपणारं एक पर्यटनस्थळ एखाद्या माजी आदिवासी गटाने उभारावं, ज्यात ही सर्व राहाणी प्रत्यक्ष अनुभवायला मिळू शकेल. अगदी ताजी ताडी आणि भाजले बोंबिलसुद्धा..
किंवा दोनशे वर्षांपूर्वीचं पुणं किंवा मुंबई असं एखादं कायमस्वरूपी प्रदर्शन असावं. पण म्हणा गूगलवर सगळं असतंयच हल्ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. आदिवासी आणि आधुनिक समाज यांच्या इंटरॅक्शन याबद्दल आजच हा लेख वाचला.

http://www.nytimes.com/2016/03/14/world/asia/india-jarawas-child-murder....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान लेख.

हे "ओतभाकरी" काय असतं?

तसंच, महाराष्ट्रात कुठेकुठे हरितपट्टे आहेत याचा काही नकाशा उपलब्ध आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तांदळाचं पीठ मीठ घालून डोशासारखंच पण जरा घट्ट कालवायचं. खोलगट लोखंडी तव्यात मधे ओतून जाडसर- वाटीच्या बुडाने किंवा हाताने पसरायचं ते पार तव्याच्या कडेपर्यंत. मग वरून झाकण मारायचं. अंदाजपंचेदाहोदरसे झाकणी मिनिटभराच्या आतच काढायची आणि भाकरी उलथन्याने सोडवून उतरायची. जाड डोसाच. न आंबलेल्या पिठाची सोपी भाकरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तांदळाचं पीठ मीठ घालून डोशासारखंच पण जरा घट्ट कालवायचं. खोलगट लोखंडी तव्यात मधे ओतून जाडसर- वाटीच्या बुडाने किंवा हाताने पसरायचं ते पार तव्याच्या कडेपर्यंत. मग वरून झाकण मारायचं. अंदाजपंचेदाहोदरसे झाकणी मिनिटभराच्या आतच काढायची आणि भाकरी उलथन्याने सोडवून उतरायची. जाड डोसाच. न आंबलेल्या पिठाची सोपी भाकरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा. उत्तम. म्हणजे भाकरी थापणे, गोल आकारात आणि ती न मोडता उचलून तव्यावर टाकणे ही अशक्यप्राय कसरत टळतेय यात. केलं पाहिजे आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद! करून पाहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.