बीजे जगतात...

बिया जमवून त्या रुजवायचा छंद मला कधी लागला आठवत नाही.
पण या छंदाने खूप मस्त जिवंत वाटतं.
एक बी. आतमधला गर्भ सुम्म झोपून गेलेला असतो. कडधान्यांची, तृणधान्यांची बीजं जशी सहज, जरासं पाणी नि ऊब मिळाली की अंकुरतात, मातीत खोचली की लगेच दोन पानं किंवा प्लुम्यूल्स बाहेर डोकवतात... तसं काही सारंसोपं साऱ्याच बियांचं नसतं. कठीण कवचांतून बाहेर पडण्याची काही बीजगर्भांची धडपड मदतीवाचून कितीही वर्षं थांबून राहू शकते.
या झोपलेल्या बीजगर्भांना जागं करायचं मुख्य काम असतं पाण्याचं. वरच्या कवचाच्या पांघरुणांतून पाणी आत शिरलं की ते टप्प्याटप्प्याने कवचाच्या आतल्या थरांतून घुसत, फुगवत जातं, बाहेरच्या कवचाला तडकवतं आणि मगच बीजाचे हातपाय हलायला सुरुवात होते. मुळाचं रॅडिकल मातीत घुसू पाहातं आणि मगच बीजदले मातीचा थर फोडून वरचं आकाश पाहू लागतात. तेव्हाच तर बीजाला या जगात आपण जगू शकू असा विश्वास आलेला असतो. माझं कवच अंतर्बाह्य भिजवून टाकेल इतकं पाणी हवं मला. आणि माती... आणि मला सोसेल अशी हवा. तरच मी जगायचं मान्य करीन म्हणत असतात अनेक बिया. नाहीतर राहीन झोपून अश्शीच. काही काळाने करपून जाईल माझा जीव? ठीक आहे... वाढून मग करपण्यापेक्षा बरं.
तर त्या झोपलेल्या बियांना द्यायचा असतो विश्वास...
पाणी त्यांच्या अंतस्त्वचेपर्यंत पोहोचून त्यांची अंतःसंज्ञा जागी करायची असते.
कधीकधी या बियांच्या कठीण कवचांना पाण्याचा पाझरस्पर्श व्हावा म्हणून थोडाथोडा तडा द्यावा लागतो. बी भिजत घालायचं. कवचाला थोडंसं घासून, चीर पाडल्यासारखं करून मग पुन्हा भिजत घालायचं. जरा कवच उमळल्यासारखं दिसलं की मग पुन्हा कातरकडेच्या सुरीने आतला गर न दुखावला जाईल अशी काळजी घेत पाणी पोहोचण्याची वाट आणखी मोकळी करायची. आतल्या गरापर्यंत पोहोचण्याआधी सुरी नेमकी थांबली पाहिजे. अवतीभवतीचं सारं जग विसरून ही शस्त्रक्रिया करावी लागते बरं...
आणि मग ती पुन्हा भिजत ठेवायची. पुन्हा पाण्याला पाण्याचं काम करू द्यायचं. नव्या पाण्याची भर निदान दिवसाआड तरी लावायची.
मी आजवर आंबे,फणस, जांभूळ, बोर, कोकम, काजू, सिताफळ, चिंच, कडूनिंब, सातवीण या झाडांच्या सोप्या बिया तर रुजवल्याच आहेत. त्यांचं काही नवल विशेष नाही. नारळ तर प्रत्येक कोकणी माणूस रुजवतोच. बकुळ, गारबी, रावणताड, मामिया अमेरिकाना, उंडळ, सीतेचा अशोक, भेरली माड, समुद्रफूल, सागरगोटे, गुंज अशा काही बिया रुजवायचा प्रयत्न केलाय मी.
पण काही बिया आव्हान देणाऱ्या होत्या. काहींच्या बाबतीत यश आलं. काहीं बिया अजिबात बधल्या नाहीत. काहींनी फसवलंही. त्याचे हे काही किस्से.
गारबीची वेल आणि ढमाली शेंग अनेकांनी पाहिली असेल. दुधाच्या गाठींवर उगाळून लावायला म्हणून ती रस्त्यावरचे वैदू लोक विकताना दिसतात. तिथं कदाचित पाहिली असेल गारबीची बी.
महा कठोर हृदयी बी. एकतर डार्क चॉकोलेटसारखी चकचकीत रंगाची, गुळगुळीत अंगाची बी. तिला सुरीने तासायचं म्हणजे अवघडच. पण मी अगदी विक्टरीनॉक्सची सुरी वापरून तिच्या कडेवर बारीकसा उथळ छेद केला. मग पुन्हा भिजत घातलं. मग पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा त्याच छेदावर घासलं. पुन्हा पाण्यात घातलं. मग महिनाभराने पुन्हा त्याच ठिकाणी सुरीने छेद केला.
मनात धाकधूक होतीच- आतल्या जीवाला कापलं जायला नको... तीन महिने भिजत पडलेली बी. वरचं कवच जरा भेगाळल्यागत भिजटलेलं. तिला गच्चीत एका कुंडीत ठेवून आले. जग गं बाई, मी आहे ना तुला... माती म्हणाली. काढ गं वर डोकं, मी आहे ना तुला- वरची झुळूक म्हणाली... आकाशात पसरलेल्या हलक्याशा उन्हाने हुंकार भरला असावा.
त्यानंतर पुन्हा दोन महिने गेले. आशा सोडून दिली होती. नाही रुजणार ही हट्टी पोर... आणि एक चारपाच दिवस कुठेतरी बाहेर गेलेले. परतल्यावर पहाते तर काय वीतभर ताणा त्या कुंडीतून डोकावत होता. आणि मग तो हांहां म्हणता महिनाभरात पाचसहा फूट सण्णसण्ण वाढला. बयाबाईला आणखी वाढू दिलं आणि मग मित्रांच्या फार्मवरच्या एका वृक्षातळी तिला वसवून आले.
आता कळलंय, की गारबीच्या बीजाला एवढा धीर तर धरावा लागतोच. आत्ता तीन बिया भिजवत घातल्यात. त्यांच्या कवचाच्या आत पाणी शिरेल आता लवकरच. पावसाळ्यापर्यंत त्या जगायला राजी होतील बहुतेक...
रावणताडाचं फळ मला नंदन कलबागांनी आणून दिलेलं. त्यालाही व्यवस्थित चिरा पाडून मी भिजत घातलं. चांगलं फुगल्यासारखं वाटल्यावर वेखंड लावलेल्या चिखलकुंडीतच तेही लावलं. सहासात महिने गेले. त्याचं वरचं आवरण काळ पडून कुजल्यासारखं दिसू लागलं. तरीही तसंच ठेवलेलं. मग एक दिवस वेखंडाची कुंडी जरा नीट साफसूफ करायला घेतली. मला वाटलं हे काही रुजलंच नाही. तर काढून टाकावं. म्हणून ते कुजलेलं वाटणारं फळ खेचलं चिखलातून. तर त्याचं सणसणीत मूळ फळासकट हातात आलेलं दिसलं. आणि त्याचं टोक तुटून खालीच राहिलं होतं. कपाळावर हात मारून घेतला. स्वतःचा रागराग केला. अशा नुकत्याच जगू लागलेल्या बीजाचं मूळ तुटलं तर ते काही जगत नाही. माहीत होतं. तरीही पुन्हा एकदा त्याला मातीत ठेवलं. पण मातीच झाली त्याची. मी अपराधी. रावणताड माझ्याकडे रुजून आलेला... आणि मी अज्ञानापोटी त्याला मरू दिलं... सहा वर्षं झाली. सल अजून आहे. कायमच राहील.
मग मायामीहून एक मित्र खिशात घालून एक सुकलेलं फळ घेऊन आला. म्हणाला ही फळ एका फार मोठ्या झाडाला लागतात. आणि घोसाघोसाने लागतात. ब्राझिलियन्स, मेक्सिकन्स ही फळं गोळा करून नेतात. फळांच्या वर्णनावरून विकीवरून इमेजेस शोधल्या, त्याला दाखवल्या. हेच होतं म्हणाला तो. त्या झाडाचं नाव होतं मामिया अमेरिकाना. केवढा भव्य वृक्ष होता तो...
मी विचार केला- बघू तर रुजवायचा प्रयत्न करून... ते सुकलेलं फळ सोललं. उंडळीच्या बीजासारखीच रचना वाटली. थोडीशीच चीर पाडली आणि ऑफिसमधल्या टेबलवर एक अँथुरियम होतं. त्याच मातीत कडेला खुपसून टाकली ती बी. आशा ठेवलीच नव्हती. आणि महिनाभराने अचानक लक्षात आलं अँथुरियमच्या पानगर्दीतून एक ठसठशीत चार इंची कोंभ खाडकन् उभा राहिलेला दिसत होता. कुंडीसकट ते घरी नेलं. मोठ्या कुंडीत सावलीत लावलं. त्याचा वाढण्याचा झपाटा एवढा जबरदस्त आहे की लवकरच खूप मोठ्या कुंडीत त्याला ठेवावं लागलं. उंडळीच्या पानांसारखीच पानं आहेत थेट. गेल्याच आठवड्यात त्याची पाठवणी मित्रांच्या शेतात केली आहे. कसली खूष होऊन फुटलीय ती बी या मातीत. माझं लाडकं दत्तक पोर असणार आहे ते.
सीतेच्या अशोकाची बी मात्र काही त्रास न देता रुजते हं. बोरीवलीला डोम पाल्म फुलला होता- आमच्या वृक्षराजी मुंबईची पुस्तकासाठी त्याचा फोटो घ्यायला आम्ही गेलो होते. तेव्हा त्या शाळेच्या आवारात सीतेचा अशोक पाहिला. त्याच्या बुंध्यातळी भरपूर बिया पडलेल्या दिसल्या. त्यातलीच एक उचलली आणि जराशी सॅंडपेपरवर घासून रुजत घातलेली. आणि ती किती आनंदाने जगायला लागली आणि माझ्या जगण्याच्या आनंदात भरही घालू लागली.
मग गेल्या वर्षी वाटलं, सागरगोट्यांच्या काटेरी झाळीचं किती छान कुंपण होईल. मग डॉ. लट्टूंना विचारलं पार्ल्यात कुठे सागरगोटे मिळतात का पहा हो. त्यांनी मिळवलेच. चाळीस सागरगोटे. भिजवले, चिरावले. भिजवले...
काळपट पडला त्यांना राखी रंग... आणि साल मऊ झाली. पंचवीस सागरगोटे चांगले मऊ झालेले, उरलेले पंधरा ढिम्म भिजले नाहीत. मग या पंचवीस मऊ मनाच्या सागरगोट्यांना एकत्रच दोन कुंड्यांतून विभागून घातलं. आता छानपैकी वीस सागरगोट्यांचे वेल जीव धरून एकमेकांच्या साथीने वाढू लागलेत.
गंमतीच्या कथा आहेत सगळ्या बियांच्या...
आता माझ्याकडे डिलेनिया इंडिका किंवा कमरकच्या, एन्टाडा स्कॅन्डेन्स म्हणजे गारबीच्या अशा बिया जगायचं की नाही ते ठरवत पडल्या आहेत.
टु बी ऑर नॉट टु बी...
मला त्यांना कन्विन्स करायचंय- जगा गं बायांनो...

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

निराळंच काहीतरी असतं तुमचं! मस्त. मजा आली. फोटूपण द्या की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लिहिलंय . बी रुजून येताना बघायचा आनंद वेगळाच असतो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त वाटत असेल अशा बिया रुजून झाड झाल्यावर.

एक मात्र आवर्जून म्हणावंसं वाटतं की परदेशातून आणलेलं बीज इथे रुजवताना जरा सांभाळूनच.. तिथलं एखादं झाड इथेही अनपेक्षितपणे रुजून उगवेलही, पण एखादं फारच वेगात फोफावलं तर इथल्या काही उपयुक्त "भूमीपुत्र" झाडांची नीश काबीज करुन त्यांना कॉम्पिटिशनने नष्ट करुन स्वतः माजून रहायची सगळीक्डे. काही प्रमाणात कॉम्पिटिशन झाडांबाबत ठीक असावी पण बाहेरुन आलेलं एखादं बीज नवीन "लॅण्टाना" बनायला नको. त्याने गांजलेली जंगलं पूर्वी पाहिली आहेत.

इमिग्रेशनमधे म्हणूनच तर बिया किंवा अन्य वनस्पतीजन्य उत्पादनं डिक्लेअर करावी लागतात.

तुम्ही अर्थातच सर्व माहितीनिशीच असं रुजवत असाल म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही मी असं कधी करत नाही. फक्त हा महावृक्ष आहे आणि भरमसाठ माजणाऱ्या तण प्रकारातला तो नाही हे लक्षात आलेलं. तो जगेल असं वाटलंच नव्हतं. कचऱ्यात टाकण्याऐवजी कुंडीत खुपसली बी एवढंच. तुम्ही म्हणताय ती तण प्रकारातली झाडे नव्हेच झुडपे, गवते ही आयात धान्ये किंवा जहाजे किंवा प्रवासी बीजांमार्फत सर्वदूर पसरली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युकॅलिप्टस हे मोठ्या वृक्षाचं उदाहरण. भराभर बायोमास देणारं झाड म्हणून पूर्वी आणून आणून प्रयत्नपूर्वक जगभरात रुजवलं गेलं. आता तसा लाकडासाठी वगैरे उपयोग आहे, पण नवीन परिसराच्या मूळ बायोडायव्हर्सिटीला धक्का, प्राण्यांना सुटेबल नसणं, इतर स्पेसीजच्या मानाने अतिरिक्त पाणीशोषण असे अनेक दुर्गुण नंतर लक्षात येत गेले.

अर्थात केवळ झुडुपं हाच प्रॉब्लेम ठरेल असं नव्हे इतक्यापुरताच हा मुद्दा. फुलस्टॉप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धरित्रीच्या कुशीमंदी बीयबियाणं निजली
वर पसरली माती जशी शाल पांघुरली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिला गच्चीत एका कुंडीत ठेवून आले. जग गं बाई, मी आहे ना तुला... माती म्हणाली. काढ गं वर डोकं, मी आहे ना तुला- वरची झुळूक म्हणाली... आकाशात पसरलेल्या हलक्याशा उन्हाने हुंकार भरला असावा.

खुप छान लिहीलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||

छान छान गोडुलं लिहिलं आहे. मध्येच किंचित दवणीय होते पण ते चालायचंच Wink

एक सुचना: लेख दिसायलाही छान दिसेल असं जरा बघा. नव्या परिच्छेदांमध्ये एक ओळ, अगदी अपवाद वगळता एकोळी परिच्छेद न पाडणे इत्यादी. (जमलंच तर चित्रही आवडतील). सद्य स्वरूपातील लेख वाचायला जरा कष्टच पडताहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयला, एकच माऱा पर सॉल्लिड मारा.
दवणीय!!
पुन्यांदा असं हू देनार न्हाई सरकार.

ते चित्रबित्र घालायचं तेवढंसं जमत नाही. 'ढ'वणीय.
परिच्छेदांचं लक्षात ठेवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
चित्रे चढवण्यात शंका असतील तर हा धागा बघा: इथे फोटो कसे चढवावेत?
आणि फोटो ऐसीवर चढवायच्या व्यापाचा कंटाळा असेल तर फ्लिकर वा तत्सम साईटवर चढवा आणि आम्हाला (व्यनी किंवा प्रतिसादात) दुवे द्या, आम्ही ते लेखात जोडून देऊ

मात्र फोटो काढायचाच कंटाळा असेल तर नाईलाज आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडलं.

विशेषतः, सध्या हे काम अगदी छोट्या प्रमाणात करत्ये म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला आणि बिया रूजवण्याचा उपक्रम तर अगदी आवडीचा ! माझ्याकडे सागरगोटे आहेत ते नक्की रूजवण्याचा प्रयत्न करणार. मऊ मनाचा एक तरी निघावा !
अजून बियांच्या कथांच्या प्रतिक्षेत आहे ! नक्की लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिया-झाडांबद्दलचं ममत्व वाचायला गोड वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक सागरगोटा मातीत आणि एक पाण्यात असे टाकले होते. पाण्यात होता त्याच्यातले बदल दिसत गेले आणि जेव्हा कोंब आला तेव्हा मातीत घातला. आधीच मातीत होता तो सुद्धा रूजला आणि पाण्यातल्याच्या पुढेच आहे त्याची वाढ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजवर बियांपासून फक्त भाज्या लावल्या आहेत. वृक्ष नाही.
तुमच्या पेशन्सला प्रणिपात.
तुम्ही एक महिनाभर माझ्याकडे रहायला या हो. तुम्हाला हव्या त्या/तितक्या बिया आणून देईन. जमीन मोकळी आहे, लावा हवी तितकी झाडं!
(वाटल्यास डील स्वीट्नर म्हणून सोड्याची खिचडी आणि वालांचं बिरडंही देईन!!)
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखन फारच आवडलं. खूप आतून आलेले आहे. छंद व्यवस्थित जोपासला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे हा तर खुपच जिव्हाळ्याचा विषय आहे. छानच लिहिले आहे. माझ्या बागेत कांचनाचे झाड आहे, आणि त्याच्या इतक्या शेंगा, बिया होतात, आणि पटकन रुजतात. मी गेली ३-४ वर्षापासून त्या सर्व गोळा करतोय, एके वर्षी कोल्हापुर जवळ पावनखिंड पाहायला गेलो होतो, तेथे मी आमच्या बरोबर असलेल्या मुलांना, मोठ्यांना त्या दिल्या आणि सांगितले की भिरकवा जंगलात. त्या त्यांनी मोठ्या आनंदाने टाकल्या. ती सर्व नक्कीच रुजली असतील. अजून २-३ छोट्या पिशव्या भरून माझ्याकडे आहेत. ह्या पावसाळ्यात सह्याद्रीत ट्रेकिंगला जाईन तेव्हा भिरकावेन परत. तीच गोष्ट पारिजातकाच्या झाडाची. त्या काही केल्या रुजत नाहीत. का कोणास ठाऊक.
मध्ये प्रसिद्ध पर्यावरण संशोधक श्री द महाजन यांनी बिया गोळा करण्याचे आणि रुजवण्याचे आवाहन केले होतो. जंगलांचा ऱ्हास कमी होण्यास आपला थोडाफार हातभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

हे आठवलं
-------------------------------------
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटचं कडवं तर जबरदस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0