स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची कला

स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याच्या कलेत तुम्हांला पारंगत व्हायचे आहे का?
लिहा अथवा भेटा, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र.
स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिली तीन दशके महाराष्ट्रात विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या तोलामोलाचा असा नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही काँग्रेस मजबूतरीत्या टिकून होती, आणि संयुक्त महाराष्ट्राचा 'कलश' काँग्रेसी यशवंतरावांच्या हस्तेच आणला गेला.
१९७७ सालच्या जनता पक्षाच्या प्रयोगाला महाराष्ट्रात राज्यपातळीवर २८८ पैकी ९९ इतकेच समर्थन मिळाले. अखेर शरद पवारांनी १९७८ साली काँग्रेसमधून ऐवज गोळा करून त्याला जनता पक्षाचे ठिगळ लावून पुलोद प्रयत्न केला. तो दोन वर्षे टिकला आणि १९८० साली काँग्रेस परत ठामपणे परतली. शरद पवारांनी सहा वर्षे वाट पाहिली आणि मुकाट 'राष्ट्रीय प्रवाहात सामील' झाले. विरोधी पक्षांना १९८० साली ७८ (त्यात शरद काँग्रेसचे ४७) आणि १९८५ साली ३६ इतक्या जागा होत्या.
विरोधी पक्षांना १९९० साली २८८ पैकी ९२ जागा मिळाल्या. आणि १९९५ साली १३८. उरलेला टेकू लावायला 'अपक्ष' तयार होतेच. अशा रीतीने शिवसेना-भाजप सरकार आले. आणि साडेचार वर्षांच्या कारकीर्दीत बहुत प्रताप करून आपले संख्याबळ १९९९ साली १२५वर आणले. शरद पवार आणि काँग्रेस वेगवेगळे लढून १३३ ला पोहोचले आणि सरकार स्थापन करते झाले. २००४ साली काँग्रेस युती १४० तर सेना-भाजप ११६. आणि २००९ साली काँग्रेस युती १४४ तर सेना-भाजप ९१.
२०१४ साली सगळ्यांना चक्रावून टाकणारे आकडे आले. चौरंगी लढतीत भाजप १२२, सेना ६३, काँग्रेस ४२ आणि शरद पवार ४१. सत्तेच्या एवढे जवळ एकहाती पोहोचल्यामुळे भाजपला काय करावे ते सुचेना. शरद पवारांनी 'राज्याच्या राजकीय स्थैर्यासाठी' सगळे निकाल जाहीर होण्याआधीच तत्परतेने भाजपला पाठिंबा जाहीर केला. तो घेतला की नाही याबद्दल मुग्धता पाळून भाजपने सरकार स्थापले आणि शिवसेना 'विरोधी पक्षात' असताना विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करून घेऊन मग शिवसेनेला सरकारमध्ये प्रवेश दिला.
आता या पार्श्वभूमीवर सध्याची स्थिती पाहू. स्वतःच्या पायावर लखलखत्या पात्याची कुऱ्हाड मारून घेण्याच्या स्तुत्य उपक्रमाला राज्य भाजपने धूमधडाक्यात सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत. मधून अधून जागे होऊन मुख्यमंत्री आपल्या 'सहकाऱ्यांची' पाठराखण करतात वा 'भारतमाता की जय' म्हणतात आणि परत डोळे मिटतात.
मा. पंकजा मुंडे यांच्याकडे पाहू. गोपीनाथ मुंड्यांची कन्या एवढी(च) ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंड्यांच्या अपघाती निधनानंतर एकदम प्रसिद्धीचे झगमगते वलय लाभले. त्यामुळे २०१४ च्या निकालांनंतर ज्या मंडळींना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली त्यात या आघाडीवर होत्या. त्या दिवास्वप्नांतून त्या अजून जाग्या झालेल्या दिसत नाहीत. 'चिक्की' प्रकरणातून मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवले, पण त्यामुळे गप्प बसायला पंकजाताई अजाबात तयार नाहीत. 'सेल्फी हा मानसिक आजार आहे' हे सिद्ध करण्यासाठी पंकजा मुंडे सध्या सक्रिय आहेत. आणि भीषण दुष्काळाला तोंड देणाऱ्या मराठवाड्यात "पाण्याचा भसाभस वापर करणारे दारूचे कारखाने बंद करू नयेत, त्यामुळे लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल. दारूचे कारखाने बंद केल्यामुळे काय दुष्काळ हटणार आहे का?" असे मौलिक आणि चिंतनीय विचार मांडत त्या हिंडत आहेत.
मा. एकनाथ खडसे यांचे अजून वेगळेच. सहा वेळेला आमदार आणि गेल्या विधानसभेत विरोधी पक्षनेता एवढ्या बळावर 'मुख्यमंत्रीपदाचा पहिला मानकरी कोण' या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना माहीत असायलाच हवे असा यांचा तोरा होता. 'पक्षश्रेष्ठी' नामक निर्गुण निराकार शक्तीने कुणा तिसऱ्यालाच तिथे बसवले. स्वतःच्या जिल्ह्याबाहेर फारसे दृष्यमान नसलेले व्यक्तिमत्व आणि जिल्ह्याच्या राजकारणात 'कुटुंब कुटुंब' खेळण्याची दांडगी हौस त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड आली. पण त्याने हार जातील तर ते नाथाभाऊ कसले? मराठवाड्याच्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने हिंडताना १०,००० लिटर पाणी हेलिपॅडवर शिंपडावे लागले तर "ते पाणी पिण्यायोग्य नव्हतेच" आणि "मंत्र्यांनी हेलिकॉप्टरनेच हिंडले पाहिजे, रस्त्याने प्रवास केला तर खूप वेळ वाया जातो. मुख्यमंत्र्यांनी लातूरचा दौरा गाडीने केला आणि अख्खा दिवस वाया घालवला" अशी विचारमौक्तिके उधळण्यात नाथाभाऊ सध्या मग्न आहेत. अशा प्रकारची 'टगेगिरी' करणाऱ्या नेत्याच्या पक्षाची गेल्या निवडणुकीत काय विधुळवाट लागली याकडे लक्ष द्यायला ते अजिबात तयार नाहीत.
मा. गिरीश बापट. सलग पाच वेळा आमदार. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे (हो हो, तेच ते अविनाश भोसले नामक महान उद्योगपतीला पुढे आणणारे महामंडळ) संचालक. आणि आता अन्न, नागरी पुरवठा, औषधे, ग्राहकहित आणि संसदीय कामकाज मंत्री. यातल्या ग्राहकांच्या तोंडाला त्यांनी डाळ प्रकरणात पार फेस आणला होता. मुख्यमंत्र्यांनी गप्प राहून पाठराखण केली म्हणून सुटले. आपण कसे अजून 'शौकीन' आहोत हे भाषणातून सिद्ध करून दाखवण्याचा उद्योगही त्यांनी केला. असे 'शौकीन' असणे बहुधा आपल्या उच्च, उज्वल इ इ परंपरेत नीट बसते, त्यामुळे संघासकट सारे गप्प गप्प. आता पुण्याचे पाणी दौंडला नेण्यासाठी त्यांची अनाकलनीय खटपट चालू आहे. दौंडच्या साठवण तलावाची क्षमता ४५ कोटी लिटर. मागणी आहे ५०० कोटी लिटर आणि हे पाणी कालव्यानेच देण्याची. यात काही गौडबंगाल असल्याचे गिरीशपंतांना तरी वाटत नाही. तसे खोपोलीतल्या डाळीच्या कारखान्यावर बंदीची कारवाई केल्यावर 'खाजगी' भेट (मंत्री म्हणून मिळणारी सुरक्षाव्यवस्था बाजूला ठेवून) देतानाही त्यांना काही वाटले नव्हतेच.
मुख्य पात्रे येऊन गेल्यावर कॉमिक रिलीफ हवा. त्याचीही जय्यत तयारी आहे. मा. मकरंद देशपांडे हे भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य. सांगलीहून लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवावे असे देशपांडे यांना वाटले आणि ते अंमलातही आले. लातूरच का? सांगलीच्या पूर्वभागातील जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ हे तालुके कित्येक दशके दुष्काळग्रस्त आहेत. तिथे का नाही? लातूरची पाण्याची गरज दिवसाला किमान पाच कोटी लिटर्सची. रेल्वे दहा तासांच्या प्रवासानंतर पोहोचवणार जास्तीत जास्त पन्नास लाख लिटर पाणी. सरकारी यंत्रणा राबराब राबली आणि देशपांडेबुवा धन्य झाले. खुद्द सांगलीत तीन दिवस पाणी नव्हते ते सोडा.
शिवसेना सत्ताधाऱ्यांचा सहकारी. त्यामुळे या स्वनाशी खेळात त्यांचा सहभाग हवाच.
मा. उद्धव ठाकरे स्वतःच्याच सरकारला शेलल्या शिव्या घालत राज्यभर (देशभर नव्हे; राज्याबाहेर त्यांना कुणी विचारत नाही) हिंडत आहेत. जर सरकार नाकर्ते आहे तर शिवसेनेचे मंत्री अशा सरकारमध्ये काय करताहेत हा प्रश्न त्यांना पडत नाही. तसा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती तुटल्यानंतरही केंद्रातले मंत्रीपद सोडण्याचे धाडस त्यांच्याकडून झाले नव्हते. ते मंत्रीपद (अवजड उद्योग) म्हणजे तशी ओसाडगावची जहागीरच. त्या तुलनेत खायची प्यायची सोय असलेली राज्यातली मंत्रीपदे कोण सोडणार?
हे सर्व चालू असताना महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या दुष्काळाकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाहीच, पण अगदी पक्षीय दृष्टीकोनातून पाहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निकालांमध्ये भाजप चौथ्या स्थानावर आहे याचेही कुणाला सोयरसुतक नाही.
म्हणून म्हणतो, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याच्या कलेत पारंगत व्हायचे असेल तर तातडीने भाजप कार्यालय गाठा.
आणि जातच असलात तर "१९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास" असे ओरडून या. न जाणो, एखादा जागा असला तर लक्ष देईलही. नाहीतर मा. मोदींनी महाराष्ट्र राज्याच्या सरकारस्थापनेचा पोस्ट-डेटेड चेक काँग्रेस नि राष्ट्रवादीला देऊन टाकायला हरकत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला.
महाराष्ट्रात आप या पक्षाला काही वाव मिळण्याची नजिकच्या भविष्यात शक्यता आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुख्य पात्रे येऊन गेल्यावर कॉमिक रिलीफ हवा. त्याचीही जय्यत तयारी आहे. मा. मकरंद देशपांडे हे भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य. सांगलीहून लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवावे असे देशपांडे यांना वाटले आणि ते अंमलातही आले. लातूरच का? सांगलीच्या पूर्वभागातील जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ हे तालुके कित्येक दशके दुष्काळग्रस्त आहेत. तिथे का नाही? लातूरची पाण्याची गरज दिवसाला किमान पाच कोटी लिटर्सची. रेल्वे दहा तासांच्या प्रवासानंतर पोहोचवणार जास्तीत जास्त पन्नास लाख लिटर पाणी. सरकारी यंत्रणा राबराब राबली आणि देशपांडेबुवा धन्य झाले. खुद्द सांगलीत तीन दिवस पाणी नव्हते ते सोडा.

मिरजेतही रेल्वे कॉलनीला त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण त्या पाणी प्रकरणाने "जनतेसाठी कायपण" याची पब्लिसिटी चांगली झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राजकीय परिस्थितीचा आढावा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खर्र! या मुद्द्यांवर लोकांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण ते आपले हेलिकॉप्टर खरेदी अन आदर्श बिल्डिंगीच्या बातम्यांमध्ये गुंग! १०००० लिटर पाणी वाया गेलं म्हणजे काय!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बरेच दिवसांनी राजकीय विश्लेषणात्मक लेखन ऐसीवर येतेय. Smile
अजून येऊ द्या. हा अगदी प्राथमिक आढावा झाला Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!