बचपन के दिन भुला न देना - उत्तरार्ध

मागील भागात प्राथमिक शाळेतील बालपणीच्या आठवणी झाल्या. आता त्यानंतरचा भाग

खेळत बागडत प्राथमिक शाळेची ४ वर्षे कशी गेली ते समजलेच नाही. आणि मग एक दुसरे पर्व म्हणजेच ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात माध्यमिक शाळेचे दिवस सुरु झाले. वस्तुत: आमच्या आधीच्या शाळेत ही ५ वी ते ७वी ची सोय होती पण मोठ्या शाळेचे आकर्षण म्हणुन मी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी आधीची शाळा सोडू नका म्हणुन तेथील शिक्षकांनी खूप विनवण्या केल्या. एक रोपटे एका ठिकाणाहून काढुन दुसऱ्या ठिकाणी पेरले तर ते जगेल कदाचित पण त्याची वाढ खुंटेल अशी अनेक उदाहरणे देऊन आम्हाला त्या शाळेत राहण्यास भाग पाडायचे प्रयत्न झाले. पण आम्ही शाळा बदलली.

नव्या शाळेत प्रथम जम बसणे अवघड गेले पण ते काही दिवसच. शाळेत अभ्यासाबरोबरच साप्ताहिक विज्ञान मंच वगैरे शालाबाह्य गोष्टींमुळे गोडी वाढत गेली. तसेच दरवर्षी २८ फेब्रुवारीला आम्ही विज्ञान दिन साजरा करीत असू. त्यावेळी विज्ञान कथा , प्रकल्प इत्यादी सुंदर कार्यक्रम असायचे. भालबा केळकर , जयंत नारळीकर इ
प्रभृतीम्ची व्याख्याने फार सुंदर असत यावेळी.

किती सुंदर मराठी कविता होत्या त्यावेळी! कविता शिकताना कवितेतील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत. तसेच त्यातील काही कविता रेडिओ वर गाणे म्हणुन ऐकताना आम्ही आनंदाने आणि अभिमानाने सांगत असू की हि आमची कविता! त्याकाळी रेडिओ वर गाणे ऐकणे म्हणजे एक अवीट समारोह ! रेडिओ वापरण्यावर चालू असलेला करमणूक कर नुकताच बंद झाला होता त्या दिवसात.

उदाहरणार्थ :

जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय - भा रा तांबे .

माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे - बालकवी .

रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी , ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली - भा रा तांबे

गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी - बा सी मर्ढेकर

याशिवाय इतिहास शिकवतानाही काही कवितांचा संदर्भ घेऊन शिकवले जाई

उदा : शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग -
“खबरदार जर टाच मारुनी जाल इथे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या “

किंवा महात्मा गाधींचा दांडी येथील मिठाचा सत्याग्रह सांगताना
“उचललेस तू मीठ मूठभर…. साम्राज्याचा खचला पाया “

या कविता आणि इतिहासातील असे प्रसंग शिकताना आम्ही मंत्रमुग्ध व्हायचो.

शाळेतले दिवस मजेत जात असतानाच उन्हाळ्याच्या सुट्टीत मिरजेतील वसंत व्याख्यानमाला म्हणजे जणू आम्हाला पर्वणीच . संध्याकाळच्या वेळी खरे मंदिर वाचनालयाच्या भव्य पटांगणात “काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी” यासारखी सुमधुर गीते ऐकल्यानंतर व्याख्यानाला सुरुवात होत असे.. या व्याख्यानमालेत आम्ही नरहर कुरुंदकर , नरेंद्र दाभोलकर , विद्याधर गोखले यांची अनेक व्याख्याने ऐकली . नरहर कुरुंदकर तर हे आपल्या कुटुंबाचेच कार्य समजून दरवर्षी व्याख्यान देत असत. याशिवाय व्याख्यानातील एक पुष्प नेहमी सिने नाट्य अभिनेत्याच्या मुलाखतीवर असायचे. निळू फुले, डॉ श्रीराम लागू, सचिन यांच्या मुलाखती तेव्हा आम्ही वसंत व्याख्यानमालेत ऐकल्या.

महाराष्ट्रात त्याकाळात फारच कमी लोकांना माहित असलेला हा ज्ञानयज्ञ मिरज विद्यार्थी संघाच्या अथक प्रयत्नातून आजही अव्याहतपणे आणि तोही अगदी मोफत चालू आहे.

याशिवाय तो काळ म्हणजे क्रिकेटचा सुवर्णकाळ होता. टेलिव्हिजन इंटरनेट यांचा सुकाळ नसतानाही क्रिकेट आवडीने खेळले आणि ऐकले जायचे. गल्लोगल्ली क्रिकेट सामन्यांचे स्कोर रेडिओवर ऐकून पुठ्ठ्याच्या तुकड्यावर लिहून जनतेला अपडेट्स कळवले जायचे. मला मात्र क्रिकेटची आवड निर्माण झाली ती ओस्ट्रेलियन ऑल राउंडर रिची बेनो यांची कॉमेंटरी ऐकून. तो अवलिया असे काही रसग्रहण करायचा की सारे चित्र डोळ्यासमोर हजर. रेडिओवर आम्ही भलतेच अवलंबुन कारण आमच्या गावात टीव्ही उशीरा आला तेव्हा सुरुवातीला आम्ही दुसर्याच्या घरात जाउन टीव्ही पाहायचो. लाकडी दरवाजा असलेला क्राउनच्या कृष्ण धवल टीव्हीवर चित्रहार , छायागीत पाहणे हे आमच्या करमणुकीचे प्रमुख मार्ग होते. प्रसंगी शेजारी वैतागून आम्हाला शिव्या देत पण आम्ही दुर्लक्ष करत असु.

याशिवाय टी वी वर क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण पहाणे आलेच. त्यावेळी कसोटी सामने एकुण सहा दिवसाचे असत . ५ दिवस आणि १ दिवस सुट्टी. सुनील गावस्कर आणि रवि शास्त्री बर्याच वेळा तीन तीन चार चार दिवस खेळून प्रेक्षकांना कंटाळवायचे. मी मात्र कपिल देव चा जबरदस्त पंखा होतो आणि आहे. खेळाडू कोणतेहि असोत पण क्रिकेटचे आजच्यासारखे बाजारीकरण नव्हते त्यामुळे क्रिकेट पाहण्याचे सर्वांना व्यसन होते.

क्रिकेटमध्ये खूप खिलाडूवृत्ती होती. एक उदाहरण द्यायचे झाल्यास वेस्ट इंडीज च्या कर्टेनी वॉल्शने बर्याच वेळा नोन स्ट्राइकर एंड ला क्रीज च्या बाहेर जाणार्या फलंदाजाला रन आउट होशील म्हणून आत उभारण्यास सांगणे.

परंतु त्याच वेस्ट इंडीज मध्यॆ विवियन रिचर्ड्स मात्र अम्पायर वर ओरडून अपील करून खेळाडू आउट नसताना दबाव आणायचा. आणि पंच घाबरून आउट दयायचेही

मात्र कोणीही खेळाडू असोत देशासाठी खेळत. फ़िक्सिंग ची कीड लागली नव्हती . नंतर एकदा जेव्हा कपिलदेव वर एका मुलाखतीत असले घाणेरडे आरोप झाल्यावर धाय मोकलून रडला होता तेव्हा आम्ही सर्व अतिशय हळवे झालो होतो.

शाळेत घोळक्यात आम्ही बऱ्याच शिक्षकांची जाहीर चेष्टा करत असू. अर्थात खडूस असणारे शिक्षक !

एक उदाहरण म्हणजे आमचे असे एक शिक्षक मैदानात भाषण करत असताना :

प्रिय विद्यार्थी मित्र हो ---- कोरस मध्ये आम्ही …… हम्म
आज आपल्या शाळेचा २०वा वर्धापन दिन - परत कोरस मध्ये आम्ही ……. हम्म
तेव्हा आज एक कार्यक्रम आहे. --- परत हम्म !
आजचे पाहुणे आहेत - हम्म !
वगैरे वगैरे ! टीम वर्क मस्त जमायचे!

हे हम्म संपायचे नाही आणि ते शिक्षक रडवेले होउन कंटाळून भाषण बंद करायचे.

आता मात्र हम्म हा शब्द मला लिहिलेला जरी दिसला की ते शिक्षक माझ्या अंगात संचारतात आणि माझे विद्यार्थी माझी खेचत असल्याचा मला भास होतो. इतका उध्धट वाटतो हम्म हा प्रकार!

आणखी एक धमाल किस्सा!

आमच्या गल्लीत काही सिनियर्स ना गणेशोत्सवात सर्वांना जमवून हस्ताक्षर स्पर्धा , धावणे वगैरे घ्यायची सवय होती. पण स्पर्धकांना एक अर्ज भरून प्रवेश फुकट होता आणि सर्वांसाठी प्रशस्तीपत्रे होती झाले मग! आम्ही त्यांची खेचायचे ठरवले. जवळ जवळ २० ते ३० काल्पनिक नावे देऊन आम्ही अर्ज दिले. जसे कृतेश साळवी, प्रद्युम्न देशपांडे, अभियोग शर्मा, क्रांती मुखर्जी याशिवाय काही निधर्मी नावे जसे पुंडलिक सय्यद , पिटर पेशवे , धवल टाटा वगैरे. रीतसर अर्ज दिल्यामुळे सिनियर्स ना स्पर्धेमध्ये अनेक जण आल्याचा आनंद झाला. स्पर्धे वेळी गडबड गोंधळ करून आम्ही काही काल्पनिक नावे असल्याचे सिनियर्स ना भासू दिले नाही तर काही काल्पनिक नावाच्या स्पर्धकांमार्फ़त वेश बदलुन आम्ही सहभागी झालो., आणि मग बक्षिस समारंभानंतर केवळ सहभागी स्पर्धकांची प्रशस्तीपत्र देण्यासाठी (काल्पनिक) नावे घेतली जाऊ लागली तर सर्व गैरहजर ! हा घोळ घालणारे आम्ही सर्व मागे बसून आमचे हसू कसे बसे लपवत होतो.

सिनियर्स चा चेहरा पाहण्यासारखा झाला! वीस मिनिटे प्रमुख पाहूणे प्रशस्ती पत्र घेउन उभे! तेव्हापासून कुठल्याही स्पर्धा प्रवेश मूल्य आकारूनच होत. चांगला धडा मिळाला संयोजकांना!

शाळेत जरी आम्ही थोडे वात्रट होतो तरी शाळेतल्या बऱ्याच गोष्टीनी आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यातीलच एक म्हणजे संस्क्रुत सुभाषिते शिकणे. काही अगदी सोपी सुभाषिते तर आजही अर्थासकट तोंडपाठ आहेत. दोन उदाहरणे देत आहे.

तैलात रक्षत जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात।
मूर्ख हस्ते न दातव्यं एवं वदती पुस्तकं ।।

भावार्थ:

पुस्तक विनंती करते , “कृपया माझे तेल , पाणी आणि सैल बांधणी पासून संरक्षण करा. आणि मला मूर्खांच्या हाती देउ नका.(मूर्खांना पुस्तकांची किंमत कधीच कळत नाही) ”

२.

पृथिव्यां त्रिणि रत्नांनी जलं अन्नं सुभाषितम ।
मुढे पाषाण खंडेषु रत्नसंज्ञा विधीयते ।।

भावार्थ:

पाणी , अन्न आणि सुविचार ही पृथ्वीवरील तीन रत्ने आहेत.
मूर्ख लोक मात्र दगडाच्या तुकड्यांना (सोने ,चांदी ) रत्ने म्हणवतात.

आज किती रेलिव्हंट आहे हे सुभाषित नाहीका?

तर असे दिवस मजेत होते. शाळेत आम्ही लाजरे बुजरेही होतो. मुलींशी बोलणे म्हणजे निर्लज्जपणा अशी विचित्र समजूत होती. जे लोक असे करत त्यांना आम्ही चिडवायचो. परंतु स्नेहसंमेलनात मात्र नटुन थटुन नाच करणाऱ्या वर्गभगिनी पाहिल्या की मात्र आम्हाला अप्सरांच्या राज्यात असल्या सारखे वाटायचे. स्नेह संमेलन संपताना आता परत हा कार्यक्रम होण्यासाठी एका वर्षाची वाट पाहावी लागणार हे मनात आल्यावर मन हळवे व्हायचे.

तसेच आमचे काही एथिक्स होते. कितीही वात्रट पणा केला तरी. पेपर लिहिताना कोपी तर सोडाच पण इकडे तिकडे पाहणे पण नाही अशी “टाचणी टाक आणि ऐक” शांतता ठेवायचो कारण रडीचा डाव आम्हाला पसंत नसायचा.

पहाता पाहात हे दिवस गेले आणि दहावीचे वर्ष आले व गेलेही आणि आम्ही शाळेला निरोप दिला. इथेही ११ वी १२ वी असतानाही आम्ही शाळा सोडून कोलेज ला गेलो. निरोप देताना मात्र शाळेतील सर्व शिक्षक , ते पटांगण , तळघर इत्यादी सजीव निर्जीव वस्तू आठवून आम्ही रडवेले झालो होतो.

आज नोकरीच्या धबडग्यात गेले पंचवीस वर्षे शाळेत गेलो नाही पण लवकरच जाण्याचा विचार आहे शाळा पाहायला. सर्व नवीन असेल पण आम्ही अभिमानाने तेथील आताच्या शिक्षकांना सांगु… ही आमची शाळा!

तसेच वसंत व्याख्यानमालेतील एक व्याख्यान ऐकायचे आहे. पाहुया कसे जमते ते!

अशा काही आठवणी . आठवले तसे लिहिले.

हे बालपण अगदी तुमच्या आमच्या सारखेच होते आमचे.

लेख वाचल्याबद्दल शतश: धन्यवाद!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

स्मरणरंजन आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बालपणीचा काळ सुखाचा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

सर्वांना धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओम शान्ति ओम