आमची बटाट्याची चाळ

पु ल देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक हे मुंबईतील चाळीमधील लोकांचे वर्णन करणारे पुस्तक प्रसिद्धच आहे. काल मी आईकडे गेलो असता, गप्पांच्या ओघात आम्ही लहानपणी राहत असलेल्या चाळीतील लोकांचा विषय निघाला, आणि मला त्या पुस्तकाची आठवण झाली. आमच्या चाळीच्या दिवसाबद्दल बऱ्याच आठवणी निघाल्या. संध्याकाळी घरी परत आल्यावर माझ्या लहानपणाच्या, चाळीतील दिवसांबद्दल, तेथील आठवणीबद्दल लिहावे असे ठरवले. पूर्वी मी माझे आजोळ असलेल्या निंबाळच्या आठवणी लिहिल्या होत्या.

तर ही गोष्ट ३५-४० वर्षापूर्वीची. मी साधारण चौथी मध्ये असताना आम्ही चिंचवड स्टेशन जवळील चाळीमध्ये राहायला आलो. आमची चाळ, आणि आमच्या समोर दुसरी, आणि डावीकडे आणखीन एक चाळ, अशा तीन चाळींचा समूह होता. समोरच्या चाळी मंगलोरी कौलांची छप्पर असलेली होती, तर आमची चाळ ही asbestos पत्र्यांचे छप्पर असलेली होती. पावसाळ्यात पावसाचा ताशा वाजवल्यासारखा आवाज होत असे आणि छप्पर ठिकठिकाणी गळत असे. एकाबाजूला चिंचवड रेल्वे स्टेशन आणि रेल्वेची लाईन, दुसऱ्या बाजूला जवळून मुंबई-पुणे हमरस्ता. ही रेल्वे लाईन अर्धचंद्राकार होती, त्यामुळे मुंबईच्या दिशेने गाडी येताना ती ह्या वळणावर अतिशय रम्य दिसत असे. समोरच्या चाळीमागे एक नाला. त्याच्या एकाबाजूला एक दर्गा, आणि पलीकडे, नाल्यावरील पुलाखाली एक साधू आणि त्याचे शिष्यगण राहत असत. दर्गा आणि त्या साधूची जागा हे सर्व कायम गुढ वाटे आम्हाला, विशेषतः साधूची जागा. लपंडाव खेळत असता, बऱ्याचदा तेथे लपून बसले असता, तेथे असलेले वातावरण अजून लक्षात आहे. तो साधू आणि त्याचे लोक गांजाचा धूर सोडत बसलेले, दाढी आणि डोक्यावरच्या केसांच्या जटा वाढलेल्या, काळे कपडे, असे सगळे नजरेस पडे. उन्हाळ्यात त्या दर्ग्याचा उरूस असे जो दोन दिवस चाले. कव्वालीचा कार्यक्रम देखील होत असे. दर्ग्याच्या पलीकडे भंगार मालाची वखार होती. आणि जवळच कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या कागद/पुठ्ठा(hand made paper) तसेच बॉक्स फाईल बनवण्याचा कारखाना होता. जवळच मोकळे मैदान होते, तेथे आम्ही खेळत असू, आणि बऱ्याच वेळा त्या कारखान्यात कुतूहल म्हणून जात असू. आम्हा मुलांच्या कुतूहलाची दुसरी गोष्ट अशी होती, ती म्हणजे जवळच असलेले लष्कराच्या भंगारात गेलेल्या वस्तूंचे गोडाऊन होते जे बऱ्याच वेळेस बंदच असे.

पिंपरी-चिंचवड भाग १९६० पासून MIDC मुळे औद्योगिक भाग म्हणून उदयास आला, आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोकं येथे रोजगारासाठी येवू लागले. आमची चाळ देखील त्या दृष्टीने वेगळी नव्हती. कोकणातील गाड, घैसास, सावंत, भागवत, दांडेकर, मसुरकर, कुशे, कुळकर्णी यासारखे लोक, सोलापूरचे उत्तरकर, बंडगर, चाळीचे मालक असलेले गावडे, गराडे पुणे जिल्ह्यातीलच होते. कर्नाटकातील आम्ही, हेगडे असे होतो, आणि कर्नाटकातीलच उडुपीकडील शेट्टी, तसेच डिसोझा हे कुटुंबीय होते. भोसले, ठाकरे अशी मराठा कुटुंबे देखील होती. सांगली,साताऱ्याकडील मारवाडी जैन राठी कुटुंब होते. मुळचे आंध्रकडील असलेले लिंगाल असे सर्व अठरापगड जातीचे, धर्माचे लोक एकत्र चाळीत राहत असत. करंदीकर म्हणून मुळचे केडगाव येथील कुटुंब होते. गराडे कुटुंब, आमच्या चाळीच्या मालकाच्या घरोब्यातील होते, आणि त्यांचा बंगला होता, जो आम्हाला कायम आकर्षित करायचा. त्यांच्या कडे तुळशी-विवाह सोहळा जोरात होत असे, त्यांच्या मुलाचे आणि तुलसीचे लग्न बंगल्यात, पटांगणात होत असे, तेव्हा आम्हाला तेथे जायला मिळत असे, तसेच बऱ्याचदा, जेजूरीच्या मल्हारीचा, येळकोट येळकोट जय मल्हाराच्या गजरात तळी भरून सदानंदाचा येळकोट जेव्हा होत असे, तेव्हा आम्ही बंगल्यात भाकरी-भाजीचा भंडारा खायला जात असू. गणपतीच्या दिवसात घरोघरी गणपती बसत. दररोज संध्याकाळी प्रत्येकाकडे आरत्या म्हणायला आणि प्रसाद, खिरापत चापायला आम्ही मुले जात असू.

ह्या सर्व लोकांचे पोटापाण्याचे व्यवसाय काय होते हे देखील पाहणे मजेशीर वाटेल आता. बरेच जण आजूबाजू असलेल्या कंपन्यातून(टाटा, बजाज इत्यादी) काम करत, काही जण सरकारी नोकरीत असत, जे पुण्याकडे रेल्वेने जा येत. शेट्टी यांचे जवळच उपहारगृह होते. ते दररोज सकाळी तेथे जात असत, ते दृश्य अजून मनात आहे. त्यांची एकूण उंची साडेचार पाच फुट, अतिशय स्थूल प्रकृती, कानावर अतिशय दाट केस. चाळीच्या एका टोकाला ते राहत. तेथून ते चालत जवळच असलेल्या त्यांच्या उपहारगृहात ते जात असत, ते मजेशीर दृश्य असे. ते आणि जवळपास इतरत्र शेट्टी किवा तत्सम उडुपी भागातून आलेले बंट लोकं कोंबडे झुंजवण्याचे खेळ अधूनमधून खेळायचे, ते आम्ही पाहायला जात असून. लिंगाल यांच्याकडे काही रिक्षा होत्या, त्या त्यांनी चालवायला दिल्या होत्या. त्या रिक्षा श्रावणात हार वगैरे घालून ते सजवायचे आणि पूजा करत असत. राठी यांचा कपड्याचा व्यवसाय होता. करंदीकर आजोबा हे घड्याळ दुरुस्त करणारे घड्याळजी होते. आम्हाला ते एका डोळ्यावर दुर्बिण लावून घड्याळ दुरुस्त करत असताना पाहायची भारी हौस, आणि ते ती पुरी करायचे. त्यांचा एक मुलगा अरुण लष्करात होता. तो सुट्टीत येत असे, आणि आम्ही सर्व मुले त्याच्या भोवती बसून त्याच्याकडून लष्करातील गमती जमाती ऐकत बसत असू. सर्वांच्या त्यांच्या पार्श्वभूमीनुसार काही लकबी, स्वभाव-वैशिष्ठ्ये होती. कोकणातील, मालवणातील गाड आजोबा अगदी टाप-टीप असत. डोक्यावरील पांढऱ्या केसाप्रमाणे, त्यांचे कपडे म्हणजे धोतर आणि कुर्ता, कायम पांढरा-शुभ्र, आणि स्वच्छ असे. कोकणातून ते वाल, तेथील वैशिष्ट्यपूर्ण खराटे आणायचे. चाळीचे मालक गावडे हे पहिलवानकी करणारे कुस्तीगीर होते, कोल्हापुरात राहून तालीम घेवून आले होते. ते भाडे वसूल करायला येत असत तेव्हा त्यांचा आवाज, आणि त्यांची चाल, आम्हा मुलांना एकूणच व्यक्तिमत्व दरारा वाटणारे असे होते. उडुपी, मंगळूर भागातील डिसोझा कुटुंबीय आधुनिक जीवन शैली असलेले, आणि ख्रिश्चन कुटुंबात चालून जाणारा त्यांचा पाश्चात्य पद्धतीचा पेहराव असे. त्यांच्याकडेच आम्ही मुलांनी शोले सिनेमाचे संपूर्ण संवाद टेपरेकोर्डरवर ऐकल्याचे आठवते. त्यावेळी म्हणजे १९८२-८३ च्या सुमारास गोल्ड स्पॉट नावाचे शीतपेय प्रसिद्ध होते. आम्हा मुलांच्या दृष्टीने दुसरे एक कारण होते. त्याच्या बाटल्याच बुचाच्या आत काही चित्रे दडवलेली असत, ती गोळा करण्याचा छंद जडला होता. दुसरा असाच एक छंद होता, तो मोकळ्या काडेपेट्या जमा करण्याच्या. त्यासाठी आम्ही वेड्या सारखे काडेपेट्या शोधत शोधत रेल्वे रुळाच्या बाजूने वगैरे फिरत असू.

प्रत्येक भाडेकरूची २ खोल्यांची जागा, अशी १५-२० घरे एकमेकांना चिकटून बनलेली एक चाळ. समोर शहाबादी फरशी टाकलेले अंगण. समोरासमोर चाळी असल्यामुळे सगळा कारभार खुल्लम-खुल्ला असे. कोण नवीन पाहुणे आले, किंवा कोणाकडे काय शिजते आहे, हे सर्व सहज समजत असे, आणि सहज संवाद होत असे. घरघुती कार्यक्रमात देखील आमंत्रणाशिवाय सहभाग असे. राठीकुटुंबातील मारवाडी पद्धतीचे लग्न चाळीतच लागल्याचे आणि आम्ही त्यात बरीच धमाल केल्याचे स्मरते. क्रिकेट खेळणे, लपंडाव, गोट्या(दोन चाळीत असलेल्या बोळात), आट्यापाट्या, विटी-दांडू असे खेळ, एकमेकात मारा-माऱ्या, भांडणे असे सर्व काही असे. होळी, रंगपंचमी धूम-धडाक्यात साजरी होत असे. आम्हा मुलांची तर धमाल असे. दिवाळीत चाळीच्या एका बाजूस छोटासा किल्ला बनवून, शेवटी तो उडवून टाकण्यात मजा येत असे, आणि दिवाळीच्या वेळेस घरा-घरासमोर रांगोळ्या काढण्याची स्पर्धाच लागे. तसेच एकमेकाना फराळाची ताटे पोहचवली जात असे, आणि त्यावर नंतर चर्चा होत असे. गाड आजोबा रंगीत कागद आणि काड्या वापरून आकाश कंदील बनवत असत. आम्ही मुले किल्ला बनवत असू, आणि शेवटच्या दिवशी फटके लावून ते आम्ही उडवून लावत असू. कोजागिरी पोर्णिमा देखील रात्रीचे कार्यक्रम, जसे, विविध-गुणदर्शन, संगीत खुर्ची इ. ठेवून साजरी केली जात असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मुले जमून घरगुती सिनेमा दाखवण्याचे खेळ करत असू-त्या वेळेस सिनेमातील दृश्यांची फिल्म्स मिळत असत. अधूनमधून बायोस्कोपवाला येवून सिनेमातील फिरती दृश्ये दाखवत असे. घराजवळ वाचनालय होते, तेथे वेगवेगळी मासिके, पुस्तके आणून वाचत असू. त्या वाचनालयाच्या जवळच एक जुनी दगडी बांधकाम असलेली विहीर होती. त्यात कासवे असायची जी आम्ही अधून-मधून पाहायला जात असू. चाळीजवळच असलेल्या आंब्याच्या झाडावरून, तसेच शेंदळीच्या झाडावरून आंबे, शेंदुळ(raw dates) पाडून खाण्याचा कार्यक्रम होई.

तसेच घरोघरी पापड आणि इतर पदार्थ करून घराबाहेर वाळवण्यासाठी मांडले जाई-ते दृश्य अजून डोळ्यासमोर आहे. गणेशोत्सवाच्या वेळेस पलीकडील चाळीत मंडळाचा गणपती बसत असे. त्य वेळेस open air theater वर सिनेमा दाखवला जाई. मधोमध पांढरा पडदा, आणि दोन्ही बाजूला लोकं खाली जमिनीवर बसलेली. एका बाजूने सिनेमा सुलट, तर दुसऱ्या बाजूने उलट असा प्रकार होई. मुख्य रस्त्याच्या पलीकडे मोकळी जागा होती, तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दररोज कार्यक्रम होत असत, आणि आम्हा मुलांना गोळा करून खेळ, आणि इतर गोष्टी होत असत. १९८४ चा क्रिकेट विश्वचषकाचा शेवटला सामना(भारत आणि वेस्ट इंडीज) आम्ही रेडियोवर सर्वांनी मिळून चाळीत ऐकल्याचे आठवते आहे. रेडियो वरून अजून एक आठवले. त्यावेळेस कसे कोणास ठाऊक, आमच्याकडे महम्मद रफीच्या हिंदी गाण्यांचे बोल असलेले एक छोटेसे पुस्तक होते(pocket book). शेजारी जेव्हा रेडियोवर गाणी लागत, तेव्हा ते पुस्तक घेवून रफीचे गाणे आले की त्याच्या बरोबर गाण्याचा उद्योग सुरु होई! त्यावेळेस कोणाकडे अजून टीव्ही आलेला नव्हता. जवळच हमरस्त्यावर एक जयश्री नावाचे चित्रपटगृह होते(आणि आश्चर्याची गोष्ट की, अजून देखील तसेच ते आहे), तेथे आम्ही अधून मधून जायचो. अफ्रिकन सफारी नावाचा इंग्रजी सिनेमा पाहिला होता. धर्मेंद्रचा कर्तव्य नावाचा जंगल, वाघ अशा गोष्टी असलेला सिनेमा पहिला होता, तो इंटरनेटवर आता का कोणास ठाऊक मिळत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे जेव्हा लोक गावी जात, तेव्हा मुलांना त्यांच्या घरी रात्री झोपायला म्हणून सांगून जात.

दहावीचा अभ्यासासाठी जैनाबादकर नावाचे निपुत्रिक कुटुंब होते. त्यांच्या घरातून दररोज तरुण भारत आणून त्यातील ‘दहावीचा अभ्यास’ हे सदर वर्षभर वाचून केला. त्यांच्याकडे cyclostyle machine होते जे त्यांच्या कॉलेजच्या कामाकरिता ते वापरत असावेत, आणि ते पाहताना, त्या रॉकेलचा वास, आणि त्याचा एक टिपिकल आवाज, आणि कागदाच्या प्रती बाहेर येणे, हा सर्व प्रकार मजेशीर वाटे(त्यावेळेस xerox photo copier नव्हते). त्याच सुमारास तरुण भारत मधे येणाऱ्या व्यंगचित्रं पाहून त्यांची नक्कल करण्याचा छंद लागला होता. दुर्दैवाने त्यातील काहीच माझ्याकडे राहिली नाहीत. दूरदर्शनवरील गजरा, चिमणराव गुंड्याभाऊ इत्यादी कार्यक्रम त्यांच्याकडे आम्ही पहायचो. एक-दोनदा चाळीतील सर्व जण मिळून ट्रीपला गेल्याचेही आठवते. मला वाटते पुण्याजवळील बनेश्वर येथे आम्ही सर्व गेलो होतो हे नक्कीच स्मरते आहे.

तर असे हे आमच्या बटाटाच्या चाळीतील दिवस. वेगवेगळ्या स्वभावाचे, कमी-जास्त आर्थिक परिस्थिती असलेल्या, पांढरपेशा कुटुंबाचे, तसेच, आम्हा मुलांचे, एकत्र राहण्याचे, एकमेकांच्या सोबतीने राहणाचे, शिकणाचे, खेळण्याचे, ते दिवस. हळूहळू काळ बदलू लागला, चाळी पाडून अपार्टमेंटस बांधली जावू लागली. आमच्या चाळीचेही तेच झाले. आणि सर्व कुटुंबे हळूहळू पांगू लागली, आणि काही वर्षातच आमची बटाट्याची चाळ नामशेष झाली. तसेच बरीच मंडळी देखील काळाच्या पडद्याआड गेली आहेत. जे अजून आहेत, ते अधून मधून भेटत असतात, आणि त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

(माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

field_vote: 
0
No votes yet