त्या दोघींचा आत्मसन्मानाचा लढा!

मुखपृष्ठाविषयी.

त्या दोघींचा आत्मसन्मानाचा लढा!

- मुकुंद कुळे

mukta shabda

मुद्दुपलनी आणि नागरत्नम्मा - दोघींच्यात जवळजवळ शंभर-दीडशे वर्षांचं अंतर होतं; पण दोघीही आपल्या आत्मसन्मानासाठी लढल्या. देवदासी असलेल्या मुद्दुने अठराव्या शतकात 'राधिकासांत्वनमु' हे तेलगु शृंगारकाव्य लिहिलं; पण स्त्रीने सांगितलेला शृंगार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र मुद्दुनंतर शंभर वर्षांनी जन्माला आलेल्या नागरत्नम्माने मुद्दुपलनी आणि तिच्या काव्याला न्याय मिळवून देण्यासाठी झगडा केला, त्याची कथा :

'जेव्हा तुझा नवरा तुला धरेल,
तेव्हा तुझ्या छातीने त्याला हलकेच ढकल.
जर त्याने तुझ्या गालाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला,
तर त्याच्या ओठांवर हळुवारपणे तुझे ओठ टेकव.
जेव्हा तो तुझ्यावर स्वार होईल, तेव्हा तू खालून त्याला हलकेच साथ दे.
प्रणय करताना जर तो थकला, तर प्रणयाची सूत्रं तू हाती घे.
लगेच तू त्याच्यावर स्वार हो.
तो एक चांगला रसिक आणि समर्पित होणारा प्रेमी आहे,
त्याच्याशी कुशलतेने प्रणय कर आणि त्यालाही करायला दे…'
असं म्हणत राधेने ईलाला कृष्णाकडे ढकललं. नंतर कृष्णाजवळ जाऊन ती मंद स्वरात त्याला म्हणाली -
'तिची छाती अगदीच कोवळी आहे, माझ्यासारखी भरलेली नाही
तेव्हा जोराने दाबू नकोस.
तिचे ओठ एखाद्या मृदू पर्णासारखे आहेत, माझ्यासारखे कडक नाहीत
तेव्हा त्यांचा जोराने चावा घेऊ नकोस.
माझ्या मांड्या तुझ्याशी कुस्ती खेळायला आता सरावल्यात,
पण तिच्या मांड्या अजून केळीसारख्या कोवळ्या गाभ्यासारख्या आहेत.
ती माझ्यासारखी घट्टमुट्ट नाही, तिचं शरीर अगदी नाजूक आहे.
ती तुझ्या बरोबरीची नाही, प्रणयक्रीडेत अजून नवीन आहे.
तिच्याशी कसं वागायचं, हे मी तुला सांगायला हवं का?
मला माहीत आहे, प्रत्येक स्त्रीसाठी तू नेहमीच चांगला प्रियकर राहिला आहेस.
तेव्हा तिच्या ओठांवर तुझ्या जिभेचं टोक फिरव, ते पिळू नकोस.
तिच्या गालांचा हलकेच मुका घे, ते ओरबाडू नकोस.
तिच्या स्तनाग्रांवर हळुवार बोट फिरव, ती चुरडू नकोस.
अगदी हळुवारपणे प्रणय कर, धसमुसळेपणाने नको...'

कुठल्याही शृंगारकाव्यात खपून जातील अशाच या काव्यपंक्ती आहेत. प्रणयक्रीडेतील भावना जरा अधिकच मोकळेपणी मांडल्यात, पण कुणाही स्त्री-पुरुषांच्या त्या सवयीच्या आहेत. फक्त खाजगी शृंगारिक भाव थोडा थेट, आक्रमकपणे आणि उघडपणे मांडलाय एवढंच! परंतु भारतीय महाकाव्यांमध्ये अशा वर्णनांची कमतरता नाही, किंबहुना अभिजात वाङ्मयात शृंगाररसाला कायमच वरचं स्थान मिळालेलं आहे. शेवटी शृंगार ही सर्वाधिक महत्त्वाची नैसर्गिक भावना आहे. तसंच काव्यनिर्मिती करण्यात पुरुषवर्गच आघाडीवर असल्यामुळे त्यानं हातचं न राखता स्त्री-पुरुष संबंधांचं रसभरित वर्णन आपल्या काव्यातून केलं आहे. त्यातही स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचं, ओठांपासून मांड्यांपर्यंत आणि स्तनांपासून नितंबांपर्यंत. मग तो कालिदास असो किंवा भर्तृहरी किंवा मोरोपंत-रघुनाथपंडित. अर्थात वाचकांनीही ती काव्यं मग्न होऊन वाचलेली आहेत. वाचकही अर्थात पुरुषच... पूर्वीच्या काळी! तेव्हा वरील शृंगारिक काव्यपंक्तीही त्यांनी चवीनेच वाचल्या असतील, यात शंका नाही. चवीचवीनेच ते वर्णन वाचलं असेल आणि वाचताना कृष्णाच्या, राधा व ईला यांच्याबरोबरच्या कामलीलाही नजरेसमोर आणल्या असतील!

अन् तरीही वरील काव्य वाचल्यावर १८व्या शतकात तत्कालीन समाजातील संस्कृतिरक्षकांनी हैराण होऊन 'अब्रह्मण्यम्, शांतं पापं' अशी बोंब ठोकलीच! 'हे काय लिहून ठेवलंय?' अशी एकच हाकाटी केली. कारण 'राधिकासांत्वनमु' नावाचं हे शृंगारकाव्य कुण्या पुरुषाने लिहिलेलं नव्हतं. ते लिहिलं होतं, एका स्त्रीने - मुद्दुपलनीने. तंजावरचे इतिहासप्रसिद्ध, कलारसिक राजे प्रतापसिंह (राज्यकाळ – १७३९-१७६३) यांच्या दरबारातील देवदासी आणि त्यांची भोगदासीही असलेली - मुद्दुपलनी!

मुद्दुपलनी (१७३९ – १७९०) बोलून-चालून एक स्त्री. एका स्त्रीने शृंगारकाव्य लिहावं, त्यातही ते थेट उघडं-वाघडं लिहावं; आणि एवढंच नाही, तर स्त्रीने कामक्रीडेत कसा पुढाकार घ्यावा, हेही तिने सांगावं - हा त्यांच्या मते घोर अपराधच! कारण स्त्री कशी शालीन हवी, पडदानशीन हवी. कितीही उत्तेजित झाली, तरी तिने आपल्या कामभावना दडपूनच टाकल्या पाहिजेत. त्यांत तिने पुरुषाला वरचढ तर ठरताच कामा नये.

पण पुरुषसत्ताक पद्धतीने लादलेला हा सामाजिक विधिनिषेध मुद्दुपलनीने मुळीच मानला नाही. परंपरेने सांगितलेली राधा-कृष्णाची गोष्ट न सांगता तिने नवीच गोष्ट सांगितली रचून. राधेला कृष्णाची ज्येष्ठ पत्नी दाखवून, तिने ईला नावाचं एक नवीन पात्र त्याच्या आयुष्यात आणलं. ही ईला, राधा-कृष्णाच्या परिचयातलीच. राधा-कृष्णाचा कामलीलांनी युक्त संसार सुरू असताना, ईला लहानगी होती. तीही सतत त्यांच्याबरोबरच असायची. अंगणापासून शयनगृहापर्यंत. तिच्या वाढत्या वयातल्या भावना राधेने त्या काळात समजून घेतल्या आणि त्या भावनांना पोषक खतपाणीही घातलं. परंतु तेव्हा राधेला कुठे ठाऊक होतं, की ही ईलाच येईल आपल्या आणि कृष्णाच्या मध्ये? पण ती आलीच त्या दोघांच्यामध्ये. तेव्हा, अतिशय सुकुमार असलेल्या आणि कामलीलांपासून अनभिज्ञ असलेल्या ईलेला, त्याबाबतीत तयार करण्याची जबाबदारीही राधेवरच पडली. राधेनेही ती कौशल्याने पार पाडली.

ही राधा म्हणजे मुद्दुच तर होती. प्रतापसिंहाकडून दुखावली गेलेली. तिचं प्रतापसिंहावर आणि प्रतापसिंहाचं तिच्यावर नितांत प्रेम होतं. तत्कालीन प्रसिद्ध देवदासी आणि वीणावादक असलेल्या तंजनायकीची नात असलेली मुद्दु, वादन-नर्तन आणि लेखनातही हुशार होती. संस्कृत, तमिळ आणि तेलगु या तीनही भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. एवढंच नाही, तिने जयदेवाच्या 'गीतगोविंदम्' या काव्याचा तेलगुत अनुवाद केला होता. तसंच प्रसिद्ध तमिळ स्त्रीसंत आंदाळ यांच्या 'तिरुप्पवई' या रचनाही तिने लोकांसमोर आणल्या. त्या आणताना तिने 'सप्तपदम्' - म्हणजे सात ओळींच्या रचना - केल्या, ज्या लोकप्रिय झाल्या. मुद्दुच्या या कलानिपुणतेची ख्याती प्रतापसिंहांच्या कानावर गेली. स्वतः प्रतापसिंह मराठी, तमिळ, तेलगु आणि संस्कृत भाषेचे जाणकार होते. त्यांनी स्वतः 'कृष्णमंजिरी', 'उमासंहिता', 'पारिजात' यांसारखी मराठी नाटकं लिहिली होती. खरंतर ते ज्या काळात तंजावरच्या गादीवर आले, तो काळ अतिशय धामधुमीचा होता. तंजावरात भोसल्यांची सत्ता स्थिर होऊन काळ उलटून गेला होता. तंजावरवर कब्जा मिळवण्यासाठी अर्काटच्या नवाबाबरोबरच फ्रेंच आणि इंग्रजही टपून बसले होते. या साऱ्यांशी सावधपणे सामना करत, प्रतापसिंहांनी आपलं राज्य टिकवून ठेवलं. सततची युद्धं, दंगली आणि कारस्थानांच्या मालिकांमध्येही त्यांनी 'कलांचे चाहते' ही तंजावरच्या राजांची ख्याती टिकवून ठेवली. त्यामुळेच अंदाधुंदीच्या वातावरणातही त्यांनी विविध कलांना कायम प्रोत्साहनच दिलं. साहजिकच देवदासी असलेल्या मुद्दुपलनीची लोकप्रियता कानावर पडताच, त्यांनी तिला राजदरबारात नर्तन-गायन करण्यासाठी आमंत्रित केलं आणि पहिल्याच फटक्यात त्यांचा तिच्यावर जीव जडला. देवदासी असलेली मुद्दुपलनी लगेच प्रतापसिंहांची भोगदासी झाली.

राजाश्रय मिळाल्यावर मुद्दुपलनीला आर्थिक स्थैर्य लाभलंच, त्याशिवाय तिला आपल्या कलागुणांचाही अधिक विकास करता आला. परंतु कालांतराने प्रतापसिंहांचं मुद्दुकडे काहीसं दुर्लक्ष होऊ लागलं. राजा असल्यामुळे त्यांना स्त्रियांची तशी कमी नव्हतीच. परंतु त्या सगळ्यांपेक्षा मुद्दुपलनी वेगळी होती. ती निव्वळ देखणी किंवा कुशल नर्तिका नव्हती. ती विद्वान होती आणि तिला आपल्या विद्वत्तेचा सार्थ अभिमानही होता. त्यामुळेच प्रतापसिंहाने केलेला अव्हेर तिच्या जिव्हारी लागला आणि आपण स्वतः, प्रतापसिंह व त्याच्या आयुष्यात आलेलं आणखी कुणी असा कल्पनाबंध रचून, त्यावर तिने 'राधिकासांत्वनमु' हे ४ भागांचं आणि ५८४ पदं असलेलं प्रतीकात्मक तेलगु शृंगारकाव्य लिहिलं. वाचणाऱ्यांना ती खरोखरच राधा, कृष्ण आणि ईलेची गोष्ट वाटली. पण जे मुद्दु आणि प्रतापसिंहाना ओळखत होते, त्यांना मात्र खरं काय ते ठाऊक होतं. महत्त्वाचं म्हणजे 'राधिकासांत्वनमु'चा शेवट सुखान्त होता. कृष्ण पुन्हा राधेकडे परततो आणि तिची माफी मागतो; म्हणजेच तिचं सांत्वन करतो, असं त्यात दाखवण्यात आलं आहे. मुद्दुच्या आयुष्यातील प्रत्यक्षातल्या प्रेमत्रिकोणाचा शेवट काय झाला, ते मात्र ठाऊक नाही.

मुद्दुपलनी स्वतःच्या क्षमतेचा आणि ज्ञानाचा आवाका नीट ठाऊक असलेली स्त्री होती. तसंच लैंगिक भावना फक्त पुरुषालाच असतात असं नाही, तर स्त्रीलाही असतात; फक्त तिला त्या दाबून ठेवाव्या लागतात, हे ती चांगलंच जाणून होती. म्हणूनच तिने एक प्रकारे 'राधिकासांत्वनमु' या काव्याच्या आधारे स्त्रीच्या लैंगिक भावनांना उघड आवाज दिला. स्त्रीलाही लैंगिक भावना असतात, हे तिने दणक्यात सांगितलं. मुख्य म्हणजे हे करताना, आपण काय करतोय याचं तिला नेमकं भान होतं. आपण तंजावरच्या राजदरबारातल्या कुठल्याही विद्वानापेक्षा कमी नाही, याची तिला जाण होती. आणि ती स्वतःला त्यांच्या बरोबरीचीच मानायची. तिच्या या निर्भय? आणि ठाम भूमिकेमुळे, तसंच ती राजाची भोगपत्नी असल्यामुळे, तिच्या हयातीत कुणी थेट या काव्याच्या विरोधात बोललं नाही. किंबहुना वरवर तिचं कौतुकही केलं. परंतु या काव्याचा फार गाजावाजा होणार नाही, याची मात्र पक्की तजवीज करण्यात आली. इतकी, की लवकरच हे काव्य काळाच्या उदरात गडप झालं. त्याचं अस्तित्वच पुसून टाकण्यात आलं. कारण ते एका स्त्रीने लिहिलं होतं. मात्र मुद्दुच्याच काळात लिहिल्या गेलेल्या 'रघुनाथनायकभ्युदयामु' (रघुनाथाच्या आयुष्यातील एक दिवस) या काव्यात राजा आणि चित्रलेखा या वारांगनेचा रंगवण्यात आलेला प्रणय सहज स्वीकारला गेला. एवढंच नाही, तर त्याचं कौतुकही झालं. कारण तो शृंगार एका पुरुषाने रंगवलेला होता.

मुद्दुपलनीचं 'राधिकासांत्वनमु' काव्य तिच्या हयातीतच नजरअंदाज व्हायला लागलं होतं. हा पुरुषसत्ताक समाज आपलं काव्य सहजासहजी स्वीकारणार नाही, हे खरंतर मुद्दुपलनीलाही ठाऊक होतंच. म्हणून तिने आपल्या काव्यात काही गमतीजमतीही केल्या होत्या. काही ठिकाणी तिने थेट चित्रण करण्याऐवजी व्यासाचा मुलगा महर्षी शुक आणि विद्वान राजा जनक यांच्या संवादरूपात काही कविता सादर केल्या. जेणेकरून कुणीही आपल्या काव्यावर अश्लीलतेचा आरोप करू नये. यावरून मुद्दुपलनी तत्कालीन समाजाला आणि धार्मिक-सांस्कृतिक सत्ता ज्यांच्या हाती होती, त्यांना व्यवस्थित ओळखून होती, हे सिद्ध होतं. म्हणजे लेखक म्हणून असलेला आत्मसन्मान जपण्याचा तिने हिरिरीने प्रयत्न केला. दुर्दैवाने तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. तिच्या हयातीतच तिचं काव्य विस्मृतीत जाऊ लागलं. तिच्या पश्चात तर कुणी त्याची आठवण काढण्याचं काहीच कारण नव्हतं. तंजावरच्या राजदरबारात एवढं मानाचं स्थान लाभलेली विद्वान व्यक्ती; पण तिला परंपरेनं हरवलं. सनातनी वृत्तीच्या समाजाने तिचा काव्यग्रंथ स्वीकारला नाही. जणू लेखक म्हणून तिची कर्तबगारीच मिटवण्यात आली, नाकारण्यात आली.पण काळ सूड उगवतो.


The Pulpit Rock
मुद्दुपलनीच्या 'राधिकासांत्वनमु'ला न्याय देण्यासाठी झगडणारी नागरत्नम्मा

तब्बल शंभर-दीडशे वर्षांनी नागरत्नम्मा जन्माला (१८७८-१९५२) आली. मुद्दुपलनीचीच विद्वत्ता, रूप आणि तेज घेऊन. योगायोग म्हणजे नागरत्नम्माही देवदासीच होती. तिची आई पुट्टुलक्ष्मी प्रसिद्ध देवदासी-गणिका होती. नागरत्मम्माचे जन्मदाते असलेल्या वकील सुब्बाराव यांनी तिच्या जन्मानंतर लगेचच पुट्टुलक्ष्मीला सोडून दिलं. त्यानंतर पुट्टुलक्ष्मी म्हैसूर संस्थानच्या दरबारातील संस्कृतविद्वान असलेल्या शास्त्रींच्या आश्रयाला गेली. त्यांनी काही वर्षं पुट्टुलक्ष्मी आणि छोट्या नागरत्नम्माला आश्रय दिला. या काळात त्यांनी नागरत्नम्माला संस्कृत आणि संगीताचे धडे दिले. परंतु नागरत्नम्मा पाच-सात वर्षांची असतानाच त्यांनी नागरत्नम्माला देवदासी म्हणून सोडलं आणि तिच्या आईलादेखील. पुट्टुलक्ष्मी यामुळे प्रचंड संतापली. आपल्याला सन्मान मिळाल्याशिवाय पुन्हा म्हैसुरात पाय ठेवायचा नाही, असा निश्चय करून ती नागरत्नम्माला घेऊन बेंगळुरूचे एक परिचित वेंकटस्वामी अप्पा यांच्याकडे गेली. वेंकटस्वामी विद्वान आणि व्हायोलिनवादक होते. त्यांच्या आश्रयाखाली नागरत्नम्माने इंग्रजी, कन्नड आणि तेलगु भाषांचे धडे गिरवलेच; सोबत व्हायोलिनवादन आणि नृत्यही शिकून घेतलं. या साऱ्यांत ती एवढी पारंगत झाली की अवघ्या पंधराव्या वर्षी तिने जाणकारांसमोर गायन-नर्तन करून त्यांना चकित केलं.

नागरत्नम्माच्या पहिल्याच सादरीकरणाचं खूप कौतुक झालं. ते ऐकून तिला थेट म्हैसूर संस्थानाचे अधिपती सर चामराजेंद्र ओडियार यांनी आमंत्रण दिलं. म्हैसूरमधील त्यांच्या प्रसिद्ध जगनमोहन पॅलेसमध्ये नागरत्नम्माच्या कलेचं सादरीकरण झाल्यावर मग आजूबाजूच्या त्रावणकोर, बोब्बली अशा विविध संस्थानांतून नागरत्नम्माला आमंत्रणं येऊ लागली. नागरत्नम्माची विद्वत्ता, सौंदर्य आणि कलानिपुणतेची सर्वत्र चर्चा होऊ लागली. ती चर्चा ऐकून उच्च न्यायालयातील न्यायाधीश नरहरी राव यांचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी तिला सन्मानाने बोलावलं. त्यांच्या आश्रयाला जाताच नागरत्नम्माला सामाजिक मान-प्रतिष्ठा सारं काही मिळालं. तत्कालीन घरंदाज लोकांमध्ये तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. एवढंच नाही, तर मैफलीतली कलाकार म्हणूनही नागरत्नम्मा ओळखली जाऊ लागली. त्यानंतर संपूर्ण दक्षिण भारतात तिला एवढा मानमरातब आणि पैसा मिळाला की आयकर भरणारी पहिली महिला म्हणून नागरत्नम्मा ओळखली जाते. आपल्या या कलेबरोबरच नागरत्नम्मा ओळखली जाते, ती कर्नाटक संगीताला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या संगीतकार त्यागराज यांच्याप्रती असलेल्या समर्पणासाठीही. दरम्यान कला सादर करतानाच तिने स्वतःची प्रकाशनसंस्था सुरू केली आणि संस्कृत, कन्नड, तेलगु अशा विविध भाषांत भाषण देत ती फिरू लागली.

या भ्रमंतीदरम्यानच तंजावरमध्ये गेलेली असताना नागरत्नम्माला मराठा राजांवरील लेखात मुद्दुपलनी व तिच्या 'राधिकासांत्वनमु' या काव्याचा उल्लेख पहिल्यांदा आढळलाआणि नागरत्नम्माचं आयुष्यच बदलून गेलं. तिने मुद्दुपलनी आणि तिच्या राधिकासांत्वनमु ग्रंथाचा शोध सुरू केला. शंभरेक वर्षांपूर्वी एका स्त्रीने शृंगारिक काव्य लिहावं, याचंच तिला कौतुक वाटलं होतं. खूप शोधाशोध केल्यावर तिला या काव्याची एक प्रत सापडली. परंतु त्यातून अनेक गोष्टी गाळलेल्या असल्याचं तिच्या लक्षात आलं. पहिला तेलगु-इंग्रजी शब्दकोश तयार करणाऱ्या तेलगुपंडित चार्ल्स फिलिप ब्राऊन याने १८५५मध्ये इंग्लंडला परत जाताना आपल्याकडील पुस्तकांचा खजिना मद्रासच्या ओरिएन्टल ग्रंथालयाला दिला होता. त्या खजिन्यात मुद्दुपलनीच्या 'राधिकासांत्वनमु'चं हस्तलिखित होतं. या हस्तलिखितावरून पैदिपती व्यंकटनरसू यांनी आधी १८८७मध्ये आणि नंतर १९०७मध्ये 'राधिकासांत्वनमु' प्रकाशित केलं. मात्र ज्या कारणाने शंभर वर्षांपूर्वी या काव्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्याच कारणासाठी पैदिपती व्यंकटनरसू यांनीही या पुस्तकातील काही भाग गाळून टाकला. एक स्त्री आपल्या लैंगिकतेविषयी एवढं उघड-उघड कसं काय लिहू शकते, असाच त्यांचाही सवाल होता. परिणामी पैदिपती यांनी 'राधिकासांत्वनमु'मधील बराचसा शृंगारिक भाग गाळून टाकला. तसंच मुद्दुपलनीने आपल्या काव्यात स्वतःची, विद्वान देवदासींची जी उज्ज्वल परंपरा सांगितली होती; ती परंपरा सांगणारा भागही गाळून टाकला. नागरत्नम्माच्या हाती लागलेली प्रत ही पैदिपती व्यंकटनरसू यांनी संपादित केलेली होती.

नागरत्नम्माला हे संपादित पुस्तक मुळीच आवडलं नाही. यातला आत्माच पैदिपती व्यंकटनरसू यांनी काढून घेतलाय, असं तिला वाटलं. कारण तिला मुद्दुपलनीच्या काव्यातली गेयता आणि तिचा थेटपणा आवडला होता. त्यामुळे मुद्दुचं काव्य स्वतःच पुन्हा नव्याने छापण्याचा तिने निर्धार केला. त्यासाठी तिने मूळ हस्तलिखित पोथीही मिळवली आणि 'राधिकासांत्वनमु' नव्याने छापलं. नागरत्नम्माने संपादित केलेली 'राधिकासांत्वनमु'ची ही आवृत्ती प्रसिद्ध तेलगुपंडित आणि सरस्वती मुद्रालयाचे मालक वाविल्ला रामास्वामी शास्त्रुलु यांनी १९०९मध्ये छापली होती. या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत नागरत्नम्माने लिहिलं होतं – 'मुद्दुपलनीचं हे काव्य वाचण्याचा मला वारंवार मोह होतो. यात विविध रसांचं जे वर्णन करण्यात आलं आहे, ते फक्त मुद्दुपलनीच करू शकते; कारण ती देवदासी परंपरेतली होती. केवळ समृद्ध अनुभवामुळेच असं लेखन करता येऊ शकतं.'

अर्थात काळ बदलला तरी सनातनी वृत्ती तशीच होती. त्यामुळेच १८व्या शतकातील काव्य विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात छापलं गेलं, तेव्हाही त्याला नैतिकतेच्या तथाकथित ठेकेदारांच्या टीकेला सामोरं जावं लागलंच. या काव्यावर आणि नागरत्नम्मावर टीका करताना 'शशिलेखा' नावाच्या अनियतकालिकात लिहिण्यात आलं होतं – 'एका वेश्येने लिहिलेलं असं पुस्तक, दुसरी वेश्याच प्रकाशित करू शकते.' त्यानंतर काही संस्कृतिरक्षकांनी तक्रार केल्यामुळे प्रकाशकाच्या कार्यालयावर छापा टाकून 'राधिकासांत्वनमु'च्या प्रती तत्कालीन ब्रिटिश सरकारने जप्त केल्या. परिणामी १९११मध्ये कनिंगहॅमचे पोलिस आयुक्त व मुख्य न्यायाधीशांनी नागरत्नम्मा आणि तिच्या प्रकाशकांवर अश्लील साहित्य प्रकाशित केल्याचा ठपका ठेवला आणि या पुस्तकावर बंदी आणली. एवढंच नाही, तर पुस्तकाच्या प्रती मिळवून त्या नष्ट करण्यात आल्या.

एका स्त्रीने शृंगारिक काव्य लिहिलं, म्हणून पुन्हा एकदा मुद्दुपलनी आणि तिच्या काव्याला 'काळ'कोठडीत ढकलण्यात आलं.

या प्रकाराने नागरत्नम्मा व्यथित झाली, पण तिने हार कधीच मानली नाही. ज्यांनी ज्यांनी 'राधिकासांत्वनमु'वर अश्लीलतेचा आरोप केला, त्या सगळ्यांना तिने त्या-त्या वेळी ठामपणे उत्तर दिलं. तत्कालीन मद्रास राज्यातील महिलांच्या मोहिमेत कायम आघाडीवर असणारे कंडुकरी वीरसालिंगम यांनी आक्षेप घेतला होता – 'पुस्तकातील काही उल्लेख लज्जास्पद आणि स्त्रियांनी ऐकू नयेत, असे आहेत. केवळ वेश्यांनीच त्याचा उच्चार करावा.' यावर नागरत्त्नम्माने लगेच प्रत्युत्तर दिलं होतं - 'शिष्टाचार आणि अपमान या गोष्टी केवळ महिलांनाच लागू होतात का? लैंगिक सुखाविषयी बारीकसारीक उल्लेख करणे आणि कुठल्याही आडपडद्याशिवाय लिहिणे; हे ती केवळ वारांगना आहे म्हणून मान्य आहे, असं वीरसालिंगम यांना सुचवायचं आहे का? 'राधिकासांत्वनमु'मधील अश्लीलता तुम्ही स्वतः समीक्षा केलेल्या व प्रसिद्धी दिलेल्या 'वैजंयतिविलासम्'मधील अश्लीलतेपेक्षा वेगळी आहे का?'

जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा नागरत्नम्माने आक्षेपकर्त्यांना सणसणीत चपराक लगावलेली आहे. परंतु अठराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा काळच असा होता की, ब्रिटिश अमलाखाली 'व्हिक्टोरियन मोरॅलिटी'ची मुळं नवशिक्षित भारतीय समाजात रुजत होती. परिणामी आधी अठराव्या शतकातील सनातन्यांनी 'राधिकासांत्वनमु' नाकारलं आणि विसाव्या शतकात इंग्रजी शिकून नवशिक्षित झालेल्या समूहाने ते नाकारलं. इंग्रजी शिक्षणाने शहाणे झालेल्या तत्कालीन दक्षिणेतील ब्राह्मण समाजाने, व्हिक्टोरिया राणीवरील प्रेमामुळे मुद्दुपलनीचं लेखन कामुक असल्याचा अपप्रचार केला. तसंच देवदासी आणि त्यांच्या कला समाजव्यवस्था भ्रष्ट करत असल्याचाही आरोप केला. मुख्यतः नवशिक्षित समाजाच्या या भूमिकेमुळेच, तत्कालीन दंड संहितेच्या २९२ कलमांतर्गत 'राधिकासांत्वनमु'वर दुसऱ्यांदा बंदी आली.

'राधिकासांत्वनमु'वरची ही बंदी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होती. स्वातंत्र्यानंतर एक-दोन वर्षांनी मद्रासचे तत्कालीन मु्ख्यमंत्री व आंध्रकेसरी म्हणून प्रख्यात असलेले तंगुतरी प्रकाशम् यांनी ही बंदी उठवली. ही बंदी उठवताना ते म्हणाले – 'तेलगु साहित्याच्या संपन्न मालेतील काही मोती या निमित्ताने मी पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.'

उमेद असेपर्यंत नागरत्नम्माने 'राधिकासांत्वनमु'चा मुद्दा लावून धरला. मात्र त्या पुस्तकावरची बंदी उठली, तेव्हा नागरत्नम्मा थकलेली होती. योगायोग म्हणजे १९ मे १९५२ला नागरत्नम्माचं निधन झालं. त्याच वर्षी वाविल्ला रामास्वामी शास्त्रुलु यांनीच 'राधिकासांत्वनमु'च्या नागरत्नम्मा-संपादित दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. कारण मुद्दुपलनीची कला आणि तिचं साहित्य टिकवून ठेवण्यासाठी नागरत्नम्माने दिलेला लढा किंवा उपसलेले कष्ट, म्हणजे एक मोठं धाडसच होतं, हे त्यांना ठाऊक होतं.

स्त्रीलाही आपल्या लैंगिक भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, हे मुद्दुपलनीने १८व्या शतकात आपल्या कलाकृतीतून सांगितलं आणि आपल्या आत्मसन्मानासाठी ती सनातन्यांशी शेवटपर्यंत लढत राहिली. हाच आत्मसन्मानाचा लढा नागरत्नम्माने २० व्या शतकाच्या पूर्वार्धात नवशिक्षित समाजाविरुद्ध दिला. शेवटी मुद्दुपलनी काय किंवा नागरत्नम्मा काय; देवदासी असल्या तरी त्यांना जो आत्मसन्मानाचा झळाळता मार्ग दिसला, तो आमच्या सनातन्यांना, संस्कृतीच्या तथाकथित ठेकेदारांना कधीतरी दिसेल काय?

लेखकाच्या ब्लॉगवरील लेख
मुक्त शब्द २०१५ - दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

नवीनच काही कळले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही बायकांच्या ह्या कर्तबगारिचा मला खचितच अभिमान वाटू लागत आहे काश सगळ्या बायकात ही प्रवृत्ती असती आयुष्य अजुन सुखावह बनले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

उत्तम लेख. लैंगिकतेच्या अभिव्यक्तीबद्दल पुरुषांसाठी कमी नियम आणि स्त्रियांसाठी अत्यंत जाचक नियम हे जगातल्या बहुतांश संस्कृतींमध्ये अनादी काळपासून दिसून आलेलं आहे. याच्या जोडीला काय लिहिलं आहे यापेक्षा कोणी लिहिलं आहे हे महत्त्वाचं कसं ठरतं हे लेखात खूप छान पद्धतीने सांगितलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका प्रकारे विभावरी शिरुरकरांच्याच या दोघी पूर्वसूरी होत्या असं म्हणायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्यांव!

आणखी तपशीलवार लिहा की प्रतिसाद!

मूळ लेख फारच आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुन्दर लेख. नविन आणि रोचक माहिती कळली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख. आधी वाचला असल्याने हे माहितीये वाटून बाजूला ठेवणार होतो. पण अनेक तपशील डोक्यातून निघुन गेले होते ते गवसले. आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुन्दर लेख. नविन आणि रोचक माहिती कळली.>> +१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अत्यंत सुंदर शैलीत मांडलेला आहे, फार आवडला. ही नविनच माहीती या लेखाने मिळाली
मात्र मुद्दुपलनी ची जी तुम्ही लेखात माहीती दिलेली आहे त्यावरुन तिने दिलेल्या लढ्याला आत्मसम्मानाचा लढा म्हणणे फारसे पटले नाही. तुमच्या लेखातील माहीतीनुसार प्रतापसिहांच्या पुनःप्राप्तीसाठी तिने हा खटाटोप केलाय असे प्रथमदर्शनी तरी दिसते. त्याने अव्हेर केल्यावर ही संवेदनशील बुद्धीमान स्त्री दुखावली गेली त्यानंतर च्या दु:खावेगातुन हे काव्य स्फुरलेल दिसतय या काव्याची फॅन्टसी तिच्या दुखावलेल्या मनाला सांत्वना देत असावी. मात्र यात आत्मसम्मानाचा लढा कुठे आला ?
मुळात ती परंपरेने भोगदासी होती व त्याविरोधात काही बंड वगैरे हे नाही. प्रतापसिंहाशी संबंध मालक दासी चे आहेत.
त्यात प्रेम आदराचा व जेलसीचा ही काही प्रमाणात अंतर्भाव दिसल्याने ते कॉम्प्लेक्स रीलेशन वाटत.
मग हे तिच ग्रंथ लिहीणं " ना जाओ सय्या छुडाके बइय्या कसम तुम्हारी मै रो पडुंगी " च्या कुळातील वाटत.
आत्मसम्मानाचा लढा दुसरी नायिका जी आहे तिच्या बाबतीत मात्र जरुर जाणवत. तिथे अधिक चपखल आहे ही उपमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एक नंबर लेख. हा अतिशय महत्त्वाचा विदाबिंदू आज या लेखामुळे प्रथमच समजला त्याबद्दल लेखकाचे अनेक धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बोका-ए-आझम यांचा प्रतिसाद फारच आवडला. याहून समर्पक दाद देणं शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन