डावलच्या स्वप्नांत पतंगी!

संकल्पनाविषयक

डावलच्या स्वप्नांत पतंगी!

लेखक - पंकज भोसले

अलीकडे माझ्या स्वप्नांमध्ये पतंगींची स्वप्नं जास्त असतात. त्यात नवं काही दिसण्याऐवजी हमखास एकोणीसशे आकड्यापुढे असलेल्या शेवटच्या दशकातली वर्षं असतात. म्हणजे मंगलदास मॅन्शनच्या चौथ्या माळ्यावर असलेल्या गच्चीवर, पतंगीची झीरो-झीरो कणी बांधून बॅलन्स साधणारा मी. माझ्यासोबत माझी फिरकी पकडणारा लाल्या हुबेहूब त्या स्वप्नांत असतात. त्या गच्चीवरून त्यावेळचं शहरही तंतोतंत तसंच दिसतं. म्हणजे तेव्हा शहरात टॉवरच काय, सहा माळ्याच्यादेखील इमारती नसल्यामुळे शहरातून तीन बाजूंचे डोंगर लख्ख दिसायचे. मॅन्शनशेजारच्या गणेश बागेतल्या नारळाच्या झाडांवर शहरामधल्या घारी वास्तव्य करून असायच्या. केवळ त्यांच्यामुळे सूर्यास्तानंतरच्या संधीप्रकाशात पतंगी उडवणं कठीण व्हायचं. त्यांची घरी परतण्याची आणि आमच्या पतंगी काटाकाटीच्या उन्मादाची वेळ ठरलेली होती. त्यात आकाशात घोळका करून येणाऱ्या घारींचे पाय मांजात किंवा पंखांवर हमखास अडकत आणि कित्येकदा घारीच आमच्या पतंगी गुल करून टाकत. डोंगरी मांजा, बारीक गुलाबी, वांगी कलर आणि कुर्ल्यावरून खास आणलेल्या तारमांजाची छडी फुकट जायची. तरी आमचं पतंगी उडवणं थांबलं नाही आणि जखमा करून घेऊनही पतंगींच्या मांजात अडकणं घारींनी सोडलं नाही.

ब्लू-बर्ड आणि व्हाईट-बर्ड या पाठीमागे किमान दोन किलोमीटरवर असलेल्या इमारतींतून शर्या आणि अनिल हे घशीटणारे किंग पतंगबाज अख्ख्या आळीचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. कुठून तरी कवटी मांजाची फिरकी आणून हे दोघे समोरच्या टप्प्यात येणाऱ्या सर्वांचे पेज कापायचे. एका पतंगीने किमान चाळीस-पन्नास पेज ते सहज घसटून टाकायचे आणि त्यांची पतंगी गुल झाली, तर पोरं पतंगीच्या मागे नाही, तर ती कट झाल्यावर खाली पडणारी त्याची छडी लुटण्यासाठी आकाशाकडे नजर लावून बसायची. पण हे फार कमी वेळाच व्हायचं. मी जेव्हा गुजरातमधून नातेवाईकांनी आणलेल्या वांगी कलर मांजाने शर्याची पतंगी कापली, तेव्हा दहा दिवसतरी विहिरीजवळच्या आमच्या नाक्यावर शर्याची पेज कापल्याचा विषय हिट होता. त्याचा पेज कापणं, म्हणजे स्थानिक गोल्ड मेडल मिळविण्यासारखंच होतं. एका घशीटण्याच्या पल्ल्यात, चार पतंगींना कापण्यात शर्याची हुकूमत दूरदूरपर्यंत पसरलेली होती. पुढच्या पोलीस लाईन, टेंभी नाका, जांभळी नाका, वर्तक आळी, चरई, लोकमान्य आळीइतक्या विभागातल्या पतंगी उडवणाऱ्या पोरांमध्ये शर्याच्या पेज कापण्याची दहशत होती. पतंगबाजी या खेळाला जर ऑलिम्पिकमध्ये स्थान असतं तर शर्या नॅशनल हिरो ठरला असता. पण तसंही आपल्याकडे कैक लोकल खेळांमधले चॅम्पियन्स तरुणपणीच संपून जातात. आपण त्या खेळात नॅशनल लेव्हलचे चॅम्पियन आहोत, हेसुद्धा त्यांच्या गावी नसतं आणि पुढे ते त्या खेळालाही विसरून जातात. असो. ‘जर... तर...’ या निव्वळ वाळूत मुतायच्या गोष्टी असतात; तिथे काही उगवत नाही, असं माझ्या एका मित्राने मला सांगितलं, तेच याबाबत खरं.

तिसरीत असताना मी पहिल्यांदा स्वतंत्रपणे पतंगी उडवायला शिकलो. शिप असलेल्या माचिसीला रुपयाचा बदामी किंवा गुलाबी मांजा बांधून, झिरमिळ्या शेपट्यांच्या पतंगी उडवून या खेळाचा श्रीगणेशा माझ्या वयाचं प्रत्येक पोर करायचं. खरंतर पतंगी उडवण्याहून अधिक मजा, ती उडताना आणि पेज लागताना पाहाताना यायची. गुल झालेल्या पतंगी आपल्याच हातात येण्याची जादू असावी, येवढीच तेव्हाची सुपरमॅन बनू इच्छिण्यामागची एकमेव प्रेरणा असायची. आळीतल्या प्रत्येकाचे स्पायडरमॅन, ही-मॅन हे हीरो होते तेव्हा. तर तिसरीत पतंगी उडवायला शिकलो, ते इतर मोठ्या पोरांचं पाहून. मोठा भाऊ वा चुलतभाऊही नसल्यामुळे मला फिरकी पकडत पकडत पतंगी उडवण्याची दीक्षा मिळाली नाही. सुरुवातीला टिचक्या जास्त मारायच्या नाहीत. हवेचा रोख पाहायचा. विरळ हवेत पतंगी उडवण्याचा प्रकार करू नये. पतंगी उडवताना हवा लागली की फक्त ढील देत राहायचं. या पतंगी उडवण्यातली मूलभूत संकल्पना प्रत्येक पतंगबाज निरीक्षणातून आत्मसात करू शकतो. तिसरीत पहिल्यांदा मी लाल-पिवळी दुरंगा पतंगी उडवली. तो क्षणही आठवतोय. हवा पुरेशी होती. मी टिचक्या मारण्याचे प्रकार करत होतो. ती नाकावर जोरात आपटायची. नंतर हळूहळू टिचक्या कमी मारत पतंगीला हलके वर सोडलं. त्यानंतर ती वर स्थिरावली. थोड्याच वेळात माझ्या हातात माचिसीला बांधलेलं मांजाचं दुसरं टोक होतं. तर त्या दिवसानंतर पतंगी उडवून देऊन माझ्या हातात द्यायला मला कुणी मोठी व्यक्ती लागली नाही. पुढच्याच आठवड्यात मी पहिल्यांदा लाकडी फिरकी घेतली. मग जशी शिक्षणातील यत्ता वाढू लागली, तशी पतंगबाजीही हरएक मौसमात वाढत गेली. आळीत जेमतेम पाच इमारती होत्या. बाकी सगळी कौलारू घरं होती आणि विजेच्या खांबांच्या तारा यत्र-तत्र-सर्वत्र दहा फूट उंचावर पसरलेल्या होत्या. खालून पतंगी नीट उडवू न शकणाऱ्या नवशिक्या लहान मुलांच्या पतंगी त्या तारांवर हमखास लटकलेल्या असायच्या. वर्षभर त्या पतंगींचे सांगाडे त्या तारांवर लटकताना दिसायचे. आळीतल्या दरएक झाडावर रंगीबेरंगी पतंगींचं प्रदर्शन आपोआप लागायचं. त्यात दररोज एक-दोन पतंगींची भर पडायची. ब्लू-बर्ड, व्हाईट-बर्ड या इमारती फार आधीच्या. त्यानंतर मंगलदास मॅन्शन झालेली. पण आम्ही पतंगी उडवायला रुळेस्तोवर या सगळ्या इमारतींच्या भिंतींना पोपडे आले होते. त्यांचा रंग कोणता, हे सांगता येणं कठीण होतं; त्या काळात आळीतली अर्धी पोरं मंगलदास मॅन्शनमधूनच पतंगी उडवायची.

आळीत प्रत्येक मोसमाचे खेळ होतेच. गोट्यांचा, भोवऱ्याचा, विटीदांडूचा, फुटबॉलचा, क्रिकेटचा तसाच पतंगींचा मोसम पावसाळ्यापासून डिसेंबरपर्यंत चालायचा. पावसाळ्यात जरा उघडीप झाली, की जमिनीवरची ओल सुकायची वाट न पाहाता पतंगी उडवायला घेतल्या जायच्या. भिजलेल्या पतंगींच्या गोंदाचा वास, पतंगी उडवल्या जाणाऱ्या सगळ्या मैदानात पसरायचा. रस्त्यांवरून, मैदानांतून, चाळींच्या खिडक्यांतून, गॅलऱ्यांतून, पत्र्यांवरून, कौलांवरून पतंगी बदवल्या जायच्या. सकाळी पाठीमागचा, दुपारी समोरचा वारा असायचा. त्यानुसार पतंगी उडताना दिसायच्या. एक-दुसऱ्यासारखे नसलेल्या माणसांप्रमाणे पतंगी आकाशात आपलं स्वतंत्र अस्तित्व घेऊन वावरताना दिसायच्या. अर्थात कणी बांधल्यानुसार पतंगी उडत असल्या, तरी मधल्या काडीनुसार त्यांचं गोल फिरणं, गोद मारणं, चक्री होणं, लप्पू किंवा मुक्की असणं ठरायचं.
नोकरी लागेस्तोवर पाऊसकाळ सोडला तर मी वर्षभर पतंगी उडवायचो. त्यासाठी मोठ्या, रंगीबेरंगी, स्थिर पतंगींचा (त्याला ढप, ढप्पा, कव्वा किंवा ढोम म्हणतात) पन्नासचा तरी गठ्ठा मी साठवून ठेवायचो. पूर्ण फिरकी बदवून झाली, की ती स्थिरमस्थार पतंगी पाहात संध्याकाळ पतंगीमय करण्याचा माझा उद्योग आठवड्यात कोणत्याही दिवशी चालायचा. ती उडवल्यानंतर आणि आकाशात तिला खूप वेळ पाहिल्यानंतर भिरभिरणारं मन नेहमीच शांत व्हायचं. पतंगीचा मोसम संपला तरी असा, स्थिर पतंगी नुसतीच एकट्याने उडवण्याचा माझा प्रकार नाक्यावरच्या अनेकांना विचित्र वाटायचा. पण नंतर नाक्यावरची पोरंदेखील आडमोसमात पतंगी उडवण्याच्या माझ्या या प्रकाराला सरावली. पतंगीच्या काळात पेज कापणारे शर्या आणि अनिल हे आळीतले आकाशाचे खरे राजे होते. बाकी साऱ्या महिन्यांत पतंगी उडवून मी त्यांची जागा घ्यायचो. आमचा भाग मध्यवर्ती असल्याने, माझीच एकटी पतंगी संपूर्ण, मुख्य शहरातल्या कोणत्याही भागातून दिसायची. मला एका वृत्तपत्रात कंत्राटावर प्रूफरिडरची नोकरी लागेपर्यंत हे कायम होतं. माझ्या मनावर पतंगी आणि नाक्यावरच्या गंमतीजमती कोरल्या गेल्या आहेत. कदाचित नाही तर खात्रीने त्यामुळेच, तेव्हाचं सारं स्वप्नांमध्ये परत परत येत असणार.

तर स्वप्नांत मी अनेकदा पतंगींचे ते दिवस पुन्हा जगतो. झीरो-झीरो कणी बांधून पतंगींचा बॅलन्स साधणारा मी, शर्या आणि अनिलसारखाच दंतकथा असल्यासारखा एकेकाची घशटून पेज कापतो. भरपूर बारीक छडी पुढे नेऊन साखळीछाप धागा हातावर आला की प्रतिस्पर्धी पतंगबाजाची घशीटतो. त्या स्वप्नांचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आकाश माझ्या लहानपणी होतं तसंच पतंगींनी गच्च भरलेलं असतं. अलीकडे एक विचित्र स्वप्नही पडलं होतं. त्या स्वप्नात तशाच शेकडो पतंगी गुल होऊन मंगलदास मॅन्शनच्या गच्चीवरून जात होत्या. मी त्यांची छडी कुठे दिसते का, ते शोधत होतो. एक भरदौर, बारीक मांजाची छडी माझ्या हाती आली. ती मी पकडली. भरपूर आनंदात ती खाली उतरवली. तर पतंगीच्या जागी मेलेला माणूस हाती आला. मी तेव्हा दचकूनच स्वप्नातून जागा झालो होतो.

आता मंगलदास मॅन्शन तोडून नऊ माळ्याचा टॉवर झाला. तोदेखील आळीतला सर्वांत लहान टॉवर आहे. लोढा हाईट्स, विकास आर्केड आणि रुनवाल होम्सच्या गर्दीत आळीतलंच नाही, तर शहरातलं आकाशही संपून गेलंय. दहा फुटांवर असणाऱ्या विजेच्या तारा आणि खांब केव्हाचे लुप्त झाले. जागोजागी केबलच्या मोठ्या वायर्सनी आकाश व्यापलंय. मोठ्या किंवा छोट्या सोसायट्यांच्या गच्च्यांना कुलपं लागलेत आणि आळीतल्या विहिरी बुजवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी नाक्यातल्या पोरांऐवजी टू व्हिलर्सची गर्दी झाली आहे. तिथे जवळच असलेल्या बाकड्यावर मी दर सुट्टीत बसून राहातो. पुन्हा नाक्यावरचा कल्ला पूर्वीसारखाच सुरू होईल, या आशेने. पण एकेकाळी नाक्यावरची शान असणारे कुणीच आता येत नाहीत. त्यांना फोन करून बोलावलं तर मलाच वेड्यात काढतात. ‘जग बदललं तरी डावलच्या स्वप्नांत अजून पतंगी आणि नाका शिल्लक’, असं माझ्या पाठीमागे बोलत माझीच खिल्ली उडवतात.

माझं नाव कलगोंडा डावल. सहावीमध्ये असल्यापासून शाळेत माझं नाव विचित्र उच्चारत आणि आडनाव उलटं वाचून सगळा वर्ग माझी खिल्ली उडवायचा. आठवी-नववीपर्यंत त्यात बदल झाला नव्हता. मग कुठल्यातरी पिक्चरमध्ये ‘कल्लू मामा’ नावाचं गाणं हिट झालं. तेव्हापासून मला कलगोंडाच्या जागी कल्लूमामा म्हणून हाक मारायला सुरुवात झाली. आळीतल्या नाक्यावरपण मला कल्लूच म्हणायचे तेव्हा. पिनाक, विन्या, नेमाडेकाका, रवळेकर, कौशिक खर्डे, सुदीप वैराळे अशी कितीतरी दादा मंडळी तेव्हा नाक्यावर जमत आणि तासन्‌तास कोणत्याही विषयावर भंकस करत. विहिरीच्या शेजारचा तो परिसर खूप छान होता. नववीमध्ये असल्यापासून मी त्यांच्यात जायला लागलो. त्यांच्या वयाच्या मानाने अगदी कच्चालिंबूच होतो. तिकडे जायला लागलो कारण त्यांच्यापैकी कुणीच आडनाव उलटं वाचून मला हिणवलं नाही. मला आजूबाजूला भेटत नसलेली सन्मानाची वागणूक नाक्यावर मिळाली. शाळेत वर्गातलं कुणीही माझी दुसऱ्या वर्गातल्या मुलाशी ओळख करून देताना ‘याचं नाव डावल. उलटं म्हणून बघ’, असं बोलून समोरच्याला माझ्यावर हसायची संधी द्यायचा. तो समोरचा त्याला त्यातला विनोद ज्या मात्रेने कळायचा तितका मला हसून घ्यायचा. नाक्यावर तसं कधीच झालं नाही. उलट नेमाडे काकांनी एक कथाच मला वाचायला दिली. त्यात नागडे, पादरे, लंगोटे आणि हागरे अशी आडनाव असलेल्या माणसांच्या दुःखांची गोष्ट होती. आता जगात असतात तशी आणि त्याहून भीषण आडनावं. आपल्या आडनावाला उलटं केल्यानंतर त्या कथेतल्या पात्रांइतकं काही आपलं आडनाव वाईट नाही. 'उलटं किंवा सुलटं वाचलं तरी ती पौरुषत्व प्रगट करणारी ती गोष्ट आहे, त्यावरून मनाला लावून घेऊ नको', अशी माझी समजूत त्यांनीच नाक्यावर बसून घातली होती. तेव्हापासून मला माझ्या आडनावाला कुणी माझ्यासमोरच उलटं वाचलं तरी लाज वाटत नाही. तरी अनेक गोष्टींपासून मला या नावामुळे वंचित व्हावं लागलं हे खरंच. नववी-दहावीत शाळेत माझ्याशी मुली बोलतच नसत. कारण माझ्याशी बोलल्यानंतर त्या मुलीला माझं आडनाव उलटं घेऊन चिडवलं जाण्याची दहशत असे. एका-दोघींना तसा अनुभव आल्यानंतर आपसूक मीच त्यांच्यापासून लांब राहू लागलो. कॉलेजमध्येही थोड्याफार प्रमाणात हाच अनुभव आला. आमच्या संपूर्ण घराण्यात एकही लव्ह-मॅरेज झालं नाही. लग्नांत अडचणीच चिकार येतात. किंवा याहून भीषण आडनावं असलेल्यांशीच सोयरीक होते. हे नसलं तर अ‍ॅरेंज मॅरेज होतात, तीदेखील कुठलं ना कुठलं व्यंग असलेल्या, किंवा काहीतरी ताप करून ठेवल्यामुळे बापाला लग्न करून देण्याची घाई असणाऱ्या मुलींसोबत. माझी शाळेत, कॉलेजात, क्लासमध्ये कोणतीही मैत्रीण नव्हती. पण नाक्यावरच्या गँगमुळे तशी गरज मला कधी वाटली नाही. नाक्यावर आम्ही जाम मजा करायचो. नेमाडेकाका अविरत गोष्टी आणि जोक्स सांगायचे कसले ना कसले. त्या जोक्समधल्या गोष्टी आठवून आम्ही दिवसा, रात्री कधीही हसत राहायचो. प्रत्येक सिनेमाच्या स्टोरीचं विडंबन करायचं हा नेमाडे काकांचा स्वभाव होता. आळीतल्या कोणत्या पोरीची व्हर्जिनिटी संपली, हे तिच्या बदललेल्या चालीवरून हुडकून सांगण्यात त्यांचा उत्साह दांडगा होता. नेमाडेकाका नाक्यावरून जाणाऱ्या थव्यांकडे पाहात, पोरांना ते अचूक कसं ओळखायचं याचे धडे द्यायचे. नाक्यावरच्या सुदीप वैराळेने आळीबाहेरच्या पोरी पटविण्याचा झपाटा लावला होता. आपल्या कोणत्या गर्लफ्रेंडला कोणत्या हॉटेलात नेलं, कोणत्या गर्लफ्रेंडला घामाच्या रोजच्या दर्पामुळे ‘काम’ न करताच सोडून दिलं आणि कोणती गर्लफ्रेंड ‘त्या’ अवस्थेत काय बोलते, याचे रसभरीत किस्से तो सांगत असे. त्या गोष्टींनी नाक्यावरच्या नेमाडेकाकांच्या किश्श्यांचा टीआरपी काही काळ कमी करून टाकला होता. वास्तविक सुदीप वैराळे प्रचंड सुंदर होता. त्याला सहज मुली पटत. पण तो सांगत असलेले किस्से मला कधीच खरे वाटले नाहीत. नेमाडे काकाही बरीच अतिशयोक्ती करत, आळीतल्या सगळ्या मुलींना ‘रांड’ संबोधत असत. त्यांनी एक नवाच 'सूक्ष्मलक्ष्यी सिद्धांत' शोधून काढला होता.

‘पोरींची डावी छाती जर मोठी असेल, तर त्यांचा बॉयफ्रेण्ड नॉर्मली उजवा असतो. पण त्यांची उजवी छाती डावीपेक्षा मोठी असेल, तर हमखास त्यांचा बॉयफ्रेण्ड लेफ्टी असणार.’ या सिद्धांतानंतर बरेच दिवस नाक्यावरच्या पोरांच्या नजरांमधील विचार विकारी न बनता फक्त तुलना करण्यामध्ये रंगले होते. याशिवाय आळीतल्या आणि आळीबाहेरच्या तरण्या पोरींची चाल, त्यांच्या नटण्या-मुरडण्याच्या आणि गावउंडगेपणाच्या चेष्टा ते भीषण टोकाच्या मतांनी करीत. संध्याकाळ ते रात्रीचा काळ त्यामुळे मस्त मजेत जाई. पुढचे काही दिवस त्यातला विनोद कधीही आठवला तरी हसवून सोडी.

खरं तर मुलींच्या शरीरविषयक पुरुषी कल्पनांच्या अतिरेकी शोधासाठी नेमाडेकाकांना नोबेल मिळायला हवं होतं. पण त्यांनी आपला शोधप्रबंध कधीच लिहीला नाही. परिणामी आधीच्या किश्श्यांवर भीषण कडी करत असूनही, आळीतल्या विहिरीजवळच्या नाक्यावरच त्यांचे सगळे किस्से तिथल्या उपस्थितांच्या मनामध्येच फक्त गोंदले गेले.

नाक्यावरच त्यांनी आमिर, शाहरुख आणि सलमान खानच्या हिंदी चित्रपटातील मूर्खपणावर बरीच व्याख्यानं दिली होती. त्यातलं एक म्हणजे तत्कालीन लग्नपटांचं बरेच दिवस सुरू ठेवलेलं विडंबन. ‘हम आपके है कौन’ या लोकप्रिय चित्रपटातलं गाणं पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्यांनी या नावापासून त्याची चिरफाड करून टाकली होती. हे खरं तर त्यांच्याच शब्दांत ऐकायला हवं.
‘सलमान इतका च्युत्या आहे की त्याला त्या ‘भोंग्या’वर बेचकीने फूल मारावंसं वाटतं. साधं चालताना पडद्यावर मला जे कळालं, ते या सलमानला का कळू नये? दोन्हीकडून फुगेच फुगे. तरी या नायिका ‘दाबली गेलीच नाही कधी’ अशा पद्धतीचे हिरोसमोर आणि जनतेसमोर नाटक करणार. भारतातल्या कोट्यवधी जनतेला ती व्हर्जिन असल्याचं च्युत्या बनवणार. कॉलेजमधली असून तिचे ‘हेहे एवढे आणि तेते तेवढे’ कसे हा प्रश्न कुणालाच पडत नाही. हे नायक पण भडवीचे ‘आम्ही हलवलं नाहीच कधी’ असे ठामपणाचा आव आणत चित्रपटभर नायिकांशी गुलूगुलू बोलणार. दिग्दर्शक लेकाचे हिरो-हिरोईनीला दाबण्याचा सीन देण्यात घाबरणार आणि बलात्काराच्या प्रयत्नांच्या सीनमध्ये तो हिरोईन वा हिरोच्या बहिणीवर होतोय की करणाऱ्यावर हा प्रश्न पाहणाऱ्यांना पडेल असं सोज्ज्वळ चित्रित करणार. साले हे आदर्शवाद चोदणार्रे हिंदी चित्रपट बघून पुढच्या पिढीची पोरं निखळ सेक्स करायचं विसरतील, अशी शंका येते.’

मला नववीच्या काळातच नेमाडेकाकांनी सांगितलेल्या निकषांवर मुली व्हर्जिन आहेत की नाही, हे त्यांच्या चालीवरून शोधायचं व्यसन लागलं. लग्न झालेल्या बायकांची चाल, मध्यमवयीन बायकांची चाल पाहून मग आमच्या वयातल्या मुलींची चाल पाहात त्यांची व्हर्जिनिटी तपासण्याचा मला छंदच लागला. या दरम्यान, वल्लरी नावाच्या आळीतल्या मुुलीच्या मी प्रेमात पडलो, ते तिच्या चेहऱ्याकडे अजिबातच न पाहता. जीन्स-टीशर्ट घालणारी वल्लरी स्टेशनजवळच्या कॉलेजात जाई. माझी शाळा त्या कॉलेजच्या वाटेतच अलीकडे होती. तिच्या जीन्समध्ये दिसणाऱ्या अद्‌भुत गालगुंडांकडे पाहात मी सकाळी शाळेत तरंगतच पोहोचायचो. संपूर्ण रस्ताभर ते त्राटक चालायचं. पुढे आळीतल्या पॉर्नवेड्या पिनाकला मी ते सांगितलं, तर त्याने माझ्या वाढदिवसाला जेदा स्टीव्हन्सपासून अ‍ॅव्हा रोझपर्यंत आणि अलेक्शिस टेक्सासपासून त्याच्या लाडक्या रेचल स्टारच्या शेकडो क्लिप्स मला सीडीमध्ये भरून भेट दिल्या. पुढे वल्लरी शेजारच्या लोकमान्य आळीतल्या मुलाला पटली, त्यानंतर महिनाभर त्या सीडीतल्या प्रत्येक क्लिपचा मी बारकाईने अभ्यास केला. पुढे दहावी ते संपूर्ण कॉलेजकाळात मी कुणावर प्रेम केलं नाही; आणि बेतास बात चेहरा आणि भरगच्च बॉडी असली तरी माझ्या नाव-आडनावामुळे कोणतीही मुलगी माझ्याजवळ फिरकली नाही. नेमाडेकाकांनी सांगितलेल्या गोष्टींना बरीच वर्षं झाली. आजवर कितीतरी संख्येने जीन्स, पंजाबी ड्रेसमधली गालगुंडं मी पाहिली. पण ‘व्हर्जिन’ आणि ‘अ-व्हर्जिन’ फरक चालीवरून हुडकायचं आजतागायत मला कळलेलं नाही. कदाचित नेमाडे काकांच्या तिकडम्‌ मानसिकतेतून तयार झालेल्या या विचित्र कल्पना असाव्यात. सगळे त्यांनी मनाचे रचलेले इमले असावेत, असा माझा कयास आहे. ते आता कसंही वाटलं तरी त्यांच्याकडून तेव्हा ऐकताना गंमतीशीर होई. राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सगळ्या चर्चा, वादांच्या विषयांत नेमाडेकाका आणि नाक्यावरची पोरं अश्लीलतेचा रंग भरत.

एक दिवस नाक्यावरच्याच कुणीतरी नेमाडे काकांना प्रश्न विचारला ‘नेमाडेकाका तुमचं येवढं वाचन आणि जनरल नॉलेज स्ट्राँग आहे, तर कबुतरांना झाटं असतात का, हे सांगू शकाल का?’
‘आज माझा मूड नाही. पण उद्याच तुला सांगतो’, करत दुसऱ्या दिवसापासून कबुतरांना झाटं असतात की नाही, या विषयावर त्यांनी सात दिवस चर्चा रंगवली.
एका कुत्र्याने आळी आणि आळीबाहेरच्या सर्वच कुत्रींना हतबल करून ठेवलं होतं. ‘त्या कुत्र्याची आणि एकूणच कुत्रा या प्राण्याची सेक्सबाबत मजा आहे’ असं कुणीतरी तेव्हा म्हणालं. त्यावर वाद घालताना, फक्त माणसाची सेक्सबाबत मजा असल्याचा नवा सिद्धांत नेमाडे काकांनी उकरून काढला.
‘तुम्ही जे हाताळायचे विचार करता, ते कुत्रा काय, कुठलाच सस्तन प्राणी करू शकत नाही. तेव्हा माणसाइतका त्याबाबतीत सुखी कुणीच नाही.’ असा प्रतिवाद करीत त्यांनी तो वादही जिंकला होता.
हिंदी चित्रपटांतल्या बलात्कार प्रसंगांत नायिका खलनायकाला ‘भगवान के लिये मुझे छोड दो’ म्हणते; हा डायलॉग कुणी पहिल्यांदा लिहिला याचा ते शोध घेत होते. या एका वाक्याचं विडंबन त्यांनी अनेक स्वरचित मौखिक गोष्टींत केलं होतं. त्यांतली सविता नावाची बाई त्यांची शरीराने सर्वगुणसंपन्न नायिका होती. तिच्यात फक्त एकच वैगुण्य होतं, ती बोबडी बोलायची. त्यांच्या अनेक गोष्टींत या सविताबाईवर बलात्कार होण्याचा समरप्रसंग येत असे. प्रत्येकवेळी आपल्या बोबड्या आवाजात ती बलात्काऱ्यांना ‘भगवान के लिये मुझे चोद्दो’ उच्चारे. बलात्कारी पुरुष भीतीने, पाप आणि गुन्ह्यापासून परावृत्त होत, सदाचारी राहात. सविताबाई आपल्या सौम्य व्यंगामुळे कशी बलात्कारापासून सुटका करून घेते आणि अनेक अनर्थ टाळते, अशी ती तात्पर्यकथा असे.

‘सखीचा सल्ला’ या कार्यक्रमामधल्या प्रश्नांचंही नाक्यावर दररोज न चुकता विडंबन होई. एकदा ‘स्त्रियांनी आपलं स्वरक्षण कसं करावं’ असा कसलासा एक विषय होता त्या कार्यक्रमाचा. तर नाक्यावर त्याचं व्हर्शन असं तयार झालं.
‘हॅलो, हॅलो विचाराना प्रश्न. पण पहिले तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा बरं.’
‘मी चमू बोलतेय, औरंगाबादवरून.’
‘हा विचारा, तुमचा प्रश्न, काय तो’
‘आपल्यावर होणारा बलात्कार कसा टाळावा?’
‘अत्यंत चांगला आणि आज कळीचा, घराघरात महत्त्वाचा बनलेला मुद्दा आहे तो.’
‘स्त्री आता अबला नाही, तर सबला झाली आहे. किती वर्षं हा पुरुषी अन्याय सहन करायचा? बलात्काराच्या ज्या बातम्या आपण टीव्हीवर पाहतो, वा पेपरात दररोज वाचतो, त्यांचं शीर्षक कितीवेळा तसंच राहू द्यायचं? त्यात बदल झालाच पाहिजे. आपल्याला त्या शीर्षकाला बदलता येईल. आपण महिलांनीच एकत्र न येऊन स्वतंत्रपणे ते आजमवून पाहायला हवे. आपल्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्या बाहेरच्या पुरुषांवरच नाही, तर आपल्या घरातल्या पुरुषाचा अत्याचारही आपण अशा पद्धतीने सहज टोलवून लावू शकतो.’
‘पण म्हणजे पेपरातलं शीर्षक कसं बदलणार? त्यासाठी काय करावं लागणार आणि बलात्कार त्यातून कसा टळणार?’
‘तुम्ही असं करा त्या अन्यायाच्या वेळी, की दुसऱ्या दिवशी पेपरातलं शीर्षक ‘बलात्काऱ्यांवर मलात्कार’ असं बनेल.’

नाक्यावर नेमाडे काकाच नाही, तर माझ्यासह आळीतली सगळी पोरं वखवखल्यासारखे बायका, पोरींकडे पाहात असू. त्यांच्यावर मनपसंतीची भंकस करीत असू. अखंड टीका करीत असू. तरी बाई आणि फडफडत्या पोरी हा विषय नाक्यावर अन्नातल्या मिठाइतका महत्त्वाचा होता. त्यांतला प्रत्येकजण स्त्रीवादाची खिल्ली उडवायचा. ‘मुली मुलांच्या खांद्याला कांदा लावून पुढे जातात’ हा नाक्यावरचाच एक आणखी अप्रकाशित सिद्धांत होता. तरी प्रत्येकाच्या मनात हलवायला एकतरी पोरगी, बाई, हिंदी चित्रपटांतली नटी कायम ठाण मांडून होती. बलात्काऱ्यांवर मलात्काराच्या आणि सविताबाईच्या बोबड्या बोलांतील चातुर्याच्या अनेक गोष्टी नाक्यावर रात्री उशिरापर्यंत रंगत. पुढे नाक्यावरच्याच एका घुम्या मुलाने काही वर्षांनी सविताभाभी नावाची एक अश्लील गोष्टी सांगणारी सचित्र वेबसाईट काढली. त्याने नेमाडे काकांना त्याचं कोणतंही श्रेय दिलं नाही.

काही महिन्यांपूर्वी पडलेल्या एका स्वप्नात मी पतंगी उडवत असताना आणि शर्याचे सारेच पेज कापत असताना नाक्यावरची सगळी गँग मला मंगलदास मॅन्शनच्या गच्चीवर उपस्थित दिसली. फारच भारी स्वप्न होतं ते. आता नाक्यावरच्या पोरांपैकी अर्ध्यांची लग्नं झालीत. ती सारी आपापल्या बायकांचा स्त्रीवाद जपतात. कधी काळच्या आपल्या मुक्तमौजी पुरुषी विचारांना आवर घालून किराणा माल आणि मुळा-शेपूच्या जुड्यांच्या पिशव्या घेऊन, कातावलेल्या अवस्थेत आपापल्या बायकांच्या मागे चालताना दिसतात.

नाका गजबजलेला होता. कुणीही, कुणाला न बोलवता, ठरलेल्या वेळेत आपसूक विहिरीजवळ येत होतं. पण आता प्रत्येकाने मोबाईलवर आपला नाका बनवला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत वा चॅट करण्यात प्रत्येकाने आपलं जग वाढवलं आहे. माझ्याजवळ अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल नाही, आणि मी फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकत नाही. पूर्वीही शाळेत-कॉलेजात आडनावामुळे मित्र कमी असल्यामुळे, कुणाशी बोलायला फेसबुक वापरायचं हा प्रश्न आहे; त्यामुळे मी सुरुवातीपासूनच फेसबुकच्या नादी लागलो नाही.

माझ्याशिवाय कुणीच नाक्याच्या ठिकाणी आता येत नाही. नेमाडे काका आमच्या पिढीतले नव्हते. तरी तेही आमच्यासोबत सहज मिसळायचे. मला त्यांच्यासारखं आमच्या पुढच्या पिढीच्या नाक्यावर कधीच उभंे राहता येणार नाही. कारण पुढच्या पिढीच्या पोरांनी इथे त्यांचा नाका बनवलाच नाही. सतत क्लासला पळणारी आणि मोबाईलवर असणारी आत्ताची पोरं एका ठिकाणी उभीही राहू शकत नाहीत पाच मिनिटं.

आता पतंगी उडवली जाणारी ठिकाणं फार कमी राहिली आहेत शहरात. पूर्वी ठाण्यातल्या ठाण्यात पतंगी उडवले जाणारे बालेकिल्ले होते. उथळसर, कॅसलमिल नाका, धोबी आळी, चंदनवाडी, चेंदणी कोळीवाडा, कोपरी, महागिरी, राबोडी या प्रत्येक विभागात तिथले तिथले ‘शर्या’ होते. या सर्व ठिकाणी माझे कोणते ना कोणते नातेवाईक राहात असल्याने, त्यांच्याकडे शाळेत असल्यापासून पतंगी उडवण्यासाठी खास जाणं होई. उथळसर नाक्यावर जयंतीलाल पतंगीवाला अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या दुकानासमोरच एक भाजीवाला बसायचा. म्हणजे त्याची अगदीच छोटीशी टपरी होती. या माणसाकडे भाजी घ्यायला कुणीही आलेलं मी कधीच पाहिलं नाही. पण त्याच्याकडे चाँदवाल्या पतंगींचा स्टॉक कायम असे. त्याच्याकडे मी कवटी मांजाची फिरकी पहिल्यांदा पाहिली. पण तेव्हा २० रुपये १०० आट्या असा त्याचा दर होता आणि ती छडी तो त्याच्या निवडक ग्राहकांनाच पुरवायचा. जयंतीचं दुकानही पतंगीचा मौसम सोडला, तरच किराणा मालाचं असल्याचं समजायचं. त्याने त्याच्या दुकानावर एक प्रचंड मोठी पत्र्याची पतंगी बनवली होती. त्यावर त्याचं भलं मोठं नाव लिहीलं होतं. त्याच्या घरातले सगळेच लोक सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी अंधार पडेस्तोवर मांज्यांच्या आठ्या मारत असत. बारीक मांजाचे १५-२० पर्याय तिथे होते. गुलाबी आणि बदामी मांजाची भली मोठी फिरकी होती आणि धागा-मांजा फिरकीत चटकन भरून देणारी इलेक्ट्रिक मशीनही होती. दिवसातल्या कोणत्याही प्रहरी जयंतीचं दुकान पतंगी खरेदी करण्यासाठी गजबजलेलं असे.

माझ्या आयुष्यात मी घरात एकदाच चोरी केली. एकोणीसशे आकड्यापुढे असलेल्या शेवटून दुसऱ्या दशकात आठ-दहा वर्षांचा असताना. आईच्या पैशांच्या डब्यातून पाच रुपये घेऊन मी एकटाच आळीतून जयंतीच्या दुकानापर्यंत पोहोचलो होतो. त्या पाच रुपयांचा बदामी रंगाचा मांजा मला हवा होता. तेव्हा पावाची आणि मिरच्या कोथिंबिरीच्या जुडीची किंमत चाराणे होती. पालेभाजीची कोणतीही जुडी पन्नास पैशांना मिळायची. मँगोला-गोल्डस्पॉट ही तेव्हाची हिट कोल्ड्रींक्स मोठ्या बाटलीत अडीच रुपयांना मिळायची. फाईव्हस्टार आणि डबलडेकर ही चॉकलेट्स दोन रुपयांना मिळायची. पारले-जी आणि ग्लुको-डी या बिस्किटांचे मोठे पुडे दोन रुपयांना मिळायचे. विब्सचा ब्रेडही दोन रुपयांना मिळायचा. या साऱ्या गोष्टी मी आमच्या घराजवळच्या राजूमामा या वृद्धाच्या टपरीवरून धावत घरी आणायचो, म्हणून त्यांच्या किंमती माझ्या लक्षात आहेत. किराणा मालही तेव्हा स्वस्तच असावा. पाच रुपयांना बरंच महत्त्व होतं आणि दहा-वीस पैसेही चलनात होते.

तर माझ्यासारख्याला चाराण्याचा मांजा आणि चाराण्याची पतंगी दोन दिवस पुरवता येण्याचा तो काळ होता. तसं असताना, मी चक्क मोठ्या गिऱ्हाईकासारखा पाच रुपये घेऊन आलो, म्हणून जयंतीने मला पकडूनच ठेवलं. माझा पत्ता विचारला आणि भेदरलेल्या अवस्थेतच मला घरी आणून सोडलं. त्या दिवशी मोरीमध्ये झाऱ्याने भरपूर मार खाल्ला. पण संध्याकाळी घरात बदामी मांजाची फिरकी आली. या घटनेनंतर वेळोवेळी पतंगीसाठी आठाणे-रुपया पॉकेटमनी मिळायला लागला. पण पतंगी पकडायला सुरुवात केल्यानंतर त्याचीही गरज वाटेनाशी झाली.

पतंगी पकडायला जायला लागलो ते सुहास भालेराव नावाच्या माझ्याच वयाच्या मित्रासोबत. आम्ही सुनिलकुमार या प्रसिद्ध शिक्षकाच्या विद्यासागर क्लासमध्ये एकमेकांना सहावीत असताना भेटलो. त्याचे वडील पोलीस होते आणि तो पोलीस लाईनमध्ये राहायचा. त्याच्या प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वास भरलेला असायचा. रस्ता क्रॉस करताना, गाड्यांना चकवत तो गुल झालेल्या पतंगीची छडी पटकावयचा. कितीही मोठी मुलं असली पतंगी पकडायला, तरी हा सुहास त्यांना गंडवत पतंगी पकडायचा. त्याने मला पतंगी पकडायची टेक्नीक शिकवली.

‘पतंगीच्या पाठी कधीच धावत जायचं नाही. डोळे बारीक मांजाचा शोध घेत, पतंगीच्या आजूबाजूचा भाग पाहात ठेवायचे. कितीही मुलं बाजूला असली, तरी मांजा पुरेसा खाली आल्यावरच त्यावर झडप घालायची. आधी झडप घातली तर मांजा हातात येत नाही. त्या झडप मारण्यावर श्वास वर-खाली होतो आणि आपल्यापेक्षा दुसरा स्ट्राँग मुलगा वेळ साधून पतंगी पकडतो. त्यामुळे झडप घालण्याचं टायमिंग परफेक्ट ठेवायचं’, हे त्याचं तत्त्वज्ञान होतं. काही मुलं छकडा (झाडाची लांबलचक फांदी) घेऊन पतंगी पकडायची. काठीमध्ये पतंगी गुरफटून, हे छकडेवाले नेहमीच लहान मुलांना पतंगी पकडू द्यायचे नाहीत. छकडेवाले असतानाही सुहास उत्तमरीत्या पतंगी पकडायचा. त्यासाठी विशिष्ट वेळेत छकडा धरणाऱ्या मुलांना ढकलायचा. तो मुलगा आपल्या हातातील छकड्याच्या वजनाने कलंडायचा. ती वेळ साधली की पतंगीचा मांजा सुरक्षितरीत्या सुहासच्या हातात असायचा. पंधरा द्वाड मुलांमधूनही, कागदाला थोडीही इजा न होऊ देता तो पतंगी पकडून आणू शकायचा.

क्लास सुटल्यानंतरच्या पंधरा-वीस मिनिटांत, हा सुहास पाहाता पाहाता दहा पतंगी सहज पकडून दाखवायचा. पैज लावून पतंगी पकडण्यातही तो एक्सपर्ट होता. त्या पकडलेल्या सगळ्याच पतंगी तो मला देऊन टाकायचा. त्यामुळे तेव्हा तो माझा सगळ्यात जिगरी दोस्त झाला होता. त्याला पतंगी नीट उडवता यायच्या नाहीत. पण पकडण्यात तो मास्टर बनला होता. त्या पतंगीचा सगळा मांजा गुंडाळून मी आठवडा-दोन आठवडे पुरवायचो. असा एक पतंगींचा मोसम त्याच्याकडून पतंगी पकडण्याची दीक्षा मिळविण्यात गेला. पण दुसऱ्या वर्षी सुहासच्या वडलांची बदली पुण्याला झाली आणि तो ठाणं सोडून निघून गेला. एकट्याने पतंगी पकडण्याचा माझा रसच संपून गेला.

याच काळात दूरदर्शनवर तिसरं चॅनल आलं. दिवसभर टीव्हीवर उत्तम कार्यक्रम लागायला लागले. केबल टीव्हीच्या वायर्स आकाशात वाढायला लागल्या. आळीत मंगलदास मॅन्शनच्या बाजूला मातृछाया-पितृछाया इमारती झाल्या. देवकी चाळीची पाच मजली देवकी अपार्टमेंट झाली. लोहार चाळीचा ब्लॅकस्मिथ टॉवर झाला. दरवर्षी पतंगींचा मोसम पुढे सरकू लागला आणि एकेकाळी पतंगींनी भरलेलं आकाश आता सुनंसुनं होत गेलं. जयंतीलाल पतंगवाल्याच्या दुकानातून मांज्याच्या फिरक्यांची श्रीमंती ओसरू लागली. त्याची पत्र्याची पतंगीही गंजून गेल्यानंतर काढून टाकण्यात आली. एकोणीसशे संपून दोनहजारोत्तर काळातील एका वर्षी जयंतीने पतंगीविक्रीचा व्यवसाय बंद केला. भाजीवाल्याची टपरी रस्ता रुंदीकरणात आधीच गेली होती. पतंगी खरेदी करण्यासाठी शहरात मोजकी चार-पाचच दुकानं उरली. तीही तोट्यात होती. एकट्या राबोडी भागात पतंगीविक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू होता आणि तिथला सलीम मियाँ आणि त्याचा चेला मक्सूद माझे मित्र बनले.

कॉलेजात असताना मी त्या राबोडी परिसरातल्या नजरत मंझिल नावाच्या इमारतीमध्ये जायला लागलो. तिथल्या गच्चीवर पतंगी उडवण्यासाठी मोसमातल्या कोणत्याही दिवशी पोहोचायचो. सलीम मियाँ आणि मक्सूद हे राबोडीतले अट्टल पतंगीबाज. त्यांचा नारळपाण्याचा आणि नारळाचाही व्यवसाय होता. त्यासाठी दोन आणि त्यालाच लागून असलेल्या पतंगी दुकानासाठी दोन नोकर त्याने ठेवले होते. मी तिथला नेहमीचा पतंगींचा गिऱ्हाईक असल्याने सलीम मियाँशी बोलणं भरपूर व्हायला लागलं. आमच्या एरियात माझं वर्षभर पतंगी उडवणं चालतं, हे मी सलीम मियाँला सांगितलं होतं. तेव्हा त्याने त्याचा चेला मक्सूद याच्याशी माझी गाठ घालून दिली. हा मक्सूद उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा गावातून आला होता. सलीम मियाँला नारळाच्या घाऊक खरेदीत तो पहाटे मदत करायचा. पण बाकी दिवसातला सारा वेळ तो पतंगी उडवत बसायचा. तेही सलीम मियाँच्या दुकानातून उचलून.

मी जेव्हा मक्सूदला पाहिलं तेव्हा मला तो मतिमंदच भासला. पण पतंगींबद्दल बोलायला लागल्यावर तो त्यांतला तज्ज्ञ असल्याची माझी खात्री झाली. नजरत मंझिलच्या चौथ्या माळ्यावर सलीम मियाँचं घर होतं आणि त्याच्या गच्चीवर एका कोनाड्यात केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये, मक्सूद त्याच्या पतंगी आणि मांजाच्या फिरक्यांची संपत्ती घेऊन राहात असे.
त्याला पतंगींचा डॉक्टरही म्हणता येईल. सलीम मियाँच्या दुकानातल्या फाटलेल्या पतंगींवर तो निष्णात डॉक्टर असल्यासारखी सर्जरी करायचा. अत्यंत लप्पू पतंगींना दुसरी काडी दोऱ्याने बांधून तो मुक्की बनवून टाकी. संपूर्ण फाटलेल्या पतंगींच्या काड्या त्यासाठी तो जमा करी. त्यातून वेगवेगळ्या आकाराच्या पतंगी त्याने बनविल्या होत्या. प्लास्टिकच्या पिशव्यांपासून बनविलेल्या त्याच्या पतंगी खूपच मस्त उडत.

रात्री तो नजरत मंजिलच्या गच्चीवरून भली मोठी पतंगी उडवी आणि त्याच्यावर पाच ते दहा कंदील सोडी. दिवसातल्या कुठल्याही वेळी पतंगी उडवण्याची त्याची असोशी माझ्या पतंगी उडवण्याच्या वेडापेक्षा भीषण होती. एकदा पावसाळ्यात मी नजरत मंझिलमध्ये त्याला भेटायला गेलो. तर त्याच्या शेडमधल्या खाटेवर झोपून तो आपल्या दोन्ही हातांना पतंगींसारखा उडवत होता. मी जेव्हा त्याला हाक मारली तेव्हा त्याच्या पतंगतंद्रीतून तो जागा झाला.
‘बारीश मे पतंग नही उडाने को होती.’
‘प्लास्टिक की उडा सकते हों’.
‘मांजा भीग जाएगा कल्लूभाय,’
‘तू इतनी पतंग क्यू उडाता है?’
‘इतनी? हमारे गांव मे तो सोतें नहीं पतंगबाज. पुरा दिन-रात पतंगबाजीयाँ चलती है.’
‘यहाँ शहरमे तो तुमने कुछ भी पतंग देखी ही नही. हमारे गोरखपूर मे चलों.
ह्या मक्सूदने त्याच्या गावातल्या पतंगीबाजांचे किस्से ऐकवले ते शर्याच्या पतंगबाजीपेक्षा भन्नाट होते. मी तर मनापासून त्याच्या गावाला जाण्याची तयारी करीत होतो. मक्सूदमुळे मला कुर्ला, डोंगरी आणि वांद्रा भागातले घाऊक पतंगीवाले कळाले. माल घेण्यासाठी तो आणि सलीम मियाँ तिकडे जायचे. मी कॉलेजला बुट्टी वगैरे मारून त्या घाऊक पतंगी बाजारात त्यांच्यासोबत वावरायचो.

त्यांच्यासोबत साबणशेट या पतंगीवाल्याच्या पतंगी-फॅक्टरीमध्ये मी एक दिवस गेलो. तिथले पतंगी बनविणारे कारागीर पाहिले. मधली काठी म्हणजे ‘थड्डा’, वाकवलेली काठी म्हणजे ‘कमान’, ही पतंगींबाबत नवीच शब्दसंपदा मला कळाली. पतंगीला दोरा बांधणाऱ्या आणि थड्डा जोडणाऱ्या बायका, त्यांना शेपटी बांंधणारे वेगळे कारागीर, डिझाईन करणारे वेगळे आणि कमान बांधणारे वेगळे हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. एक रुपयाची पतंगी दहा हातांमधून निघून तयार होते. चाँद-तारा बनवणारे स्पेशल कारागीर आणि चांदीची पतंगी बनवणारे, ढप बनवणारे वेगळे हे मला कळालं. त्यातला प्रत्येक जण मला घुम्या वाटला.

‘अफू लेते वो लोग; और एक दिन मे एक कारगीर दो हजार पतंग बनाता है.’ ही मक्सूदने दिलेली माहिती धक्कादायक होती. साबणशेटला मुंबई-ठाण्यातील पतंगीच्या घसरणाऱ्या विक्रीची चिंता नव्हती. राज्यभर त्याचं मोठे गिऱ्हाईक होतं. सोलापूर, नागपूर, पुणे, नाशिक, मालेगाव येथे मोठा माल टाकला जायचा त्यांच्याकडून. बरेलीवरून मांजाची आणि साखळीछाप धाग्याची प्रचंड मोठी ऑर्डर ते मुंबईत आणायचे आणि संपूर्ण मुंबई-उपनगराला त्यांच्याकडूनच घाऊक माल मिळायचा. साबणशेटच्या डोंगरीच्या दुकानात मी पहिल्यांदा इराणी चहा प्यायलो. त्याला म्हणे, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता पतंगी-विक्रीत अभूतपूर्व काम केल्याबद्दल.

मक्सूद आणि सलीम मियाँमुळे माझ्या पतंगीज्ञानात आणि प्रेमात प्रचंड वाढ झाली; ती तीन-चार वर्षं नजरत मंझिलमध्ये सतत येण्या-जाण्यामुळे.

मग एकदिवस सलीम मियाँ हार्ट अ‍टॅकने गेला. लियाकत नावाचा त्यांचा दूरचा नातेवाईक भिवंडीवरून सलीम मियाँच्या घरात आला. त्याने सलीम मियाँचा नारळ व्यवसाय पहिले ताब्यात घेतला. शिवाय पतंगीचा व्यवसाय बंद केला. त्याचं आणि मक्सूदचे पतंगी उडवण्यावरून वाजायला लागलं. पतंगीचा मोसम नसतानाच एक दिवस, नजरत मंझिलमधून लियाकतने मक्सूदला हाकलून लावलं. हाकलला गेल्यामुळे नाही, पण पतंगी आयुष्यातून गेल्यामुळे मक्सूद वेडापिसा झाला. आधीच काठीसारखी असलेली त्याची शरीरयष्टी आणखी कृश झाली होती. माझं नजरत मंझिल सुटलं ते सलीम मियाँच्या जाण्यामुळे. पुढे राबोडीच्या परिसरातच जाणं बंद झालं. नंतर काही महिने मक्सूद त्या भागात वेड्यासारखा फिरत होता म्हणे. शोध घेतला तेव्हा त्याला कुणीतरी तिथून गावाला नेला, अशी माहिती मला मिळाली. आमच्या विभागातली पतंगबाजी आटायला लागली असताना, नजरत मंझिलमधून राबोडीत टिकून राहिलेल्या पतंगीसंस्कृतीचा मी तीन-चार वर्षं भरपूर अनुभव घेतला. नंतर तिथेही टॉवर आणि केबलच्या वायरींनी आक्रमण केलंच. पण सलीम मियाँसारखे पतंगीबाज दुकानदार आणि मक्सूदसारखे पतंगीये चेले टिकून न राहिल्यामुळे पतंगबाजी खरी अस्ताला गेली, असावी असं माझं मत आहे. मक्सूद कुठे असेल, याची जराही कल्पना नाही. पण माझी त्याच्याबतची शेवटची आठवण म्हणजे भर पावसात शेडमधल्या खाटेवर झोपून तळहातांना पतंगींसारखे उडवत, उजव्या हाताच्या काल्पनिक पतंगीची डाव्या हाताशी पेज लावत त्याचा सुखी चेहरा पाहिल्याची.

दोन हजार आकड्यापुढच्या पहिल्या दशकात मला एका छोट्याशा साप्ताहिकात मुद्रितशोधकाची नोकरी मिळाली. बी.ए. मराठी असल्यामुळे किंवा त्या साप्ताहिकाला कुणीच मुद्रितशोधक मिळाला नसल्यामुळे, ती नोकरी माझ्या हाती चटकन आली. अत्यंत तुटपुंजा पगार होता तिथे. मग विविध अर्ज करून झाल्यावर चार महिन्यांनी एका दुसऱ्याच शहरात प्रमुख केंद्र असलेल्या पेपरात लागलो. काही वर्षांनी मुंबईवर राज्य करणाऱ्या शक्तिशाली वृत्तपत्रात, आधीच्या तुलनेत बऱ्या पण पेपरच्या नावाच्या दृष्टीने अगदीच थोड्या पगारात मला नोकरी मिळाली. सुरुवातीला मी मोठ्या पेपराचा अनुभव मिळेल म्हणून आणि कालांतराने पगार वाढत राहील या आशेवर ही नोकरी धरली. पण कालांतरानेही माझ्या पगारात कणाने वाढ झाली नाही. या नोकरीवर आल्यानंतरही मला पतंगबाजीचीच आठवण यायची. तिथलं राजकारण त्यासारखंच होतं काहीसं.

त्या वृत्तपत्राला पंचवीस प्रूफरिडर्सची गरज असताना केवळ दहामध्ये काम भागवलं जात होतं. त्यात आठ जण व्हेजबोर्डावर होते. आम्ही सारखंच प्रूफ रिडिंगचे काम करत होतो; तरी त्यांचा पगार माझ्या साताठ पट होता. मी आणि पोयरेकर नावाचा आणखी एक माझ्याच वयाचा पोरगा कंत्राटी होतो. आम्हाला कँटिंगपासून कोणत्याच सोयीसुविधा नव्हत्या. व्हेजबोर्डवाल्यांपेक्षा जास्त तास आम्हाला राबवलं जात होतं. तरीही मी तिथे निमूट खाली मुंडी घालून काम करत होतो. माझ्या मुद्रितशोधनामध्ये कोणत्याही चुका निसटत नसत. वर वाक्यरचनेत दोष असेल, तर तोही मी उपसंपादकांच्या कानावर घालत असे. त्यामुळे तिथले मुख्य उपसंपादक शिरगावकर माझे चांगले मित्र बनले. ते मला वाचायला भरपूर पुस्तकं देत आणि 'पुरवणीसाठी लिहाल का', असंही विचारत. त्यांच्यासाठी रक्षाबंधन आणि दसरा पुरवणीसाठी मी दोन लेख दिले होते. त्यांना ते इतके आवडले की त्यांनी संपादकांना मला प्रूफरिडर पदावरून उपसंपादक बनविण्याची शिफारस केली. त्या वृत्तपत्रात उपसंपादकही गरजेपेक्षा कमी असल्याने वरिष्ठ पातळीवर काही सूत्रंही हलली.

मी गांभीर्याने मुंबई विद्यापीठाचा पार्टटाइम पत्रकारितेचा सहा महिन्यांचा कोर्स केला आणि बातम्या लिहिण्याची, रोजचा पेपर पूर्णपणे वाचून काढण्याची आणि इंग्रजी बातम्यांचं भाषांतर करण्याची प्रॅक्टिस सुरू केली. पण पुढल्या काही महिन्यांत आमच्या वरिष्ठांनी अशी काही चक्रं फिरवली की माझी उपसंपादक म्हणून होणारी बढती टांगून राहिली. शिरगावकरांनी खूप प्रयत्न केले. पण काम पुढे सरकलं नाही. आमच्या प्रूफरिडिंग विभागाचे प्रमुख मांढरे, त्यांचे चेले सोनवणे, चिकणे, मुकादम आणि मोकाशी यांनी माझं गाडं रोखून धरलं. पैकी मुकादम, मोकाशी या दोघांनीही पत्रकारितेचा कोर्स केला होता. पण त्यांना तिथे संपादकीय विभागात कुणीच उभं केलं नाही. मला त्या दोघांचा उबग येईल इतक्या शिव्या ते उपसंपादकांना देत.
‘साधी वाक्यरचना धड लिहिता येत नाही, तरी उपसंपादक झालेत लेकाचे.’
‘वशीला ओ. सगळी नावं पाहा त्या विभागातली. देशपांडे, जोशी आणि दामल्यांचीच भर आहे सगळी. शिवाय सगळे संघवाले. त्यांत आपल्याला विचारतोय कोण?’

वर्षात तिथे मी ही वाक्यं किमान शंभरवेळा ऐकली असतील. उपसंपादकांची उणीदुणी काढणं हा एकमेव उद्योग ही प्रूफरिडर मंडळी करत. पत्रकार संघात यांच्या मताला किंमत म्हणून हेदेखील स्वत:ला पत्रकार समजत. वर यांची मिजास पत्रकारांच्या वरताण.

एकालाही साहित्य किंवा कुठल्याही वाचनाचा छंद नाही. प्रत्येकजण उपसंपादक न बनता आल्यामुळे उपसंपादकांना शिव्या घालण्याचा आणि आपण कसे पात्र आहोत या पदाकरता याचा बडेजाव मांडत वेळ फुकट घालवत होता.
त्या वृत्तपत्रात मी शेवटचा लेख लिहिला तोही पतंगींवरच. त्यानंतर दुसऱ्या कमी महत्त्वाच्या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून रुजू झालो. तर त्या मोठ्या वृत्तपत्राच्या पुरवणीसाठी लेख लिहिण्यासाठी मी पुन्हा मुंबई-ठाणे आणि उपनगरांतल्या पतंगीवाल्या दुकानांना, डोंगरीतल्या घाऊक पतंगी बाजाराला भेट दिली. तेव्हा पंतगींची निम्मी बाजारपेठ खालावली होती. साबणशेटची पुढची पिढी पतंगीसोबत मोबाईल कव्हरचा घाऊक बिझनेस करत होती.

राज्यातले काही भाग सोडले, तर पतंगींचे बालेकिल्ले संपुष्टात येत होते. मकर संक्रांतीसाठी काही कॉर्पोरेट कंपन्या पतंगी नेत होत्या. सव्वीस जानेवारीसाठी तिरंगी पतंगींना फक्त सजावटीसाठी मागणी होती. पण एकूणच उपनगरांत माल जाणं बंदच झालं होतं.
‘अभी कोई पतंग नई उडाता. वो पतंग उडाने का भी व्हिडीयो गेम आ गया है ना.’ साबणशेटच्या मुलाने मला सांगितलं.
ठाण्याच्या जयंतीलाल गालाला, त्याच्या किराणामालाच्या दुकानात जाऊन गाठला. तो आता भरपूर म्हातारा झालाय. त्याला पतंगीविषयी विचारले, तर त्याचा चेहरा खूप खुलला.
‘तुम्ही माझ्याकडून पतंगी न्यायचा का? साऱ्या शहरात पतंगी जायची माझ्याकडून. पतंगींच्या बिझनेसमुळे मी दोन घरं घेतली. एक गाळा घेतला. पण आता तो मेन बिझनेसच गायब झाला आहे.’
‘तुम्ही बंद का केलंत पण पतंगी विकायचं?’
‘वीस वर्ष बिझनेस केला मी पतंगींचा. रात्री शेवटची गाडी पकडायचो डोंगरीवरून. माल आणायचो पतंगी-मांजाचा तिथूनच. जेव्हा भरभराट होती, तेव्हा मजा वाटायची. सारखं सारखं जावं लागायचं माल आणायला, इतका धंदा होता पतंगीचा. आता कोण उडवतो पतंग? अजून वर्षात मकरसंक्रांतीच्या आधी येतो कोण-कोण विचारत. पतंगी ठेवता का? माझं मन त्यातून उडालंय. एका वर्षी खूप लॉसमध्ये गेला धंदा. टाकलेलं भांडवलही आलं नाही. सगळ्या पतंगी दुसऱ्या वर्षापर्यंत खराब झाल्या. आता पतंगी उडवणारेपण राहिले नाहीत आणि आत्ताच्या पोरांना पतंगी उडवायला वेळ आणि जागा पण राहिलेली नाही.’

जयंतीलाल, साबणशेट आणि इतर दोन-चार दुकानांच्या मालकांशी बोलून मी पतंगीच्या ऱ्हासाची स्टोरी लिहीली. त्यात संगणक, मोबाइल, व्हिडीओगेम यांनी मूळ खेळांवर घाला कसा घातला, पतंगी उडवण्याची हौैस कशी संपत गेली, टॉवर्स आणि केबल वायरींमुळे या छंदाची कल्हई कशी झाली त्यावर मुद्देसूद लिहून काढलं. पतंगींसोबत एक भाषासंस्कृती कशी नष्ट होत आहे, याकडे लक्ष वेधून घेतलं. पतंगींना आणि त्यातल्या गोष्टींना दरएक गल्लीआड, प्रांताआड त्यांच्या आकार, रंगसंगतींनुसार नावं होती. अर्धा फोकस, हॅण्डीक्लास, रॉकेट, कावळे, बाण, दुरंगा, तिरंगा, चौैरंगा. ही सगळी नावं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत होती. आता पतंगी उडवणंच कमी झाल्यामुळे ती प्रक्रिया संपुष्टात आली. पतंगींच्या संपण्यासोबत तो शब्दसंसारच नष्ट होईल, असं मी त्यात म्हटलं. या लेखाला खूप प्रतिक्रिया आल्या. पण आमच्याकडे सगळ्यांनी माझी खिल्ली उडवली.

नंतर नंतर अनेकदा माझ्या आडनावावरून ऑफिसात माझी चेष्टा होत असल्याचं पोयरेकरने मला सांगितलं. एकदा उघड उघड मांढरेंशी झालेल्या एका वादात त्यांनी माझ्या आडनावाचा उद्धार केल्यामुळे मी तिथल्या नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर पोयरेकरने मला आडनाव बदलण्यासाठी काय करावं, वृत्तपत्रात जाहिरात कशी द्यावी, याची सारी प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानुसार मी आडनाव बदलायसाठी अर्जही घेऊन आलो होतो.

जरा बऱ्या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून रुजू झाल्यानंतर घरात माझ्यामागे लग्न करण्याचा धोशा अधिक लागला. त्यात फॉल्टीसुंदऱ्या आणि अडलेल्या बापांशी बोलण्याची संधी मिळाली. पाच-सात मुली पाहून झाल्यानंतर मी मुली पाहाण्याचंच सोडून दिलं. आमच्याच हापिसातल्या एका परितक्त्या स्त्रीवर माझं प्रेम जुळलं. त्या विजोड प्रेमकहाणीत तपशिलात सांगण्यासारखे काही नसलं तरी हा काळ माझ्या आयुष्यातला सर्वांत सुखाचा होता.

डावल आडनाव न पाहता तिने माझं प्रेम पाहिलं असेल कदाचित. ती लगेचच हो म्हणाली. हे यशस्वी ठरतं तर आमच्या संपूर्ण डावल कुटुंबियांत पहिला प्रेमविवाह माझ्याकडूनच होणार होता. आमची सुट्टी एकाच दिवशी असल्याने आम्ही खूप फिरायचो. मुंबईतल्या सगळ्या बागा, सगळी ठिकाणं आम्ही पालथी घातली. दोनेक महिन्यांत मी पूर्णपणे तिच्या अधीन झालो. मी तिला लग्नाची मागणी घातली. तिने आधी त्याला नकार दिला नाही. पण तिच्या घरच्यांनी माझ्या आडनावावरून बराच कल्ला केला आणि तिचं बरंच ब्रेनवॉशिंग झालं. त्यानंतर तिचं वागणं तुटक व्हायला लागलं. तिने दुसरी नोकरी धरली. वृत्तपत्र क्षेत्राहून अधिक पगार देणारी बँकेतली. ऑफिस बदलल्याने एकमेकांची सुट्टी वेगळी झाली. भेटणं कमी व्हायला लागलं. मग त्यावरून भांडण व्हायला लागली आणि एकदिवस तिनेच माझ्याशी ब्रेकअप करून टाकलं. ‘तुमचं आडनाव बदललं तरी मी तुमच्याशी लग्न करणार नाही. तुम्ही आवडत नाही आता,’ असं तिने मला सुनावलं.

एकटेपणाची कित्येक वर्षांची सवय असतानाही त्या दोन-चार महिन्यांमधल्या घटनांनी माझं आयुष्य बिघडवून टाकलं. मग साप्ताहिक सुट्टीमध्ये पतंगी उडवून किंवा उडणाऱ्या पतंगी पाहून ते दु:ख विसरून टाकायचा पण मी केला. हल्ली सुट्टीच्या दिवशी अख्खा दिवस कुर्ला स्टेशनच्या जवळ दिसणाऱ्या डोंगराकडच्या रस्त्यावर एका बागेत मी बसतो. त्या डोंगरावरून आणि त्याच्या आजूबाजूच्या मुस्लीमबहुल झोपडपट्टीतच भरपूर पतंगी उडतात. त्या पाहत बसतो अंधार पडेस्तोवर. वांद्रा स्टेशनजवळची झोपडपट्टी, कल्याण स्टेशनजवळच्या मॉलसमोर असणारी वस्ती, ठाण्यातला राबोडी परिसरातला काही भाग अद्याप पतंगींनी समृद्ध आहे. कधी कधी तिकडेही चक्कर मारतो. पतंगी उडताना पाहण्यासाठी. या पतंगी उडताना पाहायची मजा काही और असते. त्या पेज कापतात तेव्हा ऐटीत दिसतात आणि गुल झाल्या की पराभूत सैनिकाच्या आवेशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भिरकावल्यागत दिसतात. पतंगी आकाशात पाहिली, तर खरंच माझं दु:ख नाहीसं होतं. आत्ता शिल्लक राहिलेल्या या पतंगबाजीच्या खेळामुळे मी अनेक त्रासदायक गोष्टी पचवू शकतो.

सुट्टीत पतंगबाजी पाहण्याचे हे कार्य आटोपलं की मी आळीतल्या नाक्यावर येतो. तिथल्या बाकड्यावर बसतो. नाक्यावरचे जुने शिलेदार बाईकवरून, कारमधून किंवा चालत आपल्या बायका-मुलांसोबत घरी जाताना हात करतात किंवा कधी कधी ओळख दाखवण्याचंही विसरतात. मी मात्र, त्यांना ते एकटे असतील तरच थांबवतो. ‘नाक्यावर येत नाय रे हल्ली?’ हे विचारतो. कुणी उत्तर देतं. कुणी माझ्या सेंटीपणाची माझ्यासमोरच खिल्ली उडवतात. कुणाल ओक, कौशिक खर्डे, रवळेकर, वैराळे यांच्याशी त्यांना आवडणाऱ्या बॉक्स क्रिकेटच्या जुन्या आठवणी काढतो. मंगलदास मॅन्शनच्या गच्चीवरून शर्याच्या कापलेल्या पतंगींची आठवण येतेच. पाच मिनिटांच्यावर माझ्याशी बोलण्यात कुणालाच रस नसतो. मोबाईल आल्याचं दाखवत, व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करायचं भासवत, सगळे आपापल्या घराकडे पांगायला लागतात. गेल्या वर्षी आई-बाबा दोघेही दोन महिन्यांच्या अंतराने गेल्यानंतर मी आता पूर्णपणे एकटाच आणि काहीही करण्यासाठी स्वतंत्र आहे. आडनाव बदलण्याचा अर्ज मी भरला होता; त्याच दिवशी फाडून टाकला. वृत्तपत्रात काम करत असल्याने थोडा वाचनछंद आहेच. पण त्याहीपेक्षा एकटेपणावर उतारा म्हणून रात्री मी पॉर्नसाइट्सना शरण जातो. कधीतरी उशिराने मोकळं झाल्यावर मला झोप लागते. तेव्हा पतंगीच्या स्वप्नांमध्ये मला मी सापडतो. वास्तव जगात एकेकाळी पतंगबाजीमध्ये माझा आदर्श असलेला शर्या बेवडा मारून आमच्याच एरियाजवळच्या चित्रपटगृहाबाहेर पडलेला असतो. काही सेकंदांमध्ये, तुम्हाला नकळत आसमानी गोद मारत तुमची पतंगी घसटून टाकणारा अनिल जुन्या-नव्या घरांच्या दलालीचं काम करताना दिसतो. पण माझ्या स्वप्नांमध्ये ते पतंगबाजीतले तसेच चॅम्पियन म्हणून असतात. अन् मीदेखील कधीकधी त्यांच्यासारखाच चॅम्पियन पतंगीबाज होतो, ते वेगळं.

केवळ पतंगबाजीच नाही, तर एकूण पूर्वी होतं ते सगळं काहीच शिल्लक राहणार नाही, याची मला जाणीव आहे. तरी अजून पतंगी उडणारे कमी होत चाललेले पट्टे, शहर आणि उपनगरांत टिकून आहेत, तोवर तिथं मी पतंगी पाहायला जाईन. पण ते कधी संपलेच तरी माझी स्वप्नं आणि त्यात पतंगी दिसणं संपणार नाहीत. मला तेवढा दिलासा पुरेसा आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

जबरदस्त!

कथामालिकेचा भाग का नाही हे समजलं नाही. नेमाडेकाका वगैरे पात्रं तीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जबरदस्त!

कथामालिकेचा भाग का नाही हे समजलं नाही. नेमाडेकाका वगैरे पात्रं तीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमचा काळा मांजा कसला कापतोय हो!
हळहळू सर्व उरत जाणार फेसबुक सेल्फीपुरतं.
मला पतंग करायला यायचा पण ते दोन हाताने मांजा भराभर खेचून वर घ्यायला जमायचं नाही. ते धाकटा भाऊ करायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं लिहिलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फार सुंदर जमलय हे सर्व लेखन हे जे काय आहे त्याची भट्टी छानच जमलीय एकाच वेळी इतकं विनोदी आणि ट्रॅजिक काही ठिकाणी कॅरेक्टर्स एकदम नजरेसमोर लक्ख धडधडीत उभी केलीत तुम्ही खरच

कधीतरी उशिराने मोकळं झाल्यावर मला झोप लागते. तेव्हा पतंगीच्या स्वप्नांमध्ये मला मी सापडतो. वास्तव जगात एकेकाळी पतंगबाजीमध्ये माझा आदर्श असलेला शर्या बेवडा मारून आमच्याच एरियाजवळच्या चित्रपटगृहाबाहेर पडलेला असतो. काही सेकंदांमध्ये, तुम्हाला नकळत आसमानी गोद मारत तुमची पतंगी घसटून टाकणारा अनिल जुन्या-नव्या घरांच्या दलालीचं काम करताना दिसतो. पण माझ्या स्वप्नांमध्ये ते पतंगबाजीतले तसेच चॅम्पियन म्हणून असतात

या ओळीतुन आलेल वर्णन तर फारच व्याकुळ करणार जमलय आकाशात मुक्त आकाशात विहरणार्‍या मुक्त पतंगाच बालपणाच प्रतिकं सुंदर प्रतिक व त्याला त्या स्वप्निल मुक्त सुंदर बालपणाला त्यातल्या हिरो ला गोठवणारा वास्तववादी कॉन्ट्रास्ट फारच प्रत्ययकारकतेने सर्व उभ केलयं. पण एका दमात कंटिन्युइटी मध्ये वाचला तरच त्या कॅरेक्टर शी मन जुडल्यावरच मग यातील तीव्रता जाणवते. मी विचार करतो तुकड्या तुकड्या त हा लेख्/कथा वाचला असता तर असा "इफेक्ट' कदाचित आला नसता. मारीया व्हर्घास च्या आंट ज्युलिया अ‍ॅन्ड स्क्रीप्ट रायटर या कांदबरीतलं लेखकाच पात्र डोळ्यासमोर तरळुन गेल.
अर्थात हे मला माझ्यापुरत वाटलेल लेखकाला कदाचित काही वेगळही अभिप्रेत असेल
सुंदर मात्र एकदम बेस्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही जबरी लिहीता. मुलांचे चावट भावविश्व आणि त्यातील पात्रं , त्यांच्या अश्लील गप्पा हे तर पहील्यांदा वाचले. म्हणजे "गन्नम ष्टाइल" मध्ये पहील्यांदा व आता दुसर्‍यांदा. आमच्या कॉलेजमध्ये एका मैत्रिणीबरोबर झालेल्या गप्पात "मुले असे बोलतात" असे ऐकून होते पण इथे फर्स्ट हॅन्ड माहीती मिळतेय.
.
लहानपणी आमचे जोक म्हणजे बर्‍यापैकी "केशव जोक " असत. उदा <लाजत लाजत/ आढे वेढे घेत> पुढील नॉनव्हेज जोक- एकदा एका शेतकर्‍याकडे एक माणूस रात्री थांबण्याकरता येतो. तेव्हा शेतकर्‍याची बायको मुलीला सांगते "ऐक! पुरुषांचा भरोसा नाही तेव्हा त्याने हाताला स्पर्श केला तर "सफरचंद" म्हणुन ओरड, गालाला लावला तर "चिक्कु", हाताला लावला तर "आंबा" ....." वगैरे जंत्रीवजा सूचना ती मुलीला देते. रात्री मुलगी "फ्रुट्सॅलड' म्हणुन ओरडु लागते. <लाजत लाजत हशा>
.
अगदी एखादी मुलगी "बोल्ड" असेल तर-
एकदा एका मुलाचं मुलीबरोबर लग्न होतं. घरी कोणाला कळू नये म्हणुन ते सांकेतिक भाषा ठरवितात "पोळ्या कर मला भूक लागली." मुलीला सारखच हवे असते. एकदा ती म्हणते "अहो पोळ्या करु का?" तर नवरा म्हणातो "तूप संपलय"
हा जोक ३ मुलींपैकी एकीच्या डोक्यावरुन गेला की तिला मिनतवारीने अज्जिबात शब्द न घेता समजावुन सांगावा लागे.
....एकंदर सोज्वळपणा लक्षात आला असेलच.
.
शेवटची काहीतरी हरविल्याची भावना खासच. कथा खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जब्बरदस्त लिहिलंय. प्रचंड आवडण्यात आलेला आहे लेखनाचा बाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचाट, अफाट, जबराट, भन्नाट अन अजून कायकाय. जगन्नाथसंप्रदायी असतानाचे भावविश्व अतिशय अचूक टिपलेले आहे. मान गये. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अति उत्तम ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0